विविध आहार-प्रणाली आणि शरीराचा प्रतिसाद

Submitted by सई केसकर on 23 August, 2018 - 08:40

शाम भागवत यांच्या दीक्षित प्रणालीवरच्या धाग्यामुळे बरीच चर्चा झाली. त्यातून काही मुद्दे आले आहेत, ज्यांवर मी एक प्रतिसाद लिहायला घेतला होता. पण त्या प्रतिसादाचा लेखच होऊ लागल्यामुळे तो वेगळा लेख म्हणून इथे देत आहे. त्या चर्चेत आलेले काही प्रश्न आणि त्यांची (मला माहिती असलेली) उत्तरे इथे लिहीत आहे. पण त्या आधी एक महत्वाचा मुद्दा मांडण्याची गरज वाटते. आपण आहारात बदल, मग तो कुठलीही आहार प्रणाली (दर दोन तासांचा मिताहार (ऋजुता दिवेकर), आयएफ, दीक्षित, फाईव्ह टू, कीटोजेनीक) वापरून करीत असू. पण आपला मूळ हेतू काय आहे हे निश्चित असणे गरजेचे आहे. असे म्हंटले जाते की टाईप २ डायबेटीस हा लठ्ठपणामुळे होतो. पण अलीकडच्या संशोधनातून असे सिद्ध होते आहे की लठ्ठपणा हा टाईप २ होण्याचे पहिले लक्षण आहे. या दोन्हीमध्ये सूक्ष्मसा फरक आहे. लठ्ठपणा हा डायबेटीसचे कारण नसून ते एक लक्षण आहे. पण मग सगळ्या लठ्ठ व्यक्तींना डायबेटीस असतो का? याचे उत्तर अर्थातच नाही असे आहे. आणि सगळ्या सडपातळ व्यक्तींना डायबेटीस होण्याचा अजिबात धोका नसतो का? असेही नाही.

पण चाळिशीनंतर आहारात बदल करणारे, मग ते स्वयंप्रेरणेने असो किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने, बरेच लोक या पैकी एकाशी (लठ्ठपणा किंवा डायबेटीस) किंवा दोन्हीशी झगडत असतात. जे दोन्ही गोष्टींशी झगडत असतात त्यांचा एक उपगट होऊ शकतो. आणि अशा लोकांमध्ये अनुवांशिकतेमुळे आधी लठ्ठपणा आणि मग टाईप २ डायबेटीस अशी अधोगती झालेली दिसते. पण वरील पैकी कुठल्याही गटात तुम्ही असलात आणि तुम्ही वेगवेगळ्या आहार पद्धती वापरून तुमचे वजन किंवा साखर आटोक्यात ठेवायचा प्रयत्न करत असाल तरी तुमच्या शरीराचा प्रतिसाद एकाच प्रकारचा असतो. आणि हे कसे होते ते मी इथे लिहायचा प्रयत्न करणार आहे. इथे मी शास्त्रीय रेफरन्सेस देत नाहीये कारण हे बऱ्याच पुस्तकातील माहितीवर आधारित आहे. ज्यांना जशी माहिती हवी असेल तशी आपण प्रतिक्रियांमध्ये चर्चेला घेऊ. म्हणजे आपल्या सगळ्यांनाच एक संकलित धागा मिळेल.

वजन वाढीचे आणि ग्लुकोज वापराचे जीवरसायनशास्त्र

वजन कसं कमी होतं हे जाणून घेण्यासाठी शरीरातील एका महत्वाच्या अवयवाबद्दल थोडी माहिती असली पाहिजे. ते म्हणजे पॅनक्रिया अर्थात स्वादुपिंड. या ग्रंथीला आपण शरीरातील "फूड डिस्ट्रिब्युशन मॅनेजर" असं म्हणू शकतो. आपण खाल्लेल्या अन्नातील ग्लुकोज आपल्या शरीराच्या कानाकोपऱ्यात नेण्याचे काम इथे तयार होणाऱ्या संप्रेरकांमुळे होत असते. स्वादुपिंडात अल्फा, बीटा, डेल्टा, गामा आणि इप्सिलॉन अशी नावे असलेल्या पेशी असतात. त्यातून वेगवेगळी संप्रेरके सोडली जातात. आणि कुठलं संप्रेरक कधी येईल हे मात्र आपण खाल्लेले अन्न ठरवते. यातील दोन महत्वाची संप्रेरके आहेत इन्सुलिन आणि ग्लुकागॉन.

इन्सुलिन (ज्याची कमतरता किंवा अभाव यात डायबेटीस २ आणि १ होतात) रक्तातील ग्लुकोज नियंत्रित ठेवण्याचे काम करते. इन्सुलिनचे हे एकच कार्य सामान्य लोकांना माहिती असते. पण इन्सुलिनचे दुसरे कार्य म्हणजे लिव्हर ला अतिरिक्त ग्लुकोज, ग्लायकोजेन आणि फॅट या रूपात साठवून ठेवायचे आदेश देणे. ग्लुकागॉन याच्या बरोब्बर उलट काम करतं. जेव्हा रक्तातील ग्लुकोज कमी होतं तेव्हा ग्लुकागॉन लिव्हर आणि स्नायूंमध्ये साठवलेल्या ग्लायकोजेनचे ग्लुकोज मध्ये रूपांतर करतं.७० किलोच्या माणसाच्या लिव्हरमध्ये १००-१२० ग्राम ग्लायकोजेन मावते. ग्लायकोजेनवर शरीर ८-१२ तास चालू शकते. आणि ग्लायकोजेन संपल्यावर ग्लुकोनियोजेनेसिस या प्रक्रियेतून कर्बोदके नसलेल्या पदार्थातून ग्लुकोज निर्मिती करतं. आणि फॅटचे किटोसिसनी केटोन मध्ये रूपांतर करतं. ग्लुकोज आणि कीटोन या दोन्ही इंधनांवर आपलं शरीर चालू शकतं.

कर्बोदकांना इन्सुलिनचा सगळ्यात जास्त प्रतिसाद मिळतो. त्यामुळे जेवणात ब्रेड, पास्ता, पोळी, भात, साखर याचे प्रमाण जितके जास्त तितके जास्त इन्सुलिन बनते. त्याखालोखाल प्रथिनांना इन्सुलिनचा प्रतिसाद असतो. आणि सगळ्यात कमी प्रतिसाद हा पालेभाज्या आणि फॅट्सना मिळतो. पण डाएटरी फॅटचा चुकीचा संबंध कोलेस्टेरॉलशी जोडला गेल्यामुळे फॅट्स बऱ्याच वर्षांपासून बदनाम झाले आहेत.

तुम्ही डाएट कुठलेही करा. वरील रसायनशात्र बदलणार नाही. आता फक्त कुठले डाएट हे या वरील साच्यात कसे बसते आणि यशस्वी होते हे समजून घेऊ.

१. थोड्या थोड्या वेळाने ५-६ वेळा खाणे

भागवतांच्या धाग्यात एक प्रश्न होता. की जर काहीही खाल्ल्याने इन्सुलिन स्रवते, तर दर दोन तासांनी थोडे थोडे खाल्ल्यास वजन का कमी होते?
तुम्ही कुठल्याही प्रस्थापित डाएटिशियनचा अशा आहाराचा दिनक्रम बघा. दर दोन तासांनी खायचे असले तरी ते काय खायचे याला अनन्यसाधारण महत्व आहे. बऱ्याच वेळा अशा प्रणालीमध्ये फॅट आणि कार्ब्स दोन्हीवर कंट्रोल असतो. शक्यतो शेवटचे जेवण हे सातच्या आत किंवा आसपास घेण्याचाही आग्रह असतो. अशा प्रणालीमध्ये एका जेवणात पोळी आणि भात एकत्र कधीच नसतो. मधल्या वेळेतील स्नॅक्ससुद्धा लो कार्ब्स म्हणावीत अशीच असतात. जसे की बदाम, ताक, ग्रीन टी, चीज इत्यादी. तसेच एका वेळी किती खायचे याला मर्यादा असते. साखर वर्ज्य असते.
काहीही खाल्ल्यावर इन्सुलिन स्त्रवते हे बरोबर आहे. पण ते किती स्रवणार हे आपले अन्न ठरवते. जर दोन दोन तासांनी आपण कमीत कमी इन्सुलिन स्रवेल असा आहार घेतला, तर
१. लिव्हरमध्ये ग्लायकोजेन साठणार नाही
२. मिळालेल्या थोड्या साखरेतून शरीराच्या पेशींना इंधन मिळत राहील
३. रात्री ७ ते सकाळी नाष्ट्यापर्यंत जे काही थोडेफार ग्लायकोजेन आहे ते वापरून शरीर फॅटवर चालू राहील.
पाहायला गेले तर इथेसुद्धा फास्टिंगची मदत घेतली जाते. पण ते सगळे तास झोपेतच गेल्याने ते आपल्याला जाणवत नाही.

२. आय एफ

आयएफ बद्दल मीच इथे खूप दळून झाले आहे. त्यामुळे अजून जास्त लिहायची गरज नाही. पण ऋजुता दिवेकर पद्धतीत आपण जे ५-६ वेळा खातो ते सगळे आणि थोडे अधिक या पद्धतीत २ वेळा खातो. आयएफचा सुटसुटीतपणा हा या दोन वेळेच्या पोटभर जेवणात आहे. पण इथेही पोळी, भात, साखर यांना लगाम लावला नाही तर या प्रणालीचा काहीही उपयोग नाही. इथे तुम्ही जेव्हा १६ किंवा अधिक तास इन्सुलिन तयार होईल असे काहीही खात नाही, तेव्हा तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते. आणि तुम्ही २ जेवणात जे थोडे जास्त खाऊन ग्लायकोजेन जमवलेले असते, ते त्या १६ तासात वापरून थोडे फॅटदेखील वापरले जाते. यातील काही तास जागृतावस्थेत असतात त्यामुळे भुकेची तीव्रता तुम्हाला अनुभवावी लागते. मग समजा, आपण इथेही २ वेळा अत्यल्प खाल्ले तर? तर तुम्हाला लगेच भूक लागते आणि तुमचे आयएफ मोडते. तसेच ऍसिडिटी वगैरे होण्याचाही संभव असतो. त्यामुळे १६ किंवा अधिक तासांच्या फास्टिंगवर जर तुम्ही राहणार असाल तर पोटभर खाणे आवश्यक आहे. तसेच प्रथिनांचा आणि हेल्दी फॅट्सचा (फुल फॅट दही, दूध, चीज, अंड्यातील पिवळे) यांचा समतोल राखणे गरजेचे आहे.
याचेच व्हेरिएशन ५-२ डाएट आहे. यात ५ दिवस तुम्ही ३ वेळा जेवायचे आणि २ दिवस कर्बोदके आणि प्रथिनविरहित कडकडीत उपास करायचा. इथे पुन्हा रसायनशास्त्र तेच आहे. २ दिवस कुठलाही साखरेमध्ये रूपांतरित होईल असा स्बस्ट्रेट तुम्ही खाल्लाच नाही, तर नाईलाजाने लिव्हर आणि स्नायूंमधले ग्लायकोजेन वापरून नंतर फॅटवर शरीर चालते. २ दिवसांचा उपास दीर्घकालीन असल्यामुळे उरलेले पाच दिवस व्यवस्थित जेवता येते. तुम्ही फास्टिंगची वेळ जितकी वाढवाल, तितकी खायची मुभा तुम्हाला फीडिंग विंडोमध्ये मिळते. कारण दीर्घकाळ फास्टिंग केल्याने फॅटबर्निंग सुद्धा जास्त होते.

३. दीक्षित पद्धत

यामध्ये ५५ मिनिटांच्या २ विंडो दिल्या आहेत. त्यात तुम्ही तुमच्या संबंध दिवसाचा योजलेला आहार घ्यायचा आहे. साधारण सकाळी १२ आणि रात्री ८ अशा या २ वेळा असतात. रात्री ८ ते सकाळी १२ म्हणजे १६ तासाचे फास्टिंग आहे. म्हणजेच इथेही फास्टिंगचा आधार घेतलेला आहे. १२ पर्यंत काहीही खायचे नाही किंवा ४० कॅलरीजच्या आतले द्रवपदार्थ (जसे की २ चमचे दह्याचे ताक किंवा बिनसाखरेचा पाण्याचा चहा) घ्यायचे, हे अंगवळणी पडायला अवघड असले तरी एकदा सवय झाली की व्यवस्थित जमायला लागते. पण यात जर तुम्ही पोळी, भात साखरेचे प्रमाण वाढवले तर काय होईल? सकाळच्या जेवणानंतर तुमची साखर शूट होईल. त्यामुळे ती आटोक्यात आणायला बरेच इन्सुलिन लागेल. आणि उरलेल्या साखरेचे भरपूर ग्लायकोजेन बनेल. हा इन्सुलिन स्पाईक तुमचे शरीर आवरून ठेवते आहे तोपर्यंत ८ वाजताचे तसेच लोडेड जेवण येईल!
फॅट बर्निंग हवे असेल तर लिव्हर पुन्हा पुन्हा रिकामे झाले पाहिजे. आणि हे उपाशी न राहता साध्य करायचे असेल तर ज्या खाद्यपदार्थांनी इन्सुलिन तयार होते ते कमी खाल्ले पाहिजेत.
टाईप २ साठी तुम्ही हे डाएट करत असलात, तर जेवणाच्या कन्टेन्टबद्दल जागृक असणे जास्त महत्वाचे आहे. कारण टाईप २ मध्ये शरीरातील पेशी इन्सुलिनला हवा तसा प्रतिसाद देत नाहीत. आणि फास्टिंगमुळे आणि कर्बोदके कमी केल्यामुळे, पेशींची प्रतिसाद द्यायची ताकद सुधारते. म्हणूनच असा आहार घेणाऱ्या बऱ्याच जणांचे मॅफॉर्मिनचे प्रमाण हळू हळू कमी होऊ लागते.

४. केटोजेनीक डाएट

वरील तीनही प्रणालींमध्ये आपण फास्टिंग आणि कर्बोदके नियंत्रित ठेवण्याचा खेळ बघितला. पण असेही एक डाएट आहे जे या सगळ्याला बगल देऊन एका क्रांतिकारी मार्गाचा अवलंब करते. आपण पहिले की कर्बोदकांना इन्सुलिनचा सगळ्यात जास्त प्रतिसाद असतो. मग आपण कर्बोदके खायचे सोडूनच दिले तर? आपण ज्याला धान्य म्हणतो ते सगळे कर्बोदकांमध्ये मोडते. तसेच साखर. कीटोजेनीक डाएट मध्ये प्रत्यक्ष कर्बोदके (म्हणजे साखर आणि धान्य) वर्ज्य असतात. अप्रत्यक्ष कर्बोदके (जी भाज्यांमधून मिळतात) २० ग्रॅमच्या आत घ्यायची असतात. कर्बोदकांच्या मागोमाग प्रथिने रक्तशर्करा निर्मितीत सहाय्य करतात. त्यामुळे प्रथिनेही बेताची खाण्याकडे कीटोजेनीक डाएटचा भर असतो. आणि उरले काय? तर ८० % फॅट खाऊन हे डाएट गेले जाते आणि असे डाएट करून लोक वजनही कमी करतात आणि साखर सुद्धा नॉर्मल ठेवतात. कारण यांचे शरीर कधी ग्लुकोजवर चालतच नाही. सतत फॅटचे कीटोनमध्ये रूपांतर करून ही माणसे किटोसिसमध्ये असतात. जेव्हा शरीराला ग्लुकोज लागते, तेव्हा प्रोटीनपासून ते तयार केले जाते. याला ग्लुकोनियोजेनेसिस असे म्हणतात. त्यामुळे कर्बोदके खाल्ली नाहीत तरी शरीर व्यवस्थित (आणि याविषयात काही तज्ज्ञांच्या मते, जास्त चांगले) चालते. टाईप २ डायबेटीससाठी हे डाएट चांगले आहे हे दाखवून देणारे अनेक प्रयोग पाश्चात्य देशांमध्ये झाले आहेत.
अर्थात अशा नियमांमध्ये चपखल बसणारे अन्न मांसाहारी आहे. शाकाहारी कीटोजेनीक डाएट अतिशय अवघड आहे, पण भारतात लोक शाकाहारी कीटोजेनीक डाएट करतानादेखील दिसतात. इतके फॅट खाऊन कुणी वजन कमी करू शकेल का? याचे उत्तर हो आहे. कारण वरील रासायनिक प्रक्रियांमध्ये अत्यल्प इन्सुलिन तयार करण्याच्या गुणधर्मात फॅट चपखल बसते. असे डाएट करून एचडीएल वाढवून एलडीएल कमी झालेलया लोकांवर संशोधनही झालेले आहे. स्टीवन फिनी, टीम नोक्स, पीटर आटीया हे असे काही डॉक्टर्स आहेत ज्यांनी कीटोजेनीक डाएटवर संशोधनही केले आहे आणि आपापले ग्रुप्स तयार केले आहेत. यांची नावे गूगल केल्यास साऊथ आफ्रिकेतले बॅन्टिंग डाएट आणि अमेरिकेतील व्हर्टा ही संस्था काय करते ते वाचनीय आहे.
अर्थात कीटोजेनीक डाएट टोकाचे असल्याने त्याची सवय व्हायला वेळ लागतो आणि रोजच्या आयुष्यात काटेकोरपणे पाळण्यात अडथळे येऊ शकतात. तसेच, किटोसिसमधून बाहेर आल्यावर पुन्हा किटोसिसमध्ये जायला वेळ लागतो.

शेवटी, व्यायाम या सगळ्यामध्ये कुठे बसतो?

तुम्ही डायबेटिक असाल तर व्यायाम, तोदेखील कार्डिओव्हॅस्क्युलर, अत्यंत महत्वाचा आहे. तुम्ही उपाशी पोटी व्यायाम केलात, तर लिव्हरमधील आणि स्नायूंमधील ग्लायकोजेन झटकन वापरले जाते. त्यामुळे रक्तातील साखर स्नायूंमध्ये पुन्हा घेतली जाते. माझ्या स्वतःच्या अशा (अनावश्यक) प्रयोगातून असे दिसून आले, की व्यायामापूर्वी आणि व्यायामानंतरच्या रक्तशर्करेत २० युनिटचा फरक पडतो. म्हणजे फास्टेड साखर १०० असेल तर ४० मिनिट सायकलिंग नंतर ती ८० झालेली असते! हा फरक तुम्ही डायबेटिक आहात किंवा नाही हे ठरवण्याइतका मोठा आहे.
पण हेच वेटलॉस साठी खरे ठरू शकेल का? समजा आपण फक्त व्यायामाने वजन कमी करायचे ठरवले आणि आहार भक्कम ठेवला, तर लिव्हर रिकामे करायला (ज्याला वर पहिल्या प्रमाणे ८-१२ तास शारीरिक क्रियांच्या माध्यमातून लागतात) किती व्यायाम करावा लागेल? आणि जरी आपण भरपूर व्यायाम केला, तरी शरीर "चालू" ठेवायला जेवढे उष्मांक लागतात त्यापेक्षा फारच कमी उष्मांक व्यायाम करून खर्ची पडतात. पण यामुळे व्यायाम निरुपयोगी आहे असे आहे का? तर नाही. व्यायामानाने अर्थातच ग्लायकोजेनचे साठे कमी होण्यास मदत होते. पण तो साखर कमी करण्यास जितकी परिणामकारक आहे तितकी वजन कमी करण्यास नाही. वजन कमी करण्यासाठी आहारावर नियंत्रण हे व्यायामापेक्षा महत्वाचे आहे. कारण अन्न आपल्या हॉर्मोनल सिस्टमवर जसा परिणाम करते तसा व्यायाम करत नाही. मात्र, व्यायामाने मेंदूमध्ये एंडोर्फिन्स सोडले जातात, ज्यामुळे आनंदी वाटते. त्यामुळे सतत व्यायाम करणाऱ्या लोकांना व्यायामाचे "ऍडिक्शन" होते. व्यायाम एक महत्वाचे अँटीडिप्रेसंट आहे.

शरीराचे रसायनशास्त्र समजून घेतले की काय खावे आणि काय खाऊ नये याचा अंदाज येतो. पण असे बदल करताना डॉक्टरांचा सल्ला घेणे उत्तम आहे. तसेच गोळ्या असतील तर डॉक्टरना विचारूनच बंद करणे किंवा कमी करणे योग्य आहे. शेवटी कुठलेही डाएट आपल्याला आणि आपल्या जीवनशैलीला सूट होणे महत्वाचे. त्यामागील प्रिन्सिपल एकच असणार आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी तुमचा धागा वाचला. त्यानंतर तुमच्या बाजूने काही प्रतिसाद दिलेले आहेत. तुम्ही मिसळपावचा संदर्भ आताच्या प्रतिसादात दिलेला आहे. त्या प्रतिसादामधे तुम्ही जो यू टर्न घेतला आहे त्याबद्दल स्पेसिफिकली....
अजून एक व्याख्यान आहे. त्यात ते म्हणतात की ५५ मिनिटात थोडे खाल्ले काय आणि कितीही खाल्ले काय इन्शुलिन तेव्हढेच तयार होते. हा मुद्दा त्यांच्या मते इन्शुलीनच्या मात्रेसाठी ते सांगताहेत. याचा अर्थ कितीही खा असा होऊ शकत नाही.

अजून एक व्याख्यान आहे. त्यात ते म्हणतात की ५५ मिनिटात थोडे खाल्ले काय आणि कितीही खाल्ले काय इन्शुलिन तेव्हढेच तयार होते. हा मुद्दा त्यांच्या मते इन्शुलीनच्या मात्रेसाठी ते सांगताहेत. याचा अर्थ कितीही खा असा होऊ शकत नाही.

एकदम बरोबर.

दिवसाचा आहार कसा ठरवायचा?
यासाठी डॉ. दिक्षीत सांगतात तुमची भूक ओळखा. गेले काही दिवस म्हणजे आठवडा, पंधरवडा तुम्ही काय काय खात होतात याचा आढावा घेतला रोज तुम्हाला किती आहार लागतो ते निश्चीत करता येईल. दोनदाच जेवायचे आहे म्हणून ते वाढवू नका किंवा वजन कमी करायचय या हट्टाहासाने एकदम कमी करायचा प्रयत्न करू नका. एकदा तुमचा एका दिवसाचा आहार निश्चीत झाल्यावर त्याचे दोन भाग करा. समान भाग करायला पाहिजे असे नाही. एक मुख्य जेवण व एक हलके जेवण असेही तुम्ही करू शकता. आणि तेवढे अन्न दोनवेळेत खा. (कॅलरी मोजायची फारशी जरूरी भासत नाही.)

आपल्यासाठी तपासायचे मुद्दे खालीलप्रमाणे

व्याख्यानातले मुद्दे निरोगी व्यक्ती (मधूमेह नसलेले, अ‍ॅसिडिटी नसलेले) पण स्थूलतेकडे झुकलेले किंवा लठ्ठ यांच्यासाठी आहेत हे गृहीतक आहे.
आता मुख्य प्रश्न आहार कुठला हे निश्चित झालेले नाही. (त्यांनी एके ठिकाणी आहारतज्ञाचा उल्लेख केला आहे). आणि कुठल्याही प्रकारच्या आहारात तेव्हढेच इन्शुलीन तयार होते का ?

सई यांच्या प्रतिसादात यातली बरीचशी उत्तरे आलेली आहेत.

व्याख्यानातले मुद्दे निरोगी व्यक्ती (मधूमेह नसलेले, अ‍ॅसिडिटी नसलेले) पण स्थूलतेकडे झुकलेले किंवा लठ्ठ यांच्यासाठी आहेत हे गृहीतक आहे.
स्थूलतेकडे झुकलेले किंवा लठ्ठ यांच्यासाठी , त्यातून बरे होण्याचा उपाय आहे तर
जे तसे नाहीत त्यांच्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय आहे.

काहीही खाल्ल्यावर इन्सुलिन स्त्रवते हे बरोबर आहे. पण ते किती स्रवणार हे आपले अन्न ठरवते. >> हे बरोबर आहे की दीक्षित म्हणतात ते बरोबर आहे?.
मला वाटत दीक्षित यांच्या म्हणण्याचा अर्थ असा असावा.: समजा एका वेळेस १० मात्रा इन्सुलिन स्रवणार असेल तर एक पेढा खा अथवा १० जिलब्या खा इन्सुलिन १० मात्राच स्रवणार. म्हणूनच इतर वेळी एखाद सुद्धा बिस्किट किंवा पेढा खाउ नका किंवा ज्यात साखर असेल असे काहिही खाउ नका असे ते म्हणतात.

पण जर का १० मात्रांनी फक्त १० जिलब्या पचत असतील तर १० पेक्षा जास्त जिलब्या खाल्यावरही १०च मात्रा स्त्रवतील असा त्याचा अर्थ नसावा.
तज्ञांनी खुलासा करावा.

अवांतर : माझ वजन विनासायास पद्धतीने ( Happy ) कमी झालं आहे, होत आहे. माझ्या एका मुलाने मात्र त्याच वेळेस किटो पद्धत वापरून , दुसर्‍याने दिवेकर टाइप पद्धत वापरून व दोघांनीही व्यायामाची जोड देऊन चांगलेच वजन कमी केले आहे. आम्ही तिघांनीही वेगवेगळ्या पद्धती वापरल्या हे मात्र गंमतीशीर आहे. (आम्ही तिघेही वेगवेगळ्या ठिकाणी रहातो, आमचे अन्नदाते वेगवेगळे आहेत. )

आम्हाला तिघांनाही नुसत कमी खाउन व त्यास व्यायामाची जोड देउन पूर्वी वजन कमी करता आले नव्हते.

पण जर का १० मात्रांनी फक्त १० जिलब्या पचत असतील तर १० पेक्षा जास्त जिलब्या खाल्यावरही १०च मात्रा स्त्रवतील असा त्याचा अर्थ नसावा.

अस १० जिलब्या वगैरे उदाहरणे फारच व्यक्तिसापेक्ष आहेत. परत १ जिलबी म्हणजे नक्की काय? याचे निकषही निश्चित नाहीत. म्हणजे त्यासाठी त्या माणसाची तपासणी करूनच किती जिलब्या वगैरे ठरवायला लागेल. तस झाल तर आत्ताच्या प्रचलीत पध्दती व डॉ. दिक्षीतांची पध्दतीमधे फारसा फरकच राहणार नाही व प्रत्येकाची तपासणी करून मगच आहार ठरवायला लागेल. म्हणजे तज्ञांची मदतीशिवाय काहीच करता येणार नाही.

यावर उपाय म्हणून भूक भागणे, पोट भरल्याची संवेदना वगैरे संज्ञा वापरल्या जातात व त्या आधारे योग्य आहार ज्याचा त्याने ठरवायचा आहे. यापेक्षा जास्त खाणे म्हणजे पोट फुटेस्तोवर खाण्याची सुरवात होय. जी या आहारपध्दतीत अपेक्षीत नाही.

हा खुलासा मी तज्ञ म्हणून केलेला नाही. डॉ. दिक्षीत यांच्या व्हिडीओवरून मला जे आकलन झाले त्यानुसार केले आहे.

उष्ट्राणां हि विवाहेषु . . छान झालंय वरती. बदलेली ट्यून अन मदतीला धावून आलेला खड्डा लय भारी.

बाकी किरण्या, बरं झालं प्रतिसाद गायब झाले ते. Lol आणि हो. तुला मी ओळखच काय, घड्याळात किती वाजले ते देखिल सांगू लागत नाही. तेव्हा,

१. पुन्हा विचारू नकोस.
२. ओळख ठाऊक नसताना तिसर्‍याच्याच नावाने शंख करून चारित्र्यहननाचा केविलवाणा प्रयत्न करू नकोस. Wink

दीक्षित प्रणालीबाबत माझ्या मनात एकच शंका आहे. पण खरे म्हणजे हीच काय कुठलीही प्रणाली स्विकारण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांना भेटले पाहीजे.

काहीच हरकत नाही. पण उल्लेख करताना "डॉ. दिक्षीत" असा न करता, "डॉ. जगन्नाथ दिक्षीत" असा करा. म्हणजे लोकांना "राजीव दिक्षीत" व "जगन्नाथ दिक्षीत" असा फरक करता येईल.

अस १० जिलब्या वगैरे उदाहरणे फारच व्यक्तिसापेक्ष आहेत.>> अहो मी नुसत उदाहरण दिले आहे. कुणासाठी १० जिलब्यांसाठी १० मात्रा असतील, तुमच्या साठी १५ मात्रा असतील, माझ्यासाठी २० असतील. ते इन्सुलिन विरोधावर अवलंबून आहे. म्हणून तो आकडा महत्वाचा नाही. माझा प्रश्न वेगळा आहे.

१. लठ्ठ होण्यामागे एकमेव कारण म्हणजे रक्तामधली इन्शूलीन लेवल वाढलेली राहणे.

हे कोण म्हणतंय? आधार काय? पुरावा काय?

अवांतर -
अवांतर : माझ वजन विनासायास पद्धतीने ( Happy ) कमी झालं आहे, होत आहे. माझ्या एका मुलाने मात्र त्याच वेळेस किटो पद्धत वापरून , दुसर्‍याने दिवेकर टाइप पद्धत वापरून व दोघांनीही व्यायामाची जोड देऊन चांगलेच वजन कमी केले आहे. आम्ही तिघांनीही वेगवेगळ्या पद्धती वापरल्या हे मात्र गंमतीशीर आहे. (आम्ही तिघेही वेगवेगळ्या ठिकाणी रहातो, आमचे अन्नदाते वेगवेगळे आहेत. )

आम्हाला तिघांनाही नुसत कमी खाउन व त्यास व्यायामाची जोड देउन पूर्वी वजन कमी करता आले नव्हते. >>>>
विकीकाका, अवांतर लई भारी

जाऊ द्या, सई ताई. रडण्यानेसुद्धा इन्शुलिन वाढू शकते असं ते म्हणतील उद्या... Happy

प्राचीन काळी एक चीन की कुठला प्रवासी अथेन्स मध्ये येतो आणि डेल्फी च्या ऑरॅकलला विचारतो, 'तुमच्या ग्रीस मध्ये सगळ्यात शहाणा/हुशार्/चाणाक्ष माणूस कोण आहे?' ओरॅकल म्हणते 'सॉक्रेटिस'
प्रवासी म्हणतो ओरॅकल ने सांगितल्यावर आपण विश्वास ठेवावा ह्यत काय ते शहाणपण? मी माझा स्वतः अभ्यास करून शोधून काढेन. म्हणून तो सोक्रेटिस सोडून ग्रीस मध्ये विद्वान, विचारवंत गणल्या गेलेल्या १०० लोकांशी वादविवाद करतो आणि सर्वात शेवटी सॉक्रेटिसशी.
निघतांना तो सॉक्रेटिसला म्हणतो शहाणा/हुशार्/चाणाक्ष/विचारवंत म्हणून ज्या लोकांना मी भेटलो त्या लोकांनी माझी निराशाच केली अपवाद फक्त तू. ओरॅकल म्हणाली म्हणून नाही पण माझे असे मत आहे की तू ग्रीस मधलाच नव्हे तर जगातला सर्वात शहाणा/हुशार्/चाणाक्ष माणूस आहे. तर असे का ? तुझे ह्याबद्दल काय मत आहे.
सॉक्रेटिस हसून म्हणाला, 'अरे मित्रा मी जगातला सर्वात शहाणा/हुशार्/चाणाक्ष माणूस असेल नसेल पण तुझे असे मत का बनले ते मी सांगू शकेन.
तुला असे वाटले कारण, 'ज्या विषयाचा माझा अभ्यास नाही त्या विषयाबद्दल ज्ञान असल्याचे ढोंग मी करत नाही'

ह्या गोष्टीत अनेक पात्रे आहेत... सॉक्रेटिस, प्रवासी, ओरॅकल, ईतर विद्वान, त्याकाळची जनता आणि गोष्टं सांगणारे व ऐकणारे तुम्ही आम्ही.
ह्या सगळ्यामध्ये आपण नेमके कोण हे ज्याने त्याने पडताळून पहावे.
माझ्या मते ह्या कथेचे मर्म म्हणजे कथे मधला सगळ्यात शहाणा/हुशार्/चाणाक्ष माणूस सॉक्रेटिस नसून चिनी प्रवासी आहे.

मल्हारी, कांगावा सुरू केलास पुन्हा
जी गोष्ट तू चालू केली आहेस त्याबद्दल शंख करू नकोस. माझ्या नावाने तू अनेक आयड्यांना हाका मारून बदनामी केलेली आहेस. तुझ्या इशा-या बिशा-यांना इथे काडीचीही किंमत नाही. सईचा धागा माहीतीपूर्ण असल्याने मी इथे प्रतिसाद एडीट केले होते. तुला त्याची फिकीर आहे असे दिसत नाही.. पण तुझ्यासारख्या दिवाभीत आयडीला मी किंमत देत नाही.
तुझ्या चारीत्र्यहननाचे म्हणत असशील तर हनन व्हायला चारीत्र्यपूर्ण व्यक्ती ठाऊक तरी असायला पाहीजे ना ? इथे नुसत्याच पोष्टी येतात पण माणूस दिसत नाही कि त्याचा ठावठिकाणाही कळत नाही Lol

सई , क्षमस्व

हायझेनबर्ग
तुम्ही जाहीरात, मोहीम, मार्मिक कथा या शिवाय मुद्द्याचे काही लिहू शकाल काय ? आमच्या मते तुम्हीच सॉक्रेटीस, तुम्हीच अ‍ॅरिस्टॉटल, तुम्हीच आईनस्टाईन वगैरे सर्व आहात. मुद्द्याचे लिहीणार असाल तर लिहा नाहीतर प्रत्येक धाग्यावर किरकिर करू नका. प्लीजच..

मुद्द्याचे लिहीणार असाल तर लिहा नाहीतर प्रत्येक धाग्यावर किरकिर करू नका. प्लीजच..>> Lol फारच मार्मिक बोलता बुवा तुम्ही. Wink

लठ्ठ होण्यामागे एकमेव कारण म्हणजे रक्तामधली इन्शूलीन लेवल वाढलेली राहणे.
मला हे वाचून रडू आल.

@सई केसकर
खरच तुमच्यामुळे वाक्यरचनेत काही चूक झाली की लागलीच कळतय व ती दुरूस्त करता येतेय. धन्यवाद.
ते वाक्य मी आता असे बदलत आहे.
लठ्ठ होण्यामागे रक्तामधली इन्शूलीन लेवल वाढलेली राहणे हे कारण बहुतांशी असते

संदर्भ: डॉ. दिक्षीतांच्या व्हीडीओ १:३०:५३ ते १:३२:०७ म्हणजे एकूण १:१४ मिनिटे
व्हीडीओ ज्यांनी पाहिलेला नाही त्याचेसाठी प्रतिलेखन खाली देत आहे.

इथे आमचे डॉक्टर मित्र बसलेत ते म्हणतील,
"तुम्ही नुसते इन्सुलीन काय घेऊन बसला आहात. रेनीन आहे, लेपटीन आहे, अमूक आहे, ढमूक आहे.
अहो, लठ्ठपणाबाबत काहीजणांनी दोन वर्षे अभ्यास केलाय. (आहात कुठे?)"

पण जेवढा जास्त अभ्यास तेवढी जास्त गुंतागुंत!!!!!

खरतर तुम्ही कमी अभ्यास केला तरी विषय समजण्यासारखा आहे!!!!!
एमबीबीएसचे १ ल्या वर्षाचे शरीरविज्ञानशास्त्र त्यासाठी पुरेसे आहे.

बुध्दीबळामधे विश्वनाथ आनंदचे जे महत्व आहे ते शरीराच्या हार्मोन्स सिस्टीममधे इन्सूलीनचे आहे. एकदा तुम्ही इन्सूलीनला मार्गावर आणा, बाकी सगळे तुमचे हॉर्मोन्स जाग्यावर येतील व काम करायला लागतील.

एखादी केस याला अपवाद असेल. पण आम्हाला एखादा पेशन्ट बरा करायचा नाहीये आम्हाला संपूर्ण समाजासाठी काम करायचय. त्यामुळे आम्ही फक्त इन्सूलीनवर लक्ष केंद्रीत करतो व आम्हाला चांगले रिझल्ट मिळताहेत. कारण इन्सूलीन हे अतिशय महत्वाचे हार्मोन आहे.

https://foodandnutrition.org/from-the-magazine/investigating-intermitten...

जिज्ञासुंनी / तज्ञांनी वरिल आर्टिकल मुळापासून सर्व वाचावे व आपले मत द्यावे. ह्या रिसर्च मध्ये क्लेम केले आहे की इ-फास्टींग मुळे काही दुष्परिणाम होतात (Side effects of intermittent fasting include persistent hunger, cold, irritability, low energy, distraction and lower work performance.)जे खरोखर होत नाही, त्याच्या अगदी उलट होते असे फास्टींग करणारे स्वतः सांगतात .

Pages