समग्र शेषनाग - जय त्रिकालदेव

Submitted by पायस on 4 October, 2018 - 19:33

१९८९ ते १९९१ हा काळ भारतासाठी मोठा धामधूमीचा होता. दोन वर्षात आपण ४ पंतप्रधान बदलले आणि तितक्याच वेगाने आपल्या राहणीमानात बदल स्वीकारले. असे म्हणतात की बदल घडत असताना हा शेवटचा टप्पा सर्वाधिक वादळी असतो. त्या नियमानुसार बॉलिवूडमध्ये या दोन वर्षात के आर रेड्डी नावाचे वादळ आले ज्याने पाप को जलाकर राख कर दूंगा, वीरू दादा, गर्जना सारख्या कलाकृतिंमधून जुन्याची नव्याशी सांगड घालण्याचा प्रयत्न केला. एके दिवशी त्याला दृष्टांत झाला की "हे शमशान घाट के मुर्दे, त्रिकालदेव चाहते हैं की तुम बाकी शमशान घाट के मुर्दों के लिए एक भक्तिरस से भरपूर फिल्म का निर्माण करो. ताकि कलयुग में भटक गए भूले बिसरे वापस राह पर आ सके". तो दिवस बहुधा नागपंचमीचा होता. तत्काळ त्याने शेषनागची निर्मिती केली. नाग जमातीवर तसे सिनेमे तर पुष्कळ येऊन गेले. पण नाग, खजिना, नागमणी, दैवी चमत्कार, रेखाच्या रुपातली माधवी, अमर विषारी तांत्रिक आणि मंदाकिनी असे बंपर पॅकेज केवळ शेषनागच देतो. अशा महान चित्रपटाचे विषामृत वाचकांपर्यंत पोहोचवणे एका व्यक्तिच्या शक्तीपलीकडचे काम आहे. तरी हा विषग्रहणाचा अल्पसा प्रयत्न!

१) शेषनाग सहकारी बँक लिमिटेड

१.१) प्रेक्षक आणि सिनेमा यांमध्ये टायटलरुपी रेखा असते.

पहिल्या काही फ्रेम्समध्येच शेषनागाची कूळकथा अ‍ॅनिमेशन मधून स्पष्ट केली आहे. शेषनागाने पृथ्वीला आपल्या डोक्यावर तोलून धरले आहे असा समज आहे. त्यानुसार मिश्किल हसणारे शेषनागाचे कार्टून पृथ्वी डोक्यावर घेऊन आहे असे दिसते. त्यानंतर प्रेक्षकांकडे वळून बघताक्षणी धरणी दुभंगते आणि त्यातून टायटल सीक्वेन्स सुरु होतो. हा सीक्वेन्स म्हणजे रेखाची नागकन्येच्या वेषातली छायाचित्रे आहेत. इथे अनुभवी प्रेक्षक लगेच सावध होतो. जर टायटल्सची नय्या पार करण्याकरिता सुद्धा रेखाची गरज भासत असेल तर सिनेमाच्या हिरोमध्ये काही फारसा दम नाही.

१.२) आमचे येथे चेक्स फक्त चंद्रग्रहणाच्या दिवशी वटवले जातील

टायटल्स सोबत वाजत असलेले पार्श्वसंगीत अ‍ॅबरप्टली संपून अचानक "ढॅण्ण" आवाज होतो आणि आपल्याला एका गूढ गुहेचे दृश्य दिसू लागते. एक पुजारी आणि तीन ठाकूरसाब ते राजासाब या रेंजमध्ये बसणारे लोक गुहेत प्रवेश करतात. तिघांच्या हातात प्रत्येकी एक पेटारा असतो. आपल्याला लक्षात येते की हे एक भूमिगत मंदिर असून इथे प्रत्येक खांबावर सात फण्यांच्या नागाची नक्षी आहे. मध्ये एक मोठ्ठी पिंड असून त्या पिंडीवर भल्यामोठ्या नागाच्या फण्याचे छत्र आहे. पुजारीच्या सांगण्याप्रमाणे ते लोक आपापल्या पेटार्‍यातून एक चंदेरी रंग दिलेला थर्माकोलचा तुकडा बाहेर काढतात. ते तीन तुकडे जोडले की या पिंड+नागाची छोटेखानी प्रतिकृति तयार होत असते. ती प्रतिकृति विशिष्ट जागी ठेवून पुजारी त्यांना एका बाजूला घेतो. मग चंद्रग्रहण लागते आणि त्या गुहेच्या छताला पडलेल्या भगदाडातून येणारे चांदणे अडवले जाते. गुहेत अंधार होताच त्या मोठ्या फण्यावरचे एलईडी पाकपूक करतात आणि त्या फण्यातून फूत्कार निघाल्यासारखे किरण येतात आणि प्रतिकृतित प्रवेश करतात. हा क्यू घेऊन कुठून तरी दोन नाग सरपटत येतात. ते अनुक्रमे जितेंद्र आणि माधवी असतात. जंपिंग जॅक आणि मॅड्सच्या डोक्यावर नागमणी असतो. आपण का मागे राहावे म्हणून तेही किरणे सोडतात आणि त्या तीनही किरणांचा संगम होऊन धरणी दुभंगते व तिच्या खालचा खजिना दृष्टीस पडतो. मग ते निघून जातात. चंद्रग्रहण सुटते आणि क्षणभरच एक निळसर ज्योत दिसते. पुजारी सांगतो की ती अमरज्योती आहे. मग ते तिघे पोतेभर दागदागिने आणि सुवर्णमुद्रा भरून घेतात. पुजारी त्यांना हे धन गोरगरिबांच्या भल्यासाठी वापरायला सांगतो आणि पुढची खेप पुढच्या चंद्रग्रहणाला मिळेल हे स्पष्ट करतो.

आता खरे तर सिनेमा इथेच संपायला हवा. क्लिअरली मंदिरात ग्रहणसदृश परिस्थिती निर्माण करणे फार काही कठीण कर्म नाही. नागांची दृष्टी अधू असल्याने त्यांना फक्त अंधार की उजेड इतकेच कळते आणि ड्राय आईसच्या मदतीने धूर करणे आणि तापमान कमी करणे सुद्धा अवघड नाही. मग ते आले आणि तो गाडलेला खजिना परत दिसला की हवे तेवढे धन काढून घ्यावे. पण अशी अक्कल सिनेमातल्या लोकांना नसल्यामुळे सिनेमा निष्कारण आणखी अडीच तास लांबतो.

२) व्हिलन की एंट्री

२.१) शमशान घाट के मुर्दे : एक संकल्पना

डॅनी या सिनेमात अघोरी या नावाने व्हिलन दाखवला आहे. अघोरी भलताच तगडा व्हिलन आहे. त्याची ओळख आपल्याला करून घ्यायची आहेच पण तत्पूर्वी आपण "शमशान घाट के मुर्दे" ही संकल्पना समजून घेतली पाहिजे. अघोरीचे मुख्य टार्गेट ती अमरज्योती आहे हे सूज्ञास सांगणे न लगे. आता अघोरी या ज्योतीच्या मदतीने अमर होणार ही त्याच्या दृष्टीने काळ्या दगडावरची पांढरी रेघ! मग बाकी सर्व एके दिवशी स्मशानात जाणार हेही नक्की! त्यामुळे इतरांपासून स्वतःचे वेगळेपण ठसवण्यासाठी तो समस्त मर्त्य मानवांना "शमशान घाट के मुर्दे" असे संबोधत असतो. अननुभवी प्रेक्षकांना अमरज्योतीचे महत्त्व आणि फोरशॅडोइंग कळण्याकरिता या तंत्राचा वापर केला आहे.

२.२) "जय त्रिकालदेव!"

यानंतर आपण दुसर्‍या एका गुहेमध्ये प्रवेश करतो. ही गुहा शेषनागाच्या गुहेपेक्षा भलतीच प्रकाशमान असते. पण इंटेरिअर डिझाईनरने सढळ हस्ते कवट्या आणि हिडीस चेहर्‍यांचा वापर केलेला असल्यामुळे ही गुहा व्हिलनची असल्याचे स्पष्ट होते. जटाधारी डॅनी तरातरा गुहेत घुसतो आणि गुहेच्या मध्यभागी असलेल्या उग्र पुतळ्यापुढे उभा ठाकतो. "जय त्रिकालदेव! (१)" हा या सिनेमातला अघोरीचा संभाषण सुरु करण्याचा प्रोटोकॉल असावा. बुचकळ्यात पाडणारी गोष्ट या त्रिकालदेवच्या मूर्तीचे स्तन लक्षात येतील इतके मोठे आहेत. आता इथे महाकाली किंवा तत्सम देवतेचा वापर का केलेला नाही हे माझ्या आकलनापलीकडचे आहे. असो, तर अघोरी त्या त्रिकालदेवच्या मूर्तीशी बोलायला सुरुवात करतो, नव्हे त्या मूर्तीला धमकवायला लागतो. तो समोरची एक धुनी पेटवतो आणि हातातल्या त्रिशूळाने अंगठा कापून घेतो. जोवर त्रिकालदेव त्याला त्या दोन नागांचा (पक्षी जॅक आणि मॅड्स) पत्ता सांगत नाही तोवर तो या रक्ताने त्या धुनीतली आग विझवणार असतो. ही धमकी असून त्रिकालदेवही मनात हसला असावा. ती जखम कांदा चिरताना बोट चिरले गेले तर होईल तेवढी आहे, बघता बघता रक्त गोठेल. रावणाच्या शिरकमल स्टाईल गोष्टींची सवय असलेला त्रिकालदेव याने कसला प्रसन्न होतोय? अघोरीच्या गँगमधले चिल्लर लोक मात्र लई घाबरतात. उद्या हा टपकला तर रात्रीच्या दोन पेगची सोय कोण करणार?

ही काळजी असल्याने कुठून तरी सुधीर धावत येतो. सुधीर अघोरी गँगचा फ्रान्सहून आयात केलेला मेंबर असावा कारण त्याच्या दाढी मिशा थेट मस्कटिअर छाप आहेत. अघोरी आधी या शमशान घाटच्या मुडद्यावर उखडला असे दाखवतो. आता तो नक्की उखडला का नाही हे सांगणे थोडे कठीण आहे कारण संपूर्ण सिनेमाभर डॅनीचा चेहरा कायमस्वरुपी बद्धकोष्ठ झाल्यासारखा आहे. सुधीर त्रिकालदेवची शपथ घेऊन सांगतो की मी जॅक आणि मॅड्सला मानवी रुपात बघितले आहे (मागून त्रिकालदेव ओरडतो, शपथ घ्यायची तर आईची घे. मला का मध्ये ओढतो?). अघोरी जाम पॉवरबाज तांत्रिक असतो. त्याला सुधीरच्या डोळ्यात त्याने काय बघितले आहे ते सगळे दिसते. बातमी खरी असल्याचे कळल्यावर तो खदाखदा हसतो. "जय त्रिकालदेव! (२)" एक भोळसट मेंबर त्याला विचारतो के हे नाग तर फार विषारी असतात, त्याचं काय करणार आहेस. मग आपल्या डॅनी अघोरी बनवायची रेसिपी सांगतो.

त्रिकालदेवचा अघोरी (संदर्भः शमशान घाटच्या मुडद्यांकरिता सुलभ सैतानी पाककृति)
साहित्यः
१००० शैतान
१००० पाली
१ मगरीचे कातडे
२० विंचू

कृति:
स्मशानात १००० शैतान मावतील अशी एक चिता रचून घ्या. त्यात त्या १००० शैतानांना जाळून त्यांची राख गोळा करा. ही राखरांगोळी होईपर्यंत १००० पालींचे रक्त एका भांड्यात काढून घ्या. ते रक्त वापरून राखेचा एक मानवाकृति पुतळा बनवावा. हातापायांची बोटे बनवू नयेत. पुतळ्याला मगरीच्या कातड्याची त्वचा बसवावी. नीट न बसवल्यास एअर बबल्स राहून अघोरीच्या कपाळावर कायमस्वरुपी आठ्या पडतील. बोटांच्या जागी विंचवांच्या नांग्या जोडाव्यात. जर तुमचे शैतान, शंभर टक्के शैतान असतील तर तुमचा अघोरी निश्चितच हवा तसा चिडचिडा आणि त्रासलेल्या आवाजाचा तयार होईल. घरगुती पालींच्या जागी जर सरडे वापरल्यास अघोरीला कायमस्वरुपी बद्धकोष्ठ असण्याची गॅरेंटी!

आपले विषारीपण सिद्ध करण्याकरिता तो एका नागाकडून स्वतःला चावून घेतो. नाग बिचारा एक्सपायरी डेट उलटलेल्या अघोरीच्या चवीने तडफडून मरतो. अशा रीतिने आपल्या लोकांना मोटिव्हेट करून अघोरी त्या इच्छाधारी कपलला पकडायला बाहेर पडतो.

२.३) बॉस कधीच चुकत नसतो

अखेर आपल्याला प्रथमच सिनेमातल्या स्थळांचा भूगोल बघायला मिळतो. हिमालयाच्या कटआऊटच्या बॅकग्राऊंडवर आणि अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर व पुंगी यांच्या स्वरांवर जॅक आणि मॅड्स नाचत असतात. "तु नाचे मैं गाऊ, मितवा छेड मिलन के गीत" या शब्दांवर जितेंद्र आणि माधवीने भांगडा ते भरतनाट्यम् अशी अफलातून व्हरायटी दिली आहे. सरोज खानला बहुधा रेड्डीकाकांनी "जोपर्यंत ते सापासारखी जीभ लपलप करत आहेत तोपर्यंत एनीथिंग गोज्" असा कानमंत्र दिला असावा. थोड्यावेळाने त्यांना जमिनीवर नाचून कंटाळा येतो मग ते हवेत नाचायला लागतात. मग माधवीला तिच्या लांबसडक केसांचा कंटाळा येतो. त्यामुळे ती एक कडवे छोट्या, कुरळ्या केसांत नाचून घेते. त्यातही फार काही मजा न आल्याने मग ती पुन्हा लांब केस मोकळे सोडून चमकीवाल्या हिरव्या चुड्यात नाचून घेते. जितू इकडे तिकडे उड्या मारायची आणि मधून मधून माधवीला खाली लोळायला लावून तिच्यावरून उड्या मारायची जबाबदारी इमानेइतबारी पार पाडतो.
हे सगळे चालू असताना अघोरी आपल्या सोबत काही गारुड्यांना घेऊन येतो. वॉर्निंग शॉट म्हणून तो त्याचा त्रिशूळ फेकून जॅक आणि मॅड्सचे लक्ष वेधून घेतो. ते दोघे भलतेच चालू असल्याने ते नागरुप धारण करून सुमडीत पलायन करतात. हे नागांचे तेल अघोरी सोबत आलेल्या शमशान घाटच्या मुडद्यांवर काढतो. या नागांना शोधून जर त्यांनी अघोरीसमोर हजर नाही केले तर अघोरी त्यांची खाल उधडून टाकेल. "जय त्रिकालदेव! (३)"

३) सरपटण्यापेक्षा दोन पायांवर पळ काढणे सोपे असते

३.१) "आमच्या इथे अघोरी चावल्यावरची लस टोचून मिळेल" सर्पमित्र चारुदत्त वसुमित्र रे अर्थात चा. व. रे

हा खाल उधडण्याचा क्यू घेऊन एडिटर आपल्या काही सापांची कात वाळत टाकलेली दाखवतो. कुठूनतरी तिथे ऋषी कपूर उगवतो. ऋषीबाळ फारच गुणी बाळ दाखवला आहे. तो त्या गारुड्यांचे प्रबोधन करण्याचा असफल प्रयत्न करतो. इथे पटकथालेखक आपले अर्थशास्त्राचे ज्ञान पाजळतो - साप विकण्यापेक्षा सापांच्या कातीचे चामडे विकणे अधिक फायदेशीर आहे (सेकंडरी सेक्टर जॉब वि. प्रायमरी सेक्टर जॉब). ऋषीबाळ म्हणतो की हे भोलेनाथचे भक्त आहेत असं करू नका. तुमची चामडी कोणी लोळवली तर तुम्हाला कसं वाटेल? यावर ते गारुडी ऋषीबाळाची चामडी लोळवतात. याने बाळ भलताच खवळतो. तो जाऊन एका ओसाड मंदिरात शंकराच्या मूर्तिपुढे आपले गार्‍हाणे मांडतो. पण फार काही घडण्याआधीच त्याला दिसते की गारुडी लोक गठ्ठ्याने नागांच्या मागे लागलेत. मग तो शंकराला त्याच्या भक्तांना (पक्षी: कोणताही नाग) वाचवायचे वचन देतो. चाणाक्ष प्रेक्षकाच्या लक्षात येते की याच्यामुळे अघोरीच्या हातून जितेंद्र/माधवीचे प्राण वाचणार आहेत.

इकडे अघोरीच्या आदेशावरून सुधीर आणि कं. जॅक आणि मॅड्सच्या शोधात असतात. पण पकडलेल्या नागांपैकी एकही नाग इच्छाधारी नसल्यामुळे अघोरी वैतागतो. तो म्हणतो की जाऊन शोधा त्यांना आणि पकडलेल्या नागांचे विष काढून मला द्या. आज मी विषपान करणार आहे. जितेंद्राला आपले जातभाई मारले जात असल्याचे बघवत नाही. तो थेट अघोरीच्या गुहेत जाऊन थडकतो. त्याच्या आवाजाचे पडसाद पुरते पाच सेकंद उमटतात. कान किटल्यामुळे अघोरी बाहेर येतो. बघतो तर काय - हा तर इच्छाधारी नाग! मुडदा स्वतःच शमशान घाटमध्ये आल्याने खुश होऊन तो विकट हास्य करतो. मग त्यांच्यात वाक्-युद्ध रंगते. अघोरी त्याला पेटीत बंद करणार असल्याचे सांगून नसलेल्या पेट्यांमधून हवी ती पेटी निवडायची मुभा देतो. जितेंद्र त्याला "तुझ्या अस्थी बंद करता येतील अशी पेटी चालेल मला" म्हणून अघोरीला उचकवतो. "जय त्रिकालदेव! (४)"

दोघांमध्ये तुंबळयुद्ध (बजेटमध्ये जेवढे तुंबलं तेवढं तुंबळ) होते. कधी नव्हे तो एक इच्छाधारी नाग पुंगीच्या स्वरांमध्ये मदमस्त होण्याआधीच झडप घालून पुंगी फेकून देण्याचा शहाणपणा करतो. अघोरीकडे आग लावणे (शब्दशः), फुंकरीतून वादळ निर्माण करणे, हवेतून तलवार काढणे अशा पॉवर्स असतात. तर जितेंद्राकडे हवेत तरंगणे, फेकलेल्या तलवारीचा हार करणे अशा पॉवर असतात. मानवी रुपात झोंबाझोंबी करून पोट न भरल्याने ते नाग आणि मुंगसाच्या रुपात झोंबाझोंबी करतात. असा विषम सामना असूनही जितू अघोरीवर भारी पडत असतो. तो अघोरीला चावणार इतक्यात मॅड्स येऊन सांगते की "प्रीतम इसे मत डसो." तब्बल २४ मिनिटांनंतर आपल्याला जितेंद्राचे सिनेमातले नाव कळते - प्रीतम. मॅड्स म्हणते की अघोरी आपल्यापेक्षा जास्त विषारी आहे. डॅनीचे समाधान झालेले असल्याने तो हसून जरा हवापाण्याच्या गोष्टी करू बघतो. त्यावर जितेंद्र विषफुंकार सोडतो. ही विषफुंकार कमी आणि फ्लेमथ्रोअरचा ब्लास्ट जास्त आहे. यावर अघोरी कसलं तरी भस्म फेकतो आणि याने धूरच धूर होतो. "जय त्रिकालदेव! (५)". याने म्हणे माधवी जखमी होते. धूराच्या आडोशाने जॅक आणि मॅड्स काढता पाय घेतात आणि अघोरी सगळ्या गारुड्यांना परत त्यांच्या पाठलागावर लावतो.

३.२) रेखा कोणतीही असो, तिला ओलांडून जायचे म्हणजे अग्निपरीक्षा द्यावीच लागते.

ऋषीबाळ आपल्याच तंद्रीत चाललेला असतो. त्याला दगडावर एक अंगाला केचप फासलेला रबरी नाग दिसतो. एका नजरेत त्याला कळते की "ये तो जखमी नागीन हय". तीन चिल्लर गारुडी येऊन त्याला ती नागीण मागतात. ऋषीबाळ झाशीच्या राणीइतक्या बाणेदारपणे सांगतो - नहीं दूंगा! तो त्या नागिणीला आपल्या कासोटीला बांधून पळ काढतो. उतारावर धावत असल्याने तो अपेक्षेप्रमाणे धडपडतो. मग हे गारुडी त्याला काठ्यांनी झोडप झोडप झोडपतात. या नादात त्यांचे लक्ष नसताना एक नाग (हा बहुधा जितेंद्र असावा) त्यांना डसतो. प्रत्यक्षात हे काम आधीसुद्धा होऊ शकले असते पण नागाला "गठ्ठ्याने बडवला जाणारा माणूस कसा दिसतो?" या शोमध्ये रस असावा. या संधीचा फायदा घेऊन बाळ नागीणीला एका सुरक्षित ठिकाणी सोडतो आणि तिचे प्राण वाचवतो.

ही बातमी कळल्यानंतर अघोरीचा राग ऋषी कपूरवर शिफ्ट होतो. तो आधी ऋषी कपूरला मारायचे ठरवतो. इकडे माधवी आणि जितेंद्रची परत गाठभेट पडते. बागेत रोमान्स करायच्या पोजमध्ये माधवी अजूनही माणसांमध्ये माणूसकी शिल्लक आहे या अर्थाचा डायलॉग मारते. जितेंद्रही "हो ना, याला नक्की भोलेबाबाने पाठवले असणार" म्हणत दुजोरा देतो. हे दोघे याचे उपकार न विसरण्याची शपथ घेतात. याचाच अर्थ लवकरच ऋषी कपूरचे कुत्र्यागत हाल होणार आहेत, त्याशिवाय यांना त्याच्या उपकारांची परतफेड कशी करता येईल?

"जय त्रिकालदेव! (६)" अघोरीने भलेही ऋषीबाळाला मारण्याची घोषणा केलेली असली तरी तो अजूनही या नागांना आपल्या सीमेबाहेर निसटू देण्याच्या मूडमध्ये नसतो. मग त्याला पॉवर दाखवायची हौस येते आणि एका रँडम ठिकाणी तो त्रिशूळ जमिनीत रोवतो. त्याच्या ताकदी धरणी दुभंगून एक सीमारेखा तयार होते. त्याच्या म्हणण्यानुसार ही रेखा ओलांडणे जॅक आणि मॅड्स के बस की बात नसते आणि तसेच होते. हे दोघे नागरुपात ती रेखा ओलांडायचा प्रयत्न करतात तेव्हा ती अग्निरेखा असल्याचे कळते. हे बिचारे अघोरीप्रूफ पण नसतात तर फायरप्रूफ कुठून असणार? इच्छाधारी रुपांतरणाच्या नियमांनुसार नागांना रोमान्स/फायटिंग/डायलॉगबाजी या कामांव्यतिरिक्त रुप बदलता येत नसल्याने ते माणूस बनून उडी मारून ती रेखा पार करण्याचा प्रयत्न करत नाहीत. पिंडी ते ब्रह्मांडी या तत्वाच्या करोलरी नुसार शंकराची पिंड कुठेही प्रकट होऊ शकते. या करोलरीमुळे त्या रँडम ठिकाणी हवेतून पिंड अवतरते. मग हे नाग या पिंडीला विळखा घालून तिला ओढत ओढत नेतात. अघोरी आणि त्याच्या शोधपथकाचा मंत्र "आपण बरे आणि आपले काम बरे" असल्याने त्यांना त्यांच्या शेजारून एक पिंड घसरत चालली आहे हे दिसत नाही. हायरार्की मध्ये अग्निदेव शंकराच्या खाली असल्याने तो लगोलग आग विझवतो आणि हे लोक पिंडीसकट ती अग्निरेखा ओलांडतात.

या लोकांनी रेखा ओलांडल्याचा क्यू घेऊन पुढच्या दृश्यात रेखा येणार हे उघड आहे. तरी इथे माझी अल्पकाळापुरती विरामरेखा. त्रिकालदेवाची कृपा होताच उरलेल्या शमशान घाटच्या मुडद्यांबद्दल प्रतिसादांत विस्ताराने लिहितो Proud

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

बाप रे !!! पायस हॅट्स ऑफ तुम्हला.... इतक्या seroius moviche इतके सुंदर आणी विनोदी रसग्रहण केल्याबद्दल धन्यवाद._/\_. मला राहून राहून असे वाटते की या मूवी च्या directors, producer ने हा धागा वाचला पाहिजे... त्यांना कल्पनाही नसेल की आपण एक इतका भयंकर विनोदी चित्रपट बनवला आहे.. इथले वाचून वाचून तुनळीवर वर एक एक सीन बघत ahe.... खुपच सॉल्लिड लिहिता तुम्ही.. : D

सर्व वाचकांचे आभार! त्रिकालदेवचा आशीर्वाद, भोलेबाबाची कृपा आणि तुम्हा सर्वांच्या सदिच्छा यामुळे मजसारख्या तुच्छ शमशान घाटच्या मुडद्याकडून हे लेखन घडू शकले Happy जर तुम्ही हा सिनेमा पूर्ण बघितलात आणि यातल्या हास्यास्पद अतर्क्य गोष्टी जाणवत असतील, त्या शोधण्याची आवड असेल तर व्यासंगाकरिता/उच्चाभ्यासाकरिता नाचे नागीन गली गली, तु नागीन मैं सपेरा, हसीना और नगीना आणि शेवटी बिजली और बादल असा अभ्यासक्रम आहे (इथे गटणेकरिता पुस्तकांचे कपाट उघडल्याचा फील आला). वेळ होईल त्यानुसार नंतर कधीतरी हा अभ्यासही आपण करू. पण आत्ता आपण शेषनागचा क्लायमॅक्स संपवूयात.

११) क्लायमॅक्स

११.१) अघोरीची इच्छा

रेड्डीकाकांना प्रेक्षकाच्या बुद्धिमत्तेवर भरवसा नसल्याने ते अनुपम खेरकडून मूर्खासारखा संवाद वदवून घेतात. "अघोरी बाबा, आपने मेरी बीवी को नागीन बना दिया!". अघोरीला फालतू लोकांमध्ये तसाही इंटरेस्ट नसतो. तो खुलासा करतो की अरे ही नागीणच आहे, रुप बदलून आली होती. इथे आपल्याला गाढवाच्या लग्नमधल्या "सावळ्या, अरे त्या मुंग्याच आहेत आपण अजून उडालोच नाही" ची आठवण झाल्याखेरीज राहत नाही. यानंतरही जेव्हा अनुपम खेर ऐकत नाही तेव्हा तो त्याच्या अंगावर आपले भिल्ल शिष्य सोडून त्याला पळवून लावतो. जेव्हा तो जायला निघतो, रझा मुराद मोठ्या नम्रतेने त्याला म्हणतो की लग्न तर होऊ द्या. त्याने जेवणाचे काँट्रॅक्ट चोळखणआळीतल्या तेरेदेसायाला दिले नसणार, जेवणाचा रेट ताटावर असेल. डॅनीच्या ताटाचे पैसे फुकट जाऊ नये इतकीच त्याची चिंता! अघोरी त्याला म्हणतो की आज चंद्रग्रहण आहे. रझा मुरादच्या चंद्रालाही ग्रहण लागल्याचे, अर्थात मंदाकिनी पळवली गेल्याचे कळते. डॅन धनोआ तिला शोधायला जाणार एवढ्यात अघोरी म्हणतो की भोला शेषनागाच्या गुहेत मिळेल. तुम्ही सगळे माझ्यासोबत चला.

कट टू शेषनागची गुहा. "जय त्रिकालदेव! (१३)". अघोरी मंत्रशक्तीने दोन पिंजरे बनवतो आणि त्यात हातातले दोन नाग फेकतो. लगेच जॅक आणि मॅड्स मूळ रुपात येतात. ते पिंजरे म्हणजे टेलिफोन बूथचा सांगाडा आहे, नॉर्मल पिंजर्‍यांशी त्याचा काही संबंध नाही. चंद्रग्रहणाला चेक वटवायला ते तीन ठाकूरसाब ते राजासाब रेंजमधले लोक आणि त्यांचा गुरू येतो. बाहेर असलेल्या अघोरीच्या माणसांनी त्यांना बंदी बनवलेले असतेच. तिघांमध्ये जो त्यातल्या त्यात धीट असतो तो अघोरीला विचारतो की कोण तू? काय पाहिजे तुला? आजवर अघोरीला काय पाहिजे हे त्रिकालदेवनेही विचारलेले नसते. त्यामुळे मोठा अचंबा वाटून तो आपली इच्छा सांगतो

"मेरी इच्छा हैं की इंसानों की खोपडियां इतनी जमा करूं की उनका एक पहाड बन जाए. फिर उस पहाड की चोटी पर खडे होकर मैं हसूं, नाचूं. इतना नाचूं, इतना नाचूं की खोपडियां चूर चूर होकर मिट्टी बन जाए." #माईकड्रॉप

११.२) हिरो लोकांना ब्लॅकमेल केल्याशिवाय क्लायमॅक्समध्ये मजा नाही

अघोरी त्या लोकांना बंदी बनवून त्या थर्माकोलच्या शेषनागाचे तीन भाग हस्तगत करतो. मॅड्स पहिल्या शॉटपासूनच चिडचिड अवस्थेत असल्यामुळे प्रसंग बाका आहे हे प्रेक्षकांना कळते. मग अघोरी "मी धनवान होणार, मी अमर होणार" वगैरे वल्गना करतो. जॅक आणि मॅड्स त्याला उपदेशात्मक भाषण मारतात. त्या तीन लोकांच्या गुरु/पुजार्‍यालाही अघोरीला उपदेश करायची हौस येते आणि तो म्हणतो की असं पाप तू केलंस तर तू मरशील. अघोरी स्वतःला अमर समजत असल्याने तो त्याला त्रिशूळातून किरणे सोडून मारतो (नवी पॉवर!). मग तो जॅक आणि मॅड्स सोबत वाक्-युद्धात रमतो. हे संवाद शमशान घाट प्रचूर आहेत. त्यांचे सार असे की अघोरीला या दोघांनी ती नागमणी वाली किरणे सोडून खजिना द्यावा. तर या दोघांचे म्हणणे आहे की देत नाही जा! अघोरीकडे यावरही उपाययोजना असते. त्याच्या फकीरा नावाच्या कोणा चिल्लर गुंडाला तो हाक मारतो. दोन गुंड मग रेखाला (पक्षी चंपा, भोलाची खरी बहीण) घेऊन येतात. या पॉईंटला सुधीर सिनेमातून गायब आहे, का ते माहित नाही.

हिरो लोकांच्या प्रिय व्यक्ती (शक्यतो माँ, बहन, छोटी मुले) पकडून त्यांचे टॉर्चर करून हिरो लोकांना ब्लॅकमेल करण्याची प्राचीन कला वापरली जाणार असल्याचे झटकन लक्षात येते. अघोरी फारच गरीब असल्याने त्याच्याकडे डोमेक्स, हार्पिक इ. विकत घ्यायला पैसे नसतात. त्यामुळे तो रेखाच्या रक्ताने मंदिराची फरशी पुसणार असल्याची घोषणा करतो. क्षणभर या रुपकावर आपण हसतो. पण पुढच्याच क्षणी "रुपकं करायला मी काय कवी आहे का" अशा विचारांचा अघोरी बिनदिक्कत रेखाच्या गळ्यापाशी त्रिशूळ भोसकतो. गळा आणि छाती यांच्यामध्ये असलेल्या छोट्या कोनाड्यात बरोबर तो त्रिशूळ रुततो आणि रक्त येऊ लागते. पण या जखमेने रेखा मरणार नाही हेही लक्षात येते. मग रेखा-अघोरी वाक् युद्ध होते. एक कौतुकास्पद गोष्ट अशी की जसे जसे हे वाक् युद्ध रंगते तसे रेखाच्या गळ्यावरचा "खून का धब्बा" आकाराने वाढत गेला आहे. म्हणजे तिचे रक्त वाहते आहे. अनेक नावाजलेल्या सिनेमांमध्ये या प्रकारची सिचुएशन आल्यावर खून का धब्बा आकाराने तसाच राहिलेला आहे (जणू रक्त वाहतच नाही). या अटेंशन टू डिटेलचे क्रेडिट शेषनागला द्यायलाच हवे.

११.३) शेषनाग गांधारदेशातून आला होता काय?

असो, तर ब्लॅकमेल यशस्वी होते. जॅक आणि मॅड्स नाचायला तयार होतात. लगेच चंद्रग्रहण लागते. ते सुरुवातीचे धूर, अंधार, किरणे सोपस्कार होतात. आता हे लोक नाचणार इतक्यात रेखा एक लास्ट डिच एफर्ट म्हणून अघोरीला डिवचते ("इसकी बात मत मानिए, आपको शेषनाग की कसम"). अघोरी तिला मारणार एवढ्यात अनुपम खेर कुठून तरी तडमडतो आणि त्रिशूळ त्याच्या छातीत घुसतो. थोडक्यात अनुपमचे परिवर्तन करून त्याला शेवटी चांगला बनवणार हे कन्फर्म होते. मग कुठून तरी ऋषी कपूरसुद्धा तडमडतो. मग त्यांची फायटिंग सुरू होते. इतके पॉवरफुल जॅक आणि मॅड्स अघोरीच्या चिल्लर गुंडांच्या हातातल्या भाल्यांना पाहून काही अनाकलनीय कारणाने गप्प बसतात. ऋषी कपूरला जितेंद्राने लढण्यालायक बनवले असले तरी इतक्या सगळ्या गुंडांसमोर त्याचे काही चालत नाही. मग अघोरीचे लोक या सगळ्यांना खांबांना बांधतात. मंदाकिनी, डॅन धनोआ, रझा मुराद पण आलेले असतात. रझा मुरादला अचानक डॅन धनोआ लुच्चा असल्याचा साक्षात्कार होतो. मग त्याला आणि मंदाकिनीलाही बांधले जाते.

निरुपाय होऊन ते दोघे नागमणीतून किरणे सोडतात. धरणी दुभंगते आणि खजिना दृग्गोचर होतो. लगेच त्या दोघांनाही बांधले जाते. खजिना बघून डॅन धनोआ हरखतो. हिरे, पाचू, नीलम, पुष्कराज इ. रत्ने त्याला दिसतात. पुष्कराजशी यमक जुळणारा यमराज मात्र त्याला दिसत नाही. त्याच्या पोटात त्रिशूळ मारून अघोरी खजिन्याची आरती रक्ताने करतो. शेषनागही "लहू मुंह लग गया" झाल्याने अमरज्योती सोडतो. अखेरचा पर्याय म्हणून जॅक आणि मॅड्स नागरुपात अघोरीवर हल्ला करतात. अघोरी त्यातून सावरून त्या बूथवाल्या पिंजर्‍यात लगेच फेकतो खरा, पण इथे एक आपली शंका! तिथे उभ्या असलेल्या सगळ्यांना अमर ज्योती काय करते ते माहिती आहे. अघोरीच्या माणसांपैकी एकालाही अघोरी या दोघांशी लढतो आहे तोवर पटकन अमरज्योतीत स्नान करावेसे का वाटत नाही? मी असतो तर मी ही सुवर्णसंधी सोडली नसती.

एकदाचं घोडं गंगेत न्हातं, म्हणजे अघोरी अमरज्योतीत न्हाऊन निघतो. इथे सांगण्यासारखी एक महान कूळकथा आहे Proud मी जेव्हा हा सिनेमा पहिल्यांदा पाहिला तेव्हा आम्ही सगळे घरचे टाईमपास करत होतो. आई म्हणाली "अरे त्याचा त्रिशूळ त्या ज्योतीच्या मध्ये आला. म्हणजे जसा गांधारीने दुर्योधनाला बघितल्यावर दुर्योधनाचा कंबरेखालचा भाग वज्राचा होत नाही तसा काहीतरी प्लॉटपॉईंट असणार बघ!" शेषनागची अमरज्योती आणि गांधारीची पतिव्रता दृष्टी हे कनेक्शन लागल्यानंतर संपूर्ण सिनेमा महाभारत आहे हे कळते. त्यानुसार शेवटी द्वंद्व होऊन अघोरीला भोला मारणार हे निश्चित होते. तसेच भोलाही भीमाप्रमाणेच निरागस आणि गुबगुबीत असल्याने तो भीम हेही नक्की होते.

अघोरी अमर झाल्यामुळे आता त्याला त्रिकालदेव, भोलेनाथ वगैरेंची आवश्यकता नसते. मग तो त्रिशूळ (देवाचे हत्यार) फेकून देतो. मग तलवारीने त्या ठाकूर-ते-राजा-रेंज लोकांना मारतो. तसेही ते फुकटेच असतात त्यामुळे त्यांच्या मृत्युचे कोणालाही सोयरेसुतक नसते. पण हे मेल्यानंतर पहाड बनवण्यासाठी उरलेल्या खोपड्या हिरो लोकांमधून येणार असल्यामुळे चमत्कार घडणे अत्यावश्यक होते. त्यानुसार इतक्या वेळ त्या बूथवाल्या पिंजर्‍यात असहायपणे बंदिवान असलेले जॅक आणि मॅड्स काचा फोडून बाहेर येतात. जर हे आधीच शक्य होते तर त्यांनी तसे का नाही केले या प्रश्नाचे उत्तर देण्यास मी पामर असमर्थ आहे. मुख्य मुद्दा असा की फायनल फाईट सुरू.

११.४) जितेंद्राची कृष्णशिष्टाई - अघोरीचा अंत

समस्त नाग-साप सिनेमांच्या नियमानुसार अखेरच्या फाईटसाठी शेकडो नाग येतात. शेकडो नागांसमोर अघोरीचे मूठभर चिल्लर गुंड टिकणे शक्य नसते. सगळे विषाने, म्हणजे तोंडातून फेस येऊन मरतात. एकाने तो पांढरा द्राव तोंडात जरा जास्तच घेतला असावा कारण तडफडण्याचा अभिनय करताना चुकून त्याच्या तोंडातून त्या द्रावाचा गुळणा होतो आणि तो उताणा असल्याने सगळा द्राव त्याच्याच तोंडावर पडतो. इकडे जॅक आणि बाळ अघोरीचा सामना करण्याचा प्रयत्न करतात. अघोरी आता लैच पॉवरबाज झालेला असतो. त्यामुळे तो यांना मनाला येईल तसे गरगर फिरवून फेकून देत असतो. त्याच्या इतकी शक्ती असते की तो खांबावर आपटला की खांब पडत असतो. मध्येच क्षणभर चौकस प्रेक्षकांना संतुष्ट करायला रेड्डीकाका माधवीला "फुस्स" करून सुधीरला मारताना दाखवतात. माधवी असेच फुस्स करून बरेच गुंड/गारूडी मारते.

अघोरी थोडा मार खाल्ल्यानंतर कागेबुनशिन नो जुत्सू वापरून दोन क्लोन बनवतो आणि जॅकचा व बाळाचा गळा दाबण्याचा प्रयत्न करतो. पण ऋषी कपूरलाही आता स्नेक स्टाईलचे ट्रेनिंग मिळालेले असते. त्यामुळे हे दोघे कुंगफू मास्टर याच्यावर दुगाण्या झाडतात. "जय त्रिकालदेव! (१४)" अघोरी चिडून आधी त्रिशूळ फेकतो. दोघे तो चुकवतात. मग तो अख्खीच्या अख्खी पिंड उखडून फेकतो. पिंड मात्र त्यांना लागते. मला तरी वाटते की त्यांनी डॉज करण्याचा प्रयत्न केला असेल पण भोलेनाथ "माझ्यावर डोकं आपटणारे तुम्हीच दोघे नाही का? आता मी तुमच्यावर डोके आपटतो" मूड मध्ये असावा. अघोरी विकट हास्य करतो. जितेंद्र निराश होऊन शेषनाग, भोलेनाथचा धावा करतो. मग भोलेनाथ त्याला ती दुर्योधनावाली गोष्ट सांगून हा अमर झाला नसल्याचे सांगतात. इथे बालपणीच्या अस्मादिकांनी मातोश्रींकडे कमालीच्या आदराने पाहिल्याचे स्मरते.

जितेंद्रला मतितार्थ समजतो. तो ऋषी कपूरला "याच्या छाताडात त्रिशूळ मार" असे सांगतो. सिनेमा संपत आलेला असल्याने ऐलान-ए-जंग प्रमाणेच उरलेले बजेट पंख्यांवर वापरले जाते आणि वाळलेली पाने व सोसाट्याचा वारा असे दृश्य दिसते. ऋषी कपूरला पहिल्या प्रयत्नात तो स्वीट स्पॉट सापडत नाही. अघोरी वज्रकाय असल्याने तो नुसताच गडगडाटी हास्य करतो. अजून त्याला आपण अमर नाही हे कळले नसल्याने तो ऋषी कपूरला परत प्रयत्न करू देतो. दोन तीन वेळा प्रयत्न करून झाल्यानंतर मी म्हणालो की "आई हा छातीत मारण्याऐवजी खांद्यात त्रिशूळ मारतो आहे. अशाने अघोरी कसा मरायचा?"
मातोश्री: "अरे जितेंद्र सिनेमाचा कृष्ण ना? आता महाभारतातल्या भीमाने सुद्धा कृष्णाने मांडीवर थोपटून इशारा करेपर्यंत चुकीच्या ठिकाणी गदा मारली होती. मग ऋषी कपूर किस झाड की पत्ती?"
मातोश्रींच्या म्हणण्याप्रमाणे लगेचच जितेंद्र ऋषी कपूरला "भोला, यहां मार" करून इशारा करतो (इथे साष्टांग नमस्कार!). लग्गेच भोला बरोबर ठिकाणी त्रिशूळ खुपसतो. मरण्यापूर्वी अघोरी थोडी फाईट मारतो पण शेवटी "आऽऽऽ" ओरडून एकदाचा मरतो. लगेच शेषनाग किरणे सोडून त्याला भस्म करतो, डायरेक्ट सांगाडाच दुसरी बातच नको! अघोरीचा अंत झाला हे सूचित करणारे पिंड उडत जागेवर येते, चंद्रग्रहण सुटते प्रसंग घडतात. इथे पिंड ज्या दोरावरून घसरत/तरंगत जाते तो दोर बारकाईने बघितल्यास दिसू शकतो. पिंड हिंदकळताना पण दिसते. पण अघोरी मेल्याच्या आनंदात या किरकोळ चुका प्रेक्षक माफ करतो.

थोडाच वेळ उरलेला असल्यामुळे आता संदेश द्यायची वेळ झालेली असते. भोला जॅक आणि मॅड्सला न जाण्याची विनंती करतो. पण ते दोघे या योनीत हजार वर्षेच राहू शकत असल्याचे आणि ती हजार वर्षे पूर्ण झाल्याचे कळते. सगळे मग भावूक होतात, एकटी मंदाकिनी मख्ख चेहर्‍याने उभी राहते. व्यक्तींपेक्षा त्यांचे प्रेम आणि आशीर्वाद सोबत असणे अधिक महत्त्वाचे असल्याचा संदेश देऊन जॅक आणि मॅड्स नागमूर्तीत परिवर्तित होतात. बाकी रझा मुरादचे काय झाले? बन्सी यानंतरही जुगार खेळणार का? रेखाच्या उघड्या जखमेचे सेप्टिक होऊन ती तडफडून मरते काय? भोला कामिनी सोबत संसार चालवण्यासाठी काय उद्योग करणार? हे सर्व प्रश्न गौण असल्याने दिग्दर्शक त्यावर सूचकपणे मौन बाळगतो. प्रेमाचा संदेश दिलेला असल्याने "जाओ एक दुजे से प्यार करो" असे सुरेश वाडकर-अनुराधा पौडवाल गायला लागतात, जॅक आणि मॅड्स हवेत नाचायला लागतात आणि श्रेयनामावली पडद्यावर झळकते.

(समाप्त)

हुश्शश्श ....rather फुस्स ...संपला बाबा एकदाचा पिक्चर ..जय भोलेनाथ ...अखंड मानवजात आपल्या या कार्याबद्दल ऋणी राहिल Lol

Happy
फारच मस्त!
आधी सुधीर गायब होता ना? मग पुन्हा मॅडस च्या फुस्स ने कशाला आला मरायला तिकडे? Happy
मला हे कधी पासूनचं कोडं आहे की 'सपेरा' व 'नागन' यांचे नाते हे विळ्या भोपळ्या प्रमाणे (च) असते कि सौहार्दाचेही असू शकते?
मुळात ही इच्छाधारी नाग ही कंसेप्ट आधी कुणि इंट्रोड्यूस केली? त्याला सलाम.
रझा मुराद ला 'राम तेरी गंगा मैली'... पासून मंदाकिनी मिळत नाही हे माहिती असूनही तो तिच्याच का मागे लागतो? Uhoh

अती महान विनोदी परीक्षण!
तुस्सी ग्रेट हो.

"मेरी इच्छा हैं की इंसानों की खोपडियां इतनी जमा करूं की उनका एक पहाड बन जाए. फिर उस पहाड की चोटी पर खडे होकर मैं हसूं, नाचूं. इतना नाचूं, इतना नाचूं की खोपडियां चूर चूर होकर मिट्टी बन जाए."<<<<<<

हे म्हणजे खरोखर पांढरीचे टेकाड. वरदाताईंना याच्या उत्खननात रस असेल का? Proud

इथे बालपणीच्या अस्मादिकांनी मातोश्रींकडे कमालीच्या आदराने पाहिल्याचे स्मरते. >>> हा सगळा भाग महान आहे Happy
आता पुन्हा पहिल्यापासून वाचतो. मधले सगळे वाचायचे बाकी आहे.

इथे बालपणीच्या अस्मादिकांनी मातोश्रींकडे कमालीच्या आदराने पाहिल्याचे स्मरते. >>> >> बापरे काय सॉल्लीड्ड आई आहे..हाहाहा..

इथे पिंड ज्या दोरावरून घसरत/तरंगत जाते तो दोर बारकाईने बघितल्यास दिसू शकतो. पिंड हिंदकळताना पण दिसते.>> बारकाईने कशाला.. चष्मा असलेल्याने तो न घालता पाहिला तरी दिसेल ते दोरखंड Biggrin

कमाल केलीय पायस तुम्ही !! इतक्या महान सिनेमाचं संपूर्ण पाहून परिक्षण लिहीण्याची. खूप दिवसांनी असं पोट दुखेपर्यंत हसलेय मी Lol चरण कमल कुठं आहेत आपले Happy

अथपासून इतिपर्यंत वाचलं.
दसऱ्याची नसलेली सुट्टी वसूल झाली.
पायस साष्टांग दंडवत
>>> + १

तुम्हाला मातोश्रींकडून बाळकडू मिळालयं

पायस, तो पहिला भाग थोडा पाहिला.

इथे इच्छाधारी नागांची transcending पॉवर फारच पुढे गेलेली आहे. नागातून माधवी, माधवीतून रेखा, गोर्‍या नागाचा काळा नाग, इण्डियन कोब्रा तून अमेरिकन कोब्रा, कोणातून काहीही प्रकट होउ शकते. पुढे एखाद्या सीन मधे जितेन्द्रच्या नागातून माधवी व माधवीच्या नागातून जितेन्द्र असे प्रकट होउन एकमेकांकडे पाहून चूक लक्षात आल्यावर "ऊप्स!" म्हणून पुन्हा माणूस->नाग->माणूस करतात असा एखादा "ब्लूपर" नक्की असेल 'मेकिंग ऑफ शेषनाग' मधे

बाकी अजून "शेषनाग" नावाचा संदर्भ कळाला नाही. शंकराचे भक्त वगैरेंचा संदर्भ आहे. शंकराशी संबंधित नाग तो वासुकी. शेषनागाचा संदर्भ विष्णूशी आहे. पुढे पिक्चर मधे काही आहे का पाहू. नाहीतर माधवी-नाग ची "उसके बारे मे मत सोचो" गाइडलाइन शिरोधार्य मानू.

तिसरे म्हणजे "इच्छाधारी नाग टेस्ट" ही कशी केली जाते? त्या एका सीन मधे अघोरी गारूड्यांनी पकडलेला प्रत्येक नाग हातात धरून "ये भी नहीं" म्हणताना दाखवला आहे. नागाचीच इच्छा नसेल तर अघोरीला कसा पत्ता लागणार की तो तसा आहे?

चौथे म्हणजे वाटेत जखमी होउन पडलेला नाग हा नर आहे की मादी, हे ऋषि कपूर ला कसे कळते? इतर जनावरांसारखी सोपी व्हिज्युअल सोय नसावी असा माझा समज आहे. की पटकथेत तो नसलेल्या सीन्स मधे असलेले कॉमन नॉलेज त्याला आपोआप मिळाले आहे? नशीब तो इफ्तेखार बरोबर डॉन असलेल्या त्या हॉटेलला वेढा घातलेल्या पोलिसांत नव्हता. नाहीतर तो सगळा "....लेकिन पुलिस नहीं जानती ये रिव्हॉल्वर खाली है" मधला दमच गेला असता.

पहिल्या ३०-४० मिनीटातला एपिक सीन म्हणजे जीतू-माधवी नागरूपात हवेत तरंगत नाचत असताना त्या काळ्या वासर्‍याच्या चेहर्‍यावरचे एक्स्प्रेशन्स!

नाहीतर तो सगळा "....लेकिन पुलिस नहीं जानती ये रिव्हॉल्वर खाली है" मधला दमच गेला असता.<<<<<<
Rofl तुफान कमेंट!
पण वळसा नाही, वेढा!

आज मी पण टीव्हीवर शेषनाग पाहिला थोडा वेळ. जॅक गौडचाच मारामारी सीन चालू होता.

वाह फारएण्डा! हे म्हणजे पहिल्या १० श्लोकांचं अथर्वशीर्ष झाल्यावर पुढे असलेल्या तितक्याच लांबीच्या फलश्रुती सारखं आहे. डबल धमाक्याच्या प्रतिक्षेत असलेली बाहुली Happy

तिसरे म्हणजे "इच्छाधारी नाग टेस्ट" ही कशी केली जाते? त्या एका सीन मधे अघोरी गारूड्यांनी पकडलेला प्रत्येक नाग हातात धरून "ये भी नहीं" म्हणताना दाखवला आहे. नागाचीच इच्छा नसेल तर अघोरीला कसा पत्ता लागणार की तो तसा आहे?<<<<<<

अघोरीच्या हातात इच्छाधारी नाग स्कॅनर बसवला असणार.

(३.२)
अघोरी आणि त्याच्या शोधपथकाचा मंत्र "आपण बरे आणि आपले काम बरे" असल्याने त्यांना त्यांच्या शेजारून एक पिंड घसरत चालली आहे हे दिसत नाही. >>>
आणि
(४.२)
बासरीच्या भोकांची उघडझाप केली आणि सुरावटीला साधारण मॅच होईल अशी मान झटकली की हिंदी सिनेमातले कोणतेही पात्र हरिप्रसाद चौरसिया बनू शकते या त्रिकालाबाधित सत्याची सिद्धता मिळते.>>>

Lol हे दोन्ही महान आहे.

बाय द वे 'देवदास' मधल्या दो चुटकी सिंदूर की कीमत तुम क्या जानो सवालाला या चित्रपटातून उत्तर दिले गेले आहे. अनुपम खेर रेखाला म्हणतो "पहने हुए सिंदूर की कोई कीमत नहीं होती"

पायस, खतरनाक!
टिव्हीवर काही तुकडे पाहिले, अघोरी मॅड्स आणि जितूच्या घरी येतो तेंव्हाचे संवाद फिजॉलॉजिकल ते फिलॉसॉफिकल अशी मोठी रेंज दाखवतात.

धन्यवाद सगळ्यांना Happy

मस्त लिहिले आहेस फा!

माधवी-नाग ची "उसके बारे मे मत सोचो" गाइडलाइन शिरोधार्य मानू. >> Happy तू लिहिले आहेस त्या इच्छाधारी नाग टेस्ट, ऋषी कपूरचे अंतर्ज्ञान शिवाय अनेक गोष्टींविषयी तीच गाईडलाईन शिरोधार्य मानावी लागते. काही ठिकाणी सस्पेन्शन ऑफ बिलीफची परीक्षा बघतो हा सिनेमा.

उदा. हे विषग्रहण लिहिण्याआधी मी अ‍ॅक्चुअली नागांवर थोडी शोधाशोध केली होती. म्हटलं आपल्यालाही ऋषी कपूरची नाग/नागीण ओळखण्याची अतिंद्रिय शक्ती प्राप्त झाली तर झाली. नाग - म्हणजे naja naja प्रजातीचे साप सेक्शुअली डायमॉर्फिक नसतात. म्हणजे नर आणि मादी जवळपास सारख्याच लांबीचे असतात. त्यामुळे त्यांना हातात धरून जननेंद्रिये पाहिल्याशिवाय, जी उघड्या डोळ्यांना दिसणे मुळात कठीण, त्यांच्यात फरक करता येणे शक्य नाही. आता रमत गमत चाललेल्या ऋषी कपूरला हे निरीक्षण करता येत असेल तर त्याला डॉनचे "खाली रिव्हॉल्व्हर"च काय, डॉन आणि विजयमध्येही फरक करता येईल. अगदीच खोलात जायचे म्हणले तर हा नागांवरचा रिसर्च पेपर अभ्यासावा लागेल. यातील दाव्यानुसार नर नागांचे सुळे मादी नागांपेक्षा थोडे अधिक मोठे असतात. आता ऋषी कपूरने जर तिच्या सुळ्यांकडे बारकाईने पाहिले असेल तर माहित नाही बुवा. तरीसुद्धा जंगलात भेटलेल्या रँडम पोरीला "परी" म्हणणार्‍या नरपुंगवाची नजर इतकी तीक्ष्ण असेल हे पटत नाही. इच्छाधारी टेस्ट विषयी तर बोलायलाच नको!

त्यामुळे त्यांना हातात धरून जननेंद्रिये पाहिल्याशिवाय, जी उघड्या डोळ्यांना दिसणे मुळात कठीण, त्यांच्यात फरक करता येणे शक्य नाही. आता रमत गमत चाललेल्या ऋषी कपूरला हे निरीक्षण करता येत असेल >> तो नक्की शक्ती कपूरचा शिष्य असला पाहिजे कारण, "उडती हुई मख्खी को देखकर बता सकता हूं की वो नर है की मादा" अशी अचाट शक्ती असलेला तो एकच कपूर.

Pages