थरारक : ४
वाड्याच्या वरचा भाग अत्यंत सुंदर होता. खाली आहेत तश्याच खोल्या आणि जागा, पण समोरचा उघडा असा मोठा दिवाणखाना दिमाखदार होता. मी इतक्या दिवसातून प्रथमच इथे आलो होतो.
सगळीकडे वेड्यासारखा पाहतोय तरी बाईसाहेब कुठेच नव्हत्या आणि कुणी इतर पुरुष माणूसदेखील तिथे नव्हता. मी चक्रावून त्यांना ह्या खोलीतून त्या खोलीत शोधत होतो पण काहीच नाही.
मला अचानक त्या रात्री झालेल्या प्रकारची आठवण आली तसा मी घाबरून खाली जायला वळतोय तोच अगदी जवळूनच मला तोंड दाबून हुंदके दाबल्या सारखा आवाज आला मी आवाजाच्या दिशेने पाहिलं तर भीतीने आणि लाजेने चक्रावून गेलो.
एका मोठ्या मेजच्या मागे मधुबाईसाहेब अंग चोरून स्वतःच्याच तोंडावर हात देऊन स्वतःचे हुंदके आवरत भीतीने आणि लाजेने माझ्याकडे थेट माझ्याच कडे पाहत होत्या.
त्या नजरेत फक्त एक अगतिकता आणि लाज होती, मला मुळीच भीती नाही वाटली त्यांची. अंगावरचे अर्ध्यापेक्षा जास्त फाटलेलेच होते. जागो जागी फाटलेल्या कपड्यातून अंग दिसत होतं, मला कळवळून आलं. माझ्या बहिणीसारख्याच होत्या त्या.
वाटलं नव्हतं गोदाआईने दिलेला शर्ट त्यांच्याच मुलीची अब्रू धाकायला मला वापरावा लागेल. मी पटापट अंगावरचा शर्ट काढून त्यांच्याकडे फेकतोय तोच त्या नको नको म्हणून अगतिकतेने मान हलवत होत्या, मला वाटलं कि ज्याने कुणी हे कृत्य केलं आहे तो माणूस इथेच असावा म्हणून भीतीने त्या अश्या करत असतील.
मी रागाने सगळीकडे पाहिलं, खरंच जर तो मानूस मिळाला असता तर मी त्याला जिवंत सोडलं नसतं. पण नाही कुणीच नव्हतं तिथे. मी त्यांच्याकडे शर्ट फेकतोय तोच आतल्या खोलीतून आवाज आला. स्पष्ट एकदम स्पष्ट.
ना तो आवाज बाईसाहेबांचा होता ना गोदाआई ना, कधीच ऐकलेल्या आजीचा. एकदम खणखणीत, त्यात विशिष्ट जबर होती, हुकूम होता, मी चक्रावून तिकडे पाहिलं.
तश्या बाईसाहेब आहेत त्याच परिस्थितीत धावत माझ्यापाशी आल्या आणि " पळ इथून, ह्या वाड्यातून, नाहीतर इतरांप्रमाणे तुझाही जीव घेईल ती" अक्षरशः मला ढकलत त्या खाली जायला सांगत होत्या, स्वतःची लाज विसरून. मी भीतीने त्यांच्याकडे पाहत होतो तितक्यात एका झटक्यात त्यांची केसं धरून वेगाने कशाने तरी त्यांना आत त्या आवाजाच्या खोलीत खेचत नेऊन आपटलं.
" पळ बिभास, वाचव स्वतःला, बिभास" त्या खोलीत त्यांचा आवाज कुठेतरी विरून गेला.
काहीतरी अतिवेगाने आपल्याकडे झेपावू पाहत आहे असं मला त्या एकदोन क्षणात जाणवलं आणि मी धूम ठोकली ती सरळ आजीच्या खोलीत, चुकून गेलो होतो गोदाआईची समजून.
दार आतून लावून घेतलं आणि माझ्याही नकळत आजीच्या पायांवर रडलो. माझी कुणीही नसताना त्या जवळपास निर्जीव देहातून मला कोण आधार मिळाला मी शब्दांत सांगू शकत नाही.
रडण्याचा आवेग ओसरला तसा मी सरळ पळणार होतो तिथून उठलोच होतो तर गोदाआई म्हणल्याप्रमाणे इतके वर्ष निर्जीव पडलेली ती क्लान्त काया हलकेच थरथरली.
मी त्यांच्या जवळ गेलो.
एकावर एक धक्के ह्या वयात मी कसा पचवत होतो मलाच माहित नव्हतं. हे जगण्याचं किंवा काकूने मुद्दामून दिलेल्या त्रासामुळे मनात सगळं सहन करण्याची आपोआपच शक्ती तयार झाली असावी, कदाचित. नाहीतर शिव जाणो.
इतके वर्ष शून्यात गढलेली ती नजर माझ्या नजरेत स्थिरावली होती. आश्चर्य म्हणावं कि घाबरावं माझं डोकं चालना देत नव्हतं.
त्या हळू आवाजात माझ्याशी बोलल्या कितीतरी वेळ, ऐकायला पाहिजे होतं ते आणि नको ऐकायला हवं ते देखील त्यांनी मला सांगितलं.
" बिभास, बरोबर ना?. . .
गोदाआई आणि मधू कडून प्रथम तुझी माफी मागते . आमच्या स्वार्थासाठी तुझ्या गोदाआईने तुझा जीव धोक्यात घातला आहे.
आधी ऐकून घे, कदाचित माफ करशील तू आम्हाला.
ह्या वाड्याला सावकार देसकर यांचा वाडा ह्या नावाने सगळे ओळखायचे. इथल्या सगळ्यात मोठ्या श्रीमंत माणसांपैकी एक. खोऱ्याने ओढावे तसा पैसा घरात यायचा. पैश्याबरोबरच एक प्रकारची गुर्मी देखील होती ह्या घरातल्या पुरुषांमध्ये. आधी सत्ता माझ्या नवर्याच्या हाती होती. माझ्या पोटी सावकार देसकर, म्हणजे वीरेंद्र माझा मुलगा तुझ्या गोदाआईचा नवरा जन्माला आला आणि विसाव्या वर्षीच सगळी सत्ता त्याच्या हाती सोपवून दिली त्याच्या वडिलांनी. कमी वयातच नको तितके ऐषोआराम, नको ती सत्ता, आणि जन्मापासूनच रक्तात भिनलेली पैश्याची गर्मी, त्याने तो अधिकच महत्वकांक्षी आणि हट्टी बनला.
हळूहळू वडिलांसारखीच व्यसनं करू लागला, ते कमी होतं तर त्याला हळूहळू स्त्रियांचा देखील नाद लागला. माझा जीव तुटायचा त्याला अधोगतीला जाताना पाहून पण त्याला वडिलांचा दुजोरा होता. माझं त्यांच्या पुढे काहीच चालत नसायचं. बाहेर मान होता पण घरात सतत दुय्यम वागणूक असायची इथल्या स्त्रियांना.
वीरेंद्र अजून बिघडू नये म्हणून आणि कदाचित बायको आल्याने तो सुधारेल ह्या आशेने लवकरच त्याचं आणि शेजारच्या गावातील अत्यंत गुणी आणि मायाळू मुलीसोबत म्हणजे गोदा सोबत लग्न लावलं. एकापाठोपाठ तीन मुलांचा जन्म झाला ह्या वाड्यात. दोन मुलं आणि शेवटची मधुवंती.
अत्यंत सुंदर आणि सोज्वळ अशी आहे मधू. आम्ही स्त्रिया नेहमीच पुरुषांपुढे मान झुकवून राहायचो, पण देव जाणो कशी पण मधुवर सगळ्यांचा अतिशय जीव होता, दोन मुलांपेक्षा जास्त.
प्रत्येक कामाला नोकर माणूस असला तरी बाईमाणूस म्हणून नेहमीच झुकायला हवं असं माझ्या नवऱ्याचं मत.
हा ना करत मुलं मोठी झाली. ती दोघे मुलं बावीस आणि चोवीस तर माझी मधू एकवीस वर्षाची. उच्च शिक्षणासाठी सगळ्यांना बाहेर पाठवलं होतं. मुलगी असून देखील मधुच्या हट्टापायी तिलाही बाहेर पाठवलं होतं.सगळं आलबेल असताना अचानक वाड्यावर ती घटना घडली आणि वाड्याची राया गेली, वाड्याला उतरती कला लागली.
सावकार देसकर, वीरेंद्र माझा मुलगा असून देखील मला हे सांगायला जरा देखील लाज वाटत नाही कि एक नालायक पुरुष होता. बाईमाणसांचा नाद लग्न झालं असूनदेखील त्याने सोडला नव्हता. गोदा बिचारी वाट्याला आलेले भोग निकराने सहन करत आपल्या पोराबाळांसाठी ह्या वाड्यात राबत होती.
वाड्यात साफसफाई काम करणाऱ्या राघोबाकडे त्याची लांब गावाची नवीनच लग्न झालेली नात राहायला आली होती. आसावरी. . .दिसायला अत्यंत सुंदर, एका नजरेतंच कोणाच्याही नजरेत भरेल अशी ती गुणी पोर, सहजच इतका मोठा वाडा कधी पहिला नव्हता म्हणून पाहायला आली आणि त्याच्या वीरेंद्रच्या नजरेत पडली.
बिचारीचं दुर्भाग्य. त्याने कुठलीही लाज न बाळगता सरळ राघोबाला तिची माझी एकवेळ भेट घडवून दे तुला हवा तितका पैसा ओतीन असं सांगितलं.
गरीब माणसाला किंमत नसते रे ह्या लोकांकडे. काहीही समजतात ते त्यांना, आणि गरिबीमुळे गरीब आवाज देखील उठवत नाही.
राघोबा बिचारा आळीपाळीने घरातल्या सगळ्यांच्या पाया पडून गयावया करत होता, माझ्या लेकीचं आयुष्य नका नासवु म्हणून. माझ्याकडे आणि गोदाकडेही आला होता. बाहेर त्याने कोणाजवळ विषय जरी घेतला असता तर त्याच पूर्ण कुटुंब नष्ट देखील करायला मागे पुढे नसत पाहिलं त्याने. गोदा आधीच जिवंत पुतळा होती ह्या घरातला पण मला ते सहन झालं नाही म्हणून मी त्यावेळेस मोठया सावकारांची भीती न बाळगता कानफटात वाजवली होती वीरेंद्रच्या .
त्याने माफी मागून तिचा नाद सोडून देईन असं सगळ्यांसमोर सांगितलं होतं पण ते साफ खोटं होतं. काहीच दिवसांनी मध्यरात्री वरच्या मजल्यावरून अचानक ओरडायचे किंचाळण्याचे आवाज आले, ते आवाज दुसरे कोणाचे नसून आसावरीचे होते. तिला वाचवणं देखील माझ्या हातात नव्हते. तिच्या सोबत त्याने काय केलं असेल ते आम्हाला दोघींना नीट कळलं होतं, तीन तरणी बांड पोर स्वतःलाअसून त्याने, जवळजवळ आपल्याच मुलीच्या वयाच्या आसावरी सोबत ते कृत्य पैस्याचा माजावर केलं होतं.
आम्ही वर पोहोचलो तेव्हा ती बिचारी पोर त्या मेजाच्या मागे लपून स्वतःची उघडी पडलेली आब्रू झाकायचा प्रयत्न करत होती.
शरीर जमेल तितकं आकसून घेत ती उघडं पडलेलं शरीर लपवत होती. आम्ही दोघी जागीच खिळलो, मी तिच्या जवळ जातेय तोच माझाच म्हातारा नवरा वर येत म्हणाला पाय तोडून हातात देईल जर एक पाऊल पुढे टाकलं तर.
आम्ही दोघी जागीच थिजलो.
काय किंमत असते ह्या लोकांना, पैसा फेकला कि स्वतः कपडे उतरवतात, हि तयार नव्हती म्हणून उचलून आणली इतकंच आणि आपली सेवा करायलाच जन्माला येतात ती, आपल्यापुढे त्यांच्या इज्जत काय आणि आब्रू काय.
तिच्याकडे तुच्छतेने पाहत दोघेही हसत होते.
तशी ती उसळून उठली, तुमची तक्रार करीन मी माझी बेआब्रू केली तशीच ह्या लोकांच्यात तुमची देखील करीन. माझे कपडे उतरवले तसे तुमचे हि लोकांच्यात उतरविन असं त्वेषाने बोलून आणि ती पळत होतीच तर तिला पकडलं. आम्हाला जबरदस्तीने खाली लोटलं, खूप प्रयत्न केला आम्ही आमच्या परीने तिला वाचवायचा पण दिवाणखाना बाहेरून आतून बंद केला आणि तिला जिवंत मारलं तिथेच पण मरताना तिचे शेवटचे शब्द अजूनही जशेच्या तसे कानात घुमत आहेत. तिने शप्पत घेतली कि " ह्या वाड्यात एकही पुरुष जिवंत ठेवणार नाही मी, हालहाल करून मरेन एकेकाला, ह्या घराण्यातील कोणालाच सोडणार नाही. मला दिलेल्या यातनांची झळ प्रत्येकाला सोसायलाच लावेन असा बदला घेईन"
त्या विहिरीच्या त्याबाजूला तिला पुरलं. त्यानंतर ना राघोबा मला दिसला ना कुणी तिच्याबद्दल काही विचारायला आलं.
तिचा खून होऊन तेरा दिवसादेखील पूर्ण नाही होतं तर आधी मोठे सावकार अचानक विहिरीत पडून मेले. पुढच्या दोन दिवसांनी वीरेंद्र त्याच विहिरीच्या शेजारी शीर आणि धड बाजूला अश्या अवस्थेत मृत सापडला. त्यांच्या कार्यासाठी घरी आलेली दोन्ही मुलं अचानक रक्ताची उलटी होऊन मेले. तिचा बदला पूर्ण झाला असं समजून आम्ही घर सोडून चाललो होतो तोच अचानक मधूला काहीतरी झालं. विक्षिप्त वागायला लागली. माझं वय झालं होतं रे, पण पोरीची ती अवस्था पाहवत नव्हती.
एक दिवस तिने तिचं रूप आम्हाला दोघींना दाखवलं, आसावरी, माझ्या पोरीला झपाटलं आहे रे तिने. तिच्यावर सगळ्यांचा अतिशय जीव होता म्हणून ती मधूला तिने भोगलेल्या यातना देत आहे. गोदाला प्रत्येक वेळी इथे नवीन माणूस पुरुष कामाला बोलवायला सांगते, आणि ती मेली त्याच दिवशी रात्री ती त्या पुरुषाचा जीव घेऊन. पुरुष मारल्याचा आनंद आणि ते कृत्य मधुच्या हाताने घडवून ती आमच्या जिवंत आणि मेलेल्या जीवांचा बदला घेत आहे, हे करताना ती मधूला अत्यंत त्रास देते. आणि आम्ही असं नाही केलं तर ती मधूला मारून टाकेल. बिचारी गोदा आपल्या पोरीच्या जिवापायी स्वतःवर पाप चढवून घेत आहे. तुझ्याआधी ३ जणांचा जीव घेतलाय तिने."
म्हणजे मीही मरणार होतो नाहक, काहीही केलं नसताना. गोदाआईला कुणी दिला हा हक्क माझ्या जीवाशी असा खेळ करायला? बिचारी मधू काही चूक नसताना काय काय सहन करत होती. मला तिच्यात माझी बहीण दिसत होती.
अर्थातच माझ्यात त्या शक्तीचा सामना करायची ताकत नव्हतीच पण मधू बाईसाहेबांना वाचवायची तीव्र इच्छा जागली होती. स्वतःच्या जीवाच्याही जास्त मला त्यांचा जीव जास्त प्रिय वाटत होता. तिच्या जागी तर पियू असती तर ? मी जिवाच्या आकांताने वाचवलं असतंच कि तिला. तसंही कोण आहे आपल्यामागे रडणारा? आयुष्यात एक पुण्याचं काम करूयात. आजीसाठी मधू बाईसाहेबांसाठी आणि माणुसकीची.
आजी ह्यावर काही उपाय? मी वाचवेन मधू बाईसाहेबांना. तुम्हाला काहीतरी माहित असेलच ना?
सांगा ना आजी, ह्या वाड्याला मुक्त करू आपण त्या शक्ती पासून. कुणीतरी असेल जो आपल्याला ह्यातून बाहेर निघण्याचा मार्ग दाखवतील.
तुम्ही जुन्या जाणकार आहेत सांगा ना.
" अप्पा "
मी त्यांना संपर्क करायचा प्रयत्न केला होता त्यावेळीस म्हणून तिने माझी हि अवस्था केलीये.
तू एकदा त्यांना भेटलास ना तर ते मार्ग दाखवतील तेच बाहेर काढतील आपल्याला ह्यातून. मी सांगेल तिथे जाशील? भेटशील त्यांना?
ती अडथळे आणेल पण इच्छाशक्ती ठेवलीस तर पोहोचशील तू तिथे.
करशील आमच्यासाठी इतकं?? त्यांनी जवळ जवळ मला हात जोडले होते.
मी हि हिम्मतीने हो म्हणालो. तसंही माझा बळी देणार होतीच ती बाहेर पडणं सहजासहज शक्य नव्हतंच, सगळ्यांना वाचवण्याचा एक प्रयत्न करण्यास काय हरकत होती.
https://www.maayboli.com/node/72699 थरारक : ३
https://www.maayboli.com/node/72655 थरारक : १
https://www.maayboli.com/node/72669 थरारक : २
छान वेगवान आहे कथानक
छान वेगवान आहे कथानक
व्वा हा भाग पण भारीच. विशेष
व्वा हा भाग पण भारीच. विशेष म्हणजे लगेच टाकलात.
झक्कास
झक्कास
चांगली चाललीये कथा...शुद्ध
चांगली चाललीये कथा...शुद्ध लेखनाच्या चुका जसे. दुजोरा ला मुजोरा, सुंदर ला संदर...अशा सुधाराव्यात..
छान
छान
कथा मस्तच चालली आहे, पण जर
कथा मस्तच चालली आहे, पण जरा खालील वाक्य नीट करा ना, मला तर एकदम हिंदी सिनेमा आठवला आणि हसू आले.
मेल्यावर देखील तुमच्या यापापी आत्म्याला रक्ताचे असू गळायला लावेन,
छान आहे हाही भाग
छान आहे हाही भाग
सुधारणा केली आहेत लेखनाच्या/
सुधारणा केली आहेत लेखनाच्या/
जास्त फिल्मी वाटायला लागलं का??
कथा फिल्मी असल्यास मला तरी
कथा फिल्मी असल्यास मला तरी काहीच हरकत नाही, पण ती किमान हिंदाळलेली नको असे वाटते. बदल छानच आहे.
पुढील भागाची वाट पाहत आहे.
धन्यवाद. विचार करतेय पुढच्या
धन्यवाद. विचार करतेय पुढच्या भागावर. जमल्यास आजच पोस्ट करिन.
खूपच छान आणी ओघवते लिहीता
खूपच छान आणी ओघवते लिहीता तुम्ही. अगदी सारे प्रत्यक्ष घडले आहे असे वाटत आहे. लिहीत रहा.
आवडले
आवडले
अगदी सारे प्रत्यक्ष घडले आहे
अगदी सारे प्रत्यक्ष घडले आहे असे वाटत आहे. लिहीत रहा.>>>>>>>> +१११
छान गं, सोहनी.
मनापासून आभार सगळ्यांचे.
मनापासून आभार सगळ्यांचे.
मधुरा वेळ काढून वाचलं तुम्ही आणि आवडलं तुम्हाला,
आणि इतर वाचकांना देखील आवडलं म्हणजे थोडंसं चांगलं लिहलेय, असं वाटायला लागलं.