समग्र शेषनाग - जय त्रिकालदेव

Submitted by पायस on 4 October, 2018 - 19:33

१९८९ ते १९९१ हा काळ भारतासाठी मोठा धामधूमीचा होता. दोन वर्षात आपण ४ पंतप्रधान बदलले आणि तितक्याच वेगाने आपल्या राहणीमानात बदल स्वीकारले. असे म्हणतात की बदल घडत असताना हा शेवटचा टप्पा सर्वाधिक वादळी असतो. त्या नियमानुसार बॉलिवूडमध्ये या दोन वर्षात के आर रेड्डी नावाचे वादळ आले ज्याने पाप को जलाकर राख कर दूंगा, वीरू दादा, गर्जना सारख्या कलाकृतिंमधून जुन्याची नव्याशी सांगड घालण्याचा प्रयत्न केला. एके दिवशी त्याला दृष्टांत झाला की "हे शमशान घाट के मुर्दे, त्रिकालदेव चाहते हैं की तुम बाकी शमशान घाट के मुर्दों के लिए एक भक्तिरस से भरपूर फिल्म का निर्माण करो. ताकि कलयुग में भटक गए भूले बिसरे वापस राह पर आ सके". तो दिवस बहुधा नागपंचमीचा होता. तत्काळ त्याने शेषनागची निर्मिती केली. नाग जमातीवर तसे सिनेमे तर पुष्कळ येऊन गेले. पण नाग, खजिना, नागमणी, दैवी चमत्कार, रेखाच्या रुपातली माधवी, अमर विषारी तांत्रिक आणि मंदाकिनी असे बंपर पॅकेज केवळ शेषनागच देतो. अशा महान चित्रपटाचे विषामृत वाचकांपर्यंत पोहोचवणे एका व्यक्तिच्या शक्तीपलीकडचे काम आहे. तरी हा विषग्रहणाचा अल्पसा प्रयत्न!

१) शेषनाग सहकारी बँक लिमिटेड

१.१) प्रेक्षक आणि सिनेमा यांमध्ये टायटलरुपी रेखा असते.

पहिल्या काही फ्रेम्समध्येच शेषनागाची कूळकथा अ‍ॅनिमेशन मधून स्पष्ट केली आहे. शेषनागाने पृथ्वीला आपल्या डोक्यावर तोलून धरले आहे असा समज आहे. त्यानुसार मिश्किल हसणारे शेषनागाचे कार्टून पृथ्वी डोक्यावर घेऊन आहे असे दिसते. त्यानंतर प्रेक्षकांकडे वळून बघताक्षणी धरणी दुभंगते आणि त्यातून टायटल सीक्वेन्स सुरु होतो. हा सीक्वेन्स म्हणजे रेखाची नागकन्येच्या वेषातली छायाचित्रे आहेत. इथे अनुभवी प्रेक्षक लगेच सावध होतो. जर टायटल्सची नय्या पार करण्याकरिता सुद्धा रेखाची गरज भासत असेल तर सिनेमाच्या हिरोमध्ये काही फारसा दम नाही.

१.२) आमचे येथे चेक्स फक्त चंद्रग्रहणाच्या दिवशी वटवले जातील

टायटल्स सोबत वाजत असलेले पार्श्वसंगीत अ‍ॅबरप्टली संपून अचानक "ढॅण्ण" आवाज होतो आणि आपल्याला एका गूढ गुहेचे दृश्य दिसू लागते. एक पुजारी आणि तीन ठाकूरसाब ते राजासाब या रेंजमध्ये बसणारे लोक गुहेत प्रवेश करतात. तिघांच्या हातात प्रत्येकी एक पेटारा असतो. आपल्याला लक्षात येते की हे एक भूमिगत मंदिर असून इथे प्रत्येक खांबावर सात फण्यांच्या नागाची नक्षी आहे. मध्ये एक मोठ्ठी पिंड असून त्या पिंडीवर भल्यामोठ्या नागाच्या फण्याचे छत्र आहे. पुजारीच्या सांगण्याप्रमाणे ते लोक आपापल्या पेटार्‍यातून एक चंदेरी रंग दिलेला थर्माकोलचा तुकडा बाहेर काढतात. ते तीन तुकडे जोडले की या पिंड+नागाची छोटेखानी प्रतिकृति तयार होत असते. ती प्रतिकृति विशिष्ट जागी ठेवून पुजारी त्यांना एका बाजूला घेतो. मग चंद्रग्रहण लागते आणि त्या गुहेच्या छताला पडलेल्या भगदाडातून येणारे चांदणे अडवले जाते. गुहेत अंधार होताच त्या मोठ्या फण्यावरचे एलईडी पाकपूक करतात आणि त्या फण्यातून फूत्कार निघाल्यासारखे किरण येतात आणि प्रतिकृतित प्रवेश करतात. हा क्यू घेऊन कुठून तरी दोन नाग सरपटत येतात. ते अनुक्रमे जितेंद्र आणि माधवी असतात. जंपिंग जॅक आणि मॅड्सच्या डोक्यावर नागमणी असतो. आपण का मागे राहावे म्हणून तेही किरणे सोडतात आणि त्या तीनही किरणांचा संगम होऊन धरणी दुभंगते व तिच्या खालचा खजिना दृष्टीस पडतो. मग ते निघून जातात. चंद्रग्रहण सुटते आणि क्षणभरच एक निळसर ज्योत दिसते. पुजारी सांगतो की ती अमरज्योती आहे. मग ते तिघे पोतेभर दागदागिने आणि सुवर्णमुद्रा भरून घेतात. पुजारी त्यांना हे धन गोरगरिबांच्या भल्यासाठी वापरायला सांगतो आणि पुढची खेप पुढच्या चंद्रग्रहणाला मिळेल हे स्पष्ट करतो.

आता खरे तर सिनेमा इथेच संपायला हवा. क्लिअरली मंदिरात ग्रहणसदृश परिस्थिती निर्माण करणे फार काही कठीण कर्म नाही. नागांची दृष्टी अधू असल्याने त्यांना फक्त अंधार की उजेड इतकेच कळते आणि ड्राय आईसच्या मदतीने धूर करणे आणि तापमान कमी करणे सुद्धा अवघड नाही. मग ते आले आणि तो गाडलेला खजिना परत दिसला की हवे तेवढे धन काढून घ्यावे. पण अशी अक्कल सिनेमातल्या लोकांना नसल्यामुळे सिनेमा निष्कारण आणखी अडीच तास लांबतो.

२) व्हिलन की एंट्री

२.१) शमशान घाट के मुर्दे : एक संकल्पना

डॅनी या सिनेमात अघोरी या नावाने व्हिलन दाखवला आहे. अघोरी भलताच तगडा व्हिलन आहे. त्याची ओळख आपल्याला करून घ्यायची आहेच पण तत्पूर्वी आपण "शमशान घाट के मुर्दे" ही संकल्पना समजून घेतली पाहिजे. अघोरीचे मुख्य टार्गेट ती अमरज्योती आहे हे सूज्ञास सांगणे न लगे. आता अघोरी या ज्योतीच्या मदतीने अमर होणार ही त्याच्या दृष्टीने काळ्या दगडावरची पांढरी रेघ! मग बाकी सर्व एके दिवशी स्मशानात जाणार हेही नक्की! त्यामुळे इतरांपासून स्वतःचे वेगळेपण ठसवण्यासाठी तो समस्त मर्त्य मानवांना "शमशान घाट के मुर्दे" असे संबोधत असतो. अननुभवी प्रेक्षकांना अमरज्योतीचे महत्त्व आणि फोरशॅडोइंग कळण्याकरिता या तंत्राचा वापर केला आहे.

२.२) "जय त्रिकालदेव!"

यानंतर आपण दुसर्‍या एका गुहेमध्ये प्रवेश करतो. ही गुहा शेषनागाच्या गुहेपेक्षा भलतीच प्रकाशमान असते. पण इंटेरिअर डिझाईनरने सढळ हस्ते कवट्या आणि हिडीस चेहर्‍यांचा वापर केलेला असल्यामुळे ही गुहा व्हिलनची असल्याचे स्पष्ट होते. जटाधारी डॅनी तरातरा गुहेत घुसतो आणि गुहेच्या मध्यभागी असलेल्या उग्र पुतळ्यापुढे उभा ठाकतो. "जय त्रिकालदेव! (१)" हा या सिनेमातला अघोरीचा संभाषण सुरु करण्याचा प्रोटोकॉल असावा. बुचकळ्यात पाडणारी गोष्ट या त्रिकालदेवच्या मूर्तीचे स्तन लक्षात येतील इतके मोठे आहेत. आता इथे महाकाली किंवा तत्सम देवतेचा वापर का केलेला नाही हे माझ्या आकलनापलीकडचे आहे. असो, तर अघोरी त्या त्रिकालदेवच्या मूर्तीशी बोलायला सुरुवात करतो, नव्हे त्या मूर्तीला धमकवायला लागतो. तो समोरची एक धुनी पेटवतो आणि हातातल्या त्रिशूळाने अंगठा कापून घेतो. जोवर त्रिकालदेव त्याला त्या दोन नागांचा (पक्षी जॅक आणि मॅड्स) पत्ता सांगत नाही तोवर तो या रक्ताने त्या धुनीतली आग विझवणार असतो. ही धमकी असून त्रिकालदेवही मनात हसला असावा. ती जखम कांदा चिरताना बोट चिरले गेले तर होईल तेवढी आहे, बघता बघता रक्त गोठेल. रावणाच्या शिरकमल स्टाईल गोष्टींची सवय असलेला त्रिकालदेव याने कसला प्रसन्न होतोय? अघोरीच्या गँगमधले चिल्लर लोक मात्र लई घाबरतात. उद्या हा टपकला तर रात्रीच्या दोन पेगची सोय कोण करणार?

ही काळजी असल्याने कुठून तरी सुधीर धावत येतो. सुधीर अघोरी गँगचा फ्रान्सहून आयात केलेला मेंबर असावा कारण त्याच्या दाढी मिशा थेट मस्कटिअर छाप आहेत. अघोरी आधी या शमशान घाटच्या मुडद्यावर उखडला असे दाखवतो. आता तो नक्की उखडला का नाही हे सांगणे थोडे कठीण आहे कारण संपूर्ण सिनेमाभर डॅनीचा चेहरा कायमस्वरुपी बद्धकोष्ठ झाल्यासारखा आहे. सुधीर त्रिकालदेवची शपथ घेऊन सांगतो की मी जॅक आणि मॅड्सला मानवी रुपात बघितले आहे (मागून त्रिकालदेव ओरडतो, शपथ घ्यायची तर आईची घे. मला का मध्ये ओढतो?). अघोरी जाम पॉवरबाज तांत्रिक असतो. त्याला सुधीरच्या डोळ्यात त्याने काय बघितले आहे ते सगळे दिसते. बातमी खरी असल्याचे कळल्यावर तो खदाखदा हसतो. "जय त्रिकालदेव! (२)" एक भोळसट मेंबर त्याला विचारतो के हे नाग तर फार विषारी असतात, त्याचं काय करणार आहेस. मग आपल्या डॅनी अघोरी बनवायची रेसिपी सांगतो.

त्रिकालदेवचा अघोरी (संदर्भः शमशान घाटच्या मुडद्यांकरिता सुलभ सैतानी पाककृति)
साहित्यः
१००० शैतान
१००० पाली
१ मगरीचे कातडे
२० विंचू

कृति:
स्मशानात १००० शैतान मावतील अशी एक चिता रचून घ्या. त्यात त्या १००० शैतानांना जाळून त्यांची राख गोळा करा. ही राखरांगोळी होईपर्यंत १००० पालींचे रक्त एका भांड्यात काढून घ्या. ते रक्त वापरून राखेचा एक मानवाकृति पुतळा बनवावा. हातापायांची बोटे बनवू नयेत. पुतळ्याला मगरीच्या कातड्याची त्वचा बसवावी. नीट न बसवल्यास एअर बबल्स राहून अघोरीच्या कपाळावर कायमस्वरुपी आठ्या पडतील. बोटांच्या जागी विंचवांच्या नांग्या जोडाव्यात. जर तुमचे शैतान, शंभर टक्के शैतान असतील तर तुमचा अघोरी निश्चितच हवा तसा चिडचिडा आणि त्रासलेल्या आवाजाचा तयार होईल. घरगुती पालींच्या जागी जर सरडे वापरल्यास अघोरीला कायमस्वरुपी बद्धकोष्ठ असण्याची गॅरेंटी!

आपले विषारीपण सिद्ध करण्याकरिता तो एका नागाकडून स्वतःला चावून घेतो. नाग बिचारा एक्सपायरी डेट उलटलेल्या अघोरीच्या चवीने तडफडून मरतो. अशा रीतिने आपल्या लोकांना मोटिव्हेट करून अघोरी त्या इच्छाधारी कपलला पकडायला बाहेर पडतो.

२.३) बॉस कधीच चुकत नसतो

अखेर आपल्याला प्रथमच सिनेमातल्या स्थळांचा भूगोल बघायला मिळतो. हिमालयाच्या कटआऊटच्या बॅकग्राऊंडवर आणि अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर व पुंगी यांच्या स्वरांवर जॅक आणि मॅड्स नाचत असतात. "तु नाचे मैं गाऊ, मितवा छेड मिलन के गीत" या शब्दांवर जितेंद्र आणि माधवीने भांगडा ते भरतनाट्यम् अशी अफलातून व्हरायटी दिली आहे. सरोज खानला बहुधा रेड्डीकाकांनी "जोपर्यंत ते सापासारखी जीभ लपलप करत आहेत तोपर्यंत एनीथिंग गोज्" असा कानमंत्र दिला असावा. थोड्यावेळाने त्यांना जमिनीवर नाचून कंटाळा येतो मग ते हवेत नाचायला लागतात. मग माधवीला तिच्या लांबसडक केसांचा कंटाळा येतो. त्यामुळे ती एक कडवे छोट्या, कुरळ्या केसांत नाचून घेते. त्यातही फार काही मजा न आल्याने मग ती पुन्हा लांब केस मोकळे सोडून चमकीवाल्या हिरव्या चुड्यात नाचून घेते. जितू इकडे तिकडे उड्या मारायची आणि मधून मधून माधवीला खाली लोळायला लावून तिच्यावरून उड्या मारायची जबाबदारी इमानेइतबारी पार पाडतो.
हे सगळे चालू असताना अघोरी आपल्या सोबत काही गारुड्यांना घेऊन येतो. वॉर्निंग शॉट म्हणून तो त्याचा त्रिशूळ फेकून जॅक आणि मॅड्सचे लक्ष वेधून घेतो. ते दोघे भलतेच चालू असल्याने ते नागरुप धारण करून सुमडीत पलायन करतात. हे नागांचे तेल अघोरी सोबत आलेल्या शमशान घाटच्या मुडद्यांवर काढतो. या नागांना शोधून जर त्यांनी अघोरीसमोर हजर नाही केले तर अघोरी त्यांची खाल उधडून टाकेल. "जय त्रिकालदेव! (३)"

३) सरपटण्यापेक्षा दोन पायांवर पळ काढणे सोपे असते

३.१) "आमच्या इथे अघोरी चावल्यावरची लस टोचून मिळेल" सर्पमित्र चारुदत्त वसुमित्र रे अर्थात चा. व. रे

हा खाल उधडण्याचा क्यू घेऊन एडिटर आपल्या काही सापांची कात वाळत टाकलेली दाखवतो. कुठूनतरी तिथे ऋषी कपूर उगवतो. ऋषीबाळ फारच गुणी बाळ दाखवला आहे. तो त्या गारुड्यांचे प्रबोधन करण्याचा असफल प्रयत्न करतो. इथे पटकथालेखक आपले अर्थशास्त्राचे ज्ञान पाजळतो - साप विकण्यापेक्षा सापांच्या कातीचे चामडे विकणे अधिक फायदेशीर आहे (सेकंडरी सेक्टर जॉब वि. प्रायमरी सेक्टर जॉब). ऋषीबाळ म्हणतो की हे भोलेनाथचे भक्त आहेत असं करू नका. तुमची चामडी कोणी लोळवली तर तुम्हाला कसं वाटेल? यावर ते गारुडी ऋषीबाळाची चामडी लोळवतात. याने बाळ भलताच खवळतो. तो जाऊन एका ओसाड मंदिरात शंकराच्या मूर्तिपुढे आपले गार्‍हाणे मांडतो. पण फार काही घडण्याआधीच त्याला दिसते की गारुडी लोक गठ्ठ्याने नागांच्या मागे लागलेत. मग तो शंकराला त्याच्या भक्तांना (पक्षी: कोणताही नाग) वाचवायचे वचन देतो. चाणाक्ष प्रेक्षकाच्या लक्षात येते की याच्यामुळे अघोरीच्या हातून जितेंद्र/माधवीचे प्राण वाचणार आहेत.

इकडे अघोरीच्या आदेशावरून सुधीर आणि कं. जॅक आणि मॅड्सच्या शोधात असतात. पण पकडलेल्या नागांपैकी एकही नाग इच्छाधारी नसल्यामुळे अघोरी वैतागतो. तो म्हणतो की जाऊन शोधा त्यांना आणि पकडलेल्या नागांचे विष काढून मला द्या. आज मी विषपान करणार आहे. जितेंद्राला आपले जातभाई मारले जात असल्याचे बघवत नाही. तो थेट अघोरीच्या गुहेत जाऊन थडकतो. त्याच्या आवाजाचे पडसाद पुरते पाच सेकंद उमटतात. कान किटल्यामुळे अघोरी बाहेर येतो. बघतो तर काय - हा तर इच्छाधारी नाग! मुडदा स्वतःच शमशान घाटमध्ये आल्याने खुश होऊन तो विकट हास्य करतो. मग त्यांच्यात वाक्-युद्ध रंगते. अघोरी त्याला पेटीत बंद करणार असल्याचे सांगून नसलेल्या पेट्यांमधून हवी ती पेटी निवडायची मुभा देतो. जितेंद्र त्याला "तुझ्या अस्थी बंद करता येतील अशी पेटी चालेल मला" म्हणून अघोरीला उचकवतो. "जय त्रिकालदेव! (४)"

दोघांमध्ये तुंबळयुद्ध (बजेटमध्ये जेवढे तुंबलं तेवढं तुंबळ) होते. कधी नव्हे तो एक इच्छाधारी नाग पुंगीच्या स्वरांमध्ये मदमस्त होण्याआधीच झडप घालून पुंगी फेकून देण्याचा शहाणपणा करतो. अघोरीकडे आग लावणे (शब्दशः), फुंकरीतून वादळ निर्माण करणे, हवेतून तलवार काढणे अशा पॉवर्स असतात. तर जितेंद्राकडे हवेत तरंगणे, फेकलेल्या तलवारीचा हार करणे अशा पॉवर असतात. मानवी रुपात झोंबाझोंबी करून पोट न भरल्याने ते नाग आणि मुंगसाच्या रुपात झोंबाझोंबी करतात. असा विषम सामना असूनही जितू अघोरीवर भारी पडत असतो. तो अघोरीला चावणार इतक्यात मॅड्स येऊन सांगते की "प्रीतम इसे मत डसो." तब्बल २४ मिनिटांनंतर आपल्याला जितेंद्राचे सिनेमातले नाव कळते - प्रीतम. मॅड्स म्हणते की अघोरी आपल्यापेक्षा जास्त विषारी आहे. डॅनीचे समाधान झालेले असल्याने तो हसून जरा हवापाण्याच्या गोष्टी करू बघतो. त्यावर जितेंद्र विषफुंकार सोडतो. ही विषफुंकार कमी आणि फ्लेमथ्रोअरचा ब्लास्ट जास्त आहे. यावर अघोरी कसलं तरी भस्म फेकतो आणि याने धूरच धूर होतो. "जय त्रिकालदेव! (५)". याने म्हणे माधवी जखमी होते. धूराच्या आडोशाने जॅक आणि मॅड्स काढता पाय घेतात आणि अघोरी सगळ्या गारुड्यांना परत त्यांच्या पाठलागावर लावतो.

३.२) रेखा कोणतीही असो, तिला ओलांडून जायचे म्हणजे अग्निपरीक्षा द्यावीच लागते.

ऋषीबाळ आपल्याच तंद्रीत चाललेला असतो. त्याला दगडावर एक अंगाला केचप फासलेला रबरी नाग दिसतो. एका नजरेत त्याला कळते की "ये तो जखमी नागीन हय". तीन चिल्लर गारुडी येऊन त्याला ती नागीण मागतात. ऋषीबाळ झाशीच्या राणीइतक्या बाणेदारपणे सांगतो - नहीं दूंगा! तो त्या नागिणीला आपल्या कासोटीला बांधून पळ काढतो. उतारावर धावत असल्याने तो अपेक्षेप्रमाणे धडपडतो. मग हे गारुडी त्याला काठ्यांनी झोडप झोडप झोडपतात. या नादात त्यांचे लक्ष नसताना एक नाग (हा बहुधा जितेंद्र असावा) त्यांना डसतो. प्रत्यक्षात हे काम आधीसुद्धा होऊ शकले असते पण नागाला "गठ्ठ्याने बडवला जाणारा माणूस कसा दिसतो?" या शोमध्ये रस असावा. या संधीचा फायदा घेऊन बाळ नागीणीला एका सुरक्षित ठिकाणी सोडतो आणि तिचे प्राण वाचवतो.

ही बातमी कळल्यानंतर अघोरीचा राग ऋषी कपूरवर शिफ्ट होतो. तो आधी ऋषी कपूरला मारायचे ठरवतो. इकडे माधवी आणि जितेंद्रची परत गाठभेट पडते. बागेत रोमान्स करायच्या पोजमध्ये माधवी अजूनही माणसांमध्ये माणूसकी शिल्लक आहे या अर्थाचा डायलॉग मारते. जितेंद्रही "हो ना, याला नक्की भोलेबाबाने पाठवले असणार" म्हणत दुजोरा देतो. हे दोघे याचे उपकार न विसरण्याची शपथ घेतात. याचाच अर्थ लवकरच ऋषी कपूरचे कुत्र्यागत हाल होणार आहेत, त्याशिवाय यांना त्याच्या उपकारांची परतफेड कशी करता येईल?

"जय त्रिकालदेव! (६)" अघोरीने भलेही ऋषीबाळाला मारण्याची घोषणा केलेली असली तरी तो अजूनही या नागांना आपल्या सीमेबाहेर निसटू देण्याच्या मूडमध्ये नसतो. मग त्याला पॉवर दाखवायची हौस येते आणि एका रँडम ठिकाणी तो त्रिशूळ जमिनीत रोवतो. त्याच्या ताकदी धरणी दुभंगून एक सीमारेखा तयार होते. त्याच्या म्हणण्यानुसार ही रेखा ओलांडणे जॅक आणि मॅड्स के बस की बात नसते आणि तसेच होते. हे दोघे नागरुपात ती रेखा ओलांडायचा प्रयत्न करतात तेव्हा ती अग्निरेखा असल्याचे कळते. हे बिचारे अघोरीप्रूफ पण नसतात तर फायरप्रूफ कुठून असणार? इच्छाधारी रुपांतरणाच्या नियमांनुसार नागांना रोमान्स/फायटिंग/डायलॉगबाजी या कामांव्यतिरिक्त रुप बदलता येत नसल्याने ते माणूस बनून उडी मारून ती रेखा पार करण्याचा प्रयत्न करत नाहीत. पिंडी ते ब्रह्मांडी या तत्वाच्या करोलरी नुसार शंकराची पिंड कुठेही प्रकट होऊ शकते. या करोलरीमुळे त्या रँडम ठिकाणी हवेतून पिंड अवतरते. मग हे नाग या पिंडीला विळखा घालून तिला ओढत ओढत नेतात. अघोरी आणि त्याच्या शोधपथकाचा मंत्र "आपण बरे आणि आपले काम बरे" असल्याने त्यांना त्यांच्या शेजारून एक पिंड घसरत चालली आहे हे दिसत नाही. हायरार्की मध्ये अग्निदेव शंकराच्या खाली असल्याने तो लगोलग आग विझवतो आणि हे लोक पिंडीसकट ती अग्निरेखा ओलांडतात.

या लोकांनी रेखा ओलांडल्याचा क्यू घेऊन पुढच्या दृश्यात रेखा येणार हे उघड आहे. तरी इथे माझी अल्पकाळापुरती विरामरेखा. त्रिकालदेवाची कृपा होताच उरलेल्या शमशान घाटच्या मुडद्यांबद्दल प्रतिसादांत विस्ताराने लिहितो Proud

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

अरे यातच डॅनीला लोक गिफ्ट म्हणून शॉट ग्लासेसमध्ये विष आणून देत असतात ना? बाकी डॅनी उगीच 'शमशान घाट के मुरदे' वगैरे लांबण लावत बसला. मराठीतल्या बायकांनी केव्हाच त्याचा शॉफॉ 'मुडद्या...' करून टाकला आहे.

Lol महान सुरूवात आहे. हे पहिल्या काही मिनीटांमधे असेल तर पुढचा पिक्चर कसा असेल Happy डोक्याचा भुंगा झाला हे वाचूनच.

जडगंभीर प्रतीकप्रधान मराठी चित्रपटांच्या रसग्रहणात असते तशी म्याक्रोसोश्योइकॉनॉमिक पार्श्वभूमीने केलेली सुरूवात प्रचंड आवडली आहे.

धरणी दुभंगते आणि त्यातून टायटल सीक्वेन्स सुरु होतो >>> इथे वरती उल्लेख आलेले कोणीतरी बंपर पॅकेज वाले पडल्याने का?

तीन ठाकूरसाब ते राजासाब या रेंजमध्ये बसणारे लोक >>>
इंटेरिअर डिझाईनरने सढळ हस्ते कवट्या आणि हिडीस चेहर्‍यांचा वापर केलेला असल्यामुळे >>>
जोपर्यंत ते सापासारखी जीभ लपलप करत आहेत तोपर्यंत एनीथिंग गोज् >>> Biggrin यानंतर वाक्ये कोट करायला शोधणे सोडून दिले. कहर धमाल.

त्वचा बसवताना एअर बबल राहू न देण्याची काळजी घेणे याबद्दल मात्र टोटल रिस्पेट! नशीब चहा घेत नव्हतो. उद्या नवीन कीबोर्ड बसवावा लागला असता. त्या लाइन करता एक स्पेशल _/\_

Lol मस्त मस्त मस्त!!!
श घा के मु चं भारी विश्लेषण.
<<<<<<<<<<<<<<पुतळ्याला मगरीच्या कातड्याची त्वचा बसवावी. नीट न बसवल्यास एअर बबल्स राहून अघोरीच्या कपाळावर कायमस्वरुपी आठ्या पडतील. >>>>>>>> अशक्य भारी आहे. Lol

वा, आता मजा येणार.. अशक्य हसायला मिळणार! आता हा सिनेमा पाहणे आलेच
Lol
Rofl

अती अती भयंकर लिहीता आपण!! एकदा वाचले पण चवीचवीने परत परत वाचणार आहे.+११११११११११११११११११११११११११११११११११११११

अती महा भयंकर छान. !! Biggrin
तुंबळयुद्ध, जितेंद्राचे सिनेमातले नाव कळते - प्रीतम, एक नाग (हा बहुधा जितेंद्र असावा) , इच्छाधारी रुपांतरणाचे नियम.. आणि सर्वात भारी ..."आपण बरे आणि आपले काम बरे"......हे जबरी पंचेस आहेत.
ऑफीस मधे वाचण्याच्या कामाचे नाहीत हे लेख.....बॉस नोटीस देईल!

खतरनाक पायस!

जीतेंद्र आणि माधवीचे ते जिभ लपलपणे शब्दश: कहर आहे. अरे तुम्ही नाग आहात हे एकदा ऑलरेडी एस्टॅब्लिश करुन झालय ना? मग पुन्हा जिभा लपलपून काय सिद्ध करताय? अर्थात हे काहीच नाही असा अचाट प्रकार पुढे आहे. शंकराची पिंड रँडमली कुठेही असू शकते या सिद्धांतानुसार जंगलात दिसलेल्या पिंडीसमोर ऋषीबाळ बासरी वाजवत बसतो. हे सूर कानावर पडल्यावर नाग - नागिण पुन्हा नाचायला हजर असतात.

धनंजय मानेंच्या मदतीला झुरळ आलेले आपण पाहिलेले आहे, इथे ऋषीबाळाच्या मदतीला थेट अस्वल येते आणि मंदाकिनीबाई त्याच्या अंगावर पडतात. ऋषीबाळ महाराजामधल्या गोविंदाचा पूर्वीचा जन्म असल्याने त्याला अस्वलाची भाषा अवगत असते, त्यामुळे मंदाकिनीला मिठाळताना 'कबाब मे हड्डी' नको म्हणून अस्वलाला तिथून फुटण्याची आज्ञा देतो. या सीनमध्ये अस्वलाचा अभिनय पाहण्यासारखा आहे.

पुढे ऋषीबाळाच्या बासरी वादनाने मुंगीपासून ते हत्तीपर्यंतची सगळी जनावरं हजर होतात. हिमालयात वाजवलेल्या बासरीचा आवाज बहुतेक वाटेतला सगळा एरीया कव्हर करुन कन्याकुमारी पर्यंत पोहोचत असावा, कारण हत्ती, बिबळ्या, वाघ, सिंह, अस्वल, याक, मेंढ्या, गाई, घोडे, हरणं - नुसती हरणं नाहीत तर अगदी स्पेसिफीकली बाराशिंगासकट, मोर, राजहंस, कबुतर, माकड आणि अर्थात नाग एव्हढे सगळे प्राणी हजर होतात. त्यातही वाघोबांच्या सेकंदभराच्याच शॉटमध्ये ते आपल्या वाघिणीला चाटून रोमान्स करताना दाखवले आहेत. मंदाकिनी असताना मुद्दाम माकड आलेलं दाखवण्याचं प्रयोजन काय ते माझ्या आकलनशक्तीच्या बाहेर आहे. वास्तविक त्या मंदीच्या भावाच्या आणि इतरांच्या हातात बंदुका पाहून हे पब्लिक शिकारी आहे हे शेमडं पोर देखिल ओळखेल, पण ऋषीबाळाला या सिनेमात अक्कल वापरण्यास मनाई केलेली आहे.

अशक्य लिहिलंय !!!! निखळ करमणूक. चित्रपटाच्या राहिलेल्या भागाबद्दल पण लिहा

reading this is the real entertainment, Thanks ...

सर्वांना धन्यवाद Happy

अरे यातच डॅनीला लोक गिफ्ट म्हणून शॉट ग्लासेसमध्ये विष आणून देत असतात ना? >> हो, हाच तो.
मराठीतल्या बायकांनी केव्हाच त्याचा शॉफॉ 'मुडद्या...' करून टाकला आहे. >> Lol
रिव्हर्स स्वीप >> चांगलं लिहिलंय Happy ऋषी कपूर तसा त्या काळात भरात होता. तरी त्याने असा रोल कसा काय स्वीकारला कोणास ठाऊक?
मंदाकिनी हॅमॉकवर पहुडलेली असताना हातात बंदूक आणि गिटार! लक्ष्मीचा अवतारच जणू ती >> Biggrin

तुनळीवरची आवृत्ती >> यात काही सीन्स मिसिंग आहेत. टीव्हीवर हा अनेकदा पाहिलेला असल्याने आता सिनेमा पाठ आहे पण ते सीन असलेली आवृत्ती काही तुनळीवर दिसत नाही आहे. सिनेमा बघताना तेवढी गोष्ट लक्षात असू द्यावी.

४) असला मेव्हणा नको रे बाबा!

४.१) वस्तु दोन नोटा दोन | समान असे तयांचे मोल |
हे न जो घेई समजोन | तो येक मूर्ख ||

वर नमूद केल्याप्रमाणे रेखाची एंट्री होते. रेखा सिनेमात ऋषीबाळाची मोठी बहीण दाखवली आहे. सिनेमात बाळाला किती भाव आहे याचे उत्तर दिग्दर्शक तिच्या एंट्रीच्या दृश्यात देतो. ती बाहेरगावाहून टांग्यात बसून आलेली असते. मैं प्रेम की दीवानी हूं मधल्या हृतिकला लाजवेल अशा उत्साहाने बाळ "दीदी, दीदी" करत तिला रिसिव्ह करायला जातो. यावर रेखा "हां ठीक हैं" करून त्याच्याकडे ढुंकूनही न बघता घरात पळते. या दोघांना जन्म देणारा महाभाग कोण असा विचार आपण करत असतानाच मृत्युशय्येवरचा सईद जाफ्री दिसतो. चंपा (रेखा) आणि भोला (ऋषीबाळ) यांची जन्मदात्री केव्हाच ढगात गेलेली असल्याचे कळते. सईद जाफ्री रेखाला "यहां धरती फटी जा रही हैं और तुझे तबीयत की पडी हैं" छाप काहीतरी भावनिक उमाळे फेकून मारतो. या सिनेमात लहान-सहान कारणावरून लोकांना धरणी दुभंगण्यात भलताच रस आहे असे दिसते. जाफ्रीसाब पुढे म्हणतात की "बाप लडकी को दहेज देके जाता है, मैं तुझे बोझ देके जा रहा हूं". बाळ यावर कन्फ्युज्ड! रेखा थोडी अधिक हुशार असल्याने तिला काय समजायचे ते समजते. ती या ढिगार्‍याची जबाबदारी घ्यायचे वचन देते. याने खूश होऊन सईद जाफ्री बायकोकडे परलोकाला प्रस्थान करतो.

कट टू रेखाचे सासर! तिचा नवरा म्हणून अनुपम खेर दाखवला आहे. अनुपम खेर पत्ते खेळण्यात मग्न असताना रेखा त्याला मैं प्रेम की दीवानी + कोई मिल गया असे ड्युअल हृतिक पॅकेज डील असलेला त्याचा मेव्हणा इथेच राहणार असल्याचे कळवते. अनुपम खेरचा रोल या सिनेमात मोठा रोचक आहे. हिंदी सिनेमाच्या मापदंडांनुसार त्याच्यात व्हिलनीश गुण असले तरी त्याच्या व्हिलनपणाला एक व्यवहारीपणाची झालर आहे. असे रोल ७०-८० च्या सिनेमांत सहसा दुय्यम कॅरेक्टर्सच्या वाट्याला येत नसत. शैलीत घडत असलेल्या बदलांचा हा एक पुरावा आहे. तर अनुपम खेर व्हिलनीश असल्यामुळे तो मेव्हण्याचा दुस्वास करणार हे उघड आहे. पण त्याची तरी काय चूक? गरीबाघरची मुलगी त्याने बिनहुंड्याची नांदवली (ती रेखा आहे हा मुद्दा आपण कन्व्हिनिअंटली विसरूयात Proud ) आता हा कोई मिल गया त्याने का म्हणून अंगावर घ्यावा? बिचार्‍याला काय माहित रेखा दूरदर्शी असून तेरा वर्षांनंतर मिळणार असलेल्या रोलची तयारी आत्तापासूनच करत आहे.

असो, तर रेखा अनुपम खेरला म्हणते की याला इथे राहू द्या, हा घरची कामे वगैरे करू लागेल. अनुपम खेरचा मित्र (कोणी एक चिल्लर व्हिलनची कामे करणारा नट, याचे नाव आत्ता आठवत नाही पण हा या काळात बर्‍याच सिनेमात छोट्या मोठ्या रोलमध्ये दिसायचा), जो टोटली रेखावर लाईन मारतो, अनुपमला म्हणतो की असू दे रे आपला मेव्हणा आहे, राहू दे त्याला. अनुपम म्हणतो, बरं ठीक आहे. मग त्याला दोन रुपयाच्या दोन नोटा देऊन दोन रुपयाची उकडलेली अंडी आणि दोन रुपयाची डबलरोटी घेऊन यायला सांगतो. पण बाळ आमचा इतका भोळा असतो, इतका भोळा असतो, इतका भोळा असतो की तो विसरतो की कोणत्या नोटेची अंडी आणायची आणि कोणत्या नोटेची डबलरोटी! मग तो तसाच हात हलवत माघारी येतो. यावर अनुपम खेर उखडणं अगदीच समजण्याजोगे आहे. परत त्याचा मित्रच त्याला सल्ला देतो की याला गुरे राखण्याच्या कामावर ठेव, याच्याच्याने तेवढे एकच काम होऊ शकते. अनुपम म्हणतो, बरं ठीक आहे. बाळाला जनावरांसोबत बासरीवादन करायला आवडत असतंच त्यामुळे तोही खुश होतो.

४.२) बासरी वाजवता येत नसेल तर तुम्ही गुराखी होऊ शकत नाही.

बाळ मग मेंढ्याचा कळप चरायला नेतो. हे गाव एखाद्या दूनमध्ये वसलेले असावे कारण शिवालिक टेकड्यांसारखा भूगोल त्या लोकेशनमध्ये बघावयास मिळतो. कपडे मात्र याचे राजस्थानी/जाट स्टाईल असल्याने सगळाच गोंधळ आहे. तर आपल्या सिद्धांतानुसार जंगलातल्या एका रँडम झाडाखाले पिंड अवतरते. बाळाकडे अर्पण करण्याकरिता काही नसल्याने तो बासरी वाजवायला लागतो. बासरीच्या भोकांची उघडझाप केली आणि सुरावटीला साधारण मॅच होईल अशी मान झटकली की हिंदी सिनेमातले कोणतेही पात्र हरिप्रसाद चौरसिया बनू शकते या त्रिकालाबाधित सत्याची सिद्धता मिळते. बासरीच्या स्वरांनी मंत्रमुग्ध होऊन अनेक गुरे गोळा होतात. जॅक आणि मॅड्सला काही कामधंदा नसल्याकारणामुळे ते एका जलप्रवाहापाशी विहार करत असतात. माधवीला ती बासरी ऐकताच समजते की हा आपले प्राण वाचवणारा मनुष्य आहे.
जितेंद्र टू माधवी : लेकिन ये यहां कैसे पहुंच गया?
माधवी टू प्रेक्षक : ये सब मत सोचो

बाळाकडे बासरीतून पुंगीचे स्वर काढण्याचे अफाट कसब असल्यामुळे या दोघांना नाचावेच लागते. जीभ लपलप करून झालेले असल्यामुळे याखेपेला सरोज खानला "जोपर्यंत ते हाताने फण्याचा आकार करत असतील तोपर्यंत एनीथिंग गोज्" सांगितले असावे. मग घटकाभर नाचल्यानंतर दोघे हातात हात घेऊन गोल गोल फिरू लागतात. इच्छाधारी रुपांतरणाच्या नियमांनुसार रोमँटिक पोजमध्ये रुप बदल होऊ शकत असल्याने ते सर्परुप धारण करतात. दोन सापांना एकमेकांना विळखा घालून हवेत तरंगताना पाहून तर माणसेही घाबरतील तर गुरेढोरे घाबरली तर नवल ते काय! बाळाच्या बासरीमुळे गोळा झालेले ते सगळं खिल्लार इतस्ततः पांगते. ते बघून बाळ, जॅक आणि मॅड्स भानावर येतात. पण जे व्हायचे ते झालेच. बाळाकडून सगळी गुरे हरवली आणि आता ही दु:खद बातमी त्याला जाऊन अनुपम खेरला सांगावी लागणार आहे.

मैं प्रेम की दीवानी हूं मधल्या हृतिकला लाजवेल अशा उत्साहाने >>>> Lol
बाळाकडे बासरीतून पुंगीचे स्वर काढण्याचे अफाट कसब >>>>>>>>>> Lol

अनुपम खेरचा मित्र (कोणी एक चिल्लर व्हिलनची कामे करणारा नट, याचे नाव आत्ता आठवत नाही पण हा या काळात बर्‍याच सिनेमात छोट्या मोठ्या रोलमध्ये दिसायचा)
>>>>

त्याचे नाव - जॅक गौड.

तेजाब मधला मुकुटबिहारी, वास्तव मधला फ्रॅक्चर बंड्या आणि 'मेरे करन अर्जुन आएंगे' या भयानक अत्याचारी सिनेमातला नाहर - शमशेर जोडीतला शमशेर.

बाय द वे,
श्रीदेवीचा नगिना हिट झाल्यावर आणि चांदनीमध्ये यश चोप्रांनी रेखाला वगळून तिला घेतल्यामुळे रेखाची सटकली आणि काय वाट्टेल ते करीन पण नागिण बनून राहिन, या हेतूने तिने हा सिनेमा केला असे ऐकलेले होते.

याबाबत जी मध्ये आर्टिकल वाचलं होतं.त्यात शेषनाग मधलं रेखा च्या गाण्याचं पूर्ण शूट वर्णन होतं आणि त्यात रेखाच्या वेगवान स्टेप्स ने तो ड्रेस सारखा उसवत होता असंही होतं.बहुधा त्याकाळी नीट टेरिलीन किंवा पॉलिस्टर मिक्स शिवणाचे धागे नसतील.

त्याचे नाव - जॅक गौड.

तेजाब मधला मुकुटबिहारी, वास्तव मधला फ्रॅक्चर बंड्या आणि 'मेरे करन अर्जुन आएंगे' या भयानक अत्याचारी सिनेमातला नाहर - शमशेर जोडीतला शमशेर.
<<<<<<<
या माहितीबद्दल एक आदरयुक्त नमस्कार. _/\_ मध्ये पायसने ऐलाने जंगमधल्या त्या लोळणाऱ्या सेठचे नाव सांगितल्यावर असाच आदर वाटला होता.

गटणे मोड ऑन -
असा व्यासंग करायची इच्छा आहे माझी.

Pages