कुलदेवतेचे आयुष्यातील, मनातील स्थान, भूमिका

Submitted by सामो on 8 November, 2019 - 14:18

हिंदू धर्मात ३३ कोटी देव आहेत. राम, कृष्ण, विष्णू, विठ्ठल , शंकर, ब्रह्मदेव अशा कालापरत्वे आता मुख्य असलेल्या देवता आहेतच पण पूर्वेची देवता इंद्र, पश्चिमेची वरुण, दक्षिण - यम, उत्तर - कुबेर, वगैरे दिकपालही आहेत. अनेक देवी आहेत, काही देवींचे पुत्र जसे पार्वतीचा स्कंद व गजानन वगैरे वगैरे. कुलदेवता तर निराळ्याच - एकविरा, शांतादुर्गा, जोतिबा वगैरे.
नक्की कोणाची उपासना करायची व का? त्याचेही ढोबळ नियम आहेत.
उदाहरणार्थ - लक्ष्मीची समृद्धीसाठी, नरसिंहाची ऋणमुक्तीकरता (ऋणमोचन स्तोत्र घ्या ना), गणपतीची बुद्धीसाठी वगैरे.
.
परवाचेच उदाहरण घ्यायचे झाले तर, नवर्‍याच्या त्वचेवरील तीळाची बायॉप्सी झाली. नंतर ५-६ दिवस लागले निकाल यायला. पण तेवढ्या काळात जी घालमेल झाली ती (वाईट रीतीने) अवर्णनियच, न विसरता येणारी होती Sad पण या काळात मी कुलदेवतेला शरण गेले कारण एकच माझ्या सासूबाई तिचं नेहमी करायच्या व त्यांचे आयुष्य बरेचसे खडतर गेलेले असले तरी त्यांना दैवाची साथ होती. म्हणजे आमच्या एकविरा आईचा वरदहस्त असावा, देवीची कृपा असावी अशी त्यांची मनःशांती व धैर्य होते
मला मात्र या ६ दिवसात अचानक एकविरा देवीची आठवण आली व मी रोज स्तोत्र म्हणू लागले, तिच्या तस्बिरीपुढे उपरती झाल्याप्रमाणे, हात जोडू लागले. ६ दिवसांनी, निकाल चांगला आला, benign आला वगैरे ठीक आहे.
पण मला काही प्रश्न पडले.
(१) आपल्या जीवनात कुलदेवतेचे महत्त्व काय असते व का असते? खरच ही देवता आपल्या पाठीशी उभी रहाते का? त्या म्हणण्यात काही तथ्य आहे का?
(२) जीवनात गुरुचे महत्व काय असते व का असते?
(३) अन्य देवांचे आपल्या आयुष्यात नक्की काय स्थान असते?
उदाहरणार्थ, गेल्या काही दिवसात, मला असे आतूनच वाटले की आपल्याला यातून ना राम, ना शंकर , ना गणपती, कोणी जर बाहेर काढू शकेल तर फक्त देवी काढू शकेल. हा आडाखा कितपत अचूक आहे? मी भारतात असतेवेळी बरेचदा एकविरेला गेलेले आहे परंतु दर वेळी डोकं दुखणे किंवा काहीतरी तत्सम घडत असे. एकदा तर पायथ्याशी पोचल्यानंतर पित्त झाल्याने अन्नही उलटलेले होते.
अजुन एक ज्यादिवशी नवर्‍याचि बायॉप्सी झाली त्याच दिवशी नेमके माझ्या हातून, मराठी सप्तशती वाचणे घडले. म्हणजे मी पहील्यांदा ओढीने पूर्ण मराठी सप्तशती आयुष्यात पहील्यांदा त्या दिवशी वाचली होती सकाळी व नंतर त्याच दिवशी रुटीन चेक अपमध्ये तो तीळ सापडला व डॉक्टरांनी ताबडतोब बायॉप्सी केली. हाही योगायोगच की.
अर्थात हे सर्व श्रद्धेचे, मनाचे खेळ आहेत असेही एक म्हणता येइल पण 'कुलदेवता' याविषयी अधिकारी किंवा जाणकार लोकांचे अनुभव ऐकायला आवडतील.
______________________
दुर्गा सप्तशतीच्या शेवटच्या एका अध्यायात 'एकविरा' देवीचा उल्लेख येतो. तामसी गुणप्रधान देवी आहे असे वाचल्याचे स्मरते. म्हणजे रागीट, संतापी असावी. तसेच तिचे जे मंत्र मला सापडले त्यात तिचे नाव, महामारी, कालरात्री, क्षुधा, तृषा आदि तामसी शक्तींशी निगडीत सापडले. वरती माझा डोके दुखणे, उलटी होणे हे माझे अनुभव सांगीतले आहेतच.
______________
बायॉप्सीच्या निकालानंतर मात्र तिच्याविषयी सर्व माहीती नेट विंचरुन शोधून काढली. विष्णूदासांनी लिहीलेली स्तोत्रे, परशुरामकृत रेणुका स्तव व अनेक मंत्र. आता रोज सकाळ संध्याकाळ , तिचे स्तोत्र म्हणण्याचा नियमच स्वतःला घालून घेतलेला आहे.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी तर देवालाही समजून घेतले...असेल तुझी काही हतबलता...नाहीतर तू ऐकलच असतेस ना माझे.... >>> ग्रेट, नतमस्तक. केवढे उद्दात विचार आहेत.

सामो माझ्याकडूनही धन्यवाद.

आदिश्री तुमचा एक प्रतिसाद वाचून रमण महर्षींची एक कथा आठवली. एकदा एक विष्णुभक्त रमण महर्षिकडे जातो आणि बोलता बोलता विचारतो की माझे देहावसान झाल्यावर मला विष्णुधाम प्राप्त होईल का. रमण महर्षी हो म्हणतात. तो भक्त एकदम उल्हसित होऊन विचारतो मला भगवान विष्णूंचे दर्शन होईल का? रमण महर्षी हो म्हणतात. तो भक्त एकदम आनंदित होईन विचारतो की ते माझ्याशी बोलतील का? ' मण महर्षी त्यालाही हो म्हणतात. मग भक्त न राहवून विचारतो ते काय बोलतील माझ्याशी? तेंव्हा रमण महर्षी म्हणतात 'तू कोण आहेस याचा शोध घे' (क: अहं ? - स: अहं Happy )
शेवटी सर्वांना सगुणाकडून निर्गुणाकडेच जायचे आहे. मार्ग फक्त वेगवेगळे. ध्यानयोग काय भक्तियोग काय किंवा ध्यानयोग काय शेवटी तिकडेच घेऊन जाणार. जो मार्ग आपल्याला भावतो सोपा वाटतो त्या मार्गाने चालत राहावे.

खरे आहे... कोहंसोहं...आपला मार्ग आपल्याला निवडतो.....योग्य वेळ यावी लागते ...सगळे मार्ग त्या एका परमसत्याकडे जातात... आपल्याला आनंद वाटेल ते करावे......जन्मोजन्मीचा प्रवास आहे....जे चिरंतन आहे.. त्याला आपल्या मर्यादित जाणीवामध्ये मापू शकत नाही...

आदिश्री, अन्जू, तुमच्या मनात नि मुखात एवढं सोसूनही भगवंताचे नाम वा स्मरण टिकून आहे, हाच प्रत्यय आहे की तुमची हाक त्याच्यापर्यंत पोहोचत आहे. बाकी काही बोलण्याची माझी पात्रता नाही. पण विपरीत परिस्थितीतही भगवंतावरील विश्वास दृढ असणे ही त्याची कृपाच होय असे संत सांगतात.

अञूताई, आदिश्री, तुमच्या पोस्टस् छानच आहेत.

प्रतिसांदामध्ये कुलदेवता म्हणजे काय? कुलदैवत / कुलदेवता ही संज्ञा नेमकी कधी पासून आणि कशी आली या विषयीपण माहीती द्यावी जाणकारांनी.

विष्णुसहस्त्रनामाविषयी असे ऐकिले आहे की त्याचे उच्चार फार महत्वाचे आहेत. चुकीचे उच्चार झाल्यास विपरीत परिणाम संभवतात.

स्तोत्र कठीण असं ऐकून आहे पण मी नामावली म्हणते त्यात फक्त विष्णुची नावं आहेत, ते सोपं आहे.

माझी गीता मात्र वाचून पूर्ण होत नाही, त्यात अनेक अडथळे येतात, अर्थासहित एकदा मला पूर्ण वाचायची आहे. नवऱ्याची दोनदा वाचून झाली पण माझी होत नाही, प्रयत्न सोडलेत आता सध्या. बाकी काही ठरवलं तर विशेष अडचणी येत नाही, वाचून होतं.

विष्णूसहस्त्रनाम स्तोत्र सुरूवातीला वाचायला कठीन जातं कारण ते संस्कृत मध्ये आहे,पण उच्चार निट जमलेत की मग फारसे कठीण जात नाही ,पण वाचायला २० - ३० मिनीटे लागतात.मला तर सुरूवातीला गणपती अथर्वशिर्ष सुध्दा वाचायला कठीन जायचं ,पण आता जमतं

मलाही गीता वाचण्यात अडचणी येतात किंवा निरस वाटते... म्हणून ज्ञानेश्वरी घेतली तर ती दैनंदिन निघाली ...फार कमी ओव्या आहेत त्यात...सोपी सार्थ आणि विस्तृत अशी आहे का online ?
आपली कुलदैवतेशी नाते दूर राहून कसे दृढ़ ठेवावे.. .. मुलांना त्या बाबतीत कसे समजावून सांगावे.....So they will continue...मला असे नको आहे की त्यांंना अडचणीत असतानाच फक्त आठवण यावी..

पुरुष देव असे प्रेमळ वाटत नाहीत. पण गुरु आणि देवी हे फार प्रेमळ वाटतात म्हणजे तसं वाटतं, अनुभव येतो. Happy

चांगले आहे की सामो...मला असे relate करता येत नाही... मला परमात्मा असा देवी ,सद्गुरु, पुरुषदेव वेगवेगळ्या देवता even कुलदेवता ई.separate रुपामध्ये बघता येत नाही...एकमात्र आकार नसलेला शीतल प्रकाश वाटतो......

आदिश्री देवीचे श्लोक म्हण , दुर्गा सप्तश्लोकी, महालक्ष्मी अष्टक, अपराधक्षमा प्रार्थना, .... इतकं मस्त वाटतं गं. असं हृदय उचंबळून येतं Happy एक मिनीट माझा एक लेख इथे देते -

आदि शंकराचार्यांचे देव्यपराधक्षमापन स्तोत्र वाचल्यानंतर बराच वेळ मनात हे विचार येत राहिले.
.
न मंत्र नो यंत्रं तदपि न जाने स्तुतिमहो,
न चाव्हानं ध्यानं तदपि च न जाने स्तुति कथाः।
न जाने मुद्रास्ते तदपि च न जाने विलपनं,
परं जाने मात्स्तवदनुसरणं क्लेशहरणं॥१॥
.
(हे माते, मला ना मंत्रांचे ना तंत्रांचे ज्ञान आहे. तुझी स्तुती, आवाहन किंवा ध्यान कसे करावे याविषयी मी अनभिज्ञ आहे. ना मला योगमुद्रा येतात ना विलाप करून, टाहो फोडून, आरतीने तुला बोलविता येते. पण मला एक नक्की समजते की तुला अनुसरले, तुझ्या मागे मागे , तुझ्या पावलावर पाऊल टाकून फिरले की माझे क्लेश दूर होतात. )
.
एखादं बाळ आईवेडं असतं, सारखा आईचा पदर धरून असतं, आईचे लक्ष वेधून घेत असतं. आई जरा नजरेआड झालेली त्याला खपत नाही लग्गेच चेहरा रडवेला होतो. अगदी ओठ काढून , दीनवाणं होउन जातं बाळ. आणि मग आई कुठूनतरी ते पहाते किंवा ऐकते आणि हातातलं काम टाकून,लगबगीने येउन त्याला हृदयाशी कवळते, चुचकारते, गोड बोलून बाळाला आधी शांत करते. बाळ गोड हसून आईला समाधानाची पावती देउन टाकतं आणि आईचे हृदय परत एकदा बाळ मुठीत सामावून जातं.
.
न मोक्षस्याकांक्षा भव्विभववांछापि च न मे
न विज्ञानापेक्षा शशिमुखि सुखेच्छापि न पुनः।
अतस्त्वां संयावे जननि जननं यातु मम वै,
मृडानि रुद्राणी शिव शिव भवानीति जपतः॥८॥
.
(हे विधुवदना माते, मला ना मोक्षाचॆ आकांक्षा आहे, ना एखादी कला जाणून घेण्याची, विज्ञान ज्ञान एवढेच काय कोणत्याच सुखाचीही मला अपेक्षा नाही. फक्त मृडानी, रुद्राणी शिव शिव भवानी असे तुझे नाव घेत माझा जन्म सरावा. )
.
त्या बाळाला ना खेळणी आवडतात ना ते फ़ुलपाखरांमागे, पक्ष्यांमागे दुडूदुडू धावतं ना अन्य मुलांच्यात रमतं. त्याला बस आईच लागते. म्म -मं-आ-आ अशा बोबड्या बोलांनी आईला बोलण्यातच त्याला आनंद वाटतो.
.
पृथिव्यां पुत्रास्ते जननि बहवः सन्ति सरला,
परं तेषाम् मध्ये विरल तरलोऽहम् तव सुतः।
मदीयोऽयं त्यागः समुचितमिदं नो तव शिवे,
कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति॥३॥
.
(पृथ्वीवरती सरळमार्गी असे तुझे अनेक पुत्र आहेत त्यासर्वांमध्ये मी वेगळाच आहे. खोडकर, चंचल, स्वतंत्र वृतीचा आहे.पण तू मला त्यागाणार नाहीस याची मला खात्री आहे कारण एकवेळ कुपुत्र जन्मास येउ शकतो पण माता ही कुमाता कधीही नसते.)
.
याउलट एखादं बाळ सुटं असतं. त्याला आई फक्त नजरेच्या टप्प्यात असणे महत्त्वाचे वाटते. तेवढं मात्र असलं तर ते बाकी त्याच्या त्याच्या खेळात रमून जातं. कधी मूळाक्षरांचे ठोकळे रचून त्यांची इमारतच बनव तर कधी चेंडूशीच नाहीतर बाहुली-बाहुल्याशीच खेळ कधी गोलाकार आकाराचा ठोकळा गोलाकार साच्यात बसव तर कधी तेली खडूने, कागदावर गिरगिट्या आख.
.
विघरेज्ञानेन द्रविणविरहेण्लसतया,
विधेयाशक्यत्त्वात्तव चरणयोर्या च्युतिर्भूत।
तदेतत क्षन्तव्यं जननि सकलोद्धरिणि शिवे,
कुपुत्रो जायेत क्विचिदपि कुमाता न भवति॥२॥
.
(तुझी पूजा करण्याचे ज्ञान तर सोडाच पूजेकरता लागणारे पुरेसे द्रव्यादेखील मजकडे नाही. आळस तर माझ्यात काठोकाठ भरला आहे. या सर्वामुळे मी तुझ्या चरणांना अंतरलो आहे पण सर्वांचे कल्याण करणाऱ्या हे माते तू मला क्षमा करशील याची मला खात्री आहे कारण एकवेळ कुपुत्र जन्मास येउ शकतो पण माता ही कुमाता कधीही नसते.)
.
हां मात्र कधीकधी ते गोल ठोकळा, चौकोनी साच्यात बसवायला जातं अन मग जमलं नाही की वैतागून रडू लागतं. आई दुरून कौतुकाने जर या बाललीला पहात असेल तर तिला ताबडतोब कळतं की आता हस्तक्षेप करण्याची वेळ झाली आहे आणि ती येउन बाळाला दाखवते "असं नाही रे छकुल्या , गोल ठोकळा, हा गोल साच्यातच जाणार". हे ज्ञान बाळाला नवीन तर असताच पण अपूर्वाईचही असतं. आणि मग ते आत्मसात करून बाळ विशिष्ठ आकाराचा ठोकळा, बरोबर योग्य त्या साच्यात घालायला शिकतं. त्याला काय अभिमान वाटतो की जणू त्याच्याच बुद्धीने हे कौशल्य हस्तगत झाले आहे. आई मात्र दुरून प्रेमभऱ्या नजरेने त्याची दृष्ट काढण्यात मग्न असते.
.
स्तोत्र वाचून झाल्यानंतर बराच वेळ आई कामात असतानाही मागेमागे लागून आईचा पदर धरून धरून खेळणारं बाळ (आदि शंकराचार्य) आणि त्याच्यावर न रागावणारी सर्व विश्वाची जननी, भवानी डोळ्यांसमोर तरळत राहीले .

"म्हणून ज्ञानेश्वरी घेतली तर ती दैनंदिन निघाली ...फार कमी ओव्या आहेत त्यात...सोपी सार्थ आणि विस्तृत अशी आहे का online ?" ----------- आदिश्री, फेसबुक वर एक ग्रुप आहे 'सार्थ ज्ञानेश्वरी' म्हणून. तिथं रोज ज्ञानेश्वरीच्या दहा ओव्या मराठी अर्थासकट पोस्ट केल्या जातात. नवीन आवर्तन सुरु होऊन साधारण दोन अडीच महिने झाले आहेत फक्त. त्यामुळे वाटल्यास आधीच्या ओव्या आणि अर्थ वाचून लवकर होईल आणि नंतर रोज दहा ओव्या अर्थासकट वाचणेही शक्य होईल असे मला वाटते.

न मोक्षस्याकांक्षा भव्विभववांछापि च न मे
न विज्ञानापेक्षा शशिमुखि सुखेच्छापि न पुनः।
अतस्त्वां संयावे जननि जननं यातु मम वै,
मृडानि रुद्राणी शिव शिव भवानीति जपतः॥८॥
अतिशय आवडले .... धन्यवाद सामो.. आता याचे youtube version शोधते...मला ऐकायला खूप आवडते....
धन्यवाद कोहंसोहं... नक्की पहाते...
धन्यवाद लंपन आणि निलाक्षी..

असे ऐकले आहे की मंत्रदेवतेचा सव्वा लाख वेळा जप झाला की तो मंत्र सिद्ध होतो म्हणजे आपल्यासाठी जागृत होतो. १२ लाख वेळा विधीसहित जप केल्यास कुंडलीतील एका स्थानाची शुद्धी होते म्हणजे त्या स्थानावर असलेला वाईट ग्रहांचा प्रभाव अत्यंत क्षीण होतो किंवा पूर्णपणे नष्ट होतो. असे हे अनुष्ठान १२ वेळा झाले म्हणजे १ कोटी ४४ लाख वेळा जप झाला की कुंडलीतील १२ स्थाने शुद्ध होतात आणि या जन्मातील वाईट ग्रहप्रभाव नष्ट होतो. उरलेले जीवन गुरुकृपेने आणि परमेश्वरी कृपेने चालते.
मंत्रजप साडेतीन कोटी वेळा झाला की भूतशुद्धी आणि चित्तशुद्धी होते. शरीरातील पंचमहाभूते शुद्ध होतात आणि मनाचा चंचलपणा, वखवख, पूर्वजन्मेचे वाईट संस्कार कमी होऊन चित्तशुद्धी होते. इथून पुढे मंत्र सूक्ष्मपणे कार्य करू लागतो. साधारण मंत्रअक्षरइतका कोटी जप झाला की त्या देवतेचे दर्शन होते आणि मुक्तिमार्ग सुलभ होतो. (उदा श्री राम जय राम जयजय राम या त्रयोदशाक्षरी मंत्राचा १३ कोटी जप झाला की रामाचे दर्शन होते).
परंतु मंत्रजपाचे काही नियम आहेत व ते पाळले तरच अनुभूती येते. मंत्र गुरूकडून विधीसहित अनुग्रह किंवा दीक्षा स्वरूपात मिळालेला असल्यास सर्वोत्तम. मग गुरूंनी सांगितलेल्या नियमानुसार जप करावा. गुरूकडून मंत्र मिळालेला नसल्यास इष्टदेवतेचा किंवा कुलदेवतेचा जप करावा असे वाचले आहे.

नामाचे आणि जपाचे महत्व अनन्य आहे... परोपकार आणि दानधर्म ...तो ही अहं बाजूला ठेवून..स्वामी दत्तावधूत यांनी प्रारब्ध शुद्धि साठी अत्यंत आवश्यक सांगीतला आहे.
शिवाय सत्याचरण मग यात अतिशयोक्ती ,लपवालफव टाळणे, सत्य बोलणे सगळेच आले....असत्याची कास धरून परमसत्याच्या क्रुपेची अपेक्षा करू नये.

मी नवरात्रात देवी त्रिशती वाचते किंवा एरवी स्वामी सप्तशती वाचते, ती दत्तावधुत महाराज यांनीच लिहीली आहे.

स्वामी परमहंस योगानंद यांचं योगी कथामृत पुस्तकपण मला जबरदस्त आवडलेल्यापैकी आहे. ते वाचून मला क्रियायोग शिकावा असं मात्र वाटलं नाही, नवऱ्याला वाटलं. तो आहे क्रियायोग साधक. मला योगानंद यांचा प्रवास आवडला. ते पुस्तक कधीही मनात आले की एखादे प्रकरण काढून वाचते मी. मोठं असूनही ओघवतं आहे.

श्री. एम. यांचंही पुस्तक वाचलं मी, आधी मी बरेच दिवस वाचायला घेतलं नव्हतं, कंटाळा येईल असं वाटलं पण नंतर वाचायला घेतल्यावर मात्र आवडलं.

बाकी परोपकार, दानधर्म बाबत माझे बाबा सांगतात की जास्त वाच्यता करायची नाही आपण कोणासाठी काही केलं तर, या हाताने दिलेलं दान त्या हाताला कळू देऊ नये, जमेल तसं दुसऱ्यासाठी करत राहा. कोणी तुमच्यासाठी काही केलं तर मात्र विसरू नका, लक्षात ठेवा. माझे बाबा खरंतर अतिशय साधेसुधे पण त्यांनी छोट्या छोट्या गोष्टीतून आम्हाला खूप शिकवलं. जी काही थोडीफार सकारात्मकता माझ्याकडे आलीय, ती त्यांच्याकडून आलीय. ते पोथ्या किंवा धार्मिक फार वाचणाऱ्या गटातले नाहीत, ते आई वाचते, ती नेमधर्म करते.

मी धार्मिक वाचायला सुरुवात करायच्या आधीपासूनच बऱ्याच चांगल्या गोष्टी खरंतर बाबांनी सांगितल्या होत्या.

मध्यंतरी एका नामांकित ज्योतिषी महोदयांना मुलीची पत्रिका दाखवली होती. त्यांनी कुलस्वामीनीची पूजा करण्याची पद्धत सांगीतली त्यात -
हिरवी नऊ वारी + खण+वेणी+ हळद ++ कुंकू +आरसा+मुखदर्शनासाठी आरसा+फणि + मंगळसूत्र + मोत्याची नथ + हिरव्या बांगड्या अशी शृंगारीक ओटी दर २ वर्षांनी प्रेमपूर्वक भरा म्हणुन सांगीतले. देवीला ३ प्रदक्षीणा प्रेमपूर्वक घालायच्या. तसेच देवीचा जागर, गोंधळ करावयास सांगीतले. महापूजा व महानैवेद्य करायचा.

मुख्य त्यांनीही हे सर्व तर कराच पण नामस्मरण करा असे सांगीतले.

सामो, कुलस्वामिनी ही आपल्या कुळातील जन्मलेल्या लोकांचे हित चिंतिते, काळजी घेते अशी श्रद्धा आहे म्हणुन तिच्या विषयी कृतज्ञता हवी या भूमिकेतून असे विधी सांगितले जातात. ज्यांना ते शक्यच नसेल त्यांच्या साठी मानसपूजेची सोयही आहेच.

एक गोष्ट सांगते..
माझी लग्नानंतरची कुलदेवी आंबेजोगाईची योगेश्वरी देवी आहे. आम्ही लग्नानंतर दर्शनाला गेलो होतो. तेव्हाच मंदीर आणि देवी पाहून खूप प्रसन्न वाटलं होतं. मग मुलगा झाल्यावर त्यालाही दर्शनाला न्यायचं होतं, reservation वगैरे सगळं झालं होतं. पण ऐनवेळी ola वाल्याने दगा दिला. म्हणून परत ऑटो बुक करुन मग निघालो. वाटेत पूर्ण वेळ मातेचा जप चालू होता आम्हा दोघांचाही की गाडी गाठता येऊ दे. नशिबाने ऑटो वाला ही खूप चांगला मिळाला सगळं सांगितल्यावर त्यानेही फास्ट चालवली तरीही पुणे स्टेशन च्या आधीच्या सिग्नल ला खूप वेळ गेला, आम्ही आशा सोडून दिली पण जप चालूच होता. गाडीची वेळ निघून गेली होती, स्टेशन वर पोचलो नवऱ्याने मुलाला कडेवर घेतले होते अन माझ्याकडे जड बॅग, दोघेही पळत ब्रिज क्रॉस करून प्लॅटफॉर्म वर पोचलो तर अपेक्षेप्रमाणे गाडी दिसली नाही, सहज डावीकडे पाहिलं तर थोड्या अंतरावर चक्क ट्रेन उभी होती आणि आता सुटत होती परत पळालो आणि नवरा आणि मुलगा एका डब्यात आणि मी दुसऱ्या असं करून गाडीत चढलो. एवढं पळल्यामुळे पाय अक्षरशः थरथरत होते आत उभं राहायला ही जागा नव्हती. थोड्या वेळाने तिथल्या लोकांनी सांगितले की गाडी ठरल्या वेळेलाच सुटली होती पण पुढे गेल्यावर कोणीतरी चेन खेचल्यामुळे थांबली होती आणि त्यामुळे आम्हाला मिळाली. नंतर पुढच्या स्टेशनवर आम्ही उतरून आमच्या reserved सीट वर गेलो.
परंतू माझा पूर्ण विश्वास आहे की देवीने आमची प्रार्थना ऐकली, तेव्हापासून माझी देवीवरची श्रद्धा अगदी गाढ झाली आहे.
आणि आपण खरंच मनापासून देवीची प्रार्थना केली तर देवी नक्की आपलं संकट निवारायला बळ देते याची खात्री आहे.

सान्वी किती छान अनुभव.

माझी माहेरची कुलस्वामिनी योगेश्वरी आहे, सहा सात वर्षापूर्वी, माहेरचे सर्व आणि आम्ही तिघे इथून गाडी करून गेलेलो. परळी वैजनाथला पण जाऊन आलो. तिथे प्रत्यक्ष जाऊन कुलस्वामिनीचा छोटा फोटो आणून देवात ठेवावा हि इच्छा पूर्ण झाली माझी. फार प्रसन्न वाटतं तिचं रूप बघून.

मला कोल्हापूरच्या अंबाबाईला पण रोज दोनदा वेगवेगळ्या प्रकारे सजवतात ते बघायला आवडतं. एकदा काकड आरतीच्या वेळी फुलांनी आणि कापसांच्या वस्त्रांनी सजवलेलं रूप आणि दुपारी भरगच्च दागिने रूप, तिला वेगवेगळ्या प्रकारे साडी नेसवतात ते कसब वाटतं मला. टिळा आकार पण रोज वेगवेगळा.

धन्यवाद अंजु, माझी माहेरची कुलस्वामिनी सप्तश्रुंगी माता आहे. तुम्ही म्हटल्या तसंच सकाळी गेलो तर अभिषेकपासून अरतीपर्यंतचे सगळ्या गोष्टी बघण्याचा योग येतो. अगदी टिळा रेखाटण्यापासून साडी नेसवणे, मग दागिने परिधान करणे, अगदी तंद्री लागते बघताना.

मस्त.

मी कोल्हापूरला गेले नाहीये म्हणजे on the way कोल्हापूर बघितलं श्रीरामपूर कोकण प्रवासात पण साईट like केल्याने फोटो येतात. हल्ली सप्तशृंगीचे पण येतात आरतीचे व्हिडीओ like न करता. मस्त असतात. सासरची कुलस्वामिनी रत्नागिरीजवळ ढोकमळे गाव आहे तिथली आहे, बंदिजाई नाव. एकदा जाऊन आलो.

Pages