विविध आहार-प्रणाली आणि शरीराचा प्रतिसाद

Submitted by सई केसकर on 23 August, 2018 - 08:40

शाम भागवत यांच्या दीक्षित प्रणालीवरच्या धाग्यामुळे बरीच चर्चा झाली. त्यातून काही मुद्दे आले आहेत, ज्यांवर मी एक प्रतिसाद लिहायला घेतला होता. पण त्या प्रतिसादाचा लेखच होऊ लागल्यामुळे तो वेगळा लेख म्हणून इथे देत आहे. त्या चर्चेत आलेले काही प्रश्न आणि त्यांची (मला माहिती असलेली) उत्तरे इथे लिहीत आहे. पण त्या आधी एक महत्वाचा मुद्दा मांडण्याची गरज वाटते. आपण आहारात बदल, मग तो कुठलीही आहार प्रणाली (दर दोन तासांचा मिताहार (ऋजुता दिवेकर), आयएफ, दीक्षित, फाईव्ह टू, कीटोजेनीक) वापरून करीत असू. पण आपला मूळ हेतू काय आहे हे निश्चित असणे गरजेचे आहे. असे म्हंटले जाते की टाईप २ डायबेटीस हा लठ्ठपणामुळे होतो. पण अलीकडच्या संशोधनातून असे सिद्ध होते आहे की लठ्ठपणा हा टाईप २ होण्याचे पहिले लक्षण आहे. या दोन्हीमध्ये सूक्ष्मसा फरक आहे. लठ्ठपणा हा डायबेटीसचे कारण नसून ते एक लक्षण आहे. पण मग सगळ्या लठ्ठ व्यक्तींना डायबेटीस असतो का? याचे उत्तर अर्थातच नाही असे आहे. आणि सगळ्या सडपातळ व्यक्तींना डायबेटीस होण्याचा अजिबात धोका नसतो का? असेही नाही.

पण चाळिशीनंतर आहारात बदल करणारे, मग ते स्वयंप्रेरणेने असो किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने, बरेच लोक या पैकी एकाशी (लठ्ठपणा किंवा डायबेटीस) किंवा दोन्हीशी झगडत असतात. जे दोन्ही गोष्टींशी झगडत असतात त्यांचा एक उपगट होऊ शकतो. आणि अशा लोकांमध्ये अनुवांशिकतेमुळे आधी लठ्ठपणा आणि मग टाईप २ डायबेटीस अशी अधोगती झालेली दिसते. पण वरील पैकी कुठल्याही गटात तुम्ही असलात आणि तुम्ही वेगवेगळ्या आहार पद्धती वापरून तुमचे वजन किंवा साखर आटोक्यात ठेवायचा प्रयत्न करत असाल तरी तुमच्या शरीराचा प्रतिसाद एकाच प्रकारचा असतो. आणि हे कसे होते ते मी इथे लिहायचा प्रयत्न करणार आहे. इथे मी शास्त्रीय रेफरन्सेस देत नाहीये कारण हे बऱ्याच पुस्तकातील माहितीवर आधारित आहे. ज्यांना जशी माहिती हवी असेल तशी आपण प्रतिक्रियांमध्ये चर्चेला घेऊ. म्हणजे आपल्या सगळ्यांनाच एक संकलित धागा मिळेल.

वजन वाढीचे आणि ग्लुकोज वापराचे जीवरसायनशास्त्र

वजन कसं कमी होतं हे जाणून घेण्यासाठी शरीरातील एका महत्वाच्या अवयवाबद्दल थोडी माहिती असली पाहिजे. ते म्हणजे पॅनक्रिया अर्थात स्वादुपिंड. या ग्रंथीला आपण शरीरातील "फूड डिस्ट्रिब्युशन मॅनेजर" असं म्हणू शकतो. आपण खाल्लेल्या अन्नातील ग्लुकोज आपल्या शरीराच्या कानाकोपऱ्यात नेण्याचे काम इथे तयार होणाऱ्या संप्रेरकांमुळे होत असते. स्वादुपिंडात अल्फा, बीटा, डेल्टा, गामा आणि इप्सिलॉन अशी नावे असलेल्या पेशी असतात. त्यातून वेगवेगळी संप्रेरके सोडली जातात. आणि कुठलं संप्रेरक कधी येईल हे मात्र आपण खाल्लेले अन्न ठरवते. यातील दोन महत्वाची संप्रेरके आहेत इन्सुलिन आणि ग्लुकागॉन.

इन्सुलिन (ज्याची कमतरता किंवा अभाव यात डायबेटीस २ आणि १ होतात) रक्तातील ग्लुकोज नियंत्रित ठेवण्याचे काम करते. इन्सुलिनचे हे एकच कार्य सामान्य लोकांना माहिती असते. पण इन्सुलिनचे दुसरे कार्य म्हणजे लिव्हर ला अतिरिक्त ग्लुकोज, ग्लायकोजेन आणि फॅट या रूपात साठवून ठेवायचे आदेश देणे. ग्लुकागॉन याच्या बरोब्बर उलट काम करतं. जेव्हा रक्तातील ग्लुकोज कमी होतं तेव्हा ग्लुकागॉन लिव्हर आणि स्नायूंमध्ये साठवलेल्या ग्लायकोजेनचे ग्लुकोज मध्ये रूपांतर करतं.७० किलोच्या माणसाच्या लिव्हरमध्ये १००-१२० ग्राम ग्लायकोजेन मावते. ग्लायकोजेनवर शरीर ८-१२ तास चालू शकते. आणि ग्लायकोजेन संपल्यावर ग्लुकोनियोजेनेसिस या प्रक्रियेतून कर्बोदके नसलेल्या पदार्थातून ग्लुकोज निर्मिती करतं. आणि फॅटचे किटोसिसनी केटोन मध्ये रूपांतर करतं. ग्लुकोज आणि कीटोन या दोन्ही इंधनांवर आपलं शरीर चालू शकतं.

कर्बोदकांना इन्सुलिनचा सगळ्यात जास्त प्रतिसाद मिळतो. त्यामुळे जेवणात ब्रेड, पास्ता, पोळी, भात, साखर याचे प्रमाण जितके जास्त तितके जास्त इन्सुलिन बनते. त्याखालोखाल प्रथिनांना इन्सुलिनचा प्रतिसाद असतो. आणि सगळ्यात कमी प्रतिसाद हा पालेभाज्या आणि फॅट्सना मिळतो. पण डाएटरी फॅटचा चुकीचा संबंध कोलेस्टेरॉलशी जोडला गेल्यामुळे फॅट्स बऱ्याच वर्षांपासून बदनाम झाले आहेत.

तुम्ही डाएट कुठलेही करा. वरील रसायनशात्र बदलणार नाही. आता फक्त कुठले डाएट हे या वरील साच्यात कसे बसते आणि यशस्वी होते हे समजून घेऊ.

१. थोड्या थोड्या वेळाने ५-६ वेळा खाणे

भागवतांच्या धाग्यात एक प्रश्न होता. की जर काहीही खाल्ल्याने इन्सुलिन स्रवते, तर दर दोन तासांनी थोडे थोडे खाल्ल्यास वजन का कमी होते?
तुम्ही कुठल्याही प्रस्थापित डाएटिशियनचा अशा आहाराचा दिनक्रम बघा. दर दोन तासांनी खायचे असले तरी ते काय खायचे याला अनन्यसाधारण महत्व आहे. बऱ्याच वेळा अशा प्रणालीमध्ये फॅट आणि कार्ब्स दोन्हीवर कंट्रोल असतो. शक्यतो शेवटचे जेवण हे सातच्या आत किंवा आसपास घेण्याचाही आग्रह असतो. अशा प्रणालीमध्ये एका जेवणात पोळी आणि भात एकत्र कधीच नसतो. मधल्या वेळेतील स्नॅक्ससुद्धा लो कार्ब्स म्हणावीत अशीच असतात. जसे की बदाम, ताक, ग्रीन टी, चीज इत्यादी. तसेच एका वेळी किती खायचे याला मर्यादा असते. साखर वर्ज्य असते.
काहीही खाल्ल्यावर इन्सुलिन स्त्रवते हे बरोबर आहे. पण ते किती स्रवणार हे आपले अन्न ठरवते. जर दोन दोन तासांनी आपण कमीत कमी इन्सुलिन स्रवेल असा आहार घेतला, तर
१. लिव्हरमध्ये ग्लायकोजेन साठणार नाही
२. मिळालेल्या थोड्या साखरेतून शरीराच्या पेशींना इंधन मिळत राहील
३. रात्री ७ ते सकाळी नाष्ट्यापर्यंत जे काही थोडेफार ग्लायकोजेन आहे ते वापरून शरीर फॅटवर चालू राहील.
पाहायला गेले तर इथेसुद्धा फास्टिंगची मदत घेतली जाते. पण ते सगळे तास झोपेतच गेल्याने ते आपल्याला जाणवत नाही.

२. आय एफ

आयएफ बद्दल मीच इथे खूप दळून झाले आहे. त्यामुळे अजून जास्त लिहायची गरज नाही. पण ऋजुता दिवेकर पद्धतीत आपण जे ५-६ वेळा खातो ते सगळे आणि थोडे अधिक या पद्धतीत २ वेळा खातो. आयएफचा सुटसुटीतपणा हा या दोन वेळेच्या पोटभर जेवणात आहे. पण इथेही पोळी, भात, साखर यांना लगाम लावला नाही तर या प्रणालीचा काहीही उपयोग नाही. इथे तुम्ही जेव्हा १६ किंवा अधिक तास इन्सुलिन तयार होईल असे काहीही खात नाही, तेव्हा तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते. आणि तुम्ही २ जेवणात जे थोडे जास्त खाऊन ग्लायकोजेन जमवलेले असते, ते त्या १६ तासात वापरून थोडे फॅटदेखील वापरले जाते. यातील काही तास जागृतावस्थेत असतात त्यामुळे भुकेची तीव्रता तुम्हाला अनुभवावी लागते. मग समजा, आपण इथेही २ वेळा अत्यल्प खाल्ले तर? तर तुम्हाला लगेच भूक लागते आणि तुमचे आयएफ मोडते. तसेच ऍसिडिटी वगैरे होण्याचाही संभव असतो. त्यामुळे १६ किंवा अधिक तासांच्या फास्टिंगवर जर तुम्ही राहणार असाल तर पोटभर खाणे आवश्यक आहे. तसेच प्रथिनांचा आणि हेल्दी फॅट्सचा (फुल फॅट दही, दूध, चीज, अंड्यातील पिवळे) यांचा समतोल राखणे गरजेचे आहे.
याचेच व्हेरिएशन ५-२ डाएट आहे. यात ५ दिवस तुम्ही ३ वेळा जेवायचे आणि २ दिवस कर्बोदके आणि प्रथिनविरहित कडकडीत उपास करायचा. इथे पुन्हा रसायनशास्त्र तेच आहे. २ दिवस कुठलाही साखरेमध्ये रूपांतरित होईल असा स्बस्ट्रेट तुम्ही खाल्लाच नाही, तर नाईलाजाने लिव्हर आणि स्नायूंमधले ग्लायकोजेन वापरून नंतर फॅटवर शरीर चालते. २ दिवसांचा उपास दीर्घकालीन असल्यामुळे उरलेले पाच दिवस व्यवस्थित जेवता येते. तुम्ही फास्टिंगची वेळ जितकी वाढवाल, तितकी खायची मुभा तुम्हाला फीडिंग विंडोमध्ये मिळते. कारण दीर्घकाळ फास्टिंग केल्याने फॅटबर्निंग सुद्धा जास्त होते.

३. दीक्षित पद्धत

यामध्ये ५५ मिनिटांच्या २ विंडो दिल्या आहेत. त्यात तुम्ही तुमच्या संबंध दिवसाचा योजलेला आहार घ्यायचा आहे. साधारण सकाळी १२ आणि रात्री ८ अशा या २ वेळा असतात. रात्री ८ ते सकाळी १२ म्हणजे १६ तासाचे फास्टिंग आहे. म्हणजेच इथेही फास्टिंगचा आधार घेतलेला आहे. १२ पर्यंत काहीही खायचे नाही किंवा ४० कॅलरीजच्या आतले द्रवपदार्थ (जसे की २ चमचे दह्याचे ताक किंवा बिनसाखरेचा पाण्याचा चहा) घ्यायचे, हे अंगवळणी पडायला अवघड असले तरी एकदा सवय झाली की व्यवस्थित जमायला लागते. पण यात जर तुम्ही पोळी, भात साखरेचे प्रमाण वाढवले तर काय होईल? सकाळच्या जेवणानंतर तुमची साखर शूट होईल. त्यामुळे ती आटोक्यात आणायला बरेच इन्सुलिन लागेल. आणि उरलेल्या साखरेचे भरपूर ग्लायकोजेन बनेल. हा इन्सुलिन स्पाईक तुमचे शरीर आवरून ठेवते आहे तोपर्यंत ८ वाजताचे तसेच लोडेड जेवण येईल!
फॅट बर्निंग हवे असेल तर लिव्हर पुन्हा पुन्हा रिकामे झाले पाहिजे. आणि हे उपाशी न राहता साध्य करायचे असेल तर ज्या खाद्यपदार्थांनी इन्सुलिन तयार होते ते कमी खाल्ले पाहिजेत.
टाईप २ साठी तुम्ही हे डाएट करत असलात, तर जेवणाच्या कन्टेन्टबद्दल जागृक असणे जास्त महत्वाचे आहे. कारण टाईप २ मध्ये शरीरातील पेशी इन्सुलिनला हवा तसा प्रतिसाद देत नाहीत. आणि फास्टिंगमुळे आणि कर्बोदके कमी केल्यामुळे, पेशींची प्रतिसाद द्यायची ताकद सुधारते. म्हणूनच असा आहार घेणाऱ्या बऱ्याच जणांचे मॅफॉर्मिनचे प्रमाण हळू हळू कमी होऊ लागते.

४. केटोजेनीक डाएट

वरील तीनही प्रणालींमध्ये आपण फास्टिंग आणि कर्बोदके नियंत्रित ठेवण्याचा खेळ बघितला. पण असेही एक डाएट आहे जे या सगळ्याला बगल देऊन एका क्रांतिकारी मार्गाचा अवलंब करते. आपण पहिले की कर्बोदकांना इन्सुलिनचा सगळ्यात जास्त प्रतिसाद असतो. मग आपण कर्बोदके खायचे सोडूनच दिले तर? आपण ज्याला धान्य म्हणतो ते सगळे कर्बोदकांमध्ये मोडते. तसेच साखर. कीटोजेनीक डाएट मध्ये प्रत्यक्ष कर्बोदके (म्हणजे साखर आणि धान्य) वर्ज्य असतात. अप्रत्यक्ष कर्बोदके (जी भाज्यांमधून मिळतात) २० ग्रॅमच्या आत घ्यायची असतात. कर्बोदकांच्या मागोमाग प्रथिने रक्तशर्करा निर्मितीत सहाय्य करतात. त्यामुळे प्रथिनेही बेताची खाण्याकडे कीटोजेनीक डाएटचा भर असतो. आणि उरले काय? तर ८० % फॅट खाऊन हे डाएट गेले जाते आणि असे डाएट करून लोक वजनही कमी करतात आणि साखर सुद्धा नॉर्मल ठेवतात. कारण यांचे शरीर कधी ग्लुकोजवर चालतच नाही. सतत फॅटचे कीटोनमध्ये रूपांतर करून ही माणसे किटोसिसमध्ये असतात. जेव्हा शरीराला ग्लुकोज लागते, तेव्हा प्रोटीनपासून ते तयार केले जाते. याला ग्लुकोनियोजेनेसिस असे म्हणतात. त्यामुळे कर्बोदके खाल्ली नाहीत तरी शरीर व्यवस्थित (आणि याविषयात काही तज्ज्ञांच्या मते, जास्त चांगले) चालते. टाईप २ डायबेटीससाठी हे डाएट चांगले आहे हे दाखवून देणारे अनेक प्रयोग पाश्चात्य देशांमध्ये झाले आहेत.
अर्थात अशा नियमांमध्ये चपखल बसणारे अन्न मांसाहारी आहे. शाकाहारी कीटोजेनीक डाएट अतिशय अवघड आहे, पण भारतात लोक शाकाहारी कीटोजेनीक डाएट करतानादेखील दिसतात. इतके फॅट खाऊन कुणी वजन कमी करू शकेल का? याचे उत्तर हो आहे. कारण वरील रासायनिक प्रक्रियांमध्ये अत्यल्प इन्सुलिन तयार करण्याच्या गुणधर्मात फॅट चपखल बसते. असे डाएट करून एचडीएल वाढवून एलडीएल कमी झालेलया लोकांवर संशोधनही झालेले आहे. स्टीवन फिनी, टीम नोक्स, पीटर आटीया हे असे काही डॉक्टर्स आहेत ज्यांनी कीटोजेनीक डाएटवर संशोधनही केले आहे आणि आपापले ग्रुप्स तयार केले आहेत. यांची नावे गूगल केल्यास साऊथ आफ्रिकेतले बॅन्टिंग डाएट आणि अमेरिकेतील व्हर्टा ही संस्था काय करते ते वाचनीय आहे.
अर्थात कीटोजेनीक डाएट टोकाचे असल्याने त्याची सवय व्हायला वेळ लागतो आणि रोजच्या आयुष्यात काटेकोरपणे पाळण्यात अडथळे येऊ शकतात. तसेच, किटोसिसमधून बाहेर आल्यावर पुन्हा किटोसिसमध्ये जायला वेळ लागतो.

शेवटी, व्यायाम या सगळ्यामध्ये कुठे बसतो?

तुम्ही डायबेटिक असाल तर व्यायाम, तोदेखील कार्डिओव्हॅस्क्युलर, अत्यंत महत्वाचा आहे. तुम्ही उपाशी पोटी व्यायाम केलात, तर लिव्हरमधील आणि स्नायूंमधील ग्लायकोजेन झटकन वापरले जाते. त्यामुळे रक्तातील साखर स्नायूंमध्ये पुन्हा घेतली जाते. माझ्या स्वतःच्या अशा (अनावश्यक) प्रयोगातून असे दिसून आले, की व्यायामापूर्वी आणि व्यायामानंतरच्या रक्तशर्करेत २० युनिटचा फरक पडतो. म्हणजे फास्टेड साखर १०० असेल तर ४० मिनिट सायकलिंग नंतर ती ८० झालेली असते! हा फरक तुम्ही डायबेटिक आहात किंवा नाही हे ठरवण्याइतका मोठा आहे.
पण हेच वेटलॉस साठी खरे ठरू शकेल का? समजा आपण फक्त व्यायामाने वजन कमी करायचे ठरवले आणि आहार भक्कम ठेवला, तर लिव्हर रिकामे करायला (ज्याला वर पहिल्या प्रमाणे ८-१२ तास शारीरिक क्रियांच्या माध्यमातून लागतात) किती व्यायाम करावा लागेल? आणि जरी आपण भरपूर व्यायाम केला, तरी शरीर "चालू" ठेवायला जेवढे उष्मांक लागतात त्यापेक्षा फारच कमी उष्मांक व्यायाम करून खर्ची पडतात. पण यामुळे व्यायाम निरुपयोगी आहे असे आहे का? तर नाही. व्यायामानाने अर्थातच ग्लायकोजेनचे साठे कमी होण्यास मदत होते. पण तो साखर कमी करण्यास जितकी परिणामकारक आहे तितकी वजन कमी करण्यास नाही. वजन कमी करण्यासाठी आहारावर नियंत्रण हे व्यायामापेक्षा महत्वाचे आहे. कारण अन्न आपल्या हॉर्मोनल सिस्टमवर जसा परिणाम करते तसा व्यायाम करत नाही. मात्र, व्यायामाने मेंदूमध्ये एंडोर्फिन्स सोडले जातात, ज्यामुळे आनंदी वाटते. त्यामुळे सतत व्यायाम करणाऱ्या लोकांना व्यायामाचे "ऍडिक्शन" होते. व्यायाम एक महत्वाचे अँटीडिप्रेसंट आहे.

शरीराचे रसायनशास्त्र समजून घेतले की काय खावे आणि काय खाऊ नये याचा अंदाज येतो. पण असे बदल करताना डॉक्टरांचा सल्ला घेणे उत्तम आहे. तसेच गोळ्या असतील तर डॉक्टरना विचारूनच बंद करणे किंवा कमी करणे योग्य आहे. शेवटी कुठलेही डाएट आपल्याला आणि आपल्या जीवनशैलीला सूट होणे महत्वाचे. त्यामागील प्रिन्सिपल एकच असणार आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>मला फक्त कॅलरी मोजायच्या आहेत. dietician/consultant नको.<<

मायफिटनेसपॅल बघा. कॅलरी इंटेक बरोबरच तुमचं वर्काऔट, चालणं इ. हि ट्रॅक करु शकता. आयोएस्च्या हेल्थ अ‍ॅपशी इंटिग्रेटेड असल्याने डेटा सिंक होतो - डॅशबोर्डवर तुमची प्रगती पाहु शकता. बर्‍याच भारतीय डिशेस त्या डेटाबेसमध्ये (थर्ड पार्टी असण्याची शक्यता) आहेत, जो वारंवार अपडेट होत असतो. त्यांचं पेड्/प्रिमियम वर्जन आहे का याची कल्पना नाहि, कारण मला अजुनतरी त्याची गरज भासलेली नाहि... Happy

भागवत साहेब,
अहो जाहिरातीच्या त्या एका चुकीच्या पोस्टने तुमच्या अवतारकार्याचे पितळ ऊघडे पडले हे तुमच्या लक्षात आले नाही का?
अमितच्या विपूत लिहून 'हौदसे गई वो बुंदसे आयेगी क्या'

मी तरी कालपर्यंत तुमचा हेतू मदत करणे हाच आहे आणि ऊत्साहात चुका होत आहे असे समजत होतो. पण तुमच्या एका पोस्ट ने जाहिरातीतून १ कोटीचे टार्गेट जमा करणे वगैरे तुमचा हेतू लख्खं ऊजेडात आणलाच की. तुम्ही कोणी लोकांच्या चांगल्या तब्येतीबद्दल कळवळा असलेले नसून तुमचा हेतू मायबोली हायवेवर 'दीक्षित जाहिरातीचा बोर्ड' घेऊन ऊभे राहून ट्राफिक तिकडे वळवणे हा आणि एवढाच आहे हे तुमच्या पोष्टीच्या एका चुकीतून तुम्हीच स्पष्ट सांगितले.

ह्या धाग्यावर दीक्षित पद्धतीची माहिती वाचून मला वाटले होते तुम्ही त्याबद्दल नक्की लिहाल. ती चूक बरोबर ते सांगाल, तुमच्याकडची माहिती त्यात अ‍ॅड कराल, तुम्हाला माहिती हवी असल्यास प्रश्न विचाराल पण तुम्ही असे काहीही न करता केले काय? तर गलेबल लोक बघून एजंटसारखे जाहिरातीचे कार्ड सरकावले.

साहेब, आहारपद्धतीच्या एका अनबायस्ड, विज्ञनाधारित, माहितीपर धाग्यावर जाहिरात करणे अनेथिकल आहे.
मायबोलीकरांच्या, एखाद्या विषयात गती व अभ्यास असणार्‍या लोकांकडून हेतूविरहित माहिती मिळ्वण्याच्या हक्कावर ही गदा आहे.
आणि मी तुमच्या या कृतीचा निषेध करतो.

सिगरेट मध्ये निकोटीन असते ही वैज्ञानिक माहिती.... तुम्ही सिगरेट पीत नसलात तरी दुसर्‍यामुळे ते निकोटीन तुमच्या शरीरात जाऊन अपाय करते... ही माहिती मिळ्वणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि म्हणून सिगरेट कंपन्यांना ती प्रकाशित करणे बंधनकारक.

हे असले कॅलरीजचे प्रकार डॉ. XXX यांच्या व्याख्यानात अजिबात नाहीत त्यामुळे ती पध्दत समजून घ्यायला व अवलंबायला सोपे जाते असा माझा वैयक्तिक अनुभव आहे. >
कॅलरी ही वैज्ञानिक माहिती आहे ती मिळवणे लोकांचा हक्क आहे..... समजायला/आचरण्याला सोपी म्हणजे दीक्षित पद्धत चांगलीच असे तुमचे म्हणणे आहे का?
भूक लागल्यावर डब्यात भरून ठेवलेली साखर खाणे हे समजायला/आचरण्याला किती सोपे आहे मग एवढे जेवण का बनवत बसावे बुवा?

सेल्समनचा/ एजंट्स चा वैयक्तिक अनुभव म्हणजे साड्या विकणारा 'अहो माझी बायको रोज हीच साडी वापरते' म्हणणे. तुमचा 'दीक्षित पद्धत गळी ऊतरवणे' हा एकमेव अजेंडा असतांना (जे तुम्हीच एक वेगळा धागा ऊघडून सांगितले आहे) ह्या ध्याग्यावर तुम्ही त्या पद्धतीबद्दल लिहिणे 'कॉन्फ्लिक्ट ऑफ ईंट्रेस्ट' आहे आणि म्हणून ते थांबायला हवे.

अनेक लोक म्हणाले 'एक-दोनदा सांगून सोडून का देत नाहीत' पण हा वैचारिक मतभेद नाही. तुम्ही स्वतः दीक्षित पद्ध्तीचा अवलंब करून थांबला असता तर तुमचा बद्धीभेद करायला मी कदापी आलो नसतो पण तुम्ही ईथे हेतूपुरस्सर पुन्हा पुन्हा 'जाहिरात' करत आहात आणि तेही ही 'जाहिरात' आहे हे लपवून, म्हणून वारंवार तसे सांगत रहाणे मला महत्वाचे वाटते.
तुम्ही अजुनही 'ही जाहिरात आहे' मी जाहिरात करतोय' असे स्पष्टं लिहा... आणि मग त्या खाली वाट्टेल ते क्लेम करा.
ते क्लेम करण्यासाठी तुम्ही दीक्षित पद्ध्तीचे अधिकृत पुरस्कर्ते कसे ते सांगणे आले आणि चांगल्या वाईटाची जबाबदारही ओघाने येईलच.

पोस्ट जरी तुम्हाला ऊद्देशून असली तरी माझा हेतू मला दिसलेले लोकांनाही दिसावे आणि त्यांनी सावध व्हावे हा आहे.
तुमच्याविषयी आधीही नव्हता आणि आताही वैयक्तिक आकस नाही.

सईच्या अनबायस्ड, विज्ञनाधारित, माहितीपर धाग्यावर गोंधळ होऊ नये ही तुमची ईच्छा असती तर तुम्ही ईथे लिहिले नसते.. आणि दीक्षित पद्धत लोकांना सोप्या रितीने कळालीच असती.

काहीही खाल्ल्यावर इन्सुलिन स्त्रवते हे बरोबर आहे. पण ते किती स्रवणार हे आपले अन्न ठरवते. - दीक्षित यांच्या भाषणातून मला जे कळले ते म्हणजे तुम्ही काहीही खाल्ले तरी शरीर ठरलेल्या प्रमाणातच इन्सुलिन सोडते. ते तुम्ही किती खाता यावर अवलंबून नसते
------------------------------------------------
@मृणाल१ आणि @पेरू

संदर्भ :
सई केसकर व डॉ. दिक्षीत यांची आहारपध्दती दोन्ही एकच आहेत असा विषय चालला होता. म्हणून मी अमितव यांना सई केसकर यांच्या लेखांच्या लिंका मागितल्या होत्या. त्या त्यांनी दिल्या. मी त्या वाचल्या व सई केसकरांपेक्षा डॉ.दिक्षीत विशेष अस जास्त काय सांगत आहेत ते मांडले होते. पण अमितव यावर काहीच बोलले नाहीत, पण त्यांच्यावतीने कोणीतरी अभ्यासू व्यक्तिने मला अभ्यास वाढवायला सांगितला म्हणून मग मी आपला अभ्यास करत बसलो. पण सईताई नक्कीच यावर त्यांची मते मांडतील ही खात्री असल्याने परत हा विषय मांडतो आहे. तसेच हे सर्व सईताईंनाच उद्देशून असल्याने डॉ. दिक्षीतांचे नाव वापरण्याचे स्वातंत्र्य घेत आहे. Happy

सईताईंच्या म्हणण्यानुसार
काहीही खाल्ल्यावर इन्सुलिन स्त्रवते हे बरोबर आहे. पण ते किती स्रवणार हे आपले अन्न ठरवते.

मात्र डॉ. दीक्षित यांच्या भाषणानुसार
१. काहीही खाल्ले तरी शरीर ठरलेल्या प्रमाणातच इन्सुलिन सोडते.
२. हे ठरलेले प्रमाण अन्नाच्या प्रकाराप्रमाणे बदलत नाही तसेच
३. इन्सूलीनचे हे ठरलले प्रमाण, अन्नाचे प्रमाण बदलले तरी बदलत नाही.
४. ही इन्सूलीन स्त्रवायची सायकल ५५ मिनिटांची आहे. म्हणजे ह्या ठरलेल्या प्रमाणानुसार रक्तात इन्सूलीन सोडल्यावर नंतरची ५५ मिनिटे नव्याने इन्सूलीन रक्त्तात सोडले जात नाही.:)

डॉ. दिक्षीतांनी स्वतःवर प्रयोग करून निश्चीत केलेले हे ४ मुद्दे एखाद्या विशिष्ट परिस्थितीत शरीर मोडू शकते का? या मुद्यावर मिसळपाववर जी चर्चा झाली ( प्रामुख्याने डॉ. खरे यांचेबरोबर) त्यानुसार

१. ही जी ५५ मिनिटांची सायकल आहे असे डॉ. दिक्षीत म्हणत आहेत, त्या ५५ मिनिटात सम्राटची/ राजधानीची थाळी पोट फुटेस्तोवर खाल्लीत तर आपणापैकी कोणीही डॉ दीक्षितांना खोटे पाडू शकू. इतकेच नव्हे तर युट्युब वर कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त खाण्याचे व्हिडिओ असतात. त्यात दाखवल्याप्रमाणे कोणी ५५ मिनिटे जेवायला लागले तर दिक्षीत नुसते हरणार नाहीत तर ते भाषण करायचेही कायमचे सोडून देतील!!!
थोडक्यात "भुक भागेस्तोवर" व "पोट फुटेस्तोवर" ह्या दोन शब्दामधील फरक समजावून घेतला पाहिजे.

२. "पोट फुटस्तोवर" ह्या शब्दाचा अर्थ झटकन स्पष्ट होत असला तरी " भूक भागणे" हा शब्द सापेक्ष आहे किंवा थोडासा फसवा आहे. प्रत्येक माणसाची भूक वेगवेगळी असू शकते. तसेच हे खालील प्रमाणे स्पष्ट होऊ शकेल

सामान्य माणसाच्या जठराचा आकार रिकाम्या पोटी साधारण २०० मिली असतो आणि हाच पोट भरून खाल्ल्यावर ८०० मिली ते १ लिटर पर्यंत होऊ शकतो.

लठ्ठ माणसांच्या जठराचा आकार १६०० ते २००० मिली होतो. यामुळेच अशा माणसांना भरपूर खाल्ल्याशिवाय पोट भरल्याची संवेदना होत नाही.

आपल्या पोटाचा आकार ८०० मिली ते १ लिटर आहे हे गृहीत धरल्यास आपण एका वेळेस जास्तीत जास्त ४०० ते ५०० मिली खाणे आवश्यक आहे. हे म्हणजे जास्तीत जास्त दीड पॅकेट मॅगी इतके होईल ( १०० ग्राम कोरडे मॅगी + १५०-२०० ग्राम/ मिली पाणी).

दुर्दैवाने जठराची क्षमता हि मिलिलिटर मध्ये मोजता येते. कॅलरी किंवा ग्राम मध्ये नाही.

आपण जर पाव किलो तूप प्यायला तर त्याच्या २२५० कॅलरी होतील जे सामान्य माणसाच्या दिवसभराच्या कॅलरीच्या गरजेपेक्षा जास्त होईल. एवढे करूनही आपले पोट ( सुरुवातीला तरी) रिकामे असल्याचेच आपल्याला भासेल.

सुदैवाने आपले शरीर कोणत्याही स्थितीला पटकन जुळवून घेत असल्याने लठ्ठ माणसांनी जर खरीखर्च मिताहार केला तर एक महिन्यात त्यांच्या जठराची क्षमता ३६% पर्यंत कमी होऊ शकते. https://www.ncbi.nlm.nih.gov/pubmed/8561056?itool=EntrezSystem2.PEntrez....

याचाच अर्थ प्रत्येक माणसासाठी लागणारा आहार वेगवेगळा असणार. मग प्रत्येकाने आपला आहार कसा निश्चीत करायचा असा प्रश्न निर्माण होतो.

यासाठी डॉ. दिक्षीत सांगतात तुमची भूक ओळखा. गेले काही दिवस म्हणजे आठवडा, पंधरवडा तुम्ही काय काय खात होतात याचा आढावा घेतला रोज तुम्हाला किती आहार लागतो ते निश्चीत करता येईल. दोनदाच जेवायचे आहे म्हणून ते वाढवू नका किंवा वजन कमी करायचय या हट्टाहासाने एकदम कमी करायचा प्रयत्न करू नका. एकदा तुमचा एका दिवसाचा आहार निश्चीत झाल्यावर त्याचे दोन भाग करा. समान भाग करायला पाहिजे असे नाही. एक मुख्य जेवण व एक हलके जेवण असेही तुम्ही करू शकता. आणि तेवढे अन्न दोनवेळेत खा. कॅलरी मोजायची फारशी जरूरी भासत नाही.

आय एफ चे एक वैशिष्ट्य आहे. उपाशीपोटी आपण जास्त खाऊ शकत नाही. आपोआप जेवण कमी होत जाते. त्याच बरोबर दिक्षीतांच्या पध्दतीने पोटभर जेवल्याचे समाधान मिळते. जेवण झाल्यावर तृप्तीची संवेदना जाणवते. आपण काहीतरी खायचे गमावतोय असे वाटत नाही. किंवा काहीतरी खायच्या आनंदाला आपण मुकतोय असे वाटत नाही. जेव्हा पोट भरल्याचे जाणवेल तेव्हा लागलीच थांबा. आपल्या पोटाचा आकार जर एक लिटरपेक्षा जास्त असेल तर तो आकार हळूहळू कमी होत जाईल. आपोआप भूक कमी लागत जाईल अशा रितीने योग्य भुकेकडे आपली वाटचाल सुरू होईल.

थोडक्यात आय एफ व डॉ. दिक्षीतांची आय एफ यामधील ४ वेगळ्या गोष्टींमुळे डॉ. दिक्षीतांची पध्दत इतर आय.एफ. पेक्षा वेगळी बनते, सुटसुटीत बनते त्यातील क्लिष्टता जाते. हे खा व हे खाऊ नका हे गेल्याने सर्वसामान्यांच्या आवाक्यात येते. आय एफ म्हणजे काहीतरी अवघड प्रकार असे वाटत नाही. आपोआपच सातत्य येते व कालांतराने त्याचे रूपांतर जीवनशैलीत होऊन जाते.

ही संपूर्ण पोस्ट मधुमेहींसाठी नाही. त्यांनी तज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच आहार निश्चीत करावा.
माझ्या कुवतीप्रमाणे मला जे कळले आहे ते मी मांडले आहे. ही जिवनशैली आचरताना फक्त या पोस्टवर अवलंबून न रहाता डॉ. दिक्षीतांच्या २ तासांच्या व्हिडिओ वर अवलंबून रहा.
सईताईंच्या मार्गदर्शनाच्या अपेक्षेत. . .

Insulin release is controlled by the amount of Epac2A at the secretory vesicles
Date:
July 7, 2017
Source:
Uppsala University
Summary:
Specialized beta cells in the pancreas release the hormone insulin to control our blood glucose levels, and failure of this mechanism is central to the development of type-2 diabetes. How much and when insulin is released depends on a complex system of messenger molecules and proteins that is not well understood.

हे एका सायंस पेपरमधले आर्टिकल

https://www.sciencedaily.com/releases/2017/07/170707133831.htm

वरची भागवतांची पोस्ट वाचल्यावर 'मत बनवण्यापूर्वी' तुमच्याच भल्यासाठी कृपया हा पेपर नक्की वाचा.

ईन्शूलीन आणि त्याचे रेग्य्युलेशन समजण्यासाठी हे सुद्धा वाचा
http://nutritionwonderland.com/2010/05/understanding-our-bodies-insulin/

त्यातला एक पॅराग्राफ
Regulating Insulin
While insulin levels are mostly regulated by the amount of glucose in our blood, other things can stimulate its release. Other molecules from digestion, like certain amino acids, proteins and lipids, can similarly stimulate insulin release. But most incredibly, our bodies begin releasing insulin before we even take a single bite of food. When we think about, smell, or slightly taste foods, our brains trigger what is called Cephalic Phase Insulin Release. A food’s color, appearance, flavor, aroma, and texture can all impact how our brains respond to the idea of eating it. The goal is to prepare the body for what the brain thinks will be a sudden flood of glucose. The sweeter and sugarier the brain thinks the meal will be, the more insulin it stimulates the pancreas to release before the food even enters the mouth.
Once we start to eat, our bodies ramp up insulin secretion, in what is often called first phase insulin release. Insulin that was kept in storage while our blood glucose levels were normal is released all at once, leading to a dramatic increase in insulin levels. The amount of insulin secreted in the first phase response to a meal is determined by the amount of glucose encountered in the previous meal – the more you needed last time, the more is released in this first phase. In a healthy person, this first phase response peaks a few minutes after you’ve started your a meal.
The β-cells then take a quick pause. If the first pulse was enough, then they slowly take up the insulin they released, and store it for the next meal. If the blood glucose levels stay high, though, the β-cells begin producing and releasing insulin in pulses every ten to twenty minutes. They continue this until the body’s blood glucose gets back to normal levels. The blood sugar rise caused by the meal peaks about half an hour after eating, and this, in turn, leads to a decrease in insulin production and release.

धन्यवाद.
अशाच चर्चेची अपेक्षा होति.

गेल्यावेळच्या जेवणात किती शुगर होती त्याहिशेबात इन्शुलिनचा कमी अधिक साठा आधीच करुन तो ओतणे, आणि पदार्थाच्या रंग, वास अगदी भावनेने स्त्राव सुरु होणे हे माहित न्हवतं.. आता समजल्यावर ते इंटुयटिव्ह ही वाटतंय. Happy हे इव्होल्युशन मध्ये डेव्हलप झालं का? इन्शुलिन कुठल्या कुठल्या प्राण्यांत (सस्तन इ.) असतं. अगदीच भाप्र आहेत, कोणी बायोलॉजिस्ट असतील तर सांगा, मी ही शोधतो.

उत्तर द्यायला वेळ झाल्याबद्दल क्षमस्व.
पण हाईझेनबर्गने लिहिलेली माहिती बरोबर आहे.
त्यापलीकडे असे ऍड करिन की जेव्हा आपण उपाशी असतो तेव्हादेखील रक्तात इन्सुलिनची एक बेसलाईन असते.
तुम्ही इन्सुलिन रेसिस्टन्ट असाल तर तुमच्या रक्तात फास्टेड स्टेटमध्ये जास्त इन्सुलिन असते. म्हणून साखर जरी नॉर्मल असली तरी तरी ती तशी ठेवण्यासाठी किती इन्सुलिन लागले यावरून तुम्ही प्रेडायबेटिक आहेत की नाही हे कळते.

आपण ज्यांना डायबेटिक म्हणतो. त्यांचा नक्की प्रॉब्लेम काय असतो?
जेवण झाल्यावर २ तासांनी साखर १४०च्या आत येत नाही. म्हणजे नॉर्मल माणसामध्ये जेवणानंतर २तासात जे साखर खाली आणायचे कार्य उरकते, ते व्हायला वेळ लागतो. आणि तुमच्या जेवणात जितके ग्लुकोजयुक्त पदार्थ असतात तितकी साखर पचनक्रियेत तयार होते आणि तितके इन्सुलिन जास्त सोडावे लागते.

जर ग्लुकोजच्या मात्रेचा आणि इन्सुलिनचा संबंध नसता, तर ज्यांना टाईप १ आहे त्यांना सगळ्यांना एकच ठराविक इन्सुलिनचा डोस लागला असता!! मग असे इंटेलिजंट इन्सुलिन पम्प वगैरे करायची काही गरजच लागली नसती.

कीटोजेनीक डाएट मध्ये फास्टिंग का करावे लागत नाही?
कारण तिथे इन्सुलिन असे डोंगर दऱ्या पॅटर्नमध्ये वाढतच नाही. त्यांचे इन्सुलिन सदैव बेसलाईनवर असते. कारण इन्सुलिन स्पाईक होऊ देणारा मॅक्रोन्यूट्रिएंटच वर्ज्य असतो (कार्ब्स).

आयएफमध्ये नंतर भूक लागायचे प्रमाण का कमी होते?

कारण शुगर शूट होऊन जेव्हा ती पुन्हा बेसलाईनला येते (१३० वरून ८०) तेव्हा आपल्याला हायपोग्लायसेमिया झाल्याची भावना येते आणि भूक लागते. हेच जेव्हा आयएफ मुळे बराच काळ आपली साखर स्टेडी राहते त्यामुळे भूकेवर नियंत्रण येते. (या अशा हायपोग्लायसेमियाबद्दल जॉन युडकिन यांनी प्युअर व्हाईट डेडली मध्ये चांगल्या प्रकारे लिहिले आहे.

ज्यांच्याकडे ग्लुकोमीटर आहे त्यांनी हा प्रयोग स्वत:वर अवश्य करून बघावा. ग्लुकोजयुक्त (पोळी भात) जेवणानंतर २ तासांचे रिडींग आणि अंडी/चिकन/स्प्राऊट्स/ सॅलॅड/ताक असा आहार घेतल्यानंतर २ तासांचे रिडींग. यात बराच फरक असतो. म्हणून तुमचे वजन कमी होणार किंवा साखर नियंत्रित राहणार की नाही हे नुसती खाण्याची वेळ नाही तर खाण्याचा कन्टेन्टसुद्धा डिक्टेट करतो.

@भागवत साहेब

तुम्ही इन्सुलिन कंट्रोल करून वजन कमी करायचे ठरवले तर कुठल्याही डाएटमध्ये तुम्हाला कॅलरी मोजायची बिलकुल गरज नाही . कीटोजेनीक डाएट घेणारे लोक ८०% फॅट खाऊन वजन कसे कमी करतात? फॅट मध्ये तर कार्बोहायड्रेट्सच्या कितीतरी पटीने जास्त कॅलरीज असतात! पण असे कित्येक एक्सक्लुझिव्हली किटो लोक आहेत, नव्हे, बॉडीबिल्डर्स पण आहेत ज्यांचे बॉडी फॅट किटोमुळे १० % च्या आत आले आहे. हे लोक सकाळ दुपार संध्याकाळ तिन्ही वेळा जेवतात. आणि ब्रोकोलीसुद्धा तुपात बुडवून खातात. मग यांचे का बरे वजन वाढत नाही?

तुमच्या दीक्षित पद्धतीत सुद्धा एखाद्याने जेवताना ३ अंडी (पिवळ्यासकट) खाल्ली तर ते ४५० कॅलरीज खातील. आणि २ तेलाच्या पोळ्या खाल्ल्या तर २२० कॅलरीज होतील. पण २ तासांनी २२० कॅलरीज खाऊनही ब्लडशुगर अंडी खाऊन असेल त्यापेक्षा अधिक असेल. आणि ओव्हरटाईम ३ अंडी रोज खाऊन पोळी कमी किंवा बंद केली तर ४४० कॅलरीज रोज जास्त खाऊनही वजन कमी होईल!

आणि तुमची तुपाचे उदाहरण १००% चूक आहे. कारण याविषयावरील रिसर्च हेच सांगते की फॅट खाल्ल्याने सटायटी वाढते. तुम्ही आहारातले फॅट कमी केले आणि कार्ब्स वाढवले की सारखी भूक लागते. शरीराला फॅट ब्रेकडाउन करायला लावण्यामागचा कीटोजेनीक डाएटचा मूळ हेतू हाच आहे. की फॅट खाल्ल्यामुळे पुन्हा पुन्हा भूक लागत नाही. आणि फॅट पासून तयार होणारे कीटोन बॉडीज मेंदू चालवण्यासाठी ग्लुकोजपेक्षा जास्त एफिशिएन्ट आहेत. असे का असावे?
कारण शरीराला फॅट वापरायची वेळ दुष्काळात येते. त्यामुळे कमीत कमी सोर्स वापरून जास्तीत जास्त ऊर्जा बनवण्याकडे शरीराचा कल असतो. तसेच, जेव्हा असे होते (व्हायचे) तेव्हा माणूस शिकारीच्या शोधात असायचा (कारण बराच वेळ उपास घडलेला असायचा). त्यामुळे काही लोकांचे असेही मत आहे की किटोन्सवर मेंदू अधिक तल्लख राहतो. तसेच दीर्घकाळ उपास केल्याने मेंदूं नवीन न्यूरॉन्स तयार होतात आणि अल्झायमर्स सारख्या आजारापासून असलेला धोका कमी होतो होतो.
https://www.ted.com/talks/sandrine_thuret_you_can_grow_new_brain_cells_h...

सई, इन्शुलिन सीक्रीशनच्या प्रमाणाबरोबरच इन्शुलिम रिसेप्टर्सच्या क्षमतेचाही विचार करावा लागेल ना? मी वेळ झाला मी संदर्भ शोधून देते, पण रिसेप्टर्सची क्षमता कमी झाल्यामुळेही शुगरवर परिणाम होतो असं वाचल्याचं आठवतं.

प्रोटिन्सबद्दलच्या लिंकसाठी तुला आणि अंजलीला धन्यवाद.

>>सई, इन्शुलिन सीक्रीशनच्या प्रमाणाबरोबरच इन्शुलिम रिसेप्टर्सच्या क्षमतेचाही विचार करावा लागेल ना? मी वेळ झाला मी संदर्भ शोधून देते, पण रिसेप्टर्सची क्षमता कमी झाल्यामुळेही शुगरवर परिणाम होतो असं वाचल्याचं आठवतं.

तू जे म्हणते आहेस त्यालाच इन्सुलिन रेझिस्टन्स असे म्हणतात. मी वरील कॉमेंट मध्ये सांगितले तसे. टाईप २ मध्ये (आणि त्या आधी इन्सुलिन रेझिस्टन्समध्ये) शरीरात इन्सुलिन भरपूर बनते. पण जिथे साखर वापरली गेली पाहिजे (शरीरातील स्नायू आणि पेशी) तिथे इन्सुलिनला प्रतिकार होऊ लागतो. याची कारणे काय आहेत हे अजून स्पष्ट झाले नाही. तुम्ही १० ते १५ वर्ष तुमच्या न कळत इन्सुलिन रेझिस्टंट असू शकता. अशा वेळी कदाचित तुमची फास्टिंग पण नॉर्मल असू शकेल. पण ती नॉर्मल ठेवायला शरीराला हेल्दी माणसांपेक्षा जास्त इन्सुलिन तयार करावे लागले असेल. असे अनेक वर्ष होऊन शेवटी पेशींचा रेझिस्टन्स एका लिमिटच्या पुढे जातो. आणि मग तुम्हाला टाईप २ चे निदान रिपोर्ट्समध्ये दिसते.

इन्सुलिन रेझिस्टन्सचा एक दृश्य क्लू म्हणजे मानेच्या वळ्या असतात तिथे आणि काखेतली त्वचा काळपट होणे. या काळपट पिगमेंटेशनचे टेक्श्चर वेलवेट सारखे असते. आणि लोकांना हा स्किन डिसीज वाटतो. पण तो तुम्ही इन्सुलिन रेझिस्टंट आहात याचा सिम्प्टम आहे. असे असेल तेव्हा फास्टिंग इन्सुलिन (शुगर नव्हे) चेक करून घ्यावे.

मगाशी मोबाईल वरून नीट प्रतिसाद देता आला नव्हता.
मला डॉ. दिक्षीतांच्या व्हिडिओवरून ज्या गोष्टी कळल्या नव्हत्या त्यातल्या बर्‍याच गोष्टी मला तुमच्या लेखांच्या अमितव यांनी दिलेल्या लिका मिळाल्यावर लक्षात आल्या होत्या. म्हणून मी काही प्रश्न विचारले होते त्याची पण उत्तरे मिळाली.
मुख्य म्हणजे सगळे जण वजन कमी करताना कॅलरीमधे मोजदाद करत असतात मात्र डॉ. दिक्षीत तसे का करत नाहीत हेच कळत नव्हते.

आयएफमध्ये नंतर भूक कमी होते हा प्रत्यक्ष अनुभव येत होता पण कारण लक्षात येत नव्हते. पण याही प्रश्नाचे उत्तर मिळाले.

तुम्ही १० ते १५ वर्ष तुमच्या न कळत इन्सुलिन रेझिस्टंट असू शकता. अशा वेळी कदाचित तुमची फास्टिंग पण नॉर्मल असू शकेल. पण ती नॉर्मल ठेवायला शरीराला हेल्दी माणसांपेक्षा जास्त इन्सुलिन तयार करावे लागले असेल. असे अनेक वर्ष होऊन शेवटी पेशींचा रेझिस्टन्स एका लिमिटच्या पुढे जातो. आणि मग तुम्हाला टाईप २ चे निदान रिपोर्ट्समध्ये दिसते.
हे तर अप्रतिमच. fasting insuline रिपोर्ट का मागतात तेही कळले.

मायबोलीवर तज्ञांकडून शिकता येईल ही आशा फलद्रुप झाली.
_/\_

मेहनतीने लिहिलेल्या डीटेल्ड माहितीपर प्रतिसादासाठी अनेक धन्यवाद सई.

आशा करतो "तुम्ही काहीही खाल्ले तरी शरीर ठरलेल्या प्रमाणातच इन्सुलिन सोडते. ते तुम्ही किती खाता यावर अवलंबून नसते" अश्या
समजण्यास सोप्या ओवरसिंपलीफिकेशनला आणि आचरणात आणण्याच्या सुटसुटीपणाला' अमूक ढमूक पद्धत बेस्ट आहे म्हणण्यापूर्वी बेसिक फॅक्टस समजाऊन घेण्याकडे माय्बोलीकरांचा कल वाढेल. झापडबंद डोळ्यांनी ओवरसिंपलीफिकेशनला चमत्कार म्हणून आपापला रिसर्च न करता विश्वास ठेवण्यातला धोका कळेल.

वरवरच्या पद्धतीला डीन कॉर्निश म्हणा, अ‍ॅटकिन्स म्हणा नाहीतर दीक्षित म्हणा ... शरीराचे बेसिक सायंटिफिक फॅक्ट्स त्या बदलू शकत नाहीत
जसे मला कितीही वाटत असले तरी फिजिक्सचे भावे सर न्यूटनचा नियम बदलू शकत नाहीत.

वा ! हा लेख वाचताना सुरूवातीलाच शाम भागवतांच्या लेखाचा उल्लेख आल्याने आधी तो वाचावा लागला. तो बराच वेळखाऊ आहे. आता पुन्हा वाचला. प्रतिसाद वेळ मिळेल तसे वाचतोय. माहितीपूर्ण आहे. इंटरमिटन्ट फास्टिंग असे लेख काही दिवसांपूर्वी दिसत होते ते तुमचेच आहेत का ? आता त्यांचा संबंध लक्षात आला.

लेख आज वाचला.
प्रतिक्रियाही वाचल्या.

नेहेमीप्रमाणे सेन्सिबल व स्वयंप्रकाशी लिहिलेलं आहे.

***

दिक्षीतांच्या पद्धतीला असलेली ऑब्जेक्शन्स भागवत यांनी स्वतःच लिहिली आहेत. Happy
>>
१. काहीही खाल्ले तरी शरीर ठरलेल्या प्रमाणातच इन्सुलिन सोडते.
२. हे ठरलेले प्रमाण अन्नाच्या प्रकाराप्रमाणे बदलत नाही तसेच
३. इन्सूलीनचे हे ठरलले प्रमाण, अन्नाचे प्रमाण बदलले तरी बदलत नाही.
४. ही इन्सूलीन स्त्रवायची सायकल ५५ मिनिटांची आहे. म्हणजे ह्या ठरलेल्या प्रमाणानुसार रक्तात इन्सूलीन सोडल्यावर नंतरची ५५ मिनिटे नव्याने इन्सूलीन रक्त्तात सोडले जात नाही.:)

डॉ. दिक्षीतांनी स्वतःवर प्रयोग करून निश्चीत केलेले हे ४ मुद्दे
<<

स्वतःवर प्रयोग करून??
कसे काय ब्वा?
यातले प्रत्येक वाक्य खोटे आहे. अन हेच बेसिस असेल, तर बाकी काहीही कार्यक्रम, वा माझे वजन या पद्धतीने कमी झाले वगैरे किस्से हे अशास्त्रीय आहेत.

तर असो.

माझा देव लय भारी आहे, असा ढोल बडवणारा बडवा असतो ना? तो त्या देवाची जाहिरात करून त्या देवाच्या 'ग्लोरी'ला स्वतःचे तेज भासवत असतो, अन नेमके हेच खटकते. म्हणून तिकडे लोकांनी कल्ला केला.

***

कीटोजेनिक डाएट ही बेसिकली संपूर्ण कार्निव्होरस डाएट आहे. शाकाहार्‍यांनी करू नये असे सुचवितो.

वाघ सिंहांना किंवा इतर संपूर्ण मासाहारी प्राण्यांना जेवणात फक्त प्रोटीन्स अन फॅट, काही प्रमाणात स्नायूंतला ग्लायकोजेन मिळतो. किडनी फेल्युअरने यांच्यापैकी किती आजारी असतात?

***

"फुकट अन विनासायास" काहीही नसते.

मला वजन कमी करायची गोळी द्या असे म्हणणारे. "डॉक्टर, काय खाल्लं की वजन कमी होईल?" असं विचारणारे अन असल्या फुकट विनासायास डाएट्स अवलंबणारे नमुने आजूबाजूला बरेच असतात.

आपले जेवण, आपली लाईफस्टाईल, घडणारा फिजिकल व्यायाम, याचा अभ्यास करून अन मग जेवण व लाईफस्टाईल नियंत्रित ठेवणे, हे फुकटही होत नाही अन विनासायासही.

तेव्हा,

अभ्यास करा. तज्ञांचा सल्ला घ्या. तज्ज्ञ म्हणजे वर सई यांनी लिहिलेल्या बायोकेमिकल प्रोसेसेस अभ्यासलेले लोक. क्रेब्ज'स सायकल, ग्लायको जेनेसिस, ग्लायकोजेनॉलिसिस, ग्लायकोनिओजेनेसिस, अन तत्सम मेटॅबॉलिक प्रोसेसेस समजणारे लोक.

यात होम्योपदी, युनानी, आयुरवैदिक, योगी वगैरे महान परंपरांचे पाईक समाविष्ट नाहीत.

या सगळ्यात काहीही फुकटही नाही, अन विनासायास तर अजिब्बात नाही!

जय हिंद, जय महाराष्ट्र Happy

ही जी ५५ मिनिटांची सायकल आहे असे डॉ. दिक्षीत म्हणत आहेत, त्या ५५ मिनिटात सम्राटची/ राजधानीची थाळी पोट फुटेस्तोवर खाल्लीत तर आपणापैकी कोणीही डॉ दीक्षितांना खोटे पाडू शकू >>>>

भागवत सर , ५५ मिनिटे खातच रहा किंवा ५५ मिनिटे होत नाहीत तोपर्यंत तुमच्या ताटातले संपले तर अजून मागवून खा असे दीक्षित यांचे म्हणणे आहे की तुमचे जेवण ५५ मिनिटांच्या डेडलाईन मधे संपवायचे असे ते म्हणाले आहेत ?
भूक ओळखा हे मी अनेकांकडून ऐकलेले आहे. भूक भागलेली असली तरी खात राहणे. यामुळे आता पुरे हा सिग्नल येणे बंद होते असे काहीतरी आहे ते.
दीक्षित यांची तीन चार व्याख्याने मी ऐकली. बहुतेक सारखीच आहेत. पण एका ठिकाणी ते म्हणतात कि लोक आहारतज्ञाची फीस द्यायला टाळतात (थोडे वेगळे शब्द असतील) पण नंतर (वजन वढल्यावर) हजारो रूपये खर्च करतात, ही भाषणे ऐकल्यानंतर मला जे जाणवले ते असे,

ही सर्वसाधारण जागृती आहे. ते फोन नंबर देतात. त्यावर त्यांनी सांगितलेल्या टेस्ट्सचे रिझल्ट्स कळवायचे. मग पुढच्या सूचना ते तुम्हाला कळवतात. मी अद्याप अनुभव घेतलेला नाही. तसेच तुम्ही डॉक्टरकडे जाऊ नका असे कुठेही म्हटलेले नाही. हा कॉमन सेन्स आहे. याचे पैसे द्यावे लागत नाहीत. तुम्हाला याचा फायदा झाला तर त्यांना कळवायचे आहे. शक्य झाल्यास तुम्हीही या कामात स्वतःला जोडून घ्यायचे आहे. यात मला व्यवसाय दिसत नाही. जाहीरात व्यवसायाची असते. सामाजिक कार्याचे आवाहन असते.
जेव्हां दीक्षितांच्या सूचना घेऊन आपण आपल्या डॉक्टरकडे जाऊ तेव्हां तो (आपल्या शरीराची चांगली माहिती असलेला मित्र) आपल्याला ते करायचे किंवा नाही हे सुचवेल. किंवा बदल सुचवेल. अशा परिस्थितीत आपण दीक्षितांच्या आणि इतरांच्याही ही गोष्ट लक्षात आणून देणे गरजेचे आहे. मधूमेहींसाठी ते वेगळ्या सूचना देतात.
तसेच त्यांनी स्वतःवर प्रयोग केला ही माहिती अपूर्ण आहे. त्यांनी स्वतःवर प्रयोग केल्यानंतर मित्र व इतरांवरही प्रयोग केले आहेत. बहुधा तीनशे चारशे जणांवर प्रयोग केल्यानंतर त्यांनी पेपर पब्लिश केलेला आहे. तुम्ही जर स्वतःवर प्रयोग केले या अपु-या माहितीवर डॉ. खरे यांच्याशी चर्चा केली असेल तर मग ती चूक त्यांची नाही असे मला वाटते.
त्यांनी जो पेपर पब्लिश केला त्याचे स्टेटस काय याची कल्पना नाही. त्यात गंभीर चुका असतील तर ते कारवाईस पात्र आहेत. माझ्या समजाप्रमाणे वैद्यकीय शिक्षण घेतलेला मनुष्य जबाबदारीने विधाने करत असतो. तीच अपेक्षा आहे. तसे नसेल तर मात्र तो अक्षम्य गुन्हा आहे. कारण समाजाचा या डिग्रीवर विश्वास आहे. सल्ला फुकट की विकत हा भाग वेगळा.

सई ने सांगितल्याप्रमाणे किटो डाएटने वजन कमी होते हे मित्राकडे पाहून पटले आहे. तो नॉन व्हेज खाऊन वजन कमी करतोय. या पद्धतीची पूर्ण माहिती आवडेल/ मिळवायला आवडेल.

@आमचा खड्डा
५५ मिनिटात जेवण संपवा अस डॉक्टर म्हणत आहेत. ५५ मिनिटे पूर्ण होईपर्यंत जेवत रहा असे ते म्हणत नाहीयेत.
व्याख्यानात १:४३:२३ नंतर तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल.

तुमच्या दुसर्‍या मुद्याबद्दल थोडेसे,
या व्याख्यानातील महत्वाचा भाग १:२६:४७ पासून सुरू होतो.
त्यानंतरच्या साडेतीन मिनिटात खालील मुद्दे येतात.

१. लठ्ठ होण्यामागे एकमेव कारण म्हणजे रक्तामधली इन्शूलीन लेवल वाढलेली राहणे.
२. इन्सूलीन चे दोन प्रकार (एक) पायाभूत इन्सूलीन व (दोन) खाण्यामुळे तयार होणारे इन्सूलीन
३. प्रत्येक माणसामधे खाल्यानंतर किती इन्शूलीन बनते त्याचे एक माप असते.
४. खाण्याचे प्रमाण व इन्शूलीनचे प्रमाण यांचातील संबंध
५. ५५ मिनिटांची सायकल
(भाषा इतकी ओघवती व खेळीमेळीची आहे की, १:२६:४७ नंतर व्हीडीओ सुरू केला की तो थांबावयाचे विसरायला होते. तेव्हा पुरेसा वेळ असेल
तेव्हाच पहा.)

सई केसकर या प्रामाणिक अभ्यासक आहेत. एखाद्याचे मत खोडून काढण्याअगोदर (त्या मतांचा बाजूने व विरोधात) पुरेसा अभ्यास व संशोधन करायला लागते याची त्याना जाण आहे. त्यामुळेचे मी हे मुद्दे आत्तापर्यंत दोनदा मांडूनही त्यांनी त्या मुद्यांना स्पष्ट शब्दात विरोध अथवा सहमती दर्शवलेली नाही. उलट वादाचा मुद्दा बाजूला ठेऊन पुढे कसे जाता येईल हेच त्यांचे धोरण राहिलेले आहे असे मला वाटते. ते धोरण हिताचे असल्याने मीही तेच अवलंबणार आहे. त्यानुसार या मुद्यांवर इतरांच्या बोलण्याला किती महत्व द्यायचे हे मायबोलीचे वाचक ठरवणार असल्याने मला मधे पडायचे काही कारण वाटत नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे, सगळेच सगळ्यांना व्यवस्थित ओळखून आहेत. Happy

>>>भूक ओळखा हे मी अनेकांकडून ऐकलेले आहे. भूक भागलेली असली तरी खात राहणे. यामुळे आता पुरे हा सिग्नल येणे बंद होते असे काहीतरी आहे ते.
भूक भागली आहे हे सांगणारे केमिकल लेप्टीन आहे. आणि रॉबर्ट लस्टिग यांचे संशोधन असे सांगते की लठ्ठ व्यक्तींचा लेप्टीन-इन्सुलिनचा समतोल बिघडलेला असतो. लेप्टीनचे संकेत फॅट सेल्समधून येतात. आणि ज्या प्रमाणे पेशी इन्सुलिनला प्रतिकार करतात तशाच त्या लेप्टीनला सुद्धा करतात. म्हणून इन्सुलिन रेझिस्टन्स: लठ्ठपणा: लेप्टीनचे बिघडलेले सिग्नल अशा सगळ्या गोष्टी एकत्र झाल्या की भुकेवरचा ताबा सुटतो.
पूर्वी असे झाले की याचा दोष लोकांच्या कमकुवत विलपॉवरला दिला जायचा. पण जेव्हा हे सगळे सिग्नल व्यवस्थित चालतात तेव्हा अतिरेकी खाणे होत नाही.

एकूणच या सगळ्या पोस्ट्स मध्ये अमुक एक चूक आणि अमुक एक बरोबर असे मला सिद्ध करायचे नाहीये.
फक्त मला असे वाटते की हल्ली "वेलनेस इंडस्ट्री" च्या नावाखाली जे जे काय म्हणून येते (जिम्स, न्यूट्रिशनिस्ट, डाएटिशियन, सिलीब्रीटी डाएटिशियन) त्यांची मार्केटिंग स्ट्रॅटेजी डॉक्टरवरचा विश्वास उडवायची आहे (काही अंशी). बिग शुगर लॉबीने डॉक्टर ४० वर्षांपूर्वी विकत घेतले वगैरे कथा आत्ता ऐकायला रोमांचक वाटतात. पण क्लिनिकल रिसर्च असे ठेचा खात खातच पुढे जात असते. ४० वर्षांमध्ये आपले साखरेचे कंझम्पशनच इतके वाढले आहे की काही काही गोष्टी (जसे कि नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर, जो आता लहान मुलांना होऊ लागला आहे) आत्ता डॉक्टरांच्या निदर्शनास येऊ लागल्या आहेत. आणि पूर्वीच्या काही धारणा चूक होत्या हे वैज्ञानिक पद्धतीने सिद्ध करणारेसुद्धा डॉक्टरच आहेत.

पण फेसबुक, व्हाट्सअँप, या सगळ्या न्यूट्रिशनिस्टचे फ्री व्हिडीओ वगैरे आपण काही न करता आपल्या हातात येऊन पडतात तसे हे सगळे रिसर्च पडत नाही. म्हणून प्रत्येक पुस्तकाचा रिव्ह्यू मी इथे लिहायचा प्रयत्न करते. माझ्या परिवारात डायबेटीसमुळे अनेकजण तिशीत पस्तिशीत गेलेले मी बघितले आहे. तसेच त्यामुळे करावी लागणारी अँप्युटेशन्स, डायबेटीसमुळे होणारे किडनी फेल्यूर वगैरे अगदी जवळून पहिले आहे. त्यामुळे नियमित रक्तचाचण्या आणि डॉक्टरांचा सल्ला हा किती महत्वाचा असतो हे लहानपणीच समजले आहे. तुम्ही अनुवंशिकता बदलू शकत नाही. पण तुमचा अनुवांशिकतेला प्रतिसाद बदलू शकता.

भागवत सर
माझा किंवा तुमचा उद्देश कुठलाही झेंडा मिरवणे हा नाही हे मी इतरत्र ही स्पष्ट केले आहे. माझ्या समजुतीप्रमाणे ५५ मिनिटांची विंडो या बाबतीत तुमचा गोंधळ झाला आहे. तुम्ही बालगंधर्व रंगमंदीर येथील व्याख्यानाची लिंक दिलेली आहे. मी टिळक स्मारक मंदीर इथे झालेले व्याख्यान देखील ऐकले आहे. त्यांचे लख्ख सांगणे आहे की आपले जेवण ५५ मिनिटांच्या आत संपवावे (अनेक जण हळू खातात. माझ्या मुलीला तास ते दीड तास लागतो ). जर नाही संपवले तर पुढच्या विंडो मधे तुम्ही जेवणाचा शिल्लक भाग जो ५% का असेना पोटात ढकललात तर नव्याने इन्शुलीन तयार होईल. यासाठी ते या मुदतीत संपवले पाहीजे. त्यात जैनांच्या आहाराबाबतचा एक श्लोक पण ते सांगतात. जैनांमधे ४८ मिनिटात जेवण संपवावे असे मुनी सांगतात (जरी ते अशास्त्रीय विधान असले तरी उद्देश स्पष्ट करण्यासाठीच दिलेले आहे).

आपल्या आताच्या प्रतिसादा मुळे ५५ मिनिटात नेहमीपेक्षा जास्त जेवावे असा अर्थ निघत आहे.
( तुमचा प्रतिसाद येण्या अगोदर मूळचा प्रतिसाद दुरूस्त केला आहे )

सई
धन्यवाद या माहितीबद्दल. माझा उद्देश माहिती ग्रहण करणे हा आहे. मी या कुठल्याही माहितीचा प्रतिवाद करण्याच्या स्थितीत नाही. मात्र नंतर जर काही वेगळे आढळले तर जरूर इथे निरीक्षण नोंदवीन.

दीक्षित प्रणालीबाबत माझ्या मनात एकच शंका आहे. पण खरे म्हणजे हीच काय कुठलीही प्रणाली स्विकारण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांना भेटले पाहीजे.
ब-याच जणांच्या बाबतीत हायपर अ‍ॅसिडिटी / गॉल ब्लॅडर मधे स्टोन असे त्रास असतात. त्यांच्यासाठी सोळा तास उपवास हे प्रसंगी गंभीर ठरू शकते. माझ्या डॉक्टरांच्या मते काहींमधे पुरेशा प्रमाणात पाचक आम्ले शरीरात तयार होत नाहीत. त्यांच्यासाठी एका वेळी पुरेसं जेवण हे पचनासाठी घातक ठरू शकते. त्यांच्यासाठी थोड्या थोड्या वेळाने (अल्प) खाणे वरदान ठरते. त्यामुळे सॅंपल्स घेतले असतील तर त्या सँपल्सच्या बाबतीत आरोग्याच्या तक्रारीही माहीत असायला हव्यात. त्याचे अ ब क ड असे वर्गीकरण केलेले असायला हवे. (हे माझे मत. त्याला आधार नाही कशाचा).

सई केसकर या प्रामाणिक अभ्यासक आहेत. >>> याबद्दल मला कधीही शंका नव्हती.
एका निनावी आयडीने स्वतः डॉक्टर आहे असा क्लेम करून एका ज्ञात वैद्यकीय पदवीधारक प्राध्यापकाला खोटारडे हा आरोप लावण्याबाबत मी जे लिहीले होते ते नंतर अनावश्य्क म्हणून काढून टाकले. त्यांनी तो प्रतिसाद तुमच्या आताच्या प्रतिसादावर आधारीत दिलेला आहे आणि व्हिडीओ पाहण्याचे कष्ट घेतलेले नाहीत असा समज त्यातून होत होता.
एखाद्या क्षेत्रातल्या तज्ञाने अधिकारवाणीने काहीही भाष्य करताना आपली वैयक्तिक ओळख लपवण्याचे काय कारण ? त्यामुळे ती व्यक्ती खरंच अधिकारी आहे किंवा कसे हे प्रश्न उपस्थित होतात.
तो प्रतिसाद सई यांना उद्देशून नव्हता.

@आमचा खड्डा
१. हायपर अ‍ॅसिडिटी वाल्यांसाठी ही डाएट पध्दत अनुकूल नाही अस डॉ. दिक्षीत म्हणतात. गॉल ब्लॅडर मधे स्टोन बद्दल काही माहीत नाही.

२. कदाचित माझा हा धागा तुम्ही वाचला नसावात. त्यात मी खालील प्रमाणे लिहिले आहे.
डॉ. दीक्षित सध्या ते लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विभाग प्रमुख आहेत व गेली सत्तावीस वर्षे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अध्यापन करत आहेत. "स्थूलत्व निवारण आणि मधुमेह प्रतिबंध" या विषयावर त्यांनी संशोधन केले.यात त्यांनी प्रथम स्वतःवर प्रयोग केले. नातेवाइकांवर प्रयोग केले. जवळच्या मित्रांवर प्रयोग केले. या सगळ्याच्या व्यवस्थित नोंदी ठेवल्या. मग मात्र त्यांनी लातूर व औरंगाबाद येथील हजारो लोकांवर प्रयोग केले. वैज्ञानिक नियतकालिकात प्रबंध लिहिण्यासाठी या प्रयोगाचे योग्य दस्तावेजीकरण केले व अनेक प्रबंध प्रकाशीतही केलेले आहेत.

Pages