अनुक्रमाणिका > https://www.maayboli.com/node/72984
अनुक्रमाणिका २ > https://www.maayboli.com/node/73598
अनुक्रमाणिका ३ >https://www.maayboli.com/node/74455
2nd मार्च 2019
प्रिय वैदेही,
जंगल, डोंगर, दऱ्या ह्यातली मज्जा मेघालयात भरभरून लुटता येते. त्यापलीकडे ज्याला नवीन प्रदेशाचे जनजीवन जवळून पहायला आवडेल त्याने नागालँडला नक्की भेट द्यावी. कोहिमा ही नागालँडची राजधानी! दिमापुर हे नागालँडचे कमर्शिअल केपिटल! जनजीवन म्हटले त्यात इतिहास, रहाणीमान, परंपरा, उत्सव सारेच आले. इतिहासाच्या सर्वात जुन्या संदर्भापासून सुरवात करायची तर महाभारतातील हिडीम्बेच्या नावावरून दिमापुर हे नाव पडले. ब्रिटीशांनी बर्मा ला जायला सोयीस्कर म्हणून जेव्हा या आदिवासी प्रदेशात अतिक्रमण केले तेव्हा स्थानिक जमातींनी हल्ला बोलला. World War II मध्ये कोहिमा मधील जपानच्या ऐतिहासिक पराभवाने महायुद्धाला वेगळे वळण दिले. रानटी नागा संस्कृतीचा प्रत्यक्ष जन्म झाला त्यावर प्रदीर्घ कालखंड लोटला तेव्हा कुठे १९६३ मध्ये आसामच्या पोटातून नागालँड राज्य जन्माला आले. या विलक्षण संकृतीचे जतन आणि पतन करण्यासाठी साठी राजकीय, सामाजिक स्तरावर ऐतिहासिक घटना घडल्या. या राज्यात सोळा जमाती अस्तित्वात आहेत पण आधुनिक नैतिक रचनेनुसार त्यांची संस्कृती बोथट होत चालली आहे. एक ना एक दिवस ती लुप्त (extinct) होणारच. त्याआधी तिचे शक्य होतील ते पैलू जवळून पहायचे तर शहर सोडून जितके दूर जाता येईल तिथे जायचे, एवढेच सुचत होते.
अंगामी, कोन्याक, लोथा, सांगताम, चाम ही अशा एलिअन नावांच्या यादीतून मी नेमक्या कुठच्या जमातीची निवड करावी, हे एक कोडेच होते. पण दिमापुर ला बस स्टँन्डवर कुठची बस कुठे कुठच्या वेळेस निघते त्याची चौकशी केली तर चार वाजता मोन साठी एक बस निघत होती. कोन्याक जमातीचे head hunters of Nagaland अशी ज्यांची ओळख सांगितली ते याच मोन डीस्ट्रीक् मधल्या लोन्ग्वा या गावाला रहातात. हे नागालँडच्या नॉर्थवेस्ट बॉर्डर वरचे एक खास गाव आहे. खास अशासाठी की, अरुणाचल प्रदेशची स्टेट बॉर्डर आणि म्यानमार ची इंटर नेशनल बोर्डर याच गावालगत आहे. मी लोन्ग्वाला जायचे ठरवले.
हातात भरपूर वेळ होता. तोवर निवांत फिरता यावे म्हणून 10 रुपये भरून माझी बॅग क्लोक रूम मध्ये ठेवली. आज माझ्या फोन चा चार्जर हरवला म्हणून माझा मोबाईल गव्हर्मेंट टूरीस्टलॉजच्या रिसेप्शनमध्ये चार्ज करायला दिला आणि खुशाल हात हलवत मी मार्केट फिरायला निघाले. दिमापुर रेल्वे स्टेशन च्या बाहेरच दिमापुर बस स्टँड आहे. बस स्टँडला लागूनच टूरिझम डीपार्टमेंट चे इन्फरमेशन सेंटर, लॉज, रेस्टोरंट आहे. एक बॅकपॅकर म्हणून मी इथल्या टूरिझम डीपार्टमेंटच्या सर्वच सर्व्हिसेसची जरूर शिफारस करेन.
संध्याकाळी चार वाजता दिमापुरहून बस निघाली. मोन ला जाण्याचा मार्ग आसाम मधल्या जोरहाट मधून जातो. नागालँड बद्दल बोलायचे झाले तर इथे रस्त्यांत खड्डे असा काही प्रकारच नाही, खड्यातच कुठे रस्ता सापडतो का तेवढे पहायचे. डोळे मिटून कोणी प्रवास करत असेल तरीही जोरहाट, आसाम मधून जसे काय आपण मोकोकचुंग डीस्ट्रीक्ट मध्ये शिरतो तसे नागालँड राज्याच्या हद्दीत आपले आगमन झाले आहे हे अचूक लक्षात येते. एरव्ही पब्लिक ट्रान्सपोर्ट ने प्रवास करणे मला फारसे त्रासदायक नाही उलट सोयीस्कर वाटते. पण या रस्त्यांवर प्रवास करताना जास्त शीण येतो. माझ्या फोनच्या बॅटरीने फक्त 26 टक्क्यापर्यंतच मजल मारली होती. त्यातल्या त्यात दहाबारा तासाच्या प्रवासानंतर मी पहाटे पहाटे मोन ला पोहोचणार आहे ही एवढी तरी माहिती मी इन्टरनेट वर शोधून काढली.
दिनांक २ मार्च पहाटे, अवेळी तीन वाजता, मोन मधल्या एका सुनसान रस्त्यावर मला एकटीला उतरवून बस पुढे निघून गेली. तिथे बसस्टँन्ड असल्याच्या काहीही खाणाखुणा दिसत नव्हत्या. अशा परिस्थितीत प्रवाशाने पुढे काय करायचे, ही प्राईम माहिती मात्र इंटरनेट ने दिलीच नव्हती. च्यामारी त्याच्या नानाची ...
मोन पासून लोन्ग्वा गावाला जाणारी सुमो सकाळी साडेसात वाजता निघते. कुठून निघते? कोणास ठाऊक! कोणा बाईमाणसाला विचारायचे तरी त्यांचा दिवस सुरु होईस्तोवर वाट पहावी लागेल. त्या कडाक्याच्या थंडीत, अंगाची गुंडाळी करून, त्यातच स्वत:ला गुरफटून, मी रस्त्याच्या कडेला गपचूप बसून राहिले. थंडी इतकी वाजत होती की वाऱ्याने पाने हलतात तसे अंग कापत होते. झोप इतकी येत होती की मधेमधे अक्षरश: तोल जात होता. एकेक मिनिट पार पाडायला एवढे कठीण होते तर त्या अवस्थेत काही तास कसे काढले असतील.
साडेचार च्या दरम्यान, सारे गाव धुक्याच्या चादरीत निजले असतानाच, सोनेरीपिवळ्या छटांनी आकाशात रंगरंगोटी करायला सूर्यकिरण निघाले. ते दृश्य मला इतके आकर्षक वाटले की माझे सामान त्या निर्जन रस्त्यावरती पाठी सोडून मी निघाले. आकाशातल्या नितांत सुंदर सूर्योदयाला जवळून अनुभवता येईल अशी जागा शोधत भटकू लागले. फिरत फिरत मी एका उंच जागेवर पोहीचले. माझ्या समोरच्याच टेकडी पाठून सूर्य वर येत होता. आसमंताचे अद्भूत सौंदर्य टिपून घ्यायला माझ्या मोबाईलच्या मरायला टेकलेल्या बॅटरीने साथ दिली नाही, तसे ते दृश्य डोळ्यात साठवत, २ मार्च २०१९ या दिवसाच्या जन्म सोहळ्यात मी रमून गेले.
मी परतले तोवर रस्त्यावरची एक दोन दुकाने उघडली होती. दोनचार प्रवासी जमले होते. चार आठ गाड्या, आठ दहा लोक रस्त्यावर फिरताना दिसत होते. माझे सामान जिथे सोडून गेले ते मात्र तिथेच तसेच पडून होते. मी सर्वात आधी एका टपरीत घुसले. जरी मला चहाची तल्लफ नव्हती तरी तिथे चूल पेटवलेली असणार एवढे मला कळत होते. थोडे गोड गोड बोलून मी त्यांच्या किचन मध्ये शिरून त्या चुलीशेजारी बस्तान टाकून बसले. तेव्हा कुठे जीवात जीव आला.
मग मी तिथेच सामोसे खाऊन घेतले आणि सुमोची वाट पहात बसले. एवढ्याशा वेळात एका गॅरेज वाल्याशी दोस्ती जमली, त्यानेच मला माझा मोबाईलही चार्ज करून दिला. गॅरजचे थोडे काम शिकवले पण प्रात्यक्षिक करू दिले नाही. मला जास्त पैशांची गरज लागली तर मात्र नोकरीवर ठेऊन घेईन हे प्रौमिस केले. मग मी निघाले.
मोन पासून लोन्ग्वा हा ४५ किलोमीटर चा रस्ता खूपच सुंदर आहे. आत्ता पावसाळा सुरु व्हायच्या नुकते आधी पतझड झालेली असते त्यातच मोठीच काटछाटही केली जाते. मुंडन केलेल्या टेकड्या काय सुंदर दिसतात! डोंगरावर छोट्या छोट्या वस्त्या असतात. त्यांची लहानशीच शेते असतात. त्या नजाऱ्यावरून आपली नजर हटत नाही.
मी लोन्ग्वाला पोहोचल्यावर आर्मी ओफ़िशिअल ने माझ्या जीपमधील सहप्रवाशांना जीपमधून खाली उतरायला सांगितले, मला वाटले की काहीतरी रुटीन चेकअप असेल. पण बातचीत वगैरे न होता जेव्हा ड्रगज किंवा आर्म्स याच्या स्मगलिंगच्या संदर्भात काहीतरी राडा सुरु झाला, तेव्हा माझ्या लक्षात आले की आपण बोर्डरवरच्या अतिशय संवेदनाशील गावात पोहोचलो आहोत. आमच्या जीपमधून परमिट शिवाय प्रवास करणाऱ्या दोन रेफ्युजी तरुणांचे पुढे काय झाले ते माहित नाही पण सारे इतके अचानक झाले की मनातून मी थोडी कावरीबावरी झाले होते हे खरे!
लोन्ग्वा गावाच्या मध्यभागी एक चर्च आहे, जीपने मला तिथे उतरवले. बाजूला एअरटेल चा मोठ्ठा टॉवर बघून वेड्या आशेने माझ्या वोडाफोनलाही कुठे त्याचे-त्याचे नेटवर्क सापडते का हा अंदाज घेत, वाट दिसेल तिथे चालू लागले. इथचे थोडे फोननंबर जवळ काढून ठेवले होते, पण फोन जोडायचा कसा? मला काहीच सुचेना. मदत मागण्यासाठी मी एका अनोळखी घरात घुसले तर सर्वात प्रथम दृष्टीस पडेले ते मेलेल्या (नव्हे मारलेल्या) जनावरांच्या मुंडक्यांचे प्रदर्शन! भिंतीवरची ती रानटी सजावट पाहून मी थोडी दबकले. एकतर घरात इतका काळोख होता की उन्हातून आत शिरताना क्षणभर सारे अंधारल्यागत झाले. जेव्हा डोळे मोठे मोठे करून इकडे तिकडे पाहिले तर तिथे एक तरूण बंदुकीची सफाई करत बसला होता तो नजरेस पडला. माझ्या पोटात खरच धस्स झालं. या हेडहंटर्सच्या संस्कृतीचे प्रथमदर्शन कोणासाठीही इतकेच धक्कादायक असेल. पलीकडे आणखी एक देखणा तरुण शेकोटीची ऊब घेत बसला होता. त्याने मला अनेक प्रश्न विचारले. पुढे मला कळले की तो तिथला वरिष्ठ पोलीस अधिकारी होता.
मी इन्टरनेट वरून काढलेला होम स्टे चा एक नंबर त्यांना दिला. त्यांनी लगेच तो कोणाचा नंबर आहे त्या माणसाला शोधून बोलावून घेतले. माझे सामान उचलून तो पुढे चालत निघाला होता मला त्याच्या पाठून पाठून पळावे लागत होते. मी जिथे रहायचे ठरवले होते ते घर एका हेड हंटर चे होते. आदल्याच दिवशी जुने घर मोडून संपूर्ण गावाने फक्त २४ तासात नवीन घर उभारले होते. नवीन घरातली पहिली पाहुणी बनून मी त्या घरात प्रवेश केला.
इथे प्रत्येक घराच्या भिंतीवर रानटी आर्ट सजलेली असते आणि बैठकीच्या खोलीत चोवीस तास आग पेटत असते. कुटूंबातील पुरुष आणि चकाट्या पिटणारी इतर मंडळी दिवसातला बराचसा वेळ इथेच गांजा ओढत घालवतात. बायकांची एक वेगळी चूल स्वयंपाकघरात पेटत असते. तिथपर्यंत मी पोहोचलेच नाही. पुरुषांच्या शेकोटी शेजारीच विसावले. चहा, नाश्ता, गप्पा झाल्या. नंतर मी आंघोळ करायला म्हणून गेले. अंगणाच्या एका कोपऱ्यात दोरीवर कपडा टांगला होता. त्याच्या पलीकडे जाऊन आपले काय ते उरकायचे. कालची आंघोळ दाराला कडी नसलेल्या बाथरूम मध्ये आटपली होती आज बाथरूम ला भिंतीच नव्हत्या. मी पडद्याच्या पाठी गेले तर काय. तिथून तर पलीकडची वस्तीही दिसत होती. या परिस्थितीत कपडे कसे उतरवावे हे मला सुचेना. मग मी एक युक्ती वापरली.
पाय दुमडून बसलं तर टेकडीवरच्या झाडाचा आडोसा मिळत होता. मी उकिडवी बसले आणि पाण्याचे शिंतोडे अंगावर उडवायला सुरवात केली. थंड हवेच्या ठिकाणी थंडगार पाणी अंगावर शिंपडत आंघोळ करायची म्हणजे काय दिव्य असते ते अनुभवल्या शिवाय कळणार नाही. ते काम मन लावून करतच होते तर कुठूनसा खिदळण्याचा आवाज ऐकू आला. माझ्या तर हृदयाचा ठोकाच चुकला. मनातल्या शंकेच्या पालीला हाकलवत एकीकडे मी पडद्याखाली वाकून पाहिले तर काय, आमच्याच घराच्या अंगणातून एक लहानगा मुलगा (लहानगा म्हटल की मनाला थोडं बर वाटत) मलाच बघून फिदीफिदी हसत होता आणि त्याच्या भाषेत काहीबाही ओरडतही होता. इतक्यात त्याचे आणखी दोन सवंगडीही धावत आले. तो जे ओरडत होता ते बहुदा बाकीच्या मित्रांना बोलावण्यासाठी असावे. तिघेजण माझ्याच पडद्याच्या अलीकडे माझ्याच सारखे उकिडवे बसून माझ्याकडे बघून खिदळत होते. हसावे की रडावे त्याहीपेक्षा उभे रहावे की बसूनच रहावे, तेच मला कळेना. लाजेने मी अक्षरश: थिजून गेले. अशा परिस्थितीत आंघोळ कशी उरकली असेल?
आंघोळ आटपली तसा प्रवासाचा सारा शीण निघून गेला. आता माझ्या हातात निवांत वेळ होता. तुला पत्र लिहायचे होते पण इथे इलेक्ट्रीसिटी नाही म्हणजे मोबाईल सांभाळून वापरला नाही तर पुढच्या प्रवासात पंचाईत होईल, म्हणून मोबाईल बंदच करून ठेवला. बाहेर घराच्या कौलाचे काम चालले होते, एका कुत्रीने आठदहा पिल्लांना जन्म दिला होता, आसपासची लहान मुले अंगणात बागडत होती तिथे तिथे मी माझा जीव रमवत राहिले. तास दोन तास सरले असतील, मग मी गाव उंडारायला निघाले.
इथचे लोक आपल्या राजाला आंग असे संबोधतात. राजाला राजा होण्याचा मान वारसाहक्काने मिळतो. कोन्याक जमातीचा राजा, Tonyei Phawang, याच लोन्ग्वा गावात रहातो. पण त्याचा अर्धा राजवाडा भारतात आहे, तर अर्धा म्यानमार मध्ये! आंगचे अधिपत्य असलेल्या जवळपास सत्तर गावातील लोकांकडे भारत आणि म्यानमार अशी ड्युअल सिटीझनशिप असते. मी राजाचे घर पहायला, त्याच्याबरोबर सेल्फी काढायला म्हणून गेले.
इथे राजा पासून ते रंकापर्यंत प्रत्येकाच्या घराच्या भिंतींवर शिकारीची हत्यारे, जनावरांची शिंगे, मुंडकी, रानटी टोप्या हेच सारे सजवले असते. राजा जेवण करत होता म्हणून आमच्या भेटीची स्वप्ने रंगवत मी बाहेरच्या खोलीतील शेकोटीभोवती बसले. माझ्या आयुष्यात प्रथमच मी राजाला भेटणार होते. त्याने राजेशाही झगा वगैरे घातला असेल का? डोक्यावर मुकुट चढवला असेल का? त्याचा रुबाब कसा असेल? ... जेवण आटोपल्यावर आंग मला भेटायला आला तेव्हा एक सर्वसाधारण माणूस बघून खरतर माझा अपेक्षाभंग झाला.
एकमेकांशी गप्पागोष्टी करत आम्ही दोघे फेरफटका मारत होतो तेव्हा मधेच तो सहज वाकला आणि वाटेवर पडलेला चोकलेटचा एक रॅपर त्याने उचलला. तेव्हा मात्र मला त्याच्या लीडरशिप बद्दल मुळीच शंका वाटली नाही. राजा सर्वसामान्य प्रजेसारखाच वागतो म्हंणून त्याची वैभव, प्रतिष्ठा, थाट कुठेच कमी होत नसतो हा धडा माझ्या हृदयात मी गिरवला. मी कुठेतरी वाचले होते की आंगला साठ बायका आहेत. पण कुटुंबाची गोष्ट सांगताना आंगने फक्त दोन राण्यांचा उल्लेख केला. मी काही त्याला याविषयी खोदून खोदून काही विचारले नाही. आंगच्या शेतात दोन देशांचे देशवासी काम करतात. लहानग्या प्रिन्सला घेउन पट्टराणीही त्यावेळेस शेतावर काम करायलाच गेली होती.
तिथून बाहेर पडले तशी मी अरुणाचल प्रदेश बोर्डर च्या दिशेने चालत निघाले. एक तरूण त्याची बंदूक खांद्यावर टाकून चालला होता. मी त्याच्याशी गप्पा सुरु केल्या तर कळले की तो शिकारीला चालला होता. मग मी त्याच्याबरोबर चालत राहिले. तो शिकारीच्या गोष्टी सांगत होता त्या मला खूप सुरस वाटत होत्या. अर्धाएक तास चालल्यावर थोड्या दाट झाडीमध्ये आम्ही शिकारीची चाहूल घेत थांबून राहिलो. मी त्याला काहीच विचारू शकत नव्हते पण डोळ्याने निरीक्षण मात्र चालू होते. त्याने अंदाज घेऊन एका पक्षाला गोळी मारली तसे तो पक्षी मरून खाली पडला. मला कसेसे झाले पण मी काहीच बोलले नाही. मेलेल्या पक्षाला घेऊन तो परत निघाला तेव्हा शिकारीच्या अर्ध्या राहिलेल्या गोष्टी तो मला सांगत राहिला पण डोळ्याने प्रत्यक्ष शिकार पाहिल्यावर शिकारीच्या गोष्टी ऐकणेही त्रासदायक वाटू लागले.
घरी पोहोचेस्तोवर काळोख पडला होता. नेहेमी सारखी न चुकता रस्ता चुकलेच. ज्याचे नाव माहित नाही त्याच्या घराचा पत्ता कसा विचारू? पण मला एक स्मार्ट आयडिया सुचली. चर्चकडे कोणी भेटले त्याला मी सांगितले की “कल सबने मिलकर कौनसा घर बनाया था? मुझे उसी घर को जाना है|” मग त्याने बरोबर रस्ता दाखवला. घरी पोहोचताच मला सांगितले गेले की आता तू इथे पुरुषांबरोबर नाही तर स्वयंपाकघरात बायकांबरोबर जाऊन बसायचे. ते ऐकून मला माझा अपमान झाल्यासारखा वाटला. आत गेले तर कोणाला माझी नि मला कोणाची भाषा कळेना. आधीच शिकारीच्या प्रसंगाने मन थोडे उद्विग्न झाले होते त्यात हे सारे असे होत होते. पत्र लिहायचे म्हटले तर मोबाईल डेड झाला होता. मग मी माझी डायरी घेउन आले. शेकोटीच्या उजेडात आजच्या पत्रलेखनाला सुरवात केली. आज प्रथमच मोबाईल वर नाही तर कागदावर पत्र लिहित आहे.
वैदेही, माझी पत्र तू आवर्जून वाचतेस त्याचे कारण तुला फिरायची आवड आहे फक्त एवढेच नाही. मी जे जे काही करते त्यात नेहेमीच तुला रस असतो. माझ्या सटरफटर गप्पा तू लक्ष देऊन ऐकतेस. माझ्या जोक्सवर कधीकधी तुझ्याशिवाय दुसरे कोणीच हसत नाही. तू माझी एकुलती एक लाडकी नणंद आहेस. त्यायोगे, प्रवासात पत्र लिहायचा पायंडा पडल्यावरच मी ठरवून टाकले होते की एक ना एक दिवस तुलाही पत्र लिहायचे. तो दिवस आज उगवला. म्हणजे तूर्त दिवस मावळला आहे आणि कडाक्याची थंडीही पडली आहे. पण अगदी घरच्या कुत्र्या मांजासकट सारेच इथे शेकोटीभोवतीच वावर करतात त्यामुळे थंडी सुसह्य होते. एकीकडे बायकांची जेवायची तयारी चालू आहे पण आज जेवायला मांसाहार करायला माझे मन मात्र होणार नाही. म्हणजे बहुतेक कोरडा भात खायची वेळ येणार असे दिसते. उद्याच्या पत्रात काय जेवले ते लिहीनच. इतिहास तुझा आवडता विषय! या पत्रात इतिहासाचे खूप संदर्भ आले आहेत. म्हणून हे पत्र तुला आवडेल असे वाटते.
तुझी
सुप्रियावहिनी
रोचक
रोचक
मालिका वाचते आहे.
मालिका वाचते आहे.
धन्यवाद !
धन्यवाद !
सर्व भाग वाचतोय, प्रत्येक
सर्व भाग वाचतोय, प्रत्येक भागात प्रतिक्रिया नाही दिलेली. तुमचा प्रवास धाडसी आहेच पण अनपेक्षित (unpredictable) वळणानी रोचकही होत आहे.
आवडला हा भाग. काहीतरी वेगळे
आवडला हा भाग. काहीतरी वेगळे वाचायला मिळाले असे वाटले.
विलक्षण अनुभव.
विलक्षण अनुभव.
खरेच धाडस आहे... माझ्याच्याने
खरेच धाडस आहे... माझ्याच्याने नसता झाला हा एकटा प्रवास...कौतुक आहे तुमचे..