आठवणीतली बडबडगीतं

Submitted by मृण्मयी on 28 March, 2009 - 12:57

निषादची लहानपणची 'नर्सरी र्‍हाइम्सची' काही पुस्तकं अचानक सापडली. ती उघडून सगळ्या कविता पुन्हा एकदा वाचताना मला माझ्या लहानपणीची 'बडबडगीतं' आठवायला लागली. लहान मुलांच्या कवितांकरता इतकं समर्पक नाव सुचणार्‍या महाभागाचं कौतुक!
जशी आठवतील तशी आपापल्या बालपणीची , आठवणीतली गाणी इथे लिहून काढलीत तर वाचायला (बहुतेक सगळ्यांना) आवडेल. (अभ्यासक्रमातल्या कविता जुन्या हितगुजवर कुठेतरी लिहील्या आहेत. पण बडबडगीतं सापडली नाही.)

माझी एक आवडती कविता...
ह्या कवितेतला चित्ता खूप हावरट वाटायचा. कुणाला ह्या कवितेचे कवी आठवत असतील तर सांगा.

एकदा एक चित्ता
हातात घेऊन अडकित्ता
चित्ता आला दुपारी
मागु लागला सुपारी
मी म्हंटले "कशाला?"
तेव्हा चित्ता म्हणाला,
"नुकतेच जेवण झाले फक्कड,
खाऊन टाकले बारा बोकड.
बारा बोकड सोळा शेळ्या,
बघता बघता फस्त केल्या.
नंतर थोडी गंमत म्हणून,
तीन कोंबड्या टाकल्या खाऊन.
जेवण जरा जडच झाले,
भलते अंगावरती आले.
म्हंटले खावी सुपारी,
म्हणून आलो दुपारी."

किशोर मासिकातली एक...
आलगट्टी गालगट्टी
शोन्याशी गट्टी फू

तुला मी घेणार घेणार नाही
चॉकलेट गोळ्या देणार नाही
आलास तर घेईन गालगुच्चा
अंगावर सोडीन भू

पमगाडी, कूकगाडी
शेतावरची हम्मागाडी
आम्ही सगळे भूर जाऊ
एकटाच राहशील तू

पप्पु, बिट्टी, वेदा, राणी
आम्ही घेळू छापापाणी
तूच एकटा बाथरुममधे
रडके डोळे धू

(अशी दुष्ट प्रवृत्तीची बालगीतं आवडंत असल्याचं बघून आई-वडलांनी 'बाळीचे पाय पाळण्यातच ओळखले'.! Proud )

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages