एकटीच @ North-East India दिवस ३

Submitted by सुप्रिया राज जोशी on 31 December, 2019 - 01:24

अनुक्रमाणिका > https://www.maayboli.com/node/72984

8th फेब्रुवारी 2019

प्रिय राहुल,

कलकत्त्याला उतरल्यावर जिकडे तिकडे गर्दीचगर्दी पाहून थोडसं हरवून गेल्यासारखं झालं. इंटरनेट मिळाल्या मिळाल्या थोडी शोधाशोध करून चार च्या दरम्यान एअरपोर्ट वरून बागडोगरा साठी जे फ्लाईट असत ते पकडायचं असं ठरवलं. तोपर्यंत क्लोक रुम मध्ये समान सोडून कलकत्ता फिरून यावे का? पण अनोळखी शहर आहे. वेळेचा अंदाज चुकला तर विमानही चुकायचे. कलकत्ता एअरपोर्ट तर अवाढव्य आहे. तिथेही सहज टाईमपास होईल. पण थोडा विचार करून मगच काय तो निर्णय घ्यावा असे मी ठरवले आणि रेल्वे स्टेशनच्या वेटिंग रूममध्ये जाऊन बसले. तिथे दोन interesting पाट्या दिसल्या. त्या वाचल्यावर मी बाकीचे सारे बेत रद्द करून तिथेच चिकटून रहायचे असे ठरवले.

51944589_10156852953737778_1111045019420065792_n.jpg

पहिली पाटी फ्री WiFi बद्दलची होती. ज्यामुळे माझं पत्र पोस्ट होऊ शकत होते आणि दुसरी पाटी पुरुषांना 5 रुपयांत अंघोळ करता येईल अशी होती. पुरुष काय नि स्त्री काय, स्वच्छ भारत अभियान तर सर्व नागरिकांना लागू आहे. चौकशी करून 'पाच रुपयात स्त्रियांसाठी' शोधून काढले. तिथची बया मोठी तिखट होती. तिने वरच्या कमाईचे माझ्याकडे 10 रुपये मागितले, मग मी ही एकेक पैसा वसूल करायचा असेच ठरवले. त्याच हट्टापायी प्रातर्विधी, अंघोळ हे तर आटपलेच पण अंघोळ कशी तर डोक्यावरून केली, शिवाय ट्रेन च्या प्रवासात पार मळून गेलेले कपडेही धुऊन काढले आणि कलकत्त्याच्या कडक उन्हात वाळत घातले.

मी थंडगार पाण्याने स्वच्छ झाले. जवळचे लोशन लिपस्टिक वगैरे चोपडून सुंदरही झाले. केस विंचरायचा कंगवा मात्र सापडेना. आता तुला तर माझ्या केसांबद्दल वेगळ्याने सांगायला नकोच. म्हणजे हे रूप फक्त थोडाच वेळ रहाणार एकदा का केस सुकले, नि फुलले की माझी सुंदरता ओसरून पुन्हा मी जंगली प्राण्यासारखी दिसणार पण असो. तरी मला तात्पुरते एकदम माणसात आल्यासारखे वाटू लागले. मग मी तुला पत्र लिहायला घेतले.

पत्रास कारण की, तू जे लिहिलंस ना की तुझ्याबरोबर ट्रिप जगायचा प्रयत्न करतोय, ते वाचल्यावर मलाही असचं वाटलं की आपण एकटे नाहीच आहोत. पत्र वाचून तुम्ही सारे जे उत्तर लिहिताय ते माझ्या सोबतीला आहात! ते फिलिंग भारी वाटलं.

दोन वाजत आले तरी भानच नाही, भूक सुद्धा कशी लागली नाही?

एअरपोर्ट ला जायची बस गाठायला रेल्वेस्टेशन पासून दहा एक मिनिटे चालावे लागते. ट्राफिक असेल नसेल तरी बस एक-दीड तास घेईल. तीन पंचवीस चा बोर्डिंग टाइम! ह्या भानावर आले तसे फटफट सुकलेले कपडे अंगावर परत चढवलें नि बॅग पाठीवर टाकून अक्षरशः पळत सुटले. माझ्या लागलेल्या धक्यांमुळे दिनांक 8 फेब्रुवारीला कलकत्त्यातील कित्येक पुरुषांनी फेसबुकवर स्वतः ला #me_too tag केले असेल. त्यात रेल्वे कामगार, प्रवासी, फळभाजी विकणारे, रस्त्यावरचे जनरल पब्लिक सारे आले. मी एकेकाला सॉरी म्हणायचे फक्त मी पळत पुढे गेल्याने त्यांना ते ऐकू यायचे नाही.

एअरपोर्ट ची बस एअरपोर्टपासून दहा मिनिटांवर सोडते. मग तिथून पुन्हा धावत निघाले. ट्रॉली चालवताना ही एअरपोर्ट च्या प्रॉपर्टी वर कितीदा बँग केले असेल? शेवटचा धक्का दिला तेव्हा ट्रॉली ने सेक्युरिटी गार्ड लाच ठोकले होते. तो मला बाहेर निघ अशा अर्थाचे हातवारे करित ओरडू लागला, काही सेकंदाने कळले तो म्हणत होता ट्रॉली बाहेर ठेव. मी सुसाट ट्रॉली चालवत थेट सेक्युरिटी चेक च्या लायनीत जाऊन धडकले होते.

मी विमानात शिरणारा शेवटचा पसेंजर होते. सारे विमान भरले होते, माझी सीट शोधत मी 17B कडे पोहोचले तर माझ्या या नि त्या बाजूला कोणीच नाही! मला B सीट मिळाली तेव्हा किती नाराज झाले होते पण आज मात्र जोक आठवून आठवून हसू येत होते, why does B is cool? ...Because it is in AC! अगदीच PJ आहे रे, पण भावना पोहोचल्या ना?

BeFunky-collage.jpg

तो क्षण खूप खास होता. विमान जणू काही माझ्यासाठी थांबले होते. मी बसले नि ते चालू लागले. उड्डाण झाल्यापासून लँडिंग होईपर्यंत एकही दृश्य दिसले नाही, नुसतेच ढगढगढग होते. मग मी माझ्याजवळचे कुरमुरे खात टाईमपास केला. टाईमपास कसला, ते माझे दुपारचे जेवण होते!

बागडोगरा येता येता काचांवर थेंब थेंब दिसू लागले. आम्ही उतरलो तेव्हा पहिल्या श्वासातूनच मृदगंध हृदयात (फुफ्फुसात ते मला माहीत आहे पण अलंकारिक लिहायलं) भरून घेतला. जरी पुढे कुठे जायचे याबद्दल इतकुसा विचार ही केला नव्हता तरी हा सगळा ताण बुध्दीला येण्याऐवजी माझं मन लहान लहान बाळासारखं 'त्या' क्षणाची मज्जा घेत होतं. माझ्या चेहेऱ्यावर मोठ्ठ हसू पसरलं, इतकं ...की गेटवरचा सेक्युरीटी संशयाने माझ्याकडे जास्त निरखून पाहू लागला.

मला exit मधून बाहेर जायचं मन होई ना. कारण पुढे कुठे जायचं हे पक्क माहीत नव्हतं. मी तिथेच रेंगाळून आजूबाजूचा अंदाज घेऊ लागले, इतर प्रवासी टॅक्सी बुक करून दार्जिलिंग किंवा गंगटोक ला चालले होते. प्रायव्हेट टेकसी शिवाय पर्याय नव्हता. दिवस सरला होता. अंधार पडत होता. पाऊस पडत होता. पण बॅकपॅकर्स ही जमात खूप स्मार्ट असते. त्यांना माहीत जे पर्याय सहज डोळ्याला दिसतात त्याहून कमीतकमी अजून एक पर्याय अस्तित्वात असतो. तो कसा शोधून काढायचा याची मात्र एकेकाची आपली आपली स्टाईल असते.
मी Exit मध्ये Entry केली तोवर Next Destination गंगटोक ... एवढे ठरवले होते.

या एअरपोर्ट बाहेर पडले की प्रायव्हेट टॅक्सी वाले आपल्याला घेरून टाकतात पण आजचे चित्र वेगळेच होते. खूप कमी गाड्या उभ्या होत्या, त्यातल्या एकाने विचारले, किधर जाना है?
"गंगटोक"
"ढाई हजार लगेगा"
"मैं बस से जाउँगी"
"मॅडम दो बजे के बाद इधरसे कोई बस नाही निकलती"
"फिर शेअर जीप में जाऊंगी
"अभी इतनी रात को किधर मिलेंगे पॅसेंजर"
"देखती हू क्या हो सकता है "
मी चालत थोडी पुढे आले तर तिथून एक बंदा मोटरबाईक वरून पास होत होता त्याला हात करून थांबवले व लिफ्ट देईल का असे विचारले. त्याच्याच जायच्या रस्त्यावर एक बस स्टँड लागत होता. तिथपर्यंत सोडेना म्हणाला. मी माझी सॅक घेऊन बसले.
52495942_10156852954987778_3027684564785954816_n.jpg

तो एअरफोर्स मध्ये काम करत होता. नुकतीच या शहरात त्याची बदली झाली होती. स्टँड वर त्याने इकडे तिकडे विचारले तेव्हा कळले की सिलिगुडी स्टँड जवळून एखादी शेअर जीप मिळू शकेलं. पावसामुळे शक्यता कमीच असली तरी मला स्वतः जाऊन खात्री करायची होती.

सिलिगुडीला जाणाऱ्या लोकल बस मध्ये चढले. 18 रुपयात 30 मिनिटात सिलिगुडी बस स्टँड वर पोहोचले तर कळले शेवटची शेअर जीप नुकतीच निघाली. सारे सल्ला देत होते की आता एखाद्या गेस्ट हाउस मध्ये जाऊन झोप नि सकाळी परत ये. पण मन मानत नव्हतं. अर्धा तास रिकाम्या स्टँडवर भुतासारखी एकटीच बसले असेन, तर समोरून एकजण धावत आला, "मॅडम एक सुमो निकल रही है बस एक सीट कम है।"

मग काय निघाले. अजिबात पुढचा पाठचा विचार न करता निघाले. गंगटोक ला पोहोचेपर्यंत दहा वाजणार होते. ज्या शहराबद्दल काहीही माहिती नाही त्याची थोडी माहिती वाचूया म्हटले तर इंटरनेट मिळेना. पुढे पोहोचल्यावर तर अशी परिस्थिती आली की 'हे भगवान'!

ती मनोरंजक कहाणी गंगटोक स्पेशल पत्रात उद्या लिहीन. दोन रात्रीचा 50 तास प्रवास करून गंगटोक ला पोहोचले आहे. झोप अनावर झाली आहे. तर पत्र संपवते. गुड नाईट. टेक केअर.

तुझी मैत्रीण
सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकदम exciting आणि साहसी प्रवास चालला आहे तुमचा. वाचायला मजा येते आहे.

बागडोग्राला विमानाने गेलात? कशाप्रकारे कोणत्या वाहनाने पोचायचे हे ऐनवेळेस mood असेल तसं होतं का? मुंबई - बागडोगरा direst flight आहे. मुंबई -कोलकाता ची विमान तिकीट आणि कोलकाता - बागडोगरा तिकीट फार काही फरक नाही. 70+ सासू-सासरे पार पुणे-तवांग -अरुणाचल प्रदेश पर्यंत आणि परत प्रवास रेलवेने करुन आले. सुरुवात ट्रेन प्रवासाने केलीत तर मला वाटलं की सगळा प्रवास ट्रेन किंवा तत्सम हालअपेष्टा असलेला होईल.
त्या सुमोत बाई/बायका होत्या का?

आतापर्यंतचे सर्व भाग वाचले, एकंदरीत मजा वाटत आहे... आपले कौतुकही वाटत आहे. समाजमाध्यमावर आपले(स्वतः त्यात असलेले) फोटो टाकण्याच्या निर्णयाचे सुद्धा विशेष कौतुक!

छान चालु आहे प्रवास... पहिल्या भागापासुन वाचत आहे पण प्रतिक्रिया आज दिली (ऑफिसमध्ये वाचायला मिळतं ना फक्त ).
मागील वर्षी मी चारधाम ला एकटाच गेलो होतो त्याची आठवण आली .... फरक इतकाच की मी पुर्ण विचारपूर्वक प्रवासाच नियोजन करतो. अनारक्षित प्रवास तर नाहीच करत.
प्रवास करायला आणि प्रवास वर्णन वाचायला आवडतं कारण मला तर लिहता नाही येत....

एकटीनं फिरणाऱ्या तथाकथित पाश्चिमात्य डेरिंगबाज स्त्रिया तिसऱ्या जगात बलात्काराला बळी पडल्याच्या बातम्या येतात त्या मुळी अनोळखी लोकांवर नको इतका विश्वास टाकण्यामुळंच. कितीही स्वत: वर विश्र्वास असला तरी वेळ सांगून येत नाही. मनात आलं म्हणून लिहिले.

राजसी तुझे सासू सासरे यांचा प्रवास मस्तच
प्रवीण चारधाम एकट वा खूप छान!
अनया हो आता टाकेन.
धन्यवाद सर्वांना

मस्त चालू आहे प्रवास.

चौकशी करून 'पाच रुपयात स्त्रियांसाठी' शोधून काढले. >>> हे फार भारी वाटले

अनोळखी माणसांवर नवीन जागी फार पटकन विश्वास ठेवता असं वाटतय. एकीकडे असही वाटत की एका माणसाने दुसर्या माणसावर विश्वास ठेवायला का घाबरावे? पण आजकाल अश्या बातम्या वाचतो की भीती वाटते. असो काळजी घ्या.