१८९७ चा प्लेग

Submitted by भरत. on 27 April, 2020 - 03:05

सध्याच्या दिवसांत Epidemic Diseases Act, 1897. याचा उल्लेख वारंवार होतो आहे. कोरोना महामारी च्या पार्श्वभू मीवर सरकारने हा कायदा पुन्हा एकदा लागू केला आहे.
हा कायदा ब्रिटिश सरकारने १८९७ साली प्लेगच्या नियंत्रणार्थ आणला होता.

या प्लेगच्या पाऊलखुणा मराठी इतिहास-साहित्य-कलाविश्वात उमटलेल्या दिसतात. सर्वांत आधी आठवतो तो २२ जून १८९७ हा चित्रपट.

चापेकर बंधूंनी केलेल्या रँडच्या खुनामागे लोकमान्य टिळकां ची प्रेरणा होती, असा आरोप करून टिळकांवर राजद्रोहाचा पहिला खटला चालला आणि त्यांना १८ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली.
केसरीचे माजी संपादक अरविंद व्यं गोखले यांनी लिहिलेल्या 'मंडालेचा राजबंदी' या पुस्तकात या सगळ्या कालखंडाबद्दल लिहिले आहे. त्या आठवणी आजच्या काळाशीही समर्पक वाटतात.
१८९६ सालच्या दुष्काळात जनता होरपळत असतानाच प्लेगच्या संकटाची भर पडली. हाँगकाँगहून (म्हणजे पुन्हा चीनमधून) आलेल्या धान्याच्या पोत्यांबरोबर प्लेगचे उंदीरही मुंबई बंदरात उतरले . मुंबईत साथ पसरली, न्यायालये , सरकारी कार्यालये बंद झाली. गाड्या भरभरून माणसे गुजरातकडे रवाना होऊ लागली. काही सरकारी नजर चुकवून पुण्यात आली. ऑक्टोबर १८९६ मध्ये पुण्यात प्लेगचा पहिला रुग्ण सापडला आणि आजार पाहता पाहता पसरला.

टिळकांनी केसरीतून प्लेगबद्दल माहितीपर मजकूर छापायला सुरुवात केली. लोकांनी काळजी घ्यायला हवी, बेपर्वाई सोडायला हवी. असे सांगितले. हिंदुस्तानात प्लेग येउ नये यासाठी प्रयत्न करण्यात सरकार कमी पडले, तरी आता प्रसार रोखण्यासाठी केलेल्या उपायांना टिळकांनी पाठिंबा दिला. टिळकांना तेव्हाही लोकांना नागरिक शास्त्राचे धडे द्यायची गरज भासली होती. सुशिक्षित, पुढारलेल्या लोकांनी प्लेग निवारणाच्या कामात पुढे यावे, आजूबाजूच्या लोकांना मदत करावी हे त्यांनी खडसावून सांगितले.

प्लेग प्रतिबंधासाठी सातार्‍याहून पुण्यात आणवलेल्या रँडने नदीपलीकडे प्लेगग्रस्तांसाठी संसर्गरोध छावणी (क्वारंटाइन) उभारली. रुग्णांना वेगळे काढणे , ते सापडलेल्या ठिकाणी स्वच्छता करणे ही कामे त्याने आरंभली. या उपायांनी पुढे सक्तीचे रूप घेतले. स्वच्छता करण्याची मजल चीजवस्तू घरेदारे जाळण्यापर्यंत गेली.

छावण्यांमध्ये खाण्यापिण्याची सोय नसल्याने प्लेगच्या जोडीने लोक उपासमारी आणि रोग प्रतिकारकशक्ती कमी होऊन मरू लागले. त्यामुळे लोक रुग्णाला छावणीत पाठवायला कचरू लागले. परिणामी सरकारने दंडुकेशाही आरंभली. "लोकांमध्ये अस्वास्थ्य उत्पन्न होऊन अरिष्ट निवारण्याकरता योजलेले हेच एक दुसरे अरिष्ट" अशी स्थिती झाली. "सरकारच्या उपायांमध्ये दुष्टावा नसेल, पण माणुसकीचा ओलावा नव्हता."
एकीकडे प्लेगचे वाढते प्रमाण, मृतांची वाढती संख्या आणि त्यात उपायांच्या नावाखाली अत्याचार यामुळे जनतेत असंतोष निर्माण होऊ लागला. काखेतले गोळे तपासण्यासाठी मुस्लिम स्त्रियांचे बुरखे फाडणे, हिंदू स्त्रियांना उत्तरांगावरची वस्त्रे काढून ठेवण्यास सांगणे, असे प्रकार होऊ लागले.

मुंबईत नसली तरी पुण्यात मोहर्र्मच्या मिरवणुकीवर बंदी घातली गेली. या बंदीला टिळकांनी जुलूम म्हटले.

पुण्यात रास्तापेठेत अपरात्री जाऊन धुमाकूळ घालणार्‍या पाचदहा सोजिरांना पुणेकरांनी चोप दिला. त्यात एका सोजिराचा मृत्यू झाला.

दुष्काळात प्लेगची भर पडल्याने लोकांची अन्नान्न दशा होऊ लागली.

रँडशाहीचा कडेलोट होऊ लागला तशी टिळकांनी त्यावर टीका सुरू केली. त्या वेळची इंग्रजी वृत्तपत्रे मात्र ब्रिटिश सरकारच्या जुलुमावर लिहिण्यापेक्षा सरकारची तळी उचलत टिळकांवर टीका करण्यात - प्रक्षोभक, चिथवणीखोर अशी विशेषणे लावण्यात धन्यता मानीत होती.

लक्ष्मीबाई टिळकांच्या स्मृतिचित्रे या आत्मकथनात प्लेगच्या मोजक्या आठवणी आहेत. कसल्याही संकटात विनोदवृती जागृत ठेवणार्‍या लक्ष्मीबाईं तेव्हा नगर येथे होत्या. त्यां चे आयुष्य बिर्‍हाडे बदलण्यातच गेले. प्लेगबद्दल त्या म्हणतात की विघ्नहर्त्यानेच आपल्या वाहनास आज्ञा केली यांना आता इथून हलवा. एक दिवस दत्तू व त्या जेवत असताना एक मोठा उंदीर दत्तूच्या ताटाजवळील चित्रावती खाऊ लागला. यावर लक्ष्मीबाई म्हणतात - "नगरचे उंदीर भीत नाहीत बरं का!"
" दोघे उठले तसे आणखी एक उंदीर येऊन चित्रावती खाऊ लागला. थोड्याच वेळात दोघे उंदीर गरगर फिरू लागले व पटकन मेले.
त्यांची परीक्षा करून ते प्लेगचे उंदीर आहेत हे कळल्यावर घर सोडणे आले. लक्ष्मीबाईंची सोय जिथे सर्व स्त्रियाच होत्या अशा एका वाडीत झाली.

रमाबाई रानडे यांच्या 'आमच्या आयुष्यातील काही आठवणी' या पुस्तकातही प्लेगचे उल्लेख आहेत. त्यांच्या धान्याच्या कोठीत मेलेले उंदीर मिळू लागले. पण त्यांचे एकदोन नोकर प्लेगने आजारी पडल्यावरच हे उंदीर प्लेगचे आहेत, हे त्यांना कळले. न्या. रानडे आपल्या नोकरांचीही कुटुंबीयांसारखीच काळजी घेत. त्यांची स्वतःची प्रकृतीही तोवर उतरणीला लागली होती. अशात त्यांनी स्वतःवर अधिक त्रास ओढवून घेऊ नये म्हणून रमाबाईंनी एक नोकर आजारी पडल्याची गोष्ट होताहोईतो न्या. रानड्यांपासून लपवून ठेवली. आतापावेतो प्रत्येक गोष्ट पती सांगतो केवळ म्हणून, पतीच्या सांगण्यानुसार करणार्‍या रमाबाई पहिल्यांदाच स्वतः काही ठरवताना आणि करताना दिसल्या.

चौथी आणि अतिशय हृदयद्रावक आठवण सावित्रीबाई फुले यांच्याबद्दलची आहे. त्यांनी आपला दत्तक मुलगा डॉक्टर यशवंतवतराव याला पुण्याजवळ प्लेगच्या उपचारांसाठी दवाखाना काढायला सांगितले. त्या स्वतः जाऊन रुग्णांना घेऊन येत आणि दवाखान्यात भरती करत. ६६ वर्षांच्या सावित्रीबाईनी एका दहा वर्षांच्या रुग्ण मुलाला बर्‍याच दूरवरून पाठंगुळीला घेऊन आणून दवाख्यान्यात भरती केले. तो मुलगा तर वाचला. पण प्लेगच्या संसर्गाने सावित्रीबाईंचा बळी घेतला.
पुढे १९०५ मध्ये नगरमध्ये प्लेगची साथ आली असताना यशवंतरावांनी तिथे दवाखाना काढला आणि रुग्णसेवा करताना संसर्ग होऊन त्यांचा मृत्यू झाला.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

१८५० सालानंतर पुन्हा १८९७ च्या आसपास प्लेग हॉंगकॉंगवरून समुद्र मार्गाने मुंबईत पोचला कारण मुंबई हे बंदर होते. तसाच तो कलकत्ता आणि कराचीलासुद्धा पोचला होता. मुंबईतून तो पुण्याला पोचला. मुंबई इलाका सिंध,कराचीपर्यंत, गुजरातचे काही जिल्हे खांदेश आणि पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या काही भागापर्यंत होता. त्यामुळे प्लेग या भागात पोचला. कारण या भागातील लोकांचे सरकारी कामकाजासाठी, शिक्षण व्यापार कामधंदा यासाठी मुंबई या राजधानीच्या शहरात येणे जाणे असे. मुख्यत: दाट वस्तीमध्ये तो फोफावला. पंजाबमधेसुद्धा उद्रेक झाला. ग्रामीण भागात तुरळक पसरला कारण शहरी लोक आपली घरे सोडून मोकळ्या हवेत वास्तव्याला गेले. पण ग्रामीण भागात फार पसरण्याआधीच एका फ्रान्स आणि स्विट्झर्लंडमध्ये शिक्षण घेतलेल्या यूक्रेनी ज्यूने मुंबईत ह्या रोगावर लस शोधून काढली. त्यानंतर प्लेग हटू लागला. मोठ्या साथीच्या रूपात न राहाता तुरळक केसेसमधून काही काळ अस्तित्व दाखवत राहिला आणि शेवटी जवळजवळ संपलाच.

<< >>तरीपण उदय सखेद आश्चर्य वाटते आहे.<< +१
उदयशेठ, पटलं नाहि. चूकिची फूटपट्टी लावली आहे तुम्हि, प्लीज फेरविचार करा... >>

------ साथीच्या रोगांत quarantine / वेगळे ठेवणे बाबत जे काही नियम आहेत ते अत्यंत जाचक आहेत. कुटुंबातून वेगळे करण्याची कल्पनाही करवत नाही...
करोनाच्या सुरवातीच्या काळात (जानेवारी-२०२०) चीन मधून प्रसिद्ध झालेली चित्रे, विलग करण्याच्या करुण कहाण्या... चीन मधे पोलिस अक्षरश: जबरदस्तीने नेत होते आणि ११ दशलक्ष संख्या असणारे वुहान चे रस्ते संपुर्णत : निर्मनुष्य केले होते. करोनाग्रस्तांना "वेगळे " ठेवण्यासाठी तातडीने तयार करण्यात आलेली इस्पितळे...

भारतातही लॉकडाऊन चे नियम धाब्यावर बसवणार्‍यांना पोलिसांच्या लाठ्या मिळाल्याची दृष्ये बघायला मिळाली. अंगावर शहारे आणणारी दृश्ये होती. काही लोकांना मारहाणीमधे किंवा आत्यंतिक त्रासाने (रेल्वे खाली १६ जिव जाणे - कुठल्या विश्वात आहोत आपण ? :अरेरे:) जिव गमवावा लागला.

प्लेग काळातही अशीच परिस्थिती होती. त्या काळातही काही ठिकाणी अत्याचार झाले असतील...

रँड यांच्या खुन्याला देशभक्ती पेक्षा टोकाची धार्मिक भक्ती हे कारण आहे असे मी समजतो. वि गो खोबरेकर यांनी संपादित केलेले,
आणि तर्कतीर्थ लक्षणशास्त्री जोशी यांचे निवेदन असलेले, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृती मंडळाने प्रकाशित केलेले
" हुतात्मा दामोदर हरि चापेकर यांचे आत्मवृत्त " हे सहज उपलब्द आहे.

https://archive.org/details/DamodarHariChaphekar/mode/2up

अभ्यास वाढवण्यासाठी इंग्रजी मध्ये हवे असल्यास...
https://cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/VOL-II/autobiograp...

पुस्तकांत अनेक ठिकाणी मला देशा पेक्षा धार्मिक कट्टरताच जास्त दिसते. मग आगरकर, टिळक पण सुटले नाहीत. सुधारकाच्या सांपादकावर हल्ला, "सुधारक कर्त्यांना " धमकी, मिशनर्‍यांच्या घराला आगी लावणे, धर्मातर केलेल्या वेलणकरांवर हल्ला, पान क्र ९०-९१ वर रँडसाहेबाची तर स्तुती आहे... पण उपयोग काय ? तो धर्म शत्रू बनला म्हणून सूड.

विलायते वरुन आलेल्या सुधारकाने ( काशीनाथपंत गाडगीळ) त्याच्या मुलीचा विवाह शास्त्रा विरुद्ध केला (म्हणजे मुलीचे वय तब्बल १६ वर्षे होते) म्हणून वधू - वरांस प्राणघातक इजा पोहोचविण्याचा प्रयत्न.. लग्नवरातीवर दगडांनी हल्ला (पान क्र. २३-२४). हे कशासाठी ? परक्या मुलीने कधी विवाह करायचा या बद्दल ठरविणारे हे कोण होते ?

पान क्र. ९१ वर मुसलमानांनाना दोषी ठरवण्याचा प्रयत्न (आजही तशीच मोडस ऑपरेंडी वापरली जात आहे... महात्माची निर्घुण हत्या करुन नथूरामाने मुसलमान असल्याचा देखावा निर्माण करणे किंवा प. बंगाल मधे "गोल टोपी आणि लुंगी घातलेले " लोकांनी सरकारी मालमत्तेचे नुकसान पोहोचवणे... पालघरांत लिंचिंग झाल्यावर त्याचे खापर... )... म्हणजे मुसलमानांवर नसलेली बिल फाडण्याचे प्रकार नवे नाहित.

उदय, तुम्ही दिलेल्या लिंकबद्दल धन्यवाद. त्या पुस्तकात असंही वाचनात आलं की रँड च्या आणी गोर्या सोजिरांच्या चोरी, बलात्कार आणी इतर अत्याचारांविषयी केसरी (टिळक) आणी सुधारक (आगरकर) दोन्ही वर्तमानपत्रांनी अत्यंत कठोर टीका केली होती. त्यामुळे, रँडच्या खूनात केवळ धार्मिक रंग नसून त्याच्या अत्याचारांचादेखिल सहभाग असावा.

या संकलनाबद्दल लेखकाचे आभार.
तब्बल १२३ वर्षांनंतर, विज्ञानाने भरपूर प्रगती करूनही अनेक ठिकाणी आजच्या परिस्थितीच्या मानसिकतेची साम्यस्थळे मिळाली.

गुड गव्हर्नन्स ते हेकट ते जुलमी हा प्रवास फार सहजपणे पार केला जातो हे या सगळ्यात फार महत्वाचे सार दिसले.

>>रँड यांच्या खुन्याला देशभक्ती पेक्षा टोकाची धार्मिक भक्ती हे कारण आहे असे मी समजतो.<<
पण त्या काळात देशभक्ती आणि धर्मभक्ती वेगळी कुठे होती? इंग्रजांचं फुटिचं राजकारण होतं ते. त्याविरुद्ध उभारलेलं बंड, मग त्यातला देशभक्तीचा भाग खटकण्या सारखं काय आहे त्यात?..

Pages