ग्रामीण बोली भाषांतील शब्द.

Submitted by कोदंडपाणी on 30 January, 2019 - 06:04

शालींच्या मैत्रचे भाग वाचताना त्यातील पात्रांच्या तोंडात अनेक ग्रामीण शब्द वाचले. काही मजेशीर वाटले. प्रत्येक प्रांताची जशी आपली एक खाद्यसंस्कृती असते तशी एक भाषाही असते. त्यातल्या त्यात ग्रामीण भाषा तर अतिशय गोड असते. त्यात वापरले जाणारे शब्द रोजच्या व्यवहारात वापरले जात असले तरी ते प्रमाण मराठी भाषेत नसल्याने सहसा लिखानात येत नाही. शहरांमधे तर ते बोलण्यातही येत नाही. तर असेच वेगवेगळ्या प्रांतातील ग्रामीण भाषेतील मजेदार, वेगळे शब्द वाचायला मजा येईल. सांगली, कोल्हापुर, नागपुर, नगर, कोकण आणि महाराष्ट्रातील अनेक भागात वेगवेगळे शब्द वापरले जातात ते येथे लिहिले तर सर्वांना ते वाचण्यातला आनंद मिळेल तसेच त्यांचे अर्थही कळतील. उदा. आमच्या जुन्नर भागात वापरले जाणारे काही शब्द:

यळोमाळ: येथे तेथे किंवा दिवसभर
कव्हर: किती वेळ
उलसक किंवा उलीशीक: अत्यंत थोडे.
फिंद्री: खोडकर मुलगी
पाठ: शेळी

तुमच्याकडेही असे काही शब्द असतील तर अर्थासहीत व जमल्यास वाक्यासहीत येथे लिहा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इरल्यात ज्यूट वापरीत नसत. जुन्या ठाणे जिल्ह्यात इरले करताना बांबूच्या ताशीव, वाकतील अश्या लवचिक पण बळकट काड्या/काठ्या/काटक्या/कामट्या वापरून लांब सुपाच्या आकाराचा सांगाडा (फ्रेम)बनवीत. मग आतली पोकळ जागा बांबूच्या सपाट पातळ तासलेल्या लांब चिपट्या/बेळांनी चटईच्या विणीने पोकळसर भरून टाकीत. मग बाहेरच्या बाजूने पळसाची पाने चाराचाराच्या संख्येत घेऊन काथ्याने बाजले विणतात तशा गाठी घालून त्या सांगाड्यावर बसवीत. मग अगदी पाऊसप्रूफ इरले तयार होई .

हीरा, अगदीं बरोबर. फक्त, सिंधुदुर्ग व इतर जिल्ह्यात कांहीं ठीकाणीं बांबूच्या पातळ पटटयांऐवजी नारळाच्या झापांच्या मधल्या दांडयाच्या पातळ पटटया तासून काढून वापरत .
(* इरल्यात ज्यूट वापरीत नसत * - खरंय. तो उल्लेख 'गुगल सर्च'मधे मिळालेल्या फोटोच्या कॅपशमधला )

बुंगाट. : जोरात
सदरा , गुंडी, झबल, जांघ्या : कपड्यांचे प्रकार
खपट : खोके.
बतई : चाकू

आयला गुगल गेलं खड्यात. जरा आजुबाजूला पहा राव. सगळं दिसतय.
नवीन Submitted by शाली on 4 February, 2019 - 23:33
<<
हे सगळ्यांना दिसत नाही.
असो.

ताक.

अजून ज्यांना दिसतंय आजूबाजूला, त्यांच्यासाठी :

गूगल सर्चमधे *फक्त* १ फोटो जेन्युइन इरल्याचा आहे, तो ही कुण्या कंपनीचा स्टॉक फोटो.
मागे कुण्या एका अवतारात मी एक कल्हईचा धागा टाकला होता. तो या जुन्या परंपरांचं डॉक्युमेंटेशन करतो. असा कुणी इरल्याचा काढला, (जेन्युइन, विणकामापासून सगळा, ) तर चांगला होईल, असे म्हणतो.

अरे हो,
ता.क. = ताजा कलम.
ग्रामीण नसली तरी लुप्त भाषा आहे ही.

'अहो, त्यांच्याकडे ना, तार आली आहे...' ही बहुतेकदा वाईट बातमी असायची.

शाली, कोदंडपाणी
झाली का धरमरायाची बीज.
फुरमोळ खाला का नाय
म्या तं मोक्कार रेमटावलं आंबील,काला, घुगऱ्या न मेथीची भाजी..
ठम बी पाजळत्याय ना आच्च्या दिशी

आज बीजा हायती, समद्यानी बीजला यायाच, आंबील अन् घुगर्या वरपायच्या. आणि आळीत हाळी देयाची धरमरायाचा फुरमोळ......

आज बीजा हायती, समद्यानी बीजला यायाच, आंबील अन् घुगर्या वरपायच्या. आणि आळीत हाळी देयाची धरमरायाचा फुरमोळ...... हे काय आहे नेमकं?

धर्मरायाची बीज हा एक सण आहे. या दिवशी आंबील, घुगऱ्या, मलिदा बनवतात. पिठाचे दिवे (ठम ) पाजळतात (लावतात ) धर्मनाथ हा मच्छिन्द्रनाथांचा मुलगा. त्याला गोरक्षनाथांनी मंत्र दिला म्हणून बीज करतात.

*हे काय आहे नेमकं?* - हा प्रश्नच कुणाला पडूं नये म्हणून प्रथमच 1) कोणती बोली भाषा व 2) गरजेनुसार अर्थही दिल्यास बरं होईल.

ठम बी पाजळत्याय ना आच्च्या दिशी>>> ठम म्हणजे मशाली वगैरे वाटलं होतं.पिठाचे दिवे होय!

फुरमोळ कळला नाही.पण त्या दिवशी केला जाणारा पदार्थ असं वाटलं होते.

धर्मनाथ हा मच्छिन्द्रनाथांचा मुलगा.>>>>ही मस्त माहिती मिळाली.

म्या तं मोक्कार रेमटावलं आंबील,काला, घुगऱ्या न मेथीची भाजी..>>>> मी आंबील्,चण्याची,मेथीची भाजी चिक्कार हादडली.(काला म्हणजे रे काय भाऊ)

काला म्हणजे मलिदा. गरम चपाती बारीक चुरुन त्यात भरपुर तुप व गुळ घालुन करतात. कधी कधी याचा मोठा लाडु करुन वाढतात.

बिजेला हातात मोठे भांडे घेऊन दारोदार आंबिल व घुगऱ्या मागत फिरायचे गावात. अगदी धमाल यायची. आता आंबिल व सगळे पदार्थ होतात पण कुणी आंबिल मागताना दिसत नाही.

धरमरायाचा फुरमोळ म्हणजे सदानंदाचा येळकोट सारखीच घोषणा आहे. कशाचा तरी अपभ्रंश आहे. धर्मराजाचा स्मरण असा काहीसा अर्थ ऐकल्याचे आठवतंय.

कोकण ( सिंधुदुर्ग)
climb_0.JPG

माड - नारळाचं झाड;
खाडू- माडावर चढताना व स्थिर उभं रहाताना घट्ट पकड मिळावी म्हणून पायांत अडकवलेली दोरीची गूंडाळी;
आकडी - मागे कोयता अडकवायला हूक असलेली कंबरेला बांधायची दोरी/ पट्टा;
चुडतं / झांप - माडाचं पातं असलेलं पान;
पिडा - झांपाचा भक्कम देंठ;
सोडण - नारळावरचं तंतुमय जाड साल /टरफल . (हेंच कुजवून , सुकवून व मग काठीने झोडून त्यातले तंतू वेगळे काढले जातात. हाच काथ्या ज्यापासून दोरी सारख्या अनेक वस्तू बनवतात.).

*लाकडी हुक असतो त्यालाही आकडी म्हणतात का?* माझ्या माहितीनुसार हूकसकट त्या पटटयाला ' आकडी' म्हणतात . ( हूक लाकडी नसून लोखडी असतो ; निदान मीं तरी आकडीला लांकडी हूक पाहिलेला नाही ).

बऱ्याच गावात यात्रा आणि बैलगाडा शर्यती असतात
आमच्या वाड्याची यात्रा प्रसिद्ध होती पूर्वी

उंच फांदीवरची फुलं काढण्यासाठी ( फांदी वाकवण्यासाठी) एका टोकाला उलटा व्ही आकार असलेली काठी असते तिलाही आमच्याकडे आकडी म्हणतात.
फिट येते त्यालाही आकडी येणे म्हणतात Happy
आंबे काढायला लांब काठी असते. तिच्या टोकाला खोल जाळं असतं आणि जाळ्यावर काठीला धारदार पातं असतं ( आंब्याचा देठ कापायला). याला झेला म्हणतात.

*....जाळ्यावर काठीला धारदार पातं असतं ( आंब्याचा देठ कापायला). याला झेला म्हणतात * - कांहीं ठीकाणी यालाच ' खोबलं ' पण म्हणतात.
*एका टोकाला उलटा व्ही आकार असलेली काठी असते तिलाही आमच्याकडे आकडी म्हणतात.* होय. याचा वापर शेवगाच्या शेंगा काढायलाही सर्रास होतो.

आंबील हा पदार्थ आहे. बनवायला सोपा व टेस्टी. काही भागात ताक व तांदाळाच्या फिठापासुन बनवतात. काही भागात ज्वारीच्या किंवा नाचणीच्या पिठापासुनही बनवतात. बिजेच्या दिवशी केलेली आंबील जरा घट्ट असते तर उन्हाळ्यात जी बनवतात ती पातळ असते. थंड करुन वाढतात.

एका टोकाला 'वी' असा आकार असलेल्या फुले काढायच्या काठीला गोखली म्हणतात. कारण गोखला म्हणजे कोन किंवा कोनाडा. या काठीच्या एका बाजूला छोटा कोन बनलेला असतो म्हणून ही गोखली.
दिव्याच्या प्रकारांसाठी तसेच वेगवेगळ्या मशालींसाठी अनेक शब्द आहेत. दिव्यासाठी दिवली, दिवटी, चिमणी.. शिवाय आकारानुसार नंदादीप, लांबण(लामण)दिवा वगैरे
कंदिलाला फाणस म्हणत. समईला ठाणवई. पणत्यांना कोड्या. गॅसबत्तीलासुद्धा वेगळे नाव असे. आता आठवत नाही.
मशाल, पलिते, चूड, दिवटा, सगर, हिलाल, काकडा
अर्थात यातले सगळेच शब्द ग्रामीण नाहीत पण आता या वस्तूंचा वापर नसल्याने अस्तंगत होत चालले आहेत.

Pages