समग्र शेषनाग - जय त्रिकालदेव

Submitted by पायस on 4 October, 2018 - 19:33

१९८९ ते १९९१ हा काळ भारतासाठी मोठा धामधूमीचा होता. दोन वर्षात आपण ४ पंतप्रधान बदलले आणि तितक्याच वेगाने आपल्या राहणीमानात बदल स्वीकारले. असे म्हणतात की बदल घडत असताना हा शेवटचा टप्पा सर्वाधिक वादळी असतो. त्या नियमानुसार बॉलिवूडमध्ये या दोन वर्षात के आर रेड्डी नावाचे वादळ आले ज्याने पाप को जलाकर राख कर दूंगा, वीरू दादा, गर्जना सारख्या कलाकृतिंमधून जुन्याची नव्याशी सांगड घालण्याचा प्रयत्न केला. एके दिवशी त्याला दृष्टांत झाला की "हे शमशान घाट के मुर्दे, त्रिकालदेव चाहते हैं की तुम बाकी शमशान घाट के मुर्दों के लिए एक भक्तिरस से भरपूर फिल्म का निर्माण करो. ताकि कलयुग में भटक गए भूले बिसरे वापस राह पर आ सके". तो दिवस बहुधा नागपंचमीचा होता. तत्काळ त्याने शेषनागची निर्मिती केली. नाग जमातीवर तसे सिनेमे तर पुष्कळ येऊन गेले. पण नाग, खजिना, नागमणी, दैवी चमत्कार, रेखाच्या रुपातली माधवी, अमर विषारी तांत्रिक आणि मंदाकिनी असे बंपर पॅकेज केवळ शेषनागच देतो. अशा महान चित्रपटाचे विषामृत वाचकांपर्यंत पोहोचवणे एका व्यक्तिच्या शक्तीपलीकडचे काम आहे. तरी हा विषग्रहणाचा अल्पसा प्रयत्न!

१) शेषनाग सहकारी बँक लिमिटेड

१.१) प्रेक्षक आणि सिनेमा यांमध्ये टायटलरुपी रेखा असते.

पहिल्या काही फ्रेम्समध्येच शेषनागाची कूळकथा अ‍ॅनिमेशन मधून स्पष्ट केली आहे. शेषनागाने पृथ्वीला आपल्या डोक्यावर तोलून धरले आहे असा समज आहे. त्यानुसार मिश्किल हसणारे शेषनागाचे कार्टून पृथ्वी डोक्यावर घेऊन आहे असे दिसते. त्यानंतर प्रेक्षकांकडे वळून बघताक्षणी धरणी दुभंगते आणि त्यातून टायटल सीक्वेन्स सुरु होतो. हा सीक्वेन्स म्हणजे रेखाची नागकन्येच्या वेषातली छायाचित्रे आहेत. इथे अनुभवी प्रेक्षक लगेच सावध होतो. जर टायटल्सची नय्या पार करण्याकरिता सुद्धा रेखाची गरज भासत असेल तर सिनेमाच्या हिरोमध्ये काही फारसा दम नाही.

१.२) आमचे येथे चेक्स फक्त चंद्रग्रहणाच्या दिवशी वटवले जातील

टायटल्स सोबत वाजत असलेले पार्श्वसंगीत अ‍ॅबरप्टली संपून अचानक "ढॅण्ण" आवाज होतो आणि आपल्याला एका गूढ गुहेचे दृश्य दिसू लागते. एक पुजारी आणि तीन ठाकूरसाब ते राजासाब या रेंजमध्ये बसणारे लोक गुहेत प्रवेश करतात. तिघांच्या हातात प्रत्येकी एक पेटारा असतो. आपल्याला लक्षात येते की हे एक भूमिगत मंदिर असून इथे प्रत्येक खांबावर सात फण्यांच्या नागाची नक्षी आहे. मध्ये एक मोठ्ठी पिंड असून त्या पिंडीवर भल्यामोठ्या नागाच्या फण्याचे छत्र आहे. पुजारीच्या सांगण्याप्रमाणे ते लोक आपापल्या पेटार्‍यातून एक चंदेरी रंग दिलेला थर्माकोलचा तुकडा बाहेर काढतात. ते तीन तुकडे जोडले की या पिंड+नागाची छोटेखानी प्रतिकृति तयार होत असते. ती प्रतिकृति विशिष्ट जागी ठेवून पुजारी त्यांना एका बाजूला घेतो. मग चंद्रग्रहण लागते आणि त्या गुहेच्या छताला पडलेल्या भगदाडातून येणारे चांदणे अडवले जाते. गुहेत अंधार होताच त्या मोठ्या फण्यावरचे एलईडी पाकपूक करतात आणि त्या फण्यातून फूत्कार निघाल्यासारखे किरण येतात आणि प्रतिकृतित प्रवेश करतात. हा क्यू घेऊन कुठून तरी दोन नाग सरपटत येतात. ते अनुक्रमे जितेंद्र आणि माधवी असतात. जंपिंग जॅक आणि मॅड्सच्या डोक्यावर नागमणी असतो. आपण का मागे राहावे म्हणून तेही किरणे सोडतात आणि त्या तीनही किरणांचा संगम होऊन धरणी दुभंगते व तिच्या खालचा खजिना दृष्टीस पडतो. मग ते निघून जातात. चंद्रग्रहण सुटते आणि क्षणभरच एक निळसर ज्योत दिसते. पुजारी सांगतो की ती अमरज्योती आहे. मग ते तिघे पोतेभर दागदागिने आणि सुवर्णमुद्रा भरून घेतात. पुजारी त्यांना हे धन गोरगरिबांच्या भल्यासाठी वापरायला सांगतो आणि पुढची खेप पुढच्या चंद्रग्रहणाला मिळेल हे स्पष्ट करतो.

आता खरे तर सिनेमा इथेच संपायला हवा. क्लिअरली मंदिरात ग्रहणसदृश परिस्थिती निर्माण करणे फार काही कठीण कर्म नाही. नागांची दृष्टी अधू असल्याने त्यांना फक्त अंधार की उजेड इतकेच कळते आणि ड्राय आईसच्या मदतीने धूर करणे आणि तापमान कमी करणे सुद्धा अवघड नाही. मग ते आले आणि तो गाडलेला खजिना परत दिसला की हवे तेवढे धन काढून घ्यावे. पण अशी अक्कल सिनेमातल्या लोकांना नसल्यामुळे सिनेमा निष्कारण आणखी अडीच तास लांबतो.

२) व्हिलन की एंट्री

२.१) शमशान घाट के मुर्दे : एक संकल्पना

डॅनी या सिनेमात अघोरी या नावाने व्हिलन दाखवला आहे. अघोरी भलताच तगडा व्हिलन आहे. त्याची ओळख आपल्याला करून घ्यायची आहेच पण तत्पूर्वी आपण "शमशान घाट के मुर्दे" ही संकल्पना समजून घेतली पाहिजे. अघोरीचे मुख्य टार्गेट ती अमरज्योती आहे हे सूज्ञास सांगणे न लगे. आता अघोरी या ज्योतीच्या मदतीने अमर होणार ही त्याच्या दृष्टीने काळ्या दगडावरची पांढरी रेघ! मग बाकी सर्व एके दिवशी स्मशानात जाणार हेही नक्की! त्यामुळे इतरांपासून स्वतःचे वेगळेपण ठसवण्यासाठी तो समस्त मर्त्य मानवांना "शमशान घाट के मुर्दे" असे संबोधत असतो. अननुभवी प्रेक्षकांना अमरज्योतीचे महत्त्व आणि फोरशॅडोइंग कळण्याकरिता या तंत्राचा वापर केला आहे.

२.२) "जय त्रिकालदेव!"

यानंतर आपण दुसर्‍या एका गुहेमध्ये प्रवेश करतो. ही गुहा शेषनागाच्या गुहेपेक्षा भलतीच प्रकाशमान असते. पण इंटेरिअर डिझाईनरने सढळ हस्ते कवट्या आणि हिडीस चेहर्‍यांचा वापर केलेला असल्यामुळे ही गुहा व्हिलनची असल्याचे स्पष्ट होते. जटाधारी डॅनी तरातरा गुहेत घुसतो आणि गुहेच्या मध्यभागी असलेल्या उग्र पुतळ्यापुढे उभा ठाकतो. "जय त्रिकालदेव! (१)" हा या सिनेमातला अघोरीचा संभाषण सुरु करण्याचा प्रोटोकॉल असावा. बुचकळ्यात पाडणारी गोष्ट या त्रिकालदेवच्या मूर्तीचे स्तन लक्षात येतील इतके मोठे आहेत. आता इथे महाकाली किंवा तत्सम देवतेचा वापर का केलेला नाही हे माझ्या आकलनापलीकडचे आहे. असो, तर अघोरी त्या त्रिकालदेवच्या मूर्तीशी बोलायला सुरुवात करतो, नव्हे त्या मूर्तीला धमकवायला लागतो. तो समोरची एक धुनी पेटवतो आणि हातातल्या त्रिशूळाने अंगठा कापून घेतो. जोवर त्रिकालदेव त्याला त्या दोन नागांचा (पक्षी जॅक आणि मॅड्स) पत्ता सांगत नाही तोवर तो या रक्ताने त्या धुनीतली आग विझवणार असतो. ही धमकी असून त्रिकालदेवही मनात हसला असावा. ती जखम कांदा चिरताना बोट चिरले गेले तर होईल तेवढी आहे, बघता बघता रक्त गोठेल. रावणाच्या शिरकमल स्टाईल गोष्टींची सवय असलेला त्रिकालदेव याने कसला प्रसन्न होतोय? अघोरीच्या गँगमधले चिल्लर लोक मात्र लई घाबरतात. उद्या हा टपकला तर रात्रीच्या दोन पेगची सोय कोण करणार?

ही काळजी असल्याने कुठून तरी सुधीर धावत येतो. सुधीर अघोरी गँगचा फ्रान्सहून आयात केलेला मेंबर असावा कारण त्याच्या दाढी मिशा थेट मस्कटिअर छाप आहेत. अघोरी आधी या शमशान घाटच्या मुडद्यावर उखडला असे दाखवतो. आता तो नक्की उखडला का नाही हे सांगणे थोडे कठीण आहे कारण संपूर्ण सिनेमाभर डॅनीचा चेहरा कायमस्वरुपी बद्धकोष्ठ झाल्यासारखा आहे. सुधीर त्रिकालदेवची शपथ घेऊन सांगतो की मी जॅक आणि मॅड्सला मानवी रुपात बघितले आहे (मागून त्रिकालदेव ओरडतो, शपथ घ्यायची तर आईची घे. मला का मध्ये ओढतो?). अघोरी जाम पॉवरबाज तांत्रिक असतो. त्याला सुधीरच्या डोळ्यात त्याने काय बघितले आहे ते सगळे दिसते. बातमी खरी असल्याचे कळल्यावर तो खदाखदा हसतो. "जय त्रिकालदेव! (२)" एक भोळसट मेंबर त्याला विचारतो के हे नाग तर फार विषारी असतात, त्याचं काय करणार आहेस. मग आपल्या डॅनी अघोरी बनवायची रेसिपी सांगतो.

त्रिकालदेवचा अघोरी (संदर्भः शमशान घाटच्या मुडद्यांकरिता सुलभ सैतानी पाककृति)
साहित्यः
१००० शैतान
१००० पाली
१ मगरीचे कातडे
२० विंचू

कृति:
स्मशानात १००० शैतान मावतील अशी एक चिता रचून घ्या. त्यात त्या १००० शैतानांना जाळून त्यांची राख गोळा करा. ही राखरांगोळी होईपर्यंत १००० पालींचे रक्त एका भांड्यात काढून घ्या. ते रक्त वापरून राखेचा एक मानवाकृति पुतळा बनवावा. हातापायांची बोटे बनवू नयेत. पुतळ्याला मगरीच्या कातड्याची त्वचा बसवावी. नीट न बसवल्यास एअर बबल्स राहून अघोरीच्या कपाळावर कायमस्वरुपी आठ्या पडतील. बोटांच्या जागी विंचवांच्या नांग्या जोडाव्यात. जर तुमचे शैतान, शंभर टक्के शैतान असतील तर तुमचा अघोरी निश्चितच हवा तसा चिडचिडा आणि त्रासलेल्या आवाजाचा तयार होईल. घरगुती पालींच्या जागी जर सरडे वापरल्यास अघोरीला कायमस्वरुपी बद्धकोष्ठ असण्याची गॅरेंटी!

आपले विषारीपण सिद्ध करण्याकरिता तो एका नागाकडून स्वतःला चावून घेतो. नाग बिचारा एक्सपायरी डेट उलटलेल्या अघोरीच्या चवीने तडफडून मरतो. अशा रीतिने आपल्या लोकांना मोटिव्हेट करून अघोरी त्या इच्छाधारी कपलला पकडायला बाहेर पडतो.

२.३) बॉस कधीच चुकत नसतो

अखेर आपल्याला प्रथमच सिनेमातल्या स्थळांचा भूगोल बघायला मिळतो. हिमालयाच्या कटआऊटच्या बॅकग्राऊंडवर आणि अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर व पुंगी यांच्या स्वरांवर जॅक आणि मॅड्स नाचत असतात. "तु नाचे मैं गाऊ, मितवा छेड मिलन के गीत" या शब्दांवर जितेंद्र आणि माधवीने भांगडा ते भरतनाट्यम् अशी अफलातून व्हरायटी दिली आहे. सरोज खानला बहुधा रेड्डीकाकांनी "जोपर्यंत ते सापासारखी जीभ लपलप करत आहेत तोपर्यंत एनीथिंग गोज्" असा कानमंत्र दिला असावा. थोड्यावेळाने त्यांना जमिनीवर नाचून कंटाळा येतो मग ते हवेत नाचायला लागतात. मग माधवीला तिच्या लांबसडक केसांचा कंटाळा येतो. त्यामुळे ती एक कडवे छोट्या, कुरळ्या केसांत नाचून घेते. त्यातही फार काही मजा न आल्याने मग ती पुन्हा लांब केस मोकळे सोडून चमकीवाल्या हिरव्या चुड्यात नाचून घेते. जितू इकडे तिकडे उड्या मारायची आणि मधून मधून माधवीला खाली लोळायला लावून तिच्यावरून उड्या मारायची जबाबदारी इमानेइतबारी पार पाडतो.
हे सगळे चालू असताना अघोरी आपल्या सोबत काही गारुड्यांना घेऊन येतो. वॉर्निंग शॉट म्हणून तो त्याचा त्रिशूळ फेकून जॅक आणि मॅड्सचे लक्ष वेधून घेतो. ते दोघे भलतेच चालू असल्याने ते नागरुप धारण करून सुमडीत पलायन करतात. हे नागांचे तेल अघोरी सोबत आलेल्या शमशान घाटच्या मुडद्यांवर काढतो. या नागांना शोधून जर त्यांनी अघोरीसमोर हजर नाही केले तर अघोरी त्यांची खाल उधडून टाकेल. "जय त्रिकालदेव! (३)"

३) सरपटण्यापेक्षा दोन पायांवर पळ काढणे सोपे असते

३.१) "आमच्या इथे अघोरी चावल्यावरची लस टोचून मिळेल" सर्पमित्र चारुदत्त वसुमित्र रे अर्थात चा. व. रे

हा खाल उधडण्याचा क्यू घेऊन एडिटर आपल्या काही सापांची कात वाळत टाकलेली दाखवतो. कुठूनतरी तिथे ऋषी कपूर उगवतो. ऋषीबाळ फारच गुणी बाळ दाखवला आहे. तो त्या गारुड्यांचे प्रबोधन करण्याचा असफल प्रयत्न करतो. इथे पटकथालेखक आपले अर्थशास्त्राचे ज्ञान पाजळतो - साप विकण्यापेक्षा सापांच्या कातीचे चामडे विकणे अधिक फायदेशीर आहे (सेकंडरी सेक्टर जॉब वि. प्रायमरी सेक्टर जॉब). ऋषीबाळ म्हणतो की हे भोलेनाथचे भक्त आहेत असं करू नका. तुमची चामडी कोणी लोळवली तर तुम्हाला कसं वाटेल? यावर ते गारुडी ऋषीबाळाची चामडी लोळवतात. याने बाळ भलताच खवळतो. तो जाऊन एका ओसाड मंदिरात शंकराच्या मूर्तिपुढे आपले गार्‍हाणे मांडतो. पण फार काही घडण्याआधीच त्याला दिसते की गारुडी लोक गठ्ठ्याने नागांच्या मागे लागलेत. मग तो शंकराला त्याच्या भक्तांना (पक्षी: कोणताही नाग) वाचवायचे वचन देतो. चाणाक्ष प्रेक्षकाच्या लक्षात येते की याच्यामुळे अघोरीच्या हातून जितेंद्र/माधवीचे प्राण वाचणार आहेत.

इकडे अघोरीच्या आदेशावरून सुधीर आणि कं. जॅक आणि मॅड्सच्या शोधात असतात. पण पकडलेल्या नागांपैकी एकही नाग इच्छाधारी नसल्यामुळे अघोरी वैतागतो. तो म्हणतो की जाऊन शोधा त्यांना आणि पकडलेल्या नागांचे विष काढून मला द्या. आज मी विषपान करणार आहे. जितेंद्राला आपले जातभाई मारले जात असल्याचे बघवत नाही. तो थेट अघोरीच्या गुहेत जाऊन थडकतो. त्याच्या आवाजाचे पडसाद पुरते पाच सेकंद उमटतात. कान किटल्यामुळे अघोरी बाहेर येतो. बघतो तर काय - हा तर इच्छाधारी नाग! मुडदा स्वतःच शमशान घाटमध्ये आल्याने खुश होऊन तो विकट हास्य करतो. मग त्यांच्यात वाक्-युद्ध रंगते. अघोरी त्याला पेटीत बंद करणार असल्याचे सांगून नसलेल्या पेट्यांमधून हवी ती पेटी निवडायची मुभा देतो. जितेंद्र त्याला "तुझ्या अस्थी बंद करता येतील अशी पेटी चालेल मला" म्हणून अघोरीला उचकवतो. "जय त्रिकालदेव! (४)"

दोघांमध्ये तुंबळयुद्ध (बजेटमध्ये जेवढे तुंबलं तेवढं तुंबळ) होते. कधी नव्हे तो एक इच्छाधारी नाग पुंगीच्या स्वरांमध्ये मदमस्त होण्याआधीच झडप घालून पुंगी फेकून देण्याचा शहाणपणा करतो. अघोरीकडे आग लावणे (शब्दशः), फुंकरीतून वादळ निर्माण करणे, हवेतून तलवार काढणे अशा पॉवर्स असतात. तर जितेंद्राकडे हवेत तरंगणे, फेकलेल्या तलवारीचा हार करणे अशा पॉवर असतात. मानवी रुपात झोंबाझोंबी करून पोट न भरल्याने ते नाग आणि मुंगसाच्या रुपात झोंबाझोंबी करतात. असा विषम सामना असूनही जितू अघोरीवर भारी पडत असतो. तो अघोरीला चावणार इतक्यात मॅड्स येऊन सांगते की "प्रीतम इसे मत डसो." तब्बल २४ मिनिटांनंतर आपल्याला जितेंद्राचे सिनेमातले नाव कळते - प्रीतम. मॅड्स म्हणते की अघोरी आपल्यापेक्षा जास्त विषारी आहे. डॅनीचे समाधान झालेले असल्याने तो हसून जरा हवापाण्याच्या गोष्टी करू बघतो. त्यावर जितेंद्र विषफुंकार सोडतो. ही विषफुंकार कमी आणि फ्लेमथ्रोअरचा ब्लास्ट जास्त आहे. यावर अघोरी कसलं तरी भस्म फेकतो आणि याने धूरच धूर होतो. "जय त्रिकालदेव! (५)". याने म्हणे माधवी जखमी होते. धूराच्या आडोशाने जॅक आणि मॅड्स काढता पाय घेतात आणि अघोरी सगळ्या गारुड्यांना परत त्यांच्या पाठलागावर लावतो.

३.२) रेखा कोणतीही असो, तिला ओलांडून जायचे म्हणजे अग्निपरीक्षा द्यावीच लागते.

ऋषीबाळ आपल्याच तंद्रीत चाललेला असतो. त्याला दगडावर एक अंगाला केचप फासलेला रबरी नाग दिसतो. एका नजरेत त्याला कळते की "ये तो जखमी नागीन हय". तीन चिल्लर गारुडी येऊन त्याला ती नागीण मागतात. ऋषीबाळ झाशीच्या राणीइतक्या बाणेदारपणे सांगतो - नहीं दूंगा! तो त्या नागिणीला आपल्या कासोटीला बांधून पळ काढतो. उतारावर धावत असल्याने तो अपेक्षेप्रमाणे धडपडतो. मग हे गारुडी त्याला काठ्यांनी झोडप झोडप झोडपतात. या नादात त्यांचे लक्ष नसताना एक नाग (हा बहुधा जितेंद्र असावा) त्यांना डसतो. प्रत्यक्षात हे काम आधीसुद्धा होऊ शकले असते पण नागाला "गठ्ठ्याने बडवला जाणारा माणूस कसा दिसतो?" या शोमध्ये रस असावा. या संधीचा फायदा घेऊन बाळ नागीणीला एका सुरक्षित ठिकाणी सोडतो आणि तिचे प्राण वाचवतो.

ही बातमी कळल्यानंतर अघोरीचा राग ऋषी कपूरवर शिफ्ट होतो. तो आधी ऋषी कपूरला मारायचे ठरवतो. इकडे माधवी आणि जितेंद्रची परत गाठभेट पडते. बागेत रोमान्स करायच्या पोजमध्ये माधवी अजूनही माणसांमध्ये माणूसकी शिल्लक आहे या अर्थाचा डायलॉग मारते. जितेंद्रही "हो ना, याला नक्की भोलेबाबाने पाठवले असणार" म्हणत दुजोरा देतो. हे दोघे याचे उपकार न विसरण्याची शपथ घेतात. याचाच अर्थ लवकरच ऋषी कपूरचे कुत्र्यागत हाल होणार आहेत, त्याशिवाय यांना त्याच्या उपकारांची परतफेड कशी करता येईल?

"जय त्रिकालदेव! (६)" अघोरीने भलेही ऋषीबाळाला मारण्याची घोषणा केलेली असली तरी तो अजूनही या नागांना आपल्या सीमेबाहेर निसटू देण्याच्या मूडमध्ये नसतो. मग त्याला पॉवर दाखवायची हौस येते आणि एका रँडम ठिकाणी तो त्रिशूळ जमिनीत रोवतो. त्याच्या ताकदी धरणी दुभंगून एक सीमारेखा तयार होते. त्याच्या म्हणण्यानुसार ही रेखा ओलांडणे जॅक आणि मॅड्स के बस की बात नसते आणि तसेच होते. हे दोघे नागरुपात ती रेखा ओलांडायचा प्रयत्न करतात तेव्हा ती अग्निरेखा असल्याचे कळते. हे बिचारे अघोरीप्रूफ पण नसतात तर फायरप्रूफ कुठून असणार? इच्छाधारी रुपांतरणाच्या नियमांनुसार नागांना रोमान्स/फायटिंग/डायलॉगबाजी या कामांव्यतिरिक्त रुप बदलता येत नसल्याने ते माणूस बनून उडी मारून ती रेखा पार करण्याचा प्रयत्न करत नाहीत. पिंडी ते ब्रह्मांडी या तत्वाच्या करोलरी नुसार शंकराची पिंड कुठेही प्रकट होऊ शकते. या करोलरीमुळे त्या रँडम ठिकाणी हवेतून पिंड अवतरते. मग हे नाग या पिंडीला विळखा घालून तिला ओढत ओढत नेतात. अघोरी आणि त्याच्या शोधपथकाचा मंत्र "आपण बरे आणि आपले काम बरे" असल्याने त्यांना त्यांच्या शेजारून एक पिंड घसरत चालली आहे हे दिसत नाही. हायरार्की मध्ये अग्निदेव शंकराच्या खाली असल्याने तो लगोलग आग विझवतो आणि हे लोक पिंडीसकट ती अग्निरेखा ओलांडतात.

या लोकांनी रेखा ओलांडल्याचा क्यू घेऊन पुढच्या दृश्यात रेखा येणार हे उघड आहे. तरी इथे माझी अल्पकाळापुरती विरामरेखा. त्रिकालदेवाची कृपा होताच उरलेल्या शमशान घाटच्या मुडद्यांबद्दल प्रतिसादांत विस्ताराने लिहितो Proud

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

"आता रमत गमत चाललेल्या ऋषी कपूरला हे निरीक्षण करता येत असेल तर त्याला डॉनचे "खाली रिव्हॉल्व्हर"च काय, डॉन आणि विजयमध्येही फरक करता येईल"

"तरीसुद्धा जंगलात भेटलेल्या रँडम पोरीला "परी" म्हणणार्‍या नरपुंगवाची नजर इतकी तीक्ष्ण असेल हे पटत नाही. " - आ रा रा (हे इब्लिस ना उद्देशून नाही Happy ) पारच, पिसं काढाय्ले भौ! Happy

आगाऊ Lol

बाय द वे, यापुढची ३०-४० मिनीटे इतकी पकाऊ आहेत (त्यात मोहम्मद अजीज+ आनंद बक्षी+ बॅडपॅच मधला ऋषीकपूर) की ती बघून त्यावर इतके धमाल लिहील्याबद्दल पायस ला एक स्पेशल रिस्पेक्ट!

हे अस्वल पूर्णवेळ पौर्णिमेला रडणार्‍या लांडग्याप्रमाणे वर तोंड करून, मर्दमधल्या वाघाप्रमाणे हात जोडून दोन पायांवर धावते. >>
तसेच मिनिटागणिक सिनेमाचा भूगोल दक्षिणेकडे सरकत असल्याचे आपल्या बॅकग्राऊंड बघून कळते.>>>
ही सगळी निरीक्षणे जबरी आहेत

ऋषी कपूरला तो विचारतो की तुला कोणी इच्छाधारी नाग दिसले आहेत का? ऋषी म्हणतो नाही. >> पुलंनी कोकणात लोक चुलीखाली फुरसं निघालं होतं हे खूप सहजपणे सांगतात असे कोठेतरी लिहीलेले आहे. तशाच सहजपणे या पिक्चरमधले लोक इच्छाधारी नागांबद्दल बोलतात. एखाद्याला आपण अरे तुला इथे कोणी भाजीवाला दिसला का विचारतो तितक्या सहजपणे इच्छाधारी नागांबद्दल बोलतात. सगळे गाव पूर्णवेळ नाग-सेण्ट्रिक असल्यासारखे वागते.

हा इच्छाधारी रिलेटेड नियम नवीन आणि यूनिक आहे) >>> Lol अजून दोन पॉवर या भागात दिसल्या:
१. कपाळावर समोरच्या व्यक्तीचा फ्लॅशबॅक, आणि
२. एकच नागीण एकाच वेळेस ऋषी कपूरच्या घरी रेखा म्हणून तर बाहेर जीतू बरोबर माधवी म्हणून नाचते. माझी स्क्रीनकडे दोन मिनीटे पाठ होती. मधेच रेखाचा आवाज दुसर्‍याच कोणीतरी डबिंग केल्यासारखा येउ लागला. हे काय झाले बघतो तर एकदम माधवी अंगावर सिल्व्हर फॉइल सारखे कपडे घालून.

मात्र या गावातील लोकांचे पूरक उद्योग आवडले मला. एकाचा धंदा नाग पकडून त्यांचे विष काढून घेणे, व त्यांची कात घेउन विकणे हा रझा मुरादचा धंदा.

Pages