Welcome To India

Submitted by Tushar Damgude on 7 May, 2020 - 02:43

आज माझा या परदेशतील शेवटचा दिवस होता. विमानात बसल्या बसल्या इथे घालवलेला काळ एखाद्या चित्रपटा प्रमाणे माझ्या नजरेपुढून सरकू लागला.

भारता पासून हजारो मैल लांब असलेल्या या परदेशात गेली कित्येक वर्षे मी इथे कामानिमित्त काढली. सुरवाती सुरवातीला हा अनोळखी देश, इथली अनोळखी लोकं आणि अनोळखी संस्कृती बघून दचकायला होत होतं. त्यामुळे मी थोडासा बुजूनच वावरत असे. पण ती अवस्था जास्त काळ टिकली नाही कारण सुदैवाने काही दिवसांनीच एका मॉल मध्ये गरजेच्या वस्तू खरेदी करायला गेलो असताना मुळचा पाटना येथील असलेला एक बिहारी व्यक्ती मला भेटला.

कितीतरी दिवसांनी आम्हा दोघांनाही कोणीतरी भारतीय व्यक्ती भेटला होता. अत्यंत जिव्हाळ्याने हिंदी इंग्रजी मध्ये पोटभरून गप्पा झाल्या. तो रहायला माझ्यापासुन साधारणपणे दोन तास अंतरावर होता, त्यामुळे आमचे एकमेकांना नेहमी भेटणे शक्य न्हवते परंतु वेळातवेळ काढून आम्ही सुट्टीच्या दिवशी भेटत असु आणि गप्पा, भारतीय जेवण आदी करत वेळ घालवत असू.

नंतर आमच्या या दुकलीला तिसरा भिडू भेटला. तो तिसरा भिडू म्हणजे एक मल्याळम मुलगी होती. भाषेच्या अडचणीमुळे सुरवातीला आम्ही दोघं हिंदी मध्ये काय गप्पा मारतोय ते तिला कळत नसे आणि मग आम्हाला खिजवण्यासाठी म्हणून ती मल्याळम मध्ये काय बोलतेय ते आम्हाला कळत नसे पण आम्ही देखील आम्हाला तिचे समजलेय असा अविर्भाव करून तशीच वेळ मारून नेत असु.

तसं बघायला गेलं तर आम्हा तिघांच अशा पद्धतीने एकमेकांना धरुन राहणं नैसर्गिक होतं कारण आपापल्या देशाच्या,वंशाच्या,भाषेच्या व्यक्तींचं कोंडाळ बनवून त्यातच जगणाऱ्या लोकांच्या घोळक्यात हजारो मैल दूर असलेल्या देशात 'फक्त भारतीय' म्हणुन आम्ही देखील आमचं कोंडाळ बनवणं नैसर्गिक होतं.

त्या सगळ्या काळात आम्हाला काही अडचण आली, गरज भासली , दुखलं खुपलं तर आम्हीच एकमेकांची काळजी घेतली. आमचे वेगवेगळ्या राज्यातील भारतीय अन्नपदार्थांचा वारसा सांगणारे पदार्थ तर वाटून घेतलेच पण आमची सुख दुःख सुद्धा आम्ही वाटून घेतली.............. कुणालाही हेवा वाटावा अशी आमची मैत्री होती !
_____________________

अखेरीस माझं विमान छत्रपती शिवाजी विमानतळावर लँड झालं. सगळ्यांच्या मागोमाग निवांत चालत मी येत होतो, घरी जाण्यासाठी मला घाई गडबड करण्याची आवश्यकता नव्हती. कारण माझी वाट बघणारे विमानतळावर सोडा घरी देखील कोणी नव्हतेच. मी बॅग घेऊन लॉबीतून बाहेर पडलो आणि कॅब शोधू लागलो तेवढ्यात अचानक काही महिला व पुरुषांनी मला गराडा घालून माझ्या गळ्यात फुलांचे हार घालायला सुरवात केली. त्या घोळक्यातील काही लोकांच्या हातात माझे संपूर्ण नाव लिहिलेले स्वागताचे प्लायबोर्ड होते.

हे लोक कोण आणि हा काय प्रकार आहे ते समजावं म्हणून मी त्यांना विचारले "अहो हे काय चाललंय ?"

ते एकसुरात म्हटले " तुम्ही तुषार दामगुडे ना ?"

मी म्हटलं " हो मीच आहे तुषार दामगुडे "

मी उत्तर दिल्याबरोबर ते एकमेकांकडे पाहून सुचक हसू लागले.

मग मी जरा घुश्शातच त्यांना विचारले " अहो पण तुम्ही सगळे कोण आहात ?"

मग त्यांनी मला त्यांची ओळख करून दिली

" हे पहा हा तुमचा धर्म आहे , ती तुमची जात आहे , ती तुमची पोटजात आहे ,ती तुमची भाषा आहे , ते तुमचे गाव आहे, ते तुमचे शहर आहे , ते तुमचे राज्य आहे , मी या सगळ्यांची आई 'अस्मिता' आहे आणि हे माझे पती 'अहंकार' ! इथुन पुढे आम्ही कायम तुमच्याबरोबरच राहणार आहोत , Welcome To India "

आणि मला तिथेच भोवळ आली

तुषार दामगुडे

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>Submitted by भरत. on 7 May, 2020 - 23:12>>
हे कळेल नकळेल अशा प्रकारे इथे पूर्वीपासून सुरु आहे. आता देशी लोकं वाढल्याने ठळकपणे लक्षात येते इतकेच. केवळ दलितच नाही तर ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर असेही अनुभवले आहे किंवा फक्त बाह्मण आणि इतर सोकॉल्ड उच्च जातीचे एकत्र असेही चालते. भारताच्या इतर प्रांताबद्दल असलेल्या अज्ञानातून सुरवातीला सो कॉल्ड उच्च वर्णीय समजणे आणि नंतर तसे नाही कळल्यावर संबंध कमी करणे वगैरे प्रकारही चालतात.

स्वाती2 +1
लिहायचं टाळत होते पण खरं आहे...

जातीपाती, वंश, धर्माधारीत अस्मिता, क्लिष्ट विषय आहे. लेबलींग जन्मापासूनच लागतं ते सहजासहजी गळून पडतच नाही हे सत्य आहे.

मस्त लिहिलंय.

जातीपाती, वंश, धर्माधारीत अस्मिता, क्लिष्ट विषय आहे. लेबलींग जन्मापासूनच लागतं ते सहजासहजी गळून पडतच नाही हे सत्य आहे. >> मला पण असंच वाटत. जात नाही ती जात

जातीपाती, वंश, धर्माधारीत अस्मिता, क्लिष्ट विषय आहे. लेबलींग जन्मापासूनच लागतं ते सहजासहजी गळून पडतच नाही हे सत्य आहे.
>>>>>

पण आयुष्यभर प्रयत्न ते लेबल झुगारून द्यायच्या दिशेने असावा. हा प्रवास आपल्यासोबतच संपत नसून आपल्या पुढच्या पिढीत तिथून पुढे सुरु राहतो हे लक्षात ठेवावे.

लहानपणी मलाही घरून आमची जात अभिमानाने सांगण्यात आली होती. ऑर्कुटवर त्या जातीची कम्युनिटीही जॉईन करून झाली होती. आपला धर्मही जगात प्राचीन, आधुनिक विचारांचा, जगात भारी टाईप्स विचार करायचो.
पुढे सोशलसाईटवरच वैचारीक वाद घालताना लक्षात आले की जगातल्या प्रत्येकालाच आपला जात धर्म महान वाटते. तसेच आपल्याला आणि आपल्या घरच्यांनाही वाटते. पण तो असेलच असे नाही. आणि असला तरी त्यात आपले योगदान काय? आणि नसला तरी आपण करणार काय..

अधिक विचार करता या विचारांतील फोलपणा कळला. पण जन्माने चिकटलेली जात धर्म त्यागायचा कसा म्हणत होते सोबत.

पुढे दुसरया जातीच्या/धर्माच्या मुलीच्या प्रेमात पडलो तेव्हा तेच जात-धर्म प्रेमाचे आणि आपल्या वैयक्तिक आयुष्यातील सुखाचे दुश्मन वाटू लागले.
मग मात्र सारी लेबलं झुगारून केले तिच्याशीच लग्न.
आता आमच्या घरात दोन्हीकडची आदल्या पिढीतील मंडळी जाती धर्माचा ऊच्चार करत नाहीत. आम्हा दोघांच्या ते डोक्यातही येत नाही. त्यामुळे आमच्याकडून तरी हे जातीधर्माच्या अभिमानाचे बाळकडू आमच्या पुढच्या पिढीत झिरपले जाईल हे शक्य नाही.

केवळ दलितच नाही तर ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर असेही अनुभवले आहे किंवा फक्त बाह्मण आणि इतर सोकॉल्ड उच्च जातीचे एकत्र असेही चालते. >>> फक्त ब्राह्मणच नाही तर वेगवेगळ्या जातींचे असंख्य ग्रूप्स आहेत. पण तितकेच मिश्र ग्रूप्सही आहेत. यातून ब्राह्मण लोकांचा विशेष उल्लेख करावा असे यात काही वेगळे नाही.
पण भारतातील जातीयता इथे येण्याचे दोन प्रकार आहेत - एक तो कॉलेज डॉर्म्स मधे भारतातून इथे आलेले लोक तिथली जातीयता इतक्या सहजासहजी इथे सोडून देत नाहीत, त्यामुळे दिले जाणारे त्रास वगैरे. ते जास्त सिरीयस आहे. पण इथे जन्मलेली भारतीय वंशाची मुले तितकाच जातीयवाद पाळत नसावीत. कारण शाळेपासूनच विविध डायव्हर्स लोकांत वावरायची सवय आणि भारतातील तो सामाजिक सेट अप इथे तसाच्या तसा नाही.
दुसरा तुलनेने कमी सिरीयस प्रकार म्हणजे "सर्कल्स" निर्माण होणे. फक्त ब्राह्मण, फक्त सीकेपी, फक्त लिंगायत असले बरेच प्रकार पाहिले आहेत. अनेकदा यात दुसर्‍यांना मुद्दाम वगळण्यापेक्षा इथे आल्यानंतर आपल्या भारतातील ओळखींमधून याचा चुलतभाउ तिकडे आहे, तिचा भाचा तुमच्याच शहरात आहे टाइप कनेक्शन्स होतात. त्यातून ग्रूप्स तयार होता. भारतातील चालीरीती इथेही पाळण्यात इण्टरेस्ट असतो, ते ही यांचे समान असल्याने आपोआप घट्ट ग्रूप होत जातात व इतर फार क्वचित त्यात तितके घट्ट मिक्स होतात. मुंबईत नव्याने आलेला माणूस गाववाला शोधतो तसेच.

आता इथे इतक्या वर्षांत असे बरेच ग्रूप्स पाहिले आहेत. पण अनेक जातींचे लोक एकत्र असलेले मिश्र ग्रूप्सही तितकेच आहेत. कोणी जातीबद्दल विचारच केलेला नसतो वगैरे इतके नाइव्ह कोणीच नसेल. आडनावांवरून लोकांना माहीत असते, काहींबद्दल जनरल अंदाज असतो. पण ते कशाच्या आड येत नाही.

आडनावावरून जातीचा कयास बांधणे आणि त्यानुसार वागणूक ठरवणे हे प्रकार दुसऱ्या पिढीत होत नसावेत. नंतर फक्त दक्षिण भारतीय आणि उत्तर भारतीय असेच प्रकार त्वचेच्या रंगावरून ढोबळमानाने पडतात. तेही सैलसर आणि अंदाजपंचेच असतात. कारण त्वचारंग हे भारतातले मूळ ओळखण्याचे अचूक साधन नाही.

भरत यांनी दिलेल्या दुव्यात पण इथे शिकायला आलेल्यांमधेच हे जातीभेद प्रकरण होतात हे लिहिले आहे. त्यात त्यांनी १००० लोकांच्या सर्वेमधे हे लेख लिहिले आहेत हेही नमुद केले आहे. आशा आहे हे मोठ्या प्रमाणात नसेल व जे आहेत ते नष्ट व्हावेत.
बाकी कुटुंबाकुटुंबात इथल्या वास्तव्यात अजुनतरी नाही पाहिला जातीभेद नशिबाने. मिळुही नये पहायला. अगदी जातीजातींचे गट पण नाही पाहिले. फारेण्डने लिहिले तसे समान धाग्यामुळे आपोआप होत असतील हे पटले. आणि पुढच्या पिढिला पण बहुधा माहिती नसते ते फार छान आहे.

छान लेख !! मलाही कित्येक वर्षापूर्वी अमेरिकेत आल्यावर बरेच अनुभव आले होते. पण जातीपातीपेक्षा शहराचा अभिमान असलेले. कुठेही गेले की मराठी बोलणं ऐकून लोक येऊन विचारायची तुम्ही कुठले पुण्याचे की मुंबईचे...आणि मराठवाड्यातले म्हणाले की त्यांचा ओळख वाढवण्याचा रस संपून जायचा. एकदा तर एक बाई म्हणाली की तू पाहिल्यावर वाटत नाहीस . Is that even a compliment ? आम्ही त्यांना good enough वाटायचो नाही. किमान शंभर वेळा झाले आहे. मी तर एकदा चिडून बोलले की फक्त त्यांना विसा मिळतो का Lol , एकदा म्हणाले तुमचा भुगोल कच्चा आहे. महाराष्ट्रात अजूनही शहरं आहेत. मग सोडून दिले , तिथल्या मराठी लोकांची संख्या इथे जास्त असल्याने शेवटी उत्तर भारतीय लोकांशी मैत्री केली व ती टिकली सुद्धा. ज्या गोष्ट तुम्हाला आपोआप मिळतात त्याचा काय अभिमान बाळगायचा आणि त्याहून लोकांना जोखायचे Sad .
आताही एकच पुण्याची मैत्रीण आहे मला. सुरवातीला वाटले तीच खूप चांगली व उदात्त विचारसरणीची असेल नाही तर का मैत्री केली असती. न्युनगंड आला होता चक्क ! आता कळले आहे कुठलाही गंड चुकीचाच मग न्युनगंड असो की अहंगड ! जितके आपल्या जवळ कुणी यायचे प्रयत्न करतो तितके आपण अशा कुठलाही आधार नसलेल्या अटीने आपले वर्तुळ लहान करतो. एकदा हे वर्तुळ काढले की कळते सगळे जग आपलेच असते Happy .

छान धागा. साधारण ४०-४५ वर्षांपूर्वी पुण्यातील त्यावेळच्या प्रसिद्ध शाळेत असताना माझ्यापुढे बसणाऱ्या २ मुलींची चर्चा चालू होती मग मागे वळून त्यांनी मला विचारले की तू कोकणस्थ की देशस्थ ? तोपर्यंत मी हे शब्द ऐकले न्हवते. मग विचार केला की बहुतेक आपण मूळचे गोव्याचे आहोत म्हणजे कोकणस्थ असावे. उत्तर ऐकून त्या मुलींचे प्रचंड समाधान झाले. 'वाटलेच कारण तू गोरी आहेस' असेही ऐकायला मिळाले. घरी येऊन वडिलांना विचारले की आपण कोण आहोत ? त्यांनी मला उत्तर दिले कि आपण फक्त भारतीय आहोत म्हणून सांगत जा. मग आयुष्यभर हेच मनात राहिले. पण पुढे लक्षात आले की आपण कितीही सांगायचे नाही ठरवले तरी लोकांना तुमच्या जात धर्माशी खूप घेणे देणे असते. प्रत्येक जण आपल्या जातीवर कसा अन्याय पूर्वी झाला किंवा आता होतो याचे घोडे दामटत असतो.

गोऱ्या रंगावरून नंतरही बरेचदा लोकांनी भारतात हाच अंदाज केला आहे ! त्यात सर्व राज्याचे लोक असतात.

अगदी अमेरिकेत आल्यावरही एकदा एका फिलिपिनो बाईने जॉबमध्ये nationality विचारली होती. मी Indian सांगितल्यावर तिला खूप आश्चर्य वाटले. म्हाणालीही कि वाटत नाहीस इंडियन. मीही USA मध्ये अगदी नवीन असल्याने काही म्हणाले नाही. पण आताची असते तर racist आहेस म्हणून सुनावले असते. कारण अमेरिकेत हे खूप स्ट्रिक्टली पाळले जाते

>>ब्राह्मण लोकांचा विशेष उल्लेख करावा असे यात काही वेगळे नाही.>>
वेगळे काही नाही असे म्हटले तरी मला काही घरगुती धार्मिक/पारंपारिक अशा फक्त स्त्रीयांचा सहभाग अपेक्षित अशा प्रकारात विचित्र अनुभव आला. बरे वन टाईम डील म्हणून दुर्लक्ष करावे तर तसेही नाही. ३-४ वर्षांनी नवे कुटुंब आले की त्याचीच पुनरावृत्ती असे झाले की हाही एक पॅटर्न असे जाणवते. सुरुवातीला तुमच्या व्यतिरिक्त दुसरे कुणीच नाही तेव्हा आग्रह करुन अशा धार्मिक्/व्रत प्रकारासाठी आग्रहाने बोलावायचे, आम्ही काही पाळत नाही असे सांगायचे, मग ओळखी वाढल्यावर स्वजातीय पर्याय उपलब्ध झाल्यावर तुम्हाला आमंत्रण नाही. बरे व्याप नको म्हणून मोजकीच माणसे बोलावत असतील असे म्हणावे तर लहान मुलाचा वाढदिवस आणि इतर सोशल प्रसंगी पुन्हा आग्रहाचे आमंत्रण ! सुरुवातीलाच इतर कुणी नसताना बोलावले नसते तर प्रश्नच नव्हता, पण हे आता दुसरा चांगला पर्याय मिळाला असे तेव्हा तुमची गरज नाही असे वागणे खटकले. एरवी आमचे नेहमीच मिक्स ग्रुप्स होते/आहेत. माणसाच्या व्रत वैकल्यातून मिळणार्‍या पुण्ण्याच्या कल्पना त्याला असे वागायला भाग पाडत असाव्या का? भारतातील जेनांचा अशा निर्णयांवर प्रभाव पडत असावा का ? हे वागणे वगळता यातल्या बर्‍याच जणांशी अतिशय जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले, ती मंडळी दुसरीकडे गेल्यावरही कायम राहीले , मात्र गादीखालच्या वाटाण्यासारखे ते वगळणे टोचले.
आमच्या कडे देशात आधीच्याच पिढीत आंतर जातीय्/प्रांतीय आणि नंतरच्या पिढीत जोडीला आंतर धर्मिय विवाह ही सामान्य बाब. नवरा स्टुडंट म्हणून रहायचा तेव्हा त्याचे घर इंडीयन एंबसी म्हणून ओळखले जायचे. गरज पडली की कुणीही आसार्‍याला यायचे. पुढील काळातही मैत्रीचे संबंध केवळ व्यक्तीकडे बघून होत राहीले. गेल्या काही वर्षांत मात्र त्या xxxxxx शी तुमची मैत्री ? अशी इतर धर्मियांबद्दल नाराजी काही लोकांनी व्यक्त केली.
इथे वाढलेल्या मुलांना जात/प्रांत वगैरे डोक्यात नसते मात्र आताशा भारतातून अंडर ग्रॅड करायला येणार्‍या लोकांचे प्रमाण वाढत आहे त्यामुळे मग त्या अँगलने विचारणा झाली की मग घरी विचारणे, त्यांनी हा अंदाज कसा लावला याचा विचार, आश्चर्य असे होते. लोकं आडनावावरुन प्रांत कसे ओळखतात हे लेकाला इंटर्नशिपच्या दरम्यान एका देशी सिनियरने सांगितल्यावर त्याला गंमत वाटली होती. जोडीदाराच्या निवडीबाबत मुलांचे पालक मजेशीर वागतात. वरवर आम्हाला काही फरक पडत नाही असा आव असतो मात्र जे गॉसिप चालते त्यावरुन असे अजिबात नाही हे जाणवते. मुलांचे जोडीदार भारतीय असल्यास भिन्न प्रांतातले असले तरी स्वजातीय आहेत हे आवर्जून सांगणे होते जोडीला दुसर्‍याच्या बाबतीत कसे भिन्न प्रांतातले ओबिसी आहेत हेही कानावर घातले जाते. याच धर्तीवर मुलांचे जोडीदार कॉकेशियस वंशाचे असल्यास फारशी नाराजी नाही पण आफ्रिकन अमेरीकन असल्यास बरीच नाराजी असेही बघायला मिळते.
काही ठिकाणी मराठी मंडळाचे सगळे कार्यक्रम 'तुमचे' च असतात म्हणून सहभागी होण्यात इंटरेस्ट नाही असेही सांगितले गेल्याचे ऐकून आहे. पूर्वी शिकायला म्हणून देश सोडला की इथे स्थायीक होणे हे रुटिन होते , संपर्काची साधनेही मर्यादित होती. आता तसे नाही इथे मोजक्याच काळासाठी भारतातून वर्क विसावर येणार-जाणार अशा लोकांचे प्रमाण बरेच आहे. तिथला सामाजिक-राजकीय प्रभाव, सद्य परीस्थिती याचा परीणाम सोबत असतो. तिथला टिवी, सोशल मेडीआ यामुळे रोज तिथे काय सुरु आहे ते कळत असते. साहाजिकच त्याचे प्रतिबिंबही इथल्या वावरात कळत-नकळत उमटते.

स्वाती२ तुमचा अनुभव नाकारण्याचे काहीच कारण नाही. पण ते धार्मिक कार्यक्रमाकरता उपलब्ध असेल तेव्हा ब्राह्मण व्यक्तीला प्रेफरन्स देण्याचे उदाहरण आहे असे दिसते - हे वागणे अनेक जातीतील लोक करतात हे बघितले आहे. इथेही, भारतातही. तुम्हाला संकुचित, कद्रू ब्राह्मण कुटुंबे भेटली असतील हे १००% शक्य आहे. असंख्य आहेत. पण जातीशी संबंधित संकुचितपणा ही ब्राह्मणांची मोनोपॉली इथेही नाही. ती अनेक जातींच्या लोकांकडून वेगवेगळ्या स्वरूपात बाहेर येते इतकेच.

फारएंड,
मी भारतात लहान गावात वाढले जिथे सोवळे ओवळे प्रकार सर्रास चालत. काही घरांतून त्या आजींचे सोवळे तेव्हा स्वयंपाकघरात प्रवेश नाही , आपल्या हातचे पाणी चालत नाही वगैरेही अनुभवले. त्याच आज्या देवळातुन आल्यावर हातावर प्रसाद ठेवायच्या. ती त्यांची श्रद्धा म्हणून आदरही केला. पण त्यांचे वागणे तळ्यात -मळ्यात नसे. व्रतासाठी ब्राह्मण व्यक्ती हवी हे भारतात बर्‍याच ठिकाणी असते त्याबद्दल काहीच म्हणणे नाही पण मग नाही इथे कुणी उपलब्ध नाही तर तेव्हाही बळेच नका ना बोलवू. तसे तर आमच्याकडेही वर्षातून पाच-सहा वेळा कुळधर्माचा शिधा द्यायची पद्धत आहे. मी इथे फूड पॅन्ट्रीला त्यांच्या गरजेचे नॉन पेरीशेबल फूड देते. यावर्षी अनायासे गावात योग्य जातीची व्यक्ती आहे तेव्हा त्यांना प्रेफरन्स असे करत नाही. कदाचित या बाबतीतल्या विचारतल्या फरकामुळे मला हे असे सोईस्कर वागणे खटकले असावे.
बाकी संकुचित वागणे ही अमुकच जातीची मक्तेदारी नाही हे मान्यच. आमच्या घरातल्या आंतरभारतीमुळे स्वत:च्या आणि इतरही जाती-धर्मातील काहीही संबंध नसलेल्या लोकांच्या संकुचितपणाचा भरपूर अनुभव आहे.

छान लेख. पुण्यात हा प्रश्न सर्रास असतो..नाव काय? म्हणजे बेसिकली आडनाव काय? माझं गाव चिंचवड. चिंचवडात भारी सोवळे ओवळे चाले. आम्ही रहात होतो ती पूर्ण ब्राह्मण आळी आणि आमचं एकच कुटुंब मराठा. त्यात आमच्या शेजारच्याच वाड्यात चिंचवडचे ग्रामजोशी रहात. वाड्यामध्ये घराचं दार बंद असले प्रकार नसत , खेळताना कुठल्याही घरात जाता येत असे. शेजारच्या वाड्यातल्या आजींचं सोवळं मोडलं की मग त्या आईला ओरडून सांगत बघ ह्याने काय केलं. मग त्या घरात पुढचे 2 आठवडे तरी बंदी (स्वघोषित) , मग परत सगळं सुरू. पण हे फक्त मलाच असं नाही सर्वांनाच लागू होतं, ब्राह्मण मुलांना पण. काही लोकांना जेवण पण चाले तर काही लोक पाणी पण घेत नसत. सणवार, हळदी कुंकू असल्या प्रकारात जात कधीच आडवी आली नाही. थोडक्यात जातीचा जाच असा कधी झाला नाही. आमचे घरमालक शनवारात रहात , 15/20 रु. भाडं घ्यायला महिन्यातून एकदा येत. त्यांना आमच्याकडे पाणी सोडून इतर काही चालत नसे. पण काही शेजारी असे पण होते की ते हक्कानं आईला हे करा ते करा असं सांगत. एक कोब्रा कुटुंब होतं ज्यांना आजीनं केलेलं ताक पाहिजेच असे. आमच्या वाड्यात प्रभुणे म्हणून एक कुटुंब होते (समाजसेवक गिरीश प्रभुणे..ते सोडून गेले आणि त्यांचे धाकटे बंधू तिथे राहायला आले) ह्या काकूतर माझे भारी लाड करत. म्हणजे काही खादाडी हवी असेल तर आज हे करून दे इतपत. तर असा सगळा प्रकार होता. जातीची ओळख फार लहानपणी झाली पण तिचा बाऊ किंवा फार अवडम्बर नाही, असलं तरी लक्ष दिलं नाही, एक समतोल आपोआप पाळला गेला. वाड्याच्या आठवणी आल्या तरी डोळे पाणावतात.

एक कटू आठवण आहे खूप नंतरची(1999-2000). सी एस फाउंडेशन चा निकाल लागला, चांगले मार्क मिळाले आणि मार्क बघून ऑल इंडिया मेरिट मिळेल अशी खात्री होती. एक दीड महिन्याने समजले की ऑल इंडिया रँक आहे. मी त्यावेळी पेठेतल्या ह्या प्रसिद्ध क्लास मध्ये जात असे. सरांना रँक बद्दल सांगितलं त्यांनी फोटो मागितला आणि पूर्ण नाव लिही सांगितलं. पूर्वी क्लासेस 12 वी मेरिट आणि अशा प्रोफेशनल कोर्स रँकची खूप जाहिरात करत. आडनाव वाचून त्या मास्तरने जाहिरातीत फोटो आणि नाव देण्याचं रद्द केलं. तेंव्हा मात्र खूप वाईट वाटलं होतं (तेव्हढ्यापुरत).
असो खूप मोठी पोस्ट झाली.

Pages