इंदोरीकर महाराज नवा वाद

Submitted by आर्यन वाळुंज on 16 February, 2020 - 10:14

इंदोरीकर देशमुख महाराज हे किर्तनकार म्हणून महाराष्ट्राला परिचित आहेत. मला तरी हा माणूस किर्तनकार कधीच वाटला नाही. माझ्या बालपणापासून मी हरिनाम सप्ताहात किर्तन, प्रवचन ऐकत आलो आहे. मला घडवण्यात या किर्तनांचा मोठा वाटा आहे.
बाबामहाराज असोत किंवा खेड्यातील प्रसिध्दी न मिळालेले किर्तनकार असोत. या पंथाची एक डिग्निटी सांभाळली होती या लोकांनी.
हा इंदोरीकर महाराज सासू सून भांडण, बेवडे, पोरींची लफडी याच्याशिवाय काही बोलतच नाही. किर्तनकारानं आपल्या प्रगल्भ आणि अहंकार रहित आचरणातून समाजापुढे आदर्श निर्माण केला पाहिजे.
आता नवा वाद निर्माण केला आहे. काय तर म्हणे अमुक तमुक तिथीला अमकं काम केले तर तमकं होते.
त्यांच्या वक्तव्याला विरोध करणारांना सोशल मीडिया वर शिव्या दिल्या जात आहेत आणि बहुसंख्य लोक इंदोरीकर महाराज देशमुख यांना सपोर्ट करत आहेत. पण ते स्वत: बॅकफूटवर आले तरीही आपण चुकीचं बोललो नाही असे म्हणतात.
पुढे काय होते ते पाहणं आपल्या हाती आहे. महाराज लोक आपण सर्वज्ञ असल्याचं भासवत काहीही रेटून बोलत असतात. हे म्हणजे पृथ्वी सपाट आहे असं काही लोकांना वाटतं तसं आहे.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

अहो तुम्ही कोणाविषयी बोलत आहात याची तुम्हाला कल्पना आहे का? गेली हजारो वर्षे धर्माने अधिकृत मंजुरी दिलेल्या पुरुषप्रधान व्यवस्थेचे ते प्रतिनिधी आहेत. त्यांचा कीर्तनाला लाखोंची गर्दी होत असते. विशेषतः ग्रामीण भागातील महिला आणि मुलीसुद्धा गर्दी करून असतात. पुढच्या दोन वर्षांची त्यांची कीर्तन आत्ताच बुक झालेली आहेत.

इतकी अफाट लोकप्रियता मिळवलेली विभूती आहे ही. भविष्यातील मुख्यमंत्री आणि कदाचित पंतप्रधानपद सुद्धा असेल. आजवर कोणीही विचारत नव्हते अशा महान विभूतीना २०१४ नंतर प्रचंड प्रसिद्धी मिळू लागलीये या देशात.

आजवर कोणीही विचारत नव्हते अशा महान विभूतीना २०१४ नंतर प्रचंड प्रसिद्धी मिळू लागलीये या देशात.
>> हे वाक्य चुकीचे आहे. ते २०१४ च्या आधीपासून प्रसिद्ध आहेत.

आर्यन विचारांशी सहमत. इंदुरीकर महाराज यांच्याबद्दल ऐकले होते आधी त्यामुळे काही वर्षांपूर्वी युट्यूब वर त्यांचे काही विडिओ पाहिलेले. २-३ विडिओमध्येच लक्षात आले की बोलण्यामध्ये अध्यात्मविषय कमी आणि तुम्ही वर लिहिल्याप्रमाणे पोरींची लफडी किंवा घरातील भांडणे याविषयीच चर्चा जास्त आणि मध्ये मध्ये या विषयावर काहीतरी स्वतःचा सल्ला, कॉमेडी शो प्रमाणे मधेमधे पंचेस टाकून लोकांना हसवण्याचा प्रयत्न हेच जास्त दिसले. कदाचित लोकांना हेच जास्त आवडत असावे त्यामुळेच ते फेमस झाले (हेमावैम)
बाकी कळत्या वयात बाबामहाराज सातारकर यांची कीर्तने किंवा विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांची प्रवचने (जी अजूनही ऐकतो) ऐकून मोठा झालो. लहानपणी घराजवळ एक विठ्ठलाचे मंदिर होते तेथे एकादशीनिमित्त रात्री जागरण आणि कीर्तन होत असे. तेथे बसून ऐकण्याचा योग कधी आला नाही परंतु अधूनमधून विठ्ठलनामाचा जयघोष आणि आध्यात्माविषयाची ४ वाक्ये कानी पडत
त्या सर्वांची सर या इंदुरीकर महाराजांना नाही असे वाटते. वर काहीबाही बोलून आपली इमेज जपण्यासाठी क्षमा मागण्याऐवजी किंवा निदान असे म्हणायचे नव्हते हे सांगण्याऐवजी, सांगितलेले कसे बरोबर यावर स्पष्टीकरण द्यायला लागले तेंव्हा थोडा रागपण आलेला. भोंदू बाबांमुळे जसे योग, गुरु शिष्य परंपरा याबाबत लोकांमध्ये साशंकता निर्माण झाली आहे तसेच आता कीर्तनामध्येही अश्या वक्तव्यामुळे होऊ लागले आहे.
सध्याच्या काळात चारुदत्त आफळे यांचे कीर्तन ऐकतो मध्ये मध्ये युट्यूब वर. इंदुरीकर महाराजांपेक्षा फारच बरे.

धन्यवाद कोहंसोहं जी. मला वाटलं होतं कदाचित तुम्ही इंदोरीकरांना बरोबर ठरवाल. पण आपल्या प्रतिसादातून आपण सत्याचे पाठीराखे आहात हे समजलं. चारूदत्त आफळे यांचे किर्तनही छानच असते. बाबा महाराजांचा नुसता हरिपाठ ऐकला तरी खूप बरं वाटतं.

एकदा जुन्नरकडे कुठल्यातरी ट्रेकला जात होतो. यश्टी टोकावडेला अर्धा तास थांबली. (जसा कर्जतचा वडा फेमस तसा टोकावडेचा. वड्याच्या आतही मिरचाच असतात.) चहाच्या टपरीवर चा पीत उभा होतो. चा'वाल्याने कुठलीतरी ओडीओ क्यासेट लावलेली. ती ऐकताना हसायला यायला लागले. त्याला विचारले ही कोणती? "इकडच्या भागात लग्नमंडपात रात्री लोक आराम करतात तेव्हा टाईमपास म्हणून या क्यासेटस लावतात. "
मला पटलं . किती करमणूक होती. मी इतका गुंगलो की एस्टीवाला कंडक्टर ओरडला "येताय का? "

तर हे इंदोरीकरसुद्धा ओडिओ विडिओ करमणूक सम्राट आहेत. अधुनमधून हातवारे, द्या टाळी चाललेले असते. फार सिरियसली घ्यायचं काम नाही. मंडपातली करमणूक, मध्येच डुलकी लागली तरी उत्तम. उगाच आफळे आणि अभ्यंकर बुवांना आठवून उचक्या काढायच्या नाहीत. त्यांचं काम वेगळं यांचं वेगळं.
कस्सं???

कायदा अपडेट करायला हवा! सम विषम तारखेस संबंध ठेऊन भृणाचे लिंग निश्चित करता येते ही अंधश्रद्धा आहे. एखादा ह्यावर विश्वास ठेऊन लिंग निश्चिती कायद्याखाली कारवाई करा म्हणतोय, म्हणजे आरोप करणारा अन करावी करणारा दोघेही अंधश्रद्ध आहेत असा निष्कर्ष निघतोय.

बाकी बुवा महाराज अन हभप लोकांच्या गोष्टींपेक्षा आपल्याला इंदोरीकर महाराज सांगतात त्या गोष्टी पटतात.

उगा बेवडे सासवा सुना वरती वर जी लेक्चरबाजी केलीय, ती उगाच आहे.

बेवड्याला बेवडा म्हणलं तर काय गैर? त्या महाराजांच्या निमित्ताने दारू सोडत तर आहेत लोक्स.

मुळात ते कीर्तनकारा सोबतच समाजप्रबोधनकर जास्त आहे हे लक्षात घ्या
समाजाच्या खुळचट विचार आणि वागणुकीवर ते विनोदी अंगाने प्रबोधन करतात ..
ज्यांनी त्यांना पूर्ण ऐकलं आहे त्यांना लगेच कळेल..
कोणत्याही बुवा आणि महाराजांपेक्षा ते कधीही सरस आहेत..
लोकांना त्यांचे विचार पटतात म्हणून ते एवढे लोकप्रिय आहेत
(हा आता लोक तरीही सुधरत नाही हा भाग वेगळा Happy )

फक्त एका मुद्द्यावरून त्यांना जज करणं म्हणजे उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार आहे .

त्यांना दादा कोंडके स्टाईल किर्तनकार संबोधतात बरेच लोक. स्टॅण्ड अप कॉमेडी सारखं आहे त्यांचं किर्तन. आजकाल टवाळा आवडे विनोद फार या समर्थ उक्ती प्रमाणे जिकडे-तिकडे विनोदवीरांची चलती आहे आणि मागणी नुसार पुरवठा भरपूर आहे. इंदोरीकरांचं किर्तन ऐकून कुणी दारु सोडत असेल असं मला वाटत नाही.
मागे एका किर्तनात बोलले की कोंबडी ही स्वर्गातली नर्तकी होती. शापामुळे ती कोंबडी झाली. कोंबडी विष्ठा खाते आणि माणूस तिला खातो. त्यापेक्षा डायरेक्ट विष्ठा खावी.
असली घाण मुक्ताफळं उधळत असतो हा बाबा. यांना काहीतरी लगाम घातलाच पाहिजे.

ख्रिस्त धर्म गुरु,मुस्लिम मौलवी,आणि बाकी इतर धर्माचे प्रसारक एक दम शास्त्र शुद्ध, ज्ञान त्यांच्या लोकांना देतात .
फक्त हिंदू धर्मातील कीर्तनकार,ग्रंथ,अशास्त्रीय ज्ञान
वाटत असतात असा बऱ्याच अती शहन्या लोकांचा गैर समज आहे.

Indulikar जे बोलले ते इथल्या अती शाहन्या लोकांना चुकीचं वाटत म्हणजे तेवढी बुध्दी ह्यांच्या डोक्यात आहे.
तशी काय योग्य काय अयोग्य हे ठरवण्याची क्षमता बाकी लोकांमध्ये सुद्धा आहे.
फक्त तुम्हीच हुशार आणि ज्ञानी आहात हे डोक्यातून काढून टाका.

जाहिराती ला च विज्ञान समजणारे लोक स्वतःला विज्ञानवादी समजतात .
प्रत्यक्षात विज्ञानाचा आणि ह्यांचा काही संबंध नाही.
टीव्ही वर असंख्य वस्तूंची अशास्त्रीय माहिती चोवीस तास जाहिराती मधून दिली जाते त्या वर हे आक्षेप घेत नाहीत.
पण हिंदू साहित्य मध्ये , कीर्तन मध्ये कस चुकीचं शिकवले जात आहे अशी बोंब मात्र न चुकता दिली जाते .

एक हिंदू धर्मीय माणूस म्हणून माझं प्रथम कर्तव्य आहे की, माझ्या धर्मातील अनिष्ट प्रथा, रुढी, समज नाकारणं. जे कुणी अंधश्रद्धेला खतपाणी घालत असतील त्यांना विरोध करणं. इतर धर्मीय धर्मगुरूंच्या खास बोळ्यानं दूध पिऊ अथवा न पिऊ दे, मला माझ्या धर्माशी घेणं आहे.
राजेश सारख्या मानसिकतेचे लोक अस्पृश्यता, विधवेचे केशवपन अशा प्रथांचं समर्थन करतात कारण त्यांना ही हिंदू धर्माची अंगे आहेत असे वाटते.

कीर्तनामध्ये स्त्रियांविषयी आणि मुलाच्या जन्माबाबत बेजबाबदार वक्तव्य केल्याप्रकरणी निवृत्ती देशमुख महाराज (इंदोरीकर) यांच्याविरुद्ध अंधश्रद्धा निर्मूलन समिती व बुवाबाजी संघर्ष विभागातर्फे पोलिस अधीक्षक आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. त्यांच्यावर पीसीपीएनडीटी कायदाच्या तरतुदीनुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे.
बुवाबाजी संघर्ष विभाग व अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्यवाह ऍड. रंजना पगार-गवांदे यांनी तक्रार अर्जात म्हटले, निवृत्ती देशमुख महाराज यांचे नगर जिल्ह्यात झालेल्या कीर्तनाचा व्हीडिओ मराठी कीर्तन व्हीडिओ या युट्यूब चॅनलवर 4 जानेवारी अपलोड झाला आहे.
टायमिंगनेच आणली ही वेळ

कीर्तनामध्ये त्यांनी पुत्र प्राप्तीचा संदेश दिला आहे. त्यात "स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग जर अशुभ वेळेला झाला तर औलाद रांगडी, बेवडी व खानदान मातीत मिळविणारी होतात.' असे विधान केले आहे. त्यापुढे ही जाऊन "टाईमिंग हुकला की क्वालिटी खराब, असभ्य, बेजबाबदार, कायदा आणि संविधान विरोधी वक्तव्ये केली आहेत.
समानतेची परंपरा

वारकरी धर्मात लहान थोर, स्त्री, पुरूष असा भेदभाव केला जात नाही. समानतेची माऊली म्हणून आदराने उल्लेख करायची परंपरा आहे. कीर्तन हे समाजात प्रबोधन व जागृती करण्यासाठी असते. महाराज चुकीची अवैज्ञानिक, अंधश्रद्धा पसरविणाऱ्या गोष्टी सांगतात. मूल कसे होते याचे शरीर विज्ञान आहे.
भेदाभेद अमंगळ

जात, धर्म, वंश, प्रांत, लिंगानुसार समाजात भेदभाव करता येत नाही. त्यांनी तो लिंग भेदभाव केला आहे. सर्व भारतीय नागरिकांना वैज्ञानिक दृष्टिकोन प्रचार, प्रसार, अंगिकार करायचे कर्तव्य संविधानाने सांगितले ते महाराजाने केलेले नाही.
ते संविधानाचा प्रचार करतात

संतांनी समाजातील अनिष्ट, अघोरी प्रथा-परंपराविरोधात काम केले आहे. सध्या अनेक कीर्तनकार आपल्या कीर्तनातून संविधानाचा प्रचार आणि प्रसार करीत आहेत, हे अभिनंदनीय आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्रातील संत-समाज सुधारकांचा पुरोगामी वारसा पुढे चालविण्याचे काम करते.
बेजबाबदारपणा

आम्ही महाराजांच्या या अशास्त्रीय वक्तव्यांचा धिक्कार करतो. मूल जन्माबाबत बेजबाबदार वक्तव्य केल्याप्रकरणी निवृत्ती देशमुख महाराज (इंदोरीकर) यांच्याविरुद्ध (पीसीपीएनडीटी) पूर्व गर्भधारणा आणि प्रसूतीपूर्व निदान कायद्यानव्ये तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अर्जात करण्यात आली आहे.

महाराज, मग जुळी कशी जन्मतात...
इंदोरीकर महाराजांना आमचा जाहीर प्रश्‍न, त्यांनी जुळी मुले कशी होतात? याचा दिवस, तारीख सम की विषम ही सांगावी. जुळ्या मुलांत काही वेळा मुलगा-मुलगी होऊ शकते हे का होते? याचेही स्पष्टीकरण त्यांनी द्यावे, असे आवाहन समितीने केले आहे.

एक गम्मत म्हणूनच आहे ते. मजा घ्यायची.
Submitted by Srd on 17 February, 2020 - 10:00
>> चलता है ही विचारसरणी अशा लोकांना समाजाच्या डोक्यावर बसवते.

तीस- पस्तीस वर्षांपूर्वी 'लूनार चायनीज कॅलेंडरने' धुमाकूळ घातला होता. कुठल्यातरी इंग्रजी मासिकात प्रकाशित झाले होते, लोकं त्याच्या झेरॉक्स काढून मित्रमंडळींना वाटत असत. त्या मासिकावर काही कारवाई झाली की नाही माहीत नाही.

हो गम्मत म्हणून बघा. पण मग गम्मत करणाऱ्याला कीर्तनकार का म्हणावे? कॉमेडीयन म्हणा. आणि मग कॉमेडीच हवी असेल तर असली सुमार दर्जाची तरी का पहायची? चांगले कॉमेडीयन कितीतरी आहेत. हो कॉमेडीयन सुद्धा प्रबोधन करतात. जॉर्ज कार्लीन होऊन गेला. अजून उदाहरणे असतील. मराठीत प्रबोधन म्हटल्यावर बाळासाहेबांचे वडील आठवतात. अख्खा महाराष्ट्र प्रबोधन करत पालथा घातला त्यांनी. उगाच गर्दी जमवायची नी प्रसिद्धी मिळवायची म्हणून चाळे नाही केले. अपार आदर आहे त्यांच्या विषयी. हात आपोआप जोडले जातात. उगाच कुणालाही "लोकांचे प्रबोधन करतात" वगैरे म्हणून खरे प्रबोधन ज्यांनी केले त्यांचा पाणउतारा करू नका. अन्यथा ह्याच न्यायाने दादा कोंडके सुद्धा थोर कीर्तनकार व प्रबोधनकार होऊन गेले म्हणावे लागेल.

वरती कुणीतरी बाबा महाराजांचा "महान कीर्तनकार" म्हणून उल्लेख केलाय ते वाचून अंमळ मौज वाटली. हे असे असते बघा. खरे तर बाबा महाराजांपासून कीर्तनाला उतरती कळा सुरु झाली. कारण कीर्तनाचे व्यवसायीकरण करण्याचे "पुण्यकर्म" बाबा महाराजांनी केले. अत्यंत बाजारू कीर्तनकार. ज्ञानेश्वरीवर कीर्तन करायला लाखात मानधन घ्यायचे म्हणे. सीडी कि कॅसेट काढल्या होत्या. त्यात त्या काळात पन्नास लाख वगैरे रुपये कमवून गब्बर झाले अशा बातम्या होत्या. याबाबत त्यांच्यावर त्याकाळात खूप टीकासुद्धा झाली होती. मग आता एकदा व्यवसाय झालाच आहे तर आत्ताचे हे बाबा वेगळे काय करत आहेत? काहीतरी करून गर्दी जमवून व्यवसाय जोमात करत आहेत. त्याच दिशेने अजून चार पावले पुढे गेलेत. त्यांची तरी काय चूक? आज बाबा महाराज थोर झाले. उद्या निवृत्तीराव पण थोर होतील.

जुळी मुले कशी होतात? याचा दिवस, तारीख सम की विषम ही सांगावी. जुळ्या मुलांत काही वेळा मुलगा-मुलगी होऊ शकते हे का होते? याचेही स्पष्टीकरण त्यांनी द्यावे, असे आवाहन समितीने केले आहे.
Submitted by आर्यन वाळुंज on 17 February, 2020 - 20:36

सम विषम तारखेच्या बॉर्डरवर ठीक रात्री बारा वाजता..

वर्षात एकूण तीनशे पासष्ट / सहासष्ट दिवस

त्यापैकी
३१ दिवस असलेले ७ महिने
३० दिवस असलेले ४ महिने
२९ / २८ दिवस असलेला एक महिना

एकूणातच विषम तारखा ७ किंवा ८ ने जास्त.. त्यामुळे मुलींची संख्या जास्त व्हायला हवी. अर्थात हे झाले इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे. भारतीय तिथीनुसार महिना २९ किंवा ३० दिवसांचा त्यातही तारीख कृ.१४ किवा शु.१४ अशी लिहिलेली आढळते. मग महिन्यातल्या दुसर्‍या पंधरवड्यातील तारखा १६ पासून पुढे मोजायच्या की पुन्हा १ पासून सुरुवात करायची? इथे सम विषमचा अगदी बेसिकमध्येच लोचा...

पुन्हा प्रत्येक महिलेचा मासिक धर्म संपल्यापासून कितवा दिवस आहे त्याप्रमाणे मोजायचे किंवा कसे याबद्दलही काही विवेचन नाही.

महाराजांनी कुठलंही शास्त्र वगैरे निकष लावलेले नाहीत हे उघड आहे. ऐनवेळी काहीतरी ठोकून दिलं आहे. कीर्तनाचे यूट्यूब हिट्स वाढवायची खेळी आहे.

थोर होतील नव्हे थोर झाले आहेत.
बाबा महाराज यांच्या विषयी माहिती नवीन आहे. निम्मे वारकरी वारीत परान्न घेत असावेत असे वाटते.

इंदोरीकर महाराज हे माझ्याच समाजाचे आहेत. इंदोरीकर हे सिलेब्रेटी किर्तनकार का झाले तर समाजातील धनदांडगे मी महाराजांचं किर्तन ठेवू शकतो हे दाखवण्यासाठी म्हणजेच माझी ऐपत आहे हे गावातील इतरांना दाखवून देण्यासाठी किर्तन ठेवतात. दशक्रिया, श्राध्दं हे जणू शक्तीप्रदर्शनासाठी लोकं जमवण्यासारखं लोकांनी केले आहे. विनोदी किर्तन ऐकण्यासाठी हजारो लोक जमतात व आयोजन करणाराला वाटते इतके लोक माझ्या प्रेमापोटी आले.

लोकांना त्यांचे विचार पटतात म्हणून ते एवढे लोकप्रिय आहेत
(हा आता लोक तरीही सुधरत नाही हा भाग वेगळा )
>> विचार पटत वगैरे काही नाही. महाराज जे बेवड्यांना, सूना सासवांना, औलादींना नावं ठेवतात ते दुसरं कुणाला म्हणतात, मला नाही असे किर्तन ऐकणाऱ्या जनतेचा समज असतो. मी सुधारलेलाच/ लीच आहे हा इथल्या ( माबोवरील सुध्दा) प्रत्येकाचा ठाम विश्वास आहे.

हातात माईक आला, बोललं काहीही की गर्दी जमतेय म्हटल्यावर त्याचं व्यसनच लागत असावे. गर्दी वाढतेय ना -
वाढव टारगटपणा. हे फक्त कीर्तनकारांनाच लागू नसते.
------
ते दुसरे बाबामहाराज म्हणजे लोहगडावरून एक खाली दुधिवरे गावात देऊळ दिसते ते बांधणारे का?

पुणे: 'महाराष्ट्राला कीर्तन, प्रवचनाची मोठी परंपरा आहे. त्यात इंदुरीकरांचं कीर्तन बसत नाही. त्यांचे विनोदही कमी दर्जाचे असतात. खरंतर त्यांच्या कीर्तनावर यापूर्वीच चर्चा व्हायला हवी होती,' असं परखड मत संत तुकाराम महाराजांचे वंशज व संतसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी मांडलं आहे.
'सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा होतो, तर विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते,' असं वक्तव्य इंदुरीकर महाराजांनी ओझर येथे झालेल्या एका कीर्तनात केलं होतं. त्यावरून महाराष्ट्रात वादाचं मोहोळ उठलं आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीसह काही महिला संघटनांनी इंदुरीकरांविरुद्ध पोलिसांत तक्रार करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यांच्यावर टीकाही होत आहे. दुसरीकडं काही संघटना त्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरल्या आहेत. अनेक राजकीय पक्षांनीही त्यांना पाठिंबा दिला आहे. या पार्श्वभूमीवर सदानंद मोरे यांनी आपलं मत मांडलं आहे.
वाचा: आंदोलनं, मोर्चे नको; इंदुरीकरांचं चाहत्यांना शांततेचं आवाहन

'मी गेले ५०-५५ वर्षे कीर्तन ऐकतो आहे. मामासाहेब दांडेकर व त्यांच्याही आधीच्या कीर्तनकारांची कीर्तनं मी ऐकली आहेत. पण अशा प्रकारचे विनोद पूर्वी कोणाच्याही कीर्तनात नव्हते. ही लाट अलीकडेच आली आहे. हल्ली लोकप्रिय कीर्तनकारांच्या नावामागे विनोदमूर्ती किंवा विनोदाचार्य असं लिहितात. विनोदाचार्य हे काही कीर्तनकाराचं विशेषण नाही,' असं मोरे म्हणाले.

या वादात आता एक आयुर्वेदाचार्य वैद्य श्री शिवरत्न शेटे यांनी उडी घेतली आहे आणि त्यांनी काही आयुर्वेदिक ग्रंथात( यात सुश्रुत संहिता पण येते) असे सम दिवशी संबंध केले तर मुलगा होतो आणि विषम दिवशी संबंध केला तर मुलगी होते असे लिहिलेले आहे असे सांगितले आहे. https://www.facebook.com/179725075270/posts/10163310336675271/
पाहू या गम्मत

एवढा आकडतांडव करण्यासारखे इंदोरीकर काही बोलले नाहीत.
इंदोरिकर तुम्ही तुमचे कार्य पुढे चालू ठेवा.
जनता तुमच्या पाठीमागे आहे.

Pages