धुकं

Submitted by मोहना on 2 July, 2019 - 22:48

परमजितने हातातलं साप्ताहिक रागारागाने भिरकावलं. किती आतुरतेने वाट पाहत होता तो या साप्ताहिकाची. न्यू यॉर्कमधल्या अतिशय प्रसिद्ध साप्ताहिकाने त्याची मुलाखत घेतली होती. शहरातील सर्वोत्कृष्ट तरुण वकील परमजित अरोरा! गेल्या दोन महिन्यात असंख्यवेळा त्यांच्यांशी बोलण्यात, माहिती देण्यात गेले होते. पण प्रत्यक्षात साप्ताहिकाने त्याच्याच कार्यालयात काम करणार्‍या होतकरु स्त्री वकिलाची मुलाखत छापली होती. परमजित चांगलाच वैतागला. स्वत:ची मुलाखत न आल्याचं त्याला विशेष दु:ख झालं नव्हतं. राग आला होता तो साप्ताहिकाने स्वत:च संपर्क साधून त्याचा वेळ अशारितीने फुकट घालवल्याचा. त्याच्याऐवजी खरंच एखाद्या कर्तृत्ववान स्त्रीची मुलाखत छापली असती तर समजण्यासारखं होतं. पण त्याच्याहाताखाली काम करणारी त्याची सहकारी, जिची कारकीर्द नुकतीच सुरु झाली होती ती एकदम सर्वोत्कृष्ट? परमजितने साप्ताहिकाशी संपर्क साधायचा अयशस्वी प्रयत्न केला. चष्मा काढून त्याने डोळे चोळले. काही क्षण खुर्चीवरच मान मागे करुन तो तसाच बसून राहिला. हळूहळू त्याचा राग शांत होत गेला. त्या मुलाखतीमुळेच तर त्याला मागे वळून पाहता आलं होतं. विस्मृतीत गेलेल्या, मुद्दाम वर येऊ न दिलेल्या कितीतरी आठवणी, घटना ताज्या झाल्या होत्या. त्याला एकदम हुक्की आली. त्याने पापाजींना फोन लावला.
"पापाजी, टॅक्सी रिकामी आहे?"
"येऊ का न्यायला बेटा तुला?"
"हो. पण भाडं घेणार असाल तरच." पापाजी जोरात हसले. त्याचा थकवा कुठल्याकुठे पळाला.
"हसू नका पापाजी. मान्य आहे का ते सांगा."
"हा बेटा, मान्य. घरी पोचायच्या आधी कुठेतरी बाहेरच जेवू. पैसे मी भरणार हे तुला मान्य करावंच लागेल." परमजितने हसत हसत फोन ठेवला. मनावरचा ताण नाहीसा झाल्यासारखं वाटलं. किती सहज त्याने पापाजींना टॅक्सी घेऊन बोलावलं होतं. काही वर्षापूर्वी हे जमलं असतं? खरंच इतकी वर्ष नाहक वाया घालवली? पापाजींची वाट पाहता पाहता परमजितच्या मनातलं विचाराचं चक्र गरगर फिरत राहिलं. भूतकाळात जाऊन पोचलं.

पंजाबामधलं छोटंसं गाव खंबा. खंबा सोडून तो न्यू- यॉर्कला आला तेव्हा बारा वर्षांचा होता. पापाजी फार आठवत नव्हतेच. तो चार - पाच वर्षांचा असतानाच पापाजी अमेरिकेला गेले. ते भारतात यायचे तेव्हा लक्षात राहायचं ती अंगणातल्या बाजेवर झोपून न्यूयॉर्कची त्यांच्याकडून ऐकलेली वर्णनं. पापाजी कुठल्यातरी परीराज्यात राहत असावेत असंच वाटायचं परमजितला. त्याला त्या परीराज्याची उत्सुकता होती पण तिथे फक्त पापाजी आणि या घरात त्याची लाडकी अम्मी. अम्मी हेच त्याचं जग होतं. चाचा - चाची, दादा - दादी आणि बुवापण होतीच. या सर्वांना सोडून पापाजी अमेरिकेत का राहतात हे कोडं त्याला उलगडत नव्हतं. समज यायला लागल्यावर त्याने पापाजींना विचारलंही होतं.
"बेटा, इथल्या रोजीरोटीत भागणं कठीण होतं. तुझ्या अम्मीचे मामा असतात तिकडे. त्यांनी बोलावून घेतलं म्हणून गेलो. तिथून पैसे येतात म्हणून इथला संसार चाललाय."
"अम्मीला आणि मला यायचंय तिकडे."
"अम्मी तर काही बोलली नाही मला." पापाजींना परमजितची चतुराई कळत होती.
"मला यायचंय. पण अम्मी आली तरच मी येईन." त्याने पटकन खरं काय ते सांगून टाकलं.
"आपण तिघं तिकडेच राहायला जायचंय. थोडी कळ काढ बेटा."
"मग इकडे यायचंच नाही? चाचा - चाची येतील आपल्याबरोबर? दादा- दादी आणि दर्शी, बुवापण?"
"त्यांना भेटायला आपण येऊ इथे. शेती सांभाळायला कुणीतरी हवं ना इथे?" पापाजी समजुतीच्या स्वरात म्हणाले पण परमजितला ते पटत नव्हतं.
"मग मला नाही तिकडे राहायला यायचं. मला फक्त न्यू यॉर्क पाहायचंय. शाळेला सुट्टी पडली की येईन." तो रुसक्या स्वरात म्हणाला. पापाजी हसले.
"एकदा आलास की रमशील बेटा तू. नाहीतर ये परत. मग तर झालं?" परमजितच्या चेहर्‍यावर हसू फुटलं. हे असंच संभाषण व्हायचं. पण एक - दोन वर्षात पापाजींनी म्हटलं तसं झालंही. तो आणि अम्मी न्यूयॉर्कला पोचले. न्यू यॉर्कमधल्या भव्य दिव्य इमारती बघून परमजितचे डोळे दिपले.
"बंम्बई अशीच आहे ना?" कधीतरी एकदा त्याने मुंबई पाहिली होती ती पुन्हा बघतोय असं वाटत होतं त्याला.
"आपण शहरात आहोत म्हणून बंम्बईसारखं वाटतंय तुला. उपनगरात गेलं की खेडेगावात गेल्यासारखं वाटतं."
"खंबासारखं?" परमजितच्या डोळ्यात उत्सुकता होती.
"त्याहून सुंदर." पापाजी हसत म्हणाले तशी त्याची अधीरता वाढली.
"आपण तिथेच राहायचं?"
"हा, पण तू मोठा झालास की. खूप पैसे हवेत त्यासाठी." परमजितला नीटसं समजलं नाही. पण पुढे काही विचारेपर्यंत ते घरी पोचले होते.
"इथे राहणार आपण?" त्याचा चेहरा निराशेने काळवंडला. दगडी भिंतींच्या त्या छोटेखानी घराचा नक्षा अवकळा आल्यासारखा होता.
"घर छोटं आहे पण तुला खेळता येईल असं मोठं मैदान आहे. घराला लागूनच." पापाजींनी त्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत इमारतीला लागून असलेल्या मैदानाकडे बोट दाखवलं. परमजितचा चेहरा खुलला. बाहेरुन न आवडलेल्या घरानेही त्याला आपलंसं केलं. त्याच्या खोलीतल्या खिडकीच्या कट्ट्यावर तो तास न तास बसून राहायचा. रस्त्यावरुन सुळक्कन जाणार्‍या गाड्या पाहणं हा त्याचा छंद झाला होता. हळूहळू तो रमला. पण त्याच्या अपेक्षेप्रमाणे पापाजींकडे फार पैसे नव्हते. त्याला वाटत होतं अमेरिकेत पापाजी राहतात म्हणजे श्रीमंत. खंब्यात त्याला शाळेत खूप भाव मिळायचा पापाजी अमेरिकेत म्हणून. पण इथे दिसत होते ते पापाजी वेगळे होते. खंबातले शेजारी राहणारे छाब्रा अंकल जसे कायम सुटाबुटात ऐटीत असत तसंच पापाजी इथे राहत असतील. बॉस असतील, पापाजी, छाब्रा अंकल भेटले की, ’बोलो बॉस’ म्हणत तसं पापाजींना इथे ’बॉस’ म्हणून ओळखत असतील असं त्याला वाटत होतं. त्याच्या कल्पनाविश्वातले पापाजी आणि प्रत्यक्षातले पापाजी फारच वेगळे होते. ते दुकानात काम करतात कळल्यावर त्याला धक्काच बसला आणि रात्री टॅक्सी चालवतात हे काही केल्या त्याला स्वीकारता येईना. दोन दिवस तो घुम्यासारखाच वागत होता. अम्मीला त्याची बेचैनी कळत होती. पण त्याला कसं समजावं हे मात्र कळत नव्हतं. शाळा सुरु झाली की रमेल. बुजल्यासारखा झालाय. भाषेची सवय नाही. अशी स्वत:चीच समजूत अम्मी आणि पापाजींनी घालून घेतली. त्याचं मन गुंतवावं म्हणून त्यांनी त्याच्यावर जबाबदारी सोपवली.
"बेटा, रात्री घरी यायलाच मला दोन वाजतात. सकाळी परत कामावर जायचं असतं. तू मदत करशील?" नाईलाजाने परमजितला विचारावं लागलं,
"मदत? करेन ना. काय करु? मी येऊ तुमच्याबरोबर?" पापाजी हसले.
"माझ्याबरोबर येऊन तू काय करणार? सकाळी उठलास की गाडी स्वच्छ करता येईल का तुला? अजून तुझी शाळा सुरु व्हायची आहे. तोपर्यंत कर. नंतर अम्मी करेल. तेवढं एक काम कमी होईल माझं." परमजितने मुकाट्याने ती जबाबदारी स्वीकारली. त्या रात्री त्याला मोठं झाल्यासारखं वाटायला लागलं. पापाजींना जेवढी मदत करता येईल तेवढी करायला हवी हे ही कुठेतरी त्याच्या मनाने स्वीकारलं.

गाणी गुणगुणत रोज गाडी स्वच्छ करायला लागला परमजित. त्याचाही वेळ जायला लागला. कितीतरी वेळा गाडीतच तो गाणी ऐकत बसायचा. पापाजींच्या जागी स्वत:ला ठेवून मनातून तो गाडीही चालवायला लागला. कधी आरसे हलवून बघ, गाडी मागे नेल्यासारखं कर, कुणीतरी समोर आल्यासारखं एकदम थांबव अशा हालचाली करत तो सैर करुन यायचा मनातून. कधी पापाजी दुपारी जेवायला आले की तो तेवढ्यात काचा पुसायचा, गाडी आतून स्वच्छ करायचा तर कधी लवकर उठून काम आटपून टाकायचा. संध्याकाळी अम्मी मागे लागली की तो मैदानावरही जायला लागला. गोर्‍या मुलांबरोबर खेळायला जायला परमजित बिचकत होता. शेजारी एक - दोन भारतीय मुलं होती पण त्यांची ओळख झाली नव्हती. सुरुवातीला मैदानात जाऊन तो नुसताच उभा राहायचा. हळूच कधीतरी त्याच्यापाशी आलेला चेंडू त्याने पायाने ढकलला आणि तो त्या मुलांबरोबर कधी खेळायला लागला ते त्याचं त्यालाही समजलं नाही. त्याला कुणाची नावं ठाऊक नव्हती. पण रोज इथे यायला त्याला आवडायला लागलं. तास - दोन तास खेळलं की ताजातवाना होऊन जायचा तो. पण परमजितचा आनंद फार काळ टिकला नाही. एकदा कुणीतरी त्याला टॅक्सीबॉय म्हटलं आणि सगळे मनसोक्त हसले. राग आला तरी तो चेंगटपणे खेळत राहिला. पण त्या दिवसापासून जो तो त्याला टॅक्सीबॉय म्हणूनच हाक मारायला लागला. त्याला खेळायला जावंसं वाटेना. पलंगावर बसून तो खिडकीतून कानावर आदळणारा आरडा - ओरडा ऐकत राहायला लागला. तो खेळायला जात नाही पाहिल्यावर अम्मी मागे लागली. त्याने खेळायला जाणं बंद का केलं या प्रश्नाचं उत्तर त्याला द्यायचं नव्हतं. अम्मीची कटकट नको म्हणून पुन्हा परमजित खेळायला जायला लागला. कितीही दुर्लक्ष केलं तरी परमजितला सतत कॅबबॉय, टॅक्सीबॉय ऐकून राग यायला लागला. गाडी स्वच्छ करायचाही आळस व्हायला लागला. पापाजींची कुरकूर सुरु झाली की कुणी आजूबाजूला नाही हे पाहूनच तो गाडीकडे वळायचा. त्याला पापाजींची लाज वाटायला लागली. त्यापेक्षा खंबा बरं होतं. आजूबाजूला सगळी त्याच्यासारखीच मुलं होती. त्याचा भाव तर जास्तच होता तिथे. केवळ पापाजी अमेरिकेत या भांडवलावर. त्याला परत जावंसं वाटायला लागलं नाहीतर पापाजींनी तरी टॅक्सी चालवणं थांबवायला हवं. पण ते पापाजींना सांगायचं कसं हेच परमजितला समजत नव्हतं. तरी एक दिवस त्याने ते धाडस केलं.
"मला चिडवतात मुलं. तुम्ही नका चालवू टॅक्सी." गंभीर चेहर्‍याने त्याने पापाजींना गळ घातली. अम्मी हसली.
"पापाजी काही दुसर्‍या कुणाची टॅक्सी चालवत नाहीत. स्वत:ची टॅक्सी आहे आपली. त्या मुलांना सांग फुकट फिरवून आणतील पापाजी. मग बसतील गप्प." अम्मीचा मुद्दा नाही म्हटलं तरी बरोबर होता. तो काहीच बोलला नाही.
"जितू, मी नुसता चालक असतो तरी मला नसती लाज वाटली. कष्ट करतोय आपण, चोरी नाही. तू शिक, मोठा हो. मग फक्त परमजित साहेबांना नेण्याआणण्यासाठी माझी टॅक्सी. काय? खूष का आता?" परमजित काही बोलला नाही. पापाजींचं म्हणणं खरं असलं तरी पचनी पडत नव्हतं. तो अभ्यासात जास्तीत जास्त वेळ घालवायला लागला. तसंही आता अभ्यास वाढला होता. इथल्या शाळेत तग धरायची तर हुशारी दाखवणं भाग होतं. इथल्या मुलांमध्ये नाही रमता आलं तरी त्याला त्याची ओळख टॅक्सीबॉय होऊ द्यायची नव्हती. भले सगळे ’नर्ड’ म्हणून ओळखोत. तो मन लावून अभ्यास करत होता. पापाजींचं दुकानात काम करणं आणि टॅक्सी चालवणं चालूच राहिलं.

काही वर्षांनी अम्मीनेच सुचवलं पापाजींना मदत करायला.
"म्हणजे काय करु?" त्याने थोड्याशा नाराजीनेच विचारलं.
"आता तूही चालवायला लाग टॅक्सी."
"काऽऽय?" तो केवढ्यांदातरी ओरडला.
"तू स्वत:हून विचारशील म्हणून पापाजी वाट बघतायत. ते काही तुला सांगणार नाहीत पण आता त्यांना दगदग झेपत नाही. शनिवार - रविवारी चालव. गाडी चालवतोसच की तू. पुढच्या वर्षी कॉलेजला जाशील. खर्चाचं पाहायला हवं. तुझ्या शिक्षणासाठीच चाललं आहे हे सारं."
"गाडी स्वच्छ करतो. करतो मी मदत."
"ते तर खूप वर्ष करतोयस. त्याचं कौतुक आहेच आम्हाला पण आता आणखी जबाबदारी घ्यायला हवीस तू."
"यापेक्षा आपलं खंबाच बरं होतं अम्मी." शनिवार - रविवारी टॅक्सी चालवण्याच्या कल्पनेनेच तो वैतागला.
"जित आतापर्यंत कधी बोलले नाही पण चाचा - चाचींनी त्या घरात थारा नसता दिला आपल्याला. तुझे दादा - दादी होते तोपर्यंत ठीक होतं. शेतीत चाचा - चाचीचंच निभता नाकीनऊ होती. बुवा कायमची आहेच परत आलेली. पापाजी किती राबले तिथे तरी खाणारी तोंडं खूप. घरातला सगळा भार मी उचलत होते तरी तुझ्या चाचीचं नाक वर कायम. वरवर काही दिसणारं नव्हतंच पण गोड बोलून फायदा करुन घेण्यात चाचा - चाची दोघंही हुशार. पापाजींना हे जमलं नसतं. मनात एक बाहेर एक असा स्वभावच नाही तुझ्या पापाजींचा. तेव्हा इथे आहोत त्याचंच समाधान मान." अम्मी बरंच काही बोलत होती. याआधी कधीच न ऐकलेलं त्याला समजत होतं. त्याच्या ते मनात येतंय तोच अम्मी म्हणाली,
"मोठ्यांचे आपापासतले वाद, हेवेदावे मुलांना सांगितलेलं पापाजींना नाही आवडत. मुलं मग त्याच नजरेने पाहतात, उलटून बोलतात, आदर ठेवत नाहीत असं वाटतं त्यांना. दर्शीला पाहतोच की आपण. त्यामुळेच पापाजींचं म्हणणं मलाही पटतं; म्हणून या गोष्टी कधी सांगितल्या नव्हत्या तुला. पण तुझ्या बोलण्या - वागण्यात हल्ली हल्ली आमच्याबद्दलची अढी जाणवते जित. म्हणून आज स्पष्ट बोलले." अम्मी काय बोलतेय ते मुकाट्याने परमजित ऐकत होता. तरीही टॅक्सी चालवणं त्याच्या पचनी पडत नव्हतं. दोन - तीन दिवस अम्मी तेच सांगत राहिली तसं नाराजीनेच रात्री तो पापाजींबरोबर जायला लागला. खरंतर पापाजींची टॅक्सी आहे तर खूप फिरता येईल असं त्याला वाटायचं पण तसं कधी झालं नव्हतं. पण आता गाडी चालवायला सुरुवात करण्याअगोदर परिसर ओळखीचा व्हायला पाहिजे यावर पापाजी ठाम होते. पर्यायच नाही हे लक्षात आल्यावर नको असलेलं काम करायला परमजित सरावला. पापाजींच्या टॅक्सी चालवण्याची लाज त्याच्या मनातून काही केल्या कमी होत नव्हती. पण प्रयत्नपूर्वक निर्विकारता आणता आली त्याला. तो गाडी चालवत असेल तेव्हा ओळखीचं कुणी येऊ नये इतकीच प्रार्थना तो करायचा.

बारावीनंतर पुढच्या शिक्षणासाठी परमजितने गाव सोडलं आणि मोकळा श्वास घेतला. गावच बदललं होतं त्यामुळे त्याची ओळखही. कॅब बॉय, टॅक्सी बॉय ही ओळख पुसली गेली आणि त्याला मुक्त झाल्यासारखं वाटलं. आता तो फक्त परमजित होता. लवकरात लवकर शिक्षण पूर्ण करायचं आणि पापाजींना टॅक्सी विकून टाकायला लावायची असा निश्चयच त्याने केला. अम्मी पापाजी भेटायला आले की तो शक्यतो बाहेरच भेटायचा. त्याने कुणाशीच त्यांची ओळख करुन दिली नव्हती. मनातून दोषी वाटायचं परमजितला. आजूबाजूला खरंतर किती मुलं होती जी परिस्थितीशी लढा देत शिकत होती आणि आडपडदा न ठेवता त्याबद्दल बोलतही होती. कुणाची आई घरं स्वच्छ करायची तर कुणाचे वडील मिळतील तशी कामं करणारे, हातावर पोट असणारे. पण कुणाला त्याची लाज वाटत नव्हती. पापाजींचं टॅक्सी चालवणं इतकं कमीपणाचं का वाटून घेतो आपण हे त्याचं त्यालाच समजत नव्हतं. मुलं चिडवायची म्हणून की विनाकारण मनात बाळगलेला न्यूनगंड? विचार करुन डोकं भणभणून जायचं पण उत्तर सापडत नव्हतं. पाहता पाहता तो वकील झालाही. न्यू- यॉर्कलाच नोकरीला लागला. पण आता तो स्वतंत्र होता. चिडवणारे मित्र नव्हते, टॅक्सी स्वच्छ करावी लागत नव्हती, चालवावी लागत नव्हती. त्याच्या मनातला न्यूनगंड पूर्ण गेला नाही तरी काही अंशी कमी झाला. अम्मी - पापाजींबरोबर वागण्यात मोकळेपणा यायला लागला. पापाजींनाही आता टॅक्सी चालवण्याची गरज नव्हती पण त्यांचं मन त्यात रमायचं. टॅक्सीतल्या गिर्‍हाईंकांशी गप्पा मारणं हा त्यांचा छंद होता. पापाजींकडे अदभूत किश्श्यांचा खजिना असायचा तो यामुळेच हे त्याला आत्ता आत्ता कळायला लागलं. पापाजींची टॅक्सी अखेर काही अंशी परमजितने स्वीकारली. त्याने पापाजीना टॅक्सी चालवणं बंद करायला सांगितलं नाही पण मुद्दाम त्याबद्दल कौतुकाने कुठे कधी बोललाही नाही.

त्या दिवशीही काम आटपून तो निघाला. तेवढ्यात दाराशी त्याची जज्जसाहेबांशी गाठ पडली. परमजितने पटकन त्यांच्या हातातली बॅग घेतली. जज्जनी कौतुकाने त्याच्याकडे पाहिलं.
"सर, मी सोडू का तुम्हाला घरी?" त्याने नम्र आवाजात विचारलं.
"छे, छे. त्याची काहीच आवश्यकता नाही." जज्ज पुढे काही बोलणार तेवढ्यात टॅक्सी समोर येऊन उभी राहिली. परमजित थिजल्यागत उभा राहिला. जज्ज टॅक्सीत बसले. परमजितने हात हलवला आणि तो मटकन तिथेच पायर्‍यांवर बसला.
"पापाजी, पापाजींची टॅक्सी." न्यू - यॉर्कमध्ये शेकड्यांनी टॅक्स्या फिरत असतात. नेमकी पापाजींची टॅक्सी जज्जनी मागवावी? का? त्याच्या विचाराचं त्यालाच हसू आलं. जज्जसाहेबांना टॅक्सी चालक कोण हे आधी कसं माहीत असेल? आणि जज्जसाहेबांच्या दृष्टीनेही इथे काम करणारा एक तरुण वकील एवढीच आपली ओळख असेल याची त्याला खात्री होती. पण जज्जसाहेब त्याचं दैवत होतं. त्यांच्या कायद्यावरच्या पुस्तकांची त्याने पारायणं केली होती. पण पापाजींनीही आपल्याला ओळख दाखविली नाही, आपणही जज्जसाहेबांबरोबर त्यांची ओळख करुन दिली नाही. पापाजीना ठाऊक असेल मला त्यांच्या पेशाची लाज वाटते? म्हणून त्यांनी ओळख दाखविली नाही? त्याला स्वत:चीच लाज वाटली. त्यांच्या टॅक्सी चालवण्यामुळेच तर इथपर्यंत शिक्षण घेता आलं. जगाची ओळख झाली त्यांना भेटलेल्या गिर्‍हाईकांमुळे. पापाजींनीच टॅक्सी चालवायला शिकवली. न्यू - यॉर्क फिरला होता तो पापाजीच्या टॅक्सीने. मग तरी मनात शरम का होती? का नव्हतं येत पूर्णत: स्वीकारणं पापाजींचं टॅक्सी चालक असणं? त्याचं त्यालाच कळत नव्हतं. टॅक्सी चालवणार्‍या माणसाचा मुलगा असणं खरंच इतकं लज्जास्पद आहे? प्रश्न आणि प्रश्नच होते मनात. उत्तरं कधी मिळणार?

तो घरी आला तोपर्यंत पापाजी आले नव्हते. अम्मीने त्याचं जेवण झाकून ठेवलं होतं. मुकाट्याने तो जेवला आणि झोपलाही. सकाळी त्याला जाग आली ती पापाजींच्या स्पर्शाने. तो दचकून उठला.
"बेटा, तुझा साहेब भला माणूस आहे." हळुवार स्वरात पापाजी म्हणाले आणि परमजित दचकला.
"तुमची ओळख झाली?" पडलेल्या चेहर्‍याने परमजितने विचारलं.
"नाही. मी नाही दिली माझी ओळख करुन. नेहमी जशा गिर्‍हाईकाशी गप्पा होतात तशा झाल्या. तुझं कौतुक करत होते ते."
"माझी फार ओळख नाही त्यांच्याशी. कौतुक कसं करतील?"
"ते नाही ठाऊक पण उमदा आणि हुशार वकील आहेस. खूप पुढे येईल हा तरुण मुलगा या शब्दात तुझं वर्णन केलं." परमजितला हा सुखद धक्का होता. आता कधीतरी मुद्दाम जाऊन त्यांच्याशी बोलायचं हे त्याने नक्की केलं.
"सार्थक झालं तुला इतकं शिकवल्याचं. पण मी काही तू माझा मुलगा आहेस हे दर्शविलं नाही. झोप तू. तेवढंच सांगायचं होतं." पापाजी निघून गेले आणि तो विचारात गढला.
"काय सांगायचं होतं नक्की? जज्जसाहेब भले आहेत ते की तुम्ही स्वत:ची ओळख करुन दिली नाहीत ते." विचारावंसं वाटत असूनही त्याचं धाडस झालं नाही. पापाजी हसतमुख चेहर्‍याने तिथून गेले आणि तो डोक्यावर हात घेऊन आडवा पडून राहिला. प्रयत्नपूर्वक परमजितने मनातल्या विचारांना उडवून लावलं. काही दिवसांनी हा प्रसंगच तो विसरुन गेला. पण अगदी अकस्मात जज्जसाहेबांबरोबर कॉफी घ्यायचा योग आला आणि तो बोलून गेला. जज्जसाहेबांना त्याने त्या दिवसाची आठवण करुन दिली.
"यंग मॅन, तेव्हाच का ओळख करुन दिली नाहीस? इतक्या हुशार मुलाच्या वडिलांना भेटायला आवडलं असतं मला." जज्जसाहेबांनी कौतुकाने म्हटलं आणि त्यांच्या चेहर्‍यावरचे भाव वाचू पाहणार्‍या परमजितचे डोळे भरुन आले.
"काय झालं? मी काही चुकीचं बोललो का?" परमजित नकारार्थी मान हलवित राहिला. जज्जसाहेबांनी आपले थरथरते हात त्याच्या हातावर ठेवले.
"यु कॅन टॉक टू मी. तुझ्या आजोबांच्या वयाचा आहे मी." जज्जसाहेबांच्या शब्दांनी इतकी वर्ष मनात दाबून ठेवलेला सल परमजितच्या मनातून बाहेर पडला. तो भडाभडा बोलत राहिला. आवंढे गिळत, डोळ्यातले अश्रू पुसत बोलत राहिला. जज्जसाहेब शांतपणे ऐकत होते. त्याचा आवेग ओसरल्यावर त्यांनी पुन्हा एकदा कॉफी मागवली. दोघंही मूकपणे कॉफी पित राहिले. कप रिकामा होईपर्यंत परमजित सावरला होता.
"बेटा, तुझ्या भवितव्यासाठीच चालली होती त्या बापमाणसाची धडपड. अजून वेळ गेलेली नाही. जे माझ्याशी बोललास तेच पापाजींशी बोल. तुला वाटत असेल तुझ्या भावना तू व्यवस्थित लपवून ठेवल्यास. पण तसं असतं तर त्या दिवशी गाडीत अभिमानाने पापाजींनी स्वत:ची ओळख करुन दिली असती. यातच काय ते समज. तू निर्माण केलेल्या धुक्यात अडकला आहेस तू. धुक्यातून बाहेर पडण्याचा मार्ग तुझ्याच हातात आहे परमजित. जा. बोल तुझ्या पापाजींशी."

जज्जसाहेबाचं बोलणं कुठेतरी परमजितला पटलं होतं. पण इतक्या वर्षात त्याने स्वत:ला काय वाटतं ते धड सांगितलं नव्हतं अम्मी आणि पापाजींना. एकदा मुलं चिडवतात म्हणून टॅक्सी चालवणं बंद करा म्हणून विनवलं होतं. पण या कारणावरुन पापाजींनी ऐकावं हा वेडेपणाच होता हे तेव्हाही त्याला कळत होतं. नंतर कटकट, कुरकूर केली होती पण अखेर त्याने नाईलाजाने परिस्थिती स्वीकारली होती. आणि आता एकदम जाऊन बोलायचं? कसं बोलायचं? काय सांगायचं? चुकलं म्हणायचं? काही केल्या त्याला ठरवता येत नव्हतं. आणि अचानक त्याला उत्तर सापडलं. त्या दिवशी घरी जाताना त्याने पापाजींचीच टॅक्सी मागवली. अपेक्षेप्रमाणे पापाजी अस्वस्थ होते. परमजितमधल्या अनपेक्षित बदलाने ते सुखावले असले तरी प्रचंड दडपण त्यांच्या मनावर आलं. ते परमजितला घ्यायला गेले तेव्हा त्यांच्या चेहर्‍यावरुनच परमजितला त्यांना काय वाटतंय ते कळत होतं.
"पापाजी, जज्जसाहेबांनी मला तुमच्याशी बोलायला सांगितलंय." गाडीत बसल्यावर तो अडखळत म्हणाला,
"कशाबद्दल?" पापाजी अजूनही संभ्रमात होते.
"आपण निवांत कुठेतरी बसू या?" पापाजी परमजितला त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी घेऊन गेले आणि चाचरत अखेर परमजितच्या तोंडून शब्द बाहेर पडले.
"पापाजी, मला माफ करा."
"काय केलंस तू? कशात गुंतलायस? काही बेकायदेशीर नाही ना केलंस...? जज्जसाहेबांनी तुला माझ्याशी बोलायला सांगितलंय म्हणून विचारतोय." पापाजींच्या घशाला कोरड पडली.
"नाही नाही. मी माफी मागतोय ते माझ्या चुकांबद्दल. तुमच्या टॅक्सी चालवण्याची लाज वाटायची. तुमच्याशी माझं नातं आहे हे सांगायला आवडायचं नाही. मी तुम्हाला हे सांगितलं नाही पण तुम्हाला ते समजत होतं हे जज्जसाहेबांनी लक्षात आणून दिलं माझ्या..." बोलता बोलता पापाजींकडे टक लावून पाहत होता परमजित. प्रसंगांमागून प्रसंगांची उजळणी करत होता. पापाजी गप्प होते. त्यांनी त्याला बोलू दिलं, त्याचा भावनावेग आवरु दिला. परमजित त्यांच्याकडे पाहायला लागल्यावर ते उठलेच.
"तुम्हाला काहीच बोलायचं नाही पापाजी?" त्याने आश्चर्याने विचारलं.
"बेटा, तुझं काही चुकलं असं वाटत नाही मला. माझाही नाईलाज होता. परिस्थितीच तशी होती त्यामुळे काम करणं तर भाग होतं. तुला त्याची लाज वाटते याची कल्पना होती मला. प्रामाणिकपणे केलेल्या कुठल्याही कामाला प्रतिष्ठा असते ही माझी शिकवण तुझ्या मनापर्यंत पोचली नाही याचीच खंत होती माझ्या मनात आजपर्यंत. पण तुला शरम वाटायची त्यामागचं मोठं कारण मुलांचं चिडवणं होतं हे ठाऊक नव्हतं. तुला चिडवतात हे ठाऊक होतं पण त्याचा इतका परिणाम झाला असेल हा विचारच डोकावला नव्हता मनात. आता सारा उलगडा झाला. त्यामुळे मी माफ करण्याचा प्रश्न येतच नाही. आणि तरीही मी माफ करावं असं वाटत असेल तर सांगतो, आज तू माझी टॅक्सी मागवलीस तेव्हाच, त्या क्षणी सार्‍या चुका विसरलो बेटा मी तुझ्या. माफ केलं मी तुला आधीच." पापाजींनी त्यांचा भक्कम हात परमजितच्या पाठीवरुन फिरवला. आसवांच्या पडद्याआडून एकमेकांकडे बघणारी दुरावलेली मन क्षणात जोडली गेली.

भूतकाळाची पानं बंद करता करताच परमजितची पुन्हा त्या साप्ताहिकाकडे नजर गेली. भिरकावलेलं साप्ताहिक त्याने उचललं. कधी एकदा पापाजी येतील असं होऊन गेलं त्याला. मन मोकळं करावं असं वाटलं की मेट्रोने न जाता पापाजींची टॅक्सी मागवायला लागला होता तो. आत्ताही त्याने तेच केलं होतं. साप्ताहिकात छापून न आलेल्या मुलाखतीबद्दल त्याला पापाजींशी बोलायचं होतं. त्याची झालेली चिडचिड सांगायची होती. तो वाटच पाहात होता. खिडकीतून पापाजींची टॅक्सी खाली उभी राहिलेली दिसली आणि परमजितने ते साप्ताहिक तिथेच ठेवलं. प्रसन्न मनाने तो उठला. धुक्यात हरवलेली वाट सापडल्याचा आनंद पुन्हा एकदा त्याच्या चेहर्‍यावर पसरला. दमदार पावलं टाकत परमजित पापाजींच्या टॅक्सीच्या दिशेने चालायला लागला.

प्रसाद २०१८ दिवाळी अंकात प्रसिद्ध.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूपच छान गोष्ट. आवडली. शेवटी तर भरून आलं. फक्त परमजितला चूकीची जाणीव जरा उशीरा झाली असं वाईट वाटले.
मला ती श्रिया पिळगावकर ची रीन वाली ॲड आठवली छान आहे ती ॲड मला आवडते.

सॉलीड !
एक नंबर!!

लिहीत राहा अजून अश्या कथा.

कथेचा गाभा (जो मला फार आवडला) :
आपल्या अती जवळच्या व्यक्तीशी काही कारणास्तव मन मोकळेपणाने संवाद न होणे आणि त्या मुळे धुक्यागत होणारी मनाची घुसमट आणि अपराधिक भावना यांचे सुरेख चित्रण .

Hats off!

छान झाली आहे ही गोष्ट. फ्लॅशबॅकमध्ये शिरण्यासाठी साप्ताहिकातल्या मुलाखतीच्या प्लॉटची खरच आवश्यकता होती का असं वाटलं. कारण सुरुवातीला त्याची प्रस्तावना करून शेवटाला तो सोडून दिला आहे, त्यामुळे त्याच्या जागी दुसरा साधा (काही प्रश्न निर्माण न करणारा) प्रसंग असता तरी चाललं असतं असं वाटलं.
मी आत्तापर्यंत वाचलेल्या तुमच्या कथा खूपच निगेटीव्ह आणि एका साच्यातल्या होत्या.. भारतातून अमेरीकेत आलेली मंडळी, त्यांचे किंवा त्यांच्या मुलांचे न सुटणारे प्रश्न, इथलं आयुष्य कसं फक्त चॅलेंजिंगचं आणि वाईटच आहे असं काहीतरी चित्र उभं करणार्‍या.. (तुम्ही शाळेतलं काउनसिलिंग वगैरे क्षेत्रात काम करत असाल आणि हे सगळे प्रसंग नेहमी बघत असाल आणि त्यातुन काही कथाबिजे सुचली असतील असंही वाटलं..) त्या सगळ्या पार्श्वभुमीवर ही सटल कथा खूप आवडली !!!

तुम्ही सर्वांनी फार सुंदर अभिप्राय दिले आहेत त्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद
प्रसन्न हरणखेडकर - अशी उजळणी होणंही कधीतरी गरजेचं असतं Happy
विनिता - तुमचे वडील कष्टाने कमवतात याचा तुम्हाला अभिमान होता हे खूप महत्वाचं वाटलं. बाकी समाजाचा विचार करुन जे झालं ते या कथेत आहेच. कधीकधी वाटतं, पालकांनीही आधीच मुलांशी बोलावं का आपल्या पेशाबद्दल. मुलांना काय वाटतं, त्यांना हे करावं लागतंय किंवा त्यांनी आनंदाने स्वीकारलेलं आहे इत्यादी.
मन्या, अंजली - वडिलाच्या रिक्षा चालविण्याबद्दल तुम्हाला कमीपणा वाटला नाही हे खरंच खूप छान आहे. समजंस मुलं असणंही तितकंच महत्वाचं.
वावे - माझ्या लेखनातली विविधता तुम्हाला जाणवली हे वाचून छान वाटलं.
पराग - नाही हो. मी विविध विषयावर लेखन केलेलं आहे. मायबोलीवरच कितीतरी विनोदी आणि सकारात्मक कथा सापडतील मी लिहिलेल्या. नक्की वाचा. मी संगणक क्षेत्रात आहे. या कथेत परमजितचा न्यायाधीशांशी असलेला संबंध दाखवायचा होता आणि काहीतरी नाट्यमय त्यामुळे तो प्रसंग वापरला आहे आणि शेवटी त्याचा संबंध दाखवला आहेच. त्याच्या मनातली अस्वस्थता, घुसमट त्याला पापाजींपाशी व्यक्त करावीशी वाटते... पुन्हा एकदा सांगावसं वाटतं की माझं विनोदी लेखन वाचा किंवा इतर गोष्टीही जशा, दुकान, गिरण आणि.., दरी, सोबतीचं नाट्य, उल्लंघन, तिर्‍हाईत, रिक्त... बर्‍याच आहेत मायबोलीवर.
उरलेल्या ब्लॉगवर -

कधीकधी वाटतं, पालकांनीही आधीच मुलांशी बोलावं का आपल्या पेशाबद्दल. मुलांना काय वाटतं, त्यांना हे करावं लागतंय किंवा त्यांनी आनंदाने स्वीकारलेलं आहे इत्यादी. >> मोहना, खरं तर मुलांना कमीपणा वाटतोय हेच अव्यक्त पातळीवर रहातं. पालकांच्या दृष्टीने ते काम करुन घरासाठी, मुलांसाठी एक चांगलं आयुष्ञ देण्याचा प्रयत्न करतात एवढेच सत्य असते.
माझ्या भावाने कॉलेजला असतांना जेव्हा काही गोष्टींवरुन कुरकुर केली तेव्हा वडीलांनी त्याला शांतपणे 'मला जे जमले ते मी केले, तुला जे बदल हवेत, ते तू तुझ्या कारकिर्दीत करुन दाखव.' असे सांगितले. कारण प्रत्येकालाच खूष करणे आणि तसे वागणे प्रत्येकवेळी जमेलच असे नाही.

विनिता, खरं आहे मुलं त्यांना काय वाटतंय ते व्यक्त करत नाहीत आणि पालक आपल्यापरिने मुलांना चांगलं आयुष्य देण्याच्या प्रयत्न करत राहतात. तुमच्या वडिलांनी अगदी योग्य केलं. भावाला त्यामुळे जाणीव झाली असेल वडिलांच्या कष्टाची, भूमिकेची असं वाटतं.

ठीक आहे कथा.

अम्मी शब्द बरोबर आहे? कि माँ, मम्मीजी हवा?

दिवसा दुकानात काम करणे आणि रात्री टॅक्सी चालवणे अशी डबलशिफ्ट करणाऱ्या पुरुषाच्या घरात/त्या वर्गात स्त्रीदेखील काम करणारी असते.
आणि पांढरपेशा वर्गातल्यासारखे वडील-मुलगा नाते, तशा प्रकारचे संवाद या निन्मवर्गात बोलले जातात का शंका आहे....
त्यामुळे कथा ना धड रिअलिस्टिक ना धड कल्पनीक अशी काहीतरी वाटली.

दगडू आणि त्याचे वडील आठवले.

पराग, शोधू नका. माझ्या नावावर टिचकी मारलीत की दिसेल तुम्हाला सर्व लेखन. मी माझ्या अनुदिनीचा (blog) दुवा द्यायचा प्रयत्न केला पण तेव्हा दिसत नव्हता. पुन्हा एकदा देते - https://mohanaprabhudesai.blogspot.com/

ॲमी धन्यवाद. अम्मी हा शब्द परमजितचा आहे. कथा परमजितच्या चष्म्यातून आहे त्यामुळे भाषाही.
<<<डबलशिफ्ट करणाऱ्या पुरुषाच्या घरात/त्या वर्गात स्त्रीदेखील काम करणारी असते.>>> असं काही नाही. घरी राहणार्‍याही असतात.
<<त्यामुळे कथा ना धड रिअलिस्टिक ना धड कल्पनीक अशी काहीतरी वाटली>>>असा काही गोंधळ झालाय असं मला तरी वाटत नाही पण नक्की पुन्हा एकदा वाचून विचार करेन.

च्रप्स,
<<< फाडफाड इंग्लिश वाचा>>> माझ्या लेखाबद्दल म्हणताय बहुतेक पराग यांची प्रतिक्रिया वाचून?
https://www.maayboli.com/node/62875

Pages