गिधाडे कुणी खाल्ली? गिधाडे नामशेष होत आहेत! (फासेपारधी)

Submitted by Dr Raju Kasambe on 29 January, 2020 - 10:35

गिधाडे कुणी खाल्ली? गिधाडे नामशेष होत आहेत!

‘देवा खोटं नाही सांगत. गेल्या दहा वर्षात एकबी गिधाड पाह्यलं नाही. गावाकडे दुष्काळ पडत होता तेव्हा देव आमच्यासाठी आकाशातून गिधाडं पाठवत होता. माहे सगळे लेकरं गिधाडायचं मटण खाऊनशान वाचले. दुसरं कायचं मटण त्यायले आवडतच नव्हतं’.

85 वर्षांचा पारधी भुरा सोनावजी सोळंकी शपथेवर सांगत होता. माझ्याकडच्या पुस्तकातील गिधाडांची चित्रे बघुन त्याचे डोळे पाणावले होते. कंठ रुद्ध झाला होता.

‘आम्ही गिधाडं पोसले होते अन पोसलेल्या गिधाडायला आमी देवच मानत होतो. हळदकुंकू लावून त्यांची पूजा करत होतो. पण पोसलेली गिधाडे आम्ही खाल्ली नाही. त्याहिले आकाशात सोडून दिलं साहेब. खोटं नाही सांगत’.

मी यवतमाळ - अकोला मार्गावरील अडाण नदीच्या काठावर वसलेल्या सांगवी गावातील पारधी वस्तीवर बसलो होतो. सांगवी गावापलीकडे वाशिम जिल्हा सुरू होतो. या गावाला अजूनही ‘शकुंतला एक्सप्रेस’ नावाची तीन डब्याची आगगाडी येते. गाडीने कोळशावरून डिझेलवर मजल मारली पण सांगवी अजूनही कोळशाच्या इंजिनच्या युगात जगत आहे असे मला वाटले. एखाद्या त्रयस्थाला गावातील पारधी वस्तीवरचे सदानकदा भांडत असलेले पुरुष बायकापोरं दिसून पडतात. त्यांचे दारिद्र्य दिसून पडते.

दुर्मिळ होत चाललेल्या गिधाडांची माहिती जमविण्यासाठी मी येथे आलो होतो. भुरा सोळंके सांगत होता. त्याचा मुलगा श्रीकृष्णा सोळंके आणखी माहिती पुरवीत होता. आणि माझ्यासमोर गिधाडांची संख्या कमी का झाली असावी याचे आणखी एक महत्त्वाचे कारण उलगडले गेले. (माझ्या डोळ्यासमोर त्यावेळेस काय घडले असेल तो चित्रपटच जणू उलगडू लागला. फ्लॅशबॅक असतो ना तसा)!

वर्ष १९८१. वीस वर्षांपूर्वीचे सांगवी गाव. भल्या पहाटे भुरा सोळंकी आपले फासे पाठीवर टाकून झपझप पावले टाकीत निघाला. कारण उन्हं तापायाच्या आधी त्याला बेड्यावर घरी परतायचे होते. सोबत उमदा कीसन्या म्हणजे श्रीकृष्णा होताच. यावर्षी पाऊस कमी पडल्यामुळे जिल्ह्यात चिल्ल्यापाल्यांचे हाल होणार याची त्यांना जाण होतीच.

बटेर, तितरे फास्यात फसवणे तर भुराच्या हातचा मळ होता. लावळू (रेन क्वेल), घागरबाटी (ग्रे क्वेल) आणि घाशी टुरु (कॉमन बस्टार्ड क्वेल) तर तो एका दिवसात खंडीभर फसवायचा. कारण त्याला नरग्याच्या आवाजाला मादीचा आवाज काढून उत्तर देता येत होते. त्यामुळे नर आकर्षित होऊन सरळ फास्यात फसत असत. पोरंसोरं त्याच्या आवाजाची नक्कल करीत. पण त्यांना ते साधत नसे.

गेल्या चार-पाच दिवसांपासून घरी खुंटीला दोरीने बांधून ठेवलेली गिधाडे उपाशी होती. पोरांसोरांना खायला ज्वारी शिजवून केलेल्या कण्या म्हणजे खिचडी आणि तितरा बाटराची एखादी फोड मिळत होती. मुले रोडावत होती. पालावरची भांडणे कमी झाली होती. म्हातारी माणसे हातभट्टीची घेऊन दिवसभर पडून राहत. बायका आजूबाजूच्या खेड्यात सुया, मणी, माळा, पिना इत्यादी बायकांचे साहित्य विकून दोन-चार दमड्या कमवीत.
संध्याकाळ झाली. म्हातारे-कोतारे मधोमध बसून बारक्या पोरांना जंगलाच्या आणि भुताटकीच्या गोष्टी सांगू लागली. हळूहळू चंद्र वर चढत गेला. मुले पेंगायला लागली. पाल शांत होत गेले. अर्धपोटी सर्वजण झोपी गेले.

भल्या पहाटे गावातला वाघ्या मांग भुरा पारध्याला भेटायला आला. गावातले ढोर मेलेय. ज्याचा बैल मेला त्याने जशी वाघ्याला वर्दी दिली तशी वाघ्याने भुराला वर्दी दिली. सगळ्या पालावर उत्साहाचे वातावरण संचारले. आज आपल्याला पोटभर मटन खायला मिळणार. थोड्याच वेळात वाघ्या मांग मेलेल्या बैलाला मालकाच्या गाडीत टाकून टेकडीच्या पायथ्याशी घेऊन गेला. त्याच्या मागोमाग पारध्यांची पोरंसोरं गोंगाट करीत चालत गेली. वाघ्याचा चाकू टराटरा फिरला. त्याने बैलाचे कातडे सोलून काढले. कातडे बरोबर गुंडाळून एका पोत्यात कोंबले आणि वाघ्या टांगा टाकीत घराकडे निघून गेला. त्याचे कातडी काढण्याचे कसब शेंबडी पोरं पहात राहिली.

कावळे त्या बैलाच्या मांसाचा वाटा उचलण्यासाठी कधीचेच येऊन टपले होते. गोंगाट करीत होते. जसा वाघ्या मागे सरला तसे कावळ्यांनी बैलाचे लचके तोडणे सुरू केले. गावातली मोकाट कुत्री ही जमली. पण पारध्याच्या पोरांनी त्यांना दगड भिरकावून दूरच ठेवले.

भुरा सोळंके, श्रीकृष्णा, सिलीमन, रामदास, आपरेशन ही मंडळी खुंट्याला बांधलेली गिधाडे खांद्यावर घेऊन बैलाजवळ पोहोचली. त्यांनी सोबत फासेसुद्धा आणले होते. बारीक सुतळीने त्यांनी त्या गिधाडांचे पंख बांधून टाकले. आता त्या गिधाडांना बेडकासारख्या केवळ टुणुक टुणुक उड्या मारता येत होत्या. पण उडता मात्र येत नव्हते. मेलेल्या बैलाजवळ येताच त्यांनी पंख बांधलेली पाच गिधाडे सोडून दिली. उपाशी गिधाडे बैलावर तुटून पडली आणि मांसाचे लचके तोडू लागली. भुरा सर्वांना सूचना देऊ लागला. सिलीमन, रामदास, श्रीकृष्णा सर्व जण पटापट कामी लागले.
बैलापासून थोड्या अंतरावर टेकडीच्या बाजूने सर्व फासे त्यांनी अंथरले आणि झुडपांना बांधून टाकले. फासे लावून होताच सर्वजण मागे सरकून झुडूपाच्या आडोशाला लपले. सूर्य हळूहळू वर सरकू लागला. भुरा पारधी आणि त्याचे सवंगडी आकाशात नजर लावून बसले. भुरा मनोमन देवाला साकडे घालत होता,

‘देवा आम्हाला उपाशी ठेवू नगस. खायला काहीतरी पाठव.’

सूर्य डोक्यावर येऊ लागला असे एक शेंबडं पोर आकाशाकडे बोट दाखवून ओरडलं,

‘रात्तल’!

आणि सर्वांचे चेहरे प्रफुल्लीत झाले. भुराची प्रार्थना सफल होत होती. रात्तल म्हणजे राजगिधाड (किंग व्हल्चर). मृत जनावरांचा शोध सर्वप्रथम रात्तललाच लागतो. इतर गिधाडे रात्तलवर लक्ष ठेवून असतात. रात्तल कुठे घिरट्या घालीत उतरतोय म्हणजेच खाद्य असणारच हे त्यांना समजते. आणि ती गिधाडेही खाली तरंगत खाली उतरायला लागतात.

ठिपक्या सारखे दिसणारे रात्तल बघता बघता खाली येऊन घिरट्या घालू लागले आणि वर आकाशात शेकडो ठिपके घिरट्या घालताना दिसू लागले. सर्वप्रथम रात्तल जमिनीवर उतरले. थोड्याच वेळात पन्नास-साठ गिधाडे बैलाजवळ उतरली आणि मांसासाठी भांडाभांडी करू लागली. लांब माना बैलाच्या पोटात घालून आतले मऊ मांस लिचू लागली. मोठी चोच पटापट खाण्याच्या कामी येऊ लागली.
चोची रक्ताने भिजून गेल्या. आधीच कुरूप असलेली गिधाडे आता क्रूर आणि रक्तपिपासू भासू लागली.

भुरा पोरांना बोटाने गिधाडे दाखवीत होता. सर्वात छोटे आणि पांढऱ्या रंगाचे ते लिंडा जातीचे (इजिप्शियन व्हल्चर). काळी मान, काळे पंख आणि पांढरी पाठ ते ‘गरद’ (व्हाईट रम्प्ड व्हल्चर); पांढरट मान तपकिरी पंख आणि मानेभोवती पिसे आहेत ते आहे पांढरे किंवा ‘धोलियो’ आणि सर्वात आधी उतरले ते लाल मानेचे आहे ना, ते आहे रात्तल, गिधाडांचा राजा (किंग व्हल्चर)!

गिधाडांचे पोट भरत आले असेल तेवढ्यात भुरा आणि सिलीमन हातात पांढरे गमचे उंचावून बैलाकडे जाऊ लागले. मांस खाऊन शरीर वजनी झालेली गिधाडे टुनुक टुनुक उड्या मारीत पलीकडे पळू लागली. पलीकडे जमीनवर लावून ठेवलेल्या फास्यात ती अडकू लागली. अडकलेली गिधाडे धडपडू लागली. भुरा आणि सिलीमन पुन्हा मागे सरले. थोड्या वेळाने त्यांनी गमच्या दाखवून गिधाडांना दचकवले. गिधाडे पळायला लागली की फास्यात अडकत. असे चार-पाच वेळा करून झाल्यावर प्रत्येक फास्यात एक गिधाड अडकून पडलेले होते. भुराने आवाज देताच सर्व पोरंसोरं फास्यात पडलेल्या गिधाडांना पटापट उचलू लागली. एकूण बावीस गिधाडे अडकली होती, त्यात घरचीच पाळलेली पाच होती.

‘लिंडा’ चे मटन कमी पडणार होते तर रात्तल, गरड आणि धोलियो चे प्रत्येकी साडेतीन ते चार किलो मटन पडणार होते. पालावर सर्वजण आजची शिकार घेऊन पोहोचताच बायका म्हातारे आनंदित झाले. परमेश्वराने भुराची प्रार्थना ऐकली होती. पालावरची मुले पुढची आठ दिवस तरी उपाशी राहणार नव्हती! फक्त ज्वारीची तेवढी सोय करायची होती.

सुन्न मनाने मी भुरा आणि श्रीकृष्णाचा निरोप घेतला. बसमध्ये बसल्यावर मी विचारमग्न झालो. अमरावती, अकोला, यवतमाळ व वाशिम या केवळ चार जिल्ह्यातील एकूण शंभर एक पालावरील हजारो पारध्यांनी दहा वर्षात किती गिधाडे मारून खाल्ली असतील? आणि भरीस भर म्हणजे गिधाडांची एक जोडी दर वर्षी केवळ एकच अंडे घालते. म्हणजे प्रजननाचा दरही अल्प असतो. 1992 नंतर गिधाडे झपाट्याने कमी झाली आणि आज मृत जनावरांना खाऊन निसर्ग स्वच्छ ठेवणारी गिधाडे दुर्मिळच नव्हे तर नष्टप्राय होऊन बसले आहेत!

(टिप: सर्व नावे, स्थळे काल्पनिक आहेत).

डॉ. राजू कसंबे, मुंबई

पूर्वप्रसिद्धी: दैनिक लोकमत, मंथन पुरवणी. दि.१७ मार्च २००२.

Group content visibility: 
Use group defaults

साधना,
गिधाडे Diclofenac नावाचे औषध मृत गुरांद्वारा त्यांच्या शरीरात गेल्यामुळे मरतात. त्यामुळे गिधाडे कमी झाली याबद्दल अजिबात दुमत नाही. इतरांनीनही तशा कमेंट्स टाकल्या आहेत.
पारध्यानी गिधाडे खाल्ली हे "आणखी" एक कारण आहे. छोटे का असेना.
धन्यवाद!

चांगला लेख. माहितीपूर्ण.

<<< आता गिधाडांची स्थिती काय आहे मग...
खरेच नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत? >>>

विकीपिडियाच्या माहितीनुसार Critically endangered (CR) आहे.

लेख वाचून मन सुन्न झाले
तरीही पारध्यांनी गिधाडे खाऊन संपवली हे कारण पटत नाही
डायक्लोफिनाक चा वापर याशिवाय अन्नाचा तुटवडा आणि अधिवासाचा ऱ्हास ही कारणेही असू शकतात
कोकणात भाऊ काटदरे यांनी याविषयी बरेच संवर्धन कार्य केले आहे

गिधाडे पुनर्जन्म घेऊन मनुष्य रुपात आली. म्हणून त्यांची संख्या कमी झाली. डायक्लोफेनिअॅक च्या वापरामुळे गिधाडे मेली तर कावळे का मेले नाहीत? तेही पक्षीच आहेत नि मेलेल्या प्राण्यांचे मांस खातात.

>> डायक्लोफेनिअॅक च्या वापरामुळे गिधाडे मेली तर कावळे का मेले नाहीत? तेही पक्षीच आहेत नि मेलेल्या प्राण्यांचे मांस खातात.

Good question. कावळ्यांवर त्याचा परिणाम होत नाही असे संशोधनात आढळून आले आहे. गुगलवर insensitivity of the crow to diclofenac toxicity हे वाक्य शोधून पहा.

ओके!

छान माहिती.
अभ्यासासाठी दाद.

दोन्ही गोष्टी सुन्न करणाऱ्या. कदाचित आपल्या आवाक्यात नसलेल्या solution मुळे मन जास्त विषण्ण होते.

पारशी लोकांचा अंत्यविधी असा विहिरीत सोडून होतो हे माहित नव्हतं. भयंकर वाटलं वाचताना. त्यांच्या धर्मात गिधाडाला देवदूत मानतात असंही ऐकलं आहे.

Pages