कथा : मैत्रा - भाग २

Submitted by भागवत on 10 August, 2018 - 10:42

कथा : मैत्रा - भाग १

प्रकरण – कुटुंब

अचानक एक दिवस एक साठीतील महिला मिहीरला भेटायला आल्या. मैत्राला वाटले की कोणी तरी ओळखीची असेल. महिलेचा सोज्वळ चेहरा, कपाळावर थोड्या आठ्या, करारी आवाज मैत्राला जाणवला. ज्यावेळेस त्या बाई जवळ येऊन मैत्राचा चेहरा न्याहाळत होत्या त्यावेळेस मैत्राला खूप विचित्र वाटले. त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. डोळ्यातून काहीतरी सांगायचा त्या प्रयत्न करत होत्या. पण मैत्राला चेहर्‍यावर काहीच वाचता आले नाही. मिहिरच्या वागण्यात काही विशेष जवळीक जाणवली नाही. मिहीरला त्या दोन मिनिटे बोलल्या. बोलणे म्हणजे काय त्या महिलेने मिहिरला काहीतरी सांगीतले आणि मिहिरने नकार दर्शवण्यासाठी मान हलवली. जाताना त्या निराश दिसल्या. मैत्राने त्या स्त्रीबद्दल माहिती जाणून घेण्याची उत्सुकता लागली.

मग त्या गेल्या नंतर मिहीरला विचारले त्या काकू कोण होत्या आणि का आल्या होत्या? मिहिर म्हणाला त्याचं नाव सुभद्रा आहे म्हणजे तुझ्या सासूबाई होत्या. मैत्राला जबरदस्त धक्का बसला. मैत्राला काय बोलावे हेच सुचेना. आत्ता गेलेल्या महिला दुसर्‍या तिसर्‍या कोणी नसून तिच्याच सासूबाई होत्या. आत्ता तिला कोडे पडले की आपल्या आईशी हा माणूस असा अलिप्त का वागला असेल? तिच्या मनात त्यांच्या बद्दल विचाराचे थैमान सुरू झाले. तिला आठवले मिहिरने तिला कधीच सासूबाई बद्दल सोडा कुटुंबा बद्दल सुद्धा सांगीतले नव्हते. ही अशी अचानक सासूबाईची भेट आणि मिहीरचे वागणे तिच्या काही पचनी पडत नव्हते. बरं त्यांनी सुद्धा आपली ओळख सांगीतली नाही की मी मिहीरची आई आहे. एवढ्या दिवसाच्या संसारात आणि लग्ना अगोदरच्या ओळखीत एकदा सुद्धा मिहीरने आईचे नाव काढले नाही. तिला काय गौडबंगाल आहे काहीच कळत नव्हते. मिहीरने कंपनीतील ओळखीपासून ते लग्ना पर्यंत कधीच नाव काढले नाही तेही आई असून सुद्धा. ऐकावे ते नवलच आणि बघावे ते नवलच. किती ही लपवले तरी आपल्या माणसा बद्दल आपुलकी आणि प्रेम डोळ्यात आणि वागण्यात दिसतेच. आणि तेच तिच्या सासूबाई डोळ्यातून सांगत होत्या.

मैत्राने मिहीरला या सगळ्यांचा खडसावून जाब विचारला. महत्त्वाची गोष्ट का लपवली यावर मैत्राने आगपाखड केली.

मैत्रा – “मिहीर तू मला विनाकारण फसवले आहेस? का असा वागलास मा‍झ्याशी?”

मिहीर – “मी तुला माहिती दिली नाही. पण मी तुला फसवले नाही.”

मिहीर – “माझे कुटुंब जळगावच्या एका तालुक्याच्या ठिकाणी राहते. माझे शिक्षण तिथेच झाले. माझे मा‍झ्या घरच्या सोबत पटत नसल्या मुळे मी त्यांच्या पासून वेगळा राहतो. मी त्यांना मागेच १० वर्षा खाली सोडून आलोय. आत्ता माझा त्यांच्याशी काहीच संबंध नाही. आणि मी हे सोडून काहीही लपवलेले नाही. आणि यामुळे तुला काय फरक पडणार आहे. तू तर आधुनिक आहेस आणि तुला सासू असली काय नसली काय फरक पडणार आहे? त्यांचा आपल्या संसारात काहीच अडसर नाही.”

मैत्रा – “हे तुला मला आधी सांगीतले असते तर बरे झाले असते. आणि तू तुझ्या जन्मदात्री आईला कसे काय विसरलास?”

“त्या इथे कशासाठी आल्या होत्या? काय बोलल्या.”

“त्या मला इथे भेटायला आल्या होत्या आणि समजावून सांगण्यासाठी की घरी कधी तरी येत जा?”

“मला माहिती नाही ते आधी त्यांना परत बोलवून घे आणि ठीक ओळख करून दे.”

मिहिरने त्यांच्या आईला फोन लावला तर त्या गावी परत निघाल्या होत्या.

कुटुंबाची पडझड...
मनाची घुसमट...
नात्याची धडपड...
जीवाची फरफट...

प्रकरण – काळ

मैत्राला सत्य जाणून घ्यायचे होते त्यामुळे मैत्रा आणि मिहीर गाडीने जळगाव जवळच्या त्याच्या गावी जायला निघाले. गावातील वाड्यात पोहचले. चिरेबंदी वाडा, खानदानी कुटुंब आणि छान माणसे यांनी वातावरण भरून गेल होत. तिथे त्यांना पाहून मिहीरच्या आईला अति आनंद वाटला. सगळे त्यांच्या आकस्मिक भेटण्याने भारावून गेले. तिथे तिला मिहीरचे सगळे कुटुंबच भेटले. मिहीर आला म्हणल्या नंतर सगळेच त्यांच्या मायेची माणसे जमा झाली. विशेष करून आई, बहिण ‘एकता’, ‘सई’ वाहिनी, पुतण्या ‘आकाश’ आणि इतर मंडळी हजर होती. ‘एकताने’ सांगीतले तिच्या सासूबाईला सगळे प्रेमाने “अक्का” म्हणतात. सगळा वाडा मैत्राला दाखवला. “एकता” मिहीर पेक्षा ३ वर्षानी मोठी होती. अक्काच्या खोलीत मिहीर आणि मैत्राचा फोटो बरेच काही सांगून जात होता. कुटुंब बघून मैत्राला चांगले वाटले पण मिहीर कुटुंबा पासून लांब का आहे यांचे कोडे उलगडले नव्हते.

मग घरचे भावनिक वातावरण शांत झाल्यावर मैत्राने अक्काला विनंती केली की त्यांच्यात हा दुरावा कशासाठी निर्माण झाला याची माहिती सांगा. अक्काने सांगीतले की १२ वर्षा पूर्वी घडलेली कथा सांगितली. आमचे कुटुंब गरीब आणि शोषितासाठी काम करते. गरजू लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडते. मिहीरच्या वडीलांना सगळे प्रेमाने “हरिभाऊ” म्हणतात. गावाचे दमदार व्यक्तिमत्व. सगळे गाव त्यांचा आदर करायचे. मी सुद्धा बचत गटाच्या माध्यमातून आणि शोषिताना न्याय मिळवून देण्यासाठी राजकारणात माझा चंचु प्रवेश झाला. त्या पाठोपाठ मा‍झ्या कडे बरीच लोक अडलेले नडलेले कामे घेऊन यायचे आणि आज सुद्धा येतात. त्यासाठी मला लोकेशची म्हणजे मिहीरचा मोठा भाऊ याची मदत व्हायची. त्यामुळे तो सुद्धा राजकारणात आला. आणि मला हत्तीचे बळ मिळाले. लोकेश फक्त मिहीर पेक्षा आठ वर्षांनी मोठा होता. लोकेश रांगड्या शरीरयष्टीचा, लढाऊ होता. गरीब लोका बद्दल विशेष ममत्व होते. सगळे नातेवाईक सांगायचे राजकारणात पडू नका. राजकारण म्हणजे न सुटणारा बुद्धिबळाचा खेळ आहे. त्यात कधी आपला विजय होतो तर कधी विरोधकांचा. पण पूर्णपणे खेळ आपण जिंकलो असे होत नाही. त्यात एकमेकांवर कुरघोडी करणे चालू असते. जसे तुमच्या चांगल्या कामाचा दरवळ पसरतो तसे तुमचे प्रतिस्पर्धी सुद्धा वाढत जातात.

आमच्या गावातून मोठी नदी वाहते. गावातील काही मंडळी नदी पात्रातील वाळू उपसण्याचा मोठा व्यवसाय करतात आणि तेथील ठेकेदार बेकायदा वाळू उपसा करून ‘वाळू सम्राट’ झाले होते. तिथे लक्ष्मण नावाचा प्रमुख ठेकेदार होता. मी ज्यावेळेस निवडणुकीला उभा टाकले त्यावेळेस त्यांनी आम्हाला खूप घाबरवण्याचा प्रयत्न केला. कारण सगळी कडे त्यांची माणसे होती. प्रचारा वेळेस त्यांची माणसे आमचा पाठलाग करायची. एक वेळेस तर मी, लोकेश असे प्रचारा वेळेस गेलो असताना त्यांची गाडी आमच्या मागे हात धुवून आमच्या पाठीमागे लागली होती. आम्ही तेथून कसे तरी निसटलो. चांगल्या कामाचे फळ मला मिळाले आणि मी निवडणूक जिंकली. मी निवडून आल्यावर बेकायदा वाळू उपसण्यावर लगाम लावला. जसे बिळात पाणी गेल्यावर नाग बाहेर येतो त्याच प्रमाणे लक्ष्मण आमच्या विरोधात उभा टाकला. त्याचा एका प्राणघातक हल्यात माझा मोठा मुलगा मारला गेला. मिहीरचा आपल्या भावावर खूप जीव असल्यामुळे त्याने हे राजकारण सोडायचा हट्ट केला. पण मी ज्या कारणामुळे राजकारण केले ते मी सोडू शकले नाही. परंतु लोकेश मृत्यू झाल्याचे शल्य आजही मला आणि मिहिरला आहे. मोठ्या मुलाचा असा दुर्दैवी अंत बघून मिहीरच्या वडीलांनी कायमचे अंथरून पकडले. त्याचा परिणाम मिहीरवर होऊन तो वयाच्या १८ वर्षी घरातून निघून गेला.

बुद्धिबळाचा डाव...
झाला खोल घाव...
काळाचा कठोर घाला..
नियतीचा दोष झाला...

प्रकरण – पाऊल

मिहीर आणि मैत्रा तिथे एक आठवडा गावात राहून वापस शहरात गेले. तिथे मिहीर जास्त काही बोलला नाही पण त्याच्या मनावरील अढी कमी होईल असे वाटत होते. तो सगळ्यांशी व्यवस्थित बोलला पण आईशी जास्त काही बोलू शकला नाही. पण मैत्राने सगळ्यांशी चांगले बोलून मन जिंकले होते. मैत्राचे आणि कुटुंबाचे दर आठवड्याला फोन वर बोलणे व्हायचे आणि हळूहळू मिहीरचा राग शांत होत होता.

आणि एक दिवस ती गोड बातमी आली की मैत्रा गर्भवती आहे. या बातमीची मिहीर आणि मैत्रा २ वर्षा पासून वाट बघत होते. मिहीरचा आनंद गगनात मावत नव्हता. अखेर ती गोष्ट सत्यात उतरली होती. आनंद अशी गोष्ट आहे की दुखऱ्या नसेवर फुंकर मारते. मैत्राने अक्काशी बोलून ही बातमी कळवली. आणि संपूर्ण कुटुंब आनंदात डुबून गेले. पहिले ५-६ महिने मैत्राने ऑफिस काम केले पण त्यानंतर डॉक्टराने आराम करायला सांगीतला. आराम करण्यासाठी अक्काने आणि मैत्राची आई सुद्धा तिला बोलवत होती. पण मैत्रा अक्का कडे गेली कारण तिला नात्यातील अंतर कमी करायचे होते. याला मिहीर काही विरोध करू शकला नाही.

तिला गावात राहिल्या वर अक्काचे काम समजले. गरजू लोक अडले नडले काम घेऊन यायची. त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करणे गरजेचे होते. त्यांचा पूर्ण दिवस लोकांचे प्रश्न सोडवण्यात जायचा. सासुबाई NGO सुद्धा चालवायच्या. त्यात गरीब मुलांना शिक्षणाची सोय होती. एकदा मैत्राने अक्काला विचारले तुम्हाला लोकांना मदत करून काय मिळते. तर त्यांनी सांगीतले की आपल्या मदतीमुळे कोणी गरजू मुलाची मदत होऊन तो शिक्षण शिकत असेल तर मी समजेन माझा लोकेशच शिकतोय. मैत्रा अक्काचे काम फार जवळून बघत होती. त्यांच्या कामामुळे ती खूपच प्रभावित झाली. त्यांच्या खोलीतील मिहीर आणि मैत्राच्या फोटो बद्दल त्यांनी सांगीतले की त्यांना मैत्रा बद्दल आधी पासून माहीत आहे. मिहीर वर त्यांचे आधी पासून लक्ष होते. त्यांच्या खोलीत मिहीरच्या लग्नातील फोटो होता. बाई म्हणाल्या की आपले माणूस नाराज झाले म्हणून काही नातं तोडायचे नसते. यथावकाश मैत्राची प्रसूती झाली आणि तिला मुलगा झाला. त्याच नाव “श्रीरंग” ठेवण्यात आहे. त्यानंतर मिहीर तिला मुंबईला घेऊन गेला.

तिथे “सुभद्रा” अक्काचे विरोधक स्वस्थ बसून नव्हते. त्यांना काहीही करून अक्काना हरवायचे किंवा त्यांचे समाजातील महत्त्व कमी करायचे होते. पण आत्ता त्या खुप थकल्या होत्या. त्यांना म्हणावी तशी साथ भेटत नव्हती. गावातील लोकांना त्याचा खुप त्रास व्हायचा. बाई होत्या म्हणून ते दचकून असायची. अक्का नसत्या तर त्यांचा गाव गुंडा करून खुप छळ झाला असता. आत्ता सुद्धा काही लोक गुत्यावरील दारू पिऊन हैदोस घालायची. पण बाईचे कार्यकर्ते त्यांना आवरायचा प्रयत्न करायची. अश्याच असंघटीत आणि वेठ बिगार लोकांची पिळवणूक व्हायची.

पण अक्काचे समाजकार्यातील काम तिला स्वस्थ बसू देत नव्हते. तिला अक्काचे एक स्त्री म्हणून कौतुक तर होतेच पण एक धडाडीची, कर्तव्य दक्ष व्यक्ति म्हणून आदर होता. अशी खूपच कमी लोक तिने बघितली होती. तिच्या जवळपासच्या दुनियेत अशी लोकच नव्हती दुसर्‍या साठी झटणारी. आपली प्रगती आणि आपण हेच तिची आज पर्यंतची वाटचाल होती. तिला जीवनाचा असा दृष्टीकोन याचा साक्षात्कार पहिल्यांदाच झाला. तिला मनातून वाटले की आपण सुद्धा समाज उपयोगी काही तरी करायला पाहिजे. तिला पहिल्यांदा स्वत:ला वाटले की अक्काचा वारसा कोण चालवणार. शेवटी तिने ठरवले की आपणच अक्काचा वारसा पुढे चालवायचा. नोकरी तर आत्ता पर्यंत केली आहेच. जर तिथली समाजसेवा जमली नाही तर परत नोकरी सुरू करता येईल. पण त्यातून आपल्याला दुसर्‍याला काहीतरी मदत करता येईल आणि शिकता येईल.

गृहीतकाचा तिढा...
कार्याची दखल...
समस्येचा वेढा...
प्रश्नाची उकल...

प्रकरण – सुरुवात

मैत्राला माहीत होते की मिहीरचा याला कडाडून विरोध होईल. कारण मुंबई सारख्या शहरातून सुखवस्तू कुटुंबातून आणि चांगल्या हुद्याची नोकरी सोडून समाजकार्य करायचे म्हणजे साधी सोपी गोष्ट नव्हती. मिहीरला पहिल्यांदा वाटले की तिला अक्का बद्दल सहानुभूती असेल म्हणून मैत्रा असे ठरवत असेल. मिहिरने तिला विचारले की “तुला अक्काचा वारसा का पुढे न्यायचा आहे?”
“कारण अक्काच्या कामामुळे मी प्रभावित झाले आहे” – मैत्रा
“मग तुला फोन वर जितकी मदत करता येते तेवढी कर. जास्त काही फंदात पडायची गरज नाही.”
मी पूर्वी राजकारणाची फळ भोगली आहेत. असा हटहास चांगला नाही.
“मला माहीत आहे त्यासाठी तू १२ वर्ष पळत आहेस. पण त्यांचा वारसा कोणी तरी चालविला पाहिजे.”
“मी पळत नाही. पण मला ते दुख पेलवले नाही. डावात हारजीत ठीक आहे पण जीव जात असेल तर काय करायचे अशा कामाचे”
“पण जीव तर कुठेही जातो. ती जोखीम तर कुठेही असते. ही वेळ अक्काला साथ द्यायची आहे. वारसा जर मी मार्गा वर चालू शकले तरच मार्गक्रमण करता येईल. ”
मैत्राच्या हट्टा पुढे मिहीरचे काही चालू शकले नाही आणि त्याने प्राणाची जोखीम टाळण्याच्या अटी वर परवानगी दिली.” पण त्याला मैत्राची काळजी लागून राहिली होती.
अक्काने खुल्या दिलाने स्वागत केले आणि त्यातील धोका विशद केला. अक्काने तिला आपल्या पंखाखाली घेतले आणि तिचे खास प्रशिक्षण सुरू केले. अक्का प्रत्येक निर्णय घेताना मैत्राला मत विचारायची आणि स्वत:चे मत मांडायची. मग त्या मताची पार्श्वभूमी समजावून सांगायची. काय चूक आणि काय बरोबर याचा ऊहापोह व्हायचा. मग त्यातून निर्णायक मत तयार व्हायचे. NGOचे कार्य पद्धती अक्काने तिला समजावली. मैत्रा जसे कार्य समजावून घ्यायची तसे ती त्यात जास्त स्वारस्य घेत होती. तिला कष्टकरी लोकांची दुःख जवळून बघायला मिळाले. तिची तारेवरची कसरत व्हायची. नवरा मुंबईत आणि काम गावात. मुंबई ते गाव अश्या तिचा बऱ्याच वेळेस प्रवास व्हायचा. लहान मुलांची काही काळजी नव्हती कारण घरात बरीच माणसे होती काळजी घ्यायला.
लक्ष्मण ठेकेदार यांची मधून खटपट आणि त्रास चालूच असायचा. दारूच्या गुत्यावर त्याच्या गुंडांचा उपद्रव खूपच वाढला होता. गावातील लोक हतबल झाली होती. पण तो त्यांना काही ऐकायचा नाही. मैत्रा गावातील एका कुटुंबाचा समस्या सोडवण्यासाठी गेली होती. तिथे तिला एका माणसाने हटकले.
“बाई का आलात या दलदलीत. गप-गुमान मुंबईला वापस जा. यातच तुमचे भले होईल.”
“तुम्ही कोण आहात मला मुंबईला परत जायला सांगणारे.”
“बाई तुम्हाला लवकरच प्रचीती येईल. मी कोण आहे” असे म्हणून ती व्यक्ति निघून गेली.
मैत्राने सोबत असलेल्या महिलेला विचारले की हे गृहस्थ कोण होते. त्यांनी हा गावातील नामांकित गुंड “लक्ष्मण ठेकेदार” असे उत्तर दिले. लक्ष्मणच्या चेहर्‍यावर खुनशी भाव होते. राकट चेहरा.. उत्तम शरीरयष्टी... भेदक नजर... चेहर्‍यावर घाव.. आणि जबरदस्त संवाद फेक.. तिथे लक्ष्मण आपल्या गुंडा सोबत आला होता. तिथे सुद्धा तो अरेरावी करत बोलत होता. तिला लक्ष्मण माहीत नव्हता आधी नाहीतर मैत्राने त्याला समर्पक उत्तर दिले असते. मैत्राने हा प्रसंग अक्काला सांगीतलं. अक्का म्हणाली की आत्ता तिला अशा प्रसंगाची तयारी ठेवावी लागेल.
एक दिवस मैत्राने ठरवले की दारूच्या दुकाना विरुद्ध लढा द्यायचा. तिने आपल्या परीने गावातील महिलांना गोळा करायला सुरुवात केली आणि गाव गुंडा विरुद्ध आवाज उठवायचे ठरवले. पण सरकार दरबारी दारूचे बेकायदा दुकान बंद करण्यासाठी अर्ज देऊन सुद्धा काही होत नाही बघून तिने लढा उभारला. जिल्हाधिकारी, पालकमंत्री पासून ते सर्व अधिकार्‍यांना सांगून सुद्धा काम झाले नसल्यामुळे मैत्राने लढा तीव्र केला. मग सगळ्या महिलांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. अक्काने या लढाईत खूप साथ दिली. मोर्चा काढून सुद्धा काही परिणाम होत नाही म्हटल्या नंतर तिने मतदान घेऊन दारू दुकान बंद करण्यासाठी जनजागृती केली. त्यात तिचे बरेच महिने खर्ची पडले. पण तिच्या प्रयत्नांना यश आले आणि तिने गावातील जवळपास ७०% महिला मतदारांना गोळा केले आणि उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रार करून दारू दुकान बंद करायची विनंती केली. उत्पादन शुल्क विभागा कारवाई होऊन लक्ष्मणचे दुकान बंद झाले. सगळ्यांना खूप आनंद झाला पण मैत्राला आणि अक्काला माहीत होते की ही तर फक्त सुरुवात होती.

ध्यास नवा...
संघर्ष हवा...
इच्छेचा प्रकाश...
मोकळे आकाश...

समाप्त....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मैत्रा – “माझे कुटुंब जळगावच्या एका तालुक्याच्या ठिकाणी राहते. माझे शिक्षण तिथेच झाले. माझे मा‍झ्या घरच्या सोबत पटत नसल्या मुळे मी त्यांच्या पासून वेगळा राहतो. मी त्यांना मागेच १० वर्षा खाली सोडून आलोय. आत्ता माझा त्यांच्याशी काहीच संबंध नाही. आणि मी हे सोडून काहीही लपवलेले नाही. आणि यामुळे तुला काय फरक पडणार आहे. तू तर आधुनिक आहेस आणि तुला सासू असली काय नसली काय फरक पडणार आहे? त्यांचा आपल्या संसारात काहीच अडसर नाही.”

>>> इथे मिहीर हवे आहे.