आश्रमातून बाहेर पडलेला तो तालवृक्षासारखा उंच तरुण झपझप चालत होता. अंगावरच्या घामेजलेल्या वस्त्रांचं त्याला काहीच भान राहिलं नव्हतं. चेहरा विचारांमुळे व्यग्र झालेला दिसत होता. मांडीवर ओघळलेला रक्ताचा ओहोळ आता सुकून गेला होता. ओलेपणामुळे अंगाला चिकटलेल्या वस्त्रांतून त्याचा बलदंडपणा नजरेत भरत होता. चेहरा व्यग्र झाला असला तरी त्याचे असामान्य देखणेपण लपत नव्हते. वाटेत त्याच्या समोर कुणी आलेच तर त्याला झुकून वंदन करीत होते. कारण हा कुणीतरी राजपुरुष आहे हे त्यांना आतून जाणवत होते. "तू माझ्याशी खोटे बोललास. तू ब्राह्मण नाहीस. इतकी सहनशक्ती ब्राह्मणात असूच शकत नाही." गुरुदेवांचे जळजळीत शब्द त्याच्या कानात घुमु लागले. थकलेले गुरुदेव त्याच्या मांडीवर डोके ठेवून झोपले आणि नेमका भुंग्याने डाव साधला. गुरुदेवांची झोपमोड होऊ नये म्हणून त्याने प्राणांतिक वाटणारी वेदना सहन केली. भुंग्याला आपली मांडी पोखरु दिली आणि त्याचे फळ काय मिळाले तर "जेव्हा तुला माझ्याकडून शिकलेल्या विद्येची आत्यंतिक गरज भासेल तेव्हा ती विद्या तुला आठवणार नाही" हा शाप. यावेळी या भुंग्याला शरीर होते. मात्र हा त्याच्या आयुष्यातला पहिलाच भुंगा नव्हता. अगदी कळायला लागल्यापासून आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत हे त्याला जाणवले होते. आणि "आपण कोण" या प्रश्नाच्या भुंग्याने त्याचे आयुष्य पोखरायला सुरुवात केली होती. त्याच्या अंगावरील कवच आणि कुंडले ही इतर सवंगड्यांकडे नव्हती. त्याच्या आयुष्यात पोखरणार्या भुंग्याने तेव्हापासून प्रवेश केला तो आजतागायत. आज इतके परिश्रम करून संपादन केलेली विद्या निष्फळ होण्याचा शाप मिळाला. त्यावेळी काय नव्हतं त्याच्या मनात? अगतिकता, संताप, आक्रोश...त्याच्या डोक्यात तोच लहानपणापासून घुमणारा भुंग्यांचा आवाज पुन्हा घुमु लागला.
लाखो पराक्रमी योद्धे एकमेकांवर तुटून पडले होते. जणू लाखो भुंगे घोंघावत एकमेकांवर धावून जात होते. युद्धभूमीपासून बाजूला एका झाडाखाली तो योद्धा काही क्षण विश्राम करीत होता. अजूनही गुरुदेवांच्या विद्येचे स्मरण होते. याचा अर्थ अजूनही शेवटची घटका जवळ आली नव्हती. पण युद्धात फार जवळची माणसे मारली गेली होती. त्यांच्या आठवणींनी तो गलबलला. आता लढायचं कुणासाठी? मित्राला दिलेल्या शब्दासाठी. तो शब्द तरी प्रामाणिक होता का? कारण आपण त्या सर्वश्रेष्ठ म्हटल्या गेलेल्या योद्ध्यालाच ठार मारु. इतरांना हातही लावणार नाही असा शब्द दिला आहे. आज सर्वांचे पराभव केले पण त्यांना मारता आलं नाही. सोडून द्यावं लागलं. योद्धा रथात बसला. वेळ घालवून चालणार नव्हता. आज आपण नाहीतर तो. दोघांपैकी एकच उरणार. तो कटूपणे हसला. एक भुंगा आला कवचकुंडलं घेऊन गेला. एक भुंगा आला आणि सारथ्य करताना अपमान सहन करण्याची अट त्याने ठेवली. रथ पुढे सहजपणे जात होता. योद्ध्याच्या बाणासमोर कुणीही टिकत नव्हतं. अचून नेम साधत तो सहजपणे शीरकमले उडवित होता. त्याला आपल्या कौशल्यावर सार्थ विश्वास होता. आपण ब्राह्मण नाही म्हणून सर्वश्रेष्ठ गुरु आपल्याला शिकवणार नाही. राजपुत्रांबरोबर आपल्याला मानाने शिक्षण घेता येणार नाही. खोटे बोलून आश्रमात दाखल होणे किंवा आयुष्यभर रथ घडविण्याची कामे करणे हे दोनच पर्याय आपल्यासमोर होते. सामान्य म्हणून जगता येणे शक्यच नव्हते इतका पराक्रम त्याच्या अंगी भरला होता. त्याच्या मनात विचारांचे वादळ उठले होते. सारथ्याची कुत्सित वाक्ये आता त्याला ऐकू येत नव्हती. सारथ्याला त्याने आपला रथ प्रतिपक्षाच्या सर्वश्रेष्ठ धनुर्धराकडे नेण्यास सांगितले. पण आज विचारांना निरनिराळ्या वाटा फुटत होत्या. धनुष्यातून सुटणार्या बाणांप्रमाणे ते सरळ जात येत नव्हते. अन्यथा त्या वृद्धेची आठवण आता आली नसती. ऐन युद्धात ती राजस्त्री आपल्या शिबीरात आली होती.
त्याच्यासमोर पुन्हा एक भुंगा उडू लागला. स्त्रीच्या आवाजात तो म्हणु लागला "तु माझा मुलगा आहेस. लग्नापुर्वी झालेला. तु क्षत्रिय आहेस. तुला पराक्रमी असे पाच बंधु आहेत" त्याने कानावर घट्ट हात ठेवले. या भुंग्याने येऊन त्याचा पराक्रमच पोखरून टाकला होता. युद्धात पडण्याआधीच त्याला पराभूत केले होते. ज्यांच्याशी आजन्म वैर केलं ते माझे बंधु? त्यांना मारायचं? आपल्याला हे शक्य होईल? रथ पुढे चालला होता. रक्ताने माखलेले योद्धे मदमस्त गजांप्रमाणे एकमेकांवर चाल करून जात होते. मरणार्यांचे आकोश कानावर पडत होते. मारणार्यांच्या भीषण आरोळ्या ऐकू येत होत्या. पुन्हा एक भुंगा कानाजवळ येऊन स्त्रीच्या आवाजात गुणगुणु लागला "मी सूतपुत्राला वरणार नाही". तो आणखी त्वेषाने बाण सोडू लागला. आज त्याने अनेकांचा पराभव केला होता. फार वर्षापूर्वी जेव्हा आपले कौशल्य दाखविण्याचे वेळ आली होती तेव्हा हीच माणसे आपल्याला आपले कुल विचारीत होती. आपल्याला हसत होती. आज आपल्याच हातून जीवदान देताना बरेच जुने हिशोब पूर्ण झाले होते. त्या अचाट पराक्रमी खादाड बलदंडाला त्याने पराभव करून सोडून दिले होते. पत्नीला जुगारात हरणार्या जुगार्याला त्याने युद्धात हरवले होते. इतर दोन बंधुंनाही सहज धूळ चारली होती. आता उरला होता एकच जो त्याच्या तोलामोलाचा होता. त्याला वाटलं आपला हा पराक्रम त्या शरपंजरी पडलेल्या वृद्धाने पाहायला हवा होता. पण हा विचार मनात येताच त्याने झटकून टाकला कारण एका भुंग्याने पुन्हा घोंगावत येऊन कानाजवळ म्हटले "तू अर्धरथी आहेस". त्याच्या मनात संताप फुटला. आणि रथ त्याच्या प्रतिस्पर्ध्यासमोर आला. सर्वश्रेष्ठ धनुर्धर कोण ते आज ठरणार होते.
दोन धनुर्धर त्वेषाने एकमेकांवर तुटून पडले. निरनिराळ्या आकाराचे बाण सुटत होते. काही टोकदार काही अर्धचंद्राकृती. काही बाण मध्येच दुसर्या बाणाने खंडीत केले जात होते. काही जखमी करत होते. एक क्षण विचार करीत योद्ध्याने एक अमोघ बाण हातात घेतला. हा निर्णायक बाण होता. नेम चुकणे शक्य नव्हते. अभिमंत्रून बाण सोडला पण समोर डोक्यावर मोराचे पीस लावलेल्या चतूर सारथ्याने घोड्यांना दबवले आणि बाण फक्त मुकुट उडवून गेला. पुन्हा पुन्हा घोंघावण्याचा आवाज कानात सुरु झाला. तो संतापला. ऐन युद्धाच्यावेळी आपले लक्ष विचलित करणारे हे भुंगे टाचेखाली चिरडले पाहिजेत असे त्याला वाटले. तसा त्याने काहीवेळा प्रयत्नही केला होता. "सूतपुत्राला वरणार नाही" असं बोलणारा स्त्री आवाजातला भुंगा त्याने एकदा चिरडला होता. "पाच पुरुषांची पत्नी म्हणजे वेश्या" असे तो भर सभेत त्या उर्मट स्त्रीला म्हणाला होता. युद्धात सर्वांनी एकत्र गाठून तिच्या पुत्राला ठार मारले होते. त्यात योद्ध्यानेही आपले बाण त्या पराक्रमी पण कोवळ्या तरुणावर चालवले होते. पण इतके करूनही शांतता नव्हती. डोक्यातले विचार जात नव्हते. कधीही निरामय मनाने पराक्रम गाजवता आला नव्हता. कुल माहित नव्हते तेव्हा ते माहित करून घेण्यासाठी धडपड केली. कुल माहीत झाले तेव्हा त्याचा काही उपयोग झाला नाही. उलट नुकसानच झाले. सारे युद्धमैदान जणू काळ्या भुंग्यांनी भरून गेले होते. आता ते हळुहळु आपल्या शरीरावर चढणार असे त्याला वाटले आणि अचानक रथाची एक बाजु कलल्यासारखी झाली. तेव्हा त्याला पहिला धक्का बसला. हा धक्का फक्त रथ अचानक थांबल्याने बसलेला धक्का नव्हता. एक गुणगुण कानाशी आली "ऐन युद्धाच्यावेळी भूमी तुझ्या रथाचे चाक गिळेल". एक निश्वास सोडून तो थांबला. त्याने धनुष्य बाजूला ठेवले. तो खाली उतरला. नि:शस्त्र आणि रथावर नसलेल्या त्याच्यावर शस्त्र उगारले जाणार नाही याची त्याला खात्री होती.
त्याने खाली उतरून चाकाला हात घातला आणि तो चाक उचलण्याचा प्रयत्न करू लागला. इतक्यात समोर धनुर्धराने भात्यातून बाण काढलेला त्याने पाहिला. तो स्तंभित झाला. मी नि:शस्त्र असताना? चाक काढण्यात गुंतलो असताना? आणि हा कोण तर सर्वश्रेष्ठ धनुर्धर? त्याने समोर हात करून थांबण्यास सांगितले. "हा अधर्म आहे" तो गरजला. पण इतक्यात त्या कोवळ्या तरुणावर आपण सोडलेला बाण त्याला दिसु लागला. सभेत फरफटत आणलेल्या त्या अबलेला आपण वेश्या म्हणालो ते दृश्य नजरेसमोर दिसु लागले. एक निळसर छटा असलेला भुंगा कानात गुणगुणु लागला. तो काय म्हणत होता ते कळत नव्हते पण एक वाक्य मात्र पुन्हा पुन्हा ऐकु येत होते "तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म?" समोर पाहिले बाण धनुष्याला जोडला जात होता. गुरुदेवांनी दिलेल्या अस्त्राची आताच गरज होती. पण डोक्यातले आवाज वाढु लागले होते. ""जेव्हा तुला माझ्याकडून शिकलेल्या विद्येची आत्यंतिक गरज भासेल तेव्हा ती विद्या तुला आठवणार नाही","ऐन युद्धाच्यावेळी भूमी तुझ्या रथाचे चाक गिळेल""तू अर्धरथी आहेस","तु माझा मुलगा आहेस. लग्नापुर्वी झालेला","मी सूतपुत्राला वरणार नाही" भुंगे जणु त्याला पोखरण्यासाठी शरीरावर चढु लागले होते. ते आजवर इतक्या जवळ कधी आले नव्हते. त्यांचा कोलाहल आजवर इतका वाढला नव्हता. या आवाजात त्याला अस्त्राचे मंत्र आठवेनात. समोर धनुर्धराने धनुष्याला बाण जोडून प्रत्यंचा आकर्ण ओढली होती. बाण सुटला. त्याचाही घोंघावणारा आवाज भुंग्याप्रमाणेच होता.
#अमी, मद्रराज शल्य हा
#अमी, मद्रराज शल्य हा कर्णाच्या रथाचे सारथ्य करत होता त्याने अशी अट घातली होती, तु अर्धरथी आहेस हे त्यानेच म्हटले होते.
१. शल्यराजा ( माद्रीचा भाऊ,
१. शल्यराजा ( माद्रीचा भाऊ, नकुल-सहदेवांचा मामा) हा कर्णाचा सारथी होता. तो ( पांडवांना अप्रत्यक्षरीत्या मदत करण्यासाठी) कर्णाला अपमानास्पद बोलून त्याचा तेजोभंग करत असे.
२. अर्धरथी बहुतेक भीष्माने म्हटलं होतं कर्णाला. त्यामुळे चिडून कर्णाने अशी प्रतिज्ञा केली की जोवर भीष्म सेनापती आहे तोवर मी युद्ध लढणार नाही.
ओह अर्धरथीही शल्यानेच म्हटलं
ओह अर्धरथीही शल्यानेच म्हटलं होतं का?
वावे, आठवला भीष्माने म्हटले
वावे, आठवला भीष्माने म्हटले होते अर्धरथी
अच्छा. धन्यवाद शीतल आणि वावे
अच्छा. धन्यवाद शीतल आणि वावे
अर्धरथी म्हणजे काय?
ॲमी, अगदी टेक्निकल अर्थ माहीत
ॲमी, अगदी टेक्निकल अर्थ माहीत नाही मला. पण रथी आणि महारथी या वरच्या श्रेणी होत्या. अर्धरथी ही खालची श्रेणी. कुठली कुठली कौशल्ये अवगत आहेत यावर किंवा शौर्यावर अवलंबून ठरवत असतील.
मस्त लेख !! आवडला !
मस्त लेख !! आवडला !
पण रथी आणि महारथी या वरच्या श्रेणी होत्या. अर्धरथी ही खालची श्रेणी. कुठली कुठली कौशल्ये अवगत आहेत यावर किंवा शौर्यावर अवलंबून ठरवत असतील>> बरोबर रथी, महारथी, अर्धरथी आणि सारथी अशी उतरंड असावी
अर्धरथी म्हणजे युध्द करता येते पण रथ चालवणं जमत नाही
अर्धरथी, रथी , महारथी वगैरे
अर्धरथी, रथी , महारथी वगैरे पुढील लिंकवर
https://www.google.com/amp/s/dharmamarg.wordpress.com/2018/03/19/%25E0%2...
धन्यवाद वावे, अंजली आणि
धन्यवाद वावे, अंजली आणि दत्तात्रय साळुंके _/\_
असंही म्हणतात की भीष्माला
असंही म्हणतात की भीष्माला मुद्दामच कर्णाला युद्धापासून दूर ठेवायचे होते म्हणून त्याने अर्धरथी म्हणून त्याचा अपमान केला.
भीष्म कर्ण आणि श्रीकृष्ण हे
भीष्म कर्ण आणि श्रीकृष्ण हे तिघेही जलपुरुष होते, ते तिघे मनातून एकमेकांना ओळखून होते. कर्ण आयुषभर संभ्रमामध्ये जगला परंतु भीष्म आणि श्रीकृष्ण त्याची क्षमता जाणून होते. द्रौपदी जेव्हा मी सुतपुत्राला वरनार नाही असे म्हणते तेव्हा विरासनात धनुष्य प्रत्येंचा ताणलेली असताना तो बाण कर्ण श्रीकृष्णाच्या पायाच्या अंगठ्या वर मारतो
अप्रतिम!
अप्रतिम!
लिखाण आवडले .
लिखाण आवडले .
प्रतिसादांमधून बरीच माहिती मिळाली.
खुप खुप भारी !!!!
खुप खुप भारी !!!!
महाभारतातला कर्ण हा chapter
महाभारतातला कर्ण हा chapter मला खूप इंटरेस्टिंग वाटतो. कथा तर उत्तमच आहे. पण इथे प्रतिसादात पण छान माहिती मिळते आहे.
भुंग्याचा प्रतिकात्मक वापर खूप आवडला.
खूपच मस्त.!
खूपच मस्त.!
लहानपणापासूनच कर्ण हे सर्वाधिक आवडतं पात्र आहे..
मृत्यूंजय, राधेय.. अनेक वेळा वाचलंयं..
हे लिखाणही खूप आवडलं..
भुंग्याचा प्रतिकात्मक वापर खूप आवडला.. +1
महाभारतातील कर्ण माझं तस आवडत
महाभारतातील कर्ण माझं तस आवडत पात्र आहे ...
पूर्ण लेखामध्ये एकदाही पात्रांच्या नावांचा उल्लेख न करता जे तुम्ही लिहिलय...
जबरदस्त!!!
शब्दच नाहीत उत्कृष्ट म्हणायला !!
खूप आवडलं मला....
खुप खुप आभार!
खुप खुप आभार!
कर्ण माझेही आवडीचे पात्र आहे
कर्ण माझेही आवडीचे पात्र आहे अगदी रडले होते मी मृत्युंजय वाचताना. अंगी पराक्रम अन् क्षमता असूनही अधर्मा कडून लढले की काय होते हे त्याच्या कडे बघून कळते. मला वाटते की तो महारथी होता भीष्मां प्रमाणेच. अर्ध रथी का म्हणले हे कळत नाही. संदर्भ मिळाला तर बरे.
मला वाटते की तो महारथी होता
मला वाटते की तो महारथी होता भीष्मां प्रमाणेच. अर्ध रथी का म्हणले हे कळत नाही. संदर्भ मिळाला तर बरे.
बहुधा भीष्मांना त्याचे जन्मरहस्य ठावूक असावे त्यामुळे भावाभावांमध्ये लढाई होऊ नये म्हणून त्यांनी त्याचा अपमान करून त्याला युद्धापासून दूर ठेवले असावे.
सुरेख !
सुरेख !
अधर्मा कडून लढले की > दुर्योधनाची राजा होण्याची इच्छा मला चुकीची वाटत नाही. वडिलांना दृष्टी नव्हती; पण हा तर सक्षम होता.
बाकी द्यूत, वस्त्रहरण, अंबा,अंबालिका स्वयंवर आणि एकुणातच लालसा आणि सूडभावना डेंजर वाटतात
दुर्योधनाच्या दृष्टिकोनातून
दुर्योधनाच्या दृष्टिकोनातून कोणी कादंबरी लिहिली नाही, नाहीतर.. वस्त्रहरण मध्ये कोणतीही वासना नव्हती फक्त सूड होता. शिवाय भीम कौरवांना खेळा खेळा मध्ये आपटून टाकी, पाण्यात टाके ते दुर्योधनास लागले होते. पांडवांना का म्हणून राज्य द्यायचे मुळात तो त्यांना पांडव मानत नसे कारण पांडूला तर शाप होता ना.
>>>बहुधा भीष्मांना त्याचे
>>>बहुधा भीष्मांना त्याचे जन्मरहस्य ठावूक असावे त्यामुळे भावाभावांमध्ये लढाई होऊ नये म्हणून त्यांनी त्याचा अपमान करून त्याला युद्धापासून दूर ठेवले असावे.>>> बरोबर
कुंती ही गेली होती कर्णाला भेटायला तेव्हा माझ्या पाच पुत्रांना काही होऊ नये असे वचन घेते ऐवजी माझ्या सहा पुत्रांना म्हणाली असती तर.
कर्णाला कळलं होता तो अधर्माच्या बाजूने लढतोय परंतु त्याने दुर्योधनाला वचन दिले होते. दुर्योधनाने कर्णाच्या जोरावर तर युद्ध पुकारले होते.
या लॉजिकने कौरवांना तरी कौरव
या लॉजिकने कौरवांना तरी कौरव का म्हणायचे? भीष्म हा शेवटचा कुरु. धृतराष्ट्र आणि पांडू ( आणि विदुर) हेही नियोगातूनच जन्मले होते.
दुर्योधनाची राजा होण्याची
दुर्योधनाची राजा होण्याची इच्छा मला चुकीची वाटत नाही. वडिलांना दृष्टी नव्हती; पण हा तर सक्षम होता.>>> पांडूने धुतराष्ट्राला राज्य दिले होते वनात जाण्यापूर्वी ते पुन्हा त्याच्या मुलांना मिळावे असे भीष्म कृष्ण यांना वाटत होते. धुतराष्ट अभिषिक्त राजा नव्हता
वावे तस म्हणायचं असेल तर
वावे तस म्हणायचं असेल तर भीष्मच शेवटचा कुरु कौरव होता
खरंतर हे शकुनी मामाचा
खरंतर हे शकुनी मामाचा कारस्थान म्हणून महाभारत, त्याला बदला सूड घ्यायचा होता म्हणून तो बहिणीकडे राहून दुर्योधनाला बालपणापासूनच तसें संस्कार देत होता त्याचा अहंकार फुलवत होता.
तस म्हणायचं असेल तर भीष्मच
तस म्हणायचं असेल तर भीष्मच शेवटचा कुरु कौरव होता>>>>बरोबर , हेही वाचल्याचं आठवतंय.
खरंतर हे शकुनी मामाचा कारस्थान म्हणून महाभारत, त्याला बदला सूड घ्यायचा होता >>> शक्य आहे. तो कृष्णाला पुरेपूर ओळखून होता. कृष्ण पांडवां सोबत असताना कौरवांचा विनाश अटळ आहे हे तो जाणून होता.
खूप क्लीष्ट आहे हे महाभारत आणि म्हणून नेहमीच interesting राहीले आहे.
मी असाही एक संदर्भ वाचला आहे की द्रौपदी च्या मनात असाही विचार आला होता ' जर कर्ण आपला पती असता तर आज ही वेळ आली नसती,
ऑर्फिअस ,
ऑर्फिअस ,
सुंदर कल्पना अन सुंदर लेखन .
भुंग्याचं प्रतीक उत्तम प्रतीत होतेय !
केवळ अप्रतिम !!
केवळ अप्रतिम !!
Pages