थरारक . . .

Submitted by सोहनी सोहनी on 10 December, 2019 - 23:59

थरारक . . .

हुंम हूं करत वारा सुटला आहे एक विस्तीर्ण जागेत, सगळीकडे धुळीचे लोट, डोळे उघडे परंतु माझे श्वास ???

हे वादळ कसलं ? हे माळरान कुठलं आहे? आणि मी इथे एकटा कसा? कुठे ओढून नेत आहे हे मला?माझा माझ्यावर माझ्या विचारांवर माझ्या मनशक्तीवर काहीच नियंत्रण का नाहीये??

कोण सुंदरी आहे जी मला भुलवण्याचा प्रयत्न करतेय?माझा हात धरून मला कोठे घेऊन चाललीये?माझ्याकडे न पाहता, मला न विचारता?
हे वादळ इतकं जोरात का आहे? कोणाचा आवाज येतोय मला?

दुरून आर्त हाक येतेय थांब, थांब बिभास, थांब. नाम घे, शिव नाम घे. . . हि थरकाप उडवणारी गुरगुर कसली ?

"ओम नमः शिवाय" "ओम नमः शिवाय" "ओम नमः शिवाय" दीर्घ आवाज जवळ येतोय. ती सुंदरी किंचाळत का पळाली?

हे मोहक स्वर कोणाचे आहेत, कोण इतक्या मनोभावे नामस्मरण करतंय? ते वादळ, ते सगळं कुठे गेलं?
मी कुठे आहे?

हर हर महादेव शंकर, जटाजूट सिर गंगाधर l
गिरिजापती त्रिलोचन, निळकंठ अमर त्रुशूलन l
गणपती सूत लंबोदर, हर हर महादेव शंकर ll

मनोभावे शिव आराधनेच्या चेतनात्मक आवाजाने, धूप अगरबत्तीच्या घमघमीने त्या पवित्र जागेत मला शुद्ध आली, कि शुद्दीत आल्याचा भास झाला पण शिव आराधना करणाऱ्या त्यांचे स्वर मनाला धीर देत होते.
किलकिल्या डोळ्यांनी पाहिलं तर समोर अगदी समोरच ते शांत चित्ताने मन लावून शिव आराधना करत होते.
कितीतरी वेळेनंतर मला मी जिवंत असल्याची जाणीव झाली.

आजूबाजूला पाहिलं,
मी कदाचित देव्हार्याच्या खोलीत होतो, शेणाने सारवलेल्या कुडांची ती खोली, सर्वत्र वेगवेगळ्या पसरलेल्या वेली, त्यावर वेगवेगळी रानटी फुले, काही वेली कुडांमधून बाहेर तर काही आत आल्या होत्या, सगळ्या भिंती हिरव्या पानांनी बहरलेल्या दिसत होत्या, कुठे तरीच उरलेल्या जागेत ते शेणाने सरावलेले कूड दिसत होते, नाहीतर वेलींच्याच भिंती वाटत होत्या त्या.
आत मध्ये डोकावणारे सूर्यकिरण शरीरातील सर्व शक्ती जागवत होते, समोरच शिवलिंग होते आणि त्या समोर ते आराधना करत होते, मी हिम्मत करून उठायचा प्रयत्न करत होतो.

"उठू नकोस आराम कर, बाळ" ते माझ्याकडे न पाहताच मला म्हणाले, शिवपिंडीला नमन करून ते माझ्याकडे वळले.
चेहऱ्यावर वेगळंच तेज होतं त्यांच्या, मी तुझ्या सोबत आहे अशी शाश्वक नजर, तेजस्वी व्यक्तिमत्व, ते चेहऱ्यावर समाधानकारक हास्य ठेऊन माझ्याजवळ आले, तसं माझ्या डोळ्यांत पाणी तरळलं, काल जर हि व्यक्ती माझ्या सोबत नसती तर कदाचित मी जिवंतच नसतो.
माझ्या मनाचे भाव ओळखून त्यांनी माझ्या डोक्यावरून मायेने हात फिरवला,
अजून काय हवं होतं माझ्यासारख्या बेवारस अनाथ जीवाला. . .

त्यांचा आधार घेऊन मी बाहेर आलो, काल इथे आलो ते मुळी शुद्ध हरपूनच, हि एक छोटं घर वजा झोपडी पण मी एक विस्तृत कुटी म्हणेन अशी चार खोल्यांची वास्तू, छान शेणाने सारवलेली जमीन, सगळीकडे हिरवळ आणि कमालीचं प्रसन्न वातावरण.
किती दिवसांनी मी अशी प्रसन्न हवा माझ्या हृदयात घेत होतो.
त्यांनी मला खाली बसवलं, तेवढ्यात आतून तिथल्याच एका माणसाने गरम गरम जेवण वाढून आणलं.
"झालं गेलं ते एका वाईट स्वप्नासारखं विसरून जा, आणि नवीन सुरुवात कर, जेऊन घे. बरं वाटेल तुला बाळ"

बाळ हाक ऐकून मन तृप्त झालं, पोटात जाणाऱ्या अन्नापेक्षा कानात जाणारे हे शब्द मला कधीच मिळालं नसेल असं समाधान देत होते. बाळ, इतक्या प्रेमाने माझ्या सारख्या जीवाला कुणी संबोधलं नव्हतं ह्या उभ्या आयुष्यात.
आजन्म अवहेलनेचे जगणे जगून ह्या असल्या प्रेमाची खरंच सवय नव्हती राहिली आणि ह्या असल्या जगण्यातून बाहेर पडण्याचा एक क्षीण प्रयत्न केला तर हे असले भोग नशिबी दिले माझ्या फाटक्या दैवाने. अप्पा भेटले नसते तर त्यातून बाहेर पडण्यासाठी कदाचित मृत्यूचं एक मात्र पर्याय होता कि मृत्यू नंतरदेखील असाच फरफटत राहिलो असतो.

दुःस्वप्नासारखं विसरायला ते स्वप्न नव्हतं, मी ते जगलोय, माझ्यासोबत ते झालय आणि मी ते भयानक सगळं पाहिलं आहे. जे घडलं ते अतिशय भयानक होतं, हिंस्र होतं, अमानवी होतं, कदाचित आयुष्यभर मी नाही विसरू शकणार ते.
त्या वाड्याच्या नुसत्या विचाराने देखील माझ्या मनात भीतीने कळ आली.

ते माझ्याकडेच पाहत होते,
"नष्ट झालं आहे ते सगळं, मनातून भीती काढून टाक, शिव नामस्मरण कर, सुरळीत होईल सगळं, तुला पाहिजे असेल तर तू इथेही कायमस्वरूपी राहू शकतोस" इतकं म्हणून ते बाहेरील झाडांना पाणी द्यायला गेले.

माझ्या मनाला ह्या अश्या पवित्र वातावरणात देखील त्या भयानक आठवणींनी मला थरारून सोडलं . . .

क्रमशः

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छानचं..
कालचक्र कथेचा काही संबंध आहे का?

मस्त गं! Happy
या भागाने कथेची उत्सुकता वाढवली आहे.
मी म्हणाले होते ना सवडीने वाचून काढेन.... आज उगवला बघ सवडीचा दिवस. सगळे भाग वाचून काढते आता. Happy