विविध आहार-प्रणाली आणि शरीराचा प्रतिसाद

Submitted by सई केसकर on 23 August, 2018 - 08:40

शाम भागवत यांच्या दीक्षित प्रणालीवरच्या धाग्यामुळे बरीच चर्चा झाली. त्यातून काही मुद्दे आले आहेत, ज्यांवर मी एक प्रतिसाद लिहायला घेतला होता. पण त्या प्रतिसादाचा लेखच होऊ लागल्यामुळे तो वेगळा लेख म्हणून इथे देत आहे. त्या चर्चेत आलेले काही प्रश्न आणि त्यांची (मला माहिती असलेली) उत्तरे इथे लिहीत आहे. पण त्या आधी एक महत्वाचा मुद्दा मांडण्याची गरज वाटते. आपण आहारात बदल, मग तो कुठलीही आहार प्रणाली (दर दोन तासांचा मिताहार (ऋजुता दिवेकर), आयएफ, दीक्षित, फाईव्ह टू, कीटोजेनीक) वापरून करीत असू. पण आपला मूळ हेतू काय आहे हे निश्चित असणे गरजेचे आहे. असे म्हंटले जाते की टाईप २ डायबेटीस हा लठ्ठपणामुळे होतो. पण अलीकडच्या संशोधनातून असे सिद्ध होते आहे की लठ्ठपणा हा टाईप २ होण्याचे पहिले लक्षण आहे. या दोन्हीमध्ये सूक्ष्मसा फरक आहे. लठ्ठपणा हा डायबेटीसचे कारण नसून ते एक लक्षण आहे. पण मग सगळ्या लठ्ठ व्यक्तींना डायबेटीस असतो का? याचे उत्तर अर्थातच नाही असे आहे. आणि सगळ्या सडपातळ व्यक्तींना डायबेटीस होण्याचा अजिबात धोका नसतो का? असेही नाही.

पण चाळिशीनंतर आहारात बदल करणारे, मग ते स्वयंप्रेरणेने असो किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने, बरेच लोक या पैकी एकाशी (लठ्ठपणा किंवा डायबेटीस) किंवा दोन्हीशी झगडत असतात. जे दोन्ही गोष्टींशी झगडत असतात त्यांचा एक उपगट होऊ शकतो. आणि अशा लोकांमध्ये अनुवांशिकतेमुळे आधी लठ्ठपणा आणि मग टाईप २ डायबेटीस अशी अधोगती झालेली दिसते. पण वरील पैकी कुठल्याही गटात तुम्ही असलात आणि तुम्ही वेगवेगळ्या आहार पद्धती वापरून तुमचे वजन किंवा साखर आटोक्यात ठेवायचा प्रयत्न करत असाल तरी तुमच्या शरीराचा प्रतिसाद एकाच प्रकारचा असतो. आणि हे कसे होते ते मी इथे लिहायचा प्रयत्न करणार आहे. इथे मी शास्त्रीय रेफरन्सेस देत नाहीये कारण हे बऱ्याच पुस्तकातील माहितीवर आधारित आहे. ज्यांना जशी माहिती हवी असेल तशी आपण प्रतिक्रियांमध्ये चर्चेला घेऊ. म्हणजे आपल्या सगळ्यांनाच एक संकलित धागा मिळेल.

वजन वाढीचे आणि ग्लुकोज वापराचे जीवरसायनशास्त्र

वजन कसं कमी होतं हे जाणून घेण्यासाठी शरीरातील एका महत्वाच्या अवयवाबद्दल थोडी माहिती असली पाहिजे. ते म्हणजे पॅनक्रिया अर्थात स्वादुपिंड. या ग्रंथीला आपण शरीरातील "फूड डिस्ट्रिब्युशन मॅनेजर" असं म्हणू शकतो. आपण खाल्लेल्या अन्नातील ग्लुकोज आपल्या शरीराच्या कानाकोपऱ्यात नेण्याचे काम इथे तयार होणाऱ्या संप्रेरकांमुळे होत असते. स्वादुपिंडात अल्फा, बीटा, डेल्टा, गामा आणि इप्सिलॉन अशी नावे असलेल्या पेशी असतात. त्यातून वेगवेगळी संप्रेरके सोडली जातात. आणि कुठलं संप्रेरक कधी येईल हे मात्र आपण खाल्लेले अन्न ठरवते. यातील दोन महत्वाची संप्रेरके आहेत इन्सुलिन आणि ग्लुकागॉन.

इन्सुलिन (ज्याची कमतरता किंवा अभाव यात डायबेटीस २ आणि १ होतात) रक्तातील ग्लुकोज नियंत्रित ठेवण्याचे काम करते. इन्सुलिनचे हे एकच कार्य सामान्य लोकांना माहिती असते. पण इन्सुलिनचे दुसरे कार्य म्हणजे लिव्हर ला अतिरिक्त ग्लुकोज, ग्लायकोजेन आणि फॅट या रूपात साठवून ठेवायचे आदेश देणे. ग्लुकागॉन याच्या बरोब्बर उलट काम करतं. जेव्हा रक्तातील ग्लुकोज कमी होतं तेव्हा ग्लुकागॉन लिव्हर आणि स्नायूंमध्ये साठवलेल्या ग्लायकोजेनचे ग्लुकोज मध्ये रूपांतर करतं.७० किलोच्या माणसाच्या लिव्हरमध्ये १००-१२० ग्राम ग्लायकोजेन मावते. ग्लायकोजेनवर शरीर ८-१२ तास चालू शकते. आणि ग्लायकोजेन संपल्यावर ग्लुकोनियोजेनेसिस या प्रक्रियेतून कर्बोदके नसलेल्या पदार्थातून ग्लुकोज निर्मिती करतं. आणि फॅटचे किटोसिसनी केटोन मध्ये रूपांतर करतं. ग्लुकोज आणि कीटोन या दोन्ही इंधनांवर आपलं शरीर चालू शकतं.

कर्बोदकांना इन्सुलिनचा सगळ्यात जास्त प्रतिसाद मिळतो. त्यामुळे जेवणात ब्रेड, पास्ता, पोळी, भात, साखर याचे प्रमाण जितके जास्त तितके जास्त इन्सुलिन बनते. त्याखालोखाल प्रथिनांना इन्सुलिनचा प्रतिसाद असतो. आणि सगळ्यात कमी प्रतिसाद हा पालेभाज्या आणि फॅट्सना मिळतो. पण डाएटरी फॅटचा चुकीचा संबंध कोलेस्टेरॉलशी जोडला गेल्यामुळे फॅट्स बऱ्याच वर्षांपासून बदनाम झाले आहेत.

तुम्ही डाएट कुठलेही करा. वरील रसायनशात्र बदलणार नाही. आता फक्त कुठले डाएट हे या वरील साच्यात कसे बसते आणि यशस्वी होते हे समजून घेऊ.

१. थोड्या थोड्या वेळाने ५-६ वेळा खाणे

भागवतांच्या धाग्यात एक प्रश्न होता. की जर काहीही खाल्ल्याने इन्सुलिन स्रवते, तर दर दोन तासांनी थोडे थोडे खाल्ल्यास वजन का कमी होते?
तुम्ही कुठल्याही प्रस्थापित डाएटिशियनचा अशा आहाराचा दिनक्रम बघा. दर दोन तासांनी खायचे असले तरी ते काय खायचे याला अनन्यसाधारण महत्व आहे. बऱ्याच वेळा अशा प्रणालीमध्ये फॅट आणि कार्ब्स दोन्हीवर कंट्रोल असतो. शक्यतो शेवटचे जेवण हे सातच्या आत किंवा आसपास घेण्याचाही आग्रह असतो. अशा प्रणालीमध्ये एका जेवणात पोळी आणि भात एकत्र कधीच नसतो. मधल्या वेळेतील स्नॅक्ससुद्धा लो कार्ब्स म्हणावीत अशीच असतात. जसे की बदाम, ताक, ग्रीन टी, चीज इत्यादी. तसेच एका वेळी किती खायचे याला मर्यादा असते. साखर वर्ज्य असते.
काहीही खाल्ल्यावर इन्सुलिन स्त्रवते हे बरोबर आहे. पण ते किती स्रवणार हे आपले अन्न ठरवते. जर दोन दोन तासांनी आपण कमीत कमी इन्सुलिन स्रवेल असा आहार घेतला, तर
१. लिव्हरमध्ये ग्लायकोजेन साठणार नाही
२. मिळालेल्या थोड्या साखरेतून शरीराच्या पेशींना इंधन मिळत राहील
३. रात्री ७ ते सकाळी नाष्ट्यापर्यंत जे काही थोडेफार ग्लायकोजेन आहे ते वापरून शरीर फॅटवर चालू राहील.
पाहायला गेले तर इथेसुद्धा फास्टिंगची मदत घेतली जाते. पण ते सगळे तास झोपेतच गेल्याने ते आपल्याला जाणवत नाही.

२. आय एफ

आयएफ बद्दल मीच इथे खूप दळून झाले आहे. त्यामुळे अजून जास्त लिहायची गरज नाही. पण ऋजुता दिवेकर पद्धतीत आपण जे ५-६ वेळा खातो ते सगळे आणि थोडे अधिक या पद्धतीत २ वेळा खातो. आयएफचा सुटसुटीतपणा हा या दोन वेळेच्या पोटभर जेवणात आहे. पण इथेही पोळी, भात, साखर यांना लगाम लावला नाही तर या प्रणालीचा काहीही उपयोग नाही. इथे तुम्ही जेव्हा १६ किंवा अधिक तास इन्सुलिन तयार होईल असे काहीही खात नाही, तेव्हा तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते. आणि तुम्ही २ जेवणात जे थोडे जास्त खाऊन ग्लायकोजेन जमवलेले असते, ते त्या १६ तासात वापरून थोडे फॅटदेखील वापरले जाते. यातील काही तास जागृतावस्थेत असतात त्यामुळे भुकेची तीव्रता तुम्हाला अनुभवावी लागते. मग समजा, आपण इथेही २ वेळा अत्यल्प खाल्ले तर? तर तुम्हाला लगेच भूक लागते आणि तुमचे आयएफ मोडते. तसेच ऍसिडिटी वगैरे होण्याचाही संभव असतो. त्यामुळे १६ किंवा अधिक तासांच्या फास्टिंगवर जर तुम्ही राहणार असाल तर पोटभर खाणे आवश्यक आहे. तसेच प्रथिनांचा आणि हेल्दी फॅट्सचा (फुल फॅट दही, दूध, चीज, अंड्यातील पिवळे) यांचा समतोल राखणे गरजेचे आहे.
याचेच व्हेरिएशन ५-२ डाएट आहे. यात ५ दिवस तुम्ही ३ वेळा जेवायचे आणि २ दिवस कर्बोदके आणि प्रथिनविरहित कडकडीत उपास करायचा. इथे पुन्हा रसायनशास्त्र तेच आहे. २ दिवस कुठलाही साखरेमध्ये रूपांतरित होईल असा स्बस्ट्रेट तुम्ही खाल्लाच नाही, तर नाईलाजाने लिव्हर आणि स्नायूंमधले ग्लायकोजेन वापरून नंतर फॅटवर शरीर चालते. २ दिवसांचा उपास दीर्घकालीन असल्यामुळे उरलेले पाच दिवस व्यवस्थित जेवता येते. तुम्ही फास्टिंगची वेळ जितकी वाढवाल, तितकी खायची मुभा तुम्हाला फीडिंग विंडोमध्ये मिळते. कारण दीर्घकाळ फास्टिंग केल्याने फॅटबर्निंग सुद्धा जास्त होते.

३. दीक्षित पद्धत

यामध्ये ५५ मिनिटांच्या २ विंडो दिल्या आहेत. त्यात तुम्ही तुमच्या संबंध दिवसाचा योजलेला आहार घ्यायचा आहे. साधारण सकाळी १२ आणि रात्री ८ अशा या २ वेळा असतात. रात्री ८ ते सकाळी १२ म्हणजे १६ तासाचे फास्टिंग आहे. म्हणजेच इथेही फास्टिंगचा आधार घेतलेला आहे. १२ पर्यंत काहीही खायचे नाही किंवा ४० कॅलरीजच्या आतले द्रवपदार्थ (जसे की २ चमचे दह्याचे ताक किंवा बिनसाखरेचा पाण्याचा चहा) घ्यायचे, हे अंगवळणी पडायला अवघड असले तरी एकदा सवय झाली की व्यवस्थित जमायला लागते. पण यात जर तुम्ही पोळी, भात साखरेचे प्रमाण वाढवले तर काय होईल? सकाळच्या जेवणानंतर तुमची साखर शूट होईल. त्यामुळे ती आटोक्यात आणायला बरेच इन्सुलिन लागेल. आणि उरलेल्या साखरेचे भरपूर ग्लायकोजेन बनेल. हा इन्सुलिन स्पाईक तुमचे शरीर आवरून ठेवते आहे तोपर्यंत ८ वाजताचे तसेच लोडेड जेवण येईल!
फॅट बर्निंग हवे असेल तर लिव्हर पुन्हा पुन्हा रिकामे झाले पाहिजे. आणि हे उपाशी न राहता साध्य करायचे असेल तर ज्या खाद्यपदार्थांनी इन्सुलिन तयार होते ते कमी खाल्ले पाहिजेत.
टाईप २ साठी तुम्ही हे डाएट करत असलात, तर जेवणाच्या कन्टेन्टबद्दल जागृक असणे जास्त महत्वाचे आहे. कारण टाईप २ मध्ये शरीरातील पेशी इन्सुलिनला हवा तसा प्रतिसाद देत नाहीत. आणि फास्टिंगमुळे आणि कर्बोदके कमी केल्यामुळे, पेशींची प्रतिसाद द्यायची ताकद सुधारते. म्हणूनच असा आहार घेणाऱ्या बऱ्याच जणांचे मॅफॉर्मिनचे प्रमाण हळू हळू कमी होऊ लागते.

४. केटोजेनीक डाएट

वरील तीनही प्रणालींमध्ये आपण फास्टिंग आणि कर्बोदके नियंत्रित ठेवण्याचा खेळ बघितला. पण असेही एक डाएट आहे जे या सगळ्याला बगल देऊन एका क्रांतिकारी मार्गाचा अवलंब करते. आपण पहिले की कर्बोदकांना इन्सुलिनचा सगळ्यात जास्त प्रतिसाद असतो. मग आपण कर्बोदके खायचे सोडूनच दिले तर? आपण ज्याला धान्य म्हणतो ते सगळे कर्बोदकांमध्ये मोडते. तसेच साखर. कीटोजेनीक डाएट मध्ये प्रत्यक्ष कर्बोदके (म्हणजे साखर आणि धान्य) वर्ज्य असतात. अप्रत्यक्ष कर्बोदके (जी भाज्यांमधून मिळतात) २० ग्रॅमच्या आत घ्यायची असतात. कर्बोदकांच्या मागोमाग प्रथिने रक्तशर्करा निर्मितीत सहाय्य करतात. त्यामुळे प्रथिनेही बेताची खाण्याकडे कीटोजेनीक डाएटचा भर असतो. आणि उरले काय? तर ८० % फॅट खाऊन हे डाएट गेले जाते आणि असे डाएट करून लोक वजनही कमी करतात आणि साखर सुद्धा नॉर्मल ठेवतात. कारण यांचे शरीर कधी ग्लुकोजवर चालतच नाही. सतत फॅटचे कीटोनमध्ये रूपांतर करून ही माणसे किटोसिसमध्ये असतात. जेव्हा शरीराला ग्लुकोज लागते, तेव्हा प्रोटीनपासून ते तयार केले जाते. याला ग्लुकोनियोजेनेसिस असे म्हणतात. त्यामुळे कर्बोदके खाल्ली नाहीत तरी शरीर व्यवस्थित (आणि याविषयात काही तज्ज्ञांच्या मते, जास्त चांगले) चालते. टाईप २ डायबेटीससाठी हे डाएट चांगले आहे हे दाखवून देणारे अनेक प्रयोग पाश्चात्य देशांमध्ये झाले आहेत.
अर्थात अशा नियमांमध्ये चपखल बसणारे अन्न मांसाहारी आहे. शाकाहारी कीटोजेनीक डाएट अतिशय अवघड आहे, पण भारतात लोक शाकाहारी कीटोजेनीक डाएट करतानादेखील दिसतात. इतके फॅट खाऊन कुणी वजन कमी करू शकेल का? याचे उत्तर हो आहे. कारण वरील रासायनिक प्रक्रियांमध्ये अत्यल्प इन्सुलिन तयार करण्याच्या गुणधर्मात फॅट चपखल बसते. असे डाएट करून एचडीएल वाढवून एलडीएल कमी झालेलया लोकांवर संशोधनही झालेले आहे. स्टीवन फिनी, टीम नोक्स, पीटर आटीया हे असे काही डॉक्टर्स आहेत ज्यांनी कीटोजेनीक डाएटवर संशोधनही केले आहे आणि आपापले ग्रुप्स तयार केले आहेत. यांची नावे गूगल केल्यास साऊथ आफ्रिकेतले बॅन्टिंग डाएट आणि अमेरिकेतील व्हर्टा ही संस्था काय करते ते वाचनीय आहे.
अर्थात कीटोजेनीक डाएट टोकाचे असल्याने त्याची सवय व्हायला वेळ लागतो आणि रोजच्या आयुष्यात काटेकोरपणे पाळण्यात अडथळे येऊ शकतात. तसेच, किटोसिसमधून बाहेर आल्यावर पुन्हा किटोसिसमध्ये जायला वेळ लागतो.

शेवटी, व्यायाम या सगळ्यामध्ये कुठे बसतो?

तुम्ही डायबेटिक असाल तर व्यायाम, तोदेखील कार्डिओव्हॅस्क्युलर, अत्यंत महत्वाचा आहे. तुम्ही उपाशी पोटी व्यायाम केलात, तर लिव्हरमधील आणि स्नायूंमधील ग्लायकोजेन झटकन वापरले जाते. त्यामुळे रक्तातील साखर स्नायूंमध्ये पुन्हा घेतली जाते. माझ्या स्वतःच्या अशा (अनावश्यक) प्रयोगातून असे दिसून आले, की व्यायामापूर्वी आणि व्यायामानंतरच्या रक्तशर्करेत २० युनिटचा फरक पडतो. म्हणजे फास्टेड साखर १०० असेल तर ४० मिनिट सायकलिंग नंतर ती ८० झालेली असते! हा फरक तुम्ही डायबेटिक आहात किंवा नाही हे ठरवण्याइतका मोठा आहे.
पण हेच वेटलॉस साठी खरे ठरू शकेल का? समजा आपण फक्त व्यायामाने वजन कमी करायचे ठरवले आणि आहार भक्कम ठेवला, तर लिव्हर रिकामे करायला (ज्याला वर पहिल्या प्रमाणे ८-१२ तास शारीरिक क्रियांच्या माध्यमातून लागतात) किती व्यायाम करावा लागेल? आणि जरी आपण भरपूर व्यायाम केला, तरी शरीर "चालू" ठेवायला जेवढे उष्मांक लागतात त्यापेक्षा फारच कमी उष्मांक व्यायाम करून खर्ची पडतात. पण यामुळे व्यायाम निरुपयोगी आहे असे आहे का? तर नाही. व्यायामानाने अर्थातच ग्लायकोजेनचे साठे कमी होण्यास मदत होते. पण तो साखर कमी करण्यास जितकी परिणामकारक आहे तितकी वजन कमी करण्यास नाही. वजन कमी करण्यासाठी आहारावर नियंत्रण हे व्यायामापेक्षा महत्वाचे आहे. कारण अन्न आपल्या हॉर्मोनल सिस्टमवर जसा परिणाम करते तसा व्यायाम करत नाही. मात्र, व्यायामाने मेंदूमध्ये एंडोर्फिन्स सोडले जातात, ज्यामुळे आनंदी वाटते. त्यामुळे सतत व्यायाम करणाऱ्या लोकांना व्यायामाचे "ऍडिक्शन" होते. व्यायाम एक महत्वाचे अँटीडिप्रेसंट आहे.

शरीराचे रसायनशास्त्र समजून घेतले की काय खावे आणि काय खाऊ नये याचा अंदाज येतो. पण असे बदल करताना डॉक्टरांचा सल्ला घेणे उत्तम आहे. तसेच गोळ्या असतील तर डॉक्टरना विचारूनच बंद करणे किंवा कमी करणे योग्य आहे. शेवटी कुठलेही डाएट आपल्याला आणि आपल्या जीवनशैलीला सूट होणे महत्वाचे. त्यामागील प्रिन्सिपल एकच असणार आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर लेख.
हे असं खाल्ल्याने नक्की वजन/ साखर का कमी होते हे मस्त समजावून सांगितलयस. हे का समजलं की आणखी छान वाटतं.

उत्तम लेख.
शाम भागवतांचा कोणता लेख ? दीक्षित प्रणाली ? हे वाचून घ्यावे असे वाटू लागले आहे. नंतर पुन्हा येतो या धाग्यावर.

effortlessjag@gmail.com येथे मेल करा.
किवा
डॉ. दिक्षीतांचा फोन नं. ९९२२९९४७७७ आहे. या नंबरवर व्हॉट अ‍ॅपवर तुमचा प्रश्न विचारा.
किंवा
त्यांचा इमेल drjvdixit@gmail.com येथे कळवा.
किवा
मायबोलीवरील सदानंद कुलकर्णी यांना व्य.नी. करून बघा.

ह्याला जाहिरात म्हणत नाही का? दुसर्‍याने एवढ्या कष्टाने लिहिलेल्या अभ्यास पूर्ण धाग्यावर आपली पोळी भाजणे चालते का?
हे ethical आहे?

@अमितव
तुम्हाला विपू केली आहे.

छान माहिती धन्यवाद. मी दिक्षित डाएट फॉलो करत आहे
कॅलरी मोजण्यासाठी कोणते अ‍ॅप वापरावे ? भारतीय / महाराष्ट्रीयन पदार्थांंच्या कॅलरीजचा डेटाबेस असलेले अ‍ॅप आहे का?

हेल्दीफाय मी नावाचे अँप आहे, त्यात भारतीय पदार्थ आहेत
खूप कॉमन महाराष्ट्रीय पदार्थ आहेत,
आता तुम्हाला धोंडस, निनावे वगैरे नाही मिळणार Wink पण पोहे, वगैरे मिळतील

आता तुम्हाला धोंडस, निनावे वगैरे नाही मिळणार Wink पण पोहे, वगैरे मिळतील >>> Lol धन्यवाद. पोहे, पोळ्या, भाकरी हेच अपेक्षित आहे.

हेल्दीफाय try केलं. त्यात कॅलरी मोजल्यावर त्यांनी direct dietician assign केला Uhoh
मला फक्त कॅलरी मोजायच्या आहेत. dietician/consultant नको.

नाही त्याचा फारसा त्रास नसतो, तुम्ही कधीतरी पेड सर्व्हिस घ्याल अशी त्यांना आशा वाटते,
आपण बधायचं नाही त्याला Happy

भारतीय पदार्थांचे कॅलरी मोजणे अवघड आहे. त्या फंदात पडूच नये. कारण प्रत्येकाच्या घरातली पोळी, भाजी, फुलका, भाकरी ह्याचा आकार, वजन आणि धान्याची-भाजीपाल्याची जात, पोषणमुल्य वेगवेगळे असते. प्रत्येक घरात वापरले जाणार्‍या घटकांचे प्रमाण वेगवेगळे असते, पद्धत वेगवेगळी असते. हेल्दिफाय असो की कोणतीही जागतिक दर्जाची लॅब असो, तिथे त्यांनी तपासलेले दडपे पोहे हे तुमच्या घरात तुम्ही तयार केलेल्या दडप्या पोह्यांचे वजन, माप व कॅलरीज सारख्याच असतील याची कोनतीही शाश्वती नाही. थर्ड पार्टी डेटाबेस अ‍ॅप्स हे केवळ ग्राहक मिळवण्यासाठी व टिकवण्यासाठी असतात. त्यातून जुजबी माहिती दिल्यासारखे दाखवणे हाच उद्देश असतो.

तसेही कॅलरी इन कॅलरी आउट हे तत्त्व शंभर टक्के परफेक्ट नाहीये. सेम कॅलरी काउंट असलेल्या भिन्न पदार्थाचे पोषणमूल्य व दर्जात्मक महत्त्व वेगवेगळे असू शकते.

नेहमीप्रमाणेच खुप सहजपणे नीट समजावून सांगणारा लेख
पण एक शंका
तुम्ही कुठल्याही प्रस्थापित डाएटिशियनचा अशा आहाराचा दिनक्रम बघा. दर दोन तासांनी खायचे असले तरी ते काय खायचे याला अनन्यसाधारण महत्व आहे. बऱ्याच वेळा अशा प्रणालीमध्ये फॅट आणि कार्ब्स दोन्हीवर कंट्रोल असतो. शक्यतो शेवटचे जेवण हे सातच्या आत किंवा आसपास घेण्याचाही आग्रह असतो. अशा प्रणालीमध्ये एका जेवणात पोळी आणि भात एकत्र कधीच नसतो. मधल्या वेळेतील स्नॅक्ससुद्धा लो कार्ब्स म्हणावीत अशीच असतात. जसे की बदाम, ताक, ग्रीन टी, चीज इत्यादी. तसेच एका वेळी किती खायचे याला मर्यादा असते. साखर वर्ज्य असते.
काहीही खाल्ल्यावर इन्सुलिन स्त्रवते हे बरोबर आहे. पण ते किती स्रवणार हे आपले अन्न ठरवते. - दीक्षित यांच्या भाषणातून मला जे कळले ते म्हणजे तुम्ही काहीही खाल्ले तरी शरीर ठरलेल्या प्रमाणातच इन्सुलिन सोडते. ते तुम्ही किती खाता यावर अवलंबून नसते

मस्त समतोल राखून लिहिलेला लेख!

माझी शंका -
दिवसातून दोन वेळा जेवण करताना सकाळी ८ आणि रात्री ८ असे वेळापत्रक असल्यास लाभ्/नुकसान काय?

मी आय एफ सुरु केले आहे. मल तशी सवय आहे त्याची कामाच्य स्वरुपा मुळे.

पण मी नश्ता सोडु शकत नाही. आणि नंतर कधी कसे काय किति जेवायला मिळेल हे ही नक्की नस्ते, ( का माच्या स्वरुपामुळे).
म्हणुन मी ४ ते ५ वेगवेगळ्या दिस्वशी ट्रायल घेवुन ठरवले, कि मी सकळी ९ ते ०९ ३० च्या सुमारास भकरी, वरण, भाजी, कोशिंबीर् असे जेवण करुनच कामाला जावे आणि रात्री ०८ ३० ते ९ च्या दर्म्यान असेच जेवण.

@हेला,
तुमची 24 August, 2018 - 12:27 ची पोस्ट.
संपूर्णपणे सहमत.

कॅलरीजच्या गुंतागुंतीच्या व्याख्या आल्या की सर्वसामान्य माणूस, हे काय आपल्या आवाक्यातल नाही किंवा हे काही आपल्याला झेपायचे नाही अस मनातल्या मनात म्हणून, त्या डाएट प्लॅन पासून लांब गेलाच असे समजायला हरकत नाही.

हे असले कॅलरीजचे प्रकार डॉ. XXX यांच्या व्याख्यानात अजिबात नाहीत त्यामुळे ती पध्दत समजून घ्यायला व अवलंबायला सोपे जाते असा माझा वैयक्तिक अनुभव आहे.

भागवत सर
माझ्याकडे आता तो चार्ट नाहीये. पण त्यात चपाती , भात , डाळ अशा पदार्थांचे वजन लिहीलेले होते आणि त्यापुढे कॅलरीज. पदार्थाच्या वजनामुळे स्टँडर्डायझेशन होत असे.
व्हीएलसीसी वाल्यांनी दिलेला होता कि कुठच्या पुस्तकात आहे हे आठवेना.

अतिशय सुंदर लेख.
अगदी सोप्या शब्दांत सुटसुटीत व्यवस्थित मांडले आहे.

Pages