रबरदादा

Submitted by Asu on 5 June, 2019 - 00:22

चित्र काढताना किंवा लिहिताना पेन्सिलीबरोबर खोडरबराची साथ हवीच. पण, ते नेहमीच इकडे तिकडे उडी मारून दडून बसते आणि आपल्यालाही छळत असते. अशा खट्याळ खोडरबराच्या या लीला-

रबरदादा

खोडरबराऽऽ खोडरबराऽऽ
किती करतोस घाबराघुबरा

इथे दिसतोस तिथे दिसतोस
शोधावे तर कुठेच नसतोस

पेन्सिल तर सदाच खोडतोस
कारे उगाच तिला छळतोस

खोड्या करून कुठे लपतोस
धांदल पाहून मलाच हसतोस

मी तिचा ना मोठा भाऊ
चुका तिच्या कशा साहू

चुकली तर तिला खोडतो
इतर वेळी तिला सोडतो

खोडरबराऽऽ खोडरबराऽऽ
नको करूस जादा नखरा

समोर ये रे माझ्या दादा
रागवेन ना माझा वादा

रबर गाली खुदकन हसले
उठून बसता टपकन पडले

उडी मारून टुण टुण नाचले
कंपाशित जाऊन रुसून बसले

प्रा.अरुण सु.पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

@सस्मित मला नाही माहिती कि असुंनी किडनीस्टोन वरसुद्धा कविता केलेली आहे.लिंक दिल्यास बरे होईल. Happy

डॉ.विक्रांत,
मायबोलीवर लिंक कशी द्यायची ते मला जमत नाही. पण तुम्ही जर search मध्ये 'कळा ज्या लागल्या देहा' आणि 'वृक्कखड्या रे वृक्कखड्या' टाकले तर युरिन स्टोन वरच्या माझ्या दोन्ही कविता आपणास वाचता येतील.
- असु