व्हायरस

Submitted by जाई. on 24 March, 2020 - 00:55

१७ मे २०१८ च्या सकाळी सलिह नावाचा एक माणूस केरळमधील सरकारी वैद्यकीय रुग्णालयात अत्यवस्थ अवस्थेत दाखल होतो . सुरुवातीला त्याच्यावर उपचार करण्याऱ्या डॉक्टरांना तो जापनीज इंफायलिटीसचा प्रकार वाटतो . पण जसजसा दिवस वर चढत जातो तसतसा उपचार करण्याऱ्या न्यूरॉलॉजिस्टना काहीतरी गडबड असल्याचा संशय येतो . या रोग्याची लक्षण वर उल्लेख केलेल्या आजारापेक्षा वेगळीच असतात . विशेष म्हणजे १२ दिवसांपूर्वी सलिहाचा भाऊ याच लक्षणांनी बेजार होऊन गेलेला असतो . आणि सलिहाचे बाबा आणि आत्यामध्येही तीच लक्षण दिसू लागतात . हा इतिहास आणि रुग्णांची लक्षणे बघून न्यूरॉलॉजिस्टना संकटाची चाहूल लागते आणि वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या होऊन केरळात निपाह व्हायरसने एन्ट्री घेतली आहे यावर शिक्कामोर्तब होतं.

अबिद अली दिग्दर्शक असलेला Virus हा चित्रपट केरळमध्ये उदभवलेल्या निपाह आजाराची , त्या आजारविरुद्ध केरळने दिलेल्या यशस्वी लढ्याची गोष्ट सांगतो . निपाह व्हायरसचा उद्रेक होऊन त्याने जवळपास २१ जणांचा बळी घेतले . त्यात एका नर्सचाही समावेश होता. केरळच्या वैद्यकीय , प्रशासकीय क्षेत्राची कसोटी या आजाराने पाहिली . या सगळ्याच चित्रण समर्थपणे पडद्यावर उतरल आहे. सुरुवातीचा आजार डिटेक्क्ट करण्यात उडालेला गोंधळ , एकदा त्याच स्वरूप कळल्यावर वैद्यकीय यंत्रणेने कसलेली कंबर , त्याला प्रशासनाने दिलेली खंबीर साथ हे सगळं पडद्यावर आपसूक येत राहतं .चित्रपटाचं एक वैशिष्ट्य म्हणजे इतक्या गंभीर विषयावर असूनही कुठेही तो कंठळी , प्रचारकी होत नाही वा धडधड पळत नाही . शांतपणे एकेक पैलू उघड करून दाखवतो . सुरुवात होते ती आजार उघड झाल्यावर अजून किती जणांना याची लागण झाली आहे इथून . त्या शोधात येणारे अडथळे , गुंतागुंतीच्या मानवी स्वभावाचे पैलू, प्रसंगांना सामोरे जाण्याची प्रत्येकाची वेगळी क्षमता , प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेली योजना , आजाराची व्याप्ती शोधण हे सगळं एकापाठोपाठ येत जातं. वैद्यकीय क्षेत्रातील अडचणी , साधन सामुग्रीचा अभाव , लालफितीचा कारभार, पणाला लागलेलं मानवी जीवन , आजारातही टिकून असलेला मानवी कदृपणा हे घटक दर्शन देऊन जातात . बहुपेडी भारतीय समाजात संसर्गजन्य आजराला हाताळण , त्या हाताळणीचे होणारे राजकीय , सामाजिक परिणाम , देशाची सुरक्षितता , निसर्गतील मानवी हस्तक्षेप या सर्व मुद्द्यांवर चित्रपट मार्मिक भाष्य करतो. निपाहसारख्या मोठ्या आजाराला तोंड देताना छोट्यातील छोटी कृती किती महत्वाची ठरते , भारतीय राजकारणी , वैद्यकीय व्यावसायिक , सामान्य नागरिक यांची एकजूट शेवटी कशी जिंकते हे या चित्रपटात वारंवार दिसून येतं .

केरळच्या आरोग्यमंत्री के के शैलजा (चित्रपटात यांची भूमिका रेवतीने केलीये ) IAS ऑफिसर श्रीयुत राजन खोब्रागडे ( कलाकार :- tovino thomas ) आणि त्यांच्या पूर्ण टीमची धडपड चित्रपटभर दिसत राहते . संपूर्ण मांडणीचा भर हा नैसर्गिकरित्या घडत असलेल्या घटनावर असल्याने चित्रपट कुठेही कृत्रिम होत नाही. सिनेमात मोठे मोठे टेक्स , विव्हळत राहणं , चित्रविचित्र पार्श्वसंगीत हे कटाक्षाने टाळलं आहे . चित्रपटाच्या संथ गतींचा कंटाळा येऊ शकतो मात्र एका पॉइंटनंतर चित्रपट पकड घेतो . याच श्रेय अर्थातच दिग्दर्शकला, घट्ट बांधलेल्या पटकथेला आणि मल्याळी अभिनेत्यांना . रेवती वगळता सगळे चेहरे मलातरी नवीन होते . पण त्यांचं तुमच्या आमच्यातील असणं / दिसणं यामुळे परक वाटत नाही.

चित्रपटाच्या शेवटी आरोग्यमंत्री केरळ निपाहमुक्त झालाय ही घोषणा करतात आणि त्यानिमित्ताने सुरेख भाषण करतात . ते भाषण मुळातूनच ऐकण्यासारखं आहे . कोणत्याही आजाराला तोंड द्यायला सगळ्यांची साथ कशी महत्वाची आहे , त्याशिवाय हा गाडा चालवणं किती कठीण आहे हे आवर्जून सांगतात .

केरळच्या निपाहमुक्त घोषणेप्रमाणेच लवकरच कोरोनामुक्त जग ही घोषणा जगाला ऐकायला मिळावी ही त्या जगनियंत्याकडे प्रार्थना !!! आमेन !!!

मल्याळी भाषेतील हा चित्रपट प्राईमवर इंग्लिश सबटायटलमध्ये उपलब्ध आहे .

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users