पिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग ७: लोहाघाट यात्रा

Submitted by मार्गी on 1 October, 2018 - 02:54

७: लोहाघाट यात्रा

पिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग १: प्रस्तावना
पिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग २: पर्वतात वसलेलं एक गांव- सद्गड
पिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग ३: एक सुंदर ट्रेक: ध्वज मन्दीर
पिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग ४: कांडा गावाकडे प्रस्थान
पिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग ५: कांडा गावाचा रोमांचक ट्रेक
पिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग ६: कांडा गावाहून परत

१ डिसेंबर २०१७ च्या दुपारी लोहाघाटला जाण्यासाठी जीपने निघालो. सकाळी एक मस्त ट्रेक झाला आहे व आता जीपचा प्रवास करायचा आहे. इथल्या पहाड़ी रस्त्यांवर वाहनाने प्रवास करणे, हासुद्धा एक ट्रेक आहे. काल येताना रस्त्यात ठेवलेलं सामान घेऊन पुढे निघालो. जीपमधूनही सुंदर नजारे दिसत आहेत. लवकरच पिथौरागढ़ला पोहचलो. इथून लोहाघाट ६० किलोमीटर अंतरावर आहे. पण संपूर्ण पहाड़ी रस्ता असल्यामुळे हा प्रवास थकवणारा होणार. पिथौरागढ़च्या पुढे गुरना माता मंदीरानंतर एका जागी जीप खूप वेळ थांबली. इथे रस्त्याचं बांधकाम नव्याने केलं जात आहेत, रस्ता बंद केला आहे व त्यामुळे वाहनांची रांग लागली आहे. इथे थोड्या अंतरावर दरीमधून रामगंगा नदी वाहते आहे. थोड्या वेळ नजा-यांचा आनंद घेतला. दुपार असूनही डिसेंबरमुळे आता थंडी वाजते आहे.

थोड्या वेळाने पुन: पुढे निघालो. सतत वळून- चढणारा किंवा उतरणारा रस्ता! जीपमध्येही थकायला झालं. उलटी होण्याची भिती! जीपच्या प्रवासामध्ये स्थानिक लोकांनाही उलटी होताना दिसली. प्रवासात पुढेही रस्ता काही ठिकाणी बंद होता. ह्या पूर्ण महामार्गाचं दुपदरीकरण केलं जात आहे. भविष्यात दो दोन- दोन लेनचा असेल. पण त्यासाठी अनेक ठिकाणी पूर्ण डोंगर कापावा लागत आहे. अनेक ठिकाणी खोदकाम सुरू आहे. ही एक विचित्र स्थिती आहे. रस्ता बनवण्यासाठी डोंगर कापावा लागतो आणि मग त्यातूनच डोंगर कोसळण्याच्या प्रक्रियेला चालना मिळते. एक दुष्टचक्र सुरू होतं... असो. दुपारच्या वेळेत लोहाघाटला पोहचलो. इथे आता लग्न समारंभ बघायचा आहे.


खालून वाहणारी रामगंगा

इथे पारंपारिक विवाह समारंभ बघता आला. कुमाऊँ रिती- रिवाज बघायला मिळाले! पारंपारिक जयमाला विधीसुद्धा बघता आला! आत्तापर्यंत एका प्रकारचं नैसर्गिक सौंदर्य बघितलं होतं, आता दुस-या प्रकारचं नैसर्गिक सौंदर्यही बघता आलं! मला अनेकदा असे विवाह समारंभ कंटाळवाणे वाटत असल्यामुळे मी मध्ये मध्य़े बाहेर मोकळ्या जागेमध्ये फिरायला गेलो. स्वेटर व टोपी घालूनही चांगलीच थंडी वाजते आहे. पण जवळच्या मैदानात मुलं मात्र थंडीचे कोणतेच कपडे न वापरता फूटबॉल खेळत आहेत, त्यांना काही थंडी वाजत नाही आहे. शरीराला उबदार ठेवण्यासाठी थोडा वेळ चालत राहिलो. खूप उशीरा विवाह कार्यक्रम संपला आणि जेवण करून परत पिथौरागढ़ला जाण्यासाठी सर्व निघाले. आता तोच जीपचा प्रवास रात्रीच्या अंधारात करायचा आहे! खरोखर हिमालयातल्या पहाड़ी रस्त्यांवर रात्री गाडी चालवण्यासाठी मोठ्या कौशल्याबरोबर हिंमतही हवी. हा रस्ता असा आहे, जिथे रात्रीही मोठ्या वाहनांची वाहतुक सुरू असते. ट्रक्सही सुरू असतात. जीपचा चालक उत्तम नियंत्रणासह जीप चालवतोय. आता शरीरालाही ह्या प्रवासाची थोडी सवय झाली आहे, त्यामुळे किंचित झोपही‌ येते आहे.

पिथौरागढ़पर्यंत वधु- वरांची गाडीही आमच्यासोबत असेल. त्यानंतर ते आजच रात्री कांडा गावी जातील आणि आजच रात्री त्यांचा गृह प्रवेश असेल. आणि त्यासाठी त्यांना रात्रीच्या अंधारात तो ट्रेक करून घरी पोहचावं लागेल! आम्ही जो ट्रेक दिवसा केला होता तो ते रात्री करतील!! दिवसा करण्यापेक्षा ते फार जास्त कठिण असणार. गावातले लोक दिवे व टॉर्च इत्यादी घेऊन त्यांना रोडवर रिसिव्ह करतील. त्यानंतर मात्र रात्रीच्या अंधारात व थंडीत त्यांना त्या पायवाटेने पायी जावं लागेल, जे की अजिबात सोपं नसणार! आणि लग्न करून आलेल्या मुलीसाठी तर हे स्थान अगदी नवीन आहे, तिलाही पायी पायीच जावं लागेल! रात्री पिथौरागढ़मध्येच माझ्या पत्नीच्या काकांकडे मुक्काम केला. पिथौरागढ़मधला एक वेगळा भाग बघितला. पण मनात विचार पायी पायी अंधारात कांडाला जाणा-या लोकांचाच आहे!

क्रमश:

पुढचा भाग- पिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग ८ (अंतिम): पिथौरागढ़वरून परत

अशा इतर सर्व लेखांसाठी- माझा ब्लॉग

Group content visibility: 
Use group defaults