वृक्षपरीचे दर्शन

Submitted by Dr Raju Kasambe on 7 January, 2020 - 09:38

वृक्षपरीचे दर्शन

कर्नाटक राज्यातील उत्तरकन्नडा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कुशीतील जंगलात भटकायचा योग चालून आला होता. ह्या सदाहरित घनदाट जंगलातून काली नदी वाहते. नदीवर मोठे धरण सुद्धा बांधले आहे. हे जंगल अतिशय समृद्ध असून पश्चिम घाटात असलेली मुबलक जैवविविधता येथे बघायला मिळते. वाघ, बिबट, हत्ती, महाधनेश तसेच किंग कोब्राचा इथे अधिवास आहे.

पक्ष्यांचे सर्वेक्षण करण्याचे निमित्त होते. एका ठराविक ठिकाणी आम्हाला सोडून बस निघून गेली. आम्ही पक्ष्यांच्या नोंदी घेत चालायला सुरुवात केली. आडवळणाचा रस्ता घेऊन पाऊलवाट पकडली. ती वाट काही भातशेतातून जात होती. भातशेतापलीकडे छान जंगल दिसत होते. सकाळचे कोवळे उन्हं पडले होते. भातशेताच्या दुसर्‍या टोकाला काहीतरी पांढरे शुभ्र उडताना दिसले. दुर्बिणीमधून बघितले तर पांढरे पंख असलेल्या दोन इवल्या पर्‍या जमिनीपासून तीन चार फुटांवर हवेत तरंगत गिरक्या घेत होत्या. शेतात वाढलेले हिरवेकंच धान, पलीकडे तसेच जंगल आणि वरून पडलेला स्वच्छ सूर्यप्रकाश. त्यात त्या पर्‍या आणखीनच उठून दिसत होत्या. मी माझी पाऊलवाट सोडून तिकडे वळलो. पण बांधावरून चालता येईना. म्हणून तेथूनच जशी जमतील तशी छायाचित्रे टिपून घेतली. जंगलात अनाकलनीय गोष्टी दिसल्या तर त्यांच्या मागे धावू नये असे म्हणतात. पण माझ्यासारख्या वेड्याला तसेच करायची हौस असते. अर्थात त्यामुळे कधीकधी फजिती होते. नंतर तीच गोष्ट आठवून गम्मत सुद्धा वाटते!

सोबतच्या मित्राला विचारले. तर त्याने जंगलात परत त्या पर्‍या दिसतील म्हणून आश्वस्त केले. तेव्हा कुठे मी धीर धरून पाऊलवाटेवर चालू लागलो. झालेही तसेच घनदाट जंगलात एका ओढ्याकाठी सर्वजण विश्रांतिसाठी थांबले होते. तेथे चिखलात खूप सारी फुलपाखरे बसत होती. फुलपाखरे त्यांना आवश्यक असलेली अनेक खनिजे चिखलातून मिळवतात असे वाचले होते. त्यांची छायाचित्रे काढून बूड टेकवले तर एका अनोळखी पक्ष्याचा आवाज आला.

त्या आवाजाचा पिच्छा पुरवीत मी थोडा पलीकडे दाट झाडीत गेलो. अनेक वर्षांपूर्वी येथे कुणीतरी सुपारीची झाडे लावलेली होती. पण आता त्याभोवती दाट घाणेरी सारख्या रानटी झुडुपांनी गर्दी केलेली होती आणि तेही जंगलच झाले होते. त्या झाडीत मी कधी शिरलो मला कळले सुद्धा नाही.

आपण जरी संपूर्ण कॅमोफ्लाज कपडे घातले असले तरी वन्यजीवांना आपल्या हालचालीचा सुगावा लागतोच. माझा शोध पक्षी कधी उडून गेला ते समजले सुद्धा नाही. हताश होऊन सुपारीच्या पानांमधून येणारी प्रकाशाची तिरीप बघायला मान वळवली. त्या पानांमधूनच एक छोटीशी पांढरे शुभ्र पंख असलेली परी तरंगत खाली उतरताना दिसली. तिच्या पांढर्‍या पंखांवर अगदी चितारल्यासारखे काळे ठिपके होते. माझे मन हरखून गेले. सुदैवाने ती एका घाणेरीच्या पुष्पगुच्छावर स्थिरावली. तिने हळूच आपली सोंडेची गुंडाळी उघडून फुलात टाकली व त्यातील मध शोषून घ्यायला सुरुवात केली. मी जाग्यावरच थिजलो होतो.

फुलपाखरांना कान नसतात. पण त्यांचे डोळे मात्र हजारो नेत्रकांपासून बनलेले असतात. त्यामुळे त्यांना थोडीसुद्धा हालचाल पटकन दिसते. मी हळूच कॅमेरा उंचावला. मनसोक्त छायाचित्रे घेतली. आता मात्र मला त्या परीला स्पर्श करण्याचा मोह झाला. मी स्लो मोशन सारखे पुढे पुढे सरकत गेलो. तोपर्यंत मला चांगलाच घाम फुटला. आपण किंग कोब्राच्या जंगलात आहोत हे सुधा विसरून गेलो. ती मात्र मध चाखण्यात गुंग झाली होती. मी माझा हात लांबवून तिच्या पंखांना तर्जनीने हळूच स्पर्श केला. तसे तिचे पंख थरथरले. तिने कागदासारखे पंख हळुवार फडफडवले. तरंगत ती गर्द झाडीत दिसेनाशी झाली.

सहकार्‍यांच्या जोरजोरात हाका ऐकून मी भानावर आलो. जंगलात ही मंडळी का ओरडतायत म्हणून मी पण मनातून चिडलोच होतो. अशा आवाजाने सगळे पक्षी दूर उडून जातात. गर्द झुडूपातून बाहेर पडताना मला घाणेरीने चांगलेच ओरबाडले. मी दिसताच सर्वांनी हुश्श केले. सर्वजण मलाच शोधत होते. त्यांनी सांगितले की गेल्या अर्ध्या तासापासून मी त्यांना दिसलो नव्हतो. आदिवासींनी त्यांना त्या परिसरात किंग कोब्राचा वावर असल्याचे सांगितले होते.

मलबार ट्री निंफ नावाच्या ह्या नाजुक फुलपाखराला ‘ट्री निंफ’ अर्थात वृक्षपरी हे नाव इंग्रजांनी का दिले हे मला समजाऊन सांगायची आवश्यकता नव्हती. ते मला समजले होते. आज मी तिला प्रत्यक्ष स्पर्श केला होता. धडकी भरविणार्‍या किंगच्या जंगलात स्वप्नवत वृक्षपरी सुद्धा राहते हे मला अनुभवायला मिळाले!!

डॉ. राजू कसंबे

Malabar_Tree_Nymph_Idea_malabarica_by_Dr_Raju_Kasambe.jpg

Group content visibility: 
Use group defaults