आठवणीतली बडबडगीतं

Submitted by मृण्मयी on 28 March, 2009 - 12:57

निषादची लहानपणची 'नर्सरी र्‍हाइम्सची' काही पुस्तकं अचानक सापडली. ती उघडून सगळ्या कविता पुन्हा एकदा वाचताना मला माझ्या लहानपणीची 'बडबडगीतं' आठवायला लागली. लहान मुलांच्या कवितांकरता इतकं समर्पक नाव सुचणार्‍या महाभागाचं कौतुक!
जशी आठवतील तशी आपापल्या बालपणीची , आठवणीतली गाणी इथे लिहून काढलीत तर वाचायला (बहुतेक सगळ्यांना) आवडेल. (अभ्यासक्रमातल्या कविता जुन्या हितगुजवर कुठेतरी लिहील्या आहेत. पण बडबडगीतं सापडली नाही.)

माझी एक आवडती कविता...
ह्या कवितेतला चित्ता खूप हावरट वाटायचा. कुणाला ह्या कवितेचे कवी आठवत असतील तर सांगा.

एकदा एक चित्ता
हातात घेऊन अडकित्ता
चित्ता आला दुपारी
मागु लागला सुपारी
मी म्हंटले "कशाला?"
तेव्हा चित्ता म्हणाला,
"नुकतेच जेवण झाले फक्कड,
खाऊन टाकले बारा बोकड.
बारा बोकड सोळा शेळ्या,
बघता बघता फस्त केल्या.
नंतर थोडी गंमत म्हणून,
तीन कोंबड्या टाकल्या खाऊन.
जेवण जरा जडच झाले,
भलते अंगावरती आले.
म्हंटले खावी सुपारी,
म्हणून आलो दुपारी."

किशोर मासिकातली एक...
आलगट्टी गालगट्टी
शोन्याशी गट्टी फू

तुला मी घेणार घेणार नाही
चॉकलेट गोळ्या देणार नाही
आलास तर घेईन गालगुच्चा
अंगावर सोडीन भू

पमगाडी, कूकगाडी
शेतावरची हम्मागाडी
आम्ही सगळे भूर जाऊ
एकटाच राहशील तू

पप्पु, बिट्टी, वेदा, राणी
आम्ही घेळू छापापाणी
तूच एकटा बाथरुममधे
रडके डोळे धू

(अशी दुष्ट प्रवृत्तीची बालगीतं आवडंत असल्याचं बघून आई-वडलांनी 'बाळीचे पाय पाळण्यातच ओळखले'.! Proud )

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या कवितेची चाल फारच छान आहे.
कवी: मंगेश पाडगावकर

टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले
भिर भिर भिर भिर त्या तालावर गाणे अमुचे जुळे !

कुरणावरती, झाडांखाली
ऊन-सावली विणते जाळी
येतो वारा पाहा भरारा, गवत खुशीने डुले !

टप टप पडती ....

दुर दुर हे सूर वाहती
उनहात पिवळया पाहा नाहती
हसते धरती, फांदीवरती हा झोपाळा झुले !

टप टप पडती ....

गाणे अमुचे झुळ-झुळ वारा
गाणे अमुचे लुक-लुक तारा
पाऊस, वारा, मोरिपसारा या गाणयातुन फुले !

टप टप पडती ....

फुलांसारखे सर्व फुला रे
सुरात मिसळुनी सुर , चला रे
गाणे गाती तेच शहाणे बाकी सारे खुळे !

टप टप पडती ....

अरे वा, बरीच माहिती असलेली/नसलेली बडबडगीतं वाचायला मिळाली. बडबडगीतांवरून आठवलं, माझी ऑफिसमधल्या गाणं म्हणण्याची फारच हौस होती, त्यामुळे तिला काहीच वर्ज्य नव्हतं. ऑफिसमध्ये काम करता करता बडबडगीतांपासून पिक्चरच्या गाण्यापर्यंत रोज सगळं ऐकायला मिळायचं आम्हांला. तिचं आवडतं बडबडगीत म्हणजे -

शेपटीवाल्या प्राण्यांची भरली होती सभा,
पोपट होता सभापती मधोमध उभा.

पुढचं मला लक्षात नाही आता..

पोपट म्हणाला, पोपट म्हणाला
मित्रानो, देवाघरचे दूत(?)
तुम्हा आम्हा सर्वाना एक एक शेपूट

या शेपटाचे कराल काय?>

गाय म्ह्णणाली, गाय म्ह्णणाली
अशा अशा शेपटीने मी मारीन माशा

घोडा म्हणाला
याला धरीन, त्याला धरीन तेही माझ्या शेपटीने
असेच करीन तसेच करीन...

कुत्रा म्हणाला
खुशीत येईन तेव्हा शेपूट हलवीत राहीन

मांजरीन म्हणाली
नाही ग बाई, कुत्र्यासारखे माझे मुळ्ळीच नाही..
खूप खूप्प रागवीन तेव्हा शेपूट फुगवीन

माकड म्हणाले
कधी वर कधी पुढे(?) शेपटीवर मी मारेन उडी

मासा म्हणाला
शेपूट म्हणजे दोन हात, दोन हात
पोहत राहीन प्रवाहात

कांगारू म्हणाले, माझे काय?
शेपूट म्हणजे पाचवा पाय....

अजून १-२ कडवी आहेत वाटत

बरं का ग मंदा
काय झालं एकदा
ताई आमची चिरत होती
खसाखसा कांदा
कांदा राहिला हातात
विळी गेली बोटात
विळीवरून उठली
नाचत सुटली
नाचताना धक्क्याने
मुरंब्याची बरणीच फुटली
हाय हाय
काचेवरती पाय
काच गेली पायात
पाणी आले डोळ्यात

आला आला बोका
त्याला धरून ठोका
बोकोबानं असं केलं तरी काय?
एक लीटर दुधावरची
खाऊन टाकली सगळी साय Happy

कोणाला या गाण्याची कडवी येतात का ?
शाळेत फार आवडतं गाणं होतं ..आठवत नाहीत कडवी :(.

इंद्रधनुष्या, इंद्रधनुष्या,
ये ना संगे खेळायला
अरे ये ना संगे खेळायला
पाउस लागेल, रंग भिजेल
छत्री देउ का रे तुला ?

बदका बदका नाच रे
तुझी पिल्लं पाच रे
एक पिल्लू हरवलं
गाडीखाली सापडलं
पोलिसानी विचारलं
'बाळ, तू कोणाचा?'
'मी माझ्या आईचा'
'आई कुठे गेली?'
'आई गेली कामाला, मी आलो शाळेला' Happy

पहिल्या ४ ओळी आई नेहेमी म्हणते मला उठवायला. अजुनही! नॉस्टॅल्जिक झाले.. >>>
बस्के सेम पिंच Happy माझी आई अजूनही गुणगुणते हे गाणे मी अंथरुणात लोळत असले की Happy

१. चिमणी चिमणी वारा घाल
कावळ्या कावळ्या पाणी दे..
मी देईन तुला ग दाणा
मी देईन तुला रे घरटे

बे एके बे
बे दुणे चार
बे त्रिक सहा .....शी...
हा पुन्हा पुन्हा रे पाढा लिहुनी बोटे दुखुन गेली
गिरवुनीया लिहिता पुसता पाटी रागावली
भिजलेली पाटी पाहुन .आई मारेल मला....मी देईन तुला ग दाणा
मी देईन तुला रे घरटे ....१

घर नायलॉनचे देइन तुला मी एवलाले हिरवे
मग वादळाला पावसाला का तुम्ही भ्यावे
मेणाचे शेणाचे घर देइल कोणी तुला....मी देईन तुला ग दाणा
मी देईन तुला रे घरटे ....२

चिमणि चिमणी वारा......

२. इटुक मिटुक चिन्चेचं बुटुक ,
चिन्चेचं बुटुक
(मधली ओळ म।हीत न।ही...कोणाला माहीत आहे का?)
तोन्ड झाल चुटुक चुटुक चुटुक..

मनी माऊ मनी माऊ
नेहेमीच तुला हवा खाऊ

उठता बसता गुरु गुरु
म्याव म्याव सदा सुरु

गुपचूप गुपचूप घरात येशी
दूध्-लोणी खाऊन जाशी

टीपूला पाहून पळून जाशी
अशी गं कशी तू वाघाची मावशी

हे घ्या पूर्ण गाणे:

पोपट म्हणाला, पोपट म्हणाला
मित्रानो, देवाघरची लूट देवाघरची लूट
तुम्हा आम्हा सर्वाना एक एक शेपूट

या शेपटाचे कराल काय?>

गाय म्ह्णणाली, गाय म्ह्णणाली
अशा अशा शेपटीने मी मारीन माशा

घोडा म्हणाला
याला धरीन, त्याला धरीन मीही माझ्या शेपटीने
असेच करीन तसेच करीन...

कुत्रा म्हणाला
खुशीत येईन तेव्हा शेपूट हलवीत राहीन

मांजरीन म्हणाली
नाही ग बाई, कुत्र्यासारखे माझे मुळ्ळीच नाही..
खूप खूप्प रागवीन तेव्हा शेपूट फुगवीन

माकड म्हणाले
कधी वर कधी खाली शेपटीवर मी मारेन उडी

मासा म्हणाला
शेपूट म्हणजे दोन हात, दोन हात
पोहत राहीन प्रवाहात

कांगारू म्हणाले, माझे काय?
शेपूट म्हणजे पाचवा पाय....

मोर म्हणाला पीस पीस फुलवून धरीन
पावसाळ्यात नाच मी करीन

पोपट म्हणाला
छान छान छान छान
देवाच्या देणगीचा ठेवा मान
आपुल्या शेपटीचा उपयोग करा
नाहीतर काय होइल

दोन पायाच्या माणसागत आपले शेपूट झडून जाइल Happy

अजून १-२ कडवी आहेत वाटत

शेपटिवाले......पुढच कडव

मोर म्हणाला पिस पिस फुलवुन धरीन मी धरीन
पावसाळ्यात नाच मी करीन ...नाच मी करीन

पोपट म्हणाला छान छान छान छान
देवाच्या देणगीचा ठेवा मान
आपुल्या शेपटाचा उपयोग करा...
नाहीतर काय होइल? २

दोन पायाच्या माणसागत आपलं शेपुत झडुन जाईल...........

हा हा हा

मनीच्या कुशीत झोपलं कोण
इटुकली पिटुकली पिल्लं दोन
मिचीमिची डोळे
टिल्ले कान
माऊची पिल्लं गोरीपान Happy

हल्लीच येशा नविन नविन गाणी शिकुन येते खरे शब्द तिच्या टीचरला( हा पण येशाचा शब्द तिला शिक्षिका किंवा बाई म्हणलेल चालत नाही तिच्या टीचरला) माहित Happy

१) आजीबाई आल्या पदर खोचुन
एकेकाला काढल त्यांनी ठेचुन
त्याची केली सुरेख चटणी
चटणी झाली मस्त
मुलांनी केली फस्त

२) मछली जल की रानी है
जीवन उसका पानी है
हाथ लगाओ तो डर जायेगी
बाहर निकालो तो मर जायेगी
पानीमें डालो तो तैर जायेगी

बरं का ग मंदा
काय झालं एकदा
आमची ताई चिरत होती
खसाखसा कांदा
कांदा राहीला हातात
विळी गेली बोटात
हाय हाय हाय
आता करायच काय?
आई हसली खु खु
बाबा हसले खो खो
तुला म्हणून सांगते हो
कोणाला सांगू नको!

गुब्बी, तू लिहीलेलं पहिलं गाणं पूर्ण असं आहे:

मिरची, कैरी, कोथिंबीर, आलं
त्या चौघांचं भांडण झालं
कशावरून?
एवढ्याश्या खोबर्‍याच्या तुकड्यावरून
आई आली पदर खोचून
एकेकाला काढलं ठेचून
पाट्यावर वाटली चटणी
चटणीने भरली बशी
पण मीठ म्हणालं,
माझ्याशिवाय चव येणार कशी?
चटणी झाली मस्त
मुलांनी केली फस्त

के अंजली, तू लिहीलेलं पहिलं गाणं पूर्ण असं आहे:
बरं का गं मंदा
काय झालं एकदा
ताई आमची चिरत होती खसाखसा कांदा
कांदा गेला डोळ्यात
विळी गेली बोटात
विळीवरून उठली
नाचत सुटली
धक्क्याने मोरंब्याची बरणीच फुटली
हाय हाय हाय काचेवरती पाय
काच गेली पायात आता करायचं काय
सूं सूं सूं नाक झालं लाल
डोळ्याला चिकटलं कांद्याचं साल
आई हसली खु खु
बाबा हसले खो खो
तुला म्हणून सांगते हो
कोणाला सांगू नको!

एक होती ईडली
खुप खुप चिडली
सांबार होते गरम गरम
ईडली होती नरम नरम
चमचा आला खुशित
येवुन बसला बशीत
चमच्याने पाहिले ईकडेतिकडे
ईडलीचे केले तुकडे तुकडे
ईडली झाली होती मस्त
मुलांनी केली ईडली फस्त

मला वाटत शाळेपरत्वे पदार्थ आणि यमक बदलत असावित. शेवटी काय मस्त आणि फस्त हेच मुलांना शिकवायच Wink

किती आवडते मज मनापासूनी शाळा
लाविते लळा ही जसा माऊली बाळा
हासत्या फुलांचा बाग जसा आनंदी
ही तशीच शाळा मुले इथे स्वच्छंदी
हासुनी हसवुनी खेळूनी सांगूनी गोष्टी
आम्हांस आमुचे गुरुजी शिक्षण देती
येथेच बंधुप्रेमाचे घ्या धडे
मग देशकार्य करण्याला व्हा पुढे
मग लोक म्हणतील धन्य धन्य ती शाळा
जी देशासाठी तयार करीते बाळा

माझ्या आईला अशा शाळेतल्या तिच्या लहानपणीच्या कविता वगैरे जमवायला फार आवडतात. तिच्या फाईल मध्ये ही एक कविता होती.

गायी पाण्यावर काय म्हणूनी आल्या
का गं गंगा जमुना ही त्या मिळाल्या?
कोण बोलले माझ्या चित्तचोरटीला

बरीच मोठी कविता आहे. माझी आई अगदी गुंगून जात असे ही कविता लयीत वाचून दाखवताना. वाचता वाचता तिच्या आणि ऐकता ऐकता माझ्या डोळ्यांत पाणी येत असे. Sad

अशीच एक बाहुलीची पण कविता आहे वाट्टं. ती पण वाचताना डोळे आणि मन दोन्ही भरून येतं तिचं Sad

निंबुडा,ती कविता
लाडकी बाहुली होती माझी एक
मिळणार तशी ना शोधुनी दुसर्‍या लाख
ही आहे का?
कुणाला माहिती असल्यास इथे टाका ना!

के अंजली,

लाडकी बाहुली :

लाडकी बाहुली होती माझी एक
मिळणार तशी ना शोधूनी दुसर्‍या लाख
किती गोरी गोरी गाल गुलाबच फुलले
हासती केस ते सुंदर काळे कुरळे
झाकती उघडती निळे हासरे डोळे
अन ओठ जसे की आत्ताच खुदकन हसले
अंगात शोभला झगा रेशमी लाल
केसांवर फुलले लाल फितीचे फुल
कितीतरी बाहुल्या होत्या माझ्याजवळी
पण तीच सोनुली फार मला आवडली
मी गेले तीजसह माळावर खेळाया
मी लपून म्हणते साई सुट्ट्या हो या या
किती शोध शोधली परी कुठे न ती दिसली
परतले घरी मी होउन हिरमुसलेली
स्वप्नात तीने मम रोज एकदा यावे
हलवून मला हळु माळावरती न्यावे
वाटते सारखे जावे त्याच ठिकणी
शोधुनी पहावी पुन्हा पुन्हा ती चिमणी
जाणार कशी पण संतत पाउस धार
खल मुळी न तिजला वारा झोंबे फर
पाऊस उघडता गेले माळावरती
गवतावर ओल्या मजला सापडली ती
कुणी गेली होती गाय तुडवूनी तिजला
पाहूनी दशा ती रडूच आले मजला
मैत्रिणी म्हणाल्या काय अहा हे ध्यान
केसांच्या झिपर्‍या रंगही गेला उडून
परी आवडली ती तशीच मजला राणी
लाडकी बाहुली होती माझी म्हणुनी

- शांता शेळके

घरटा - बालकवी

चिव चिव चिव रे
तिकडे तू कोण रे ?

कपिलामावशी कपिलामावशी
घरटा मोडून तू का जाशी ?

नाही गं बाई मुळीच नाही
मऊ गवत देईन तुशी

कोंबडीताई कोंबडीताई
माझा घरटा पाहिलास बाई ?

नाही गं बाई मुळीच नाही
तुझा माझा संबंध काही

कावळेदादा कावळेदादा
माझा घरटा नेलास बाबा ?

नाही गं बाई चिमणुताई
तुझा घरटा कोण नेई ?

आता बाई पाहू कुठे ?
जाऊ कुठे ? राहू कुठे ?

गरीब बिचाऱ्या चिमणीला
सगळे टपले छळण्याला

चिमणीला मग पोपट बोले
का गं तुझे डोळे ओले?

काय सांगू बाबा तुला
घरटा माझा कोणी नेला

चिऊताई चिऊताई
माझ्या घरट्यात येतेस बाई ?

पिंजरा किती छान माझा
सगळा शीण जाईल तुझा

जळो तुझा पिंजरा मेला
त्याचे नाव नको मला

राहीन मी घरट्याविना
चिमणी उडून गेली राना

- बालकवी

ही कविता आम्ही शाळेत अगदी तालासुरात म्हणायचो!

डराव डराव!

डराव डराव! डराव डराव!
का ओरडता उगाच राव?

पत्ता तुमचा नव्ह्ता काल
कोठुनी आला? सांगा नाव
धो धो पाउस पडला फार
तुडुंब भरला पहा तलाव
सुरू जाहली अमुची नाव
आणिक तुमची डराव डराव!

बटबटीत डोळ्यांचे ध्यान
विचित्र तुमचे दिसते राव!
सांगा तुमच्या मनात काय?
ही घ्या छत्री, ही घ्या नाव
जा गाठा जा अपुला गाव
आणि थांबवा डराव डराव!

- ग. ह. पाटिल

लहान माझी बाहुली
मोठी तिची सावली
घारे डोळे फिरवीते
लुकूलुकू ही पहाते
नकटे नाक उडवीते
गुबरे गाल फुगवीते
दांत कांही घासत नाहीं
अंग कांही धूत नाहीं
भात केला, करपुन गेला!
पोळ्या केल्या, कच्च्या झाल्या!
वरण केलें, पातळ झालें
तूप सगळें सांडून गेलें
असे भुकेले नक्का जाऊं
थांबा करतें गोड खाऊ
केळीचे शिकरण करायला गेली
दोनच पडले दांत
आडाचे पाणी काढायला गेली
धपकन् पडली आंत!

Pages