समग्र शेषनाग - जय त्रिकालदेव

Submitted by पायस on 4 October, 2018 - 19:33

१९८९ ते १९९१ हा काळ भारतासाठी मोठा धामधूमीचा होता. दोन वर्षात आपण ४ पंतप्रधान बदलले आणि तितक्याच वेगाने आपल्या राहणीमानात बदल स्वीकारले. असे म्हणतात की बदल घडत असताना हा शेवटचा टप्पा सर्वाधिक वादळी असतो. त्या नियमानुसार बॉलिवूडमध्ये या दोन वर्षात के आर रेड्डी नावाचे वादळ आले ज्याने पाप को जलाकर राख कर दूंगा, वीरू दादा, गर्जना सारख्या कलाकृतिंमधून जुन्याची नव्याशी सांगड घालण्याचा प्रयत्न केला. एके दिवशी त्याला दृष्टांत झाला की "हे शमशान घाट के मुर्दे, त्रिकालदेव चाहते हैं की तुम बाकी शमशान घाट के मुर्दों के लिए एक भक्तिरस से भरपूर फिल्म का निर्माण करो. ताकि कलयुग में भटक गए भूले बिसरे वापस राह पर आ सके". तो दिवस बहुधा नागपंचमीचा होता. तत्काळ त्याने शेषनागची निर्मिती केली. नाग जमातीवर तसे सिनेमे तर पुष्कळ येऊन गेले. पण नाग, खजिना, नागमणी, दैवी चमत्कार, रेखाच्या रुपातली माधवी, अमर विषारी तांत्रिक आणि मंदाकिनी असे बंपर पॅकेज केवळ शेषनागच देतो. अशा महान चित्रपटाचे विषामृत वाचकांपर्यंत पोहोचवणे एका व्यक्तिच्या शक्तीपलीकडचे काम आहे. तरी हा विषग्रहणाचा अल्पसा प्रयत्न!

१) शेषनाग सहकारी बँक लिमिटेड

१.१) प्रेक्षक आणि सिनेमा यांमध्ये टायटलरुपी रेखा असते.

पहिल्या काही फ्रेम्समध्येच शेषनागाची कूळकथा अ‍ॅनिमेशन मधून स्पष्ट केली आहे. शेषनागाने पृथ्वीला आपल्या डोक्यावर तोलून धरले आहे असा समज आहे. त्यानुसार मिश्किल हसणारे शेषनागाचे कार्टून पृथ्वी डोक्यावर घेऊन आहे असे दिसते. त्यानंतर प्रेक्षकांकडे वळून बघताक्षणी धरणी दुभंगते आणि त्यातून टायटल सीक्वेन्स सुरु होतो. हा सीक्वेन्स म्हणजे रेखाची नागकन्येच्या वेषातली छायाचित्रे आहेत. इथे अनुभवी प्रेक्षक लगेच सावध होतो. जर टायटल्सची नय्या पार करण्याकरिता सुद्धा रेखाची गरज भासत असेल तर सिनेमाच्या हिरोमध्ये काही फारसा दम नाही.

१.२) आमचे येथे चेक्स फक्त चंद्रग्रहणाच्या दिवशी वटवले जातील

टायटल्स सोबत वाजत असलेले पार्श्वसंगीत अ‍ॅबरप्टली संपून अचानक "ढॅण्ण" आवाज होतो आणि आपल्याला एका गूढ गुहेचे दृश्य दिसू लागते. एक पुजारी आणि तीन ठाकूरसाब ते राजासाब या रेंजमध्ये बसणारे लोक गुहेत प्रवेश करतात. तिघांच्या हातात प्रत्येकी एक पेटारा असतो. आपल्याला लक्षात येते की हे एक भूमिगत मंदिर असून इथे प्रत्येक खांबावर सात फण्यांच्या नागाची नक्षी आहे. मध्ये एक मोठ्ठी पिंड असून त्या पिंडीवर भल्यामोठ्या नागाच्या फण्याचे छत्र आहे. पुजारीच्या सांगण्याप्रमाणे ते लोक आपापल्या पेटार्‍यातून एक चंदेरी रंग दिलेला थर्माकोलचा तुकडा बाहेर काढतात. ते तीन तुकडे जोडले की या पिंड+नागाची छोटेखानी प्रतिकृति तयार होत असते. ती प्रतिकृति विशिष्ट जागी ठेवून पुजारी त्यांना एका बाजूला घेतो. मग चंद्रग्रहण लागते आणि त्या गुहेच्या छताला पडलेल्या भगदाडातून येणारे चांदणे अडवले जाते. गुहेत अंधार होताच त्या मोठ्या फण्यावरचे एलईडी पाकपूक करतात आणि त्या फण्यातून फूत्कार निघाल्यासारखे किरण येतात आणि प्रतिकृतित प्रवेश करतात. हा क्यू घेऊन कुठून तरी दोन नाग सरपटत येतात. ते अनुक्रमे जितेंद्र आणि माधवी असतात. जंपिंग जॅक आणि मॅड्सच्या डोक्यावर नागमणी असतो. आपण का मागे राहावे म्हणून तेही किरणे सोडतात आणि त्या तीनही किरणांचा संगम होऊन धरणी दुभंगते व तिच्या खालचा खजिना दृष्टीस पडतो. मग ते निघून जातात. चंद्रग्रहण सुटते आणि क्षणभरच एक निळसर ज्योत दिसते. पुजारी सांगतो की ती अमरज्योती आहे. मग ते तिघे पोतेभर दागदागिने आणि सुवर्णमुद्रा भरून घेतात. पुजारी त्यांना हे धन गोरगरिबांच्या भल्यासाठी वापरायला सांगतो आणि पुढची खेप पुढच्या चंद्रग्रहणाला मिळेल हे स्पष्ट करतो.

आता खरे तर सिनेमा इथेच संपायला हवा. क्लिअरली मंदिरात ग्रहणसदृश परिस्थिती निर्माण करणे फार काही कठीण कर्म नाही. नागांची दृष्टी अधू असल्याने त्यांना फक्त अंधार की उजेड इतकेच कळते आणि ड्राय आईसच्या मदतीने धूर करणे आणि तापमान कमी करणे सुद्धा अवघड नाही. मग ते आले आणि तो गाडलेला खजिना परत दिसला की हवे तेवढे धन काढून घ्यावे. पण अशी अक्कल सिनेमातल्या लोकांना नसल्यामुळे सिनेमा निष्कारण आणखी अडीच तास लांबतो.

२) व्हिलन की एंट्री

२.१) शमशान घाट के मुर्दे : एक संकल्पना

डॅनी या सिनेमात अघोरी या नावाने व्हिलन दाखवला आहे. अघोरी भलताच तगडा व्हिलन आहे. त्याची ओळख आपल्याला करून घ्यायची आहेच पण तत्पूर्वी आपण "शमशान घाट के मुर्दे" ही संकल्पना समजून घेतली पाहिजे. अघोरीचे मुख्य टार्गेट ती अमरज्योती आहे हे सूज्ञास सांगणे न लगे. आता अघोरी या ज्योतीच्या मदतीने अमर होणार ही त्याच्या दृष्टीने काळ्या दगडावरची पांढरी रेघ! मग बाकी सर्व एके दिवशी स्मशानात जाणार हेही नक्की! त्यामुळे इतरांपासून स्वतःचे वेगळेपण ठसवण्यासाठी तो समस्त मर्त्य मानवांना "शमशान घाट के मुर्दे" असे संबोधत असतो. अननुभवी प्रेक्षकांना अमरज्योतीचे महत्त्व आणि फोरशॅडोइंग कळण्याकरिता या तंत्राचा वापर केला आहे.

२.२) "जय त्रिकालदेव!"

यानंतर आपण दुसर्‍या एका गुहेमध्ये प्रवेश करतो. ही गुहा शेषनागाच्या गुहेपेक्षा भलतीच प्रकाशमान असते. पण इंटेरिअर डिझाईनरने सढळ हस्ते कवट्या आणि हिडीस चेहर्‍यांचा वापर केलेला असल्यामुळे ही गुहा व्हिलनची असल्याचे स्पष्ट होते. जटाधारी डॅनी तरातरा गुहेत घुसतो आणि गुहेच्या मध्यभागी असलेल्या उग्र पुतळ्यापुढे उभा ठाकतो. "जय त्रिकालदेव! (१)" हा या सिनेमातला अघोरीचा संभाषण सुरु करण्याचा प्रोटोकॉल असावा. बुचकळ्यात पाडणारी गोष्ट या त्रिकालदेवच्या मूर्तीचे स्तन लक्षात येतील इतके मोठे आहेत. आता इथे महाकाली किंवा तत्सम देवतेचा वापर का केलेला नाही हे माझ्या आकलनापलीकडचे आहे. असो, तर अघोरी त्या त्रिकालदेवच्या मूर्तीशी बोलायला सुरुवात करतो, नव्हे त्या मूर्तीला धमकवायला लागतो. तो समोरची एक धुनी पेटवतो आणि हातातल्या त्रिशूळाने अंगठा कापून घेतो. जोवर त्रिकालदेव त्याला त्या दोन नागांचा (पक्षी जॅक आणि मॅड्स) पत्ता सांगत नाही तोवर तो या रक्ताने त्या धुनीतली आग विझवणार असतो. ही धमकी असून त्रिकालदेवही मनात हसला असावा. ती जखम कांदा चिरताना बोट चिरले गेले तर होईल तेवढी आहे, बघता बघता रक्त गोठेल. रावणाच्या शिरकमल स्टाईल गोष्टींची सवय असलेला त्रिकालदेव याने कसला प्रसन्न होतोय? अघोरीच्या गँगमधले चिल्लर लोक मात्र लई घाबरतात. उद्या हा टपकला तर रात्रीच्या दोन पेगची सोय कोण करणार?

ही काळजी असल्याने कुठून तरी सुधीर धावत येतो. सुधीर अघोरी गँगचा फ्रान्सहून आयात केलेला मेंबर असावा कारण त्याच्या दाढी मिशा थेट मस्कटिअर छाप आहेत. अघोरी आधी या शमशान घाटच्या मुडद्यावर उखडला असे दाखवतो. आता तो नक्की उखडला का नाही हे सांगणे थोडे कठीण आहे कारण संपूर्ण सिनेमाभर डॅनीचा चेहरा कायमस्वरुपी बद्धकोष्ठ झाल्यासारखा आहे. सुधीर त्रिकालदेवची शपथ घेऊन सांगतो की मी जॅक आणि मॅड्सला मानवी रुपात बघितले आहे (मागून त्रिकालदेव ओरडतो, शपथ घ्यायची तर आईची घे. मला का मध्ये ओढतो?). अघोरी जाम पॉवरबाज तांत्रिक असतो. त्याला सुधीरच्या डोळ्यात त्याने काय बघितले आहे ते सगळे दिसते. बातमी खरी असल्याचे कळल्यावर तो खदाखदा हसतो. "जय त्रिकालदेव! (२)" एक भोळसट मेंबर त्याला विचारतो के हे नाग तर फार विषारी असतात, त्याचं काय करणार आहेस. मग आपल्या डॅनी अघोरी बनवायची रेसिपी सांगतो.

त्रिकालदेवचा अघोरी (संदर्भः शमशान घाटच्या मुडद्यांकरिता सुलभ सैतानी पाककृति)
साहित्यः
१००० शैतान
१००० पाली
१ मगरीचे कातडे
२० विंचू

कृति:
स्मशानात १००० शैतान मावतील अशी एक चिता रचून घ्या. त्यात त्या १००० शैतानांना जाळून त्यांची राख गोळा करा. ही राखरांगोळी होईपर्यंत १००० पालींचे रक्त एका भांड्यात काढून घ्या. ते रक्त वापरून राखेचा एक मानवाकृति पुतळा बनवावा. हातापायांची बोटे बनवू नयेत. पुतळ्याला मगरीच्या कातड्याची त्वचा बसवावी. नीट न बसवल्यास एअर बबल्स राहून अघोरीच्या कपाळावर कायमस्वरुपी आठ्या पडतील. बोटांच्या जागी विंचवांच्या नांग्या जोडाव्यात. जर तुमचे शैतान, शंभर टक्के शैतान असतील तर तुमचा अघोरी निश्चितच हवा तसा चिडचिडा आणि त्रासलेल्या आवाजाचा तयार होईल. घरगुती पालींच्या जागी जर सरडे वापरल्यास अघोरीला कायमस्वरुपी बद्धकोष्ठ असण्याची गॅरेंटी!

आपले विषारीपण सिद्ध करण्याकरिता तो एका नागाकडून स्वतःला चावून घेतो. नाग बिचारा एक्सपायरी डेट उलटलेल्या अघोरीच्या चवीने तडफडून मरतो. अशा रीतिने आपल्या लोकांना मोटिव्हेट करून अघोरी त्या इच्छाधारी कपलला पकडायला बाहेर पडतो.

२.३) बॉस कधीच चुकत नसतो

अखेर आपल्याला प्रथमच सिनेमातल्या स्थळांचा भूगोल बघायला मिळतो. हिमालयाच्या कटआऊटच्या बॅकग्राऊंडवर आणि अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर व पुंगी यांच्या स्वरांवर जॅक आणि मॅड्स नाचत असतात. "तु नाचे मैं गाऊ, मितवा छेड मिलन के गीत" या शब्दांवर जितेंद्र आणि माधवीने भांगडा ते भरतनाट्यम् अशी अफलातून व्हरायटी दिली आहे. सरोज खानला बहुधा रेड्डीकाकांनी "जोपर्यंत ते सापासारखी जीभ लपलप करत आहेत तोपर्यंत एनीथिंग गोज्" असा कानमंत्र दिला असावा. थोड्यावेळाने त्यांना जमिनीवर नाचून कंटाळा येतो मग ते हवेत नाचायला लागतात. मग माधवीला तिच्या लांबसडक केसांचा कंटाळा येतो. त्यामुळे ती एक कडवे छोट्या, कुरळ्या केसांत नाचून घेते. त्यातही फार काही मजा न आल्याने मग ती पुन्हा लांब केस मोकळे सोडून चमकीवाल्या हिरव्या चुड्यात नाचून घेते. जितू इकडे तिकडे उड्या मारायची आणि मधून मधून माधवीला खाली लोळायला लावून तिच्यावरून उड्या मारायची जबाबदारी इमानेइतबारी पार पाडतो.
हे सगळे चालू असताना अघोरी आपल्या सोबत काही गारुड्यांना घेऊन येतो. वॉर्निंग शॉट म्हणून तो त्याचा त्रिशूळ फेकून जॅक आणि मॅड्सचे लक्ष वेधून घेतो. ते दोघे भलतेच चालू असल्याने ते नागरुप धारण करून सुमडीत पलायन करतात. हे नागांचे तेल अघोरी सोबत आलेल्या शमशान घाटच्या मुडद्यांवर काढतो. या नागांना शोधून जर त्यांनी अघोरीसमोर हजर नाही केले तर अघोरी त्यांची खाल उधडून टाकेल. "जय त्रिकालदेव! (३)"

३) सरपटण्यापेक्षा दोन पायांवर पळ काढणे सोपे असते

३.१) "आमच्या इथे अघोरी चावल्यावरची लस टोचून मिळेल" सर्पमित्र चारुदत्त वसुमित्र रे अर्थात चा. व. रे

हा खाल उधडण्याचा क्यू घेऊन एडिटर आपल्या काही सापांची कात वाळत टाकलेली दाखवतो. कुठूनतरी तिथे ऋषी कपूर उगवतो. ऋषीबाळ फारच गुणी बाळ दाखवला आहे. तो त्या गारुड्यांचे प्रबोधन करण्याचा असफल प्रयत्न करतो. इथे पटकथालेखक आपले अर्थशास्त्राचे ज्ञान पाजळतो - साप विकण्यापेक्षा सापांच्या कातीचे चामडे विकणे अधिक फायदेशीर आहे (सेकंडरी सेक्टर जॉब वि. प्रायमरी सेक्टर जॉब). ऋषीबाळ म्हणतो की हे भोलेनाथचे भक्त आहेत असं करू नका. तुमची चामडी कोणी लोळवली तर तुम्हाला कसं वाटेल? यावर ते गारुडी ऋषीबाळाची चामडी लोळवतात. याने बाळ भलताच खवळतो. तो जाऊन एका ओसाड मंदिरात शंकराच्या मूर्तिपुढे आपले गार्‍हाणे मांडतो. पण फार काही घडण्याआधीच त्याला दिसते की गारुडी लोक गठ्ठ्याने नागांच्या मागे लागलेत. मग तो शंकराला त्याच्या भक्तांना (पक्षी: कोणताही नाग) वाचवायचे वचन देतो. चाणाक्ष प्रेक्षकाच्या लक्षात येते की याच्यामुळे अघोरीच्या हातून जितेंद्र/माधवीचे प्राण वाचणार आहेत.

इकडे अघोरीच्या आदेशावरून सुधीर आणि कं. जॅक आणि मॅड्सच्या शोधात असतात. पण पकडलेल्या नागांपैकी एकही नाग इच्छाधारी नसल्यामुळे अघोरी वैतागतो. तो म्हणतो की जाऊन शोधा त्यांना आणि पकडलेल्या नागांचे विष काढून मला द्या. आज मी विषपान करणार आहे. जितेंद्राला आपले जातभाई मारले जात असल्याचे बघवत नाही. तो थेट अघोरीच्या गुहेत जाऊन थडकतो. त्याच्या आवाजाचे पडसाद पुरते पाच सेकंद उमटतात. कान किटल्यामुळे अघोरी बाहेर येतो. बघतो तर काय - हा तर इच्छाधारी नाग! मुडदा स्वतःच शमशान घाटमध्ये आल्याने खुश होऊन तो विकट हास्य करतो. मग त्यांच्यात वाक्-युद्ध रंगते. अघोरी त्याला पेटीत बंद करणार असल्याचे सांगून नसलेल्या पेट्यांमधून हवी ती पेटी निवडायची मुभा देतो. जितेंद्र त्याला "तुझ्या अस्थी बंद करता येतील अशी पेटी चालेल मला" म्हणून अघोरीला उचकवतो. "जय त्रिकालदेव! (४)"

दोघांमध्ये तुंबळयुद्ध (बजेटमध्ये जेवढे तुंबलं तेवढं तुंबळ) होते. कधी नव्हे तो एक इच्छाधारी नाग पुंगीच्या स्वरांमध्ये मदमस्त होण्याआधीच झडप घालून पुंगी फेकून देण्याचा शहाणपणा करतो. अघोरीकडे आग लावणे (शब्दशः), फुंकरीतून वादळ निर्माण करणे, हवेतून तलवार काढणे अशा पॉवर्स असतात. तर जितेंद्राकडे हवेत तरंगणे, फेकलेल्या तलवारीचा हार करणे अशा पॉवर असतात. मानवी रुपात झोंबाझोंबी करून पोट न भरल्याने ते नाग आणि मुंगसाच्या रुपात झोंबाझोंबी करतात. असा विषम सामना असूनही जितू अघोरीवर भारी पडत असतो. तो अघोरीला चावणार इतक्यात मॅड्स येऊन सांगते की "प्रीतम इसे मत डसो." तब्बल २४ मिनिटांनंतर आपल्याला जितेंद्राचे सिनेमातले नाव कळते - प्रीतम. मॅड्स म्हणते की अघोरी आपल्यापेक्षा जास्त विषारी आहे. डॅनीचे समाधान झालेले असल्याने तो हसून जरा हवापाण्याच्या गोष्टी करू बघतो. त्यावर जितेंद्र विषफुंकार सोडतो. ही विषफुंकार कमी आणि फ्लेमथ्रोअरचा ब्लास्ट जास्त आहे. यावर अघोरी कसलं तरी भस्म फेकतो आणि याने धूरच धूर होतो. "जय त्रिकालदेव! (५)". याने म्हणे माधवी जखमी होते. धूराच्या आडोशाने जॅक आणि मॅड्स काढता पाय घेतात आणि अघोरी सगळ्या गारुड्यांना परत त्यांच्या पाठलागावर लावतो.

३.२) रेखा कोणतीही असो, तिला ओलांडून जायचे म्हणजे अग्निपरीक्षा द्यावीच लागते.

ऋषीबाळ आपल्याच तंद्रीत चाललेला असतो. त्याला दगडावर एक अंगाला केचप फासलेला रबरी नाग दिसतो. एका नजरेत त्याला कळते की "ये तो जखमी नागीन हय". तीन चिल्लर गारुडी येऊन त्याला ती नागीण मागतात. ऋषीबाळ झाशीच्या राणीइतक्या बाणेदारपणे सांगतो - नहीं दूंगा! तो त्या नागिणीला आपल्या कासोटीला बांधून पळ काढतो. उतारावर धावत असल्याने तो अपेक्षेप्रमाणे धडपडतो. मग हे गारुडी त्याला काठ्यांनी झोडप झोडप झोडपतात. या नादात त्यांचे लक्ष नसताना एक नाग (हा बहुधा जितेंद्र असावा) त्यांना डसतो. प्रत्यक्षात हे काम आधीसुद्धा होऊ शकले असते पण नागाला "गठ्ठ्याने बडवला जाणारा माणूस कसा दिसतो?" या शोमध्ये रस असावा. या संधीचा फायदा घेऊन बाळ नागीणीला एका सुरक्षित ठिकाणी सोडतो आणि तिचे प्राण वाचवतो.

ही बातमी कळल्यानंतर अघोरीचा राग ऋषी कपूरवर शिफ्ट होतो. तो आधी ऋषी कपूरला मारायचे ठरवतो. इकडे माधवी आणि जितेंद्रची परत गाठभेट पडते. बागेत रोमान्स करायच्या पोजमध्ये माधवी अजूनही माणसांमध्ये माणूसकी शिल्लक आहे या अर्थाचा डायलॉग मारते. जितेंद्रही "हो ना, याला नक्की भोलेबाबाने पाठवले असणार" म्हणत दुजोरा देतो. हे दोघे याचे उपकार न विसरण्याची शपथ घेतात. याचाच अर्थ लवकरच ऋषी कपूरचे कुत्र्यागत हाल होणार आहेत, त्याशिवाय यांना त्याच्या उपकारांची परतफेड कशी करता येईल?

"जय त्रिकालदेव! (६)" अघोरीने भलेही ऋषीबाळाला मारण्याची घोषणा केलेली असली तरी तो अजूनही या नागांना आपल्या सीमेबाहेर निसटू देण्याच्या मूडमध्ये नसतो. मग त्याला पॉवर दाखवायची हौस येते आणि एका रँडम ठिकाणी तो त्रिशूळ जमिनीत रोवतो. त्याच्या ताकदी धरणी दुभंगून एक सीमारेखा तयार होते. त्याच्या म्हणण्यानुसार ही रेखा ओलांडणे जॅक आणि मॅड्स के बस की बात नसते आणि तसेच होते. हे दोघे नागरुपात ती रेखा ओलांडायचा प्रयत्न करतात तेव्हा ती अग्निरेखा असल्याचे कळते. हे बिचारे अघोरीप्रूफ पण नसतात तर फायरप्रूफ कुठून असणार? इच्छाधारी रुपांतरणाच्या नियमांनुसार नागांना रोमान्स/फायटिंग/डायलॉगबाजी या कामांव्यतिरिक्त रुप बदलता येत नसल्याने ते माणूस बनून उडी मारून ती रेखा पार करण्याचा प्रयत्न करत नाहीत. पिंडी ते ब्रह्मांडी या तत्वाच्या करोलरी नुसार शंकराची पिंड कुठेही प्रकट होऊ शकते. या करोलरीमुळे त्या रँडम ठिकाणी हवेतून पिंड अवतरते. मग हे नाग या पिंडीला विळखा घालून तिला ओढत ओढत नेतात. अघोरी आणि त्याच्या शोधपथकाचा मंत्र "आपण बरे आणि आपले काम बरे" असल्याने त्यांना त्यांच्या शेजारून एक पिंड घसरत चालली आहे हे दिसत नाही. हायरार्की मध्ये अग्निदेव शंकराच्या खाली असल्याने तो लगोलग आग विझवतो आणि हे लोक पिंडीसकट ती अग्निरेखा ओलांडतात.

या लोकांनी रेखा ओलांडल्याचा क्यू घेऊन पुढच्या दृश्यात रेखा येणार हे उघड आहे. तरी इथे माझी अल्पकाळापुरती विरामरेखा. त्रिकालदेवाची कृपा होताच उरलेल्या शमशान घाटच्या मुडद्यांबद्दल प्रतिसादांत विस्ताराने लिहितो Proud

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

नागीणीची चिडचिड अवस्था, क्यूं अपने बाप को नही देखा?" ,अडी वे अडी.... बा हा री ..!!! मस्त पंचेस...
पण प्रेक्षकांचे नक्की केव्हा रेखा आणि केव्हा मॅड्स यात कंफ्युजन नाही होत का? त्या म्युच्युअली कंव्हर्टिबल असतात का?

>>बाळ म्हणतो की मला एक परी भेटली, तिचा रंग म्हशीच्या दूधासारखा होता पण तिला पंख नव्हते. कदाचित एखाद्या राक्षसाने ते कापले असावेत. हे ऐकल्यावर जितेंद्र गिव्ह अप मारतो "भोला तू वाकई भोला हैं रे"<< आवरा...... पायस खरं सांग तो खरंच असं म्हणतो ?? आय मीन, म्हशी च्या दुधाची उपमा !!!!! तरी बरं रत्नांग्री च्या तुर्तास गाभण असलेल्या समस्त म्हयशी आणि त्यांचे दुध ॠ-बाळ ने पाहिले नव्हते Lol Lol

पायस खरं सांग तो खरंच असं म्हणतो ?? आय मीन, म्हशी च्या दुधाची उपमा>>> हो हो, असे खरेच आहे, कालच हा सीन पाहिला टीव्हीवर!

तू खर खर सांग कितीवेळा पिच्चर पाहिला ते >> कमीत कमी दहा वेळा Proud

रेखा आणि केव्हा मॅड्स यात कंफ्युजन नाही होत का? >> त्यांच्या टिकल्या!. नॉर्मल रेखा अतिशय नॉर्मल टिकली लावते. मॅड्सची रेखा रमोला सिकंद/कोमोलिका/राजेश्वरी मेहरा वगैरे बायांना टफ देईल अशा टिकल्या लावते.

पायस खरं सांग तो खरंच असं म्हणतो ?? >> हो Lol आणि अगदी खरं खरं सांगतो, ही उपमा तो सिनेमात एकदा सोडून दोनदा वापरतो.

८) अघोरपंथी तांत्रिक जर प्रॉडक्ट डेव्हलपमेंटमध्ये इन्व्हॉल्व्ह्ड असेल तर कंपनीला टेक सपोर्टची गरज भासत असेल काय?

८.१) हिरो-हिरोईनच्या प्रेमात विघ्ने येत नसतील तर व्हिलनला ताबडतोब परत आणावे

मार खाऊन ऋषी कपूर घरी परततो. त्याला आपल्यावर विश्वास ठेवून आलेले सर्व प्राणी मारले गेल्याचे वैषम्य वाटत असते. तो परत कधीही बासरी वाजवणार नसल्याचे रेखा आणि जितेंद्रला सांगतो. तिकडे दारावर टकटक होते. रेखा जाऊन बघते तर दारात मंदाकिनी असते. भोलाच्या बासरी न वाजवण्याच्या बेतात काही अर्थ नसल्याचे तिच्या हातातली बासरी सांगते. ती स्वतःची ओळख करून देते, इथे रझा मुरादचे नाव सेठ लालचंद असल्याचे कळते. मंदाकिनीला ऋषीला भेटायचे असते. रेखा विचारते कशाला, तर ती सांगते की माझं त्याच्यावर प्रेम आहे आणि मला ही बासरी त्याला द्यायची आहे. रेखा म्हणते की तुझ्याप्रेमामुळे हा मारला जाईल तरी तू याला विसर. आता ही नागिण असल्यामुळे हे तिला संमोहन वापरून सुद्धा साध्य करता आले असते. पण या सिनेमातल्याच काय, एकंदरीत बहुतांश बॉलिवूडमधल्या इच्छाधारी नागांना संमोहन वापरता येत नाही. राज कॉमिक्सवाला नागराज वगळता सातत्याने संमोहन वापरणारा एकही इच्छाधारी नाग मला अजून सापडलेला नाही. असो, मंदाकिनी खट्टू होऊन, बासरी रेखाकडे देऊन निघून जाते. रेखा दार बंद करते न करते तोवर मागून जितेंद्र येतो. तो म्हणतो कोण होतं. रेखा सांगते की भोलाची परी होती, मी तिला परत घालवून दिले. जितेंद्र प्रेक्षकाच्या मनातला प्रश्न विचारतो - का? आता खाल्ला त्याने मार, पण एवढं काय बिघडलं? मग ती सांगते की तिचे वडील सेठ लालचंद आहेत आणि त्यांचा गुरू आहे अघोरी! (हे कळण्याची अतिंद्रिय शक्ती मॅड्सची आणखी एक पॉवर)

जय त्रिकालदेव! (७) तब्बल पन्नास मिनिटे अघोरीपासून प्रेक्षकांना दूर ठेवल्यानंतर दिग्दर्शकाला लक्षात येते की सिनेमा अघोरीच्या जीवावर चालला आहे, त्याला परत सेंटर स्टेजवर आणावेच लागेल. वन फाईन डे, जेव्हा रझा मुराद आणि डॅन धनोआ टाईमपास करत बसलेले असतात तेव्हा अघोरी रझा मुरादच्या घरी येऊन थडकतो. डॅन धनोआ अर्थात विक्रमची अघोरीशी ओळख करून दिली जाते. अघोरी त्याला "सर्वनाशसे बचना हैं तो अघोरी के पांव छूते रहो" असा प्रेमळ आशीर्वाद सुद्धा देतो. जसा मृत्यु आगाऊ वर्दी देऊन येत नसतो तसा अघोरीही न सांगता कधीही उगवत असतो. "मौत और बदनसीबी, दो ही ऐसी चीजें हैं जो बगैर खबर किए आती हैं" अघोरी बदनसीबी बनून आलेला असतो. त्याला कुठूनतरी सुगावा लागलेला असतो की जॅक आणि मॅड्स याच प्रदेशात आहेत. विक्रम त्याच्या खराब इंग्रजीत ड्वायलॉक मारतो की हे इच्छाधारी नाग फारच विषारी असतात. डॅनी मग प्रेक्षकांच्या वतीने त्याच्या इंग्रजीचे वाभाडे काढतो - "ये किस शमशान की भाषा में बात की हैं तुने?" त्या घरात एक नाग असतो (बहुधा जितेंद्र). अघोरीला त्याचा शब्दशः वास येतो. हे बघून नाग पळ काढतो. घराच्या वरच्या मजल्यावरून मंदाकिनी आणि बाहेरून ऋषी कपूर येतो. अघोरीला ऋषी कपूरपासूनही सापांचा वास येतो पण तो तसे स्पष्ट बोलून दाखवत नाही. ऋषी कपूरला तो विचारतो की तुला कोणी इच्छाधारी नाग दिसले आहेत का? ऋषी म्हणतो नाही. अघोरी वैतागून निघून जातो.

ऋषी कपूर मंदाकिनीचे आभार मानायला (नव्या बासरीबद्दल) आणि भेट म्हणून एक ससा द्यायला आलेला असतो. विक्रम त्याला इंग्रजीत शिव्या देतो. ऋषी बाळ त्याला हिंदीत शिव्या द्यायची धमकी देतो. शिव्यांची भोक्ती नसल्याने मंदाकिनी दोघांना गप्प करून ऋषीला आपल्या खोलीत घेऊन जाते. इथे सगळे गोग्गोड दाखवायचे असल्याने मंदाकिनीला गुलाबी कपडे आणि मिनी माऊस स्टाईल बो दिला आहे. ती त्याला म्हणते सॉरी तुला शिव्या ऐकून घ्याव्या लागल्या. तो म्हणतो अरे तुझ्यासाठी "गाली तो क्या मैं गोली भी खा सकता हूं". बिचारीला त्याच्याकडून एवढ्या हिंमतीची सुद्धा अपेक्षा नसते. ती लगेच त्याला गालावर किस करते. तोही तिला गालावर किस देऊन त्याची परतफेड करतो. बंद दाराबाहेरून या पप्प्या ऐकत असलेला विक्रम याने उखडतो पण हात चोळत बसण्याखेरीज त्याच्याकडे पर्याय नसतो. भोला-कामिनी जोडी जुळली.

८.२) व्हिलन प्रोअ‍ॅक्टिव्हली काही करत नसेल तर सेमी-व्हिलन पात्रालाही परत आणावे

इकडे नागरुप त्यागून जितेंद्र परत घरी पोहोचतो. तो म्हणतो "भानू, अघोरी सेठ लालचंद के यहां पहुंच चुका हैं और उसे पता चल चुका हैं की हम लोग इसी इलाके में हैं". इथे प्रेक्षकाची "भानू, भानू कौन है? ये भानू कौन हैं?" (भावनांसहित अनुभवण्यासाठी दिलेल्या दुव्यावर टिचकी मारा) अशी अवस्था होते. तब्बल ७८ मिनिटांनंतर कळते की मॅड्सचे सिनेमातले नाव भानू आहे. तो म्हणतो की इथे राहण्यात खतरा आहे तर आपण निघूयात. ती म्हणते की नाही, भोलाला आपली गरज आहे. आपल्या परोपकारी बायकोचा अभिमान वाटून तो तिला आलिंगन देतो. दुर्दैवाने हे सज्जातून ऋषी बाळ बघतो.

एका नोकराने आपल्या बहिणीसोबत लप्पाझप्पा केल्याचे त्या शमशान घाटच्या मुर्द्याला सहन होत नाही. रागारागात तो तलवारीच्या सरावादरम्यान जितेंद्रावर वार करतो. त्याचा हा फालतूपणा बघून रेखा त्याच्या दोनवेळा मुस्काटात वाजवते. तो रागावून निघून जातो. जितेंद्र म्हणतो की जाऊ दे गं, बाळ रुसलंय. त्याला काय माहित की काय वादळ येणार आहे? बाळ तरातरा जातो तो थेट आठवड्याच्या बाजारात. तिथे अनुपम खेर काहीतरी खाद्यपदार्थ चोरण्याच्या बेतात असतो. प्रथमदर्शनी तो खाद्यपदार्थ लाडू वाटू शकतो. पण शेजारीच निखारे, चूल वगैरे जामानिमा ज्या प्रकारचा आहे ते बघता ती लिट्टी असण्याची सुद्धा शक्यता आहे. म्हणजे आपण दक्षिणेकडे सरकायचे थांबून आता पूर्वेकडे सरकत आहोत. शेवट शेषनागच्या गुहेत होणे बंधनकारक असल्याने बहुधा बिहारमधून पुन्हा उत्तरेला सरकून सिक्कीममध्ये कुठेतरी शेवट होईल असे दिसते. म्हणजे शेषनागची गुहा सिक्कीममध्ये कुठेतरी असावी. अघोरीच्या भूमिकेत डॅनीला का घेतले याचा इथे खुलासा होतो.

असो, तर बाळाला अनुपम खेर दिसतो. अनुपम खेर, म्हणजे बन्सी फारच बकाल अवस्थेत असतो. तो लगेच पश्चात्ताप व्यक्त करतो. भोलाकडे पैसे आहेत हे कळल्यानंतर तो त्याला एक शेर लाडू मागतो. भोलासुद्धा त्वरेने त्याची मागणी पूर्ण करतो. एक शेर लाडू अनुपम खेर एकटा कसे काय खातो हे दृष्य मात्र आपल्याला बघावयास मिळत नाही. कारण भोला त्याला सांगतो की दीदी जिवंत आहे. घर, बायको आणि पैसा, तिन्ही मिळाल्याने बन्सीला हर्षवायू होतो. तो म्हणतो लाडू राहू देत, आधी घरी जाऊन रेखाला भेटू. ते दोघे घरी पोहोचतात तर रेखाचे बदललेले रुप बघून अनुपम खेर खुळाच होतो. मधल्या अर्ध्या तासात आपली फियाट मर्सिडीज कशी काय झाली? मॅड्स आपली पॉवर वापरून अनुपमने उधळलेले रंग फ्लॅशबॅकमध्ये बघते. ती म्हणते की तू तर मला (पक्षी रेखाला) जुगारात हरला. आता तुला माझ्या नवर्‍याचे कोणतेही अधिकार नाहीत. महाभारताचा आणखी एक संदर्भ फेकायचा म्हणून अनुपम खेर म्हणतो की पांडवसुद्धा द्रौपदीला हरले होते, तरी ते तिचे पती राहिलेच ना! त्यात ऋषी कपूर सध्या जितेंद्राच्या मुद्द्यावरून रूष्ट असल्यामुळे तो याला ठेवून घ्यायचा हट्ट धरतो. रेखा म्हणते, बरं ठीक आहे.

८.३) व्हिलनचे संवाद आणि डायलॉग डिलीव्हरी दर्जेदार असेल तर सीन कसाही असो "माशाल्लाह, छा गए गुरु" ची दाद येतेच!

रेखा त्याला जेवायला वाढते. मधल्या काळात काय घडले याची बातमी नसलेला अनुपम खेर साहजिक आपल्या तथाकथित बायकोसोबत फ्लर्ट करू बघतो. पंगतीस उपस्थित मेव्हणा बावळट असणे त्याच्या पथ्यावरच पडते. तेवढ्यात जितेंद्र पडवळ आणि दुधी भोपळे घेऊन परत येतो. अनुपम आणि त्याची ओळख करून दिली जाते. अनुपम म्हणतो की आपल्याला नोकर नको, मी किंवा ऋषी घरातली कामे करू. यावर रेखा त्याचा शेलक्या शब्दात अपमान करते आणि जितेंद्रला आपण कामावरून काढणार नसल्याचे ठणकावून सांगते. अनुपमचे फ्लर्टिंग बघून जितेंद्राचा पण मूड बनतो. तो रेखाच्या खोलीत जाऊन तिला म्हणतो की मजा आहे राव तुझी, दोन दोन नवरे! "इन्सान बनने का यहीं तो फायदा हैं" - जितेंद्राचा हा डायलॉग ऐकून समस्त विवाहित स्त्रियांनी टीव्ही किंवा नवर्‍याचे डोके यापैकी एक काहीतरी नक्की फोडले असावे. मॅड्ससुद्धा कमी नसते. ती म्हणते, तू पण मानवरुपात आहेस. तू ठेव हजार बायका, माझ्यावर का जळतोस? जॅकला अनुपम खेरला चावायचे असते पण मॅड्स म्हणते की असे करता कामा नये. आपल्याला भोलाने नवीन जीवन दिले आहे तर आपण त्याची परतफेड केली पाहिजे. भोलाने यांना नवीन जीवन कसे दिले हे मला अजूनही समजलेले नाही.

इकडे अघोरी त्रिकालदेवासमोरचे अग्निकुंड पेटवून, त्यात अनेक हातांची आहुती देऊन साधना करत बसलेला असतो. रझा मुराद आणि डॅन धनोआ त्याच्यासाठी भेट म्हणून शंभर नागांचे विष एका बाऊलमध्ये घेऊन आलेले असतात. इथेच तो फेमस डायलॉग आहे "सौ नागों का जहर! इससे तो मेरा एक दात भी गीला नही होगा. फिर भी पी लेता हूं". असे म्हणून अघोरी त्या विषाचा शॉट मारतो. मग तो सुधीरकडे वळतो. इथे आपल्याला तब्बल ऐंशी मिनिटानंतर सुधीरचे नाव जगनजीत असल्याचे कळते. सुधीर म्हणतो की आपल्या लोकांनी पाचशे नाग पकडले पण त्यातला एकही इच्छाधारी नव्हता. अघोरी म्हणतो की मग त्यांचं विष काढून मला दे आणि कातडी काढून रझा मुरादला दे. रझा मुराद ही बातमी ऐकूनही फारसा खुष दिसत नाही. अघोरी विचारतो की काय झालं? रझा मुराद सांगतो की मला मंदाकिनीचे लग्न डॅन धनोआशी लावून द्यायचं आहे पण ती त्या गावठी पोराच्या प्रेमात पडली आहे. इथे अघोरी आपल्यासाठी फिलॉसॉफी झाडतो - "चिंता और चिता में केवल एक बिंदु का अंतर हैं". तो रझा मुरादची चिंता संपवण्याचे आणि ऋषी बाळाची चिता रचण्याचे आश्वासन देतो.

आपल्याला भोलाने नवीन जीवन दिले आहे तर आपण त्याची परतफेड केली पाहिजे. भोलाने यांना नवीन जीवन कसे दिले हे मला अजूनही समजलेले नाही. >> अरे असं कसं.. सुरुवातीला नाही का भोला नागिणजीको बचानेके लीए गुंडोसे पीटता है पर नागिण को कुछ नही होने देता और सुमडीमे उसको छोडके बचाता है ही त्याच नविन जीवनाची / नवजीवनाची बात करत असते..म्हणुन तर भोला के लीए सबकुछ ही कसम रेखा मन लावून पाळत असते रादर दॅन जॅक.. जा अकराव्यांदा पाहून ये पिच्चर.. Proud

"ये किस शमशान की भाषा में बात की हैं तुने?" ..... Happy प्रत्येक स्मशानांच्या भाषाही वेगवेगळ्या असतात ही नवी माहिती मिळाली. भीतीदायक म्हणजे नाग- साप, शमशान, मुडदे, कवट्या, अंधारात हेलकावणारे दिवे....असे सगळे वातावरण असणारा हा खूपच चित्त थरारक सिनेमा ए!!

"इन्सान बनने का यहीं तो फायदा हैं" !! Biggrin
मोस्ट एंटरटेनिंग व मसाला मूव्ही म्हणून पारितोषिकासाठी याचा विचार का नाही झाला?

Rofl
डॅनी मग प्रेक्षकांच्या वतीने त्याच्या इंग्रजीचे वाभाडे काढतो - "ये किस शमशान की भाषा में बात की हैं तुने?" >>>>> Lol
"भानू, भानू कौन है? ये भानू कौन हैं?" ची लिंक भारी Lol
भुगोल आणि अघोरीच्या भूमिकेत डॅनीला का घेतले याचा इथे खुलासा>>>> भारीच

म्हणजे आपण दक्षिणेकडे सरकायचे थांबून आता पूर्वेकडे सरकत आहोत. शेवट शेषनागच्या गुहेत होणे बंधनकारक असल्याने बहुधा बिहारमधून पुन्हा उत्तरेला सरकून सिक्कीममध्ये कुठेतरी शेवट होईल असे दिसते. म्हणजे शेषनागची गुहा सिक्कीममध्ये कुठेतरी असावी. अघोरीच्या भूमिकेत डॅनीला का घेतले याचा इथे खुलासा होतो-> Happy

सुरुवातीला नाही का भोला नागिणजीको बचानेके लीए गुंडोसे पीटता है पर नागिण को कुछ नही होने देता और सुमडीमे उसको छोडके बचाता है >> अरे तिचा टोन रुपकात्मक आहे. सॉर्ट ऑफ त्या स्काय शॉपवाल्यांसारखं - "पहले हम बहुत दुखी थे. अघोरी के डर के मारे दर दर की ठोकरे खाते फिरते थे. पर जबसे भोला आया हैं तबसे रहने को घर और दो वक्त की रोटी मिली हैं. भोला को ऑर्डर करने के लिए तुरंत कॉल लगाए ८८८-८८८-८८८८ पर. कॉल की चार्जेस पे शर्ते लागू". पण हा तशा अर्थाने त्याने नवे जीवन दिलं ते बरोबर आहे.

९) व्हिलन आणि हिरोमधली पहिली फाईट शक्यतो व्हिलनने जिंकावी. याने क्लायमॅक्सला हिरो जिंकला की त्याचा प्रभाव जास्त जाणवतो

९.१) प्रसंग कितीही बाका असला तरी नाचगाण्यात खंड पडता कामा नये

इकडे अनुपम खेरला बायकोच्या अंगचटीला जायचा मूड आलेला असतो. रेखारुपी मॅड्स त्याला झिडकारते. पण इतके दिवस तिचं ऐकून घेतल्यानंतर तो येरे माझ्या मागल्या करून जबरदस्ती मोड स्विच ऑन करतो. मॅड्स त्याला आपण रेखा नसून नागिण आहोत याचा क्लू काही फ्रेम्सपुरता देते पण त्याला तो भास वाटतो. त्याचे अती झाल्यावर हिची चिडचिड अवस्था जागृत होते. जितेंद्रला अनुपम खेरच्या जीवाची काळजी असल्याने तो मध्ये पडतो आणि त्याचे मरण किरकोळ फटक्यांवर निभावतो. दुर्दैवाने ऋषी कपूर बाहेरून त्याच वेळेला परत येतो. याला आपल्या जीजाजीचा भलताच पुळका असतो. तो म्हणतो की यातर घरात जितेंद्र राहिल नाहीतर मी! जितेंद्र तरी या खुळ्याला किती डोक्यावर चढवणार? तो मॅड्स नको नको म्हणत असतानाही घर सोडून जातो. मॅड्स याने भलतीच दु:खी होते. इथे घरातले नाग थीमचे इंटिरिअर बघण्याची संधी. नागरुप घेऊन जितेंद्र रेखाच्या खोलीत परत येतो. तिला याच्या विरहाची कल्पना सहन होत नसते आणि पहिल्यांदाच आपण नको तो उद्योग करून ठेवल्याची जाणीव होते. बाहेरून अनुपम खेर हिच्यावर लक्ष ठेवून असतो. त्यामुळे जॅक तिला दुसर्‍या दिवशी जंगलात भेटण्याचे वचन देऊन पसार होतो. गाण्याची वेळ झाली आहे हे आता कोणीही सांगू शकेल. त्यानुसार नाचण्यासाठी ते सूचिपर्णी वृक्षांच्या बनात भेटतात.

"हमें आसमान ने भेजा इस जहान में, जाओ एक दुसरे से प्यार करो, कभी मैं तुम्हारा रस्ता देखू, कभी तुम मेरा इंतजार करो" अशा लांबलचक ध्रुवपदाचे गाणे आहे. इथली एक स्टेप बघितल्यावर आपल्याला कळते की सोनम कपूरने आपल्याला दिल्ली ६ मध्ये गंडवलं. तिने कबूतराची म्हणून जी मसक्कली स्टेप केली आहे ती तर इच्छाधारी नागांची स्टेप आहे. रेखाला मॅड्सचे कपडे देऊन या गाण्यात नाचवलं आहे. दुसर्‍यांदा सिमिलर स्टेप पाहिल्यानंतर लक्षात येते की या दोघींच्या भरतनाट्यम् अडवू मध्ये जितेंद्र सातत्याने आडवा जातो. जसे मेसच्या भाज्यांमध्ये भरीला म्हणून कशातही बटाटा घालतात तसे संपूर्ण गाण्यात "ओ ओ ओ आ आ आ आ" आहे. मध्ये मध्ये तोंडी लावायला लोणचे असावे तसे रेखाच्या जागी मॅड्स नाचते. संपूर्ण गाण्यात हे लोक एकमेकांना हाताचा फणा काढून डसत राहतात. जसे लग्नाच्या पंगतीला दहा मूद साखरभात खाल्ल्यानंतरही "छे छे शेवटच्या घासासाठी मठ्ठ्यात जिलबी बुडवून खाल्ल्याशिवाय कधी ताटावरून उठतात होय?" छाप मजा आणली जाते. तसे रेड्डीकाकांचे पोट एवढ्याने भरत नाही. मग मॅड्स आणि रेखा दोघी एका फ्रेममध्ये नाचतात. कोलाज शॉट्सचाही गाण्यात सढळ हस्ते वापर आहे. जितेंद्राच्या चेहर्‍यावर गाण्यात बहुतांशी वेळा असे भाव आहेत. दोन आसुसलेल्या जीवांचा आत्मा शांत झाल्यावर गाणे संपते.

९.२) कफन कापसाचेच असते, नायलॉनचे नाही. आपल्याला आत्म्याला मुक्ती द्यायची आहे, त्याच्या गळ्यात बंध नायलॉनचे मारून त्याचा छळ नाही करायचा.

अनुपम खेर भरपूर दारू ढोसून घरी परततो. तो ठरवतो की काय वाट्टेल ते होईल आजची रात्र आपली! मॅड्स जॅकबरोबर डॅन्स करायला गेलेली असल्यामुळे बेडरूमचे दार आतून बंद असते. मग अनुपम दाराच्या वरती असलेल्या गवाक्षातून आत डोकावतो. डॅन्स संपवून मॅड्स नागरुपात नुकतीच परतलेली असते. तिला नागरुपातून रेखामध्ये बदलताना पाहून त्या शमशान घाटच्या मुर्द्याची बोबडी वळते. त्यात घरातले सगळे स्नेक म्युरल्स जिवंत नागात बदलताना पाहून त्याची खाडकन उतरते. मग तो वेड्यासारखा धावत सुटतो. "जो डर गया समझो मर गया" या उक्तीनुसार तो स्मशानात जातो. तिथे अघोरी स्मशानसाधना करत बसलेला असतो. हा अघोरीला जाऊन धडकतो. आपली साधना भंग पावल्याने अघोरी चिडतो. भयातिरेकाने तो माफी मागता मागता अघोरीकडे झाला सर्व प्रकार विदित करतो. त्याची कथा ऐकल्यानंतर अघोरीला मॅड्स कुठे आहे ते कळते. तो अनुपमला आश्वस्त करून घरी जायला सांगतो.

या प्रकारापासून अनभिज्ञ मॅड्स रेखाच्या रुपात बागेतल्या शेषनागाच्या मूर्तीची पूजा करत असते. "जय त्रिकालदेव! (८)" अघोरी तिथे येतो. ती लगेच बॅटल मोडमध्ये येते म्हणजे तिचे डोळे घारे होतात. तो म्हणतो की तू मनुष्यांना डसतेस, माझ्या गारुड्यांना तू आणि जॅकने मारलं. ती म्हणते तू माणूस नाहीस कारण तुला दिल (पक्षी हृदय) नाही. हा रिव्ह्यू अघोरीने लिहायला हरकत नव्हती. त्याचे उत्तर ऐका - "बेवकूफ हैं तू. दिल, सीने में खून साफ करने का एक यंत्र होता हैं. जो हमारे सीने में भी हैं." तोवर तिथे जॅकसुद्धा येतो. अघोरी त्या दोघांना पकडून नेणार असल्याचे सांगतो. मग वाक् युद्ध रंगते. अघोरीच्या जीभेवर त्रिकालदेव तांडव करतो आहे. वानगीदाखल नमुना "कपास का कोई ऐसा पौधा आजतक पैदा नही हुआ, जिसकी रुई से अघोरी का कफन बनाया जा सके." एकदाचा अघोरी आपला अंतस्थ हेतु - चंद्रग्रहण, अमर व्हायचं आहे - उघड करतो. "जय त्रिकालदेव! (९)". जॅक आणि मॅड्सकडे एक छोटी शेषनागाची मूर्ती असते. ते दोघे तिला धरतात तर तिच्यातून लाल रंगाची किरणे निघतात. त्यासमोर अघोरीचे काही एक चालत नाही. टॅक्टिकल माघार घेण्यातच आपले भले आहे हे ओळखून तो तात्पुरता परत जातो. याचा अर्थ असा नाही की त्याला आपला पराजय मान्य आहे. तो परत आपल्या गुहेत जातो आणि थेट त्रिकालदेवच्या तळपायात त्रिशूळ फेकून मारतो. त्रिशूळाचा दांडा त्या मूर्तीच्या पायात रुततो. मग मारकुट्या नजरेने बघत अघोरी आपला हात त्रिशूळाच्या शूलांवर दाबतो. मग निघालेले रक्त त्रिकालदेवच्या गालांना फासतो. "ले कर ले सिंगार, मना ले खुशियां, तेरा भक्त आज हार गया हैं. तेवढ्यात त्याला सुधीर येऊन सांगतो की ज्या भोलाने नागिणीला वाचवले होते, तो सध्या याच प्रदेशात वास्तव्य करून आहे. अघोरीच्या चेहर्‍यावरचे हिंस्त्र भाव बघता बाळाची काही धडगत नाही.

९.३) हिरोला वाचवण्यासाठी "दवा की नही दुवा की जरूरत होती है."

इकडे मंदाकिनी नटून थटून ऋषी कपूरला भेटायला निघालेली असते. तिला रझा मुराद वाटेतच अडवतो. तो तिला निक्षून सांगतो की तुझं लग्न विक्रम सोबतच होईल, त्या भोलाला तू विसर. चौकस वृत्तीची ती बालिका प्रत्येक प्रश्नावर "का" विचारत राहते. तिच्या "का का" ला रझा मुराद वैतागतो, पोरगी आहे का कावळा? तो तिला म्हणतो की या कोठीचे काही नियम आहेत, त्यानुसार तुला विक्रम सोबतच लग्न करावं लागेल. ती म्हणते की तुमचा आर्थिक फायदा आहे म्हणून तुम्ही माझं लग्न याच्याशी लावून देता आहात. तो म्हणतो बरं मग? आहे माझा फायदा. ती चिडून म्हणते की अशा बापाने कोठीत नाही कोठ्यात राहावं. रझा मुराद थोडा मानी स्वभावाचा आणि इज्जतवाला व्हिलन असल्यामुळे तो पोरीला घरातून बाहेर जाण्यास मनाई करतो. ती सुद्धा रडत रडत आपल्या खोलीत जाते.

या घटनाक्रमापासून अनभिज्ञ ऋषीबाळ बासरी वाजवण्यात मग्न असतो. त्याला काय माहित आज भेटायला परी नाही तर शैतान का अवतार येणार आहे? अचूक नेमबाजी करत अघोरी त्रिशूळ फेकून नेमकी बासरी तेवढी तोडतो. आवाजात कमालीचे मार्दव आणून बाळ अघोरीला नमस्कार करतो. पण असा दीनवाणा चेहरा बघून कोणालाही उगाच कानफटात मारायची इच्छा होऊ शकते. एकदा थोबाडीत खाऊन त्याचं पोट भरत नाही, तो अघोरीला "तुम्ही कानाखाली जाळ काढून आशीर्वाद देता का हो" विचारतो. अघोरी उचकून त्याला पुन्हा एकदा आपला आशीर्वाद देतो. दोन्ही गालांवर पाच बोटे उमटल्यानंतर बाळाला ध्यानात येते की हे प्रकरण जीवघेणे आहे. तो थोडाबहुत प्रतिकार करतो पण अघोरी त्याला हाताला लागेल तिथे बडवतो. मग अघोरी त्याला विषदंश करतो. डॅनीने चावण्याचा अभिनय असा काही केला आहे की बेला लुगोसी नंतर ड्रॅक्युला हाच! चावल्यानंतर अघोरी त्याला लाथ मारून उतारावरून ढकलून देतो. तो काही हजार फूट घरंगळून शिवालिक टेकड्यांच्या प्रदेशात जाऊन आपटतो.

रेखारुपी मॅड्सला बाळाने मारलेली हाक ऐकू येते. ती तशीच केस मोकळे सोडलेल्या, नुकत्याच झोपेतून जाग्या झालेल्या अवस्थेत जाऊन बाळाला शोधते. चमत्कारिक रित्या भोला एका नदीपाशी पडलेला असतो. त्याहूनही चमत्कारिक रित्या एवढ्या विषारी अघोरीचा दंश होऊनही तो तत्काळ गतप्राण झालेला नसतो. पडत्या फळाची आज्ञा घेऊन मॅड्स उर्फ भानू विष उतरवण्याचा रामबाण उपाय करू बघते. जखमेतून विष चोखून थुंकून टाकणे. जॅक तिथे येऊन भानूला म्हणतो की अघोरी आपल्यापेक्षा विषारी आहे, नसते उद्योग करू नकोस मरशील. ती म्हणते की याने माझे प्राण वाचवले होते आता मी त्याचे वाचवते. इथे नागमण्याने विष उतरू शकते, शेषनागाची ती लहान मूर्ती आहे तिच्या किरणांनी काही होते का बघावे वगैरे सेकंड ओपिनियन उपाय तिच्या डोक्यात येत नाहीत. जितेंद्र मात्र तितका मठ्ठ नसतो.

जितेंद्र तडक शेषनागाची गुहा गाठतो. त्याला धमकावतो की जर भोला आणि भानूचे प्राण वाचवले नाहीस तर मी तुला माझा डान्स दाखवून, डोके आपटून जीव देईन. या डान्समध्ये ९० मधल्या बहुतांश हिरोंच्या डॅन्स स्टेप्स बघायला मिळू शकतात. सरोज खानने बहुधा जितेंद्राची ही क्लिप "५१ सोप्या डान्स स्टेप्स" नावाने सेव्ह करून ठेवली असावी. तेवढ्याने समाधान न झाल्याने तो खड्यांवर पाय रक्ताळेपर्यंत नाचतो. मग जाऊन पिंडीवर डोकं आपटायला लागतो. भोलेबाबांना "या सिनेमात सगळ्यांना माझ्याच डोक्यावर आपलं डोकं का फोडून घ्यायचं असतं" हा प्रश्न नक्की पडला असावा. तिकडे भानूसुद्धा मरायच्या बेतात असते. मग डॅन्स आणि डोकेदुखी अशा कॉम्बोने त्रस्त झालेले भोलेबाबा शेषनागाला "कर बाबा याच्या मनासारखं" म्हणून सांगतात. त्यानुसार शेषनागाच्या मूर्तीतून किरणे निघतात. त्याने भानू ठीक होते. विष काढून टाकल्यामुळे भोलाही ठीक झालेला असतो. पण त्या किरणांच्या प्रभावामुळे माधवी मूळ रुपात येते. तिला बघून भोला गोंधळतो. अखेर जितेंद्र येऊन आपणही सही सलामत असल्याचे प्रेक्षकांना कळवतो आणि भोलाला सत्य सांगतो. "हम लोग इच्छाधारी नाग हैं."

Biggrin
मूर्ती च्या पायातून रक्त निघतं..? की अघोरीच्या हातातून ? आणि ओरिजीनल रेखा कंफर्म्ड मेलेली असते ना? की नाही?

इथे नागमण्याने विष उतरू शकते, शेषनागाची ती लहान मूर्ती आहे तिच्या किरणांनी काही होते का बघावे....हे खूपच मस्त! अगदी इकडून तिकडून सर्व प्रयत्न करणार्‍या नॉर्मल माणसाची टेंडंसी! Happy

ओरिजीनल रेखा कंफर्म्ड मेलेली असते ना? की नाही?>> ही शंका माझ्याही मनात आहे...
ओरिजिनल रेखा च नक्की काय झालं

मी हा सिनेमा पाहायला घेतला, तेव्हा तुमचा फक्त लेख आला होत.. पुढचा चित्य्रपट लेखाशिवाय पाहन्यात मजा नाय आली, बोर झाल..
आता पुर्न चिरफाड इथे झाल्यानन्तरच पुर्ण चित्रपट पाहणार

भोलेबाबांना "या सिनेमात सगळ्यांना माझ्याच डोक्यावर आपलं डोकं का फोडून घ्यायचं असतं" हा प्रश्न नक्की पडला असावा. >>>>> Rofl
अफाट लिहल आहेस.मेरी तो शाम बन गई.

पायसा, धन्यवाद घे रे बाबा. आणी एक मोठ्ठी दिलगीरी सुद्धा. लेखकाचं नाव न वाचता, हा लेख दिसत असताना सुद्धा तसाच ओलांडून पुढे जाणं झाल्यामुळे, आजच हे वाचलं आणी विकेंडाची जोरदार सुरूवात झाली. जबरदस्त!

अधून मधून फारएण्डाच्या 'म्याक्रोसोश्योएकॉनॉमिकल' आणी रिव्हर्स स्वीपाच्या 'त्याचं नाव जॅक गौड" अशा तत्परतेनं केलेल्या ज्ञानदानामुळे, अजि म्या धन्य झालोय.

स्पॉईलर अलर्ट
ओरिजिनल रेखा नाही मरत. दीदी खरेच वर गेली तर भोलाचे कसे होईल या जगात, म्हणून तिला वाचवतात लोक.

"स्पॉईलर अलर्ट" - झालच काही, तर हे विषपान स्पॉईल होईल. सिनेमाच्या कथेत फारसं काही स्पॉईल होण्यासारखं नसावं. Happy

नवीन प्रतिसादांचे आभार.

१०) इच्छाधारी नागांनी निंजा लोकांना जुत्सू शिकवले - ट्रू स्टोरी!

१०.१) ट्रेनिंग आर्क शिवाय हिरो आणि व्हिलन पॉवरबाज होऊ शकत नाहीत.

इच्छाधारी नाग हे जाता येता रस्त्यावर कुठेही भेटू शकत असल्याने भोलाला त्याचे काहीच आश्चर्य वाटत नाही. आपल्या बहिणीचे काय झाले याची मात्र त्याला चिंता असते. जितेंद्र सांगतो की तुझ्या बहिणीने विहीरीत उडी मारली होती. आम्ही तिला वाचवले. पण त्यानंतर ती आजारी पडली, म्हणून मॅड्स तिच्या रुपात भोलासोबत राहिली. आता रेखा बरी झालेली असल्यामुळे ते ऋषी कपूरला रेखाकडे घेऊन जातात. जॅक आणि मॅड्सचे आपल्यावर किती उपकार आहेत याची जाणीव होताच आपण या सर्वांचे रक्षण करण्यास सक्षम होणार असल्याचे सांगतो. रक्षण-सक्षम यमक जुळत नसले तरी त्याची भावना लक्षात घेऊन जितेंद्रही आपण आता याचे ट्रेनिंग गांभीर्याने करणार असल्याचे सांगतो. ट्रेनिंग मोंटाज सुरू!

ऋषी कपूरचे ट्रेनिंग म्हणजे वस्तुंची तोडफोड आहे. यामध्ये तो आधी रंगीत माती भरलेली मडकी आणि छपरांचे कौले डोके आपटून फोडतो. मग कौले बुक्की मारून फोडतो. यानेही समाधान न झाल्याने तो जळत्या फरश्या कराटे चॉप मारून फोडतो. हे बघून जॅक आणि मॅड्स स्मितहास्य करतात. इकडे अघोरीही गप्प बसलेला नसतो. आपली शक्ती वाढवण्याकरिता तोही कसली तरी साधना करायला सुरुवात करतो. यामध्ये त्रिकालदेवाच्या मूर्तीवर गुलाल उधळणे, समुद्राच्या लाटांमध्ये उभे राहणे, मग लाटांमध्ये बसणे, अग्निकुंडात सिद्धासन घालून बसणे आणि शेवटी हवेत तरंगून साधना करणे असे आहे. तो आकाशात जाऊनही साधना करतो आणि त्रिकालदेवापुढे काही काळ बसतो हे तुनळीत नाही. अघोरी बेसिकली पंचमहाभूतसाधना करतो.

१०.२) असा नाच गेल्या दहा हज्जार वर्षात झाला नाही आणि पुढच्या दहा हज्जार वर्षात होणार नाही

हा सेक्शन या सिनेमातला सर्वात गौरवशाली सेक्शन आहे. त्याचे कारण आहे एक गाणे पण त्या गाण्याकडे वळण्याआधी आपण गाण्याचा सेटअप करून घेऊयात. मंदाकिनीच्या पाठीचे शॉट्स घालण्याकरिता तिची हळद चालू असल्याचे दाखवले आहे. याने हेही कळते की रझा मुरादने तिच्या लग्नाचा मुहूर्त काढला आहे. रझा मुराद आपल्या लेकीवर लै म्हणजे लैच प्रेम करत असल्यामुळे तो पंचक्रोशीतल्या सगळ्या नाचगाण्याचा कार्यक्रम करणार्‍यांना आवताण धाडतो. इकडे जितेंद्र आणि ऋषी तलवारीचे ट्रेनिंग करत असतात. दोन चार वेळा खणाखणी केल्यानंतर जितेंद्र म्हणतो की तुझं ट्रेनिंग पूर्ण झालं. रेखा येऊन उगाचच "आज वडील जिवंत असते तर तुला या रुपात पाहून त्यांना अभिमान वाटला असता" वाक्य टाकते. प्रत्यक्षात डोळ्यातले काजळ वगळता त्याच्या रुपात तसूभरही फरक पडलेला नाही. मॅड्स एक अतिशय भयानक असा नागमुकूट घालून सीनमध्ये येते आणि म्हणते की अजून एक परीक्षा बाकी आहे. कामिनीचे लग्न आज संध्याकाळी आहे. भोलाने कामिनीला पळवून आणणे ही त्याच्या शौर्याची परीक्षा असेल तर अघोरीने या सगळ्यांना धोपटणे अगदी न्याय्य आहे. जॅक म्हणतो व्हाय फिकर व्हेन वी आर हिअर, आपण तुझं लग्न लावून देऊ, टेन्शन नको घेऊ.

आणि आता तब्बल बारा मिनिटे चालणारे गाणे सुरू होते. या गाण्यावर किमान एक पीएचडी प्रबंध निघू शकतो. वेळेअभावी इथे हात थोडा आखडता घेत आहे. या गाण्याचे ठळक असे पाच विभाग आहेत - १) रेखाचा हायब्रिड सोलो, २) अघोरी-रेखा(मॅड्स) वाक्युद्ध, ३) अघोरी विरुद्ध रेखा (चिडचिड अवस्था), ४) अघोरी विरुद्ध रेखा (गेट ऑफ लिमिट/गेट ऑफ वंडर अवस्था), ५) अखेर

१०.२.१) रेखाचा हायब्रिड सोलो
आधी आपल्याला कळते की रेखा लग्नात नाचायला आली आहे. तिचा नागमुकूट, भडक मेकअप, लालभडक रंगाचे कपडे, टिकली इ. गोष्टींवरून प्रेक्षक लगेच सांगू शकते की ही रेखाच्या रुपात मॅड्सच आहे. तिच्या बॅकग्राऊंड डान्सर्सना हिरवा चुडा ल्यायला लावून पोएटिक जस्टिस साधला आहे. एकतर विषमरंगसंगतीने रेखा उठून दिसणार. त्यात तिच्या विषारीपणाचे प्रतीक हिरवा तर तिची (अघोरीच्या) रक्ताची तहान लाल रंगाने दाखवली आहे. यानंतर रेखा का कोणास ठाऊक टिपिकल कृष्ण-गोपी आणि कृष्ण गोपींचे हांडे दगड मारून फोडतो वाली स्टोरी २ मिनिटाच्या सोलोमध्ये सादर करतो. मागे तालवाद्ये आणि लेहरा वाजतो पण शब्द नाहीत. बहुतेक तरी भरतनाट्यम् मध्ये तिल्लाना म्हणतात. तिच्या काही काही हस्तमुद्रा सुद्धा भरतनाट्यम् च्या आहेत. पण तिचे पदलालित्य कथकचे वाटते. मध्ये मध्ये तिच्या मुद्राही कथकच्या होतात. काही सिग्नेचर सरोज खान स्टेप्स आहेत ज्या ९०ज मध्ये माधुरीने आपल्या केल्या. कंबर हलवण्याच्या बॉलिवूडी स्टेप्स पण आहेत. असा हा हायब्रिड सोलो डान्स सर्वात आधी होतो.

१०.२.२) वाक् युद्ध
"जय त्रिकालदेव! (१०)" हा सोलो रंगलेला असताना अघोरीचे आपल्या शिष्यगणांसह आगमन होते. तो ही नागीण असल्याचे लगेच ओळखतो. अघोरी आज आर या पारच्या लढाईच्या तयारीनेच आलेला असतो. ती असेल इच्छाधारी नागीण पण हासुद्धा मृत्युधारी अघोरी आहे. रेखासुद्धा लगेच चिडचिड अवस्थेत जाते - डोळे घारे होतात, लिपग्लॉस लागतो आणि "झुझूक झुझूक" असा काहीसा आवाज करत ती स्क्रीनमध्ये इकडे तिकडे सरकते. एव्हाना काही चौकस प्रेक्षक कथेत लॉजिक शोधत असणार याची कल्पना असल्याने रेखा प्रेक्षकांशी अघोरीच्या थ्रू संवाद साधते - "तू क्या हैं? तेरी औकात क्या हैं?" अघोरी तिला आपण असली रुपात आणणार असल्याचे घोषित करतो. "जय त्रिकालदेव! (११)" हातातला त्रिशूळ जाऊन पुंगी येते. दोघीही एकमेकांकडे सूचक नजरेने बघतात. नाच पुन्हा सुरू.

१०.२.३) अघोरी वि. रेखा (चिडचिड अवस्था)
जर तुम्ही अ‍ॅनिमे बघितले असतील तर तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशन्स काय असतात माहिती असेल. जसे यातला बाप गोकू सुरुवातीला जनरल फाईट मारतो. मग काई-ओ-केन (१ ते २० पट) मग सुपर-सेईअन, पुढे उच्चाअभ्यास होऊन ब्लू, गॉड वगैरे होतो. या सिनेमात इच्छाधारी नाग नारुटोमधल्या गाय सेन्से स्टाईल ट्रान्सफॉर्मेशन्स वापरतात. (हे पंचेस समजण्याकरिता हे वाचा). इतका वेळ सप्रेस केलेली चक्रा पावर रिलीज केल्यानंतर ती एट गेट्सपैकी (हाचिमॉन) पहिली तीन गेट्स ओपन केल्यानंतर रॉक ली जसा दिसतो त्या टाईप चिडचिड अवस्थेत दिसते. ती क्रमाक्रमाने इतर गेट्स उघडते पण नको ती गेट्स उघडत नाही, चिंता नसावी. रच्याकने नारुटो शेषनागनंतर नऊ वर्षाने आला, किशिमोतोने प्रेरणा म्हणून शेषनाग पाहिला असेल काय?

अघोरीचे सगळे शिष्य भिल्लाचा वेष धारण करून आले आहेत. ते अर्धमत्स्येंद्रासनात बसून तर अघोरी आपला असाच एका गुडघ्यावर बसून पुंगी वाजवायला लागतात. त्यांच्या अर्धमत्स्येंद्रासनात बसण्याने अघोरी गोरखनाथ होत नाही, चिंता नसावी. मग पुंगीतून "नाचे मयूरी" चे सूर निघू लागतात. थोडक्यात ही बया किमान सहावे गेट उघडून ताईजुत्सुच्या "मॉर्निंग पीकॉक" पर्यंत पोहोचणार आहे हे कळते. नाचण्याच्या शैलीतही आमूलाग्र बदल घडतात. आता अंगविक्षेप, विविध अंगे भुवई उडवावी तशी उडवणे इ. मुद्रा अधिक दिसतात. मुरलीधरनच्या बॉलिंग करताना होणार्‍या चेहर्‍याच्या दसपट भयंकर चेहरे रेखा करते पण अघोरी मोठ्या धैर्याने त्याला सामोरे जातो. मग गाण्यात शब्द भरले जातात - "ओ सपेरे, दुश्मन मेरे, ओ मेरे दुश्मन जरा होशियार हो जा". इथे रेखाने हावभावांमधून चार वर्षांनंतर येणार असलेल्या मॅडम एक्सची तयारी केली आहे.

मग ती फणा काढून याला डसण्याचा असफल प्रयत्न करते. अघोरी त्यातून वाचतो (होशियार झाला ना तो). मग ती सर्परुपात येऊन अघोरीला विळखा घालू बघते. अघोरी टेलिपोर्ट होऊन वाचतो (नवी पॉवर). मग ती गुळणा करावा तसे विष थुंकते. अघोरीला आपल्या शरीराचे दोन तुकडे वेगवेगळे करून ती गुळणी चुकवतो (नवी पॉवर!!). मग ती अघोरीला डसण्यासाठी जंग जंग पछाडते पण टेलिपोर्टेशनपुढे तिचे काही चालत नाही. हा प्रकार काही मिनिटे चालतो. मध्ये मध्ये एक नाग सरपटण्याचे सीन आहेत. हा जितेंद्र असल्याचे आणि तो मंदाकिनीची सुटका करण्यासाठी आलेला असल्याचे कोणीही सांगू शकतो. पण तो त्या घरात असूनही त्याच्यावर अघोरी आणि त्याचे दहा शिष्य अशा दहा पुंग्या वाजत असतानाही काही प्रभाव का पडत नाही हे न उलगडलेले कोडे आहे. बहुतेक पुंग्या गाजराच्या असाव्यात.

१०.२.४) अघोरी वि. रेखा (मॉर्निंग पीकॉक)
अघोरीला एव्हाना कंटाळा आलेला असतो. तो काहीतरी विभूती वगैरे फेकतो आणि धूरच धूर होतो. रेखालाही पॉवरअप करणे भाग असते. रॉक ली ड्रॉप्स वेट स्टाईल अघोरी ड्रॉप्स विभूतीचा क्यू घेऊन ती पाचवे गेट उघडते. इथून पुढे ती हा पॉवर अप वापरत असताना पूर्णपणे लाल रंगात न्हाऊन निघालेली दाखवली आहे. तिच्या ओव्हरफ्लोईंग चक्रामुळे अघोरीही लाल दिसतो. मध्ये मध्ये फेटा बांधलेले डॅन धनोआ आणि रझा मुराद दाखवून हा लग्नाचा डान्स आहे हे कळवले जाते. ही एकटी एकटी जुत्सु वापरणार हे अघोरीला पटत नाही. मग तो कागेबुनशिन नो जुत्सु वापरतो. त्याला चार क्लोन्स बनवता येत असतात. पण बावळट क्लोन बनवून फक्त खदाखदा हसतो आणि ते क्लोन जातात. रेखातरी या दहा पुंग्यांची कलकल किती वेळ सहन करणार. ती आता जमिनीवर लोळण घेते.

१०.२.५) अखेर
इकडे जितेंद्र नागरुपात मंदाकिनीच्या खोलीत जातो. फूत्कार काढून तो तिच्या सख्यांना पळवून लावतो. मग दाराला आतून कडी घालतो. त्यावर मंदाकिनी आश्चर्यजनकरित्या रिलॅक्स होऊन उशीवर रेलते. बुचकळ्यात टाकणार्‍या त्या प्रतिक्रियेवर आपल्याला दिसते की ऋषीबाळ टारझनप्रमाणे खिडकी फोडून एंट्री घेतो. नागही लई हुशारीने त्याला सिंदूरचा करंडा दाखवतो. लगेच तो सिंदूर भरतो, नागाला थँकयू म्हणतो आणि आपल्या जेनला घेऊन पसार होतो (मागून काटकसरी ताई कुजबुजतात, टारझनची हिरोईन मी, तू मेली गंगा!) . एव्हाना गाण्यात सरगमचा भरणा सुरू झालेला असतो. अनुपम खेरही न जाणे कुठून तिथे येतो. जितेंद्रही आपल्या बायकोला मदत म्हणून लढाई जॉईन करतो. मग ते दोघे सहावे गेट उघडून "मॉर्निंग पीकॉक" अवस्थेत जातात. त्यामुळे त्यांना आग ओकता येते. ते शब्दशः आग ओकतात. अघोरीवर त्याचा काहीच प्रभाव पडत नाही. मग ती शेषनागाची लहान मूर्ती काढून त्याच्या किरणांनी काही होते का बघतात. अघोरीवर त्याचाही काही प्रभाव पडत नाही. हे सर्व चालू असताना रझा मुराद मख्ख चेहर्‍याने "देणे घेणे राम जाणे" म्हणून फक्त उभा आहे. एकदाचे ते दोघे हार मानतात आणि आपल्या नागरुपात जातात. किंबहुना त्यांची इच्छाधारी शक्ती खूप वापरली गेल्यामुळे त्यांना मनुष्य रुप त्यागावे लागते. अघोरी ही लढाई जिंकला. "जय त्रिकालदेव! (१२)"

अगागागा.... पायस, पार बाजार उठवलास त्या शेषनागाचा Rofl

रेखाच्या गाण्याचं वर्णन महा खतरनाक जमलय Lol
नारुटोमधलं गाय सेन्से स्टाईल ट्रान्सफॉर्मेशन, एट गेट्स, शॅडो क्लोन टेक्निक, टेलीपोर्टेशन... सगळा मसाला जबरी.
मुरलीधरनच्या बॉलिंग करताना होणार्‍या चेहर्‍याच्या दसपट भयंकर चेहरे रेखा करते - सिक्सर! बॉल स्टेडीयमच्या बाहेर.

बाय द वे, ऋषी कपूरला या सिनेमापूर्वी आणि नंतरही इतका आचरट आणि भंपकपणा करताना कधी पाहिलेले नाही. बहुतेक याच काळात आरके स्टुडीओ कर्जबाजारी असावा आणि पैसे मिळताहेत म्हणून त्याने असला झंपक रोल केला असावा.

एकदा त्या अतिआचरट 'तुम मेरे हो' चं पण पोस्टमॉर्टेम येऊ दे.

आमीर खानच्या नॉनसेन्स कॅटॅगरी सिनेमातला हा एक अर्क आहे. सोबत जुही चावला असल्यामुळे लवष्टोरी असणार हे उघड आहेच, पण त्याला नागकथेची फोडणीही आहे. आमीर खान सपेरा हे पाहून डोकं सटकलच होतं. इच्छाधारी नाग-नागिण जनरली हिरो-हिरॉईन असते, पण इथे व्हॅम्प - रादर मुख्य व्हिलन आहे. आणि ही इच्छाधारी नागिण कोण तर कल्पनाताई अय्यर (डोके बडवणारी स्माईली असते का हो?). क्लायमॅक्सला कल्पनाताई जुहीबाईंना डसतात आणि आमीरकाका ते विष उतरवण्यासाठी जे काही उपद्व्याप करतात तो सगळा प्रकार केवळ अशक्य असाच आहे.

Pages