थरारक : ३

Submitted by सोहनी सोहनी on 14 December, 2019 - 03:41

थरारक : ३

काकू करवून घ्यायच्या त्या मानाने इथलं काम खूपच शुल्लक होतं. साफसफाई, भांडी, पाणी आणायचं, आजीला जेवण द्यायचं, आणि बागकाम. चार पाच दिवस तर सगळं समजून घेण्यातच गेले. गोदाआई देखील माझ्या जोडीने काम करायच्या. मी त्यांना नको नको म्हणायचो तरीही.
त्यांनी काही गोष्टी निक्षून सांगितल्या होत्या,
रात्री मधुकडे वर काही झालं तरी जायचं नाही, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विहिरीवर जेथून मी दिवसा पाणी आणायचो तिथे रात्री फिरकायचं नाही.
आजूबाजूने जरा विचित्र आवाज वैगेरे आलेच तर त्या दिशेने जायचं नाही, सवय करून घे मग काही वाटणार नाही, आणि हो स्वतःला जप.
त्या जेव्हा जेव्हा स्वतःला जप अश्या मला म्हणायच्या ना तेव्हातेव्हा त्यांच्या डोळ्यात मला एक अपराधी अशी भावना जाणवायची.
आणि एक गोष्ट मी निष्कर्षाने अनुभवली कि गोदाआई मनाने खरंच खूप प्रेमळ आणि मायाळू होत्या तरीही त्यांनी मला प्रेमाने आपुलकीने असं वागवलं नाही, ठरवून, स्वतःला रोखल्यासारखं त्यांच्या वागण्यात एक कृत्रिमपणा जाणवायचा. त्यांचे वागणे एक आणि त्यांचे डोळे वेगळेच काही बोलायचे.
मालक लोक आहेत असं समजून मी हि अपेक्षा नाही ठेवली पण माझ्यासोबत सगळं काम मात्र करायच्या त्या.

मी एक दिवस त्यांना भीतभीत विचारलं होतं कि घरात पुरुष मंडळी कुणीच नाही? म्हणजे कुणी शहरात वैगेरे राहतं का?? आणि ते फोटो असे धूळ खात का आहेत ?? कोण आहेत ते सगळे?

त्या फोटोमध्ये त्यांचे सासरे, त्यांचा नवरा आणि त्यांची दोन मुलं होती. एका अपघातात सगळ्यांचा अकाली मृत्यू झाला असं त्या म्हणाल्या. दुसरं कुणी नाहीये, जे काही आहोत ते आम्हीच, आणि अरे ते हात नाही पोहोचत ना तिथे म्हणून साफ नाहीयेत राहूंदेत तू नको लक्ष देऊस, असं म्हणून त्यांनी विषय टाळला होता.

एक दिवस मी पूर्ण वाडा साफ करायला घेतला होता, सहजच म्हणून त्या फोटोंवर हात पोहोचतो का पाहिलं, अगदीच सहजतेने पोहोचला हात, गोदाआई तर माझ्या इतक्याच उंचीला होत्या, त्यांचा कसा हात पोहोचला नाही मला आश्चर्य वाटलं होतं, वयानुसार हात वैगेरे दुखत असेल असं मनाशीच समजून मी पहिला झाडूचा झपका त्या धुळीवर मारला तसा "त्या नालायक माणसांच्या प्रतिमा साफ करायला पुन्हा एकदा मनात तरी आणलंस ना तर तुझा फोटो त्यांच्या सोबत लावेन" मागून तिचा कर्णकर्कश आवाज ऐकून मी जागीच गर्भगळीत झालो, झाडू पटकन हातातून निसटला, मी मागे वळून तिचं ते रूप पाहून जागीच थरथरत होतो, मागे मधू बाईसाहेब माझ्याकडे रागाने पाहत मला उद्धेशून म्हणत होत्या.
जिवंत जळते अंगार होते त्यांचे डोळे, लाल केशरी अंगार धगधगते.
आवाज ऐकून गोदाआई धावत आल्या आणि मी भीतीने त्यांच्या मागे झालो होतो, खरंच मी लहानमुलांसारखा लपलो होतो त्यांच्या मागे.
" तू सांगितलं नाहीस का ग थेरडे ह्याला, कि मी सांगू ?"

माफ कर चूक झाली, लहान आहे ते पोर, एकडाव माफ कर, गोदाआई तिला गयावया करून माफी मागत होत्या.
मी ते सगळं पाहून चक्रावून गेलो होतो, भीती किंचित दूर होऊन जे होतेय ते पाहून मी आश्चर्यचकित झालो होतो. अर्थातच गोदाआई ह्या घराच्या मालकीण होत्या तरीही मधू बाईसाहेबांसमोर त्या पूर्णपणे हरल्यासारख्या वागायच्या.

त्या गुरगुरत, माझ्याकडे जालीम, खतरनाक कटाक्ष टाकून वर गेल्या.
गोदाआई प्रथमच माझ्यावर ओरडल्या, "तुला सांगितलं होतं ना, तिच्या नजरेत जेवढं कमी पडशील तेवढ तुझ्यासाठी चांगलं आहे" ओरडल्या तश्या रडल्याही लगेचच, माझं जगणंच मेलं दरिद्री.

मला खूप वाईट वाटलं त्या रडल्या म्हणून, मी त्यांची माफी मागितली, त्यांनी पुन्हा निक्षून सांगितलं तिच्या वाटेल जाऊ नकोस.
"माझी स्वतःची पोटाची पोर असून ती माझ्याशी असं वागते तर तूझ्याशी कशी नीट वागेल ती, तिच्यापासून जपून राहा"

हा सगळ्यात मोठा धक्का होता माझ्यासाठी मधू बाईसाहेब त्यांची मुलगी असूनदेखील त्यांना असं वागवत होत्या आणि आपल्याच वडील, भावांचा ह्या पातळीवर तिरस्कार करत होत्या, पण का???
त्या वेड्या होत्या तरीही असं वागणं मला खूप घाबरवून गेलं. त्यांचं वागणं आपल्याला काही इजा पोहोचण्या इतपत वाटलं तर हा वाडा आपण सोडून द्यायचा असा विचार मी करून ठेवला होता.

त्यांचं जेवण खाणं सगळंच गोदाआई पाहायच्या, आणि आजीचं मी. तश्या आजी दिवसभर पडूनच असायच्या, वयस्कर होत्या. मी पाणी पाजायचो, जेवण हाताने भरवायचो, त्या स्वतः जागच्या उठू शकत नव्हत्या, आणि नेहमीच शून्यात नजर घालून एकीकडे पाहत राहायच्या, बसलेल्या असोत किंवा झोपलेल्या असोत. गोदाआईने सांगितलं होतं कि त्या आजारी आहेत, खूप दवाखाने, घरचे बाहेरचे उपाय केले पण त्याची तब्येत आहे तशीच.
नवर्याच्या, मुलाच्या, नातवंडांच्या अकाली मृत्यूचा जबरदस्त धक्का बसून त्या अश्या झाल्या होत्या.
मला गोदाआई आणि आजीचं खूप वाईट वाटायचं, इतकी संपत्ती असूनदेखील बिचार्यांच्या चेहऱ्यावर हसू मात्र केव्हाच नसायचं, त्यात त्या विक्षिप्त अश्या मधू बाईसाहेब.
त्या मधुबाईसाहेबांचा चेहरा नको दिसायला म्हणून मी आजीच्या खोलीतच जास्त वेळ घालावायचो. त्यांच्याशी मनातलं बोलायचो, त्या काही प्रतिक्रिया देत नसायच्या पण त्या मला ऐकत आहेत असावं मला वाटायचं नेहमी.

माझी खोली, आजीची खोली आणि गोदाआईची खोली लागूनच होत्या. त्या रात्री मी सगळं उरकून माझ्या खोलीत झोपलो होतो, कसल्याश्या आवाजाने माझी झोप मोडत होती, म्हणजे थोडे थोडे कसलेशे आवाज यायचे गुरगुरण्याचे, हुंकार भरल्यासारखे, आधी चारपाच दिवस खूप घाबरलो पण गोदाआईने सांगितल्या प्रमाणे मी दुर्लक्ष करायला शिकलो होतो.
आज जास्तच आवाज येत होते, डुबुक डुबुक, कुणीतरी पाण्यात काहीतरी बुडवून पुन्हा बाहेर काढून पुन्हा बुडवल्यासारखा आवाज, अचानक खिडकीची लाकडी तावदाने एकमेकांवर आपटायला लागली, सुसुसु करत वारा आत घुसत होता.
मी दचकून उठलो, त्या आवाजाने मी खूप घाबरलो होतो म्हणून उठून खिडकी बंद करायची देखील मला हिम्मत नव्हती होत तरीही मी भीतभीत उठून खिडकीपाशी गेलो, बाहेर बरंच चांदणं पडायल्यासारखं वाटत होतं, वारा आत येत होता खरा पण झाड एकही हालत नव्हतं, माझ्या अंगावरून सरसरून काटा आला.
मी घाबरून खिडकी लावायला घेतोय तोच माझी नजर विहिरीवर पडली, एक बाई विहिरीच्या कठड्यावर बसली होती, तिची ओली केसं मला इतक्या लांबूनही स्पष्ट दिसत होती, काही केसं हलकेच उडत होती, ओली साडी अंगाला कातडीसारखी चिकटलेली वाटत होती, विहिरीमध्ये पाय टाकून ती बसली होती आधी मला थोडंसं आश्चर्य वाटलं पण जेव्हा माझी नजर तिच्या हाताच्या हालचाली कडे गेली तेव्हा माझी बोबडीच वळली. तिच्या हातात चार मानवी मुंडके होते आणि ती त्यांना केसांनी धरून पाण्यातून बुडवून वर काढून पुन्हा बुडवत होती.
मी भीतीने जागीच कापायला लागलो, खिडकी लावून पळायचं देखील मला सुचत नव्हतं, मी खिळलो होतो तिच्या हालचालींमध्ये, तिने हलकेच मन तिरपी केली, आणि एका झटक्यात तशीच उलटी बसून माझ्याकडे सरळ पाहत मान फिरवली, तिचा चेहरा पाहून माझे डोळे आणि काळीज बाहेर येतील असं जाणवलं मला, ती दुसरी तिसरी कुणी नसून मधुवंती होती, हो मधू बाईसाहेब.
तिने माझ्याकडे पाहून तिचं जहरी नजर टाकली आणि हिंस्र हसली माझ्या तोंडातून जोरात किंचाळी बाहेर आली पण आवाज माझ्या आतच कुठेतरी विरून गेली.
समोर पाहतोय तर ती वेगाने झाडांच्या फांद्यांवर झुलत त्यांच्यावरून माझ्या कडे झेपावत होती, मला प्रथमच मृत्यू समोर असणे म्हणजे काय हे कळलं होतं, ती माझ्या खिडकीमधून एक दोन क्षणातच आत येईल इतक्यां अंतरावर असतानाच, माझ्या आतून मला कसली शक्ती जाणवली तो शिवच जाणे, पण मी त्या स्थितीत खिडकी जोरात लावली आणि ती खिडकीवर आदळून खाली पडल्याचा आवाज झाला तसा मी मागे ना पाहता जिवाच्या आकांताने गोदाआईच्या खोलीत घुसलो.

आणि अजून एक भीतीचा धक्का, गोदाआई मधुबाईसाहेबांना मिठीत घेऊन असावे गाळत बसल्या होत्या, जणू किती वर्षांनी एकमेकींची भेट झाली असावी आणि मधुबाईसाहेब, त्या मधू नव्हत्याच ज्यांना मी इतके दिवस पहिल्या होत्या, एक गलितगात्र, कमजोर, शरीराने आणि मनाने देखील, खोल गेलेले डोळे, आयुष्य हरल्याच्या भावना त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होत्या.
मी तसा एकाएकी घाबरून थरथरत त्यांच्या खोलीत शिरलो तश्या दोघीही एकमेकींना कवटाळून घाबरून माझ्याकडे आणि एकमेकींकडे पाहत होत्या.

मी बोबडी वळल्यासारखा मधू बाईसाहेब त्या विहिरीवर, माझ्या खिडकीत, मी स्वतः पहिल्या आणि ह्या इथे, कसं शक्य आहे?

तितक्यात मधूबाईसाहेब स्वतःच रडायला लागल्या, जे काय होतं होतं त्यावर नक्की काय प्रतिक्रिया माझ्या मनातून यावी ह्यासाठी माझं मनाचं संभ्रमित झालं असावं म्हणून मी खिळल्यागत त्यांच्याकडे पाहत राहिलो.
तश्या गोदाआई सावरून म्हणाल्या, एकटा झोपतोस ना, काहीतरी वाईट स्वप्न पाहिलं असेल, हिलापण वाईट स्वप्न पडलं म्हणून घाबरून माझ्या कुशीत येऊन रडत होती, गोदाआई कृत्रिम वागत असल्या माझ्याशी तरीही आज त्या पूर्णपणे मधुबाईसाहेबांवर काकुळतीला येऊन जिवाच्या खोलवर जपलेली, माझ्यापासून लपवलेली माया ओवाळून वागत होत्या.
मधुबाईसाहेब वेड्या होत्या हे खरं होतं पण त्या गोदाआईंशी असं प्रेमाने किंवा त्यांच्यापाशी तिच्या आधाराची व्यक्ती म्हणून कधीच वागल्या नव्हत्या, आणि मी बाहेर जिला पाहिलं ते काय होतं? ती कोण होती? होती कि नव्हती? मी खरंच स्वप्न तर नाही ना पाहिलं? कसं शक्य आहे स्वप्न असणं, मी स्वतः डोळ्यांनी त्यांना विहिरीवर ते मुंडके . . .
ते मुंडके आठवल्यावर मी सरळ धावत जाऊन त्या धुळीने भरलेल्या फोटोंपाशी उभा राहलो, माझ्यामागे गोदाआई आणि मधुबाईसाहेब.

आई तिच्या हातात विहिरीवर ह्यांचेच मुंडके होते, मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेत, हवेतर चला माझ्या खोलीत.
ती खिडकीवर धडकली होती म्हणजे खिडकी अजून ओली असणार चला.
त्या दोघी माझ्यामागे आल्या पण खिडकी सताड उघडी होती, तिच्यावर किंवा विहिरीवर देखील कसल्याच खुणा नव्हत्या.
मी चक्रावून दोघींकडे पाहत बसलो. गोदाआई माझ्याजवळ येऊन मायेने माझ्या डोक्यावर हात फिरवत म्हणत होत्या, खूप काम करतोस ना, आणि हि मधू अशी वागते म्हणून असे स्वप्न पडत असतील, तू अराम कर.
मी ते स्वप्नंच असावं असं मनाला समजावत होतोच तर वरून गुरगुरण्याचा आवाज आला तसा मी पुन्हा भीतीने थरारलो,
माझी हि हालत त्या भयानक स्वप्नामुळे होती हे मी समजत होतोच तर मधू बाईसाहेब माझ्यापेक्षाही जास्त थरारत होत्या, गोदाआई त्यांचा हात धरून त्यांना थांबवत होत्या तर मधू बाईसाहेब घाबरून नाही नाही अशी मान हलवत होत्या, एकदाचा हात झटकून त्या धावतच वरच्या मजल्यावर गेल्या.

गोदाआई रडत रडत आजींच्या खोलीत धावल्या आणि त्यांच्या मागे मीदेखील. काय झालं , काही कळण्यासारखं नव्हतं, गोदाआई आजींच्या पायावर डोके ठेवून जीवांच्या आकांताने रडत होत्या,
मी त्यांना पुन्हापुन्हा विचारात होतो काय होतंय हे सगळं मला कळेल का?? नक्की काय होतंय मधू बाईसाहेबांना? आता ज्या होत्या त्या त्याच होत्या का? आणि मी इतके दिवस पाहतोय त्या कोण होत्या काही समजत नाहीये ? सांगा ना ??
तितक्यात वरून आवाज आला, " खूप लाड केलेले दिसतायेत पोरीचे, काय ग थेरडे, मी हि करू का थोडे अजून " मधुबाईसाहेबांचा तो आवाज ऐकून गोदाआई लगबगीने बाहेर आल्या आणि पुन्हा त्यांच्या पुढे हात जोडून "तिला काही करू नका, मी त्याला काही सांगणार नाही, तुम्हाला हवं तेच होईल, तेच मिळेल, तिला काही करू नका, मी हात जोडते पदर पसरते"

मधू बाईसाहेब जिन्यात बसून पायऱ्यांवरून गोदाआईकडे तुच्छतेने पाहत बोलत होत्या.
माझ्या अल्पमतीला जे काही समजायचं ते समजलं होतं, इथून बाहेर पडायचं बस्स, तो काही साधा प्रकार नव्हता. बाईसाहेब वेड्या नव्हत्याच त्यांना झपाटलं होतं कश्याने तरी, अमानवी होतं काही ते. मला तितकंच समजत होतं.
गोदाआईंना सगळं माहित असून त्या माझ्यासोबत खोटं बोलल्या, म्हणजे बाईसाहेब आणि गोदाआईदेखील मला इथून सहज बाहेर पडू देणार नव्हत्या हे मला त्या वयात समजण्या इतपत सक्षम होतो.
संधी साधून इथून पळायचं हे मी ठरवलं होतं तेही येत्या एकदोन दिवसांतच.

त्या घटनेनंतर खास असं काही घडलं नव्हतं पण मी मनाने खूप घाबरलो होतो, गोदाआई विचारल्या शिवाय काही सांगत नसायच्या आणि मी हि आता त्यांना मुद्दाम काहीच विचारलं नाही, मनातून पुरता हररलो असतानादेखील मी काहीच झालं नाही असं वावरत होतो, पण पाणी भरताना त्या विहिरीवर एकेक क्षणाला मला ती समोर येते कि काय, बाजूला असून मला पाहतेय कि काय? तशीच झडप घालायला तयार आहे कि काय? अश्या भीतीने लटपटत भीतीने पाणी भरायचो जरी गोदाआई सोबत असल्या तरीही.

दोन दिवसांनी त्या रात्री मी पळून जायची पूर्णपणे तयारी केली होती. गोदाआई झोपल्या तश्या मी माझं सामान यावरून घेतलं, निघताना आजीची माफी मागून निघालो. दरवाजा उघडून बाहेर पडतोय तोच वरून जोरात किंचाळण्याचे आवाज यायला लागले, "सोड मला, हात नको लावूस, आई, आजी, बिभास वाचव मला, हा माझी आब्रू"

मधू बाईसाहेबांवर कुणीतरी अतिप्रसंग करायचा प्रयत्न करतोय, इतकंच माझ्या मनात गेलं, पळायचं होतं पण त्या दिवशी पाहिलेल्या बाईसाहेब एक मुलगी, माझ्या बहिणी सारख्या वाटल्या, मी पळायचं सोडून सरळ धावत त्या रात्री, हो रात्रीच्या वेळेस, गोदाआईने हजारदा निक्षून सांगितलेलं असताना देखील वर गेलो.

आणि समोर जे पाहिलं ते माझ्या आकलन शक्तीच्या खूप पुढे होतं आणि जे अनुभवलं ते माझ्या आयुष्यातील सगळ्यात थरारक भावना होती.

https://www.maayboli.com/node/72655 थरारक : १

https://www.maayboli.com/node/72669 थरारक : २

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मनापासून आभार सगळ्यांचे. प्रयत्न करतेय चांगला आणि सगळ्यांना आवडेल अश्या पद्धतीने लिहण्याचा.
चुका आढळल्यास आवर्जून सांगा