१८९७ चा प्लेग

Submitted by भरत. on 27 April, 2020 - 03:05

सध्याच्या दिवसांत Epidemic Diseases Act, 1897. याचा उल्लेख वारंवार होतो आहे. कोरोना महामारी च्या पार्श्वभू मीवर सरकारने हा कायदा पुन्हा एकदा लागू केला आहे.
हा कायदा ब्रिटिश सरकारने १८९७ साली प्लेगच्या नियंत्रणार्थ आणला होता.

या प्लेगच्या पाऊलखुणा मराठी इतिहास-साहित्य-कलाविश्वात उमटलेल्या दिसतात. सर्वांत आधी आठवतो तो २२ जून १८९७ हा चित्रपट.

चापेकर बंधूंनी केलेल्या रँडच्या खुनामागे लोकमान्य टिळकां ची प्रेरणा होती, असा आरोप करून टिळकांवर राजद्रोहाचा पहिला खटला चालला आणि त्यांना १८ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली.
केसरीचे माजी संपादक अरविंद व्यं गोखले यांनी लिहिलेल्या 'मंडालेचा राजबंदी' या पुस्तकात या सगळ्या कालखंडाबद्दल लिहिले आहे. त्या आठवणी आजच्या काळाशीही समर्पक वाटतात.
१८९६ सालच्या दुष्काळात जनता होरपळत असतानाच प्लेगच्या संकटाची भर पडली. हाँगकाँगहून (म्हणजे पुन्हा चीनमधून) आलेल्या धान्याच्या पोत्यांबरोबर प्लेगचे उंदीरही मुंबई बंदरात उतरले . मुंबईत साथ पसरली, न्यायालये , सरकारी कार्यालये बंद झाली. गाड्या भरभरून माणसे गुजरातकडे रवाना होऊ लागली. काही सरकारी नजर चुकवून पुण्यात आली. ऑक्टोबर १८९६ मध्ये पुण्यात प्लेगचा पहिला रुग्ण सापडला आणि आजार पाहता पाहता पसरला.

टिळकांनी केसरीतून प्लेगबद्दल माहितीपर मजकूर छापायला सुरुवात केली. लोकांनी काळजी घ्यायला हवी, बेपर्वाई सोडायला हवी. असे सांगितले. हिंदुस्तानात प्लेग येउ नये यासाठी प्रयत्न करण्यात सरकार कमी पडले, तरी आता प्रसार रोखण्यासाठी केलेल्या उपायांना टिळकांनी पाठिंबा दिला. टिळकांना तेव्हाही लोकांना नागरिक शास्त्राचे धडे द्यायची गरज भासली होती. सुशिक्षित, पुढारलेल्या लोकांनी प्लेग निवारणाच्या कामात पुढे यावे, आजूबाजूच्या लोकांना मदत करावी हे त्यांनी खडसावून सांगितले.

प्लेग प्रतिबंधासाठी सातार्‍याहून पुण्यात आणवलेल्या रँडने नदीपलीकडे प्लेगग्रस्तांसाठी संसर्गरोध छावणी (क्वारंटाइन) उभारली. रुग्णांना वेगळे काढणे , ते सापडलेल्या ठिकाणी स्वच्छता करणे ही कामे त्याने आरंभली. या उपायांनी पुढे सक्तीचे रूप घेतले. स्वच्छता करण्याची मजल चीजवस्तू घरेदारे जाळण्यापर्यंत गेली.

छावण्यांमध्ये खाण्यापिण्याची सोय नसल्याने प्लेगच्या जोडीने लोक उपासमारी आणि रोग प्रतिकारकशक्ती कमी होऊन मरू लागले. त्यामुळे लोक रुग्णाला छावणीत पाठवायला कचरू लागले. परिणामी सरकारने दंडुकेशाही आरंभली. "लोकांमध्ये अस्वास्थ्य उत्पन्न होऊन अरिष्ट निवारण्याकरता योजलेले हेच एक दुसरे अरिष्ट" अशी स्थिती झाली. "सरकारच्या उपायांमध्ये दुष्टावा नसेल, पण माणुसकीचा ओलावा नव्हता."
एकीकडे प्लेगचे वाढते प्रमाण, मृतांची वाढती संख्या आणि त्यात उपायांच्या नावाखाली अत्याचार यामुळे जनतेत असंतोष निर्माण होऊ लागला. काखेतले गोळे तपासण्यासाठी मुस्लिम स्त्रियांचे बुरखे फाडणे, हिंदू स्त्रियांना उत्तरांगावरची वस्त्रे काढून ठेवण्यास सांगणे, असे प्रकार होऊ लागले.

मुंबईत नसली तरी पुण्यात मोहर्र्मच्या मिरवणुकीवर बंदी घातली गेली. या बंदीला टिळकांनी जुलूम म्हटले.

पुण्यात रास्तापेठेत अपरात्री जाऊन धुमाकूळ घालणार्‍या पाचदहा सोजिरांना पुणेकरांनी चोप दिला. त्यात एका सोजिराचा मृत्यू झाला.

दुष्काळात प्लेगची भर पडल्याने लोकांची अन्नान्न दशा होऊ लागली.

रँडशाहीचा कडेलोट होऊ लागला तशी टिळकांनी त्यावर टीका सुरू केली. त्या वेळची इंग्रजी वृत्तपत्रे मात्र ब्रिटिश सरकारच्या जुलुमावर लिहिण्यापेक्षा सरकारची तळी उचलत टिळकांवर टीका करण्यात - प्रक्षोभक, चिथवणीखोर अशी विशेषणे लावण्यात धन्यता मानीत होती.

लक्ष्मीबाई टिळकांच्या स्मृतिचित्रे या आत्मकथनात प्लेगच्या मोजक्या आठवणी आहेत. कसल्याही संकटात विनोदवृती जागृत ठेवणार्‍या लक्ष्मीबाईं तेव्हा नगर येथे होत्या. त्यां चे आयुष्य बिर्‍हाडे बदलण्यातच गेले. प्लेगबद्दल त्या म्हणतात की विघ्नहर्त्यानेच आपल्या वाहनास आज्ञा केली यांना आता इथून हलवा. एक दिवस दत्तू व त्या जेवत असताना एक मोठा उंदीर दत्तूच्या ताटाजवळील चित्रावती खाऊ लागला. यावर लक्ष्मीबाई म्हणतात - "नगरचे उंदीर भीत नाहीत बरं का!"
" दोघे उठले तसे आणखी एक उंदीर येऊन चित्रावती खाऊ लागला. थोड्याच वेळात दोघे उंदीर गरगर फिरू लागले व पटकन मेले.
त्यांची परीक्षा करून ते प्लेगचे उंदीर आहेत हे कळल्यावर घर सोडणे आले. लक्ष्मीबाईंची सोय जिथे सर्व स्त्रियाच होत्या अशा एका वाडीत झाली.

रमाबाई रानडे यांच्या 'आमच्या आयुष्यातील काही आठवणी' या पुस्तकातही प्लेगचे उल्लेख आहेत. त्यांच्या धान्याच्या कोठीत मेलेले उंदीर मिळू लागले. पण त्यांचे एकदोन नोकर प्लेगने आजारी पडल्यावरच हे उंदीर प्लेगचे आहेत, हे त्यांना कळले. न्या. रानडे आपल्या नोकरांचीही कुटुंबीयांसारखीच काळजी घेत. त्यांची स्वतःची प्रकृतीही तोवर उतरणीला लागली होती. अशात त्यांनी स्वतःवर अधिक त्रास ओढवून घेऊ नये म्हणून रमाबाईंनी एक नोकर आजारी पडल्याची गोष्ट होताहोईतो न्या. रानड्यांपासून लपवून ठेवली. आतापावेतो प्रत्येक गोष्ट पती सांगतो केवळ म्हणून, पतीच्या सांगण्यानुसार करणार्‍या रमाबाई पहिल्यांदाच स्वतः काही ठरवताना आणि करताना दिसल्या.

चौथी आणि अतिशय हृदयद्रावक आठवण सावित्रीबाई फुले यांच्याबद्दलची आहे. त्यांनी आपला दत्तक मुलगा डॉक्टर यशवंतवतराव याला पुण्याजवळ प्लेगच्या उपचारांसाठी दवाखाना काढायला सांगितले. त्या स्वतः जाऊन रुग्णांना घेऊन येत आणि दवाखान्यात भरती करत. ६६ वर्षांच्या सावित्रीबाईनी एका दहा वर्षांच्या रुग्ण मुलाला बर्‍याच दूरवरून पाठंगुळीला घेऊन आणून दवाख्यान्यात भरती केले. तो मुलगा तर वाचला. पण प्लेगच्या संसर्गाने सावित्रीबाईंचा बळी घेतला.
पुढे १९०५ मध्ये नगरमध्ये प्लेगची साथ आली असताना यशवंतरावांनी तिथे दवाखाना काढला आणि रुग्णसेवा करताना संसर्ग होऊन त्यांचा मृत्यू झाला.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेख वाचला.कंटेंट मुळे आवडला म्हणवत नाही.
प्लेग भयंकर असला पाहिजे.चि वी जोशींची एक खानावळीतल्या मावशींची कथा असलेलं पुस्तक आहे.त्यात पण त्यांचा नवरा प्लेग वाल्या एकाची अंत्ययात्रा करता करता संसर्ग होऊन प्लेग ने गेला असा उल्लेख आहे.
प्लेग वर लस निघालीय का?मध्ये सुरत मध्ये आला होता ना?

वॉलडेमार हाफकिन नावाच्या एका शास्त्रज्ञाने यावर लस शोधून काढली. मुंबईतली हाफकिन इन्स्टिट्यूट त्याच्याच नावाने प्रसिद्ध आहे. बाकी विकीवर आहे. Johns हॉपकिन्स वेगळा.
लेख समयोचित आणि माहितीपूर्ण आहे.

प्लेगमुळे तत्कालीन मराठी समाजात उठलेल्या पडसादांचे आणि इतर आठवणींचे संक्षिप्त संकलन आवडले.

भारतात शेवटची प्लेग ची साथ गुजरात मध्ये
१९९४ ला आली होती आणि त्या मध्ये ५४ लोग दगावली आणि तीन लाख लोकांना स्थलांतरित करावे लागले ही भारतातील प्लेग ची शेवटची साथ.

प्लेगमुळे तत्कालीन मराठी समाजात उठलेल्या पडसादांचे आणि इतर आठवणींचे संक्षिप्त संकलन आवडले. >>>> +१

प्लेगमुळे तत्कालीन मराठी समाजात उठलेल्या पडसादांचे आणि इतर आठवणींचे संक्षिप्त संकलन आवडले.>>>>>++11111

>>प्लेगमुळे तत्कालीन मराठी समाजात उठलेल्या पडसादांचे आणि इतर आठवणींचे संक्षिप्त संकलन आवडले. >> +१

सुरत च्या प्लेगच्या साथी मध्ये अमेरिकेचे दोन सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ भारतात येऊन सुरतला गेले आणि त्यानंतर ते भारत सरकारला न सांगता तेथून गायब झाले.
याबद्दल बोलताना ए एफ एम सी चे आमचे सूक्ष्मजीवशास्त्र विषयाचे प्राध्यापक यांनी (२०००मध्ये आमच्या कोर्स मध्ये भाषण देताना) एक शंका बोलून दाखवली कि हे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ या प्लेगचे जंतू घेऊन अमेरिकेत गेले कारण हे जंतू भारतीय जनते मध्ये रोग फैलावण्यात सक्षम होते.

दिल्लीतील १९९६ सालचा डेंग्यू आणि सिलिगुडी येथे २००१ साली पसरलेले मेंदूज्वर हे असे सूक्ष्मजीव शास्त्रज्ञांना बुचकळ्यात टाकणारे साथीचे रोग होते.

अशा विविध जंतूंची सूची तयार करून आणि त्यांचे संवर्धन करून जैविक शस्त्रास्त्रे निर्मिती होऊ शकते. भारतावर( किंवा कोणत्याही राष्ट्रावर) जैविक शस्त्राचा हल्ला करायचा झाला तर जे जन्तु तेथील स्थानिक जनतेला सर्वात घातक आहेत असे जंतू निवडून त्यांची निवडक वाढ करून हल्ला केल्यास तेथील जनतेला सर्वात जास्त नुकसान पोहोचवता येते.

जैविक अस्त्रे हा अस्त्रांचा सर्वात धोकादायक आणि अनपेक्षित( UNPREDICTABLE) प्रकार आहे.

चीन कडून वूहन मध्ये अशा अस्त्रांची निर्मिती केली गेली नसेलच असे सांगता येत नाही. परंतु त्यांनी असे अस्त्र तयार केले आहेच याबद्दल खात्रीचा पुरावा मिळालेला नाही. परंतु एकदम स्विच ऑफ केल्यासारखे तेथील संसर्ग रुग्णसंख्या आणि मृत्यू बंद कसे झाले हे कोणत्याही तर्काने सांगता येत नाही. यामुळे हा संशय बळावतो.

जालावर खोदले असता कर्नल नागेंद्र यांच्याबद्दल एक दुवा सापडला
https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC1121283/

छान आणि माहितीपूर्ण लेख.

ह्या 1897 च्या साथी शी नाही पण 1944 च्या सुमारास ही मुंबई आणि आजूबाजूच्या प्रदेशात छोटी प्लेग ची साथ आली होती तिच्याशी माझा डायरेक्ट संबंध आहे.

आमच्या आईचं नवीनच लग्न झालं होतं , आणि त्यांच्या गावात प्लेग ची साथ आली. त्यात आईला प्लेग ची लागण झाली.

साथीचा आजार असल्याने सेवा करण्यासाठी माणूस तर सोडाच डॉक्टर ही कसेबसे तपासायला यायला तयार झाले. घरातले च आईची सेवा करत होते. रात्री सगळे झोपले की विहिरीवर जाऊन तिचे कपडे धुवायचे , तिथे गरम पाणी ओतायचे असे सगळे चालले होते.

एक दिवस तिचा ताप 106° इतका वाढला होता . डॉक्टर नी ही आशा सोडली होती. पण परमेश्वरी कृपेने आई त्यातून वाचली . हळू हळू रिकव्हर झाली. नंतर ती सामान्य आयुष्य जगली. तिला फार दीर्घायुष्य मिळालं नाही तरी तिच्या जाण्याशी प्लेग चा संबंध ही नाही.

प्लेग ने तिच्या शरीरात एक कायमची खूण मात्र ठेवून दिली होती. तिच्या डाव्या दंडात एक हाताला सहज जाणवणारी एक गाठ होती ज्याचा तिला काही ही त्रास मात्र होत नसे.

कोरोना च्या ह्या दिवसात मला आईच्या प्लेगचीच आठवण येतेय.

ओह मनीमोहोर,
आई प्लेग मधून बचावल्या हे खरंच चांगलं.
घरच्या लोकांनीही न घाबरता सेवा केली.

प्लेगमुळे तत्कालीन मराठी समाजात उठलेल्या पडसादांचे आणि इतर आठवणींचे संक्षिप्त संकलन आवडले.+1111

छान लेख आहे.
प्लेग म्हटले की रॅण्ड-टिळक आणि सावित्रीबाई हेच आठवतात.
आज माहितीत थोडी आणखी भर पडली

ओह मनीमोहोर,
आई प्लेग मधून बचावल्या हे खरंच चांगलं.
घरच्या लोकांनीही न घाबरता सेवा केली.>>>>++11111 खरंय, अशा दिवसांत घरच्याची साथ कुठच्याही संकटाला सामोरं जाण्याची शक्ती देते.

@ अनु आणि @ धनुडी , खरं आहे.
आईला प्लेग ने गाठलं तेव्हा औषधं होती त्यावर. तर ती औषधं, घरच्यानी घेतलेली तिची काळजी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे परमेश्वरी कृपा ह्यामुळेच आई त्यातून बचावली.

माहितीपूर्ण लेख. लेख आवडला आहे.

हा प्लेग माझ्या पणजोबांंना झाला होता. त्यांच्या सगळ्या गावात लोक पटापट मरत होते म्हणे. हेही अत्यंत अस्वस्थ झाले व बेशुद्ध पडले. नाडी/ ठोके बंद पडले. मग घरच्यांनी तयारी केली. तिरडीवर ठेवले, तिरडी बांधली व वर उचलताना एकाला यांचा पायाचा अंगठा हललेला दिसला . मग तिरडी पुन्हा खाली ठेवली , त्यांना काढले. काही दिवसांनी ते पूर्ण बरे झाले. मग आमच्या पणजीशी लग्न झाले. त्यामाणसाने पाहिल्यामुळे आज आम्ही आहोत Lol .
हे आठवले म्हणून लिहिले . हा किस्सा आमच्या घरात प्रसिद्ध आहे. धन्यवाद.
मनिमोहोर ..तुमची आई वाचणे खरच परमेश्वराचा चमत्कार आहे.

एक गंमतः आज भारतीय सरकार ज्या कायद्याचं पालन करतंय आणी ज्याचा भारतीय लोकं 'कोरोना च्या विरोधात सरकारची उल्लेखनीय कामगिरी' म्हणून कौतूक करताहेत - ते रास्तच आहे - त्याच कायद्याचं पालन केल्याबद्दल रँड चा खून केला गेला होता. क्वारंटाईन, सॅनिटायझेशन च्या पद्धती बदलल्या. त्या काळी गावाबाहेर छावण्यांमधे ठेवावं लागे, आज घरात किंवा शहरात हॉस्पिटल मधे ठेवता येतं. आज, सॅनिटायझर्स वापरता येतात, तेव्हा चीज-वस्तू जाळावी लागे. टिळकांनी राजकीय फायदा घेत रँड च्या सोशल डिस्टंसिंग (मुहर्रम च्या मिरवणुकीवर बंदीचा निर्णय) ला 'अन्यायकारक' ठरवलं. इतिहासाची पुस्तकं वस्तुनिष्ठ नसतात हेच खरं. Happy

ब्रिटिशांसारख्या परक्या देशाने राज्य करत असताना जबरदस्तीने लावलेले जाचक नियम आणि आजच्या सरकारने लावलेले नियम ह्यात मोठा फरक आहे. परक्या लोकांच्या नियमाबद्दल लोकांचा पूर्वग्रह असणारच. इंग्रज लोक बहुतांश भारतीय लोकांना दुय्यम समजत. त्यांचे कपडे, धर्म, सोवळे ओवळे ह्याला तुच्छ मानत असण्याचीच शक्यता आहे. अशा संकटसमयी अशा प्रकारे बूटबिट घालून थेट घराच्या आत घुसून सामान बाहेर काढून लोकांना जबरदस्तीने घराबाहेर काढणे लोकांना खटकणार नाही का? घरातले लोकही जिथे सोवळे होऊन जातात तिथे देव्हार्‍यात, स्वयंपाकघरात हे परके , परधर्मीय घुसलेले लोकांना का रुचेल?
हा सगळा विचार करून लोकांच्या कलाने घेऊन, स्थानिक पुढार्‍यांना समजावून हे सगळे केले असते तर कदाचित इतका विरोध झाला नसता.
सरकारी योजनेमागे निव्वळ उद्देश चांगला असून भागत नाही. त्याची कार्यवाही योग्य होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नाहीतर अशा प्रकारे उफराटा परिणाम होतो.
टिळक हे जहाल विचारांचे राजकारणी त्यामुळे त्यांनी ह्या परिस्थितीचा फायदा करुन घेतला तर नवल काय? आजही राजकीय विरोधक आपल्या परीने ह्या साथीचा फायदा करून घेतच आहेत.

फे फ +1 आपला समाज फारच रूढीप्रिय होता. सोजीर घरात घुसतील म्हणून रोगी लपवणे, प्रेते लपवणे असे अनेक प्रकार होऊ लागले तेव्हा अधिक कडक कारवाईची गरज भासू लागली. अधिकारी हातात कर्णे घेऊन रस्त्यावर फिरून रोग आणि संसर्गाविषयी माहिती देत असे वाचले आहे. मुंबईपेक्षा पुण्यात खूपच अधिक सनातनी वातावरण होते त्यामुळे पुण्यात लोकक्षोभ अधिक झाला. मुंबईतले लोक उपलब्ध उपचार आणि स्वच्छता करून घ्यायला तयार होते, पुण्यातले रिलक्टंट होते.

फेरफटका, इतिहासाची पुस्तकं वस्तुनिष्ठ नसतात हे खरंच. ते पुस्तक टिळकांबद्दल भक्तिभावाने लिहिलेलं आहेच. पण तरीही वाचताना जाणवतं की सत्य हे तुम्ही म्हणताय ते आणि पुस्तकात सांगितलंय ते यांच्या मध्ये आहे. रादर तो एक प्रवासही असावा.

सध्या काही ठिकाणी टिळकांचा प्लेग प्रतिबंधक उपायांनाच विरोध होता असं लिहिलं जाताना दिसतंय. ते पूर्ण सत्य नाही.

रँड खुनाच्या प्रकरणात पुस्तकातल्या मांडणीतच मला खूप विसंगती जाणवली. पण इथे ते अवांतर होईल.

<सरकारी योजनेमागे निव्वळ उद्देश चांगला असून भागत नाही. त्याची कार्यवाही योग्य होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नाहीतर अशा प्रकारे उफराटा परिणाम होतो.> +१.

व्यत्यय, लिहिताना प्रताधिकाराचा नियम समोर नाचत होता. त्यामुळे त्रोटक आणि तुटक लिहिलं गेलंय. लिहितानाही मला ते जाणवत होतं.

मनोमोहोर आणि आदिश्री, तुमच्या आठवणी हृद्य आहेत.

थोडक्यात, तेव्हाचे पुणेकर म्हणजे आजचे तबलिगी होते म्हणता येईल का?
रँडच्या कर्तव्यदक्षतेमुळे हजारो पुणेकरांचे जीव वाचले असतील. त्याचे बक्षीस त्याला खुनाच्या रुपाने मिळाले.

Pages