विचित्र विश्व - रोचक माहिती, संकल्पना आणि घटना

Submitted by मामी on 17 April, 2020 - 01:40

जग अनेकानेक चित्रविचित्र गोष्टींनी आणि घटनांनी भरलेलं आहे. अनेकदा अशा काही अतर्क्य घटना घडतात की त्यांची उकल होत नाही अथवा त्यांमागे काहीतरी अनाकलनीय कार्यकारणभाव आढळून येतो. पूर्ण खात्रीलायक आणि नि:संग्दिध उत्तर मिळत नाही. अशा काही घटना माहीत असल्यास त्या इथे नोंदवता येतील.

शिवाय इतरही काही रोचक जे जे वाटेल त्याची इथे नोंद आणि चर्चा करावी. वेगळ्या संकल्पना, वेगळे अनुभव, वेगळा विचार .... असं काहीही असू शकतं. आपल्या नेहमीच्या रटाळ जीवनापेक्षा वेगळं आणि इंटरेस्टिंग असं काहीही.

तेवढाच विरंगुळा!

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऑस्ट्रेलिया देशात एकूण 10000 बीचेस आहेत..

म्हणजे रोज तुम्ही एका एका बीच ला भेट दिलीत तरी तुम्हाला 10000 बीचला भेट देण्यासाठी 27 वर्षे लागतील..

हाय धनश्री, द कोड ही तुम्ही सुचवलेली, डॉक्युमेन्ट्री आत्ताच पाहीली. मस्त आहे. सुचवल्याबद्दल धन्यवाद.

टोरेड देशाचा पाहुणा

ही एक अतिशय अदभुत घटना आहे. अर्थात या घटनेकरता कोणतेही सबळ पुरावे, निसंदिग्ध आधार नाही. पण त्याचबरोबर ही घटना घडलीच नाही असंही कोणी कधी म्हणालं नाही. आता ही एक दंतकथा बनली आहे पण मुळातच गोष्ट इतकी अदभुत आहे की ... वाचाच तुम्ही.

तर, घटना आहे जुलै १९५४ ची. जपानची राजधानी टोक्यो येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक सर्वसाधारण दिसणारा माणूस उतरला. इमिग्रेशनमधे त्याचा पासपोर्ट बघितल्यावर त्याला चौकशीसाठी नेण्यात आलं. कारण काय? तर त्याचा पासपोर्ट एका अश्या देशाचा होता की ज्याचं नाव कधीच कोणी ऐकलं नव्हतं. त्याच्या देशाचं नाव होतं टोरेड. गंमत म्हणजे त्याच्या पासपोर्टवर अनेक युरोपियन देशांचे शिक्के होते आणि जपानमध्येही अनेकवेळा तो येऊन गेल्याचं दिसत होतं. अधिकारी चक्रावून गेले. त्या माणसाला नकाशा देऊन त्यांनी त्याला त्याचा देश दाखवायला सांगितला. त्यानं स्पेन आणि फ्रान्सच्या सीमारेषेवरचा एक भूभाग दाखवला. पण अहोआश्चर्यम! या देशाचं नकाशातील नाव वेगळंच होतं. जपानी अधिकार्‍यांच्या नकाशात हा छोटासा देश - देश कसला, ते एक संस्थान आहे - अँडोरा या नावानं दाखवत होते कारण तो तसा खराच आहे.

तो माणूसही चक्रावून गेला कारण त्याच्यामते तो देश टोरेडच होता आणि तो नुकताच तिथून जपानला आला होता. जपानमध्ये तो ज्या हॉटेलात रहाणार होता त्या ठिकाणी फोन केला तर त्यांच्याकडे या माणसाच्या नावानं काही बुकिंग नव्हतं. ज्या जपानी कंपनीला तो भेट देणार होता त्यांच्याकडे अशी काही या माणसाच्या नावाने अपॉइंटमेंट नव्हती.

आता अधिकारी पारच गोंधळले आणि त्यांचा संशयही वाढला. त्यांनी पुढिल चौकशी होईपर्यंत म्हणून त्याला एका रुममध्ये ठेवलं, बाहेरून पहारा बसवला आणि पुढे नक्की काय करायचं ते ठरवण्यासाठी ते गेले. पुन्हा जेव्हा ते त्या खोलीत गेले तेव्हा बाहेर पहारा असूनही तो माणूस आणि त्याचं सर्व सामान गायब झालं होतं. खोलीबाहेर जाण्याची दुसरी वाट नव्हती की खिडकीतून वगैरे पळ काढणं शक्य नव्हतं. अँडोराचा तो गूढ पाहुणा असा हवेतल्या हवेत अदृश्य झाला तो कायमचा!

कोण होता तो नक्की? टाईम ट्रॅव्हलर होता की त्यामागे काहीतरी साधंच स्पष्टीकरण होतं? आता आपल्याला कधीच कळणार नाही.

The Mysterious Tale of the Man from Taured – Evidence for Parallel Universes? Or an Embellishment?

The Man From Taured (Short Film) : https://www.youtube.com/watch?v=CQxmkdRWucU

Submitted by prashant255 on 18 April, 2020 - 12:43
>>>>
कोणीतरी निलावतीचे नाव काढले म्हणून मी त्या फेक गप्पा आहेत असे सांगितले जेणेकरून ईतरांची दिशाभूल होऊ नये. तुम्हाला तरीही त्यावर विश्वास ठेवायचा असेल तर माझी हरकत नाही. मला दंतकथांचा अभ्यास करून त्या खोट्य आहेत हे सिद्ध करण्यात वेळ घालवण्याची ईच्छा नाही त्यामुळे मी हरलो तुम्ही जिंकलात Happy

असो,
दंतकथाही रोचक असतात. पण सत्य आणि अदभूत गोष्टी वाचायला जास्त आवडतील. माझ्या वाचनात आलेलेही शेअर करेन..

माझ्या वाचनात बऱ्याच घटना आहेत. त्यातल्या काही येथे देतोय. बाकीच्या नंतर केंव्हातरी:

डी. बी. कूपर:
१९७१ च्या नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेत पोर्टलॅंड विमानतळावर एका व्यक्तीने डॅन कूपर या नावाने तिकीट बुक केले आणि तो सिएटलला जाणाऱ्या विमानात बसला. त्या काळात विमान प्रवाशांची तपासणी केली जात नसे. विमानाने उड्डाण करताच त्याने हवाई सुंदरीला आपल्या सूटकेस मध्ये बॉम्ब असल्याचे सांगून आपल्या मागण्या लिहून दिल्या. त्यात दोन लाख डॉलर देण्याची प्रमुख मागणी होती, आणि त्याला एक पॅराशूटसुद्धा हवे होते. तो सांगेल त्याप्रमाणे सारे व्हायला हवे अशी त्याची अट होती. सिएटलच्या विमानतळावर सर्व प्रवासी उतरल्यानंतर त्याची पैशाची मागणी पूर्ण करण्यात आली व त्याला एक पॅराशूट सुद्धा देण्यात आले. त्याने वैमानिक, हवाई सुंदरी, विमानाचा इंजिनीअर व अजून एकदोघे विमानाचा स्टाफ अशा ठराविक पाच जणांनाच घेऊन त्या विमानाचे पुन्हा उड्डाण करायला सांगितले व ते पुन्हा उलट म्हणजे मेक्सिकोच्या दिशेने न्यायला सांगितले. मग त्या पाच जणांना कॉकपिट मध्येच बसायला सांगून याने विमानातले सारे पडदे ओढून घेतले. लाईट्स बंद करायला लावल्या. तेंव्हा विमान साधारणपणे पोर्टलॅंड जवळील कोलंबिया-वॉशौगल नद्यांच्या घनदाट जंगल परिसरावर आले असावे. रात्रीचे आठ वाजले होते. बाहेर प्रचंड वादळ आणि तुफान पाऊस होता. तेंव्हा त्याने विमानाचा मागचा छोटा दरवाजा उघडून त्या भयाण वातावरणात काळ्याकुट्ट अंधारात पॅराशूट आणि दोन लाख डॉलरसहित विमानातून खाली उडी मारली. त्यानंतर मात्र त्याचा कसलाही ठावठिकाणा लागला नाही. तो नक्की कोण होता, कुठून आला होता व पुढे त्याचे काय झाले हे पुढे आजतागायत कधीच कळले नाही. या घटनेविषयी इंटरनेटवर खूप मोठे ब्लॉग्स व आर्टिकल्स उपलब्ध आहेत. विकिपीडियावर लेख पण आहे.

https://en.wikipedia.org/wiki/D._B._Cooper

भीमकुंड:
मध्यप्रदेशात छत्रपूर जिल्ह्यात बुंदेलखंड भागात बजना गावाजवळ हा कुंड आहे. याचे पाणी अतिशय स्वच्छ व नितळ आहे. याची निर्मिती महाभारत काळात भीमाने केली अशी आख्यायिका आहे. याच्या बाबत गूढ गोष्ट अशी कि हे कुंड किती खोल आहे हे अद्याप मोजता आलेले नाही. न मोजता येण्यामागे विविध कारणे असतीलही. जसे कि धार्मिक भावना जोडल्या गेल्या असल्याने त्याचा आदर राखण्यासाठी याची खोली मोजण्याचे प्रयत्न फारसे गांभीर्याने झाले नसावेत. किंवा SONAR सारख्या उपकरणाला पाण्याची खोली मोजण्यासाठी जागा जास्त लागत असल्याने ते इथे एवढ्याशा कुंडात आणणे शक्य नसेल. काही वेळा दोरखंडाला जडशीळ वस्तू बांधून त्याद्वारे खोली मोजण्याचा प्रयत्न झाला पण तो सुद्धा निष्फळ ठरला असे म्हणतात. याला कारण या पाण्यात खोलवर अतिशय तीव्र असे प्रवाह असावेत ज्यामुळे हि जडशीळ वस्तू आडवी वाहत जात असावी. काही पाणबुडे उतरले होते तेंव्हा त्यांना सत्तर ऐंशी फुट खाली पाण्याचे तीव्र प्रवाह जाणवले (भूमिगत नदी?). या कुंडाची खोली किती व खाली नक्की काय आहे हे अद्याप न उकलेलेले कोडे आहे. काही जणांच्या मते हे कुंड प्रवाहाद्वारे थेट समुद्राशी जोडले आहे. २००४ साली सुनामी आली होती तेंव्हा या कुंडाच्या पाण्याची पातळी कित्येक मीटरने वाढली होती असे म्हणतात. विहीर असो वा नदी असो वा समुद्र वा धरण वगैरे, पण कोणत्याही पाण्यात बुडालेल्या व्यक्तीचा मृतदेह कालांतराने पाण्यावर तरंगतोच. इथे मात्र असे म्हणतात कि इथे पाण्यात बुडालेल्या व्यक्तीचा मृतदेह आजवर कधीच वर आलेला नाही. खरेखोटे जे काय असेल ते असेल, पण भीमकुंड हे सध्या तरी खोली किती आहे हे माहित नसलेले एक गूढमय कुंड अशी ओळख धारण करून आहे.

https://en.wikipedia.org/wiki/Bhimkund

द्यातलोव पास(Dyatlov Pass) एक रहस्य:
द्यातलोव पास हि अत्यंत गूढ अशी घडलेली घटना ज्या मध्ये नऊ जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. हि घटना १९५९ सालच्या फेब्रुवारी महिन्यात रशियातील उत्तर पर्वत रांगेत घडली होती. द्यातलोव हा नऊ जणांच्या गिर्यारोहकांच्या गटाचा गटप्रमुख होता म्हणून या घटनेला द्यातलोव पास असे नाव देण्यात आले. (हि वाक्ये फेसबुकवरील एका पोस्ट मधून कॉपी पेस्ट केल्या आहेत. अधिक वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा)

https://www.facebook.com/MyHorribaleStories/posts/890870204634471

द्यातलोव पास विषयी विकिपीडियावर: https://en.wikipedia.org/wiki/Dyatlov_Pass_incident

https://www.maayboli.com/node/49229?page=39
हे कुठेतरी वाचल्यासारखे वाटत होते ....सापडले मामी. तो टोरेड देशाचा पाहूणा. हे तेच आहे का? भुत्याभाऊ यांनी लिहीलेला प्रतिसाद.
@द्यातलोव पास भयानक!!

कोणाला ताओस हम्म बद्दल माहीत आहे का?

न्यू मेक्सिको मधील एक शहर आहे ताओस .या शहराच्या बाहेर डिझेल इंजिनच्या किंवा एखाद्या मोठ्या ट्रकच्या चालण्याचा आवाज ऐकायला येतो. हा आवाज सर्वांना अगदी स्पष्टपणे ऐकायला येतो, पण हा आवाज कुठून येतो आणि का येतो? याचा शोध आजवर लागला नाही. या आवाजाला ताओस हम्म म्हणतात. आपल्या रिस्कवत गूगल करू शकता.

असे म्हटले जाते की जगात अजूनही दहाबारा ठिकाणी कमीजास्त प्रमाणात असा आवाज ऐकू येतो. पण अर्थात, तो कसा कुठून येतो हे तिथेही गूढच आहे Happy

राजस्थानजवळ जोधपूरपासून ५० किलोमीटरवर एक मोटारसायकल मंदिर आहे जिथे एका बुलेट ची पूजा केली जाते. त्या मंदिराचे नाव आहे ओम बन्ना मंदिर. याची कहाणी पण मोठी रोचक आहे. हे मंदिर जिथे आहे तिथे ओम सिंग राठोड याचा झाडाला बाईक आदळून अपघाती मृत्यू झाला होता. पोलिसांनी ही मोटारसायकल अपघात स्थळावरून पोलीस स्टेशन ला आणली आणि पुढच्या दिवशी पोलीस स्टेशन मधून गायब ती अपघात स्थळावर सापडली. गाडीतले पेट्रोल काढून, गाडी साखळीला बांधून ठेवली तरी हा प्रकार वारंवार घडला. या घटनेनंतर बऱ्याच लोकांना ज्या रोड वर अपघात झाला होता तेथे आत्म्याचे अस्तित्व जाणवले आणि तो आत्मा या रोडवर गरजूंना काही ना काही प्रकाराने मदत करतो असे अनुभवदेखील आले. नंतर लोकांनी मंदिर बांधले ज्यात ओम च्या मोटारसायकलची पूजा होते. या रोडवरून जाणारे अनेकजण या मंदिराला आवर्जून भेट देतात.
काही वर्षांपूर्वी स्टार वन चॅनेल वर मानो या ना मानो नावाची सिरीयल यायची जिचे सूत्रसंचालन इरफान खान करायचा. त्यात अश्याच गूढ घटनांची माहिती दिली जायची त्यात सुद्धा ओम बन्ना मंदिरावर एक एपिसोड होता.

थोडे अद्भुत थोडे गूढ नावाची लेख मालिका आहे माबोवर .
टोरेड आणि db kooper बद्दल तिथे वाचले होते . आणखी काही रोचक गोष्टी आहेत.

नाचवणारा प्लेग: इ.स. १५१८ च्या जुलै महिन्यात फ्रांस मधल्या स्ट्रासबर्ग शहरात एक महिला रस्त्यात येऊन अचानक जोरजोरात नाचायला लागली. नंतर अनेक महिला व मुली येऊन तिच्यासोबत नाचू लागल्या. आणि नंतर बघता बघता अनेक स्त्री पुरुष त्यांच्या सोबत नाचू लागले. बघता बघता शेकडो लोक नाचू लागले. ते सगळे न थकता न थांबता अखंडपणे नाचत होते. हा नाच कित्येक दिवसांपर्यंत सुरु होता असे उल्लेख आढळतात. काहीजण तर चक्कर येऊन पडले. पण इतरांचा नाच काही थांबला नाही. अखेर काही डॉक्टरांनी येऊन हस्तक्षेप करून सर्वाना दवाखान्यात दाखल केले. यात काहीजणांचा मृत्यू झाला असेही म्हणतात. पण या विचित्र घटनेची समाधानकारक कारणमीमांसा आजतागायत झालेली नाही.

विकिपीडिया: https://en.wikipedia.org/wiki/Dancing_plague_of_1518

मेरी सेलेस्टी: हि एका बोटीची गूढकथा आहे. हि बोट घेऊन तिचा मालक व कप्तान अमेरिकेतील न्यूयॉर्क येथून इटली मधल्या जीनोआ बंदराकडे ७ नोव्हेंबर १८७२ रोजी जाण्यास निघाला. त्याच्यासोबत त्याची पत्नी व लहान मुलगी तसेच सात कर्मचारी होते. पण हि डबल शिडाची बोट जीनोआला कधीच पोहोचली नाही. ४ डिसेंबर १८७२ ला अझोरीस बेटांवर दुसऱ्या एका बोटीच्या कप्तानाला हि बोट पाण्यावर हेलकावे खात अनियंत्रितपणे तरंगताना दिसली. तेंव्हा त्याला संशय आला. त्याने जवळ जाऊन पाहिले असता त्याला या बोटीत कोणीही दिसले नाही. बोट संपूर्ण निर्मनुष्य होती. पण सुस्थितीत होती. आतल्या साहित्याची किरकोळ पडझड झाली होती, व थोडेफार पाणी साचले होते इतकेच. पण दुर्घटना किंवा घातपात झाल्याची कोणीतीही खून दिसत नव्हती. नाही म्हणायला बोटीतली लाईफबोट मात्र गायब झाली होती. बोटीतल्या लॉगबुक मधल्या शेवटच्या नोंदी दहा दिवसांपूर्वीच्या होत्या. याचा अर्थ दहा दिवसापूर्वी ते सर्वजण भर महासागरात बोटीचा प्रवास मध्येच सोडून लाईफबोट मधून तडकाफडकी निघून गेले असावेत. कुठेतरी गायब झाले होते. त्यातल्या कोणाविषयीही नंतर कधीच काही कळले नाही. विविध तर्क मांडले गेले. पण नक्की काय झाले हे आजतागायत गुलदस्त्यातच राहिले.

विकिपीडिया: https://en.wikipedia.org/wiki/Mary_Celeste

एमीलीया एइरहार्ट (सन १९३७): एमीली एक अत्यंत साहसी अमेरिकन वैमानिक होती. अख्खा अटलांटिक महासागर एका महिलेने प्रथमच एकटीने पार करण्याचा विक्रम तिच्या नावे आहे. या व्यतिरिक्तही इतर अनेक विक्रम तिने केले होते. आपल्या या साहसी स्वभावामुळे एमीलीया ऐन पस्तिशीतच अमेरिकेतील एक खूप प्रसिद्ध सेलिब्रिटी झाली होती. एकटीने विमानातून जगाला प्रदक्षिणा घालण्याचा तिचा मानस होता. हा विक्रम करण्याचा तिने एकदा प्रयत्न केला होता. तिने दोन तांत्रिक सहायक बरोबर घेतले होते. पण उड्डाण करताना विमानाला झालेल्या छोट्या अपघातामुळे हा प्रयत्न मध्येच सोडून द्यावा लागला होता. तरीही न खचता ती कालांतराने पुन्हा एकदा सज्ज झाली. यावेळी सहायक एकच होता व त्याला रेडीओ संदेश हाताळणीचे पुरेसे ज्ञान नव्हते. मोहिमेला सुरवात केली व एक महिन्याभरात तिच्या विमानाने तब्बल पस्तीस हजार किलोमीटर इतके अंतर काटून बरीचशी जगप्रदक्षिणा पूर्ण केली. मोहीम शेवटच्या टप्प्यात आली होती. ती पूर्ण व्हायला आता शेवटचे दहाबारा हजार किमी अंतर शिल्लक राहिले होते. तोच तिचे विमान मध्य पॅसिफिक महासागरात आकस्मिकपणे रडारवरून गायब झाले. ते नंतर पुन्हा कधीच दिसले नाही. त्यानंतरच्या कित्येक वर्षांत बरेच शोधकार्य करूनही त्या दोघांबाबत अथवा विमानाबाबत काहीही हाती लागले नाही. विमान गूढरीत्या गायब होण्याच्या आजवरच्या सर्वात प्रसिद्ध घटनांपैकी हि एक मानली जाते.

विकिपीडिया: https://en.wikipedia.org/wiki/Amelia_Earhart

चर्च मधली सायंप्रार्थना आणि विलक्षण योगायोग: या घटनेविषयी बऱ्याच वर्षांपूर्वी मी वृत्तपत्रात वाचले होते. पण इंटरनेटवर त्यासंबंधी कुठेही संदर्भ सापडत नाही. त्यामुळे हे काल्पनिक कथा आहे कि खरे घडलेले आहे कळायला मार्ग नाही. मलासुद्धा आता वाचलेले सगळे तपशील नीट आठवत नाहीत. बहुदा अमेरिकेतच घडलेली घटना आहे. कोणत्या शहरात माहिती नाही. पण दीडदोनशे वर्षांपूर्वी. एका चर्चमध्ये संध्याकाळी काही मुले नियमितपणे सायंप्रार्थना म्हणण्यासाठी जमत असत. आपल्याकडे सुद्धा ज्या काळात इंटरनेट टीव्ही काहीही नव्हते तेंव्हा दररोज सायंकाळी मंदिरात भजन गायनाचा कार्यक्रम चाले. हे अगदी तसेच. त्यातल्या एकदोघांचे आवाज चांगले होते. अन्य एकदोघांना छान वादनाची कला होती. अजून एक समन्वयक होता. त्यांच्यात तो सर्वात जेष्ठ होता. हे सर्व मिळून रोज छान सायंप्रार्थना करत. एक दिवस संध्याकाळी या समन्वकाला एका गायक मुलाचा निरोप आला कि तो आज आजारी असल्याने येऊ शकत नाही. तितक्यात एका वादक मुलाचा सुद्धा निरोप आला कि घरी काही आवश्यक काम असल्याने तो सुद्धा आज येऊ शकत नाही. नंतर तर असे घडले कि विविध कारणांनी त्यातले कोणीही त्या संध्याकाळी येऊ शकत नव्हते. समन्वयकाला सुद्धा आश्चर्य वाटले कि आज एकाच दिवशी सर्वाना कसली ना कसली अडचण कशी काय आली? हा योगायोग आहे असे त्याला वाटले. आपण एकटे जाऊन करणार तरी काय म्हणून समन्वयकाने सुद्धा जाणे रद्द केले. पण विलक्षण योगायोग तर खरा पुढेच होता. कारण त्याच संध्याकाळी तासाभराने त्या चर्चमध्ये स्फोटासारखा प्रचंड मोठा आवाज झाला. आवाजामुळे आजूबाजूचे सगळे धावले. पाहतो तर जिथे हे सगळे प्रार्थना गायला रोज जमत होते त्याच जागेवर एक भले मोठे अवजडसे झुंबर प्रचंड उंचीवरून खाली कोसळले होते!

आत्ताच एका मित्राच्या स्टेट्सवर वाचलं. एका जोडप्यात भांडण होतं, कारण, नवऱ्याला दुसऱ्या स्त्रीसोबत संसार मांडायचा होता. या भांडणामुळे उद्विग्न झालेली पत्नी बाल्कनीतून उडी मारते, पण योगायोगाने त्याचवेळी घराबाहेर पडणाऱ्या नवऱ्याच्या अंगावर पडते. नवरा खलास, बायको जिवंत!

भुताळी जहाज ....इव्हान व्हॅसिली
इव्हान व्हॅसिली हे जहाज १८९७ मध्ये सेंट पीटर्सबर्ग इथे बांधण्यात आलं. जहाजाला ट्रिपल एक्स्पान्शनचे एकच इंजिन होते. जहाजाचा सांगाडा लोखंडी पट्ट्यांपासून बनवण्यात आलेला होता आणि डेक व इतर बांधकाम लाकडाचं होतं. जहाजाच्या साठवणीच्या जागेत एका सफरीत २५०० मैल अंतर कापण्याइतका कोळसा साठवण्याची सोय होती.
सुरवातीची पाच वर्षे बाल्टीक समुद्रातून फिनलंडच्या आखातात इव्हान व्हॅसीली व्यवस्थीत मालाची ने-आण करत होते. या पाच वर्षांच्या काळात जहाजावर कोणतीही अप्रिय घटना घडली नाही. १९०३ मध्ये जपानविरुध होऊ घातलेल्या युध्दासाठी रशियन सरकारने ते ताब्यात घेतले आणि व्लाडीव्होस्टॉक इथे युध्दसाहीत्य नेण्याची कामगिरी त्याच्यावर सोपवली.
उत्तर समुद्रातून निघून अटलांटीक महासागरातून आफ्रीकेच्या पश्चिम किनार्‍याने मार्गक्रमणा करत जहाजाने दक्षिण आफ्रीकेतील केपटाऊन गाठलं. या ठिकाणी जहाजात कोळसा भरण्यात आला. केपटाऊन सोडल्यावर केप ऑफ गुड होपला वळसा घालून पूर्व किनार्‍याने जहाजाने झांजीबार बेट गाठलं. हिंदी महासागरातून पुढे मजल मारण्याच्या दृष्टीने जहाजात जास्तीचा कोळसा भरण्यात आला. आतापर्यंतचा जहाजाचा प्रवास अगदी सुनियोजीत प्रकारे सुरु होता. जहाजाने झांजीबार बेट सोडून हिंदी महासागरात प्रवेश केला
....आणि....
डेकवरील खलाशांना अनेकदा आपल्या आसपास कोणीतरी वावरत असल्याचा भास होऊ लागला. आपल्यावर कोणाची तरी सतत नजर आहे असं प्रत्येकाला वाटत असे. प्रत्यक्षात कोणाच्याही नजरेस काही पडलं नाही तरी आपल्या अवतीभवती कोणतीतरी अज्ञात शक्तीचं वावरत असल्याचं सर्वांनाच जाणवत होतं. वातावरणात येणारी थंड हवेची अनैसर्गिक झुळूक त्या शक्तीच्या अस्तित्वाची जाणीव करुन देत होती. मात्रं अद्यापही कोणतीही अप्रिय घटना घडलेली नव्हती.
एका संध्याकाळी पहारा बदलण्याच्यावेळी डेकवरील खलाशांना एक आकृती दिसली! मानवी आकाराच्या त्या आकृतीला स्पष्ट दिसून येतील असे कोणतेही अवयव दिसत नव्हते. पारदर्शक आणि धुरकट दिसणारी ती आकृती रात्रीच्या अंधारात चमकत होती. डेकच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत जाऊन ती आकृती एका लाईफबोटीमागे अदृष्य झाली.
हा विलक्षण प्रकार पाहून डेकवरील सर्वांचीच पाचावर धारण बसली. परंतु अद्यापही त्या आकृतीने आपला प्रताप दाखवण्यास सुरवात केली नव्हती. मजल-दरमजल करीत जहाज चीनमधील पोर्ट ऑर्थर या मिलीटरी तळापाशी पोहोचलं आणि खलाशांच्या दुर्दैवाचे दशावतार सुरू झाले.
पोर्ट ऑर्थरला पोहोचण्यापूर्वी आदल्या रात्री एका खलाशाने जोरदार किंकाळी फोडली. त्याला शांत करण्याचा काहीजण प्रयत्न करु लागले. काही क्षणांतच सर्वांनाच आपण काय करतो आहोत याचं भान उरलं नव्हतं! कोणाचाही स्वत:वर ताबा उरला नव्हता. स्वतःला आणि एकमेकांना बदडण्यास त्यांनी सुरवात केली. एका खलाशाने झेंड्याची काठी उपसून इतरांवर हल्ला चढवला! काही वेळ हा गोंधळ असाच सुरु राहीला. अकस्मात अ‍ॅलेक गोविन्स्की या खलाशाने डेकची कड गाठली आणि स्वतःला समुद्रात झोकून दिलं! रात्रीच्या अंधारात अथांग सागरात तो बुडाला.
.... आणि डेकवरील परिस्थिती जादूची कांडी फिरावी तशी पूर्वपदावर आली.
पोर्ट ऑर्थर इथल्या रशियन अधिकार्‍यांनी खलाशांच्या कहाणीवर विश्वास ठेवण्याचं साफ नाकारलं! पूर्वनियोजीत योजनेप्रमाणे जहाज व्लाडीव्होस्टॉक इथे नेण्याचा त्यांनी कॅप्टनला आदेश दिला.
पोर्ट ऑर्थर सोडून जहाजाने पुढचा मार्ग पकडला. सुरवातीच्या दोन दिवसांत काहीही न झाल्याने सर्वांच्याच मनावरील ताण कमी झाला.
तिसर्‍या दिवशी पुन्हा त्या शक्तीने आपली चुणूक दाखवली. डेकवरील खलाशांचा स्वत:वरील ताबा पूर्णपणे उडाला. आपापसांत त्यांची जोरदार भांडणे आणि मारामार्‍या सुरु झाल्या. आपण काय करतो आहोत हेच कोणालाही समजत नव्हतं. काही मिनीटांनी एका खलाशाने समुद्रात उडी घेतली आणि डेकवरील वातावरण अकस्मात निवळलं!
जहाज व्लाडीव्होस्टॉकला पोहोचल्यावर जहाजावरील बारा खलाशांनी जहाज सोडून धूम ठोकली. जहाजावरील अज्ञात दुष्ट शक्तीपासून लवकरात लवकर दूर जाण्याची त्यांना घाई झाली होती. दुर्दैवाने पलायनाचा हा प्रयत्न साफ अपयशी ठरला. बाराही खलाशांना कैद करून जहाजावरील एका केबीनमध्ये डांबण्यात आलं.
व्लाडीव्होस्टॉक इथल्या रशियन अधिकार्‍यांनी कॅप्टनकडे या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी केली. परंतु त्यातून काहीच निष्पन्न झालं नाही. जहाजात पुन्हा माल भरण्यात आला आणि ते हाँगकाँगच्या मार्गाला लागलं.
बंदरातून बाहेर पडताच त्या शक्तीने पुन्हा डोकं वर काढलं!
पहिल्या दिवशी रात्री पूर्वीप्रमाणेच डेकवर जी गोंधळाला सुरवात झाली. एका खलाशाने सागरात उडी टाकल्यावरच परिस्थिती मूळपदावर आली. दुसर्‍या रात्रीही तोच प्रकार झाला. तिसर्‍या दिवशी रात्री कोणी समुद्रात उडी टाकली नाही, परंतु एका खलाशाला भितीमुळेच मृत्यू आला!
हाँगकाँग बंदर समोर दिसत असताना जहाजाचा कॅप्टन स्वेन अँड्रीस्ट याने स्वतःला समुद्रात झोकून दिलं!
जहाज हाँगकाँग बंदरात पोहोचताच खलाशांनी जहाजावरून उड्या टाकल्या आणि ते हाँगकाँग आणि आजूबाजूच्या परिसरात लपून बसले. सेकंड ऑफीसर क्राईस्ट हॅन्सन आणि पाच स्कँडीनॅव्हीयन खलाशी तेवढे जहाजावर शिल्लक राहीले होते.
क्राईस्ट हॅन्सन हा अत्यंत धाडसी स्वभावाचा माणूस होता. त्याचा भुता-खेतांवर अजिबात विश्वास नव्हता. त्याने जहाजाचं कप्तानपद स्वीकारलं. अनेक नवीन खलाशांची नेमणूक केली आणि लोकरीने जहाज भरून ऑस्ट्रेलियातील सिडनी बंदरात जाण्यासाठी नांगर उचलला. जहाजावरील नवीन खलाशांपैकी एकालाही जहाजाचा 'इतिहास' माहीत नव्हता.
सुदैवाने सिडनीच्या दिशेने प्रवास बर्‍यापैकी सुरळीत झाला. त्या शक्तीच्या अस्तित्वाचा कोणताही दुष्परिणाम दिसून आला नाही.
सिडनी बंदरापासून एक दिवसांवर असताना क्राईस्ट हॅन्सनने डोक्यात गोळी झाडून घेतली!
इंजिनरुम मध्ये काम करणार्‍या हॅरी नेल्सनने फर्स्ट मेटच्या सहाय्याने जहाज सिडनीला आणलं. जहाज धक्क्याला लागण्यापूर्वीच नेल्सन वगळता सर्वांनी जहाजावरुन धूम ठोकली.
रशियन सरकारने हॅरी नेल्सनच्या सहाय्याने भुता-खेतांवर विश्वास न ठेवणार्‍या कॅप्टनचा शोध घेण्यास सुरवात केली. लवकरच त्यांना योग्य असा माणूस मिळाला. परंतु आतापर्यंत जहाजाचं इतकं 'नाव' झालं होतं, की इतर खलाशी आणि कर्मचारीवर्ग मिळेपर्यंत चार महिने गेले. जहाजाने सिडनी बंदर सोडलं आणि अमेरिकेतील सॅन फ्रॅन्सिस्कोची वाट धरली.
सुरवातीचा आठवडाभर जहाजाचा प्रवास व्यवस्थित सुरु होता. परंतु पुन्हा पहिल्याप्रमाणेच असंबध्द गोंधळ सुरु झाला. पूर्वीप्रमाणेच डेकवरील खलाशांचा स्वत:वरील ताबा उडाला. परिस्थिती मूळपदावर आल्यावरही दोन खलाशी इतके प्रक्षुब्ध झाले होते, की त्यांना जहाजाच्या तळातील एका केबिनमध्ये बंदीस्तं करून ठेवण्याची वेळ आली! सकाळी दोघंही मृतावस्थेत आढळून आले!
दुसर्‍या दिवशी भुता-खेतांवर अजिबात विश्वास न ठेवणार्‍या कॅप्टनने रिव्हॉल्व्हरची नळी स्वत:च्या तोंडात खुपसून चाप ओढला!
स्वतःवर थोडाफार ताबा असलेल्या खलाशांच्या मदतीने हॅरी नेल्सनने जहाज मागे फिरवून व्लाडीव्होस्टॉकला आणलं.
या वेळी मात्रं हॅरी नेल्सनसंह सर्वांनी जहाज सोडून काढता पाय घेतला. कितीही मोठ्या रकमेचं आमिष खलाशांना जहाजावर परतण्यास प्रवृत्त करू शकलं नाही. जहाजावरील कोणत्याही सामानाचा छोटासा तुकडाही त्यांना नको होता! पुढे पुढे तर जहाजावर पहारा ठेवण्यासही कोणी माणूस मिळेना. उत्कृष्ट स्थितीतील हे जहाज पुढे कित्येक महिने व्लाडीव्होस्टॉक बंदरात तसंच पडून राहीलं.
सागरावरील खलाशांना या शक्तीचा नायनाट करण्याचा एकच उपाय ठाऊक होता.

आग!

१९०७ च्या हिवाळ्यात एका रात्री हे जहाज पेटवून देण्यात आलं! अनेक छोट्या छोट्या बोटींतून जहाजाभोवती कोंडाळं करुन व्होडकाचे घुटके घेत खलाशांनी जहाजाच्या अंत साजरा केला! काही जण आनंदाने गाणे-बजावण्यात मश्गूल झाले होते.
जहाज जळून पाण्याखाली जाण्यापूर्वी अंगावर काटा उभा रहावा अशी एक कर्णभेदक किंकाळी सर्वांना ऐकू आली!
जहाजावर कोणत्या अज्ञात शक्तीचं वास्तव्यं होतं हे मात्रं कधीही, कोणालाही समजून आलं नाही.
संदर्भ :-
Ocean Traingle - चार्ल्स बार्लीझ
Underwater Tales

अँटिकीथेरा यंत्र (Antikythera mechanism)

जगातला पहिला कॉम्प्युटर कधी बनला माहिताय तुम्हाला? गुगल केलं तर लक्षात येईल की अगदी बाल्यावस्थेतले कॉप्युटर्स १९व्या शतकाच्या सुरवातीस बनण्यास सुरूवात झाली.

पण सर्वात प्राचीन कॉप्युटर खरंतर समुद्रातून बाहेर काढला गेलाय. १९००-०१ च्या सुमारास ग्रीसच्या एका अँटिकीथेरा बेटाजवळ समुद्रात पूर्वी कधीतरी बुडलेल्या जहाजाचं उत्खनन सुरू होतं. त्यावेळी ज्या अनेक गोष्टी बाहेर काढल्या गेल्या त्यात एक दगडसदृश यंत्र होतं. हे यंत्र तुटलेलं होतं. त्याचे ऐकूण ८५ अवशेष मिळाले. हे यंत्र म्हणजेच जगातला हातानं चालवायचा पहिला अ‍ॅनलॉग कॉम्प्युटर मानला जातो आणि तो किती जुना आहे माहित आहे? चक्क ख्रिस्तपूर्व दुसर्‍या ते पहिल्या शतकादरम्यानचा.

मिळालेल्या अवशेषांवरून अभ्यास करून शास्त्रज्ञांनी असं शोधलं की या यंत्रात ३७ चक्र होती जी एकमेकांना जोडलेली होती आणि ती फिरवून सूर्य आणि चंद्राच्या आणि इतरही ग्रहांच्या भ्रमणस्थिती, सूर्य आणि चंद्र ग्रहणाच्या वेळा शोधता येत. शिवाय ऑलिंपिकसारख्या क्रिडाप्रकाराचा काउंट डाऊनही करता येत असे. अदभुतच आहे हे सगळं.

Antikythera mechanism : https://en.wikipedia.org/wiki/Antikythera_mechanism

This ancient Greek mechanism may be the world's first computer : https://www.youtube.com/watch?v=RyBsOe6E_aI

प्रविण मोहन
हा अमेरिकन भारतीय आहे. जगभरातील हिंदु मंदिरांचा अभ्यासक आहे. मंदिराचा ईतका बारकाईने अभ्यास कोणी केलेला असेल अस वाटत नाही.
पुर्ण दगडात अजस्र मंदिरे बांधणार्या प्राचिन वास्तुशिल्पी लोकांकडे बघण्याचा दृृष्टीकोन बदलावाच लागेल अस संशोधन प्रवीण मोहनने केलेले आहे .
https://www.youtube.com/user/phenomenalplacecom

वरच्या व्हीडीयोत जे प्रवीण मोहनने शोधलेले आहे ते आपल्यावर खुप मोठे उपकारच आहेत !
शिवाचे तिन नेत्र म्हणजे प्रत्यक्षात जहाजांना मार्ग दर्शन करणारे लाईट हाऊस आहेत !!

२० - २१ व्या शतकात बांधलेल्या ईमारती , वास्तुमध्ये प्रवेश व बाहेर पडण्याचा दरवाजा वेगवेगळे असातात. पण हजारो वर्षांपुर्वी बांधलेल्या हिंदु मंदिरात अशी व्यवस्था होती व त्यावर तशे संकेत कोरलेले होते हे तुम्हाला कोणी सांगीतले तर तूम्ही त्याला वेडात काढाल. प्रवेश व बाहेर पडायचे निर्देशक बोर्ड लाकडाचे भाषेत लिहीलेले नसुन ते सांकेतीक आहेत.
https://youtu.be/4up9baE7pmQ

इन्फिनिटी ची संकल्पना आपल्याला माहीत आहे. पण आपल्याला फारच मर्यादित अर्थाने इन्फिनिटीची माहिती असते. किंबहुना आपण कधी यावर विचार केलेलाच नसतो. हीच संकल्पना किती मस्त उलगडून सांगितली आहे इथे. याचे सगळेच व्हिडिओ मस्त असतात.

Dividing by zero? : https://www.youtube.com/watch?v=J2z5uzqxJNU&t=267s

आपण सध्या वापरत असलेल्या कॅलेंडरची कथा !
https://youtu.be/MvpuC7Dg4e0
वापरत असलेले कॅलेंडर त्यावरचे संस्कार व तयार करताना झालेल्या चुका.
Dr C K Raju
Chandra Kant Raju (born 7 March 1954) born in Gwalior, Madhya Pradesh, India is a computer scientist, mathematician, educator, physicist and polymath researcher. He received the Telesio Galilei Academy Award in 2010 for defining "a product of Schwartz distributions", for proposing "an interpretation of quantum mechanics, dubbed the structured-time interpretation, and a model of physical time evolution", and for proposing the use of functional differential equations in physics

ह्याच डॉ राजुंचा आणखी एक व्हीडीयो आहे. Discovery of India.
https://youtu.be/EI4lPuAIbKw
ह्यात ते विचारतात की वास्को दा गामाने "भारताचा शोध लावला" जर खर असेल मग भारत लोकांना माहीती नव्हता ?
वास्को दा गामा ला श्रेय जात ते युरोपातुन भारताचा समुद्री मार्ग शोधण्याचा. पण त्यापुर्वी भारतीय लोक व्यापारा करता युरोप पर्यंत पोहोचत होतेच की !! आणि गेलेले व्यापारी परत सुद्धा येत. याचा अर्थ भारतीयांना युरोपचा मार्ग माहीती होता.

कोलंबस , वास्को द गामा, ब्रिटीश , फ्रेंच , अशा लोकांनी समद्रात साहसी यात्रा करुन भारत गाठल !! ह्या सर्वांना भारताचा शोधकर्ता म्हणुन गौरवल गेल !
पण भारतीय म्हणुन आपण हा कधी विचार केलेला आहे का ? की का बाबा तुम्हाला भारताचा शोध का घ्यावासा वाटला ?
तुमच्या कडे जर बोट आणि पैसे दिले तर तुम्ही सोमालिया किंवा ईथियोपीया च्या शोध मोहीमेवर जाल ?
याचा अर्थ स्पष्ट आहे की ह्या देशांमध्ये भारताचा माल जात होता, त्या मालाला चांगला ऊठाव होता. तो व्यापार भारतीय व्यापारी लोकांकडुन स्वःता कडे वळवायचा होता. यामुळे भारताबद्दल आकर्षण होत. प्राचिन काळापासुन भारतातील व्यापारी जगभरात पोहोचले होते. तो सर्व व्यापार समुद्र मार्गे होत होता.
त्या साठी समुद्र मर्गांची व्यवस्थित माहीती त्यांना होती. त्याशिवाय नौकानयनाची टुल्स त्यांच्याकडे होते. भरती ओहोटीचे तक्ते, नकाशे, होते. होकायंत्र व अंतर मोजण्याच यंत्र त्यांच्याकडे होत. हे सगळ आता नामशेष झाल आहे.

स्वर्गाचा रस्ता अन् आत्महत्या करणारे पक्षी..भारतातील रहस्य

भारत हा संस्कृतीप्रधान देश आहे. ती जपताना संस्कृती अनेक अंगे फुटतात. यापैकीच संस्कृतीची महत्वपूर्ण बाजू म्हणजे श्रद्धा आणि अंधश्रद्धा होय. अनेक रूढी आणि परंपरांनी नटलेल्या आपल्या या देशात काही अशी ठिकाणे आहेत जी विज्ञान आणि शास्त्रज्ञांनाही विचार करायला भाग पाडतात. म्हटलं तर ही देवाची करणी आणि म्हटलं तर शास्त्र..ही ठिकाणे नेहमीच लोकांना बुचकळ्यात टाकणारी ठरतात.. चला तर मग आज अशाच काही ठिकाणांना भेट देऊयात...

लटकते खांब : लेपक्षी, आंध्र प्रदेश

आंध्र प्रदेशातील लेपक्षी मंदिरातील ७० खांबांपैकी एक खांब असा आहे जो कोणत्याही आधाराशिवाय लटकतो. या खांबाच्या खालून एखादा कपडा किंवा ओढणीही आरपार जाऊ शकतो. हा खांब पाहण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात. हिंदू संस्कृतीमध्ये या मंदीराला महत्त्वाचे स्थान आहे.

येथे पक्षी आत्महत्या करतात..जतिंगा : आसाम

थंड हवामान, हिरवीगार जंगले यासाठी आसाम हे राज्‍य प्रसिद्ध आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेले असेही या राज्याला म्हटले जाते. पावसाळ्यात या राज्यातील जतिंगा या ठिकाणी एक विचित्र घटना घडते. ती म्हणजे, आकाशात मनसोक्त फिरणारे सुर्यास्तानंतर येथे आत्महत्या करण्यासाठी येतात. या मागील कारण अद्याप स्पष्ट नाही. पण, तेथील स्थानिक लोकांचे असे म्हणने आहे की, पक्षांवर रहस्यमय शक्तींचा प्रभाव आहे. पण, पावसाळी धुक्यामुळे पक्षांची दिशा ओळखण्याची क्षमता कमी होते आणि ते थेट जमिनीवर जाऊन पडतात, असे वैज्ञानिकांचे म्हणने आहे.

येथे गाडी घसरत नाही तर...लडाख

रस्त्यावर गाडी चालवत असताना चढ आला असता नेहमी आपण गाडी उतरतीला लागेल या भीतीने ब्रेक लावतो. पण लडाख मध्ये एक असा एक चढ आहे की तिथे उतराला गाडी असता खाली घसरण्याऐवजी आपोआप वर चढते. हा रस्ता स्वर्गाशी जोडला जात असल्याचे काही लोकांचे म्हणने आहे. तर चुंबकीय लहरींमुळे या गाड्या आपोआप चढीच्या दिशेने ओढल्या जातात असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.

खांब नसलेला राजदरबार : लखनऊ

लखनऊतील १८व्या शतकात बांधलेल्या या महालाचा राजदरबार ५० मीटर रुंद आहे. विशेष म्हणजे इतक्या रुंद दरबारात एकही खांब नाही. वास्तूविशारदांमध्ये या दरबाराच्या बांधकामाविषयी आश्चर्य व्यक्त केले जाते.

झुलता दगड : तामिळनाडू

भौतिकशास्त्राच्या सर्व नियमांना मागे टाकणारा एक मोठा खडक महाबलिपूरम येथे आहे. त्याला प्रेमाने कृष्णाचा लोण्याचा गोळा असेही म्हटले जाते. कोणत्याही आधाराशिवाय हा पाच मीटर व्यासाचा खडक एका उतरत्या पृष्ठभागावर गेली अनेक शतके उभा आहे.

तरंगता तलाव : मणिपूर

मणिपूरचा लोकतक तलाव हा जगातील एक नैसर्गिक आश्चर्य आहे. या तलावात अनेक अशी बेटे आहेत जी तरंगतात. माणसे या बेटांवर शेती करतात. तसेच तेथे जगातील काही दुर्मिळ प्राणीही आढळतात. दरवर्षी हजारो पर्यटक या बेटांना भेट देतात.

शेट्टीहल्ली बुडते चर्च ​​​​​​​

कर्नाटक जिल्ह्यातील शेट्टीहल्ली रोझरी चर्च बुडते चर्च म्हणून प्रसिद्ध आहे. एकोणीसाव्या शतकात फ्रेंच धर्मप्रचारकांनी हे चर्च बांधले होते. हे चर्च गोथिक स्थापत्यकलेवर आधारित आहे. चर्चच्या शेजारी तलाव बांधल्यानंतर लोकांनी चर्च वापरण्यास बंद केले.

स्केलेटन लेक

उत्तराखंडच्या पर्वतरागांमधील हे बर्फाळ रुपकुंड तलाव पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. हा तलाव बारा महीने बर्फाने झाकलेला असतो. पण जेव्हा इथला बर्फ वितळतो तेव्हा कुंडाच्या तळाशी असलेले मानवी हाडांचे सांगाडे पाहायला मिळतात. कनौजचे राजा जसधावल यात्रेसाठी या ठिकाणावरून जात होते. त्याच दरम्यान वादळ सुटले या वादळात त्यांच्यासोबत ३०० यात्री अडकले, आणि या रूपकुंडात बुडून त्यांचा मृत्यू झाला. आज ही या तलावात त्यांचे सापळे दिसतात.

Pages