एकटीच @ North-East India दिवस - १७

Submitted by सुप्रिया राज जोशी on 3 March, 2020 - 01:27

अनुक्रमाणिका > https://www.maayboli.com/node/72984
अनुक्रमाणिका २ > https://www.maayboli.com/node/73598

53264630_10156897055572778_2975813965579288576_n.jpg

22nd फेब्रुवारी 2019

प्रिय विद्या,

चाळीस वर्षांची आपली मैत्री, आयुष्यातल्या एकेक सर्वात आनंदाच्या किंवा दुःखाच्या वेळी तुझ्याजवळ मी, माझ्याजवळ तू होतो. पेनाने लिहिलेले पत्र पोस्टाच्या लाल पेटीत टाकायच्या जमान्यापासून आपण एकमेकांना पत्र लिहित आहोत. तू मुंबई सोडून गेल्यावर थोडा पत्र लिहायला उशीर काय झाला की नालायक बेशरम मूर्ख गाढव ... अशी सुरवात केलेले तुझे पत्र पोस्टमन आणून द्यायचा. आता या पत्रांच्या मालिकेत तुला वगळले तर शिव्या हासडत मला ठोकून काढशील. शिव्यांचं काही नाही गं, तुझ्या तोंडी त्या ही गोड वाटतात, पण दोन वर्षांपूर्वी वजन पाहिले होते ते 105 किलो होते, आठवतंय ना? तू ठोकून काढलस तर माझ्या जीवाला नाही झेपणार Wink म्हणून आजचं पत्र तुला!
52868323_10156897055732778_9222965990646611968_n.jpg

चेरापुंजी चे माझे घर इतके टुमदार सुंदर होते काही विचारू नकोस. रात्री जेवायला उठायचीही ताकद नव्हती पण कालच्या प्रवासाच्या अनुभवानंतर, आधी पोटाचे आणि नंतरच प्रवासाचे पहायचे हा धडा शिकले. मग बाजूच्याच एका टपरीवर जाऊन तीस रुपयांचा चिकन भात खाऊन घेतला नि गादीत जाऊन लुडकले.

सकाळी उठले तर अंग ठणकत होते. एरव्ही उठल्या उठल्या बॅग उचलून पुढच्या प्रवासाला निघाले असते, पण आज अंग गादीतून बाहेर निघायही मागत नव्हते. पण मग मला आठवले की पिऊन तरर होणारी समस्त मंडळी दुसऱ्या दिवशी एखादा साथीदार डोके धरून बसला की उतारा घ्यायचा सल्ला देतात. म्हणजे आज नाही उठले तर अंग आणखी धरेल म्हणून उठले नि चेरापुंजी फिरायला निघाले.

कुठे जायचे ठरवले नव्हते पण एक रस्ता पकडला नि चालायला सुरुवात केली. एका दुकानात चॉकलेटस घेतली तेव्हा हा रस्ता कुठे जातो ते विचारले तर कळले अर्धा किलोमीटर वर मोस्माई गुहा (mawsmai cave) आहे. तेव्हा कुठे मला कळलं की मी कुठे चालले होते. अर्धा किलोमीटर एवढा व्यायाम उतारा म्हणून पुरेसा होता पण दोन एक किलोमीटर चालले तरी अर्धा किलोमीटर संपेना.

रस्ता चालत नव्हतेच मी, काहीतरी वेगळंच चालू होतं. खूप लाज वाटत होती आणि हसू येत होत. पाऊले वाकडी पडतात तो चालण्यातला डीफेक्ट म्हणून खपून जाईल गं. पण चालता चालता दोन दोन मिनिटांनी नकळत पाय ढोपरातून टूम करून दुमडतात. माझा त्यावर काहीही control नाही पण समोर बघणाऱ्याला कसे कळावे की माझे हे नेमके काय चालू आहे? सर्कशीतला बुटका विदुषक झोपळ्यावरून पडला की सारे हसतात, माझे तसे झाले होते, मी कशीबशी दुमडुक दुमडुक चालते ती त्याक्षणी मला हेरणाऱ्यांसाठी करमणुक होती.

तीन किलोमीटर चालल्यावर एकदाचा Mawsmai चा milestone दिसला. कुठच्या angle ने caves अर्धा किलोमीटर वर होत्या कोणास ठाऊक? या तर Milestone वर लिहिले होते 4 किलोमीटर! त्याच्या बरोबर सेल्फी काढायला गेले तर बसताच येईना. फार प्रयत्नाने एकदा बसले तर उठत येईना. आजच caves बघायला चालले आहे हे एका अर्थी बरे कारण काहीच वेळात एकूणच माझी सरपटायलाच सुरवात होणार असे दिसत होते. Lol

52690321_10156897055882778_5847226377228517376_n.jpg

Mawsmai च्या आत sand stone चे वेगवेगळ्या आकाराचे rock forms तयार झाले आहेत. ज्याला त्यातले कळते त्याने तर पावलापावलावर stalactites आणि stalagmites निरखत रमावे.
53336745_10156897056317778_1081422638569488384_n.jpg

गुहेने जबडा मोठ्ठा उघडून आ वासला आहे तरी तिचे पोट मात्र निमुळते आहे. पोटात भरपूर bats आहेत. आत शिरल्यावर एक वेगळ्याच जगात गेल्यासारखे वाटते... इथे पावसाळ्यात पाणी असते नशीब आता नव्हते, त्यामुळे मला सरडा होऊन फिरता आले. आता उतारा नशेपेक्षा कडक झाला असे म्हणायची पाळी आली तसे परत जाताना बजेट ला बाजूला ठेउन गपचूप टॅक्सी करून गेस्ट हाउस वर गेले. माझ्या खोलीतच एक छोटीशी लायब्ररी होती. त्यात टूरिस्ट ला आवडतील अशी अनेक पुस्के होती. एका पुस्तकात मला Mawphlag या जागेचा उल्लेख सापडला.

हातात हात घालून वसलेल्या टेकड्यांच्या कुशीत बसलेल्या Mawphlang ला Scotland of the East म्हणून ओळखातात. या गावाने डोक्यात sacred forest चा तुरा माळला आहे. आपल्या देशातील अनेक मोठमोठ्या हस्ती खास हे sacred forest बघायला या जागेला भेट देऊन आल्या आहेत. ही sacred forest काय ची भानगड काय आहे जाऊन पाहायलाच हव. मग निघाले ...Mawphlang!
कुठून कुठे पोहोचले ते एका वाक्यात लिहून संपले. पण बॅग पॅकींग करणारा 46 किलोमीटर अंतर तीनदा वाहने बदलून तीन तासांनी इथे पोहोचतो. पोहोचायला दुपारचा एक वाजला, पण प्रथमच दिवसा उजेडी इच्छित स्थळी पोहोचले म्हणून मी जाम खूष होते. आज रात्री जिथे रहायचे तिथेच बॅग टाकून उरलेला दिवस हुंडारायला निघायचे.

नव्या गावात उतरल्यावर कुठल्या वाटेने चालायचे हे ही विचारावे लागते. खासी भाषा मला कळत नाही आणि हिंदी त्यांना बोलत येत नाही. म्हणून मी 'होम स्टे' हा एकच परवलीचा शब्द वापरायचा असे ठरवले. एवढा शब्द साऱ्यांना कळायचा. त्यानुसार जी दिशा दाखवली त्या रस्त्यावर 15 मिनिटे चालून मी जिथे पोहोचले तिथे होम स्टे चे 2000 रुपये मागू लागले. माझ्या एक दिवसाच्या सरासरी खर्चाच्या दुपटीपेक्षाही ते जास्त होते. अशा वेळी कोणी काय करेल ते मला माहित नाही. मी मात्र तिथेच मांडी ठोकून ठाण मांडून बसले.

53419754_10156897058842778_2479069056125108224_n.jpg

मला याच गावात रहायचे आणि एवढा खर्चही परवडणार नाही, या कारणाने ते आंदोलन होते. हळूहळू गावात इकडे तिकडे चर्चा सुरू झाली. कोणीतरी हिंदी भाषा बोलू शकणाऱ्या आयसिलियाला संवाद साधण्यासाठी बोलावले, तिने sacred group office मध्ये जाण्याविषयी सुचवले. तिथेच मला काहीतरी मदत मिळेल असा तिचा सल्ला होता. बैग उचलून निर्जन रस्त्यावरून दोनेक किलोमीटर चे अंतर चालत मी इथे पोहोचले तरी पुन्हा तेच! ईथे तर टुरिस्ट गाईड्सची युनिअन होती. म्हणजे बार्गेनिंग ला काही स्कोपच नाही. साऱ्यांनी मला परोपरीने सांगितले की या गावात माझ्या बजेटमध्ये रहायची सोय होऊच शकणार नाही. नाही म्हणजे नाही. पण मी ही काही कमी चिक्कट नाही म्हणजे नाहीच. पाच वाजले, थोड्याच वेळात अंधार पडेल तरी मी बेशक त्या युनिअनच्या अड्ड्यावर माझे पत्रलेखन करीत शांत बसून राहिले.

52938323_10156897059067778_3693181677057605632_n.jpg

ऑफिस बंद करायची वेळ झाली तसे एका गाईडने विचारले, "अब क्या करोगे?"
"पता नही, आप के God की जो मर्जी होगी।

एकदा आपण चिंता सोडली की तिला जो उचलेल त्यालाच ती चिकटते. सरतेशेवटी तो गाईडच म्हणाला, "एक रूम है पर अंदर सिर्फ एक बेड है और कुछ नही, उधर रहोगे?"
मी त्याच्याबरोबर जाऊन पाहिले तर एका सुंदर होम स्टे मध्ये प्रवाशांच्या ड्राययव्हरची झोपायची सोय केली जाते, ती खोली होती. दिवसभराच्या थकव्या नंतर झोपायला आणखी काय लागते? पत्र लेखन पूर्ण करून, शेजारणी ने दिलेला सुकाच भात खाऊन (इथले लोकल्स हेच खातात) साडे सातला मी गाढ झोपुनही गेले.

53405335_10156899709357778_1205817849377980416_n.jpg

तुझ्या जवळ रहायला म्हणून येणार काय होते नि अचानक इथे ट्रिपलाच निघून आले. मी दूर आहे पण मला तू बिनातक्रार आयुष्याशी कसा सामना करत आहेस त्याची जाणीव आहे. आयुष्याचे, नात्यागोत्यांचे, भावभावनांचे मर्म जसे तुला कळले तसे सर्वांना कळू दे. माझे तर भाग्य असे की तुझ्यासारखी मैत्रिण मला मिळाली.

विद्या, आयुश ची परीक्षा सुरू होईल त्याला मावशीने all the best केले आहे ते सांग. खूप वर्षांनंतर तुला पत्र लिहिलं, मज्जा आली. जमलं तर तू पण उत्तर लिही ना गं.

तुझीच
सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users