भुंगा

Submitted by ऑर्फियस on 3 March, 2019 - 06:07

आश्रमातून बाहेर पडलेला तो तालवृक्षासारखा उंच तरुण झपझप चालत होता. अंगावरच्या घामेजलेल्या वस्त्रांचं त्याला काहीच भान राहिलं नव्हतं. चेहरा विचारांमुळे व्यग्र झालेला दिसत होता. मांडीवर ओघळलेला रक्ताचा ओहोळ आता सुकून गेला होता. ओलेपणामुळे अंगाला चिकटलेल्या वस्त्रांतून त्याचा बलदंडपणा नजरेत भरत होता. चेहरा व्यग्र झाला असला तरी त्याचे असामान्य देखणेपण लपत नव्हते. वाटेत त्याच्या समोर कुणी आलेच तर त्याला झुकून वंदन करीत होते. कारण हा कुणीतरी राजपुरुष आहे हे त्यांना आतून जाणवत होते. "तू माझ्याशी खोटे बोललास. तू ब्राह्मण नाहीस. इतकी सहनशक्ती ब्राह्मणात असूच शकत नाही." गुरुदेवांचे जळजळीत शब्द त्याच्या कानात घुमु लागले. थकलेले गुरुदेव त्याच्या मांडीवर डोके ठेवून झोपले आणि नेमका भुंग्याने डाव साधला. गुरुदेवांची झोपमोड होऊ नये म्हणून त्याने प्राणांतिक वाटणारी वेदना सहन केली. भुंग्याला आपली मांडी पोखरु दिली आणि त्याचे फळ काय मिळाले तर "जेव्हा तुला माझ्याकडून शिकलेल्या विद्येची आत्यंतिक गरज भासेल तेव्हा ती विद्या तुला आठवणार नाही" हा शाप. यावेळी या भुंग्याला शरीर होते. मात्र हा त्याच्या आयुष्यातला पहिलाच भुंगा नव्हता. अगदी कळायला लागल्यापासून आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत हे त्याला जाणवले होते. आणि "आपण कोण" या प्रश्नाच्या भुंग्याने त्याचे आयुष्य पोखरायला सुरुवात केली होती. त्याच्या अंगावरील कवच आणि कुंडले ही इतर सवंगड्यांकडे नव्हती. त्याच्या आयुष्यात पोखरणार्‍या भुंग्याने तेव्हापासून प्रवेश केला तो आजतागायत. आज इतके परिश्रम करून संपादन केलेली विद्या निष्फळ होण्याचा शाप मिळाला. त्यावेळी काय नव्हतं त्याच्या मनात? अगतिकता, संताप, आक्रोश...त्याच्या डोक्यात तोच लहानपणापासून घुमणारा भुंग्यांचा आवाज पुन्हा घुमु लागला.

लाखो पराक्रमी योद्धे एकमेकांवर तुटून पडले होते. जणू लाखो भुंगे घोंघावत एकमेकांवर धावून जात होते. युद्धभूमीपासून बाजूला एका झाडाखाली तो योद्धा काही क्षण विश्राम करीत होता. अजूनही गुरुदेवांच्या विद्येचे स्मरण होते. याचा अर्थ अजूनही शेवटची घटका जवळ आली नव्हती. पण युद्धात फार जवळची माणसे मारली गेली होती. त्यांच्या आठवणींनी तो गलबलला. आता लढायचं कुणासाठी? मित्राला दिलेल्या शब्दासाठी. तो शब्द तरी प्रामाणिक होता का? कारण आपण त्या सर्वश्रेष्ठ म्हटल्या गेलेल्या योद्ध्यालाच ठार मारु. इतरांना हातही लावणार नाही असा शब्द दिला आहे. आज सर्वांचे पराभव केले पण त्यांना मारता आलं नाही. सोडून द्यावं लागलं. योद्धा रथात बसला. वेळ घालवून चालणार नव्हता. आज आपण नाहीतर तो. दोघांपैकी एकच उरणार. तो कटूपणे हसला. एक भुंगा आला कवचकुंडलं घेऊन गेला. एक भुंगा आला आणि सारथ्य करताना अपमान सहन करण्याची अट त्याने ठेवली. रथ पुढे सहजपणे जात होता. योद्ध्याच्या बाणासमोर कुणीही टिकत नव्हतं. अचून नेम साधत तो सहजपणे शीरकमले उडवित होता. त्याला आपल्या कौशल्यावर सार्थ विश्वास होता. आपण ब्राह्मण नाही म्हणून सर्वश्रेष्ठ गुरु आपल्याला शिकवणार नाही. राजपुत्रांबरोबर आपल्याला मानाने शिक्षण घेता येणार नाही. खोटे बोलून आश्रमात दाखल होणे किंवा आयुष्यभर रथ घडविण्याची कामे करणे हे दोनच पर्याय आपल्यासमोर होते. सामान्य म्हणून जगता येणे शक्यच नव्हते इतका पराक्रम त्याच्या अंगी भरला होता. त्याच्या मनात विचारांचे वादळ उठले होते. सारथ्याची कुत्सित वाक्ये आता त्याला ऐकू येत नव्हती. सारथ्याला त्याने आपला रथ प्रतिपक्षाच्या सर्वश्रेष्ठ धनुर्धराकडे नेण्यास सांगितले. पण आज विचारांना निरनिराळ्या वाटा फुटत होत्या. धनुष्यातून सुटणार्‍या बाणांप्रमाणे ते सरळ जात येत नव्हते. अन्यथा त्या वृद्धेची आठवण आता आली नसती. ऐन युद्धात ती राजस्त्री आपल्या शिबीरात आली होती.

त्याच्यासमोर पुन्हा एक भुंगा उडू लागला. स्त्रीच्या आवाजात तो म्हणु लागला "तु माझा मुलगा आहेस. लग्नापुर्वी झालेला. तु क्षत्रिय आहेस. तुला पराक्रमी असे पाच बंधु आहेत" त्याने कानावर घट्ट हात ठेवले. या भुंग्याने येऊन त्याचा पराक्रमच पोखरून टाकला होता. युद्धात पडण्याआधीच त्याला पराभूत केले होते. ज्यांच्याशी आजन्म वैर केलं ते माझे बंधु? त्यांना मारायचं? आपल्याला हे शक्य होईल? रथ पुढे चालला होता. रक्ताने माखलेले योद्धे मदमस्त गजांप्रमाणे एकमेकांवर चाल करून जात होते. मरणार्‍यांचे आकोश कानावर पडत होते. मारणार्‍यांच्या भीषण आरोळ्या ऐकू येत होत्या. पुन्हा एक भुंगा कानाजवळ येऊन स्त्रीच्या आवाजात गुणगुणु लागला "मी सूतपुत्राला वरणार नाही". तो आणखी त्वेषाने बाण सोडू लागला. आज त्याने अनेकांचा पराभव केला होता. फार वर्षापूर्वी जेव्हा आपले कौशल्य दाखविण्याचे वेळ आली होती तेव्हा हीच माणसे आपल्याला आपले कुल विचारीत होती. आपल्याला हसत होती. आज आपल्याच हातून जीवदान देताना बरेच जुने हिशोब पूर्ण झाले होते. त्या अचाट पराक्रमी खादाड बलदंडाला त्याने पराभव करून सोडून दिले होते. पत्नीला जुगारात हरणार्‍या जुगार्‍याला त्याने युद्धात हरवले होते. इतर दोन बंधुंनाही सहज धूळ चारली होती. आता उरला होता एकच जो त्याच्या तोलामोलाचा होता. त्याला वाटलं आपला हा पराक्रम त्या शरपंजरी पडलेल्या वृद्धाने पाहायला हवा होता. पण हा विचार मनात येताच त्याने झटकून टाकला कारण एका भुंग्याने पुन्हा घोंगावत येऊन कानाजवळ म्हटले "तू अर्धरथी आहेस". त्याच्या मनात संताप फुटला. आणि रथ त्याच्या प्रतिस्पर्ध्यासमोर आला. सर्वश्रेष्ठ धनुर्धर कोण ते आज ठरणार होते.

दोन धनुर्धर त्वेषाने एकमेकांवर तुटून पडले. निरनिराळ्या आकाराचे बाण सुटत होते. काही टोकदार काही अर्धचंद्राकृती. काही बाण मध्येच दुसर्‍या बाणाने खंडीत केले जात होते. काही जखमी करत होते. एक क्षण विचार करीत योद्ध्याने एक अमोघ बाण हातात घेतला. हा निर्णायक बाण होता. नेम चुकणे शक्य नव्हते. अभिमंत्रून बाण सोडला पण समोर डोक्यावर मोराचे पीस लावलेल्या चतूर सारथ्याने घोड्यांना दबवले आणि बाण फक्त मुकुट उडवून गेला. पुन्हा पुन्हा घोंघावण्याचा आवाज कानात सुरु झाला. तो संतापला. ऐन युद्धाच्यावेळी आपले लक्ष विचलित करणारे हे भुंगे टाचेखाली चिरडले पाहिजेत असे त्याला वाटले. तसा त्याने काहीवेळा प्रयत्नही केला होता. "सूतपुत्राला वरणार नाही" असं बोलणारा स्त्री आवाजातला भुंगा त्याने एकदा चिरडला होता. "पाच पुरुषांची पत्नी म्हणजे वेश्या" असे तो भर सभेत त्या उर्मट स्त्रीला म्हणाला होता. युद्धात सर्वांनी एकत्र गाठून तिच्या पुत्राला ठार मारले होते. त्यात योद्ध्यानेही आपले बाण त्या पराक्रमी पण कोवळ्या तरुणावर चालवले होते. पण इतके करूनही शांतता नव्हती. डोक्यातले विचार जात नव्हते. कधीही निरामय मनाने पराक्रम गाजवता आला नव्हता. कुल माहित नव्हते तेव्हा ते माहित करून घेण्यासाठी धडपड केली. कुल माहीत झाले तेव्हा त्याचा काही उपयोग झाला नाही. उलट नुकसानच झाले. सारे युद्धमैदान जणू काळ्या भुंग्यांनी भरून गेले होते. आता ते हळुहळु आपल्या शरीरावर चढणार असे त्याला वाटले आणि अचानक रथाची एक बाजु कलल्यासारखी झाली. तेव्हा त्याला पहिला धक्का बसला. हा धक्का फक्त रथ अचानक थांबल्याने बसलेला धक्का नव्हता. एक गुणगुण कानाशी आली "ऐन युद्धाच्यावेळी भूमी तुझ्या रथाचे चाक गिळेल". एक निश्वास सोडून तो थांबला. त्याने धनुष्य बाजूला ठेवले. तो खाली उतरला. नि:शस्त्र आणि रथावर नसलेल्या त्याच्यावर शस्त्र उगारले जाणार नाही याची त्याला खात्री होती.

त्याने खाली उतरून चाकाला हात घातला आणि तो चाक उचलण्याचा प्रयत्न करू लागला. इतक्यात समोर धनुर्धराने भात्यातून बाण काढलेला त्याने पाहिला. तो स्तंभित झाला. मी नि:शस्त्र असताना? चाक काढण्यात गुंतलो असताना? आणि हा कोण तर सर्वश्रेष्ठ धनुर्धर? त्याने समोर हात करून थांबण्यास सांगितले. "हा अधर्म आहे" तो गरजला. पण इतक्यात त्या कोवळ्या तरुणावर आपण सोडलेला बाण त्याला दिसु लागला. सभेत फरफटत आणलेल्या त्या अबलेला आपण वेश्या म्हणालो ते दृश्य नजरेसमोर दिसु लागले. एक निळसर छटा असलेला भुंगा कानात गुणगुणु लागला. तो काय म्हणत होता ते कळत नव्हते पण एक वाक्य मात्र पुन्हा पुन्हा ऐकु येत होते "तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म?" समोर पाहिले बाण धनुष्याला जोडला जात होता. गुरुदेवांनी दिलेल्या अस्त्राची आताच गरज होती. पण डोक्यातले आवाज वाढु लागले होते. ""जेव्हा तुला माझ्याकडून शिकलेल्या विद्येची आत्यंतिक गरज भासेल तेव्हा ती विद्या तुला आठवणार नाही","ऐन युद्धाच्यावेळी भूमी तुझ्या रथाचे चाक गिळेल""तू अर्धरथी आहेस","तु माझा मुलगा आहेस. लग्नापुर्वी झालेला","मी सूतपुत्राला वरणार नाही" भुंगे जणु त्याला पोखरण्यासाठी शरीरावर चढु लागले होते. ते आजवर इतक्या जवळ कधी आले नव्हते. त्यांचा कोलाहल आजवर इतका वाढला नव्हता. या आवाजात त्याला अस्त्राचे मंत्र आठवेनात. समोर धनुर्धराने धनुष्याला बाण जोडून प्रत्यंचा आकर्ण ओढली होती. बाण सुटला. त्याचाही घोंघावणारा आवाज भुंग्याप्रमाणेच होता.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अप्रतिम! Happy कर्ण माझं लहानपणापासूनचं आवडीचं पात्र. अगदी सुंदर लिहिलंय तुम्ही. कर्णाच्या आयुष्यातले त्याला पोखरणारे भुंगे यथार्थ शब्दांत मांडलेयत. Happy

मस्त लिहिले आहे, कर्ण जीवनावरील जवळजवळ सर्व पुस्तके कादंबरी वाचून झाल्या आहेत. तुम्ही अगदी समर्पक लिहिले आहे. मनुष्याचे आयुष्य तरी काय आहे भुंग्याच्या भुणभुणतेतून केलेली वाटचाल.

खूप छान
कर्ण व्यक्तिरेखा लहानपणा पासून खूप आवडीची असल्याने हे लिखाण मनात विशेष महत्व राखणारे आहे.

तू माझ्याशी खोटे बोललास. तू ब्राह्मण नाहीस. इतकी सहनशक्ती ब्राह्मणात असूच शकत नाही."
>>> कवच आणि कुंडले बघून गुरुला कळायला पाहिजे होते की.

तू माझ्याशी खोटे बोललास. तू ब्राह्मण नाहीस. इतकी सहनशक्ती ब्राह्मणात असूच शकत नाही."
>>> कवच आणि कुंडले बघून गुरुला कळायला पाहिजे होते की.

नवीन Submitted by च्रप्स on 5 March, 2019 - 05:32

कवच कुण्ड्ल दान केल्यावरच कर्ण ह्या गुरूकडे अस्त्र शिकायला गेला होता

तसेहि कवच कुण्ड्ल असते तर भुन्गा माण्डी पोखरू नसता शकला .

____/\____

अप्रतिम!!! खुप आवड्लंय.
कर्णाबाद्दल काहीही वाचताना अगदी भुंगाच लागतो डोक्याला.
शब्दखुणांमधे संबंधित शब्द अ‍ॅड करा.

खूपच सुंदर लिहीलय ! कर्णाच्या मनाची तडफड, संताप, शब्दा शब्दात उतरलाय.
" मृत्युंजय" वाचताना, "कर्ण" प्रकरण वाचताना खूप वाईट वाटलं . आणि पुन्हा वाचण्याचं धाडसं झालं नाही.

कवच कुंडले असतानाही मांडीवर रक्ताचा डाग कसा काय. जखमच व्हायला नको ना ???>>टायसन, कवच-कुंडले इंद्राने नेली म्हणून तर कर्णाला अस्रांची आवश्यकता पडली. कवच कुंडले गमावल्यानंतरचा हा प्रसंग आहे.

छान लिहलंय.

> १. एक भुंगा आला आणि सारथ्य करताना अपमान सहन करण्याची अट त्याने ठेवली.

२. पण हा विचार मनात येताच त्याने झटकून टाकला कारण एका भुंग्याने पुन्हा घोंगावत येऊन कानाजवळ म्हटले "तू अर्धरथी आहेस". >
या दोन्हीचे संदर्भ माहित नाहीत. सांगा कोणीतरी.

Pages