कुठे शोधू तुला

Submitted by मंगलाताई on 13 April, 2020 - 13:38

अरे किती शोधलं तुला मी
तुझ्या नेहमीच्या ठिकाणी
देवळाच्या आत , गाभाऱ्यात
मशिदीत
गुरू द्वारात,
चर्च मध्ये,
पण छे पत्ताच नाही तुझा .

शोधून शोधून दमले
मनात म्हंटलं अरे हो
यालाही जरा उसंत घेऊ द्या .
रोजच्या धावपळीत कंटाळा आला असेल ना तुला?

महाआरत्या
महाप्रसाद,
भक्तांची अलोट गर्दी,
जाडजूड देणग्या बुकं,
देणग्यांचे महापूर,

नवस पूरे करणारे पामरं
अच्छा, म्हणून तू गेलास का देऊळ सोडून .
हारांच्या ओझ्यानं मान कलायला झाली
उदबत्तीच्या सुवासानं जीव गुदमरून गेला
कर्णकर्कश ध्वनिक्षेपकानं ठार बहिरा झाला तू
नैवेद्याच्या ताटानं तुला अजीर्ण झाले .
तरीच तू आताशा जरा क्रुश दिसू लागला होतास.

पण अगदी देऊळ सोडून जाशील असं नव्हत वाटलं मला .
पण बरचं झालं गेलास ते
नाही तरी तुला कोण आहे म्हणा
मनातलं काही सांगायला .
एकटाच तू युगानूयुगे उभा
कर कटेवरी ठेऊन .

हल्ली तुझे रुक्मिणी शी पटत नाही कारे?
हो व्यक्ती स्वातंत्र्य तुम्हांला ही आहेच की .
जरा काही मनातलं सांगतो म्हंटलं ,
जरा कुठे डोळे उघडून बघतो म्हंटलं ,
तर भक्तांची नजर सतत तुझ्यावर .
मग तुझा श्वास गुदमरू लागला
आणि खरचं तुला सांगते
श्वास गुदमरतो तिथं राहू नये .

पण मला जरा कळवायचं होतं
कुठे जातोस ते , एखादा फोन तरी
एखादा एस.एम.एस किंवा व्हाट्स अँप.
अरे तंत्रज्ञान किती पुढं गेलयं
तू मात्र अडाणी च राहिला .
कुठे शोधू तुला या संकटसमयी?
केवढा आधार वाटला असता मला तुझा .

हं आलं लक्षात .
तू दवाखान्यात असशील
डॉ. च्या रुपात,
तू नर्सच्या हाताने सेवा करत असशील,
तू पोलिस बनून कायदा पालन करत असशील,
तू कचरयाच्या गाड्या ओढून नेत असशील .
तू अनेक रूपाने आलास पुढे
पण मी मात्र तुला शोधले
तुझ्या मंदिराच्या बंदिस्त भिंतीतच .

मानवाने घेतले स्वतःला क्वारनटाईन करून.
तू स्वच्छंदपणे भटकायला निघालास.
मी घरात आहे तोवर फिरुन घे .
मी बाहेर आले की शोधेन तुला .
पुन्हा
देवळात,
मशिदीत,
चर्चमध्ये
आणि गुरुद्वारात .
तू मात्र कुठे भलतीकडे च असशील नवे रुप घेऊन .
आणि मी नक्की म्हणेन बघा मी नवस केला होता म्हणून तर तो पावला .

Group content visibility: 
Use group defaults