जीवनाची कहाणी

Submitted by आनन्दीआनन्द on 21 November, 2018 - 01:49

साधी, सरळ, सोप्पी हवी, जीवनाची कहाणी

नको चढ, नको उतार
उंच नको जायला फार
घ्यायचीय कुणा भरारी
आपण बरे, कामे बरी
शांतपणे सरून जावी, गात मस्त गाणी
साधी, सरळ, सोप्पी हवी, जीवनाची कहाणी

मला नाही जिंकायचे जग
कशासाठी धावायचे मग
जाऊ पायवाटेने निवांत
नको उद्याची रे भ्रांत
‘वेग’ नको, ‘वेग’ हवा, बाकी नाही काही मागणी
साधी, सरळ, सोप्पी हवी, जीवनाची कहाणी

आयुष्याची हवी सूत्रे चार
साधी राहणी, साधेच विचार
सोबतीला मित्र असू दे
ओठी त्याचे नाव असू दे
असेच जगतात का हो, सारी माणसे शहाणी?
साधी, सरळ, सोप्पी हवी, जीवनाची कहाणी

गाणी तुझी गाणार नाहीत
गोष्टी तुझ्या सांगणार नाहीत
नाही होणार साजरी जयंती
लक्षातही नसेल पुण्यतिथी
आठवणीने कुणाच्यातरी डोळा दाटून यावे पाणी
साधी, सरळ, सोप्पी हवी, जीवनाची कहाणी
आनंद खांदेवाले

Group content visibility: 
Public - accessible to all site users