पिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग ८ (अंतिम): पिथौरागढ़वरून परत

Submitted by मार्गी on 3 October, 2018 - 09:19

८ (अंतिम): पिथौरागढ़वरून परत

पिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग १: प्रस्तावना
पिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग २: पर्वतात वसलेलं एक गांव- सद्गड
पिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग ३: एक सुंदर ट्रेक: ध्वज मन्दीर
पिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग ४: कांडा गावाकडे प्रस्थान
पिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग ५: कांडा गावाचा रोमांचक ट्रेक
पिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग ६: कांडा गावाहून परत
पिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग ७: लोहाघाट यात्रा

२ डिसेंबर २०१७ ची सकाळ. काल रात्री परत पिथौरागढ़ला पोहचलो. आज इथून निघायचं आहे, कारण उद्या दुपारी दिल्लीवरून ट्रेन आहे. तसं कालच लोहाघाटवरूनच जाता आलं असतं, पण मग एक रात्र लोहाघाटला थांबावं लागलं. त्याऐवजी सगळ्यांसोबत पिथौरागढ़ला आलो आणि रात्रीचा प्रवासही अनुभवला. माझ्यासोबतचे आणखी काही दिवस थांबतील. पण मला सुट्ट्या कमी असल्यामुळे निघावं लागेल. पण हे सात दिवस खूपच मस्त होते. जवळजवळ अडीच वर्षांनंतर हिमालयाचं दर्शन झालं, सद्गड- ध्वज मंदीर व कांडाचे जबरदस्त ट्रेक करता आले. हिमालयाच्या कुशीत असलेल्या गावांमध्ये राहता आलं! आता ह्या आठवणी मनात जपत इथून निघायचं आहे.

सकाळी अकराला पिथौरागढ़च्या बस स्टँडवरून दिल्लीची बस मिळेल. दिल्लीहून फार लांबच्या ठिकाणी बस जातात! जसं दिल्ली- धारचूला, दिल्ली- महेंद्रनगर आणि दिल्ली- लेहसुद्धा (फक्त जुलै- सप्टेंबर)! चढावर वसलेलं पिथौरागढ़ गांव बघत निघालो. काही दिवस मुलीपासून दूर राहावं लागेल, तिची आज्ञा घेतली! तिचे गाल थोडे थोडे लाल झाले आहेत! बस स्टँडवर पोहचता पोहचता वाटेत मोहर्रमचा जुलूस लागला. पिथौरागढ़सारख्या गावामध्ये असा जुलूस अनपेक्षित आहे. जुलूसमध्ये शाळेतील मुले मोठ्या संख्येने आहेत. इथून थेट दिल्ली- आयएसबीटी आनंद विहारला दिवसातून दोन- तीन बस जातात. सहा तासांवर असलेल्या टनकपूरवरून आणखी बस जातात. हळु हळु बस निघाली. गुरना माता मंदीराच्या जवळ ट्रॅफिक अडवलेली नाही, त्यामुळे थांबावं लागलं नाही.

आता टनकपूरपर्यंत सर्व पर्वतच पर्वत! हिमालयातून परतीचा प्रवास सुरू! मध्ये मध्ये दूरचे शिखरही दिसत आहेत. ह्या छोट्या भ्रमंतीमध्ये सायकल चालवत आली नाही आणि दूरच्या कुठल्या ठिकाणीही जाता आलं नाही. पण तरी हिमालयात फिरता छान आलं. आता ह्याच आठवणी घेऊन पुढच्या प्रवासापर्यंत टिकाव धरायचा आहे. पिथौरागढ़- टनकपूर रस्त्यावर लोहाघाटनंतर फक्त चंपावत हेच मोठं गांव लागतं. बाकी अगदीच छोटी आहेत. तसेच वाटेत काही मिलिटरी आणि बीआरओची युनिटस आहेत, काही घरं व हॉटेलही आहेत. डोंगरातली शेती सगळीकडे दिसत राहते. आणि नजारे- त्यांची तर मालिकाच सतत सुरू असते! हळु हळु टनकपूर जवळ येतंय. टनकपूरच्या अलीकडे पंधरा किलोमीटरवर एका हॉटेलजवळ बस नाश्त्यासाठी थांबली. हिमालयाच्या चरण तलातलीच जागा! इथपर्यंत ड्रायव्हर काहीसा थकला होता, म्हणून कंडक्टरने बस चालवायला घेतली. पण दोन मिनिटांमध्येच ड्रायव्हरने त्याला थांबवलं व थकलेला असूनही बस परत चालवायला घेतली! कंडक्टरला पहाडी रस्त्यांची सवय नसावी.

आत्तापर्यंत चारही बाजूंना डोंगर होते. हळु हळु जणू एका बाजूचे डोंगर विरत चालले! थोड्याच वेळात एक अपूर्व नजारा समोर आला- तीन बाजूंना डोंगर आणि दूर एका बाजूला जमिनीचा समुद्र! तरीही चढ- उतार सुरू आहेत. हळु हळु हिमालयाची चरण- धूळ संपत गेली आणि टणकपूरचं मैदान जवळ आलं! आणि मग शहराची गर्दी सुरूच झाली! अंधार पडता पडता टनकपूरला पोहचलो. हिमालयाने आज्ञा दिली! पण उत्तराखंड रुद्रपूर सिटी पार होईपर्यंत सुरू राहील. टनकपूरला थोडा वेळ थांबून बस निघाली. टनकपूरवरून एक बस हरिद्वार मार्गे शिमलाला जाते! हिमालयातून उतरल्यानंतरही थंडी सुरू राहिली. जशी रात्र वाढत गेली तशी थंडीही वाढत गेली. पहाटे पाचच्या आसपास बस दिल्लीला पोहचली. आनंद विहार टर्मिनसला थोडा वेळ थांबून सिटी बसने नवी दिल्ली स्टेशनकडे निघालो. सिटी बस शोधण्यात थोडा वेळ गेला. बसमधूनच जामा मस्जीद आणि लाल किल्ला बघितला. दिल्लीमध्ये ह्या दिवसांमध्ये कुप्रसिद्ध धुरकं पसरलं आहे. त्यामुळे व्हिजिबिलिटी अतिशय कमी आहे. वेळेत स्टेशनला पोहचलो आणि ट्रेनही मिळाली. पण मन अजूनही हिमालयातच आहे! तिथला सन्नाटा, प्रसन्न शांती, नजारे आणि प्रगाढ आल्हादायकता! वा!

अशा इतर सर्व लेखांसाठी- माझा ब्लॉग

Group content visibility: 
Use group defaults