गाणी आणि आठवणी

Submitted by अतुल. on 18 May, 2019 - 06:31

खूप लहानपणीची एक घटना आठवते. ती एक अतिशय उदासवाणी सकाळ होती. पावसाळा नव्हता. तरीही वातावरण कुंद. ढगाळलेले. जाग आली तीच बाहेर सुरु असलेल्या कसल्याश्या गोंधळ आणि गलक्यामुळेच. उठून पाहिले. घरातल्या व शेजारपाजारच्या मोठ्या माणसांच्या चेहऱ्यांवर धक्का बसल्याचे काळजीचे भाव होते. सगळेजण गंभीरपणे कसलीशी कुजबुज आणि चर्चा करत होते. त्याचवेळी रेडीओवर लता मंगेशकरांचे ते 'गाईड' मधले गाणे लागले होते "काँटों से खिंच के ये आँचल, तोड़ के बंधन बांधी पायल. कोई ना रोको दिल की उड़ान को, दिल वो चला, आज फिर जीने की तमन्ना है. आज फिर मरने का इरादा है". तसाच बाहेर आलो. बाहेरच्या दरवाजापासून पुढे काही अंतरावरच गावातला खाजगी दवाखाना होता. त्यासमोरचे छोटे पटांगण सारे माणसांनी भरून गेलेले दिसत होते. कोणीतरी बोलले, "किल्लेदारांच्या ताईला अपघात झालाय. दवाखान्यात आणली आहे". काळजात लक्क झालं.

तेंव्हा मी दुसरी किंवा तिसरीला असेन. ताई चौथीच्या वर्गात. आपल्या लहान भावाला कडेवर घेऊन शाळेत यायची. नेहमी चेहरा हसरा. भावाला खाली ठेवून बाजूला खेळत बसायची. तो रडायला लागला कि खेळ सोडून पट्कन उठून त्याला कडेवर घेऊन फिरवायची. शांत करायची. ताई होतीच तशी. एवढीशी पोर. पण वयाच्या मानाने फार समंजस. शाळेत सर्वानाच खूप प्रिय होती. त्या दिवशी सकाळी सकाळी ताईच्या घरचा नोकर मोठ्या घागरींतून विहिरीतून शेंदून आणलेले पाणी भरत होता. वाटेत मध्येच अंथरुणात ताई झोपली होती. लगबगीत जात असताना भिंतीत बसवलेल्या खुंटीला कसा कुणास ठावूक त्याच्या घागरीचा धक्का लागला. त्यासरशी पाण्याने भरलेली ती जडशीळ घागर त्याच्या खांद्यावरून निसटली आणि थेट खाली झोपलेल्या ताईच्या डोक्यात आदळली. आरडाओरडा झाला. तिला घेऊन ते सगळे कुटुंबीय दवाखान्यात आले. ताईला आपल्या छातीशी कवटाळून तिची आई घेऊन आली होती. आईच्या खाद्यावर डोके टाकून ताई निपचित पडली होती. हां हां म्हणता हि बातमी वाऱ्यासारखी सगळ्या गावभर पसरली. दवाखान्याच्या प्रांगणात बघता बघता सारे गाव जमा झाले. दुर्दैवाने ताई यातून वाचली नाही. अतिशय मनहूस असा दिवस होता तो. पण त्यानंतरची कितीतरी वर्षे "आज फिर जीने की तमन्ना है. आज फिर मरने का इरादा है" गाणे ऐकले कि ती खिन्न सकाळ जशीच्या तशी आठवायची. असे वाटायचे कि हे गाणे कुणीतरी ताईसाठीच तर लिहिले नसेल ना? आज इतक्या वर्षांनी त्या कटू घटनेच्या स्मृती खूप पुसट झाल्या असल्या तरी ते गाणे ऐकले कि कुठेतरी मनाच्या एका छोट्याश्या कोपऱ्यात हि घटना आठवतेच.

गाण्याशी आठवण एखाद्या घटनेशी तीव्रतेने जोडली जाण्याचे माझ्या आयुष्यातले हे कदाचित पहिले उदाहरण असेल. असे अनेकदा आपल्या आयुष्यात घडते. एखादा हृदयस्पर्शी प्रसंग असेल, विनोदी प्रसंग असेल, भयंकर घटना असेल, धक्कादायक गोष्ट असेल. किंवा अगदी साधी सामान्य घटना असेल. पण कशी कोणास ठावूक, अनेकदा ती एखाद्या गाण्याशी नकळत जोडली जाते. बरं, प्रत्येकवेळी त्या गाण्यातले भाव त्या घटनेशी जुळतीलच असे नाही. कधीकधी विसंगत सुद्धा असतात. पण ते गाणे ऐकले कि आपल्याला ती घटना मात्र हमखास आठवते.

त्या काळात दादा कोंडके यांची गाणी खेडेगावांत फार लोकप्रिय होती. पण अश्लीलतेकडे झुकणारी, डबल मिनिंग वाली, असा शिक्का बसल्याने सुशिक्षित घरांत ती ऐकली जात नसंत. मुलांनी चुकून जरी गुणगुणले तरी मार पडायचा. पण घरासमोरच एक मंदिर होते. त्यासमोरच कायमस्वरूपी लग्नमंडप. गावातली तसेच आसपासच्या इतर गावातली लग्ने तिथे उरकली जात. तेंव्हा मे महिन्यात लग्नसराईच्या दिवसांत लाउडस्पीकरवर हीच गाणे तिथे जोरजोरात लावली जात. दिवसभर कानावर आदळत राहत. त्यामुळे झाले असे कि या गाण्यांशी त्या दिवसांच्या आठवणी जोडल्या गेल्या. पुढील आयुष्यात अर्थात ही गाणी फारशी कधी ऐकली नाहीत वा ऐकायला मिळालीही नाहीत. शाळा मग कॉलेज मग विद्यापीठ मग नोकरी. यात बराच काळ निघून गेला. एव्हाना ती गाणी विस्मरणातसुद्धा गेली. करता करता पुढे अनेक वर्षांनी परदेशात गेलो. परदेशांतले दिवस तसे रुक्षच होते. त्यात आणि त्या ऑफिसात मी एकटाच भारतीय होतो. दिवसभर कामांत गुंतवून घ्यायचो. पर्याय नव्हता. कधीकधी तर शनवार रविवारी सुद्धा ऑफिसात जाऊन बसायचो. शनवार रविवारी सगळे ऑफिस सुनसान असायचे. तेंव्हा आंतरजाल नुकतेच हातपाय पसरायला लागले होते. आजच्यासारखी युट्युब व गाण्यांची वारेपाम संकेतस्थळे अद्याप सुरु झाली नव्हती. तरीही जालावर दादांची फार मोजकी गाणी कुठून कशी हाताला लागली कोण जाणे. बहुतेक कुठल्याश्या याहू ग्रुपवर वगैरे मिळाली असावीत. नक्की आठवत नाही. त्यांची क्वालिटी सुद्धा फारशी चांगली नव्हती. पण तरीही कोण आनंद झाला म्हणून सांगू. अधाशीपणे डाऊनलोड केली. आणि इतक्या वर्षांनी तेही थेट परदेशात ऐकली तेंव्हा बालपणीचे गावाकडचे दिवस आठवले. कित्तीकित्ती वर्षांनी ऐकत होतो. ऐकताना अगदी गावाकडेच आहोत असे वाटायचे. "आहे घरासचि असे गमते मनास, ह्या येथल्या सकळ वस्तु उगीच भास" अशी गतकालविव्हल अवस्था. पुढे या गाण्यांकडे बघण्याचा माझा दृष्टीकोनच बदलला. अश्लीलतेपेक्षाही त्या गाण्यांतील कलात्मकता आणि मुख्य म्हणजे दादांची ओरिजिनलिटी मला जास्त भावू लागली. गावात कधीकाळी जबरदस्तीने कर्कश्श आवाजात कानावर पडलेली गाणी, परदेशांत मात्र मी वारंवार आवडीने ऐकू लागलो. परदेशात असताना, त्यातही आपण एकटेच असू, तर आपला देश आपली माती आपली माणसे याविषयी अपार प्रेम आपल्या मनात उफाळून येते. आपल्या मातीचे अस्सल मराठमोळेपण, रांगडेपण या गाण्यांत ठासून भरले आहे, वगैरे वगैरे मला विचार माझ्या मनात येऊ लागले. तिथे असताना मी ती गाणी सतत ऐकायचो. इतक्या वेळा ऐकली इतक्या वेळा ऐकली कि नंतर नंतर त्या गाण्यांवरचा गावाकडचा ठसा पार पुसूनच गेला. त्यानंतर भारतात परत आलो. आता तर त्यालाही काळ झाला. पण आज जर हि गाणी माझ्या कानांवर पडली तर मला लहानपणीचे गावाकडचे दिवस नव्हे तर मध्य लंडनमध्ये असलेल्या त्या ऑफिसातले दिवस आठवतात! हि मोठी गम्मतच म्हणायची. गाण्यांचे हे असे असते. अलीकडच्या काळात एकदा माझ्याकडून कारमध्ये दादा कोंडकेंची हि गाणी अभावितपणे लावली गेली. थोरला भाऊ बाजूलाच बसला होता. तो उडालाच. म्हणाला, "काय रे, तुझी अभिरुची बदलली कि काय?". आता त्याला कसे माहित असणार ह्या गाण्यांबाबतच्या माझ्या दृष्टीकोनात काय स्थित्यंतरे होत गेली आहेत.

"दिल ढूँढता है फिर वही" हे असेच अजून एक गाणे. विशेषतः या गाण्याचे सुरवातीचे लतादीदींचे आलाप. "ओऽऽऽओ. ओऽऽअओ. ओऽऽअओऽऽओ ओऽऽऽओ..." रणरणत्या उन्हात तापलेल्या कुठल्याश्या अनामिक दरीखोऱ्यांतून थंडगार वाऱ्याची एखादी झुळूक आल्यासारखे हे आलाप. अक्षरशः बखोटीला धरून फरफटत ओढून नेल्याप्रमाणे चांगली वीसबावीस वर्षे मला मागे नेऊन सोडतात. कॉलेजच्या आवारातल्या त्या हिरवळीवर कुठेतरी मला नेऊन टाकतात. शेवटच्या सेमिस्टरच्या प्रोजेक्टचे, रात्रंदिवस केलेल्या जागरणाचे, सबमिशनचे, व्हायवाचे दिवस आठवतात. बाजूला कॅसेट प्लेअरवर सतत हे गाणे वाजत असायचे. अगदी एप्रिल में महिन्याचेच दिवस. मी म्हणणारे ऊन. प्रचंड उकाडा. थंड वाटायचे ते केवळ त्या सुरांमुळे. "या गरमियों की रात जो पुरवाईयाँ चलें..." वाःह भाई. क्या बात! खरंच आहे. या पुरवाईयाँ मनात अजरामर झाल्यात. काय झाले असते तेंव्हा हे गाणे नसते तर? आज कधीमधी कानावर हे सूर पडतात तेंव्हा ते दिवस अजूनही जसेच्या तसे मनात ताजे होतात.

"नफरत कि दुनिया छोडकर" हे "हाथी मेरे साथी" मधले गाणे. या गाण्यात सुरवातीला रफीसाहेबांनी उच्चरवात जो प्रील्युड गायलाय. बापरे! अंगावर काटा येतो ऐकताना. तो तसा गाणे कुण्णाकुणालाच शक्य नाही. धाकट्या भावाच्या एका हसत्याखेळत्या धडधाकट वर्गमित्राचा अचानक मृत्यू झालाची बातमी एकदा अचानक आली. कसलासा विषाणूवाला डांस का काय मानेवर चावल्याचे निमित्त झाले. ताप आला. अन त्यात हा तडकाफडकी गेला. मन विश्वास ठेवायला तयार नव्हते त्या बातमीवर. बोर्डिंग स्कूल होते. बाकी सगळ्या पालकांमध्ये घबराट पसरली होती. बातमी ऐकली तेंव्हा रफींचे हे गाणे आसपास कुठे वाजत होते का काय आठवत नाही. पण त्या गाण्याशी हि आठवण जोडली गेलीय खरी. त्यानंतर कित्येक वर्षे "नफरत किऽऽऽ" चे काळजाला हात घालणारे सूर कोठून जर कानावर पडले कि ती घटना आठवत असे. काळाच्या ओघात त्या आठवणी क्षीण झाल्यात. पण अजूनही काही प्रमाणात ते होतेच.

बाबूजी सुधीर फडकेंनी गायलेलं "त्या तरूतळी..." मुळे अशाच गूढ आठवणी जाग्या होतात. "मदालसा तरूवरी रेलुनी, वाट बघे सखी अधीर लोचनी, पानजाळी सळसळे, वळे ती मथित हृदय कवळीत...." कोण जाणे कुठले झाड? कोण ती? तिथे का उभी होती? कोणाची वाट पाहत होती? काही काही माहित नाही. मुळात आयुष्यात जे कधी घडलेच नाही ते आठवेल तरी कसे? तरीही हे सगळे घडलेले आहे असे उगीच का वाटत राहते? पण नाही. हे गाणं ऐकले कि इतक्या वर्षांनीसुद्धा 'ती' अनामिका 'त्या' अज्ञात ठिकाणी 'त्या' मोठ्या झाडाच्या घनगर्द सावलीत अजूनही तशीच व्याकुळ होऊन उभी असेल, डोळ्यांत प्राण आणून वाट पाहत असेल असे वाटत राहते. काही गाणी फार विचित्र असतात बुवा. कधीही न घडलेल्या घटनेच्या आठवणी सुद्धा जाग्या करतात.

"मै ना भूलुंगा..." आठवते हे गाणे? प्रश्नच मजेशीर आहे ना? "रोटी कपडा और मकान" मधले. मुकेशजी आणि लतादिदींनी गायलेले. रेडिओवर लागायचे. खूप वर्षे झाली. पावसाळ्याचे दिवस होते. आयुष्यातला एक उदासवाणा कालखंड होता. खिडकीतून बाहेर भकासपणे बघत बसायचो. रेडीओने चांगली साथ दिली त्या काळात. दुसरे होतेच काय म्हणा. "अरे क्या बात कही. वो देखो रात ढली. ये बातें चलती रहें. ये रातें ढलती रहें" अशी वळणे घेत हे गाणे कधीतरी संपून जायचे. त्याची आवर्तने मात्र आजही तशीच कानात घुमत आहेत. त्या रेडीओवर ऐकू येणाऱ्या खरखरीसहित. रात्री अकरा वाजता उर्दू सर्विस सुरु व्हायची. त्यावर एकापेक्षा एक मधुर गीते बरसत राहायची. एके रात्री रेडीओ सुरुच राहिला. झोप कधी लागली कळलेच नाही. जाग आली तेंव्हा रात्री साडेबारा एक झाला असेल. बाहेर वळीव पडून गेला होता. सारे चिंब झाले होते. खिडकी. तावदाने. झाडे. निथळत होती. मातीचा गंध आसमंतात दरवळत होता. रेडीओ तसाच सुरु होता. आणि कुठेतरी शेकडो का हजारो किलोमीटर अंतरावर असलेल्या उर्दू सर्विसच्या उंच मनोऱ्यातूनर प्रक्षेपित झालले लतादीदींच्या आर्त आवाजातले चिंब सूर कानावर पडत होते "आजा रेऽऽऽ अब मेरा दिल पुकारा. रो रो के गम भी हारा. बदनाम न हो प्यार मेरा. आजा रेऽऽऽ"

गाणी त्या त्या वेळी जरी संपून गेली तरी मनात अशी जिवंत राहतात. तो क्षण, तो दिवस, ती रात्र, तो काळ आपल्या मनात जसाच्या तसा घेऊन येतात. गुलजार यांनी एके ठिकाणी चार शब्दांत किती सुंदर लिहून ठेवलंय:

एक मुड़ एक कैफियत
गीत का चेहरा होता है
कुछ सही से लफ्ज़ जड़ दो
मौज़ू सी धुन की लकीरें खींच दो
तो नगमा सांस लेने लगता है
ज़िन्दा हो जाता है
बस इतनी सी जान होती है गाने की
एक लम्हें की जितनी
हां कुछ लम्हें
बरसों जिंदा रहते हैं
गीत बूढ़े नहीं होते
उनके चेहरे पर झुर्रियां नहीं गिरती
वो पलते रहते हैं
चलते रहते हैं
सुनने वालों की उम्र बदल जाती है तो कहते है
हां वो उस पहाड़ का टीला
जब बादलों से ढक जाता था
तो एक आवाज सुनाई दिया करती थी
-गुलज़ार

तुमची कोणती अशी गाणी आहेत. कोणत्या आठवणी आहेत. प्रतिसादांमध्ये जरूर लिहा....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> दिवाळीच्या पहाटे उठी उठी गोपाळा बहुतेक वेळा लागायचं रेडीओवर

सेम! लहानपणी सकाळी लवकर उठून वडील रेडीओ लावत असत. आभाळाच्या देवघरी हा उष:काल झाला. रवी आला हो रवी आला... ऐकले कि अजूनही आपण साखरझोपेत आहोत आणि डोळे चोळत जाग येत आहे असे वाटते.

>> गाण्यांशी जोडलेल्या अनेकोनेक चांगल्या वाईट आठवणी आहेत.

सस्मित, लिहा...

आये हो मेरे जिंदगी में तुम बहार बनके... पुण्यात नवीन होतो तेंव्हाचे दिवस आठवतात. हे गाणे जुने झाले आहे कोण म्हणेल? इतके ताजेतवाने इतका उत्साह भरून राहिलाय त्यात. तेंव्हा जिकडे तिकडे लागलेले असायचे. नकळत त्या दिवसांशी जोडले गेले.

त्या काळात एक मित्र आणि मी, विद्यार्थीगृहाच्या इंजिनीअरिंग कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये लंच ला नियमित जात असू. ऐ हुस्न-ए-लालाफ़ाम ज़रा आँख तो मिला... गझल ऐकली कि ते का आठवत असेल? बहुदा त्या कॅन्टीनमध्ये तेंव्हा हि गझल लावली जात असावी.

उर्मिला थोडंसं माहिती होतं तुझ्याकडून ऐकून, पण आज काही वेगळ्याच गोष्टी समजल्यात...
हा धागा फॉलो करत नसल्याने कळलं सुद्धा नसतं... Very sad!
आणि तू कायम इतकी हॅप्पी असतेस, की मी अंदाजही लावू शकलो नसतो.
May his soul rest in peace...

गुलाम अलि यांच्या गझलांचं माझ्या जीवनात अनन्यसाधारण महत्व आहे.
१९८२ ला D D वर प्रथम चुपके - चुपके ऐकलं तेव्हाच मी त्यांचा मोठा चाहता झालो. जवळजवळ २-३ वर्षे मी गुलाम अली (आणि कुमार गंधर्व) यांचेच गाणे ऐकायचो. त्यामुळे त्यांची कोणतीही गझल ऐकली की मला कॉलेज ऑडि टोरियम , किंवा कँटीन , अथवा माझी अभ्यासाची टेबल खुर्ची डोळ्यासमोर येते .. आणि आठवत रहातात कित्येक प्रसंग !
पुढे COEP च्या गॅदरिंगमधे मी ' दिलमें इक लेहेरसी उठी है अभी" गायलो होतो आणि साताठशे मुले आणि प्रदद्ध्यापक चकित होउन ऐकत होते ... जबर्या टाळ्यांच्या गजराने once more मिळाला तो प्रसंग विसरूच शकत नाही ! अगदी अती स्कॉलर आम्हा कलाकारांना तुच्छ लेखनारे रँकर - स्कॉलर , प्रोफेसर, मित्र मेइत्रिणी , अगदी कॉलेज क्वीन देखील... सगळे स्टेजवर येऊन भेटून गेले.
आणि या सार्याचे खरे निम्मे श्रेय गुलाम अली यांच्या गायकीला - कंपोसिशनना आहे हे त्या वेळीच जाणवले होते !

Omg Sad Very sorry....

Submitted by atuldpatil on 25 May, 2019 - it's ok.. no need to say sorry n all sir
उर्मिला थोडंसं माहिती होतं तुझ्याकडून ऐकून, पण आज काही वेगळ्याच गोष्टी ...
हा धागा फॉलो करत नसल्याने कळलं सुद्धा नसतं... Very sad!
आणि तू कायम इतकी हॅप्पी असतेस, की मी अंदाजही लावू शकलो नसतो.
May his soul rest in peace... Thanks

Submitted by अज्ञातवासी on 25 May, 2019 - 10:09
आहा हा! काय आठवणी जागवल्यात. say sorry n all sir..

अजून एक गाण्याबरोबर जोडलेली दुखःद आठवण

गेल्या काही महिन्यांपूर्वी माझ्या एका मैत्रिणीचे मिस्टर खूप आजारी होते. आम्ही ४-५ जणी तिला भेटायला गेलो होतो. डॉ. नी अल्मोस्ट सांगितलंच होतं आजची रात्र पाहिली तरी बास. जगण्याची शक्यता अल्मोस्ट नाहीच. त्या रात्री मैत्रिणीच्या घरी बसलो थोडा वेळ, कोणाला काहीच शब्द सुचत नव्हते. ती नुसती रडत होती पण खूप रात्र झाली निघायला हवं होतं दुसर्‍या दिवशी आपापले ऑफिस, शाळा. ११.११.३० वाजले असतील रात्रीचे. मला एकटीलाच ड्राईव्ह करून घरी जायचे होते बाकी सगळ्या आसपासच राहणार्‍या होत्या. जाताना रेडीओवर जुनी हिंदी गाणी लावली. शांत रस्ता आणि त्यात लग जा गले के फिर ये ह्सीं रात लागलं आणि त्या मैत्रिणीची तिच्या नवर्‍याची सिच्युएशन आठवून खूपच रडायला यायला लागलं. अगदी त्या वेळच्या परिस्थितीशी तंतोतंत जुळणारं गाणं Sad खूपच वाईट वाटत होतं. त्या अर्ध्या तासानंतर लगेचच ते गेल्याचा फोन आला.
आजही कधी ते गाणं ऐकलं की हेच सगळं आठवतं

>> Submitted by अंजली_१२ on 19 June, 2019 - 20:42

अत्यंत हृदयस्पर्शी आणि मन हेलावून टाकणारी आठवण Sad Sad बापरे! आता हे गाणे कधी ऐकले कि मलासुद्धा हा वाचलेला प्रसंग आठवेल....

>>>>>थोरला भाऊ बाजूलाच बसला होता. तो उडालाच.
हाहाहा

>>>>कधीही न घडलेल्या घटनेच्या आठवणी सुद्धा जाग्या करतात.
वाह वा!! मस्त भावना मांडल्यात.
-------------------
'दिल ढुंढता है ...' जिवघेणी ट्युन आहे. काहीतरी हरवलय-गवसलय काsssही समजत नाही. काहीतरी अतर्क्य आणि हळवं मनात आंदुळत रहातं. तो मूडच हातात पकडताच येत नाही. पारा पकडायला जावा तसा हातातून निसटतो.
-------------
'दिल तडप तडप के ....' काय फ्रेश चैतन्यमय गाणे आहे. मनावर कसलेही उदासीचे जळमट टिकू न देणारे.

अगदी कालच असा काहीतरी हा धागा आहे असं अंधुक आठवत होतं कारण ते हल्ली एक बी प्राक चं फिलहाल मधलं गाणं बर्‍याचदा ऐकणं होतं.
त्यात त्याचा मै किसी और का हूं फिलहाल ला असा काही हताशपणा, दर्द, प्रेम सगळं एकवटून आलंय की बास! फार आवडतं गाणं.

वरचा 'लग जा गले..' चा जो किस्सा किस्सा आहे तो मला अनेकदा आठवत असतो. अजूनही मी कुणाला सहजपणे तो सांगू शकत नाही इतका तो ह्रदयस्पर्शी आहे.

@सामो, धन्यवाद!
हो,'दिल ढुंढता है...' बाबत अगदी अगदी खरं आहे Happy

>> त्यात त्याचा मै किसी और का हूं फिलहाल
>> Submitted by अंजली_१२ on 29 July, 2021 - 00:51

So true! ऐकलं आता हे Happy

हा धागा वाचला होता आधी पण प्रतिसाद द्यायचा राहिला होता. गाण्यांशी जोडलेल्या विनोदी किंवा सुखद आठवणी वाचून मजा आली आणि दुःखद आठवणी वाचून वाईट वाटलं. आणि खरं तर अतुलनी वर लिहिलंय तसं ती ती गाणी ऐकून मलाही इथले दुःखद अनुभव आठवतात. विशेषतः कांटों से खींच के ये आँचल आणि लग जा गले.

आमच्याकडे लहानपणी एरवी वर्षभर टेपरेकॉर्डर लावला जायचा नाही, फक्त मे महिन्याच्या सुट्टीत किंवा तापबीप आला असेल आणि घरी बसायला लागलं तरच! 'पडू आजारी' ची गंमत! Happy
तेव्हा मे महिन्याच्या सुट्टीत 'कयामत से कयामत तक' ची गाणी खूप ऐकायचो. नंतर काही कारणाने ती कॅसेट हरवली (बहुतेक बहिणीच्या मैत्रिणीला दिली आणि तिने परत दिलीच नाही वगैरे) तर त्यामुळे नंतर मधे बरीच वर्षं ती गाणी ऐकली नाहीत आणि त्यामुळे लहानपणची आठवणच टिकून राहिली. अजूनही कयामत से कयामत तकची गाणी ऐकली लहानपणच्या रम्य सुट्ट्या आठवतात Happy
'जानेमन जानेमन' हे गाणं पहिल्यांदा ऐकलं ते जंजिरा किल्ल्यावर जाताना. तेव्हा ते खूप वेळा ऐकलं. त्यामुळे ते गाणं ऐकलं की ती ट्रिपच आठवते!
'साथिया' ची गाणी ऐकली की सेमिस्टर सुरू होतानाची एक प्रकारची दडपणाची भावना आठवते कारण तेव्हा ती गाणी खूप वेळा कानावर पडायची.

छान लेख आणि आठवणी.
वाचता वाचता मलाही एक गम्मत आठवली.
मी तेव्हा नववीला होते.एका बिल्डिंग मधे मी आणि मैत्रिणी क्लासला जायचो,इतर शाळांमधले विद्यार्थी पण यायचे.तेव्हा नुकताच हैल्लो ब्रदर सिनेमा रिलीज झाला होता.क्लास शेजारी एक घर होते तीथे जोरात आवाजात हैलो ब्रदरची गाणी, हटा सावन कि घटा,तेरी चुनरीया सारखी लावलेली असायची. क्लासमध्ये फैन लावण्यावरून आमची आणि इतर शाळातील विद्यार्थ्यांची नेहमी छोटी वादावादी व्हायची आणि आम्ही हटा सावन कि घटा म्हणून एकमेकांना चिडवायचो.
हे गाणं लागलं कि मला हे सगळं आठवतं. Lol

वरचा 'लग जा गले..' चा जो किस्सा किस्सा आहे तो मला अनेकदा आठवत असतो. अजूनही मी कुणाला सहजपणे तो सांगू शकत नाही इतका तो ह्रदयस्पर्शी आहे.>>>>>>>>>>>>>> हो मलाही अजून तो एकटीचा ड्राईव्ह, ती रात्र, उदासी, त्या दोघांचे सहजीवन सगळं काही विसरता येत नाही.

रोमँटीक आठवणी आहेत जरा.

कॉलेजच्या दुस-या वर्षाला असताना शेजारच्याच कॉलेजमधल्या एका ज्युनिअर मुलीशी ओळख झाली. घरगुती कनेक्शन्सही निघाले. आत्ता क्रश ब्रिश म्हणतात ते तसे म्हणत नव्हते त्या वेळी. पण कुठेतरी हृदयाच्या तारा झंकारल्या गेल्या होत्या. ख्रिसमसच्या सुटीत गरीबीमुळे आम्ही शिमल्याला फिरायला गेलो होतो. नेमका हॉटेलमधे टीव्हीवर शर्मिली सुरू होता. बाहेरही हिमवर्षाव चालू होता सिनेमात पण. त्या वेळी तिची खूप आठवण झाली होती. फोन करण्याइतके धाडस नव्हते.

दुस-या दिवशी सकाळी बाजारात एक लडकी को देखा हे गाणे कानावर पडले. सिनेमा यायचा होता अजून. या सगळ्याचा मनाने हवा तसा अर्थ लावला. Lol

कॉलेज संपले. स्थिरस्थावर झालो. मग मध्यस्थ घालून तिच्याशीच लग्न जमवले. फिरायला शिमल्यालाच गेलो होतो. वॉकमनमधे शर्मिलीची कॅसेट कॅकली. इअरफोनचं एकेक टोक आम्ही शेअर करून गाणी ऐकली. पण एक लडकी को देखा कुठे ऐकू येईना. मग त्या दुकानात जाऊन त्याला प्रसंग सांगितला. आताचा प्रसंग सांगितला. दुस-या दिवशी आम्ही तिथून जायच्या वेळेला पठ्ठ्याने "एक लडकी को देखा तो" गाणे लावले.
आधीच्या वेळच्या सगळ्या इच्छा अशी पूर्ण झाल्या. Proud

Pages