बळे आगळा राम हा श्रेष्ठ स्वामी

Submitted by पुरंदरे शशांक on 2 April, 2020 - 03:20

बळे आगळा राम हा श्रेष्ठ स्वामी

प्रभू लाभला रामराया सुनीळू
दीनाकारणे पातला तो कृपाळू
सदा भक्तकाजी उभा पाठिराखा
तया वंदिता चित्त चैतन्य देखा

उभी जानकी वामबाजूस नित्य
पुढे वंदितो मारुती भक्त मुख्य
सदा सज्जनालागि कोदंडपाणी
असा सावळा राम लावण्यखाणी

जरी अंबरी मेघ हे श्यामवर्णी
मनी लोचनी सावळा चापपाणी
असा स्वामीश्री सर्वसंपन्न गुणे
तया आठवाने समाधान बाणे

पती जानकीचा प्रभू मारुतीचा
असे स्वामि हा भक्त बिभिषणाचा
कधी भिल्लीणीकारणे सेवि बोरे
ऋषी आश्रमी राक्षसा ताडि घोरे

अति सौम्य मुद्रे स्वभक्ता सुखावे
स्वये भक्तकाजी सुखे झिजवावे
सदा सज्जनाकाजी धावून जावे
प्रभू रामचंद्रासी नेमे भजावे

करी अंतरी ध्यान या राघवाचे
भवा नाशिते ध्यान सर्वोत्तमाचे
मुखी रामनामे मना पालटीजे
स्वये श्री प्रभू अंतरी वास कीजे

करु ध्यान पाही जरी राघवाचे
तरी उन्मनी होत जाते मनाचे
जरी पाहि ओलांडुनी या मनाते
तरी पाविजे निर्गुणी राघवाते

मना नाम घेई जरा तातडीने
अतिप्रेम भावे परी उत्कटीने
नको व्यर्थ निंदादी दोषादिकाते
तरी प्रेम लाभेल सर्वोत्तमाचे

असे राम नाथा भुवनत्रयाचा
परी माऊली भक्तकाजी त्रिवाचा
जरी आळवू प्रेमभावे तयाला
कडे मातृप्रेमे धरी बालकाला

बळे आगळा राम हा श्रेष्ठ स्वामी
तया भाविता वृत्ती निवृत्त होई
जयाचे मुखी नाम येता स्वभावे
विदेहीपणे जीव पायी स्थिरावे

जरी येत कर्णी कथा राघवाची
मना देत विश्वास भक्ती प्रभूची
उणी यापुढे गोडि ती अमृताची
जिवा लाभताहे समाधी सुखाची

परब्रह्म साकार भक्ता सहाय्या
अयोध्यापुरी जन्म घे रामराया
अति आदरे पाळी कर्तव्यनिष्ठा
प्रभू रामचंद्रा नमोजी समर्था

सदा शांतमूर्ति परी दिव्यकांती
मना मोहवीते प्रभा नीलकांती
अनन्यास दे भक्ती कैवल्यदानी
अयोध्यापती वंदितो चापपाणी

मना वेध लावी घनःश्याममूर्ती
कृपा राघवाची करे शांतवृत्ती
जना सांगतो श्रेष्ठ कर्तव्यपूर्ती
परी अंतरी पूर्ण आलिप्तवृत्ती

जडो चित्त हे राघवापायी नित्य
वसो वैखरी नाम त्याचे पवित्र
कदा मानसी ते रिपू ना रिघावे
सदा शांत चित्ते जनी वावरावे
(रिपू..... कामक्रोधादी शत्रू )
(रिघणे..शिरकाव करणे)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूपच अलौकिक!!
>>>>>असे राम नाथा भुवनत्रयाचा
परी माऊली भक्तकाजी त्रिवाचा
जरी आळवू प्रेमभावे तयाला
कडे मातृप्रेमे धरी बालकाला>>>>>> __/\__

करु ध्यान पाही जरी राघवाचे
तरी उन्मनी होत जाते मनाचे
जरी पाहि ओलांडुनी या मनाते
तरी पाविजे निर्गुणी राघवाते >>>अप्रतिम रचना.

'तरी उन्मनी होत जाते मनाचे ' उत्तमच.
अति आदरे राम नित्य स्मरावा
सदा रामनामे ध्यानी धरावा
विमलचित्त होता श्रीराम मीच
माय बाप बंधू सर्वस्व तोच

खूपच छान Happy
राम रंगी रंगले, मन Happy

_/\_