थरारक :२

Submitted by सोहनी सोहनी on 12 December, 2019 - 06:35

थरारक :२

गावातल्या वाण्याचं ऐकून ह्या वाड्यात आलो नसतो तर हे असलं काही घडलंच नसतं माझ्या आयुष्यात. त्याला तरी काय दोष द्यायचा म्हणा, माझं दैवच मुळी खोटं. वाण्याला माझी काळजी असावी म्हणून नेहमीच मी भाजी आणायला जायचो तेव्हा मला एका घरी काम करायला जाशील का ?असं विचारायचा. काम म्हणजे तेच जे मी इथे करायचो पण त्याचे मला पैसे मिळणार होते वरून जेवण आणि तिथेच राहायला जागा.

जन्मताच अनाथ म्हणून नव्हतो आलो, संपूर्ण चार वर्षाचं आई वडिलांच्या प्रेमाचं छत्र नशिबात लिहून आलो होतो.
जन्मताच आईला खाल्लं आणि आईच्या दुःखाने बापही खंगून मेला. काकू अश्याच काहीतरी म्हणायच्या नेहमी.
अनाथ हा शिक्का माझ्या माथी बसवला गेला तेव्हा माझ्या असल्या नसलेल्या कोणत्याच नातेवाईकाचं प्रेम माझ्यासाठी उफाळून आलं नसावं त्यामुळेच इच्छा नसतानादेखील मी काका काकू कडे राहायला आलो,माझी नव्हे त्यांची इच्छा. हे देखील काकूच म्हणते..

काका माझ्या बाबांचे जुने मित्र, गरीब असलो तरी घरी येजा असायची आणि जे काही चटणी भाकरी असेल ती हक्काने हाताने घेऊन खाण्याइतपत मैत्री, काकांसोबत बोलता बोलताना काय तो माझ्या हयात नसलेल्या आईबाबांविषयी नवीन नवीन गोष्टी ऐकून आधी हरकून मग हमसून हमसून रडायचो.

खर्च परवडणार नाही म्हणून शाळा नाही, राहायचं असेल तर घरात पडतील ती सगळी कामं करायची ह्या सरळ सोप्या अटी वरून मला काकूंनी घरात ठेऊन घेतलं.

काका खूप चांगले होते मनाने पण काकू . . . वाईट म्हणायचं हक्क नाही पण माझ्या बाबतीत तरी माझ्या मनाला लागेल असं आवर्जून वागायच्या आणि त्यांच्या पुढे काका काहीच म्हणू शकत नसायचे अगदी इच्छा असूनदेखील.

वयाच्या एकोणीस वर्षापर्यंत घरात धुणीभांडी, झाडलोट, कपडे, त्यांच्या दोन मुलांची पडतील ती कामे, अगदी खूप लहान असताना शु काढण्यापासून ते आता शाळेतून आल्यावर शूज ( बुटांना शूज म्हणतात हे मला पियूने बोबडं बोलत शिकवलंय) साफ करण्यापर्यंत सगळी कामं व्यवस्थित करत होतो ते हि काकूंची हृदयाला प्रत्येक वेळी कचकचून हेलावणारी बोलणी ऐकून.

इथे काही हौशीने राहत नव्हतो, तसा पर्यायही नव्हताच माझ्याकडे पण इतक्य वर्षांची सवय म्हणा किंवा पियूचा लळा पण मनात आणून देखील मी घर सोडलं नव्हतं. अगदीच वाण्याच्या प्रस्तावाचा सकारात्मक विचार करून देखील मी त्याला कधीच होकार दिला नव्हता, मला अपेक्षाच नव्हत्या काही माझ्या आयुष्याकडून.
जे आहे तेच माझं प्राक्तन हे समजून मी आला दिवस पुढे ढकलत होतो. तसंही घर सोडून जाऊन तरी काय करणार होतो मी ?धडधाकट असून देखील ह्या प्रश्ना वर मी निरुत्तर व्हायचो .ना लिहता येत ना वाचता, घर काम तेवढा मनापासून यायचा.

त्या दिवशी खेळवत असताना पियू अचानक ओट्या वरून खाली पडली, डोक्याला दगड लागून रक्त निघालं थोडं, कळवळला जीव तिचा. काकीने खूप मारलं मला, म्हणजे आधीही मारायच्या पण एखाद कानाखाली वैगेरे पण आज, असो. शेवटी सुदैव कि दुर्दैव माहित नाही पण घराबाहेर काढलं, खूप रडलो मला मारलं घराबाहेर काढलं म्हणून नाही पण पियूला लागलं हो खूप म्हणून, नको म्हणायला बराच जीव लागला होता माझा तिच्यावर दादा दादा म्हणत यायची माझ्याकडे.

दोन जोडी जुनाट कपडे, मोजून सहा वेळा टाका लावून घेतलेली चप्पल आणि काकांकडून ऐकलेल्या आईबाबांच्या गोष्टी इतकी माझी मालमत्ता घेऊन स्वतःला सावरून वाण्याकडे पोहोचलो.
स्वहस्ते अगदी तुझं त्या घरात भलंच होईल इतकं सांगून, वाड्याच्या दाराच्या बाहेरच उभ्या असलेल्या कोणा बाईमाणसाला माझ्याविषयी जुजबी माहिती देऊन मला त्या वाड्याच्या अगदी दारापर्यंत सोडून गेला.

त्यांनी अंगभर लुगडं नेसलंलं होतो, शरीरावर एकही दागिना नाही आणि सगळ्यात वाईट वाटलं ते म्हणजे त्याच रिकामं कपाळ आणि भकास डोळे पाहून.
माझी थोडी चौकशी करून त्या मला आत घेऊन गेल्या, बोलण्यावरून तरी त्या मानाने खूप मृदू असतील अश्या वाटल्या. काकू सारख्या नाहीत ह्याचा काहीतरी वेगळाच आनंद मनाला सुखावून गेला.

तसा भव्यच होता वाडा, वाडा म्हणावा तसाच अगदी. आणि आश्चर्य म्हणजे वाड्यात फक्त तीनच माणसं राहायला होती, एक म्हणजे गोदाआई ज्या दारात भेटल्या त्या आणि दुसऱ्या म्हणजे आजी, त्यांची सासूबाई आणि ती.
जी ह्या सगळ्या सत्राची सूत्रधार. मधुवंती. . .
अतिशय सुंदर होती ती दिसायला, पियू इतकीच गोड़ वाटली पण परिपक्वता आलेलं शरीर त्यामुळे मी नजर झुकवुनच तिच्या समोर उभा होतो.
असेल चोवीस पंचवीस वर्षाची, तिने मला माझं नाव विचारलं तेव्हा मी तिच्या डोळ्यात पाहून कितीतरी वर्षे मी स्वतःही उच्चारलं नसेल ते नाव " बिभास " सांगताना थरारलोच. . .
काय होतं त्या डोळ्यांत ? रोखून धरलेली नजर? खोल खूप खोल ह्या मनात काहीतरी भीतीने थरारलं.

तसं गोदाआईने जवळ जवळ ओढतच मला वाडा दाखवायला नेलं. तू तिच्याकडे लक्ष नको देऊस ती तशीच वागते, मी हळूच मागे वळून पाहिलं तर काहीशी कुत्सित हास्य आणून ती रोखूनच माझ्या कडे पाहत होती.

वाडा दाखवता दाखवता गोदाआईने बरंच काही काही सांगितलं. हे सुद्धा कि मधूला जरा वेड लागलं आहे काही वर्षे झाली. खूप उपाय करूनदेखील सुधारणा नाही म्हणून जरा विक्षिप्त वागते आणि ती वरच्या खोल्यांत राहते त्यामुळे चुकूनही रात्री कसलाही अगदी कसलाही आवाज आला तरी वर जायचं नाहीस तू.
मी हो ला हो आणि ना ला ना अशी मान डोलावत होतो.
मला एक स्वतंत्र खोली दिली राहायला, किचन मधेच झोपून गेली एकोणीस वर्षे आयुष्य काढलेल्या जीवाला काय आनंद झाला सांगू पण एक मात्र खूप खटकलं मला,
वाड्यात एकही पुरुष नव्हता, मी सोडून कुणीही नाही.
वाड्यातील एकही पुरुष जिवंतच नव्हता.
वाड्याच्या एका मोठ्या भिंतीवर चार जणांच्या फोटोला सुकलेले हार टांगलेले होते, पूर्णतः स्वच्छ सुंदर नेटका असलेल्या वाड्यात त्या फोटोंना कितीतरी जाळे धूळ तशीच होती.

कारण काय असावं ?? माझ्या मनात पडलेल्या ह्या प्रश्नच वेळीच मला उत्तर मिळालं असत तर कदाचित मी मरणाच्या दारात गेलोच नसतो. . .

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त

बोकलत - ते पहिल्या भागात लिहलेला आहे कि त्यात तुम्ही काय सांगता. जरा वाचा कि शांतपणे, सगळीकडे सारखा नुसता धुमाकूळ