कोरोनामुळे झालेली सक्तीची स्थानबध्दता/वानप्रस्थ किंवा सब्बॅटिकलचे भविष्यकालीन परिणाम…

Submitted by अ'निरु'द्ध on 28 March, 2020 - 00:13

कोरोनामुळे झालेली सक्तीची स्थानबध्दता/वानप्रस्थ किंवा सब्बॅटिकलचे भविष्यकालीन परिणाम…

मित्रांनो,
रविवारचा एक दिवसाचा लाॅकडाऊन बऱ्याच जणांनी एंजाॅय केला..
कडकडीत लाॅकडाऊन मुळे अनुभवलेली शांतता, पक्षांचे आवाज याबाबत बरेच जण सोशल माध्यमांवरतीही भरभरुन व्यक्त झाले.

पण त्यानंतर जाहीर केलेल्या तीन आठवड्याच्या सक्तीच्या लाॅकडाऊनचे मात्र लोकांच्या मनावर वेगवेगळे परिणाम झाले.
जीवनावश्यक वस्तूंची चिंता, वाणसामानाची चिंता, नोकरीधंद्यातल्या टारगेट्सची, जबाबदारीची चिंता, फक्त घरातच दिवस कसे काढायची याची चिंता… हे सगळं कोरोनावरच्या अन्य धाग्यांवर आलेलं आहे..

तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी जुन्या छंदाची आळवणी सुरु केली असेल.. असलेल्या छंदाला जास्त वेळ द्यायला लागला असाल.. (तसं असेल तर इथे नक्की द्या)

मात्र लाॅकडाऊनचे काही दिवस झाल्यावर कदाचित काही जणांना ही शांतता, हे अव्यग्र असणं आता आवडू लागलं असेल..

कदाचित काही जणांना याची आधीपासूनच आस असेल पण इच्छा असूनही ते शक्य झालं नसेल…
आणि काही जणांना गेल्या काही वर्षांत भयानक वेगाने वाढलेल्या कार्यव्यग्रतेच्या दुष्टचक्रात हा विचार करायलाही उसंत मिळालेली नसेल..
मी नेहमी विचार करतो (कदाचित चुकीचाही असेल) की बँकेतली एक मोठी जबाबदारी सांभाळणारा एखादा कॅशियर जेव्हा सुट्टी घेऊन फिरायला जातो तेव्हा त्याच्यावर बँकेच्या कामाची, कॅशची अशी कोणतीही जबाबदारी नसते.. तो त्याची सुट्टी, आऊटींग पुर्णपणे एंजाॅय करु शकतो…

पण स्वतःचा व्यवसाय असणारे, सल्लागार/कन्सल्टंट म्हणून काम करणारे, काॅर्पोरेट मधे कामाला असणारे किंवा अधिकारपदावरचे लोकं, (हल्ली बहुतांश सरकारी कर्मचारी आणि कदाचित शिक्षकही यातच आले) आणि लहानमोठे आंत्रप्रुनर हे जरी सुट्टीवर गेले तरी स्पर्धात्मक वातावरण म्हणा, परिस्थितीचा रेटा म्हणा किंवा जबाबदारीचं पद म्हणा.. त्यांना कामापासून असं १०० टक्के मुक्त रहाणं, अलिप्त रहाणं शक्य होत नाही… आणि मग ती सुट्टीही पुर्णांशाने सुट्टी रहात नाही.

पण ह्या लाॅकडाऊन मधे डाॅक्टर्स, पोलिस आणि काही व्यवसाय सोडता तसंच आत्ताही "वर्क फ्राॅम होम" करणारे वगळता (यात हातावर पोट असलेले, रोजंदारीवर काम करणारे गृहीत धरलेले नाहीत) अन्य लोकं त्यांच्या कामाच्या जबाबदारीतून पुर्णांशाने मुक्त होते/आहेत..

आणि त्यांना हे पूर्णपणे मोकळं असण्याची, Unwinding होऊ लागल्याची सुखद जाणीवही व्हायला लागली असेल..

आमच्या वरच्याच मजल्यावर एक पंचेचाळीशीतले चार्टर्ड अकाउंटंट रहातात. अधूनमधून बाल्कनीत बसून जुनी फिल्मी गाणी, भावगीतं गात असायचे. आमच्या बाल्कनीत त्यांचा आवाज पोहोचतो. त्यांचा आवाजही छान, सुरेल आहे.
हल्ली मात्र दिवसातून तीन वेळा तरी त्यांच्या गाण्याचा आनंद मिळतो. आणि सध्याच्या या शांततेमुळे आवाज जास्तच सुस्पष्ट येतो.. जास्त वेळही गातात आणि जास्त तल्लीनतेनेही..
साहजिकच मजाही जास्त येते..
त्यांना गाणं आवडतंय हे सांगायला, काँम्प्लिमेंट द्यायला फोन केला होता.. खूप आनंदात होते.
म्हणाले - अहो गाणं हे माझं पॅशन. अजून जास्त गायचं होतं, जास्त शिकायचं होतं.. पण कामाच्या धबडग्यात कधी जमलंच नाही.. आणि हे असं विमुक्तपणे तर नाहीच नाही..
आपल्या इथे जवळच एक गाणं शिकवणारे बुवा आहेत. गेली दोन वर्ष जायचं जायचं म्हणतोय.. पण जमलंच नाही.. आता मात्र लाॅकडाऊन संपला की आधी त्यांच्याकडे शिकायला जाणार आहे..
आणि माझ्या कामाचे तास खरं तर एखादा आख्खा दिवस कमी करणार आहे.. माझे यंग पार्टनर्स, असोसिएट्स बघतील काय ते..

थोडक्यात जशी वाघाला रक्ताची चटक लागते तशी ह्या सब्बॅटिकलची लोकांना सवय लागायला लागलीय..

माझ्या ओळखीतल्या ज्यांना ज्यांना काही छंद आहेत त्यापैकी कोणीच कुरकुरत नाहीये.
कसलाच छंद नसलेले आणि एरवी फक्त काम एके काम करणारेच ह्या लाॅकडाऊन मुळे जास्त त्रासलेयत..
कारण सध्या त्यांना करायला काहीच काम नाही. आणि छंदात गुंतून राहतील अशी त्यांची जडणघडणच नाही.

परदेशात दोन, तीन वर्ष काम करुन पैसे साठवायचे आणि मग एखादी मोठी सुट्टी घेऊन किंवा असलेला जाॅबही सोडून काही दिवस आयुष्य मनाप्रमाणे जगण्याचा ट्रेंड आहे.
अर्थात तिथली लाईफस्टाईल वेगळी आणि तिथल्या लोकांमधे हे असं जगणाऱ्यांची लाईफस्टाईल/त्याचे निकष हे अजूनच वेगळे...

पण आपल्याकडे ज्या लोकांनी उर्वरित आयुष्यासाठी पुरेसे पैसे कमावलेले आहेत आणि गरज नसताना अतिरेकी कार्यमग्न आयुष्य घालवताहेत अशा लोकांना (कदाचित खूप कमीही असतील But Not Negligible..) ही अव्यग्रतेची चटक लागली म्हणा किंवा गोडी कळली म्हणा.. असे लोकं ह्या अनुभवानंतर कदाचित पुर्णपणे किंवा अंशतः निवृत व्हायचा विचार करतील किंवा असलेल्या छंदासाठी कामातून जास्त वेळ काढतील…
एखाद्या व्यक्तीकडे फार काही पैसे नसतीलही परंतु कदाचित कमी गरजा असलेलं आयुष्य निवडून कामाचा अतिरिक्त ताण टाळण्याचा आणि ही अव्यग्रतेमधली मजा घेण्याचा ती व्यक्ती प्रयत्न करेल..

तर मायबोलीकरांचे यावर काय विचार आहेत हे जाणून घ्यायला, तुमचे किंवा तुमच्या ओळखीच्यांचे अनुभव इथे वाचायला आवडतील ..

की बाँबस्फोटानंतरही मुंबई दुसऱ्या दिवशी काही झालंच नाही अशा तऱ्हेने कामाला लागते तसंच कोरोना नंतरही होणार….???

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक परिणाम : माझे काही व्यावसायिक मित्र जे येत्या दोन/चार वर्षात निवृत्त व्हायचा विचार करत होते ते आता कंटाळून निवृत्त नाही होणार असं म्हणायला लागले आहेत.
हा सुपरिणाम की दुष्परिणाम माहिती नाही..

दूरगामी तसेच मूलगामी परीणाम होतीलच.
- एक तर वैद्यकिय क्षेत्राने प्रचंड घालमेल पाहीलेली असल्याने, ते अधिक बळकट होइल जसे जास्त सुविधा, रिसोर्सेस, साधने, काळजी, सावधानता.
- दुसरं एव्हिएशन इंडस्ट्रीवरही खूप परीणम होणार आहे.
- देशांच्या सीमा अधिक रिजीड होउ शकतात
- मंदी येउन, बर्‍याच नोकर्‍या जाणार असे वाटते.

परदेशी नोकरी करणाऱ्यांवर "आता केवळ स्थानिक लोकांना प्रथम संधी" अशा काही बदललेल्या धोरणामुळे परिणाम होईल का..? (अर्थात हा मोठा विषय आहे कारण स्पेशलायझेशन, त्या स्वरुपाच्या कामात स्थानिकांचे प्राविण्य आहे अथवा नाही, वगैरे, वगैरे..)

पहीलं अमेरीकेत कॉलेज शिक्षण अ‍ॅफोर्डेबल केले पाहीजे. काही ठिकाणी कम्युनिटी कॉलेजेस फ्री आहेत तर काही ठिकाणी अल्प दरात शिक्षण उपलब्ध आहे. मग मुलं त्या कॉलेजातून पहीली २ वर्षे करुन मग कॉलेजात ते क्रेडिटस अप्लाय करतात.
तर सांगायचा मुद्दा हा की कॉलेजेस अ‍ॅफोर्डेबल झाली तर नोकरीसाठी स्थानिक उमेदवार निर्माण होतील. नाहीतर मग बाहेरच्या लोकांशिवाय पर्याय नाही.

वर्क फ्रॉम होमला आता जवळजवळ दोन आठवडे होतील. बाकीच्या कंपन्या बंद असल्याने खूप काम आहे, पण करू शकत नाही अशी परिस्थिती झालीये.
दररोज सकाळी लॉगीन आणि संध्याकाळी लॉग आऊटचा मेल टाकतो. दुपारी एक रिपोर्ट पाठवतो. बस काम संपलं.
आज MBA च्या मुलांचं एक ऑनलाइन लेक्चर घेतलं, कोरोना नंतर येणाऱ्या जागतिक मंदीवर. नेहमी मस्ती करत असलेले मुलं या विषयामुळे भेदरलेले दिसले. वाईट वाटलं.

>>>आज MBA च्या मुलांचं एक ऑनलाइन लेक्चर घेतलं, कोरोना नंतर येणाऱ्या जागतिक मंदीवर.<<<
@ अज्ञातवासी.... यावर अन्य धाग्यावर कुठे लिहिलं नसेल तर इथे लिहिणार का प्लीज...?

निरु, पाफा, ते अतिशय बेसिक लेवलच लेक्चर होतं. मेबी तुम्हाला त्यापेक्षाही जास्त मुद्दे माहिती असण्याची शक्यता आहे. Happy
पण उद्या लॅपटॉप वरून लिहितो...

हि साथ कधी आटोक्यात येईल ते माहित नाही पण लॉकडाउन संपल्यावर बहुतेक लोकांच्या आर्थिक जीवनावर आणि त्या अनुषंगाने बाकी सर्वच बाजूंवर नक्कीच दूरगामी परिणाम होणार. येथील बरीच मंडळी खासगी व्यवसायिक आणि उद्योजक असतील. भारतावर याचा इतर देशांपेक्षा कमी परिणाम होणार हे जरी खरं असलं तरी वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांकडून त्यांच्या नोकरी/व्यवसायावर होणारे संभावित परिणाम/बदल/आव्हाने यांवर वाचायला आवडेल. कोरोनामुळे होणाऱ्या आर्थिक उलथापालथींवर वेगळा धागा न भेटल्याने इथे विचारतोय.

Pages