दोन आडनावं आणि मी

Submitted by मोहना on 17 June, 2019 - 10:55

काल एका मासिकाच्या संपादकांनी म्हटलं की माझं आडनाव फार मोठं आहे. प्रभुदेसाई जोगळेकर. एक निवडा. मी निवडायला बसले. बरोबर नवर्‍याला पण बसवलं.
"मला एक आडनाव उडवायचं आहे."
"उडव." तो नेहमीसारखंच न ऐकता उत्तरला.
"कुणाला?"
"उडव गं कुणाला पण." जास्तीत जास्त मी पतंग उडवेन अशी खात्री असावी त्याला.
"तुला उडवते." आता मात्र त्याने दचकून मग गोंधळून पाहिलं.
"आडनाव उडवायचं आहे." ’तुझं लक्ष नसतं, ऐकतच नाहीस’ इत्यादी गिळून टाकत मी मुद्यावर थडकले.
"जोगळेकरांना उडवते आहेस का? प्रभुदेसायांना उडव ना." काय बाई ते धाडस या पुरुषाचं असं करुन मी त्याला ’लुक’ दिला. तो गडबडीने म्हणाला,
"बरं उडव जोगळेकरांना."

मग मी जोगळेकरांना उडवलं. संपादकाना सांगितलं, प्रभुदेसाईच ठेवा. ते म्हणाले,
"पण तुमचं माहेरचं आडनाव काय आहे?"
"प्रभुदेसाई."
"मग तुम्ही प्रभुदेसाई जोगळेकर असं लावत होता ते बरोबर नाही. जोगळेकर प्रभुदेसाई असं पाहिजे." एकीकडे एकच आडनाव निवडा म्हणतात दुसरीकडे ती एकत्र कशी पाहिजेत ते सांगतात असं मनातल्या मनात पुटपुटत मी त्यांना इतक्या वर्षांचा माझ्या मनातला गोंधळ सांगितला.
"मी लहान होते ना तेव्हा वसुंधरा पेंडसे नाईक असं नाव वाचायचे सर्वत्र. त्या काळात इतकं लांबलचक आडनाव एकच ठाऊक होतं. तेव्हापासून अशी दोन आडनावं एकत्र करुन मला लावायची होती. त्यासाठी लग्न करावं लागतं असं आई म्हणाली. म्हणून मग मी लग्न केलं. पण ती आडनावं कशी लावायची ते कुणालाच ठाऊक नव्हतं त्यामुळे झालं असेल."
"अच्छा" त्यांनी म्हटलं. मग मी म्हटलं,
"आणि तसंही निदान नावात तरी मी नवर्‍याला कुरघोडी करु दिली नसती. ठिक आहे प्रभुदेसाई जोगळेकरच."
"तुम्ही काय स्त्रीमुक्तीवाल्या आहात का?" त्यांनी विचारलं.
"छे हो. ती अवघड मोहीम. मी फक्त मला मुक्त करत असते." ते पुढे काही बोलले नाहीत. मग मीच म्हटलं.
"आणि आता मला ना फक्त मोहना विरेन असं लावायचं आहे. आडनाव गुलदस्तात ठेवायचं. मग कसली उत्सुकता वाढते हो लोकांची आडनाव काय असेल त्याची. आपण काय लिहिलं ते वाचतंच नाहीत. फक्त आडनावावर विचार करत राहतात."
"तुम्हाला आईचं, वडिलांचं, नवर्‍याचं अशी सर्व नावं नाही का वापरावीशी वाटत?" आज ’आडनाव’ घेऊनच बोलत होतो आम्ही.
"नाही हो, आठवत नाहीत इतक्या सर्वांची नावं. दरवेळी लिहिताना क्रम चुकेल अशी पण भिती वाटते मग."
"इतकं काय काय लिहित असता..." माझं लेखन त्यांना वाचावं लागतं याबद्दलची नाराजी दर्शवलीच त्यांनी. काणाडोळा करत मी म्हटलं,
"ते वेगळं. ते काय शब्द सांडतात. इथे नाव, आडनावांचा मामला आहे."
"बरं तर, मग जोगळेकरांना उडवताय ना नक्की?"
"हो, हो. प्रभुदेसाईच ठेवा. नाहीतर असं करु या, यावेळेस दोघांनाही उडवा. मला जरा वेळ द्या. मी तुम्हाला माझं नवीन नाव कळवते." ते बरं म्हणाले. मी डोकं खाजवलं, दहावेळा चष्मा पुसला आणि एक आडनाव तयार करायला सुरुवात केली. म्हटलं, जोगळेकर प्रभुदेसायांची रत्नपण आता नावात आलीच पाहिजेत. काम चालू आहे!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वाती२, मन्याऽ, सामो धन्यवाद.
Rajesh188, नाही हो. कुठलंच आडनाव कमी करायला तयार नाही झाले मी. सर्व काल्पनिक आहे. कितीतरी वेळा वर्तमानपत्र स्वत:च उडवून टाकतात माझं एक आडनाव, काहीवेळा विचारतात. गेल्यावर्षी माझा ’रिक्त’ कथासंग्रह मेहताप्रकाशनने प्रसिद्ध केला त्यावेळेस त्यांना दोन्ही आडनावं मुखपृष्ठावर बसवणं कठीण गेलं त्यावरुन सुचलं Happy
Rikta_0.jpg

अरे वा, छान आहे मुखपृष्ठ - भारत अमेरिका आणि वाटचाल... खूप शुभेच्छा!
(सिक्वील काढलं तर "अतिरिक्त" नाव आताच ठरवून टाका Wink जाऊ द्या, माझा वात्रटपणा इथे पुरे!)

सीमंतिनी - कथा आहेत. जे वाटतंय ते तसं असेलच असं नाही.... असं झालंय मुखपृष्ठ असं दिसतंय Happy
'भरीव' ठेवेन म्हणते पुढच्या कथासंग्रहाचं नाव. :-). पण आधी हा वाचा.

सीमंतिनी - कथा आहेत. जे वाटतंय ते तसं असेलच असं नाही.... असं झालंय मुखपृष्ठ असं दिसतंय Happy
'भरीव' ठेवेन म्हणते पुढच्या कथासंग्रहाचं नाव. :-). पण आधी हा वाचा.

Mast ahe.
जोगळेकर प्रभुदेसायांची रत्नपण आता नावात आलीच पाहिजेत. काम चालू आहे!...... क हर

मजेशीर लेख आहे. जोड आडनावातला अनुक्रमाचे लॉजिक असे कळले की लग्ना अगोदर त्या मुलीने आपल्या क्षेत्रात नाव कमावले असते त्यामुळे लोक तिला त्या नाव वआडनावाने ओळखतात शिवाय लग्न ही जन्मानंतरची कालांतराने येणारी अवस्था आहे त्यामुळे माहेरच्या आडनावाचा अनुक्रम पहिला पाहिजे. लग्न झाल्यावर पुरुषप्रधान संस्कृती मुळे सासरचे आडनाव लावण्याचा प्रघात आहे. मग त्याचा नंबर दुसरा येणार ना!
कधी कधी एखाद्या प्रतिभावंत स्त्रीचे व्याख्यान असले की आयोजक आडनांवाचा अनुक्रमाचा संकेत लक्षात न ठेवता कसाही अनुक्रम लावतात त्यामुळे काही लोकांचा अजूनच गोंधळ वाढतो.
ही जोड आडनावांची प्रथा चालु झाली तेव्हा मला एक प्रश्न पडला की एखाद्या स्त्रीची तीन दा लग्ने झाली असतील तर काय? म्हण्जे असे की पहिले आडनाव माहेरचे पुढचे पहिल्या नवर्‍याचे, त्यापुढचे दुसर्‍या नवर्‍याचे त्यापुढचे तिसर्‍या नवर्‍याचे असे काही तरी करावे लागेल. मग त्या बाई नाव उच्चारताना आयोजकांची फॅ फॅ उडणार!
ते जाउ द्या पण बाई कर्तुत्ववान किंवा प्रसिद्ध असेल व नवरा सुमार असेल ( कमी कर्तुत्ववान) किंवा अप्रसिद्ध असेल तर बाई चा डॉमिनन्स जास्त असतो व लोक त्या नवर्‍याला बाईच्याच माहेरच्या आडनावावे ओळखतात. आमच्याकडे असेच एका प्राथमिक शिक्षकाची ओळख पोळ गुरुजी म्हणून झाली होती. पण पोळ बाईंना कुणी कुलकर्णी बाई म्हणून ओळखले नाही. गुरुजींच्या वडिलांना सुद्धा पोळ बाईंचे सासरे असे ओळखायचे
बाकी आता विवाह संस्थाच ढासाळत चालली असल्याने जोड आडनावे बंद होतील, तसेही आता लग्न झाल्यावर माहेरच्या नावाचा पासपोर्ट चालतोच. मिस्टर ॲन्ड मिसेस अमुकतमुक असे आडनावाने ओळखण्याचे दिवस आता संपत चालले आहेत.

आता शाळेत पण वडील व आई दोंघांचे नाव लिहावे लागते मग खाली उदाहरणांत कोणते नाव योग्य होईल?

१) शाहिद पंकज नीलिमा अझीम कपूर
२) इशान राजेश नीलिमा अझीम कपूर खट्टर
३) जुनैद आमीर रीना किरण गौरी दत्ता राव स्प्रॅट खान

कोणताही आव, आवेश नसलेला छान, विनोदी लेख ! खूप आवडला !!

हे बघ, लग्न तर मला तुझ्याशीच करायचंय ; पण तुझा हा दोन्ही नावं लावायचा हट्ट नाहीं सोडलास, तर आयुष्यभर खरे - खोटे करतच बसायची पाळी येईल ना आपल्यावर !!20181219_105812.jpg

मजेशीर आहे लेख. 👍

देशमुख आडनाव असलेल्या मैत्रिणीने देशमुख आडनाव असलेल्या मुलाशी लग्न केले तेव्हां तिला “देशमुख- देशमुख” दोनदा लिही नावात असे खूप चिडवले होते 😀

…. फक्त मोहना विरेन असं लावायचं आहे. आडनाव गुलदस्तात ठेवायचं…. कल्पना खरेच चांगली आहे

+ १

मागासलेली राज्ये असूनही समहाऊ उप्र, राजस्थान, बिहारमधे हे खूप प्रचलनात आहे. मोहन कुमार / मोहना कुमारी असे.

@ भाऊ, खरे-खोटे= 😁

जास्तीत जास्त मी पतंग उडवेन अशी खात्री असावी त्याला.
"तुला उडवते." आता मात्र त्याने दचकून मग गोंधळून पाहिलं.
>>>>
Lol

खुसखुशीत लेख Lol

मला तो रिक्तचा फोटो दिसत नाहीये, ती जागा रिक्त दिसतेय मला.

Pages