निषादची लहानपणची 'नर्सरी र्हाइम्सची' काही पुस्तकं अचानक सापडली. ती उघडून सगळ्या कविता पुन्हा एकदा वाचताना मला माझ्या लहानपणीची 'बडबडगीतं' आठवायला लागली. लहान मुलांच्या कवितांकरता इतकं समर्पक नाव सुचणार्या महाभागाचं कौतुक!
जशी आठवतील तशी आपापल्या बालपणीची , आठवणीतली गाणी इथे लिहून काढलीत तर वाचायला (बहुतेक सगळ्यांना) आवडेल. (अभ्यासक्रमातल्या कविता जुन्या हितगुजवर कुठेतरी लिहील्या आहेत. पण बडबडगीतं सापडली नाही.)
माझी एक आवडती कविता...
ह्या कवितेतला चित्ता खूप हावरट वाटायचा. कुणाला ह्या कवितेचे कवी आठवत असतील तर सांगा.
एकदा एक चित्ता
हातात घेऊन अडकित्ता
चित्ता आला दुपारी
मागु लागला सुपारी
मी म्हंटले "कशाला?"
तेव्हा चित्ता म्हणाला,
"नुकतेच जेवण झाले फक्कड,
खाऊन टाकले बारा बोकड.
बारा बोकड सोळा शेळ्या,
बघता बघता फस्त केल्या.
नंतर थोडी गंमत म्हणून,
तीन कोंबड्या टाकल्या खाऊन.
जेवण जरा जडच झाले,
भलते अंगावरती आले.
म्हंटले खावी सुपारी,
म्हणून आलो दुपारी."
किशोर मासिकातली एक...
आलगट्टी गालगट्टी
शोन्याशी गट्टी फू
तुला मी घेणार घेणार नाही
चॉकलेट गोळ्या देणार नाही
आलास तर घेईन गालगुच्चा
अंगावर सोडीन भू
पमगाडी, कूकगाडी
शेतावरची हम्मागाडी
आम्ही सगळे भूर जाऊ
एकटाच राहशील तू
पप्पु, बिट्टी, वेदा, राणी
आम्ही घेळू छापापाणी
तूच एकटा बाथरुममधे
रडके डोळे धू
(अशी दुष्ट प्रवृत्तीची बालगीतं आवडंत असल्याचं बघून आई-वडलांनी 'बाळीचे पाय पाळण्यातच ओळखले'.!
)
आगोबाई ढगोबाई हे लिहिलेले
आगोबाई ढगोबाई हे लिहिलेले गाणे आहे का कोणाकडे ?
अग्गोबाईऽऽऽ
अग्गोबाईऽऽऽ ढग्गोबाईऽऽऽ
अग्गोबाई ढग्गोबाई लागली कळ
ढगाला उन्हाची लागली झळ
थोडी न् थोडकी लागली फार
डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार.......धृ.
वारा वारा गरागरा सो सो सुम्
ढोल्या ढोल्या ढगात ढूम ढूम ढूम
वीजबाई अशी काही तोर्यामध्ये खडी
आभाळाच्या पाठीवर छमछम छडी.......१
खोल खोल जमिनीचे उघडून दार
बुडबुड बेडकाची बडबड फार
डुंबायला डबक्याचा करूया तलाव
साबुबिबु नको थोडा चिखल लगाव........२
(सीडीत नसलेले ३रे कडवे)
हाशहुश् उन्हाळ्याने काढताच बंडी
गार गार पावसात भरू लागे थंडी
कुडकुड थंडी मारे कडकड मिठ्या
दातभाऊ खेळतात कशा आट्यापाट्या.......३
खुप मस्त धागा, आठवणींना उजाळा
खुप मस्त धागा, आठवणींना उजाळा देणारा...
एवढा मोठ्ठा भोपळा,
आकाराने लांबोडा,
त्यात बसली म्हातारी
म्हातारी गेली लेकीकडे
लेकीने केले दहिवडे
दहिवडे झाले घट्ट
म्हातारी झाली लठ्ठ
आम्ही अटक मटक असं
आम्ही अटक मटक असं म्हणतो..
अटक मटक चवळी चटक
चवळी झाली गोड गोड
जिभेला आला फोड फोड
फोड काही फुटेना
घरचा पाहुणा उठेना
घरचा पाहुणा उठला,
जिभेचा फोड फुटला.
लव लव साळूबाई मामा येतो हाती
लव लव साळूबाई मामा येतो
हाती खोब-याची वाटी देतो
मामी येते हिसकून घेते
तुकडा मोडून हाती देते
*************
मिठु मिठु पोपट
आहे मोठा चावट
पेरु खातो कच्चा
बाळाला म्हणंतो लुच्चा
*************
ये रे ये रे पावसा
तुला देतो पैसा
पैसा झाला खोटा
पाऊस आला मोठा
ये ग ये ग सरी
माझे मडके भरी
सर आली धाऊन
मडके गेले वाहुन
आख माख सोन्याची काख जिवती आई
आख माख सोन्याची काख
जिवती आई माझ्या बाळाला राख
कोण आला ? वारा आला कसा आला?
कोण आला ? वारा आला
कसा आला? वाहत वाहत
कोण आला ? मासा आला
कसा आला? पोहत पोहत
कोण आला ? पक्षी आला
कसा आला? गिरकत गिरकत
कोण आला ? तारा आला
कसा आला? झळकत झळकत
वेडं कोकरु खुप थकलं; येताना
वेडं कोकरु
खुप थकलं;
येताना घरी
वाट चुकलं !
अंधार बघून
भलतंच भ्यालं
दमून दमून
झोपेला आलं !
शेवटी एकदा
घर दिसलं
वेडं कोकरु
गोड हसलं !
डोकं ठेवुन
गवताच्या उशीत
हळुच शिरलं
आईच्या कुशीत!
मंगेश पाडगावकर
परी ग परी कोण तुझ्या घरी मनी
परी ग परी
कोण तुझ्या घरी
मनी मावशी
स्वंयंपाक करी
मिठू म्हणे हरी हरी
बाळ माझ गोड ग आंब्याची फोड
बाळ माझ गोड ग
आंब्याची फोड ग!
बाळ माझ शहाण ग
मोत्याचा दाणा ग!
बाळ - आपल्या बाळाच नाव
अतुल कुमार गोरे खातो कच्ची
अतुल कुमार गोरे
खातो कच्ची बोरे
आम्हाला देतोस कारे
मी नाही देत जारे
टिप्या टिप्या छुरे
पळाली सारे पोरे
अतुल कुमार गोरे खातो कच्ची
अतुल कुमार गोरे
खातो कच्ची बोरे
आम्हाला देतोस कारे
मी नाही देत जारे
टिप्या टिप्या छुरे
पळाली सारे पोरे
ससोबा साजरे खातात गाजरे या की
ससोबा साजरे
खातात गाजरे
या की जरा जवळ
भारी तुम्ही लाजरे
माझ्या या दारातून कोण कोण
माझ्या या दारातून
कोण कोण येते कोण कोण येते
मामा येतो नि मामी येते
गोड गोड खाऊ देऊन जाते
काका येतो नि काकी येते
छान छान बाहुली देऊन जात
माझ्या या घरातून
कोण कोण येते कोण कोण येते
दादा येतो नि वहिनी येते
चणे फुटाणे देऊन जाते
बाबा येतात नि आई येते
गोड गोड पापी घेऊन जाते
कितितरी बालगिते पहिल्यनदाच
कितितरी बालगिते पहिल्यनदाच वाचली........खूप धन्स....
दिन दिन दिवळी गाई म्हशी
दिन दिन दिवळी
गाई म्हशी ओवाळी
गाई म्हशी कुणाच्या? लक्ष्मणाच्या
लक्ष्मण कुणाचा ? आई बाबांचा
दे माय खोब-याची वाटी
वाघाच्या पाठीत घालीन काठी.
मस्त आहेत सर्व बडबड गीते.. हे
मला तुकडेतुकडे आठवतायेत फक्त
एका माकडाने काढले दुकान
गिर्हाइके आली छान छान
मनीने आणले पैसे नवे
म्हणाली शेटजी,उंदिर हवे
वर्षू, इथे बघ
वर्षू, इथे बघ
डोल मैने डोल ग पुढे पाणी खोल
डोल मैने डोल ग
पुढे पाणी खोल ग
मागे जाई तोल ग
डोल मैने डोल ग
डोल मैने डोलाची
हातामधे परडी फुलाची
फुल गेले सांडुन
परी आली भांडुन
तु माझी गुणाची सखु बर का तु
तु माझी गुणाची सखु बर का
तु बाहेर जाउ नको बर का
पोर तुला मारतील
तुझा झगा फाडतील
तुला नाही बळ
चिमटा घेउन पळ
सलिल कुलकर्णिच या रे या सारे
सलिल कुलकर्णिच या रे या सारे गायुया आहे क कोणाकडे लिहिलेल?
सलिल कुलकर्णिच या रे या सारे
सलिल कुलकर्णिच या रे या सारे गायुया आहे क कोणाकडे लिहिलेल?
एका माकडाने काढलय दुकान आली
एका माकडाने काढलय दुकान
आली गिर्हाइके छान छान
मनीने आणले पैसे नवे
म्हणाली शेटजी,उंदिर हवे
छान छान...
अस्वल आले नाचवित पाय
म्हणाले मधाचा भाव काय
छान छान...
कोल्ह्याने मागितला गुळाचा रवा
आणि म्हणाला मांडून ठेवा
माकड म्हणाले लावुन गंध
आता झालय दुकान बंद
छान छान...
चांदोबाने कविता
चांदोबाने
कविता केली.
हातामधुन
खाली पडली.
एका परीने
झेलली हातात
आणि काढली
चित्रे त्यात.
मग कवितेत
शिरला सूर
गेली उडुन दूरदूर.
-- विंदा
-------------------------------
एक नाही दोन नाही बेरीज-वजाबाकी नाही
तीन नाही चार नाही भूमितीची सजा नाही
दिवस उद्याचा सवडीचा
रविवार माझ्या आवडीचा.. धृ..
सोमवारचा असतो गणिताचा तास
गणिताच्या तासाला मी नापास
गणित विषय माझ्या नावडीचा
रविवार माझ्या आवडीचा ..१..
भलताच कठीण तो मंगळवार
डोक्यावर असतो भूगोलाचा भार
भूगोल विषय माझ्या नावडीचा
रविवार माझ्या आवडीचा ..२..
घेऊन तोफ़ा आणि तलवारी
इतिहास येतो बुधवारी
इतिहास माझ्या नावडीचा
रविवार माझ्या आवडीचा ..३..
-----------------------
(चाल: गोरी गोरी पान, फुलासारखी छान)
नवा नवा छान, मी फ्रॉक घालणार
दादा, तुला मी राखी बांधणार
थाट माट रांगोळीचा चंदनाचा पाट
ताट चांदीचे रे, नारळाचा भात
गोड गोड करंज्याही मीच वाढणार
सुवर्णाच्या निरंजनात लाविते रे वात
ओवाळीन भाऊराया होई औक्षवंत
हात देई हाता दादा नाही सोडणार
भरजरी किनारीखाली गुलाबाचे फुल
राखीवर शोभे दादा जरतारी झूल
तुझ्यासाठी दादा स्वारी आता हसणार
----------------------------------------
बघ आई आकाशात सूर्य हा आला|
पांघरून अंगावरी भरजरी शेला||
नीळ्या त्याच्या महालाला खांब सोनेरी|
मोतीयांच्या लावियेल्या आत झालरी||
केशराचे घातलेले सडे भूवरी|
त्यावरून येई त्याची डौलाने स्वारी||
डोंगराच्या आडून हा डोकावे हळू|
गुलाबाची फूले आणि लागे ऊधळू||
नभातून सोनियाच्या ओती तो राशी|
गुदगुल्या करी कश्या कळ्या फुलांसी||
पाखरांच्या संगे याची सोबत छान्|
गाती बघ कशी याला गोड गायन्||
मंद वारा जागवीतो सार्या जगाला|
म्हणतसे ऊठा ऊठा मित्र हा आला||
--------------------------------------------
एक होती म्हतारी
जाइ लेकिच्या घरी
काठी टेकित टेकित जाते
जाते जंगलातुन
गुहेतुन आले वाघोबा
वाघोबा अन कोल्होबा
म्हणु लागले म्हातारीला
खाउ का ग तुला
म्हातारी मग घाबरली
थर थर कापु लागली
पाया पडुनी म्हणु लागली
जाउ द्या ना मला
लेकीकडे जाउन येते
शिरा पुरी खाउन येते
लठ्ठमुठ्ठ होउन येते
खा ना मग मला
म्हणणे तिचे आवडले
म्हातारीला सोडुन दिले
लेकीकडे जाउन आली
शिरा पुरी खाउन आली
लठ्ठमुठ्ठ होउन आली
भोपळ्यामधे बसुन आली
दिसेना कोणा
एवढा मोठा भोपळा
लाल लाल वाटोला
आतुन बोले म्हातरी
चल रे भोपळ्या टुणुन टुणुक
गुहेतुन आले वाघोबा
वाघोबा अन कोल्होबा
म्हणु लागले म्हातारीला
खाउ का ग तुला
मीच खाणार मीच खाणार
नाही कोणाला देणार
भांडु लागले तांडु लागले
भांडु लागले तांडु लागले
पळते म्हातारी
कशाची म्हातारी कशाची कोतारी
चल रे भोपळ्या टुणुक टुणुक.
(जुन्या मायबोलीतून साभार)
चांदोमामा मोठ्ठा खट्याळ
चांदोमामा मोठ्ठा खट्याळ पोर,
एक नंबरचा दंगेखोर
छळायचा सगळ्या तार्यांना
आकाशात घालून धिंगाणा
एकदा आई त्याला रागावली
थोबाडीत देऊन म्हणाली,
कार्ट्या तुझी मोडतेच खोड
जेवण तुझे करतेच बंद
चंदू बिचारा खूप रडला
१५ दिवसात खंगत गेला
दया आली आईला जेवायला दिले चंदूला
अस्सा पठ्ठ्या फ़ुगत गेला
१५ दिवसात टुणटुणित झाला..
आरगोटी गारगोटी चांदोमामाची झाली फ़जिती..
-------------------------------------------------
असे कसे हो असते मोठ्यांचे वागणे
एकदा एक बोलणे आणि एकदा एक बोलणे....
लवकर उठलं तर म्हणतील नीज अजुन थोडा
आणि उशिरा उठलं तर म्हणतील पसरलाय घोडा...
असे कसे..
अभ्यास केला तर म्हणतील पुस्तकातला किडा
आणि नापास झालं तर म्हणतील परिक्षेतला वेडा...
असे कसे...
एकदा म्हणतील बाबा रे दया करायला शिक
आणि केली तर म्हणतील गधड्या लावशील मला भीक...
असे कसे..
कधी आजारी पडले तर मग मात्र म्हणतात
पिंकी आमची गुणाची एव्हढेच खरे बोलतात....
असे कसे..
-------------------------------------------------
ये गं तु गं गाई
बाळाच्या डोळीया
घाली पाळणिया अंथरूण..
अंथरुण केले पंघरुनी शेला
निजविते तुला ..... राणी / राजा अंगाई
ये गं तु गं गाई
चरुनं भरुनं
बाळाला दुध देई वाटी भरून अंगाई..
(बाळा असेल तिथे बाळाचे नाव घालायचे अधुन मधुन)
-------------------------------------------------------
ये ग गाई गोठ्यात
बाळाल दुदु दे वाटीत
बाळची वाटी मांजर चाटी
मांजर गेल रागानं
त्याला खाल्ल वाघोबानं
वाघोबाचे डोळे लाल झाले
तिकडुन आले उंदीर्मामा
वाघोबाला भीऊन पळून गेले
------------------------------------------
कुरकुर कुरकुर कुरकुंजा
घोड्यावर बसला भडभुंजा
भडभुंज्याची लांब लांब शेंडी
घोड्याला वाटली चार्याची पेंढी.
-------------------------------------------
कोकीळ म्हणतो काय करावे खोकून बसला पार घसा
कुहु कुहुची मंजुळ गाणी सांगा आता गाऊ कसा
सांगा आता गाऊ कसा (१)
कुत्रा म्हणतो उडी मारुनी पकडू गेलो एक ससा
ससा पळाला पाय मोडला चोरामागे धावू कसा
चोरामागे धावू कसा (२)
म्हणे कोंबडा टीव्ही बघता रात्री गेला वेळ असा
उशीरा उठलो कुकुचकू ची हाक कुणा मी देऊ कसा
हाक कुणा मी देऊ कसा (३)
बोका म्हणतो चष्म्यावाचून आंधळाच मी भरदिवसा
बिळात सरकन् पळून गेला उंदीर कोठे शोधू कसा
उंदीर कोठे शोधू कसा (४)
-------------------------------------------
ससा ससा, दिसतो कसा,
कापूस पिंजून ठेवलाय जसा,
लाल लाल डोळे छान,
छोटे शेपूट मोठे कान,
पाला खाउन होतो टूम
चाहूल लागता पळतो धूम.
(जुनी माबो)
शाळेला जाताना पाऊस त्याची
शाळेला जाताना पाऊस
त्याची गंमत काय सांगू
आई म्हणाली नकोस जाऊ
त्याची गंमत काय सांगू?
बाबा लवकर तयार झाले
कामाला जाण्यास निघाले
बुटात त्यांच्या पाणी शिरले
त्याची गंमत काय सांगू?
खिडकीवरती बसुनी कावळा
मोठ्याने ओरडू लागला
उगारता मी हात पळाला
त्याची गंमत काय सांगू?
कुणी घसरुनी पडले खाली
छत्री त्याची उलटी झाली
भिजुनी गेले सारे अंग
त्याची गंमत काय सांगू?
----------------------------------------
मशेरी गं मशेरी वाजले सात
चल चल उठ, घास माझे दात
अगं अगं झाडूबाई, कोपर्यात दडूबाई
चल चल उठ, कामाला लाग
मला आहे मोठा कचर्याचा राग
केराच्या टोपलीत केर नको ठेऊ
कचर्याच्या पेटीत ओत जा पाहू
फडकेराव फडकेराव झटकन या
टेबल नि खुर्च्या झटकून घ्या
चपला नि बूट, तुम्ही ओळीत रहा
घरातील गंमत, बाहेरून पहा
कात्रीबाई कात्रीबाई हलकेच या
वाढलेली नखे कातरून घ्या
साबू नि टॉवेल तुम्ही आंघोळीला चला
अंग माझं मळलंय, न्हाऊ दे मला
साबूराव साबूराव काढा तुमचा फेस
आधी मला धुवू दे माझे केस
आता हळू हळू अंग माझे चोळा
अंग माझे चोळा नि घालवा मळा
टॉवेलराव टॉवेलराव अंग माझे पुसा
हळू हळू नको, पुसा घसा घसा
कसं काय आरसेराव बरं आहे ना?
सारं काही ठीकठाक झालंय ना?
सारं काही ठीकठाक, पोशाख कसा झक्क
धूळ नाही, केर नाही घर कसं लख्ख
आता इथे रोगराई शिरायची नाही
नि आजारी पडायची भीतीही नाही
तुमचं घरही असंच ठेवा
बरं आता येतो राम राम घ्यावा
------------------------------
जुन्या माबोवरून
काळ्याकुट्ट काळोखा साबण तुला
काळ्याकुट्ट काळोखा
साबण तुला देऊ का?
स्वच्छ आंघोळ करून ये
नाक नखे धुवून ये
खसा खसा पूस अंग
पावडर लावून बदल रंग
मग दिसशील गोरापान
लोक म्हणतील छान छान
--------------------------------
दिवसभर पावसात असून सांग ना आई
झाडाला खोकला कसा होत नाही
दिवसभर पावसात खेळून, सांग ना आई
वारा कसा जराही दमत नाही ?
रात्रभर पाढे म्हणून, सांग ना आई
बेडकाचा आवाज कसा बसत नाही ?
रात्रभर जागून सुद्धा, सांग ना आई
चांदोबा झोपी कसा जात नाही ?
दिवसभर काम करून, सांग ना आई
तुला मुळी थकवा कसा येत नाही ?
गीत - श्रीनिवास खळे
---------------------------------------------
टप टप टप काय बाहेर वाजतंय् ते पाहू
चल् ग आई, चल् ग आई, पावसात जाऊ !
भिरभिरभिर अंगणात बघ वारे नाचतात !
गरगरगर त्यासंगे, चल गिरक्या घेऊ !
आकाशी गडगडते म्हातारी का दळते ?
गडाड्गुडुम गडाड्गुडुम ऐकत ते राहू !
ह्या गारा आल्या सटासटा आल्या चल चटाचटा
पट् पट् पट् वेचुनिया ओंजळीत घेऊ !
फेर गुंगुनी धरू, भोवऱ्यापरी फिरू
“ये पावसा, घे पैसा”, गीत गोड गाऊ !
पहा फुले, लता, तरू – चिमणी, गाय, वासरू
चिंब भिजती, मीच तरी का, घरात राहू ?
गीत – श्रीनिवास खारकर
----------------------------------
आई कसे गं पाण्याने, आले भरू हे अंगण
का गं रडते आकाश काल सकाळपासून?
दिला दिसभर त्याला, त्याच्या आईने का मार?
तुझ्यासारखाच का गं, तिला येतो राग फार?
तिचे केवढे गं मोठे, डोळे लकाकत होते
खाऊसाठीच आकाश, काल ओरडत होते
किती रडते बिचारे, आले अंगण हे भरू
सांग आईला गं त्याच्या, नको आकाशाला मारू
-------------------------------
तान्ह्या बाळासाठी :
भुड भुड भुडुश्शा
आंघोळ करुश्शा
आंघोळ केली
पाण्यानं नेली
पाणी गेले
दारच्या केळीला
हिरव्या वेलीला
चिव चिव चिमणीला
घुम घुम पारव्याला
बाळ झाले गोरे गोरे
पाहायला आली
पोरे थोरे
लावली तीट
मिटली मूठ
मोत्याचे टोपले
बाळ झोपले
---------------------------------------
छोटीशी शकु
बाहेर जाऊ नकु
पोर तुला मारतील
तुझा अंगा फाडतील
अंगात नाही बळ
शकु चिमटे घेऊन पळ
(जुनी माबो)
बोबडा बलराम: दूद नको पाज्यू
बोबडा बलराम:
दूद नको पाज्यू हलीला काल्या कपिलेचे
काला या मनती आइ ग, पोल गुलाक्याचे
तूच घेउनी पगलाखाली
पाजत जा या शांज-शकाली
तुजियाशम गोले, होउदे लूप शोनूल्याचे
तूही गोली, मीही गोला
काला का हा किशन् एकला?
लावु नको तित्ती, नको ग बोत काजलाचे
थेउ नको ग याच्यापाशी
वाल्यामधल्या काल्या दाशी
देउ नका याला, नहाया पानी यमुनेचे
पालनयात तू याच्या घाली
फुले गोजिली चाप्यवलली
लावित जा अंगा, पांधले गंद चंदनाचे
नकोश निजवू या अंधाली
दिवे थेव ग उशास लात्ली
दावु नको याला कधीही खेल शावल्यांचे
नको दाखवू, नको बोलवू
झालावलचे काले काउ
हंश याश दावी, शाजिले धवल्या पंखांचे
हंशाशंगे याश खेलुदे
चांदाशंगे गोथ्थ बोलुदे
ल्हाउ देत भवती, थवेही गौल-गौलनींचे
मथुलेहुन तु आन चिताली
गोली कल ही मूल्ती काली
हशशी का बाई, कलेना कालन हशन्याचे ?
- गदिमा
---------------------------------------------
चक चक चकली,काट्याने
चक चक चकली,काट्याने माखली
तुकडा मोडताच खमंग लागली
असे काहीतरी दिवाळीचे गाणे होते.कोणाला आठवते का?
अजून एक शंकराचे गाणे होते.त्यात शंकराचे वर्णन होते.शब्द मात्र आजिबात आठवत नाहीत.
अरुंधती छान कविता पण काही
अरुंधती छान कविता
पण काही कविता वाचुन वाटलं काळ्या गोर्याचा भेद कसा लहानपणीच मनात भरवतो ना आपण? मोठेपणी सुद्धा ते मनावरचं भुत जात नाही
Pages