श्री. कल्पेश गोसावी यांची सुलेखनचित्रे
जें देखताचि चतुर | समाधान पावती ||
वाटोळें सरळें मोकळें | वोतलें मसीचे काळे |
कुळकुळीत वळी चालिल्या ढाळे | मुक्तमाळा जैशा ||
अक्षरमात्र तितुकें नीट | आडव्या मात्रा त्या हि नीट |
आर्कुली वेलांड्या ||
पहिलें अक्षर जें काढिलें | ग्रंथ संपेतो पाहात गेलें |
येका टांकेंचि लिहिलें | ऐसें वाटे ||
अक्षराचें काळेपण | टांकाचे ठोसरपण |
तैसेचिं वळण वांकाण | सारिखेंचि ||
आधुनिक सुलेखनकलेचे भीष्माचार्य म्हणून ओळखल्या जाणार्या श्री. र. कृ. जोशी यांनी भारतीय सुलेखनकलेला जागतिक स्तरावर स्वतंत्र ओळख मिळवून दिली. भारतीय भाषांतील टाइपफेस तयार करण्याचं श्रेय सर्वस्वी रकृंचं आहे. मात्र रकृंना अभिप्रेत असलेलं सुलेखन काही वेगळंच होतं. रकृंनी अक्षरांचा, शब्दांचा वापर करून अप्रतिम चित्रशिल्पे घडवली. रकृंची अक्षरं रसिकाशी थेट संवाद साधत. त्या अक्षरांतून, शब्दांतून उमटलेला भाव जाणून घ्यायला इतर कुठल्याही माध्यमाची आवश्यकता भासत नसे. रकृंनी अनेक धाडसी प्रयोग केले. त्यांची हॅपनिंग्ज, 'सत्यकथे'च्या मुखपृष्ठावर झळकलेला विसाचा पाढा ( २० x १ = २०, २० x २ = २०.... इंदिरा गांधींच्या वीस कलमी योजनेचा आणि एकाधिकारशाहीचा तो भन्नाट निषेध होता ) अशा अनेक गोष्टी त्याकाळी अनेकांना सहज पचवता आल्या नाहीत. मात्र आज रकृंनी करून ठेवलेल्या कामाची व्याप्ती आणि महती कळते.
रकृंचा वारसा आज समर्थपणे चालवणार्यांपैकी एक मनस्वी कलावंत म्हणजे श्री. अच्युत पालव. पालवांनी सुलेखनकलेला व्यावसायिक रूप दिलं. ही सुलेखनचित्रं केवळ कागद आणि कॅनव्हासापुरती मर्यादित राहिली नाहीत. भिंती, दारावरील पाट्या, घड्याळं, फॅशन शोमधील मॉडेलांची शरीरं अशा अनेक ठिकाणी पालवांची सुलेखनचित्रे दिमाखात विराजमान झाली. स्वयंपाकघरातील उपकरणे, सिरींज, टूथब्रश यांसारख्या साधनांचा वापर करत अक्षरं आणि शब्दांच्या माध्यमातून त्यांनी काढलेली सुलेखनचित्रे जगभरात तर गाजलीच, पण भारतीय सुलेखनकारांना त्यामुळे अनेकानेक व्यावसायिक संधीही उपलब्ध होत गेल्या.
श्री. कल्पेश गोसावी हे आधुनिक भारतीय सुलेखनकारांच्या तिसर्या पिढीतील एक कलावंत. सर जे. जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड आर्टचा विद्यार्थी असलेल्या कल्पेशनं सुलेखनकलेच्या क्षेत्रात अल्पावधीतच नाव कमावलं आहे. असंख्य शिबिरे, प्रदर्शनं आणि स्पर्धांतून त्याच्या सुलेखनचित्रांचं कौतुक झालं आहे. FCB Ulka या जाहिरातसंस्थेने त्याला दोन वर्षांपूर्वी सर्वोत्कृष्ट सुलेखनकार म्हणून गौरवलं आहे. गेल्या वर्षी जेजेनं सर्वोत्कृष्ट सुलेखनकाराचं बक्षीसही त्याला दिलं आहे.

रकृ, अच्युत पालव आणि कल्पेशची सुलेखनचित्रं म्हणजे चित्र आणि त्याच्या जोडीला सुलेखन असा प्रकार नाही. अक्षरं किंवा शब्दं यांचाच अनोख्या प्रकाराने वापर करून ही चित्रं साकार होतात. ही अक्षरं असं काही रूप घेतात की वेगळ्या चित्रांची आवश्यकताच भासत नाही.
सुलेखनकलेतील नवीन प्रयोगांची आणि कल्पेशच्या सृजनशीलतेची मायबोलीकरांना ओळख व्हावी, म्हणून कल्पेशने रेखाटलेली ही काही सुलेखनचित्रे..
१. मेघाक्षरे
२. केतकीच्या बनी..
३. देवनागरी अक्षरे
४. तुका म्हणे
५. रोमन सुलेखन
६. पांडुरंग
७. अक्षर
८. दिवाळी शुभेच्छापत्र
९. पाऊस
१०. सावन आयो रे
११. मोडी लिपी
१२. चल पंढरीसी जाऊ
१३. अक्षरगणेश
कल्पेशतर्
कल्पेशतर्फे सर्वांना धन्यवाद
मायबोलीच्या टीशर्टसाठी सुलेखन करायला त्याला नक्की आवडेल.
'मेघाक्षरे' व 'देवनागरी अक्षरे' ही दोन चित्रे कल्पेशकडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. विकत घ्यायची असल्यास मी कल्पेशशी बोलू शकेन.
चिनॉक्स,सह
चिनॉक्स,सही रे.. मस्त आहेत सगळी सुलेखनचित्रे... धन्यवाद रे तुला कल्पेशची ओळख करून दिल्याबद्दल..
मायबोली टी- शर्टच्या बाबतीत अॅडमिननी ह्या संकल्पनेचा विचार करावा ही त्यांना विनंती... परवाच वैभव आणि सौमित्रच्या कवितांच्या प्रोग्रॅमच्या वेळी भरत नाट्य मंदिरला कॅलीग्राफी केलेले टी शर्ट्स पहायला मिळाले.. अच्युत पालव यांनीच सुलेखन केलेले असावेत.. फार छान वाटले ते टी-शर्ट्स.. तेव्हा मायबोली टी शर्ट्सच्या बाबतीतही हा प्रयोग करून पहायला हरकत नाही असे वाटते..
सुरेख
सुरेख चित्रे - केतकीच्या बनी तिथे , पणती हे विशेष आवडलेले.
चिनूक्स - र. कॄ. जोशींबद्दल फ म्हणतो तशी माहिती लिहीणार का?
मा बो टीशर्ट बद्दल सगळ्यांना माझेही अनुमोदक.
रकृंबद्दल
रकृंबद्दल एक सविस्तर लेख लवकरच लिहीन. श्री. अच्युत पालव यांच्याशी झालेल्या गप्पाही लिहिण्याचा प्रयत्न करतो.
अफलातून ....
अफलातून .... !!!!!!!!!!!
परागकण
चिनुक्स...
चिनुक्स... एवढी छान माहिती शेअर केल्याबद्दल अतिशय आभारी आहे..
मस्तच सगळी चित्रे... पांडुरंग जास्त आवडला
०-------------------------------------------------०
नेहेमीच डोक्याने विचार करु नये, कधी भावनांनाही वाव द्यावा
आसुसलेल्या डोळ्यांना, स्वप्नांचा गाव द्यावा
सुलेखन
सुलेखन मस्तच... खूप आवडलं ..
रकृंवरचा लेख वाचायला खूप आवडेल...
चिनूक्स, धन्यवाद रे. तुझ्या लेखांमधून विविध क्षेत्रातल्या लोकांची आणि त्यांच्या कामाची ओळख होते.
चिनूक्सा,
चिनूक्सा, उत्तम ओळख करून दिली आहेस. बाकी गोसावी यांच्या कलेबद्दल काय बोलावे ! तुला आणि त्यांना अनेकानेक धन्यवाद. तुझे आणखी खास आभार कारण तू रकृंची आठवण काढलीस.
रकृ हे चित्रांच्या अंगाने कविता लिहिणारे मराठीतले पहिले कवी. म्हणजे चित्रे आणि त्यावर कविता असे नव्हे, तर चित्रकविता. अक्षरे ही चित्रे आहेत असे त्यांनी मानले व कविताचित्रे/चित्रकविता रचल्या. कवितेला असे 'मूर्त' रूपातही बघता येते याचे भान मराठी माणसाला देणारा हा मराठीतील पहिलाच (आणि बहुधा एकमेव) कवी.
उदा. त्यांच्या 'कोणासाठी' या कवितेत प्रत्येक ओळ 'कोणासाठी' या शब्दाने सुरू होते. या पहिल्या शब्दांचा (म्हणजेच कोणासाठी या शब्दांचा) डावीकडे स्तंभ आहे. हे शब्द ठळक आणि मोठ्या आकारात आहेत. उजवीकडे उर्वरित ओळींचा स्तंभ आहे, जो नेहमीसारख्या अक्षरांत लिहिला आहे.
कोणासाठी आळवावे शतसुरी एक गाणे
कोणासाठी किती वेळा कोणी बदलावे नाणे
अशी रचना ते करतात. पाहताक्षणी अंगावर येणारा ठळक असा 'कोणासाठी' अक्षरस्तंभ, त्या दोन वेगवेगळ्या अक्षरस्तंभांमधली रिकामी जागा (जी वर स्पष्ट होत नाहीये) अशी ती चित्ररुपाने अनुभवत आणि वाचत आपण शेवटाकडे येतो... तर 'कवितेची' शेवटची ओळ म्हणजे या दोन स्तंभांना सामायिक असलेली, जणू त्या दोन स्तंभांचा पाया अशी.
'कोणा एका उणे जाण्या किती लाख देणे घेणे !'
अन् या अक्षरशिल्पाची शेवटची ओळ -
को ? णा ? सा ? ठी ?
***
Real stupidity beats artificial intelligence.
एकाहून एक
एकाहून एक नितांतसूंदर, आशयघन चित्रे!
र.कृं. बद्दलही आणखी वाचायला आवडेल..
सुंदर... मला
सुंदर... मला शेवटचे किंवा केतकीच्या बनी टी-शर्ट वर खुप आवडेल. विशेष करुन शेवटचे अक्षरगणेश.
अप्रतिम. र
अप्रतिम.
र कृ जोशी, अच्युत पालव यांची धुरा पुढे नेणारं कोणीतरी आहे, याचा आनंद वाटला. अर्थात, प्रसिद्धी न मिळालेल्या लोकांची माफी मागून मगच हे वाक्य लिहितोय. कल्पेशला हार्दिक शुभेच्छा. "पणती जपून ठेवा, अंधार फार झाला" फारच आवडलं. अगदी बोलकं आहे. नव्यानं प्रसिद्ध् झालेला 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, हिम्मत असेल तर अडवा' पहायचाय. याच कारणासाठी. एनी वे, या लेखासाठी शतशः धन्यवाद.
सुंदर
सुंदर सुलेखन. आणि तेवढाच छान माहितीपूर्ण लेख! चिनूक्सा तुसी ग्रेट हो..
र.कृं. बद्दलही आणखी वाचायला आवडेल.. पालवांचा एखाद्या वर्कशॉप मधे शिकायला जाण्याची खुप खुप इच्छा आहे बघु कधी योग येतो आहे..
स्सग्गळं
स्सग्गळं मनात उतरणारं. अ प्र ती म
अ प्र ति म!
अ प्र ति म! फार फार सुंदर अक्षरचित्रे!
माबो टी शर्ट खरच करावा. मी नक्की घेईन. "पाऊस" आणि "सावन आयो रे" चा टी शर्ट किती सुंदर दिसेल!
चिनुक्ष लेख छान आहे. या कलाकाराची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद.
धन्स रे
धन्स रे चिनूक्स...
कल्पेशला शुभेच्छा ...
मायबोली टी शर्टला अनुमोदन
व्वा काय
व्वा काय एक एक मस्त सुलेखन चित्रे आहेत... चिनूक्स धन्यवाद...
लेख नक्की लिही रे...
मा.बो टीशर्ट साठी सर्वांना मोदक
अॅडमिन : मनावर घ्याच तुम्ही ही कल्पना
-------
हे ऐकलेत का? मराठी गझल इ-मुशायरा
अप्रतिम!!!!!
अप्रतिम!!!!!
अप्रतीम
अप्रतीम काँपोस, सुबक रंगसंगती.
you may meet me in details at ....... www.layakari.com
I am here too in part ..... http://adnyaatvaas.blogspot.com
Pages