निरोप

Submitted by jpradnya on 5 April, 2020 - 17:36

निरोप म्हणजे देवाला नमस्कार
निघताना हातावर घातलेलं दही
पाठीवर थरथरता हात आजीचा
सांगून जातो बरंच काही

न सैलावणारी घट्ट मिठी
छकुल्या हातांनी केलेला टाटा
जेव्हा दुरावतात सखे सोबती
जेव्हा वेगळ्या होतात वाटा

साता समुद्रांपार पहिली भरारी
सासरी चाललेल्या ताईची पाठवणी
हसण्याचा केलेला आटोकाट प्रयत्न
दडवीत हुंदका
लपवीत डोळ्यातलं पाणी

सहवासातल्या क्षणांच्या आठवणींची दाटी
विरहाची हुरहूर जडावलेली अंतः करणं
निरोप म्हणजेच परतीचं तिकीट
निरोपातच असतं पुढल्या भेटीचं बोलावणं

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users