व्हेन इन रोम (ग्रीस ११)

Submitted by Arnika on 2 December, 2018 - 06:42

जुन्या पेठेकडे जायला निघाले होते मी. चार स्टेशनं होता होता गाडीत बरीच गर्दी चढली, त्यातच हे दोन बापे होते. शिपिंग कंपनीतल्या कामगारांमुळे ग्रीकच्या खालोखाल माझ्या कानावर सगळ्यात जास्त पडलेली भाषा, बंगाली, बोलत होते. जरा गर्दी विरळ झाल्यावर त्यांनी मला खिडकीत बसलेलं पाहिलं आणि समोरच्या दोन जागांवर येऊन बसले. मी गाणी न ऐकता कानात हेडफोन ठेऊन लक्ष देत होते. “लांब केस”, “रंग”, “बांग्ला?” एवढं समजलं. बाकी नजर समजायला बंगाली कळायची गरज नव्हती. त्यांचं स्टेशन लगेचच आलं होतं, पण एक माणूस जागेवरून उठायला लागला तेव्हा दुसऱ्याने त्याला पुन्हा खाली बसवलं. माझ्याशी बोलून बघणार होते ते. आता मात्र भीती वाटायला लागली. अवतीभोवती बरीच माणसं होती त्यामुळे डोकं ठिकाणावर होतं. मग मी खिशातून फोन काढून मी जरा मोठ्यानेच ग्रीकमध्ये बोलायला लागले. का आणि काय विचार करून ते मला आठवत नाही; तो इंस्टिंक्टचा भाग असावा.

“नाही नाही, तुम्ही मला वाटेतच भेटा कारण मला आज चर्चमध्ये जायचंय. कीर्तन सुरू व्हायच्या आत पोचायलाच हवं.” एवढं म्हणून मी फोन ठेवला. तेव्हाच योगायोगाने शहराबाहेरून आलेल्या एका माणसाने मला कुठलातरी पत्ता विचारला आणि मी त्याला ग्रीकमध्ये वाट सांगितली. मी इथलीच आहे असं वाटून त्या दोन माणसांची हवी तशी निराशा झाली आणि दोघे काहीतरी खाणाखुणा करत पुढच्या स्टेशनला उतरले...

प्रत्येक शहर एक दिशा देत असतं. तिथे कसं वागायचं, बोलायचं, राहायचं हे तिथला वारा सांगत असतो. तसं अथीनाने मला शिकवलंय की एकट्या मुलीने इथे अजिबात पर्यटकासारखं दिसायचं नाही. घामेजलेले कपडे, पाठीवर धोपटी, डोक्यावर गॉगल आणि तोंडावर आश्चर्य दाखवत फिरलात तर मधमाश्या घोंगावायला लागतात. चांगले कपडे घालून, लिपस्टिक, अत्तर आणि डोळ्यावर गॉगल लावून इथल्या मुलींसारखं आपल्याला सगळं माहीत असल्यागत वावरायचं. मधेमधे फोनवर ग्रीक बोलायचं. मग तुमच्याकडे कोणी ढुंकूनही बघत नाही. परवा पाहिलं तर आयुषमान खुरानासुद्धा त्याच्या शायरीत असंच काहीसं म्हणत होता (आमची मनं वेगळी नाहीचेत म्हणा) -- यहां सबको दरारों में झांकने की आदत है, दरवाजे खोल दो कोई पूछने तक न आएगा.

जुन्या पेठेवरून पुढे गेलं की एक कृष्णाचं देऊळ आहे. दिवाळीत एकदा तिकडे जाऊन यायचं म्हणत होते, पण त्या भागात फार बरी माणसं नसतात असं ऐकलं. कोक्कीनू आई-बाबांना देवळाचा पत्ता सांगितल्यावरच त्यांनी हातपाय गाळले. मला कोणाला गॅसवर ठेऊन कुठे जायचं नव्हतं म्हणून बेत रद्द केला. इथल्या भारतीय एम्बसीत दिवाळीसाठी काही खास नव्हतं आणि यंदा घरची दिवाळीही मोठी असणार नव्हती, त्यामुळे इतकं चुकल्याचुकल्यासारखं वाटलं नाही... ग्रीसमध्ये गणेश चतुर्थी मात्र अचानक साजरी झाली. त्यावेळी सिक्यामध्ये होते आणि आमच्या होटेलवर एक रशियन गट योगासनांच्या शिबिरासाठी आला होता. मॉस्कोच्या त्यांच्या योगवर्गात बरीच मराठी माणसं आहेत म्हणे. तर त्यांचा म्होरक्या मी गणपतीच्या दिवशी नैवेद्याचा शिरा करत असताना आला. त्याने अगदी लवून हात जोडत आज उत्सव कसा साजरा करणार आहेस असं विचारलं. म्हंटलं संध्याकाळी करेन काहीतरी घरच्या घरी. त्याला इंग्लिश नीटसं समजलं नसावं. म्हणाला, “चालेल. आम्ही साडेसात पर्यंत येऊ?”

आली की नऊ माणसं साडेसातला नटून थटून अंगणात! त्यांनी आणलेली टर्किश डिलाइट्स, आपला शिरा आणि चहा. बिचारा गणपती कुठेही वसला तरी ‘डिश’ देण्याची पद्धत त्याची पाठ सोडत नाही बघा! गोलात बसून आमचं वनभोजन चालू असताना त्यांनी मला सरप्राइज द्यायला फोनवर सुखकर्ता दुखहर्ता आरती लावली. सगळं इतकं सोपं कशाला ठेवायचं ना, म्हणून मग मला आरतीचा अर्थ विचारला. त्यांच्यातल्या फक्त दोघांना इंग्लिश येत होतं. हातवारे करून आरतीचा अर्थ सांगता सांगता माझं ‘घालीन लोटांगण’ आपोआप झालं. शिवाय पुढचे दोन आठवडे अंगणातला जास्वंद डवरलेला होता... अजून काय लागतं?

आपल्या चवींपासून मी पहिल्यांदाच इतके दिवस लांब राहात्ये. इथे मिळतं ते आणि घरात सगळ्यांसाठी शिजतं ते खायचं हे मी आधीच ठरवलं होतं. जे जे खाल्लं ते मनापासून आवडलं. तीन महिन्यांत चायनीज नाही, खास होटेल शोधून भारतीय नाही, इटालियन, थाइ, जपानीही नाही. जे डोळ्यासमोर दिसलं नाही त्याचा हट्टही धरावा वाटला नाही. पण एक सांगते. मेजवान्या, खासियत, पार्टी-फूड, डिज़र्ट्स हे कुठल्याही देशाचं कितीही सुरेख असू दे, त्या चवींचे कितीही कडक डोहाळे लागू देत आणि कितीही वारंवार हे सगळं खावंसं वाटू दे, सबंध जेवणाची पारख त्या-त्या देशातल्या साध्या पदार्थांवरून केली तरच खरी. आणि बाकी कुठल्याही क्विज़ीनच्या साध्या जेवणापेक्षा सरस भारताचं साधं जेवण आहे हे मी फायनल केलंय.

कोणाहीकडे दोन दिवसांपेक्षा जास्त राहायला जायचं म्हणजे मला धाकधूक वाटते. सुरुवातीला सगळ्यांना एकमेकांचं कौतुक असतं, एकमेकांच्या आवडीनिवडीचा मान ठेवायचा असतो आणि न पटणाऱ्या गोष्टी दोन दिवसासाठी सोडून द्यायला कोणाला काही वाटत नाही. इथे तर दोन-दोन महिने राहिल्यामुळे सगळ्यांचे सगळे मूड बघितले. त्यांनाही माझे चढ-उतार समजायला लागले. कधीतरी वाद व्हायचे. कधीतरी काही न होताच तोंडं फिरलेली असायची. मी कधीकधी आपल्या घरी असल्यासारखी मोकळी वावरायचे आणि कधीतरी या घरांमध्ये खाजगी भांडणं पेटलेलेली असताना एखाद्या कोपऱ्यात अवघडून बसायचे.

सिक्या आणि अथीनामधली आमची धर्म, अर्थ, रंग, भाषा वगैरे मोठ्या गप्पांबद्दलची सहिष्णुता पहिल्यापासून कमालीची बळकट होती. पण घरांमधले दैनंदिन फरक डाचायचे. आतले कपडे कुठे वाळत घालायचे इथपासून एकमेकांसाठी जेवायला थांबायचं की नाही इथपर्यंत सगळंच नवीन! कधीतरी आई-आजी-बाबा-आत्या-दादा माझ्या तोंडून एकदम बोलतायत की काय असं वाटायचं. “खरकट्या ताटल्या साध्या पाण्याने विसळून मग घासायला टाक”; “कपडे सुटसुटीत वाळत घाल”; “दाण्याचं कूट जरा भरड असलं की भाजीचा लगदा होत नाही”; “ओरडून हाक मारू नकोस, इकडे येऊन बोल. आपण काही हवेलीत राहात नाही”; “स्वयंपाकघरातली फडकी कुजकी होण्याआधी बदल”, “कचऱ्याच्या डब्याला पिशवी का लावलेली नाहीये?”; “फ्रीजमध्ये दही-दूध वरच्या खणात ठेवावं”; “पाणी प्यायलीस की पुढच्या माणसासाठी तांब्या भरलेला हवा” ... कटकट वाटायची घरच्यांनी सांगितलं की. आता वेगळ्या (बे)शिस्तीच्या घरात आल्यावर समजतंय ही माणसं आमच्या कानीकपाळी का ओरडायची ते. एरवी मी लेखाला नाव देते, आज या परिच्छेदाचं नाव जास्त महत्त्वाचं आहे: ‘आई, तुझं म्हणणं बरोबर होतं’.

पण सगळे किल्ले लढवत बसायचे नाहीत हेही मला पटलंय. आपण चांगलं काम करायला जातोय, ही घरं काही दिवस आपली घरं असणार आहेत एवढंच ठरवून मी दोन्ही घरांत पाऊल टाकलं. नको तिकडे समाज सुधारणा करायला जायचं नाही हे पक्कं केलं होतं येण्याआधीच. उष्टं-खरकटं मानत नाही? थोड्या दिवसांसाठी मीही हट्ट सोडेन. जेवणाची तयारी नीट न मांडता दहादा पानावरून उठता? उठा बाबा. मी एकदा बसल्यावर जागची हलणार नाही हे आधीच सांगितलंय. आमच्यात जेवणाचा अपमान होतो वगैरे लपेट मारली. चाळीस वर्ष दररोज जेवणाऱ्या माणसाने दररोज पानावर बसल्यावर दही आणि चमच्यासाठी दोनदा चकरा मारणं यापेक्षा मोठा मूर्खपणा काय असू शकतो? इतर काही गोष्टींबद्दल आपलं काही मत असायची गरज नसते. काही गोष्टी सोडून द्याव्याच लागतात. मी दिल्यायत ना. मोठ्या मनाने! अर्धा टोमॅटो कापायला घरातला एकमेव सुरा वापरून मग तो डिशवॉशरमध्ये घासायला टाकण्याची लोकांची चूक मी सोडून दिल्ये. देवाने बॅलन्स शीट मांडून योग्य तो निवाडा करावा आता. बाकी अगदीच सहन झाल्या नाहीत अशा दोनच गोष्टी. सिक्याला बघितलेल्या बऱ्याच पोरांचं पानावर बसल्यावर “ईऽऽ” म्हणणं आणि अथीनाच्या कोक्कीनूंच्या घरातला सगळ्यांचा आरडा-ओरडा.

पूर्व-पश्चिमेच्या उंबऱ्यावरची ग्रीसला छान साधलेली एक कला आहे. कुटुंबांमध्ये जवळीक असूनही प्रत्येक माणसाला थोडासा एकटेपणा जपायची परवानगी देणं. माणसं एकमेकांशी बांधलेली असली तरी ती पायात पायात असत नाहीत. कितीही लहान किंवा मोठ्या माणसाला दिवसातला काही वेळ आपापली शांतता, आपापले कोपरे हवे असतात हे माझ्या दोन्ही घरांना बिनबोलत समजलंय.

काल महिन्याभराने पुन्हा एकदा सिक्याला गेले. निरोप घ्यायला. इतक्या दिवसांनी यासोनास कदाचित ओळखणार नाही इतपत मनाची तयारी करून गेले होते, पण गाडीतून उतरल्या उतरल्या पोरगं “नोन्ना, नोन्ना, नोन्ना” म्हणत बिलगलं. आरियाद्नीने शाळेत तिच्या कुटुंबाबद्दल लिहिलेला निबंध आणि त्याबरोबरचं चित्र दाखवलं. त्यात होती एक लांब केसांची गुटगुटीत मुलगी! गप्पा काय, कोणीही मारेल. कालची गंमत घरात शेकोटी पेटवून एकमेकांबरोबर शांत बसण्यात होती. मी पुन्हा त्याच्याच घरी राहात्ये म्हंटल्यावर यासोनासने त्याला सांभाळणाऱ्या नव्या मुलीचा हात धरला आणि तिला ट्रेनमध्ये सोडून येऊया म्हणायला लागला. लटके ओरडलो आम्ही त्याला, पण मी कुठलीतरी स्पर्धा जिंकल्याच्या आनंदात मनातल्या मनात भांगडा करत होते. कशाकशात अडकून पडायला होतं ना?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छानच गं! संपला मुक्काम ग्रीसमधला?
सगळे किल्ले लढवत बसायचे नाहीत >> choose your battles चं काय सहज मराठीकरण केलंस! सुंदर!

मस्तच.

मी पुन्हा त्याच्याच घरी राहात्ये म्हंटल्यावर यासोनासने त्याला सांभाळणाऱ्या नव्या मुलीचा हात धरला आणि तिला ट्रेनमध्ये सोडून येऊया म्हणायला लागला. >>> so sweet.

प्रवास व माणसांच्या मनाचा वेध घेणारा सुंदर लेख ,
आम्हाला तर प्रतिसाद देणें पण अवघड जाते अन आपण लीलया लिहून जाता ,

मी इथलीच आहे असं वाटून त्या दोन माणसांची हवी तशी निराशा झाली आणि दोघे काहीतरी खाणाखुणा करत पुढच्या स्टेशनला उतरले...

>>>>> हे पुरतं समजलं नाही मला

@आसा, त्यांची आपापसात चर्चा चालली होती की मुलगी इमिग्रंट वाटत्ये, आपण विचारून बघू. ग्रीसमधलीच आहे असं वाटल्यावर, विशेषत: चर्चबद्दल बोलल्यावर त्यांचा उत्साह संपला.
मलाही इथे लिहिताना खूप बरं वाटलं. जुने मायबोलीकर भेटले आणि कित्येक नवीन जणांची ओळख झाली त्यानिमित्ताने. सतत उभारी देत राहिलात, सोबत करत राहिलात त्याबद्दल मी कृतज्ञ आहे Happy

धन्यवाद!

ही सिरीज संपूच नये अस वाटत होत. मलाही प्रवासवर्णन आवडत नाहीत पण तुझ्या लेखनीत वेगळीच मज्जा आहे Happy