चिऊताईगिरी

Submitted by Dr Raju Kasambe on 27 July, 2019 - 01:07

चिऊताईगिरी

मुन्नाभाईची बघून गांधीगिरी
चिऊताईला सुद्धा चढले स्फुरण
ठरवले तिने चिऊताईगिरीचे धोरण !

चिऊताई मोबाईल टॉवरवर चढली
तिने चीवचीवाट करीत नारे लावले
पण, शिकारी पक्ष्यांनी तिचे लचके तोडले !

उंच इमारतींच्या बंद काळ्या काचांवर
तिने इवल्याशा चोचीने केले प्रहार
पण, तिची चोच तुटून ती जायबंदी झाली !

तिने भरचौकात चिमण्यांचा थवा जमवला
कावळ्यांच्या विरोधात तिने आंदोलन केले
पण, गावगुंड कावळ्यांनी तिच्यावर हल्ले केले !

घरांमध्ये सदोदित गरगरणारे पंख्यांवीरोधात
गोल गोल फिरून तिने विरोध दर्शविला
पण, पंख्यांच्या पात्यांनी तिचे पंख छाटले !

बगीच्यात फवारल्या जाणाऱ्या कीटकनाशकांच्या विरोधात
विषाक्त कीटक खाऊन तिने चिवचिवाट केला
पण, त्याच कीटकनाशकांनी तिचा घात केला !

अन्न, पाणी आणि निवारा मागत राहिली चिऊताई
चिऊताईची चिऊताईगिरी झाली सपशेल फेल
घटल्या चिमण्या, झाली कबुतर, कावळ्यांची रेलचेल !

थांबव ही चिऊताईगिरी, निक्षून सांगतोय तुला
बदलतंय जग, लवकर बदलव स्वतःला
नाहीतर मिळून जाशील डायनोसॉर युगाला !

(जानेवारी २०१९, अप्रकाशित).

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चिऊताईनी स्वतःत बदल करण्यापेक्षा तिच्यासाठी चांगले बदल आपण आपल्या आजुबाजुला केले पाहिजेत.

छान आहे कविता.
चिऊताईला उद्देशून लिहिलेल्या ओळी 'लेकी बोले सुने लागे' आहेत.