दोन आडनावं आणि मी

Submitted by मोहना on 17 June, 2019 - 10:55

काल एका मासिकाच्या संपादकांनी म्हटलं की माझं आडनाव फार मोठं आहे. प्रभुदेसाई जोगळेकर. एक निवडा. मी निवडायला बसले. बरोबर नवर्‍याला पण बसवलं.
"मला एक आडनाव उडवायचं आहे."
"उडव." तो नेहमीसारखंच न ऐकता उत्तरला.
"कुणाला?"
"उडव गं कुणाला पण." जास्तीत जास्त मी पतंग उडवेन अशी खात्री असावी त्याला.
"तुला उडवते." आता मात्र त्याने दचकून मग गोंधळून पाहिलं.
"आडनाव उडवायचं आहे." ’तुझं लक्ष नसतं, ऐकतच नाहीस’ इत्यादी गिळून टाकत मी मुद्यावर थडकले.
"जोगळेकरांना उडवते आहेस का? प्रभुदेसायांना उडव ना." काय बाई ते धाडस या पुरुषाचं असं करुन मी त्याला ’लुक’ दिला. तो गडबडीने म्हणाला,
"बरं उडव जोगळेकरांना."

मग मी जोगळेकरांना उडवलं. संपादकाना सांगितलं, प्रभुदेसाईच ठेवा. ते म्हणाले,
"पण तुमचं माहेरचं आडनाव काय आहे?"
"प्रभुदेसाई."
"मग तुम्ही प्रभुदेसाई जोगळेकर असं लावत होता ते बरोबर नाही. जोगळेकर प्रभुदेसाई असं पाहिजे." एकीकडे एकच आडनाव निवडा म्हणतात दुसरीकडे ती एकत्र कशी पाहिजेत ते सांगतात असं मनातल्या मनात पुटपुटत मी त्यांना इतक्या वर्षांचा माझ्या मनातला गोंधळ सांगितला.
"मी लहान होते ना तेव्हा वसुंधरा पेंडसे नाईक असं नाव वाचायचे सर्वत्र. त्या काळात इतकं लांबलचक आडनाव एकच ठाऊक होतं. तेव्हापासून अशी दोन आडनावं एकत्र करुन मला लावायची होती. त्यासाठी लग्न करावं लागतं असं आई म्हणाली. म्हणून मग मी लग्न केलं. पण ती आडनावं कशी लावायची ते कुणालाच ठाऊक नव्हतं त्यामुळे झालं असेल."
"अच्छा" त्यांनी म्हटलं. मग मी म्हटलं,
"आणि तसंही निदान नावात तरी मी नवर्‍याला कुरघोडी करु दिली नसती. ठिक आहे प्रभुदेसाई जोगळेकरच."
"तुम्ही काय स्त्रीमुक्तीवाल्या आहात का?" त्यांनी विचारलं.
"छे हो. ती अवघड मोहीम. मी फक्त मला मुक्त करत असते." ते पुढे काही बोलले नाहीत. मग मीच म्हटलं.
"आणि आता मला ना फक्त मोहना विरेन असं लावायचं आहे. आडनाव गुलदस्तात ठेवायचं. मग कसली उत्सुकता वाढते हो लोकांची आडनाव काय असेल त्याची. आपण काय लिहिलं ते वाचतंच नाहीत. फक्त आडनावावर विचार करत राहतात."
"तुम्हाला आईचं, वडिलांचं, नवर्‍याचं अशी सर्व नावं नाही का वापरावीशी वाटत?" आज ’आडनाव’ घेऊनच बोलत होतो आम्ही.
"नाही हो, आठवत नाहीत इतक्या सर्वांची नावं. दरवेळी लिहिताना क्रम चुकेल अशी पण भिती वाटते मग."
"इतकं काय काय लिहित असता..." माझं लेखन त्यांना वाचावं लागतं याबद्दलची नाराजी दर्शवलीच त्यांनी. काणाडोळा करत मी म्हटलं,
"ते वेगळं. ते काय शब्द सांडतात. इथे नाव, आडनावांचा मामला आहे."
"बरं तर, मग जोगळेकरांना उडवताय ना नक्की?"
"हो, हो. प्रभुदेसाईच ठेवा. नाहीतर असं करु या, यावेळेस दोघांनाही उडवा. मला जरा वेळ द्या. मी तुम्हाला माझं नवीन नाव कळवते." ते बरं म्हणाले. मी डोकं खाजवलं, दहावेळा चष्मा पुसला आणि एक आडनाव तयार करायला सुरुवात केली. म्हटलं, जोगळेकर प्रभुदेसायांची रत्नपण आता नावात आलीच पाहिजेत. काम चालू आहे!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वाती२, मन्याऽ, सामो धन्यवाद.
Rajesh188, नाही हो. कुठलंच आडनाव कमी करायला तयार नाही झाले मी. सर्व काल्पनिक आहे. कितीतरी वेळा वर्तमानपत्र स्वत:च उडवून टाकतात माझं एक आडनाव, काहीवेळा विचारतात. गेल्यावर्षी माझा ’रिक्त’ कथासंग्रह मेहताप्रकाशनने प्रसिद्ध केला त्यावेळेस त्यांना दोन्ही आडनावं मुखपृष्ठावर बसवणं कठीण गेलं त्यावरुन सुचलं Happy
Rikta_0.jpg

अरे वा, छान आहे मुखपृष्ठ - भारत अमेरिका आणि वाटचाल... खूप शुभेच्छा!
(सिक्वील काढलं तर "अतिरिक्त" नाव आताच ठरवून टाका Wink जाऊ द्या, माझा वात्रटपणा इथे पुरे!)

सीमंतिनी - कथा आहेत. जे वाटतंय ते तसं असेलच असं नाही.... असं झालंय मुखपृष्ठ असं दिसतंय Happy
'भरीव' ठेवेन म्हणते पुढच्या कथासंग्रहाचं नाव. :-). पण आधी हा वाचा.

सीमंतिनी - कथा आहेत. जे वाटतंय ते तसं असेलच असं नाही.... असं झालंय मुखपृष्ठ असं दिसतंय Happy
'भरीव' ठेवेन म्हणते पुढच्या कथासंग्रहाचं नाव. :-). पण आधी हा वाचा.

Mast ahe.
जोगळेकर प्रभुदेसायांची रत्नपण आता नावात आलीच पाहिजेत. काम चालू आहे!...... क हर

Pages