दोन आडनावं आणि मी

Submitted by मोहना on 17 June, 2019 - 10:55

काल एका मासिकाच्या संपादकांनी म्हटलं की माझं आडनाव फार मोठं आहे. प्रभुदेसाई जोगळेकर. एक निवडा. मी निवडायला बसले. बरोबर नवर्‍याला पण बसवलं.
"मला एक आडनाव उडवायचं आहे."
"उडव." तो नेहमीसारखंच न ऐकता उत्तरला.
"कुणाला?"
"उडव गं कुणाला पण." जास्तीत जास्त मी पतंग उडवेन अशी खात्री असावी त्याला.
"तुला उडवते." आता मात्र त्याने दचकून मग गोंधळून पाहिलं.
"आडनाव उडवायचं आहे." ’तुझं लक्ष नसतं, ऐकतच नाहीस’ इत्यादी गिळून टाकत मी मुद्यावर थडकले.
"जोगळेकरांना उडवते आहेस का? प्रभुदेसायांना उडव ना." काय बाई ते धाडस या पुरुषाचं असं करुन मी त्याला ’लुक’ दिला. तो गडबडीने म्हणाला,
"बरं उडव जोगळेकरांना."

मग मी जोगळेकरांना उडवलं. संपादकाना सांगितलं, प्रभुदेसाईच ठेवा. ते म्हणाले,
"पण तुमचं माहेरचं आडनाव काय आहे?"
"प्रभुदेसाई."
"मग तुम्ही प्रभुदेसाई जोगळेकर असं लावत होता ते बरोबर नाही. जोगळेकर प्रभुदेसाई असं पाहिजे." एकीकडे एकच आडनाव निवडा म्हणतात दुसरीकडे ती एकत्र कशी पाहिजेत ते सांगतात असं मनातल्या मनात पुटपुटत मी त्यांना इतक्या वर्षांचा माझ्या मनातला गोंधळ सांगितला.
"मी लहान होते ना तेव्हा वसुंधरा पेंडसे नाईक असं नाव वाचायचे सर्वत्र. त्या काळात इतकं लांबलचक आडनाव एकच ठाऊक होतं. तेव्हापासून अशी दोन आडनावं एकत्र करुन मला लावायची होती. त्यासाठी लग्न करावं लागतं असं आई म्हणाली. म्हणून मग मी लग्न केलं. पण ती आडनावं कशी लावायची ते कुणालाच ठाऊक नव्हतं त्यामुळे झालं असेल."
"अच्छा" त्यांनी म्हटलं. मग मी म्हटलं,
"आणि तसंही निदान नावात तरी मी नवर्‍याला कुरघोडी करु दिली नसती. ठिक आहे प्रभुदेसाई जोगळेकरच."
"तुम्ही काय स्त्रीमुक्तीवाल्या आहात का?" त्यांनी विचारलं.
"छे हो. ती अवघड मोहीम. मी फक्त मला मुक्त करत असते." ते पुढे काही बोलले नाहीत. मग मीच म्हटलं.
"आणि आता मला ना फक्त मोहना विरेन असं लावायचं आहे. आडनाव गुलदस्तात ठेवायचं. मग कसली उत्सुकता वाढते हो लोकांची आडनाव काय असेल त्याची. आपण काय लिहिलं ते वाचतंच नाहीत. फक्त आडनावावर विचार करत राहतात."
"तुम्हाला आईचं, वडिलांचं, नवर्‍याचं अशी सर्व नावं नाही का वापरावीशी वाटत?" आज ’आडनाव’ घेऊनच बोलत होतो आम्ही.
"नाही हो, आठवत नाहीत इतक्या सर्वांची नावं. दरवेळी लिहिताना क्रम चुकेल अशी पण भिती वाटते मग."
"इतकं काय काय लिहित असता..." माझं लेखन त्यांना वाचावं लागतं याबद्दलची नाराजी दर्शवलीच त्यांनी. काणाडोळा करत मी म्हटलं,
"ते वेगळं. ते काय शब्द सांडतात. इथे नाव, आडनावांचा मामला आहे."
"बरं तर, मग जोगळेकरांना उडवताय ना नक्की?"
"हो, हो. प्रभुदेसाईच ठेवा. नाहीतर असं करु या, यावेळेस दोघांनाही उडवा. मला जरा वेळ द्या. मी तुम्हाला माझं नवीन नाव कळवते." ते बरं म्हणाले. मी डोकं खाजवलं, दहावेळा चष्मा पुसला आणि एक आडनाव तयार करायला सुरुवात केली. म्हटलं, जोगळेकर प्रभुदेसायांची रत्नपण आता नावात आलीच पाहिजेत. काम चालू आहे!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

छान लेख.
<<तेव्हापासून अशी दोन आडनावं एकत्र करुन मला लावायची होती. त्यासाठी लग्न करावं लागतं असं आई म्हणाली. म्हणून मग मी लग्न केलं.>>>

इथे पूर्वी विचारणा झाली होती मायबोलीवर - लग्न केलेच पाहिजे का? त्यात लग्न का करावे याची कारणे सांगितली होती. त्यात आणखी एका कारणाची भर!

मस्त Happy

>> फक्त मोहना विरेन असं लावायचं आहे. आडनाव गुलदस्तात ठेवायचं.

हि कल्पना खरेच चांगली आहे. माझी एक मैत्रीण असेच नाव लिहिते.

ह्हपुवा लेख !
अजून काही कॉम्बिनेशन --
दोन्ही आडनावातील आपल्या त्या दिवशीच्या ड्रेस साठी मैचिंग असेल ते एकच अल्फाबेट लावायचे जसे की आज निळा ड्रेस असेल तर ...
Prabhudesai मधले फक्त B घेवून नाव लिहणार --- Mohana Viren B.
दुसऱ्या दिवशी गुलाबी ड्रेस असला की Mohana Viren P.
आणि हवेतर जोडीला व्हाट्सऐप स्टेट्स -- Feeling SouthIndian

दोनच का? सगळी वंशावळ पन लाउ शकतो...
अय्यर
वेनु गोपाल अय्यर
मुत्तुस्वामी वेनु गोपाल अय्यर
चिन्नास्वामी मुत्तुस्वामी वेनु गोपाल अय्यर
.....

Lol

लेख भारी आहे, पण जे जन्मापासून लावत आलो आहोत ते आडनाव बदलायचेच कशाला ?

Biggrin
बायांनी आडनाव लावूच नये. म्हणजे फेमस व्हायला होतयं Wink हेमामालिनीला कोण "तू चक्रवर्ती का देओल?" विचारत नाही. हेमा मालिनी - बस्स नाम काफी है! इशा ने देवल लावलं. झाली का फ्येमस??!!

बायांनी आडनाव लावूच नये. म्हणजे फेमस व्हायला होतयं Wink>> साफ चूक.
हेमा, श्रीदेवी, रेखा लग्न झालेले पुरुष गटवले किंवा तसा प्रयत्न केला म्हणून फेमस झाल्या.

ते पण धड जमलं पाहिजे हो नाय म्हणजे अर्जुन कपूर बघा... होतोय का फ्येमस? लगातार फ्लॉप चालले सिनेमे. कपूर टाकून दिलं तर होईलही फ्येमस Wink

लॉल Lol Lol
> पण जे जन्मापासून लावत आलो आहोत ते आडनाव बदलायचेच कशाला ? > सहमत आहे.
तसंही हा स्वतःचे नाव-नवर्याचे/वडिलांचे नाव-आडनाव फॉरमॅट फक्त महाराष्ट्रातच वापरतात ना?

सर्वांना धन्यवाद.
वंशावळ, ड्रेसला मॅचिंग, फेमस होणं सगळ्याच कल्पना भारी Happy
धनि - आडनाव बदलणार नाही हो. पण कधीकधी संपादक सरळ एक आडनाव वगळतात. नुकताच ’रिक्त’ कथासंग्रह प्रसिद्ध झाला तेव्हा प्रकाशकाना मुखपृष्ठावर दोन आडनावं माववताना कठीण झालं त्यावरुन सुचलेलं काल्पनिक आहे सर्व.

Pages