हिटलरची प्रकृती व त्याला वाटणारी विविध प्रकारची भीती!

Submitted by पराग र. लोणकर on 6 April, 2020 - 01:37

महान पुरुषांना आपला मृत्यू आधीच कळतो असं म्हणतात. `महान` हा शब्द लोकांच्या भल्यासाठी आपले आयुष्य वेचलेल्या व्यक्तींसाठी आपण वापरतो. तशा अर्थाने हिटलरला महान निश्चितच म्हणता येणार नाही. पण त्याचं संपूर्ण जीवन जर आपण पाहिलं तर ते एका असामान्य माणसाचं होतं हे कोणीही मान्य करेल. तर अशा या असामान्य हिटलरनं आपल्या बोलण्यातून, लिखाणातून आणि भाषणांतून अनेकदा त्याला आयुष्य फारच कमी असल्याचं सांगितलं होतं. १९२८च्या दरम्यान तो एकदा म्हणाला होता की आत्ता मी ३९ वर्षांचा आहे. आणखी वीस वर्षेच मी जगणार आहे.

आपली प्रकृती आपल्याला दगा देईल याची त्याला कायम भीती वाटत असे. त्यामुळे हातातील कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याकडे त्याचा भर असे. तसं पाहिलं तर त्याला काडीचंही व्यसन नव्हतं. औषधी काढे मात्र तो आवर्जून घेत असे. आपल्या तब्येतीला तो फारच जपत असे. बऱ्याच वेळा त्याचे पोट दुखे. अशा वेळी आपल्याला मोठा रोग झाला आहे, या पोटदुखीचे कारण कॅन्सर असेल असं त्याला वाटायचं. वैद्यकीय चाचणीत मात्र काहीच निघत नसे. तसा तो अगदी ठणठणीत होता. व्यायामाची त्यांनं कधीच टाळाटाळ केली नाही. थोडा पण नियमित व्यायाम तो करीत असे. त्याचं मन फारच संशयित असल्याने शारीरिक आजार नसले तरी मानसिक आजाराने, स्वतःच्या आरोग्याविषयीच्या चिंतेने मात्र तो बरेचदा त्रस्त असे.

नाडीपरीक्षा, रक्तदाब तो वेळोवेळी तपासून घेई. त्याने वैद्यकीय माहितीची पुस्तके ढिगाने वाचली होती. वेळोवेळी गरजेप्रमाणे कंटाळा न करता तो औषधे घेई. घरगुती काढे तर तो स्वतःचे स्वतः करून घेई. बर्लिनचा एक त्वचा व गुप्तरोग तज्ञ डॉक्टर मॉरेल त्याचा खासगी डॉक्टर झाला होता. गरजेप्रमाणे इंजेक्शन्स, तारुण्य राखण्यासाठीची खास औषधे मॉरेल हिटलरला देत असेल. कमी-अधिक २८ प्रकारची औषधे तो घेत असे.

ऑगस्ट १९४१ पासून हिटलरचा थंडी, ताप, अशक्तपणा वाढला होता. हाता-पायावर सूजही येत होती. नजरही क्षीण झाली होती. बाहेरचा प्रखर प्रकाश डोळ्यांना सहन होत नव्हता. प्रसंगी डोळ्यांना पट्टी बांधावी लागे. चालताना तोलही जाऊ लागला. मानसिक ताणामुळे आपल्या प्रत्यक्ष वयापेक्षा निदान चार-पाच वर्षांनी तो म्हातारा दिसू लागला होता.

काही बाबतीत हिटलर लहान मुलासारखा वागत असे. नवीन शिवलेले कपडे अंगावर चढवले की लगेच तो त्या कपड्यात आपले फोटो काढून घेत असे. आपण या कपड्यात सर्व बाजूंनी कसे दिसतो हे तो पाहत असे. लोकांना हा पोशाख विचित्र वाटणार नाही ना, या कपड्यांमुळे आपल्या त्यांच्या मनात असलेल्या प्रतिमेला तडा तर जाणार नाही ना, याची भीती त्याच्या मनात असायची. हे फोटो पाहिल्यावर याबद्दल जराही शंका मनात आली तरी तो ताबडतोब ते नवीन कपडे बाजूला टाकून देत असे.

हिटलर कधी पोहावयास किंवा होडी चालवण्यास जात नसे. त्याला बुडण्याची भीती वाटत असावी. तो कधी घोड्यावरही बसला नाही.

आपल्याला जेवणातून विष दिले जाईल ही हिटलरला कायम भीती वाटत असे. त्यामुळे त्याच्या नोकरवर्गात काही अशा माणसांची निवड केलेली असेल की ज्यांचे काम फक्त त्याला दिल्या जाणाऱ्या अन्नाचे, त्याच्या आधी ग्रहण करणे हे असे. अशा व्यक्तींनी अन्न खाल्ल्यानंतर त्यात विष नसल्याचे स्पष्ट झाल्यावर मगच ते हिटलरला खाण्यासाठी पाठवले जात असे.

कोणत्याही व्यक्तीला पहिल्यांदा भेटण्यास जात असताना त्या व्यक्तीशी कसे बोलले म्हणजे आपल्याला आपले काम काढून घेता येईल, समोरच्यावर आपली छाप पाडता येईल, याबाबत हिटलर अतिशय दक्ष असे. त्यासाठी तो अशा व्यक्तीची प्रत्यक्ष भेट घेण्यापूर्वी आपल्या अतिशय जवळच्या एखाद्या सहकाऱ्यास त्याला भेटण्यास पाठवत असे. अशी सहकारी व्यक्ती परत आल्यावर हिटलर त्याला त्याच्या त्या भेटीविषयी विचारणा करीत असे. या प्रश्नोत्तरातून हिटलर ठरवत असे की आपण त्या व्यक्तीला भेटल्यावर आपले बोलणे कसे असावे? आपले मुद्दे शांतपणे परंतु ठाम मांडावे की आलेल्या व्यक्तीवर ओरडून बोलून त्याला घाबरावे? अशा व्यक्तीशी बोलताना आपल्याच एखाद्या अधिकाऱ्यावर डाफरावे, की अशा व्यक्तीशी प्रेमाने बोलून आपले काम काढून घ्यावे.

आपल्या संपूर्ण कारकीर्दीत आपल्या वरचढ कोणी होईल ही भीती हिटलरपुढे सदैव होतीच. त्यामुळे हा सर्व काळ त्याने कायम आपल्या सहकाऱ्यांमध्ये आपापसात स्पर्धा राहील, वेगवेगळ्या स्थापन केलेल्या शासकीय संस्था एकमेकांबरोबर काम न करता, एकमेकांशी स्पर्धा करतील याची खबरदारी घेतली. त्यामुळे त्याच्या स्थानास धोका पोहोचवू शकेल अशी एकी कोणातही निर्माण न होऊ देण्यात तो यशस्वी ठरला.

(मी – रणजित नावाने लिहिलेल्या- `माहीत नसलेला हिटलर` या पुस्तकातील काही अंश.)
MNhitler.jpeg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

शिखरावर असलेले नट/ नट्या आणि हुकूमशहा हे कायम संशयग्रस्त (paranoid) असतात असे मनोविकार शास्त्र सांगते.

सतत आपल्याविरुद्ध कोणीतरी कात करीत आहे आणि आपल्याला आपल्या पदावरून खाली खेचण्याचे प्रयत्न करत आहेत या संशय गंडाने ते प्रभावित असतात.
यात हुकूमशहा हातात सत्ता असल्यामुळे त्याचा वापर आपल्या विरोधकांना संपवण्यात किंवा त्यांच्या मध्ये दहशत निर्माण करण्यात नेहमीच करत असतात.

यात हिटलरच काही विशेष आहे असे नव्हे तर लेनिन, स्टालिन,पॉल पॉट, किम जोंग ऊन( उत्तर कोरिया) माओ झेडोन्ग, डंग झ्याव पिंग आणि आता शि जिनपिंग आणि दक्षिण अमेरिकेतील असंख्य हुकूमशहा येतील.

थोड्याफार फरकाने सर्वच हुकूमशाह असेच वागताना आढळतील. याचे कारण हि पराकोटीची संशयग्रस्त मनोवृत्ती.

या मनोवृत्तीमुळे कम्युनिस्ट हुकुमशहानी मागच्या शतकात १०-१२ कोटी लोकांना यमसदनास पाठवले आहे त्यांच्या पुढे हिटलर "किस झाड कि पत्ती" ठरेल.

आपले लेखन उत्तम आहे पण या अनुषंगाने आपण विचार केल्यास ( हा विचार आपण केला असेलही) कदाचित लेखन जास्त संतृप्त होईल असे मला वाटते.

वेगळी माहिती आहे.थोडासा पॅरानोइया आणि ocd चा अंश दिसतोय वर्णनानुसार.
अर्थात इतकी वाईट, घृणास्पद कामं केल्यावर कोणीतरी आपल्या वाईटावर आहे ही भावना,शंका नेहमी असणं अगदीच योग्य.

छान

ह्यावरूनच रोलिंगबाईंनी डार्क लॉर्ड उभा केला