वांग्याची झटपट सुकी भाजी: प्रेमळ पद्धत

Submitted by किल्ली on 30 August, 2018 - 09:23
wangyachi suki bhaji
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

- ताजी वांगी: पाव किलो/८-९ (मोठ्या आकाराची असतील तर उत्तम)
- कोथिंबीर बारीक चिरून
- लाल तिखट :चवीनुसार
- मीठ :चवीनुसार
- धण्याची पूड - चिमूटभर
- हळद - चिमूटभर
- दाण्याचे कूट /तिळाचे कूट
- तेल - थोडेसे- फोडणीसाठी
- हिंग
- कुठला तुमचा खास गरम /काळा /घरगुती मसाला असेल तर तोही घ्या चिमूटभर, नाहीतर फार विचार न करता चिमूटभर गरम मसाला द्या ढकलून
- चार दाणे साखर

क्रमवार पाककृती: 

घरात खूप वांगी असतील, भरली किंवा मसाल्याची भाजी करण्यास वेळ नसेल, तर एक झटपट भाजी म्हणून हा प्रकार करावा.
सोपी कृती आहे, कष्ट फारसे नाहीत. एका बाजूला पोळ्या करताना सहज होऊन जाते

- जाड बुडाच्या कढईत तेल तापत ठेवावे. नेहमीच्या फोडणीला घेतो त्यापेक्षा जास्तच तेल घ्यावे. अंदाजे छोटी अर्धी वाटी वगैरे.
- ताजी रसरशीत वांगी घ्यावीत. काटे काढून टाकावेत. वांग्याच्या उभ्या फोडी चिरून घ्याव्यात. पाण्यात भिजवू नये.
सगळी तयारी करून शेवटी वांगी चिरून थेट फोडणीत घालता येतील असे पाहावे.
- तेल तापले की त्यात मोहरी/जिरे तडतडवून आणि हिंग घालून फोडणी करावी
- चिरलेली वांगी फोडणीत घालून नीट मिसळून घ्यावे .
- आता प्रेमळपणे कढईवर झाकण ठेवून अत्यंत मंद आचेवर वांगी स्वतः च्या रसात वाफेवर शिजतील ह्या आशेवर पोळ्या किंवा इतर वेळखाऊ काम करावे
- १५-२० मिनिटात वांगी चांगली परतल्या जातात आणि त्यांच्या आकार बदलतो
- भाजीच्या फोडी परतून झाल्यांनतर त्यात लाल तिखटाची पूड, मीठ, हळद , मसाला, दाण्याचे कूट, साखरेचे फक्त ४ दाणे घालून मिसळून घ्यावे
- पुन्हा एकदा प्रेमळपणे कढईवर झाकण ठेवून अत्यंत मंद आचेवर ५ मिनिटे ठेवावे.
- शेवटी सजावटीसाठी कोथिंबीर आहेच !

अशाच प्रकारे गवारीच्या शेंगेचे दोन भाग तोडून तिचीही सुकी भाजी करता येते

वाढणी/प्रमाण: 
अधिक टिपा: 

डब्यात देण्यासाठी उत्तम पर्याय आहे
झटपट होते
फार मसाले वगैरे लागत नाहीत. तेल जास्त लागते मात्र! ( shallow fry method )
ही भाजी शक्य तितक्या मंद आचेवर होऊ द्यावी
ह्यात कांदा,लसूण, आलं वगैरेची गरज नाही, पण आवडत असेल तर फोडणीत बारीक ठेचून घालू शकता

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छानच लागेल.
तशीही वांग्याची भाजी मला आवडतेच.

प्रेमळपणे कढईवर >>>>>>> tikaDe kaDhaI saNasaNeet taapavaayachee aaNi ithe प्रेमळपणे कढईवर झाकण घालायचे.पा.कृ. करायला हवी.

बरं, रागीट पद्धतीची पाकृ पण येणाराय का?.......:D

सॉलिड मस्त दिसतेय भाजी. करुन बघेन अशी.

वांग्याच्या काच-यापण छान होतात. फोडणी आणि फक्त तिखट मिठ घालून. किंचित ओवा, मिरपुडपण छान लागते त्यात.

शीर्षकात प्रेमळ पद्धत असं वाचुन पाकृ वाचली नाही. Happy
पण तयार भाजी बघुन आजिबात वाटत नाहीये की ही भाजी प्रेमळ पद्धतीने बनवली आहे एवढी तिला (भाजीला) भाजली आहे. आणि फिस्करुन टाकली आहे. Happy
रागीट पद्धत आली तर वाचेन. Happy
हलके घ्या. Happy
अशी भाजी मी पण बनवते. झटपट होते. आणि भाकरीशी मस्त लागते.

व्वा खमंग वास सुटलाय
तसं वांग्याच भरीत माझ फेवरेट
हेही बनवायला सांगतो आईला. Happy

सस्मिते.. Lol

मला आधी त्यातली वांगी दिसलीच नाहीत. म्हटलं वांग्याची भाजी म्हणून गवारच्या भाजीचा फोटो टाकलास की काय. Wink
पण सोपी आणि चांगली वाटतेय. करुन बघेनच.

लागणारे जिन्नस:
- ताजी वांगी: पाव किलो/८-९ (मोठ्या आकाराची असतील तर उत्तम)
<<

पाव किलो वजनामधे ८-९ मोठ्या आकाराची वांगी कोणत्या मार्केट मध्ये मिळतात ?

पाव किलो वजनामधे ८-९ मोठ्या आकाराची वांगी कोणत्या मार्केट मध्ये मिळतात ?>>>
पाव किलो/८-९
तो '/' किवा ह्या अर्थाने वापरलाय
तात्पर्य: खुप वान्गी असतील तर ती ह्या कृतीने वापरा आणि सम्पवा Lol

सर्वांचे आभार!! Happy

Lol
आमच्याकडे सगळ्यात ताजी वांगी आहेत. आज केली होती भाजी (पाण्याचा वापर न करता) पण लहान तुकडे केले होते, भाजी छान झाली होती. आता अशीही करून बघता येईल...

रागीट पद्धत आली तर वाचेन << रागीट पध्धत म्हणजे भरीतच असेल....
वांग आवडतं. मी ह्यात शेंगदाण्याची चटणी टाकते २ चमचे... पण अशी तोंडली सारखी कापुन कधी केली नाही. आता करुन बघेन...