मायबोलीची ओळख व अनुभव

Submitted by दीप्स on 26 March, 2009 - 03:39

नमस्कार मित्रांनो ,

इथे तुम्ही तुमची मायबोली ह्या साइटशी ओळख कशी झाली , तिथे आलेले अनुभव हरकत नसेल तर शेअर करु शकता Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

२००३ च्या डिसेंबरमधे नुकताच इथे जॉब सुरू झाला होता. नेटपण पहिल्यांदाच पूर्णवेळ मिळालं. पुलं वर किंवा त्याचं काही ऑनलाइन वाचायला मिळतय का ते शोधत होते. गुगलनं मायबोलीच्या "व्यक्ती आणि वल्ली" विभागात पोहोचवल. ते सगळं वाचल्यावर गुलमोहरात आले. तेव्हा योग ची कथा चालू होती. (दोन मित्र आणि एक मैत्रिण परदेशात असतात. चार रस्त्याचा शेवट असलेली. आठवतेय?) त्या कथेवरच्या प्रतिक्रियांचा जबर व्ही आणि सी चालला होता. तो असा कसा वागला? मग तिने त्याला असं का म्हणावं/ म्हणू नये?वगैरे. आता बघा एक तर मराठी वाचायला मिळालं. पुन्हा कथा, कविता, इतर कला तेपण प्रतिक्रियांसकट हे म्हणजे एखाद्या नेहमी २-५ रु.च्या खेळण्यानी खेळणार्‍या छोट्याला बाबांनी टॉइज आर अस मधे नेऊन हवं ते घेऊन देईन असं सांगितलं तर वाटेल नां तस्स मला वाटलं. अधाशासारख मी अर्काइव्हज वाचायला लागले. सुरवातीला आज सापडलेलं पान परत उद्या सापडेलच याची खात्री नसे. मग हळुहळु उमगलं. त्यावेळी तर मला वीकेंड आला की फार वाईट वाटे आता २ दिवस वाचायला मिळणार नाही याचं. तोपर्यंत मायबोली म्हणजे गुलमोहर असच वाटे.

एकदा मायबोलीवर कुठेतरी गेले आणि धर्म ही अफुची गोळी वगैरे काहीतरी दिसलं. (चुकुन हितगुजवर गेले होते.) सगळ्यात पहिली पोस्ट बहुतेक कुलकर्णींची होती आणि त्याखाली लिंबुटिंबुंची. आयडी मस्त आहे या विचारानं वाचायला सुरुवात केली आणि आश्चर्य आणि गंमत समप्रमाणात मिक्स केल्यावर कसं वाटेल तसं वाटलं. (वर पुन्हा मला लिंबुजी वगैरे करु नका हे पण ठणकावलं होतं. :P: या स्मायलीसकट!) आणि काय सांगावं महाराजा, त्या बाफवरची प्रत्येकाची पोस्ट्स "पांड्या पांड्या लेका बालिष्टर का नाय झालास?" या भावनेने वाचत मी गेले. (अजुनही काही बाफंवरची काही पोस्टस वाचताना असंच मनात येतं) आणि मला हितगूज सापडलं. मग तिथल्या अर्काइव्हसचा फडशा पाडला. २००५ एप्रिलमधे सदस्य झाले. मायबोली रोजच्या जीवनाचा महत्वाचा भाग झाली. काही आयडींबद्दल आपोआपच आपुलकी वाटायला लागली.

२००६ मधे तब्बल ६ महिन्यांनी मायबोलीवर आले. पहिल्या दिवशी मी इथे नसल्याच कोणाला जाणवलच नाहिये हे कळल्यावर जरा वाईट वाटलं. पण मी कोण झाशीची राणी लागुन गेलेय कि कोणी माझी आठवण ठेवेल. मग माझी कॉलेज मधली मैत्रिण पूनम(प्रिंसेस) भेटली. तिच्या कथाही वाचायला मिळाल्या. त्याचबरोबर श्रद्धा(के), सुपरमॉम्,पूनम(पी एस जी), दाद, नंदिनी(तेव्हा "रेहान" सुरु होती.), दिनेश आणि इतरांच्या कथा, दिनेश आणि गिरी यांच्या भ्रमणगाथा व दहशतवाद, देव, बापू असे दणदणीत बाफ या सगळ्यात बुडुन गेले.

२००७ जानेवारीत माझ्या छोट्याला फीटस आल्या. तेव्हा परत ब्रेक. जवळ जवळ वर्षभराने परतले तर मायबोली नवीच वाटली. जरा जमवुन घेतलं आणि नाळ परत जुळलीय. जुनी मायबोली आज्जीसारखी होती. नवी आईसारखी आहे. जराशी मॉडर्न, नवनव्या गोष्टींशी जुळवुन घेवुन त्यांना सामावुन घेणारी पण आतली माया तीच. जिव्हाळा तोच आणि मला तिची ओढही अगदी तश्शीच!

मुळात मराठी बोलणं, मराठी वातावरण हे मिळत नसल्याने त्यातून मायबोली शोधली गेली आणि मायबोलीने तो आधार भरपूर दिला त्या काळात. (निधप यांचेच वाक्य चोरले न काय? क्षमा निधप)) सुरुवातीची एक दोन वर्षे मी वेड्यासारखा वाट्टेल त्या विषयावर एकजात सगळ्या बा. फ. वर लिहीत असे. पण अनेक वादविवादांत भाग घेतल्यावर मला कळले की मला अजिबात अक्कल नाही नि काहीहि माहित नाही. पण म्हणून लिहायचे थांबलो नाही, फक्त प्रमाण कमी केले. मायबोलीवरील लोक अगदी चांगले आहेत, मैत्री करण्यास योग्य. एकमेकांना वाट्टेल ती मदत करतात. माझ्या नातेवाईकांऐवजी मा. बो. करांनीच मला जास्त मदत केली आहे. मी तसा पुणे, मुंबई, ठाणे इ. ठिकाणच्या मा. बो. करांना भेटलो आहे. जर्सीतल्या नि इथल्या आसपासच्या मा. बो. करांनाहि भेटलो आहे. फार आनंद होतो लोकांना प्रत्यक्ष भेटून. मायबोलीची अनेक स्थित्यंतरे पाहीली. पण ह्या अवस्थेत मराठी लिहीणे अतिशय सोपे झाले आहे. त्यामुळे उगाचच नको तेहि लिहीले जाते, जसे भारतावर टीका. (माझे म्हणणे मला खरे वाटते, फक्त लोकांना ते वाचायला आवडत नाही म्हणून ते लिहू नये)

मी मात्र सुरुवातीपासून एकच आय डी ठेवला आहे. नागपूरकरांना त्याचा अर्थ माहित आहे. तसे आताशा मी शास्त्रीय संगीत खूप आइकतो. समजत नाहीकाही, पण ऐकतो. तेंव्हा मी पण आय डी बदलून 'सा रे ग धा' आय डी घेण्याचा विचार करतो आहे.

एस आर के , छान पोस्ट Happy झाशीच्या राणी बद्दल अगदी पटलं Happy

'सा रे ग धा' आय डी घेण्याचा विचार करतो आहे. > झक्का , घेऊनच टाका हा आयडी Proud

**********************************************
http://www.maayboli.com/node/6733 इथे भेट द्या मित्रांनो Happy

'सा रे ग धा' आय डी घेण्याचा विचार करतो आहे. >>> झक्की :d

माझ्या एका ऑफिस कलिग ने मायबोलीची लिंक दिली होती. मग काय सुरुवातीचा गोंधळ (जो सगळ्यांनी लिहीलाय तोच आणि तसाच) सोडला तर माबो माझा अविभाज्य भाग बनली. आता माझ्या घरी माझा "अहो" आणि माझी लेक दोघांनाही काही नाव तोंड पाठ झालेत. सध्या माझ्या पेक्षा जास्त माझी लेक उत्सुक आहे गटग साठी
-------------------------------------------------------------------------------
राग लोभ, अन खेद खंत हे
दिले घेतले इथेच ठेऊ
"तिथे" न लागे ह्यातील काही
आलो तैसे निघुन जाऊ

>>(निधप यांचेच वाक्य चोरले न काय? क्षमा निधप))<<
कुणीतरी कांदा आणारे.. झक्की क्षमा म्हणाले.. मला चक्कर आली... (आता घ्या दिवे!)
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

मराठी गाणी शोधताना 'मायबोली' मिळाली. त्यात आलो तर एकदम अंताक्षरीला पोहोचलो. काय कळेनाच हे काय चाललंय. त्यामुळे परत वर्षभर इथे फिरकलोही नाही. त्यानंतर पुन्हा एकदा आठवण झाली म्हणून आलो, रजिस्टर केलं आणि मेंबर झालो. वादात शक्यतो पडायचं नाही या धोरणामुळे 'गजाली' वर खुशाली विचारणे हा एकमेव उद्योग असायचा. त्याकाळी 'अंबर / दर्शन' असे दोन आयडी तिथे दोन महिन्यातून एकदा दिसत. बाकीच्या बर्‍याच बा.फं वर काय काय चालू असे पण मी नवीन होतो. मग एकदा न्यूजर्सीचं महा सम्मेलन आलं (हो तेच २००२ चं). तेव्हा गेलो आणि बरेच लोक भेटले. पण तरी हे काही आपल्याला झेपेल असं वाटत नव्हतं.

मग कधीतरी मालवणी 'जत्रा' हा एक लेख लिहिला. अगदी भीत भीत (लिहीण्याची भीती होती). तो खरं तर 'गजाली' वर टाकला होता, पण नंतर गुलमोहर वर हलवला. काही लोकांना तो आवडला.
मग 'नमुने', त्यावर झालेली वादावादी (माझी नाही), मग 'कथा', मग 'प्रवासवर्णन' करत करत मी माबोकर कधी होऊन गेलो कळलं नाही.

आता त्यालाही आठ वर्ष झाली. आता रोज सकाळी ई-मेल उघडायच्या आधी मायबोली बघतो, यातच काय ते आलं.

विनय

कुणीतरी कांदा आणारे.. झक्की क्षमा म्हणाले.. मला चक्कर आली...

>>>> निधप, इतकी भावविवश होऊ नकोस. झक्की ते कोणत्या दिवशी म्हणालेत ते पहा! Proud Light 1

आत्ता! पहा बरे! साधे रीतीरिवाजानुसार क्षमा म्हंटले, तर त्यावरहि बसल्याजागी दोन प्रतिक्रिया!
मी इतके प्रभावी, खळबळजनक, प्रेरणादायक नि विचारप्रवर्तक लिहीतो हे पाहून मलाच भोवळ आली. आता तो कांदा मलाच द्या.

मस्त पान सुरू केलंस रे दीपू. कधीच लिहिणार होतो, पण कंटाळा नि काय. Sad
आज शनिवारचा मुहूर्त साधून स्वगत पाडायला हरकत नाही. Happy

२००४ च्या आसपास नेटवर केव्हातरी काहीतरी शोधता शोधता मायबोली भेटली होती. पण नोकरी सोडून धंदा करण्याचा (घरच्यांना अघोरी वाटणारा) निर्णय घेतल्यामूळे सणकून काम करावं लागत होतं. त्या धबडग्यात विसरून गेलो, अन नंतरही कधी संबंध आला नाही. धंद्याने मनासारखं वळण घ्यायला आणखी काही दिवस लागले अन मग हळूहळू बाहेर उन्हातान्हापावसात फिरणं कमी होऊन ऑफिसमध्ये बसणं वाढलं. बसल्या बसल्या २००८ च्या सुरूवातीस पुन्हा मायबोली 'सापडली'. उत्सूकतेने पाने चाळत गेलो अन आपल्याला तब्बल १० वर्षे उशीर झाला आहे हे कळले. Sad

सुरूवात अर्थातच गुलमोहरापासनं झाली. (बर्‍याच जणांची होत असावी) वरती कुणीतरी म्हटल्याप्रमाणे बराच काळ बंद पडलेलं लिखाण या निमित्ताने चालू झालं. कथा कवितांवर आलेल्या प्रतिक्रियांनी (हेही तेव्हा नवीनच वाटे, अप्रूप वाटे) मायबोलीच्या आणखी जवळ गेलो. Happy

मग 'हितगूज' सापडलं. सुरूवातीला अंदाजच आला नाही. काहीतरी डोक्याच्या बाहेरचं चाललंसावंसं वाटलं. Proud काही दिवस वाचत राहिलो, आणि एक दिवस काहीतरी ऊर्मी येऊन 'पुण्यातले पूणेकर' वर लिहिलं. त्यालाच पोस्ट म्हणतात, हे नंतर कळलं. तर, त्या पोस्टचा रेफरंस घेऊन कुणीतरी त्याला उत्तर दिलं. (बहूतेक स्लार्टी असावा) त्यानंतर लिहित गेलो, टाईमपास करीत गेलो. (त्यानंतर सिंहगडरोडवरही एक दिवस 'रीतसर', 'नम्रपणे', 'येऊ का?' असं विचारलं. त्याच रीतसरपणे मग 'रॅगिंग'ही झाली). आपोआपच कधी इथं पुर्णपणे मिसळलो, ते मलाच कळलं नाही. त्रासलेल्या डोक्याला घटकाभर आराम असं सुरूवातीचं स्वरूप पार बदलून ते ऑफिसात आल्यानंतर पहिल्यांदा डोकावून बघण्याचं अन नंतर दिवसभर मिनिमाइझ्-मॅक्झिमाइझ या स्वरूपात डोळ्यांसमोर- असं झालं.

त्याच दरम्यान सासवडपर्यंतची पायी 'वारी' काही मित्रांसोबत केली, अन त्याच्या गप्पा एस्जी / पीपी वर चालू केल्या, तेव्हा इथं बडबड न करता रीतसर गुलमोहरावर लिही- असा प्रेमळ सल्ला कम दटावणी (पूनमची) मिळाली. थोडा विचार करून मग एका अनामिक ऊर्मीनं लिहून गेलो, अन प्रतिक्रिया बघून धक्काच बसला. अशा विषयावर कुणी प्रतिक्रिया देईल हे मनातही कधी आलं नव्हतं. या 'वाहती रीत' मूळे मला मायबोलीकरांनी खरंखूरं 'स्वीकारलं' असं वाटलं. (किंवा 'झेललं' म्हणा हवं तर Happy )

या वेळी आलेला आत्मविश्वास मला खरोखर बरंच काही देऊन गेला. फ्रस्ट्रेशनचे काही प्रसंग आले, तेव्हा मायबोली म्हणजे एक- गोंजारून घ्यायचं, मन मोकळं करण्याचं, मित्रत्वाच्या सल्ल्यांचं, तर कधी मायेनं हात फिरवून घ्यायचं एक हक्काचं ठिकाणच झालं. हा दिलासा अन आत्मविश्वास रोजचं जगणं जगताना एक 'अ‍ॅडिशनल पॉवर' देऊन गेला- घाट चढताना दुसरं इंजिन जोडल्यामूळे गाडीने लीलया अवघड घाट पार करावा तसे. यानंतर मग मी मायबोलीकर असल्याचं इतरांनाही अभिमानानं सांगू लागलो. तुम्हीही सभासद व्हा म्हणूनही सांगू लागलो.

सावकाश व्ही अँड सी कडे (किंवा जिथं प्रेमळ चर्चा चालतात अशा बीबींवर Proud ) वळलो. अन सगळ्यांचं नवीन असताना होतं तेच माझंही झालं. इथं अनावश्यक 'पेटून' काही फायदा नाही हे कळू लागलं. व्यक्तीवर हल्ला अन त्याच्या मतांवर हल्ला यातला फरकही कळू लागला. ऑनलाईन फोरमवर वागण्याचे अलिखित नियमही हळूहळू कळले. पण हे समजल्यावरही अजून बरंच शिकायचं आहे, हे दिवसागणिक कळू लागलं.

त्याच दरम्यान वर्षाविहार झाला, अन रोज आभासी रुपात नेटावर भेटणारी मायबोलीची जितीजागती माणसं प्रत्यक्ष पाहून मनापासून समाधान वाटलं. आपण योग्य ठिकाणी असल्याचं कळलं. वर्षाविहाराने मायबोलीकरांना भेटण्याची ओढ लावली. इथले कलाकार, कलंदर, व्यासंगी, कवी, लेखक, विचारवंत बघून स्तिमित झालो. विनोदी वृत्ती, हसतखेळत अन हलकेच घेण्याचा प्रकार, खडूस अन बोचरे टोमणे, हळूचचे चिमटे अन गुदगूल्या, फटकळपणा, मत मांडण्याची कळकळ, आपल्या मताचाच आग्रह, दुसर्‍यांच्या मताचा आदर असा अनेकरंगी कोलाज मनाला भावून गेला. त्यांच्या तुलनेत बर्‍याच गोष्टी आपल्यात कमी आहेत, हे जाणवलं. या सर्वांना आपला व्यवसाय, नोकरी, वैयक्तिक अडचणी, आपलं सोशल स्टेटस वगैरे सगळं काही बाजूला ठेऊन एकाच पातळीवर समरसताना पाहून कौतूक वाटलं. प्रत्येकाकडे काहीतरी वेगळं, चांगलं, शिकण्यासारखं आहे- हे माझ्यातल्या व्यावसायिक बाजूला कळलं. विचारांना क्लॅरिटी मिळाली. (क्षमा, नीधप! Proud )

अगदी अभिमानानं सांगू इच्छितो, की वैयक्तिक आयूष्य जगण्यातच नाही, तर माझ्या व्यवसायातही या सगळ्या गोष्टींचा फायदा झाला. तो कसा, हा स्वतंत्र ललिताचा विषय होईल. (ते लिहितोच सावकाश, अशाच एखाद्या स्वगतवारी Happy )

हा प्रवास असा सुरू झाला, अन ही- तिथनं थोडं आणखी पूढे येऊन एका वळणावर मागे बघताना एक सुखावणारी जाणीव. पुढे हा रस्ता कुठे जाईल माहिती नाही. पण कुठेही जावो, आता तरी- आय अ‍ॅम हॅपी. Happy

--
कवितांनो, ललितांनो, आता बस! एक या दो, बस्स बस्स!!

"पांड्या पांड्या लेका बालिष्टर का नाय झालास?">>> Lol

अगदी, अगदी. देव, बापू, धर्म, अन काही वादग्रस्त कादंबर्‍यांवरचे जुने बीबी उकरून काढून वाचले, तेव्हा मीही असाच जागोजागी सांष्टांग नमस्कार घातला होता. Proud

--
कवितांनो, ललितांनो, आता बस! एक या दो, बस्स बस्स!!

दिग्गजांनी इतकं चांगल लिहीलयं ना, की आपण काय लिहावं म्हणून लिहीले नाही.. Happy
तरीही... मला मायबोलीचा शोध २००६ ला एक मराठी गाणं नेटवर शोधताना लागला. आधी नुसतं वाचत राहिले. नंतर सदस्य बनले. ऑफिसमधल्या रिकाम्या वेळेचं काय करावं हा प्रश्नच राहिला नाही.. आधी वेळ मिळाला की मा.बो. वर यायची आता मात्र व्यसन लागलय. सकाळी मेल चेक करताना आपोआप मा.बो. पण ऊघडून मिनिमाईज केली जाते. Happy वेळ नसला तर निदान वाचावं तर लागतच.

सगळ्यांसारखा मलाही चांगला-वाईट अनुभव आलाच. पण अनुल्लेख कोणी केला तरी मला काहीच वाटलं नाही कधी, कारण हे तरल विश्व (virtual world) आहे तेव्हा याने आपल्याला काय फरक पडणार आहे/पडावा? पण माबोकर केदार१२३ माझ्या गावी आला तेव्हा संपर्क करून जेव्हा भेटला तेव्हा म्हनलं, नाही ही जी आपल्या तरल मित्रमैत्रिणींविषयी आपल्याला जी आपुलकी वाटते, ते वर कुणीसं म्हटल्याप्रमाणे विस्तारित कुटुंब आहे हे खरय.. Happy
गुलमोहोरात चांगल्या कथा, ललितं वाचायला मिळतं, अन या चांगल्या लेखकांविषयी मनात आदर/प्रिती(खरोखर) निर्माण होते, धन्यवाद त्या सगळ्यांना की इथं ते आपलं साहित्य टाकतात.. Happy
कविता मी सहसा वाचत नाही. हल्ली मात्र प्रतिक्रियांसाठी काही वाचल्या.. Proud
बस, इतकच.. Happy

>>अगदी, अगदी. देव, बापू, धर्म, अन काही वादग्रस्त कादंबर्‍यांवरचे जुने बीबी उकरून काढून वाचले, तेव्हा मीही असाच जागोजागी सांष्टांग नमस्कार घातला होता

Happy Happy Happy

गेले ते दिन गेले.

साजिरा , छान लिहिलं आहेस Happy

बाकी अजून राहीलेल्या लोकांनी जरा मनावर घेऊन इथे त्यांचे अनुभव शेअर करावेत Happy

मृण्मयी,शोनू,मैत्रेयी,डीजे,अ‍ॅडम,स्लार्टी,आशु_डी,ट्युलिप,मीनू ,मनुस्वीनी,बी,डॅफोडील्स२३ तुमचे अनुभव वाचायला आवडेल , जरा तेवढं लिहायचं मनावर घ्या .

**********************************************
http://www.maayboli.com/node/6733 इथे भेट द्या मित्रांनो Happy

काही वर्षांपूर्वी (बहुधा २००४ असावे) मराठी वाचायची खूप हुक्की आली होती. आणि इथे ऑस्ट्रेलियात काही मराठी मिळणे अशक्य होते. नवरा मराठी असूनही इंदोर आणि गुजराती भागात वाढलेला. त्याचं हिंदी आणि गुजराती मराठीपेक्षा खूपच चांगलं असल्याने त्याला साहित्य, आणि तेही मराठी याचं वावडंच होतं. नेटवर मराठी कथा इ. सर्च करताना ही साईट सापडली. आणि बर्‍याच कथा, ललित वाचायला मिळाले. त्याच सुमारास सुमॉने (मोठी बहीण) पण मायबोलीवर ती लिहिते/रोज जाते, मायबोली कसं छान आहे हे सांगितलं. मग रोजच इथे येणं सुरु झालं, पहिले नुसतं वाचतच होते. हळूहळू पोस्टी पण टाकायला लागले आणि मला इथे अनेक चांगल्या मित्र मैत्रिणी, मुख्य म्हणजे समान आवडीनिवडी असलेल्या मिळाल्या. पुण्यात एका छोटेखानी गटग ला गेले असताना दिनेशदा, जीएस१, आरती, कूल, भक्ती-मिहिर, क्षिप्रा आणि मृ (मृण्मयी नव्हे) भेटले. युरोपला गेले असताना नलिनीची भेट झाली आणि जपान तर केपीच्या कृपेने बघायला मिळाला. मायबोलीमुळे मला एका जागी इतके चांगले मित्रमैत्रिणी मिळाले आणि मायमराठीपासून दूर गेल्याने नाही म्हटलं तरी एक पोकळी निर्माण झाली होती, ती भरून निघाली.
आता रोज इथे येते हे सांगायची गरज नाहीच.

मी सुद्धा २ वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून मायबोली वर आहे आणी मला जरी लिहीता येत नसलं काही तरी सगळ्यांनी लिहीलेलं सगळच वाचतो, कविता सोडून ( कारण त्या कळत नाहीत) असो,
तर वाचलेल्यापैकी मला झक्की, साजिरा, नी ( श्वास ची पूर्ण मालिका), लिम्बू, आणी बरेचसे थोथोर लेखक्-लेखिकांनी केलेले लिखाण वाचले आहे आणी वाचत वाचत हा मायबोलीवरचा प्रवास सुरू आहे.

मी दुबईला असताना, एका सायबरकॅफे मधे बसलो होतो. शेजारी एक स्थानिक माणूस नेटवरती अरेबिक गाणी ऐकत होता. मी म्हंट्लं बघुया मराठी गाणी आहेत का ? तर सर्च केल्यावर मराठी गाण्यांच्या साइट दिसल्या पण अंताक्षरी पण दिसली, म वरुन गाणे लिहायचे होते, लिहायला गेलो तर मेंबर होणे आवश्यक आहे असे कळले, मेंबर झालो.
मग मात्र मागे वळुन बघितलेच नाही. माबो वर येण्याआधी एक लेख (सोयरे )लोकसत्ता मधे लिहिला होता. त्याच मालिकेतले अवघी विठाई माझी, फलेषू सर्वदा, रचुनी त्यांचे झेले असे लेख लिहिले त्याना उदंड प्रतिसाद मिळाला. मग कथा लिहु लागलो. त्याही बर्‍याच झाल्या.
पाककृति हे तर माझे अत्यंत आवडते क्षेत्र, तिथे तर मी अजून लिहीत असतो.
एका मायबोलीकराने, मला रंगीबेरंगी चे पान, भेट म्हणून दिले. तिथेहि लिहीत गेलो. १०० च्या वर लेख निव्वळ फूलांबद्द्ल असतील.
पण या साइट्पेक्षा मला जो मित्रपरिवार मिळाला, त्याचे महत्व अधिक आहे. आणि हि ओळख केवळ तोंडदेखली राहिली नाही तर अनेक मायबोलीकरांच्या "घरातला माणूस" मी झालो. हा परिवार आजहि वाढतोय.
माझ्या आयुष्यातील एका अवघड कालावधीत, या सर्व मित्रमंडळीनी मला जो आधार दिलाय, त्या ॠणातच मला कायम रहायचे आहे. ( याचा उल्लेख मी अनेकवेळा केलाय, पण तरीहि तो पुरेसा आहे असे मला वाटत नाही )

दिनेश,
कित्ती छान पोस्ट Happy खूप आवडली...
पुण्यातल्या गटगला तुमची आठवण निघाली होती... Happy

----------------------------------------------------
http://www.maayboli.com/node/7028 - वृतांत पुणे गटग
----------------------------------------------------

व्वा, काय मस्त धागा सुरु केलाय हा!!
माबोशी ओळख मंदार कमलापूरकरमुळे झाली (तोच सध्या इथून गायब आहे).मी सगळ्यात आधी वाचलेला धागा म्हणजे 'अ आनि अ सिन्स' व 'चुकीची ऐकलेली गाणी'.इतका प्रचंड हसलो होतो तेंव्हा.आधी काही दिवस हाच टीपि चालला होता.'शिवाजी महाराजांचे गुरु कोण' या धाग्यापासून मात्र मला पहिल्यांदा माबोवर दाखल झाल्यासारखे वाटले.माझी वाद घालण्याची खुमखुमी व पेशन्स दोन्हीची आवड भागली!
लिखाण करायची आवड नक्कीच आहे पण अतिआळसही,माबोवर मात्र आरामात माझ्या गतीने लिहित गेलो.पुन्हा लिखाणोत्तर सोपस्कार नसल्याने तात्काळ प्रकाशन व प्रतिक्रिया हे ही भावले.सोलापूर,पंचम वरच्या लेखांचे कौतूकही झाले.
नविन मित्र तर सतत मिळत आहेत.अनुल्लेख वगैरे मला लक्षात येत नाही त्यामुळे त्याचा त्रासही होत नाही.केदारजोशी,लिंब्या,स्लार्टी,चिन्या १९८५ इ. जुन्या माबोकरांनीही मतभेद झाले तरी मुद्द्यांना धरुन कायमच उत्तम चर्चा केली आहे.अरे ला कारे म्हणुन,मुद्दा स्पष्ट करत आणि कसलाही पुर्व वा पश्चिमग्रह मनात न ठेवता आत्तापर्यंतची वाटचाल झाली आहे,ती तशीच रहावी ही इच्छा.
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

खर तर आठवावच लागेल मला मा बो चा शोध कसा लागला ते, खर म्हणजे मी गुगल वर सतत काही ना काही तरी मराठी वाचायला बघत असायचे, कविता, लेख , विशेष करुन लहान मुलांसाठी गोष्टी वगरे,.
मग एकदा' माझी मराठी 'अशी साईट शोधली, नंतर असच एकदा मायमराठी टाईप करताना मायबोली चा शोध लागला, आणि मला एकदम खजिना सापडल्याचा आनंद झाला. पहिले सगळे दिवाळी अंक वाचुन काढले, नंतर काही लेख, कविता, विनोदी लेखन, मग मेंबर झाले तो पर्यंत काहीच माहिती नव्हत,
अनेकांच्या कविता,लेख,प्रतिक्रिया बघुन मला ही थोडी स्फुर्ती मिळाली लिहायची.
खुप छान मित्र मंडळी भेटले, मी खुप ठिकाणी फिरले वडीलांच्या बदली मुळे, त्यामुळे बर्याच ठिकाणच्या शाळेतले मित्र मैत्रीणी भेटले.
आणि आता एकही दिवस मा बो वर आल्याशिवाय जात नाही. परवा लेकीशी गेम खेळताना माझ्या वर पनिशमेंट आली, तर ती म्हणाली तुझी पनिश्मेंट म्हणजे, मा बो उघडायच नाही एक दिवस.
मी म्हंटल तेवढ सोडुन सांग.ते शक्य नाही

मायबोलीची ओळख..! खरंच हे सोनं मला गवसलं तो सुवर्णक्षणच म्हणायला हवा! गेल्या वर्षी इंटरर्नशिपच्या काळात रिकामं बसून राहण्यापेक्षा मराठी कथा, जोक्स, गाणी वाचायच्या भुकेत सापडलेलं हे पक्वान्न. सुरुवातीला नुसतं वाचताना लिहायची ऊर्मी कधी आली आणि इथे मी कधी सामावली गेले ते समजलंच नाही. सुरुवातीला फक्त सिंहगड रोड, गजाली, अंताक्षरी वर बागडणारी मी आता वाचू आनंदे, कोणाशी तरी बोलायचंय, गुलमोहर, अगदी अलीकडे पाकृवर सुध्दा भिरभिरत असते.. वर कुणीतरी म्हटल्याप्रमाणे हे तरल विश्वच! पण या आभासी जगातही आपण आपल्या चेहर्‍याशिवाय केवळ शब्दातून स्वतःची एक ओळख निर्माण करु शकतो. मी आजवर एकदाही जुन्या हितगुजवर गेले नाहीये..कारण माझ्या संपर्कात येणार्‍या प्रत्येक माबोकराला मला माझ्या नजरेतून पाहायचंय.. आपले शब्द हे आपल्या प्रतिबिंबाच्या स्वरुपात उमटत असतात हे शब्दसामर्थ्य आपोआपच उमगत गेलं..मग स्वत:ला जास्तीत जास्त चांगलं बनवण्याचा , लोकांसमोर स्वतःला मांडण्याचा छंदच जडला.. कधी पोस्ट्मधून , कधी ललित, कधी कथांमधून तर कधी चक्क विपूतून! माझ्या वारीवरच्या लेखाला जो उदंड प्रतिसाद मिळाला त्यातून मला आपलेपणाची जाणीव झाली. हे सगळे आपलेच आहेत.. जिंकलो तर डोक्यावर घेणार हरलो तर बोटं दाखवणार! भारतीय क्रिकेट टीमसारखं! त्यामुळे टेन्शन नही लेने का! लिखते रहने का! जे पटेल, रुचेल ते घ्यावं, नाही ते सोडावं..
माझी मायबोलीचं नातं इतकं घनिष्ट झालंय की घरी, ऑफिसमध्ये त्यावरच्या गंमती सांगताना मला आवरता येत नाही. एक कलीग तर मला, "मायबोली" च हाक मारतो! इथे आल्यावर मला नवीन नावं मिळाली (पुपुवाले, माहितीये ना? :)) ,नवीन नाती मिळाली..अत्यंत हुशार, परंतू विभिन्न क्षेत्रांत अतिशय जोमाने वाटचाल करत असलेली मंडळी आपल्या दोस्त मंडळीच्या यादीत येतात याचा खरोखरीच अभिमान वाटतो. प्रत्येकाकडून काही शिकण्यासारखं आहे..जोडसाखळीच्या खेळासारखं एका एका दोस्ताच्या कडीने हे वर्तुळ पूर्ण करायचंय.. मातृभाषेच्या या आविष्काराचा फेर धरुन आनंद लुटायचाय.. व्यक्त व्हायचंय.. व्यक्त होऊ द्यायचंय..हसत हसत जगायचंय!! Happy
हे पान सुरु केल्याबद्द्ल दीपू तुझे आभार! Happy

दिप्याने सांगीतले तर लिहीतो. Happy

२००२ च्या आसपास कधीतरी गुगलवर मराठी सर्च केले तेंव्हा मायबोली मिळाली. सर्च करताना काही खास सर्च न्हवता तर मराठी साईटस असा जनरिक सर्च मारला होता. मग मध्ये येउन पाहिले. काही गोष्टी आवडल्या. मग काही दिवस वाचक आणि नंतर सदस्य झालो. अंताक्षरीवर ललिताकाकू लिहायच्या. त्या आजकाल दिसत नाहीत.
वेगवेगळ्या विषयांवरच्या कथा, कविता वाचायला मिळाल्या, एका कवितेवरच्या चर्चेत बराच गोंधळ उडाला होता. तिथे कविता कशी होते अशी चर्चा बरेच दिवस चांगल्या स्वरुपात चालली होती.

तेंव्हा मायबोलीचे स्वरुप बदलायचे का? ह्यावर एक व्हि अ‍ॅन्ड सी चालू होता, तिथे काही बाही लिहीले. पहिली पोस्ट कुठे होती हे मात्र आठवत नाही.

पुपु तेंव्हा वेगळा होता. Happy नविन जुना वाद काही नविन नाही. आणि तो ड्यु आयडी वादही नवा नाही. पण तेंव्हा ज रा स्वरुप वेगळे होते.

व्हि अ‍ॅन्ड सी मध्ये बर्‍याच गोष्टींवर चर्चा झाल्या. लिंब्याने कुठेतरी लिहील्यासारखे आपोआपच एका विचारसरनीच्या लोकांचे ग्रुप व्हि अ‍ॅन्ड् सी वर तयार झाले. पण नविन मायबोली व जुन्यात एक मोठा फरक जाणवतो तो म्हणजे, आम्ही ज्या चर्चा केल्या त्यात पर्सनल कधीही झालो न्हवतो, म्हणूनच लालभाई नंतर माझे मित्र झाले पण आजकाल बरेचदा व्यक्तीगत टिकाच असते. जुने ते सोने ह्या मताचा मी नाही, पण तरीही हे लिहावे वाटले. मुद्दा संपला की दे शिवी मग असे बरेच लोक करतात. Happy
बर्‍याच चर्चांमधून दृष्टीकोण चांगला ठेवला तर शिकायला मिळते. दिवसरात्र लोक चर्चा करत होते, पण दुसर्‍या बाफवर मात्र ते मित्रासारखे राहत होते, ते आता कमी झालेय. गंमत म्हणजे आजकालच्या व्हि अ‍ॅन्ड सी वरुन एक लक्षात येते की ही लोक बरीच उथळ झाली आहेत. संवेदनशिल विषय आला की लगेच थोड्यावेळाने शिव्या. माझे ते बरोबर मत आणि इतरांची विचारसरणी चुकीची. Happy

किती गोष्टी लिहीणार. इथेच थांबतो.

एकुनच मेल पाहन्याआधी मायबोली उघडल्या जाते. पुर्वीही तसे होते, आजही तसेच आहे. पुढचे माहीत नाही.

माझ्या ओळखीची खूप जण मायबोलीचे वाचक होते आणि आहेत. बालकवींच्या कोणत्यातरी कवितेचा संदर्भ हवा होता. गुग्लवर सर्च केल्यावर माय्बोलीच्या कोणत्यशा बालकवींच्या कवितांच्या चर्चेची लिंक आली. आणि मग मी सभासद झाले.

प्राजु

जुन्या मायबोलीवरील चर्चांचा एक महत्वाचा भाग म्हणजे "झक्काझक्की" आणि "हुडाहुडी" Happy
नक्की कुठली चर्चा होती ते आठवत नाही पण,
रॉबिनहूडः ओ बावाजी तुमची ती स्माईली काढा आधी. उंदरासारखी दिसतेय.
(झक्कींची एक कस्ट्ममेड स्माईली आहे. ती त्यांच्या "हटकेश्वर हटकेश्वर" च्या आसपास सापडते.)
झक्की: का? घाबरता का उंदराला?
रॉबिनहूडः उंदराला काय त्याला बनवणार्‍यालासुद्धा घाबरत नाही. ....
and so on....पुण्यातल्या एका ग ट ग मधे या दोघांची भेट झाल्यापासुन मात्र "ते सुखाने नांदु? ............लागलेत"
लालभाइ, कुलकर्णी,च्यायला ,आणि पुराव्यानी शाबित "संतु" यांच्या पोस्टींच्या आठवणीही जाग्या झाल्या.

लालभाइ, कुलकर्णी,आणि पुराव्यानी शाबित "संतु" यांच्या पोस्टींच्या आठवणीही जाग्या झाल्या.
>> मला आईने अकबरी आठवलं.. Happy
--------------
नंदिनी
--------------

आईने अकबरी Rofl आता बर्‍याच जणांना परत जुन्या माबो त जावे लागेल आईने अकबरी म्हणजे काय बघायला...

Pages