काकडी - पोहे

Submitted by योकु on 23 April, 2020 - 17:49
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

सध्या सगळे जण घरी असाल लॉकडाऊन मुळे! काळजी घेत असालच. स्टे सेफ Happy
तर काहीतरी वेगळा प्रकार म्हणून रुचिरा मध्ये दिलेले हे काकडी पोहे करून पाहीलेत. चवीला अतिशय सुरेख आणि कमी सामानात चविष्ट प्रकार होतो. काही जिन्नस नव्हते ते वगळून तर त्याबदल्यात काही दुसरं घालून जमवले आहेत. नक्की करून पाहा.

२ मध्यम मोठ्या काकड्या
ओंजळ भर + जरा वर जाडे पोहे
थोडं सुकं खोबरं
२ हिरव्या मिरच्या (कमी तिखट व्हेरायटी)
२ चमचे तेल
मोठी चिमटीभर मोहोरी
चिमटीभर हिंग
साखर, मीठ चवीनुसार
अर्ध्या लिंबाचा रस

क्रमवार पाककृती: 

काकड्या स्वच्छ धूवून शेंडा बुडखा काढून सोलून जाड जाड किसाव्या (काकडी पिळून पाणी काढून टाकायचं नाहीय)
सुकं खोबरं ही असंच जाडं भरडं किसून घ्यायचंय. हा कीस २-३ टेबली चमचे तरी व्हायला हवा.
पोहे चाळून धूवून घ्यावेत.
मिरच्या धूवून, डेखं काढून आवडेल तश्या जाड/बारीक चिरून घ्याव्यात
पोह्यांतलं पाणी संपूर्णपणे निथळलं की काकडीचा कीस, खोबरं आणि पोहे एकत्र कालवून १५ मिनिटं तरी ठेवून द्यावे.

एका लहान कढल्यात २ चमचे तेल गरम करून मोहोरी तडतडू द्यावी आणि मग यात मिरची आणि हिंग घालून काही सेकंद होऊ द्यावं. ही चरचरीत फोडणी कालवलेल्या पोह्यांवर ओतावी आणि साखर, मीठ, लिंबाचा रस घालून मस्तपैकी कालवून हे फिकट हिरव्या रंगाचे पोहे खायला घ्यावेत.

thumbnail_IMG_0244.jpg

वाढणी/प्रमाण: 
दोन लोकांकरता ब्रेफा किंवा संध्याकाळचं काही खायला म्हणून
अधिक टिपा: 

- मूळ कृतीत ओलं खोबरं आणि त्याशिवाय कोथिंबीर, डाळ्यांचं कूट इ. आहेत. हो आणि पोहे स्पेसिफाय केलेले नाहीत सो ते पातळ पोहे असावेत, मी इथे नेहेमीचे फोडणीच्या पोह्यांना वापरतो ते जाड पोहे वापरले आहेत
- पोहे कालवल्यानंतर काही वेळ ठेवून देणे आवश्यक आहेत, यामुळे मस्त मॉईस्ट होतात काकडीच्या सुटलेल्या पाण्यानी आणि अर्थात चवही येते.
- माझ्यामते जरा किसलेलं आलंही यात चांगलं लागेल
- फोडणीत कुटाची मिरचीही चांगली लागेल बहुधा
- पातळ पोहे वापरणार असाल तर ते आधी धूवून घ्यायची आवश्यकता नाही (मूळ कृतीत पोहे धूवून वापरलेले नाहीत)
- गरमीच्या दिवसांत काही खावंसं वाटत नाही त्यावेळी हा पदार्थ खाल्या जाईल असा आहे. जरा गार करूनही छान लागेल.

माहितीचा स्रोत: 
रुचिरा
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रेसिपी छान आहे पण सद्ध्याच्या काळात कच्ची काकडी कांदा टाॅ, कोथिंबीर, मिरची, मुळा, गाजर काहीच कच्चं नको. जरासं वाफवून घातलं तर बरं.

रेसिपी छानच आहे. पण वर मेधावि म्हणलीय तस सध्या कच्चं न खाल्लेलंच बरं.
एरवी ह्यात गोडसर दही घालून ही भारी लागतं. दही काकडी पोहे. गाजर सिमला मिरचो, थोडे क्रश अक्रोड , वर पोह्याचा भाजलेला पापड चुरून अस सगळं घालून एक one pot meal ही होऊ शकत ह्याच.

मस्त.
मलाही सायोसारखंच वाटलं - दडप्या पोह्यांत कांद्याऐवजी काकडी. Happy

कच्चं का खायचं नाहीये सध्या?

भाज्या(वरची थुंकी) धुवून घेत असाल ना एरवीही?
तसाही कोरोना श्वसनसंस्थेत शिरणारा विषाणू आहे - पचनसंस्थेत नव्हे असं वाचलं. मायबोलीवरच्या तज्ज्ञांनी प्रकाश टाकला तर बरं होईल. Happy

उगीच कशाला विषाची परीक्षा घ्या असं असेल! ही नेहमीची रेग्युलर थुंकी नाही, कोरोना स्पेशल आहे.
तसेच, नाक आणि तोंड मध्ये फार काही स्क्वे. फुटांचं अंतर नाही.

काकडी पोहे रेसिपी छान आहे. मी एकदा केली होती रुचिरा मध्ये बघूनच, मला जरा लगदा झाला असं वाटलं. दडपे पोहे चा खमंगपणा नव्हता. इथे मिळणाऱ्या प्रचंड पाणीदार काकडीचा दोष असू शकतोच. पुढच्या वेळेस चोचवून बघू असा विचार होता पण पहिल्या प्रयत्नात तितकी मजा न आल्यामुळे राहिलंच.
वरातीमागून घोडे (relevant?) प्रतिसादासाठी सॉरी च Happy

माझ्यामते काकडी शक्यतो सोलूनच घेतली जाते म्हणून चालावी. अर्थात हे माझं मत नेहेमीप्रमाणे.
सध्या आम्ही दोघही घरून काल्म, कामाला कुणीही मदतनीस नाही आणि २.५ वर्षांच बाळ + माझं उफराटं टाइमिंग ह्या आघाड्या असल्यानी लवकर होणार्‍या इ. रेस्प्याच ट्राय करतो.
आता उद्याला औषधं इ. करता जायला लागणार आहेच बाहेर.

माझ्यामते काकडी शक्यतो सोलूनच घेतली जाते म्हणून चालावी. --- हो, बरोबर. मी पण काकडी, टोमॅटो, गाजर असं सगळं खाते आहे Happy दुपारी भयंकर उन्हात घरात बसल्या-बसल्या लाहीलाही होते तेव्हा काकडी must.
पातळ पोहे -शक्य आहे, आठवत नाही आता.

साधारण असा प्रकार मी भाताचा करते. घरी उन्हाळ्याच्या दिवसांत इतर जनता दही-भात खायची तेव्हा मी काकडीची कोशिंबीर-भात खायचे. मस्त लागतो.

नाक आणि तोंड मध्ये फार काही स्क्वे. फुटांचं अंतर नाही >>> Biggrin आपल्या पचनसंस्थेत रिसेप्टर नाहीत या विषाणूला राइड द्यायला असं म्हणतात. त्यामुळे खाद्यपदार्थातून पोटात गेलेच तर दुसर्‍या दिवशी त्यांना बाहेरचा रस्ता. अर्थात स्वयंपाक करताना (किंवा खाताना) नको त्या सवयी असल्या तर मात्र ते अंतर काउंट्स Proud

नवीन संशोधन अजून पुढे गेले आहे

करोना गुप्त मार्गाने पसरत नाही , it is not STD हे शास्त्रज्ञानी सिद्ध केले आहे

अरे रेसिपीवर बोला! इतकी छान रेसिपी टाकलीये योकुने, छानच लागतात हे पोहे , मिरची जरा बारिक असेल तर मस्त गोड्,तिखट अशी मिक्स चव येते.
मैत्रीणीकडे खाल्ले होते तिने काकडी बारिक चोचवुन घेतली होती आणी १चमचा आबन्ट दही घातल होत.

छान रेसिपी.. मी ही करते. लहानपणी ऊन्हाळ्यात दुपारी खिडकीत बसून खात खात चि. वि. जोशींची पुस्तके वाचायचे. Happy मी फोडणी मध्ये थोडे शेंगदाणे घालते बाकी सेम .

छानच रेसीपी. आज मधल्यावेळेस करते. आता काकडी घेउन येते. मला पन पहिल्यांदा वाटलेनी मग त्यापेक्षा दडपे पोहेच का करु नाहीत?

आज केले. मस्त झाले. जाडे पोहेच वापरले. लिंबू नव्हतं. ओलं खोबरं होतं. कच्चा कांदा घालायचा मोह झाला पण नाही घातला. पुढच्या वेळी घालून पाहीन Happy

https://youtu.be/3neY8L2hcbU

हे बघा इथे मधुरा काकडी चोचवते आहे.
ती करते आहे त्यापेक्षा खूप जलद आणि बारीक हवं.

चंपा, नाही चिवट लागत. पोहे धुवून घेतल्यामुळे मऊ होतात.
असे नुसते धुतलेले पोहे, दूध आणि गूळ हा माझा लहानपणी आवडता खाऊ होता. अजूनही आहे.

मस्त रेसिपी आहे. छान थंडावा येत असेल.

खमंग काकडी उरली तर त्यात पोहे भिजवून कालवले आणि तिखट मीठ adjust केलं तरी बनतील हे पोहे.

मस्त!
आमच्याकडे दडपेपोहे हे ओला नारळ खवून + नारळाचे पाणी घालून करतात त्यात अशी काकडी घालता मात्र काकडी कमी आणि ओले खोबरे जास्त.
इथे खात्रीचा नारळ मिळत नाही त्यामुळे तसे दडपे पोहे करणे जवळजवळ बंदच झाले. हा काकडी पोहे पर्याय छान आहे.

मी केले हे पोहे छान होतात,पातळ पोहे वापरले आणि थोडी कैरी होती हाताशी ती पण घातली, फोडणीला बुटकी मिरची वापरली त्यामूले गोड, आन्बट, तिखट अशा चविचे झाले पोहे
एका काकडीच्या सुटलेल्या पाण्यातच पोहे भिजले, ओला नारळ असता अजुन छान चव आली असति अस वाटल.
फोटो खास नाहि आलाय
159D71BE-D38E-4977-8523-EAD5BC51A772.jpeg

प्राजक्ता फोटो मस्त आलाय एकदम.
सासुबाई नॉर्मल कांद्या पोह्यांमध्ये सफरचंद घालतात. चक्क चांगले लागतात. मला तस कांदेपोहे काकडी घालून वाटलेले. .
पण एकुण चर्चेवरून हे बरचस दडपे पोह्यासारख असावस वाटतय.

Pages